पोलिस बंदोबस्तात महायुतीचे पैशांचे वाटप–विनोद तावडे स्वतः पैसे वाटतात हे आश्चर्य
मुंबई -विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. आता या निवडणुकीतील भाजपचा खेळ खल्लास झाला आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला. भाजपतील बहुजन नेतृत्व संपवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी तावडेंना अशा प्रकारे पकडून देण्याचे कारस्थान रचले, असेही ते यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडले, ते कॅमेऱ्यापुढे आहे. या प्रकरणी खुलासे कशाचे होत आहेत? भाजपचा खरा चेहरा उघड झाला. त्यांचा या निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे भाजपचे सरचिटणीस आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस यांच्याकडे तब्बल 5 कोटी रुपये सापडलेत. बहजुन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे जप्त केलेत. पैसे तोंडावर फेकले तोंडावर व गोंधळ घालून विनोद तावडे यांना तिथे कोंडून ठेवले. यावर कोणता खुलासा करणार हे भाजपने सांगावे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात आचारसंहिता लागण्यापूर्वी किमान 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले. आता आज नाशिकमध्ये भाजप व शिंदे गटाचे पैसे पकडले. मुंबईत पैसे वाटण्यासाठी ठाण्यातून खास माणसे नियुक्त करण्यात आली आहेत. ठाण्याच्या बाजूला ईशान्य मुंबई आहे. तिथे शिंदे यांचे राम रेपाळे यांचा माणूस आहे. हा माणूस रात्रीच्या अंधारात पैसे घेऊन येतो व मतदारांना पैसे वाटतो. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ठाण्याला परत जातो. या प्रकरणी राम रेपाळे हे नाव सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. 23 तारखेनंतर या व्यक्तीचे काय करायचे हे स्वतः मी पाहणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
माझ्याकडे पैसे वाटणाऱ्या महायुतीच्या 18 लोकांची नावे आहेत. पण विनोद तावडे स्वतः पैसे वाटत आहेत हे आश्चर्य आहे. हे लोक आमच्या बॅगा तपासतात, आमचे खिसे तपासतात. विनोद तावडे यांच्याकडे 15 कोटींहून अधिकची रक्कम होती. त्यातील 5 कोटी रुपये जप्त झालेत, असेही ते यावेळी म्हणाले.
विनोद तावडे यासंबंधीची माहिती भाजपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना दिली. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. ते बहुजन समाजाचा चेहरा आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. त्यांच्या हातात या राज्याची काही सूत्रे आहेत. ते मोदी व शहांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने पकडून देण्याचे कारस्थान भाजपमध्ये रचले गेले. ज्यांच्याकडे गृह खाते आहे त्यांच्याकडे यासंबंधीची जास्त माहिती असते, असेही संजय राऊत यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.
संजय राऊत यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. निवडणूक आयोग निष्पक्षपाती असता तर ही कारवाई बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांऐवजी आयोगाने केली असती, असे ते म्हणाले.विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना दोन डायऱ्या सापडल्या. विनोद तावडे यांनी तिथे आपली बैठक सुरू होती असा दावा केला आहे. पण मतदानापूर्वी 489 तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का? एवढी अक्कल तावडे यांना नाही का? आता पोलिस या प्रकरणात कोणती कारवाई करतात हे पहावे लागेल. कारण, सरकार त्यांचेच आहे, असेही हितेंद्र ठाकूर यावेळी बोलताना म्हणाले.