पुणे-वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत.
सहा दिवसांपूर्वी वडगावशेरी भागातील अजित पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे आणि माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देऊन यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे एकूणच महायुतीला धक्का मानला जात आहे. या सर्व घडामोडी दरम्यान चंद्रकांत टिंगरे यांच्यावर आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.चंद्रकांत टिंगरे यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळताच चंद्रकांत टिंगरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात केली. या हल्लेखोरांचा पोलीस तपास करीत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे म्हणाले की, निवडणूक मतदानाला काही तास उरले आहे. वडगावशेरी भागातील महत्वाच्या नेत्यावर, कार्यकर्त्यांवर हल्ला होणे ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. हिंसेचा आधार घेऊन कोणी धमकावत असेल तर त्यांचे मनोदय यशस्वी होणार नाहीत. ही संतांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. निर्भय बनून हिंसेचा प्रतिकार केला जाईल आणि लोकशाहीच्या मार्गाने हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल, अशा शब्दात या घटनेचा त्यांनी निषेध नोंदविला.