पुणे : “देशाच्या प्रगतीसाठी युवा पिढी निरोगी व व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे. तंबाखू, सिगारेट आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने जनजागृती करणे काळाची गरज आहे. त्या दृष्टीने दीप्ती चवधरी यांनी पुढाकार घेऊन काँग्रेस भवन येथे आयोजित केलेला ‘ व्यसनांची होळी’ उपक्रम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व व्यसनमुक्ती चळवळीचे जनक डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले.
व्यसनाच्या जाहिराती दाखवून तरुणांची दिशाभूल करून त्यांना व्यसनग्रस्त केले जात आहे त्यामुळेच व्यसना विरोधात लढा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस भवन येथे ते बोलत होते.
31 मे – जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना दीप्ती चवधरी म्हणाल्या की, देशाचे भविष्य असलेली आपली युवा पिढी जर व्यसनाच्या विळख्यात अडकली, तर देशाची प्रगती खुंटेल. सशक्त आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम आपली तरुण पिढी निरोगी, सुदृढ आणि व्यसनमुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण सर्वांनी मिळून तंबाखू, सिग्रेट आणि ड्रग्ज यांसारख्या आरोग्यास घातक असणाऱ्या व कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या व्यसनांना समाजातून हद्दपार करण्याचा संकल्प केला पाहिजे. पुणे काँग्रेसच्या वतीने केवळ आजच्या दिवसापुरते मर्यादित न राहता, भविष्यातही शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवले जातील, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस भवन पटांगणात तंबाखू, सिगारेट व अंमली पदार्थांची ‘होळी’ करण्यात आली.
यावेळी डॉ. कल्याण गंगवाल यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे मनपा काँग्रेस पक्षाचे गटनेते एडवोकेट रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी भूषवले. प्रारंभी दीप्ती चवधरी यांनी डॉ. कल्याण गंगवाल यांचा स्वागत व सत्कार केला.
एडवोकेट रामचंद्र उर्फ चंदू शेठ कदम म्हणाले, शालेय विद्यार्थी व तरुणांना व्यसनाकडे आकर्षित करण्यात येत आहे, ही चिंतेची बाब आहे. पुणे शहरात अमली पदार्थ फोफावत असून हे शहर ड्रग्स मुक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम लढा देत राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी “सशक्त भारताचा एकच नारा, तंबाखूला देऊ नका थारा” तसेच “तंबाखू, सिगारेट, ड्रग्जला द्या झटका, युवा पिढी वाचवा” अशा घोषणांनी काँग्रेस भवन पटांगण दुमदुमून गेले. तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आजार, कर्करोगाचा धोका आणि व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक व जनजागृतीची पोस्टर लावण्यात आली होती.
यावेळी हृदय रोग तज्ञ डॉ. राहुल सावंत, द. स. पोळेकर, बाळासाहेब आमराळे, दत्ता जाधव, राजाभाऊ कदम, अविनाश अडसूळ, राहुल वंजारी, सुरेश नागरे, दिलीप लोळगे, एडवोकेट फैयाज शेख, राजेंद्र भुतडा, वेदिका सकपाळ, किशोर मारणे, शिवाजी सोनार, कान्होजी जेधे, हर्षद हांडे, युवक काँग्रेसचे राहुल सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक काँग्रेसचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

