विनोद तावडेंसह भाजप उमेदवारावर गुन्हा
मुंबई-बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी तावडे यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. नालासोपारा मतदारसंघात ही घटना घडली आहे.निवडणूक आयोगाने या प्रकरणी विनोद तावडे यांच्यासह भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.बहुजन विकास आघाडीच्या आरोपानुसार, भाजप सरचिटणीस विनोद तावडे मंगळवारी विरार पूर्वच्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यासोबत भाजप उमेदवार राजन नाईक व भाजपचे काही पदाधिकारी होते. तिथे त्यांची बैठक सुरू होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यांनी त्यांच्यावर पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप केला. त्यानंतर तिथे प्रचंड राडा झाला. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूरही आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या बुधवारी एका टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपरोक्त घटना घडली आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजन नाईक यांचा काँग्रेसच्या संदीप पांडे यांच्याशी सामना होणार आहे. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीनेही क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. विनोद तावडे मंगळवारी दुपारी येथे राजन नाईक यांच्या प्रचारासाठी आले होते. ते येथील विवांता हॉटेलमध्ये थांबले होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मते, विनोद तावडे यांनी स्वतः त्या ठिकाणी मतदारांना पैसे दिले.
तावडेंनी केली माफ करण्याची विनंती – हितेंद्र ठाकूर
दुसरीकडे, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांनी आपली माफी मागितल्या आरोप केला आहे. माझे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी बोलणे झाले आहे. विनोद तावडे यांनी मला फोन करून जाऊ द्या, माफ करा अशा प्रकारची विनंती करत आहेत. त्यांचे माझ्या फोनवर एक-दोन नव्हे तर 25 कॉल्स आलेत, असे ते म्हणालेत.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी भाजप विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी जी, हे 5 कोटी कोणत्या SAFE मधून निघालेत? जनतेचा पैसा लुटून तुम्हाला कुणी Tempo मधून पाठवला? असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
निवडणूक आयोगाने या प्रकरणी विनोद तावडे यांच्यासह भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर तावडे यांनी निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, हे माझ्याविरोधातील कारस्थान आहे. मी तिथे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. हे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे षडयंत्र आहे. पोलिस व निवडणूक आयोगाने त्याची चौकशी करावी.
ठाकूर म्हणाले- हॉटेलचे सीसीटीव्ही बंद होते, आम्ही चालू केले:हितेंद्र ठाकूर म्हणाले – विनोद तावडे मतदारांना पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यांच्यासारखा राष्ट्रीय नेता एवढे छोटे काम करणार नाही असे मला वाटत होते. हॉटेलमध्ये जाऊन त्यांना पाहिले असता तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. आमच्या विनंतीनंतर ते सुरू करण्यात आले. तावडे मतदारांना पैसे वाटप करत होते. ते हॉटेलमध्ये 3 तासांपेक्षा जास्त काळ थांबले होते.
विनोद तावडे म्हणाले की, “विरारच्या राड्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आपण पत्रकार परिषद घेतली त्याचा एक गुन्हा दाखल आहे. माझा मतदारसंघ नसताना मी तिथे गेलो यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. तर हितेंद्र ठाकूर त्या ठिकाणी आले त्यावर तिसरा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पैसे वाटप झाल्याचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. शंका आली तर तुम्ही सीसीटीव्ही तपासा.”