नागपूर-राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला झाला. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. या घटनेवरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात असताना नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी हा संपूर्ण घटनाक्रम कसा घडला? हे समजावून सांगितले आहे.
हर्ष पोद्दार म्हणाले, अनिल देशमुख सोमवारी रात्री 8 च्या सुमारास आपल्या मतदारसंघातील प्रचार संपवून घरी परतत होते. नरखेडहून परत येत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यात देशमुख यांच्या डोक्याला मार लागला. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून, आमचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर खबरदारी म्हणून संवेदनशील भागांतील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
विशेषतः या घटनेचा सर्वच अंगानी सखोल तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. मी स्वतः घटनास्थळाचा दौरा केला आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे त्यावर आताच एखादा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. पोलिस या घटनेतील तथ्य तपासून लवकरच वस्तुस्थिती उजेडात आणतील. सध्या अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या अलेक्सिस (मॅक्स) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, नागपूरचे पोलिस उपायुक्त राहुल मदाने यांनी पोलिसांनी रुग्णालय परिसरातील बंदोबस्तात वाढ केल्याचे सांगितले आहे. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेनागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनीही देशमुख यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. नरखेड येथून परत येताना बेला फाटा येथे आल्यावर अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक प्रकार घडला. त्यांना तात्काळ आरएच काटोल येथे तात्काळ प्राथमिक उपचार करून दर्शनी केअर सेंटर येथे उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस तपास करीत आहेत, असे ते म्हणाले.
अनिल देशमुख यांचे सुपुत्र तथा काटोल विधानसभेचे उमेदवार सलील देशमुख यांनी या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी काटोलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. भाजप राज्यात प्रत्येक ठिकाणी वाईट पद्धतीने पराभूत होत आहे. त्यामुळेच अशा पद्धतीचे हल्ले करून ते त्यांच्याविरोधात आवाज उंचावणाऱ्याचे डोके फोडण्याचा संदेश देत आहेत. त्यांचा काटोल व नरखेडमध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दुसरीकडे, भाजपने अनिल देशमुखांवरील हल्ला हा राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप केला आहे. देशमुख स्वतःच आपल्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करून घेतली, असे भाजपचे काटोल मतदारसंघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी म्हटले आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील यांचा सामना भाजपच्या चरणसिंह ठाकूर यांच्याशी आहे. दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.