Home Blog Page 571

गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सरकार गप्प का? – नारायण पांचाळ अध्यक्ष,जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र

राजापूर – मुंबई ही कामगारांची,एके काळी गिरणी कामगारांमुळे मुंबई गजबजलेली होती,मात्र,गिरण्या बंद झाल्या आणि मुंबईतला गिरणी कामगार संकटात सापडला,तो स्थलांतर करू लागला,कोकणातले अनेक चाकरमानी गिरणी कामगार आपापल्या गावाकडे परतले,खऱ्या अर्थाने अशा गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाले पाहिजे,आजच्या वृद्धावस्थेत सुद्धा शेकडो कामगार आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊ शकतात याचा सरकारने विचार करायला हवा,गिरणी कामगार व कामगारांच्या वारसांची घराची मागणी रास्त असून अशा घटकांच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचे पत्रकार नारायण पांचाळ यांनी राजापूरच्या मेळाव्यात प्रतिपादन केले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगार घरांसाठी पुकारलेला लढा न्याय असून या लढ्याला जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ यांनी येथे गिरणी कामगार आणि वारसांच्या सभेत बोलताना पाठिंबा दिला आहे.सरकार दिवसागणिक अनेक प्रश्नांवर शासन निर्णय जाहीर करते, मग गिरणी कामगारांच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल नारायण पांचाळ यांनी आजच्या राजापूर सभेत केला आहे. गिरणी कामगार घराच्या प्रश्नांवर अनेक संस्था संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला आहे.
गिरणी कामगार घरांच्या रखडलेल्या प्रश्नावर राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष सचिन भाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी बुधवारी महात्मा गांधी सभागृहात पार पडलेल्या कामगार आणि वारसांच्या सभेत सरकारला अल्टिमेशन देऊन एल्गार आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोकण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांमध्ये प्रचार दौरे आयोजित करण्यात आले आहेत.काल सावंतवाडी आणि कणकवली येथे कामगार आणि वारसांच्या सभा पार पडल्या.या जनसंपर्क अभियानाअंतर्गत आज राजापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
गिरणी कामगारांवर अन्याय का?
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारा, मुंबईचा गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर मागे का? असा सवाल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर यांनी केला आहे.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आलेल्या अनेक संकटांवर संघाने वेळोवेळच्या लढ्याद्वारे 2मात केली आहे्.

आता माघार नाही!
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपा ध्यक्ष सुनिल बोरकर म्हणाले, गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर संघटनेने जे आक्रमक पाऊल उचलले आहे,ते कदापि मागे घेतले जाणार नाही.फॉर्म भरलेला अपात्र ठरता कामा नये.1982 नंतर कामावर आलेल्या कामगाराने एक जरी पुरावा दिला तरी तो ग्राह्य धरला पाहिजे. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी तसा म्हाडाशी पत्र व्यवहार केला आहे. कामगार आयुक्तांनी या प्रश्नावर गांभिर्याने विचार करायचे ठरविले आहे.मुंबईत एकही गिरणी कामगार घरांच्या हक्कापासून वंचित रहाता कामा नये,हि संघटनेची भुमिका आहे
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कानडे, प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल यांची भाषणे होऊन, कामगारांनी या लढ्यामागे‌ खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,असे आपल्या भाषणात आवाहन केले.राजापूर तालुका उबाठा गटाचे‌ प्रमुख कमलाकर कदम यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते.ते या सभेला
आवर्जून उपस्थित होते.

कात्रजच्या धरणात उडी मारलेल्या तरुणीस वाचविणारे दशरथ तळेवाड यांचा कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात सत्कार ….

पुणे-कात्रजच्या धरणात उडी मारलेल्या तरुणीस वाचविणारे दशरथ तळेवाड यांचा कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात सत्कार करण्यात आला .

कात्रज येथील पेशवे कालीन धरणात सकाळच्या सुमारास एका युवतीने उडी घेतली असता जवळच असलेल्या नागरिक तसेच सुरक्षा रक्षकाच्या ओरडण्याच्या आवाजावरून कामावर निघालेले दशरथ तळेवाड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारून तरुणीला सुखरूप बाहेर काढून तिचे प्राण वाचविले आहेत.
अनेकवेळा अपघात व दुर्घटना स्थळी नागरिक उपस्थित असताना मदतीसाठी न जाता व्हिडीओ काढणे , पळून जाणे असे प्रकार सरार्स घडत असतात. मात्र दशरथ तळेवाड यांच्यासारखे माणुसकी दाखविणाऱ्या देवदूताच्या धाडसाचे कौतुक सत्कार स्वरुपात कोंढवा येवलेवाडी कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे हस्ते शाल , श्रीफळ व पर्यावरणपूरक झाडाचे रोप असलेली कुंडी मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तळेवाड हे देवदूत असुन त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे तसेच समाजाप्रती प्रेम असलेले लोकांचा आपण आदर , सत्कार केला पाहिजे असे डॉ.दत्ता कोहिनकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास उप अभियंता राखी चौधरी , प्रशासन अधिकारी सुनील मोरे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्ल्म , जालिंदर कदम यांचे सह सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना अर्थक्षम करा;सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करा- शिवसंग्राम पक्षाची मागणी

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, वारंवार कर्जमाफीवर चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. त्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला भाव देण्यासह कृषी उत्पादनावर प्रक्रिया, शेतीक्षेत्राला बिगरशेती क्षेत्राची जोड, कृषी व सहकार विभागातील समन्वय आणि सहकार व महसूल विभागाच्या समन्वयातून खरीप व रब्बी हंगामात १०० टक्के पीककर्ज उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योती विनायक मेटे यांनी केली.

पुण्यातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात शिवसंग्राम पक्षाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. त्यानंतर ज्योती मेटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, प्रदेश चिटणीस योगेश विचारे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, ज्येष्ठ पदाधिकारी शेखर पवार, वसंत पाटील, पी. के. चव्हाण यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्योती मेटे म्हणाल्या, “आजच्या बैठकीत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊनही स्मारकाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष देऊन मुंबई उच्च न्यायालय, तसेच सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडून स्मारकाचे कामकाज त्वरित सुरु करावे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व स्मृतीस्थळ, तसेच पानिपत येथील मराठ्यांच्या शौर्य इतिहासाच्या प्रतिक असलेले स्मृतीस्थळ उभारणीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करते. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचे हौदेगिरी (दावणगिरी) कर्नाटक येथे स्मृतीस्थळ उभारणेबाबत कार्यवाही करावी.”

केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या स्टार्टअपसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने महिलांच्या स्टार्टअपला प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा स्तरावर इनक्युबेशन सेंटर, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये विशेष कक्ष निर्माण करावा. महाराष्ट्र शासनातील चतुर्थश्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या ६० वर्षे आहे, तर केंद्र शासनासह २५ राज्यांत सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. महाराष्ट्रात मात्र सेवानिवृत्तीचे ५८ वर्षे आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत अव्यवहार्य आहे. शासन धोरणानुसार ५५ वर्षे वयांवरील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यास पात्रतेनुसार तृतीय श्रेणीत पदोन्नती मिळाली तरी निवृत्ती वय ५८ वर्षे असल्याने त्याचा लाभ होत नाही. त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वदूर नाराजीची तीव्र भावना होत आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे,” असेही मेटे यांनी नमूद केले.

बीडमधील गुन्हेगारीवर बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, “सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निंदनीय असून, हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुरुवातीपासून करत आहे. यातील आरोपींना अटक झाली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडत पोलीस प्रशासनाने निःपक्षपातीपणे तपास करून आरोपींना शिक्षा होईल, याकडे लक्ष द्यावे. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बीडच्या जनतेप्रमाणे आम्हालाही प्रशासन चांगले काम करेल, अशी आशा आहे. अजित पवार यांचा प्रशासनावर वचक असून, अपेक्षेप्रमाणे काम होत असल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाईमध्ये वकील महिलेला झालेली मारहाण चीड आणणारी आहे. अशा घटनांमुळे बीडची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा करणारा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी याकडे न पाहता कठोर कारवाई करावी, अशीच आमही मागणी आहे.”

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसंग्रामची भूमिका त्यावेळी जाहीर करू. आता शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत आहोत. तसेच राज्यभरात शिवसंग्रामची सदस्य नोंदणी मोहीम सुरु असून, पक्षबांधणीवर भर दिला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात अधिकाधिक संख्येने शिवसंग्राम पक्षात लोकांना सामावून घेतले जात असल्याचेही मेटे यांनी सांगितले.

लहुजी क्रीडा संकुलचा तिसरा खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रेनॉल्ड जोसेफ यांचा पुणे शहर बॉक्सिंग संघटनेकडून सत्कार

पुणे-महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा “शिवछत्रपती पुरस्कार” पटकावणारा जन. अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथील आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र येथील तिसरा खेळाडू रेनॉल्ड जोसेफ याचा सत्कार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुणे शहर संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

जन. अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे १९९३ साली तत्कालीन बॉक्सिंग कोच व महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव भरतकुमार व्हावळ यांनी रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रातील असंख्य खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. सदर ठिकाणी प्रशिक्षण घेऊन अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके पटकावणाऱ्या गिरीश पवार यांना २००५- ०६ या वर्षी महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले.

त्यानंतर बॉक्सिंग चे आंतरराष्ट्रीय कोच विजय गुजर यांनी या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षकाची जबाबदारी घेतली. कालांतराने माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे व नगरसेवक अविनाश बागवे यांच्या प्रयत्नाने या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे अतिशय सुसज्ज अशा “क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रा”मध्ये रूपांतर करण्यात आले. बॉक्सिंग कोच विजय गुजर यांच्या प्रशिक्षणाने सुद्धा असंख्य बॉक्सिंग खेळाडूं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले. या प्रशिक्षण केंद्रातील दुसरा शिवछत्रपती पुरस्कार अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके पटकावणाऱ्या सलमान शेख यास २०१५-१६ या वर्षांकरिता व त्यानंतर तिसरा पुरस्कार रेनॉल्ड जोसेफ यास २०२२-२३ या वर्षांकरिता मिळाला.

याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेता रेनॉल्ड जोसेफ याचे कोच विजय गुजर व रेनॉल्ड जोसेफ याचे आई वडील यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे रिंग ऑफिशियल चेअरमन सुरेशकुमार गायकवाड, शहर संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे , छत्रपती पुरस्कार विजेते सलमान शेख, बॉक्सिंग कोच उमेश जगदाळे, पंच प्रदीप वाघे, राष्ट्रीय बॉक्सर अक्षय मानकर, रोहित चव्हाण, प्रदीप वाघे आदी मान्यवर त्याचप्रमाणे पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अनेक खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 21: शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, निविष्ठा आदींचा खर्च कमी करणे तसेच उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणारा ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ या पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बापूसाहेब पठारे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, कृषी संचालक रफीक नायकवडी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, केवळ लक्ष्यांक आणि आकड्यांवर भर न देता आपल्या जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची बलस्थाने तसेच उणिवा या ओळखून त्यावर वैज्ञानिक आणि व्यवहारिक उपाययोजनांचा ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. जग पुढे जात असताना सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे राज्यानेही दोन वर्षासाठी 500 कोटींची तरतूद केली असून पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधीबाबत विचार करण्यात येईल.

राज्यात धरणे बांधण्याजोग्या जागा जवळपास संपल्या असून लोकसंख्यावाढीमुळे महानगरांना पिण्यासाठी अधिकाधिक पाणी द्यावे लागत आहे. आता मुळशीसारख्या जलविद्युत प्रकल्पांतून वीजनिर्मिती करण्याऐवजी सौरउर्जा प्रकल्प, सहवीज प्रकल्प, आण्विक वीज निर्मिती प्रकल्प आदी पर्याय उपलब्ध आहेत. तर जलविद्युत प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी दिले पाहिजे. जेणेकरुन अन्य प्रकल्पांचे पाणी शेतीसाठी देता येईल, असेही श्री. पवार यांनी नमूद केले.

पुण्यात राबविण्यात येणारा ॲग्री हॅकॅथॉन उपक्रम टप्प्या- टप्प्याने राज्यभरात राबविण्यात येईल. या उपक्रमात राज्य शासन, कृषी विभाग, महाविद्यालय, विविध औद्योगिक संघटना, कंपन्या, मायक्रोसॉफ्टसारखी संस्था, पाणी फाऊंडेशन आदी सहभागी असून त्याचा कृषी क्षेत्रासाठी मोठा उपयोग होणार आहे. कृषीच्या क्षेत्रात नावाजलेले, योगदान देणाऱ्या सर्व घटकांची मदत राज्यातल्या कृषी क्षेत्राला पुढे नेण्यासाठी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

करोना संकटाच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानेच तारले आहे. शेतीसमोर बदलते हवामान, दुष्काळ, घटत चाललेले शेतीचे आकारमान या समस्या आहेत. त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आवश्यक आहे. बदलत्या शेतील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कधीही खचू नये, नाउमेद होऊ नये, त्यांना राज्य शासन कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. फक्त आत्मविश्वास ढळू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, राज्यात नवीन कृषी धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील शेतकरी, प्रगतीशील शेतकरी, महिला शेतकरी आदींशी संवाद साधण्यात येत आहे. शेतकरी आणि शेती क्षेत्राचा चांगले दिवस आणल्याशिवाय कृषी विभाग स्वस्थ बसणार नाही. यासाठी राज्यातील यशस्वी, चांगले प्रयोग केलेले शेतकरी यांचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पाहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

निर्यातक्षम कृषी उत्पादनात वाढ, मूल्यवर्धन, प्रक्रिया आदी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून राज्याची सध्याची कृषी निर्यात 1 हजार 500 कोटी रूपयांवरून 50 हजार कोटींवर कशी जाईल, शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कृषीमालाचे उत्पादन वाढविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, केलेल्या उत्पादनासाठी बाजारपेठ निर्माण करणे महत्त्वाचे असून अशी 100 टक्के खात्री झाल्यावर तरुण शेतकरी शेतीकडे वळतील, असा विश्वासही कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.

प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले, कृषीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेणे, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांची माहिती व ते अन्य शेतकऱ्यांकडे पोहोचविण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. विभागाने जैविक खते तयार करण्याच्या दृष्टीने एक मोठा उपक्रम हाती घेतला असून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. सत्यापित (ट्रुथफुल) बियाण्यांच्या अनुषंगानेही विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागाने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आपल्या कामकाजाची तसेच अन्य माहिती भरण्यासाठी एक ॲप तयार केले असून त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी प्रास्ताविकात माहिती दिली, ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा आराखडा पुढील पाच वर्षात राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात निर्यातक्षम पिकांचे क्लस्टर करण्यात येणार असून सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पाण्याचा, खते आदींचा कार्यक्षम वापर, कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पादन वाढ. निर्यातसाखळी तयार करणे यातून निर्यातीत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येत्या 1 ते 3 जून दरम्यान जिल्ह्यात ॲग्री हॅकॅथॉन राबविण्यात येणार असून त्यातून पुढे येणारे तंत्रज्ञान 1 जूनपासून प्रत्यक्ष शेतीमध्ये राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग संघटना, कंपन्या, महाराष्ट्र बँक आदींशी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी प्रगतीशील शेतकरी तसेच उत्कृष्ट काम केलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘कृषी संवाद- पुणे जिल्हा’ व्हॉट्स ॲप चॅनेलच्या क्यू आर कोडचे लोकार्पण करण्यात आले. तसेच महसूल विभागाच्या सेवा, दाखले घरपोच मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या सेवादूत ॲप व प्रणालीचे संगणकीय कळ दाबून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ. महानंद माने, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे राजन राजे यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक गटांचे शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संशोधक, तंत्रज्ञ, कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

दूधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

पुणे दि. 21 : जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये अपर पोलीस अधिक्षक, पुणे, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,पुणे, उप नियत्रंक वैध मापन शास्त्र पुण हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
दूधात भेसळ करणाऱ्या व्यक्ती, डेअरी याची माहिती समितीकडे देण्यात यावी असे आवाहन समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्वपूर्ण पोषक तत्वांचा स्रोत असून चांगले आरोग्य राखण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावते. तथापि हाणीकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या हिताला मोठा धोका निर्माण होतो. दुध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टीक मुल्याशी तडजोड करीत नाहीत. तर मानवी शारिरीक समस्या, पचन, अॅर्लजी आणि दीर्घकालीन अवयवांचे नुकसान या सारख्या गंभीर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. या समस्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्ह्यातील दूध संकलन स्विकृती केंद्र, पुणे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नमुने तसेच सहकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणीसाठी सहायक आयुक्त (अन), अन्न औषध प्रशासन विभाग, पुणे विभागाकडील अन्न सुरक्षा यांना दरमहा उद्दीष्ठ ठरवून देण्यांत आले आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणा-या व्यक्ती, डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून भेसळ केल्याचेआढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
दूध भेसळीबाबत माहिती देण्यासाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक व EMAIL ID.:- FDAPUNE2019@GMAIL.COM वर तक्रार नोंदवावी. दूध भेसळीबाबत तक्रार, माहिती देण्याऱ्या व्यक्तींची माहिती पुर्णपणे गोपनिय ठेवण्यात येईल असेही समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बाबासाहेब ज्ञानाचे, तर रमाई त्यागाचे प्रतीक-हर्षवर्धन सपकाळ यांचे मत

पुणे: “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचे, तर रमाई आंबेडकर त्यागाचे प्रतीक आहेत. रमाईंच्या त्यागाची साथ मिळाल्याने बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासह अनेक गोष्टींमध्ये भरीव योगदान देता आले. बाबासाहेबांचे संविधान आणि रमाईचा त्याग यातून प्रेरणा घेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा संविधानाला अभिप्रेत सरकार आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे,” असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

पुणे स्टेशन येथील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाला हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, , माजी नगरसेविका लता राजगुरू, सुजित यादव यांच्यासह मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.पुणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते ॲड. अविनाश साळवे यांच्या हस्ते हर्षवर्धन सपकाळ यांचा भारतीय संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

एका नळाचा खर्च ३० हजारावरून १ लाख ३७ हजारांवर कसा गेला ?

जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाचः हर्षवर्धन सपकाळ

माधव भंडारीचींही तहव्वूर राणासोबत चौकशी करावी, चौकशी होईपर्यंत अजित पवारांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे

हिंदी सक्ती करण्यामागे भाजपाचे मोठे षडयंत्र, भाजपाने अगोदर गुजरातमध्ये सक्ती करावी

मुंबई दि. २१ एप्रिल २०२५

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील पाणीटंचाईवरून सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले की, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी सरकारची स्थिती आहे. घोषणा मोठमोठ्या होतात प्रत्यक्षात अंमलबजावणी होतं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हर घर नल आणि हर नल जल असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत होते. यासाठी केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशन योजना सुरु केली पण केंद्रीय अर्थमंत्रालयानेच भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून एका नळाचा खर्च ३० हजारावरून १ लाख ३७ हजारांवर कसा गेला याचे स्पष्टीकरण मागवले आहे.
या योजनेचा फायदा फक्त अधिकारी आणि कंत्रादारांनाच झाला आहे. माता भगिणींना पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक मुलगी पाणी आणण्यासाठी जात असताना तिचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरावे लागते यावरून जलजीवन मिशन भ्रष्टाचाराची बळी ठरली आहे हे स्पष्ट होते. आता तर केंद्र सरकारने या योजनेच्या निधीत ४७ टक्के कपात केली आहे त्यामुळे निधीअभावी कामे होणार नाहीत. यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण पुढची काही वर्ष सुरुच राहणार आहे.

पोलिसांनी माधव भंडारींचीही चौकशी करावी
मुंबईवरील दहशतवादी २६/११ च्या हल्ल्या प्रकरणी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही त्याचा निषेध करतो. या प्रकरणातला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली अद्याप फरार आहे. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करून त्याला मुंबईत आणले आहे. माधव भंडारींना ताब्यात घेऊन त्यांचीही राणासोबत चौकशी करावी. त्यांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार त्यावेळी सरकारमध्ये असलेले अनेक नेते आज भाजपामध्ये आहेत. अजित पवारांसह अनेकजण त्यावेळीही मंत्रिमंडळात होते, आताही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे अजित पवारांना मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यांचीही चौकशी करावी. कायम राष्ट्रहिताच्या गप्पा मारणा-या भाजपचे नेते किती खरे बोलतात ते समोर येईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हिंदीच्या सक्तीमागे मोठे षडयंत्र
पहिलीपासून हिंदीची सक्ती करणे हे एक मोठे षडयंत्र आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपवण्यासाठीच हिंदी लादली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे. सरसंघचालक गोळवलकर यांच्या बंच ॲाफ थॅाट्स या पुस्तकात जे लिहिले त्याची अंमलबजावणी सरकारकडून सुरु आहे. हिंदीची सक्ती अगोदर गुजरात मध्ये करावी. पहिलीच्या वर्गापासून तीन भाषा सक्तीच्या करणे हे अशास्त्रीय आहे त्याचा भार विद्यार्थ्यांना झेपेल का ? सरकारने याचा काही विचार केलेला नाही. भाषा सल्लागार समितीने या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी घुमजाव केले आहे. त्यांना सक्ती करण्याची आवड आहे पण त्यांनी हा निर्णय परत घ्यावा ही आमची मागणी कायम आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले संग्राम थोपटे यांनी घेतलेला निर्णय आत्मघातकी आहे. संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाने निश्चित केले पण देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांची संधी हुकली होती. ज्यांनी विश्वासघात केला, थोपटे त्यांच्याकडेच जात आहेत.

संत निरंकारी मिशन कडून मानव एकता दिवसाचे आयोजन

संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी सह देश-विदेशात ५०० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

भोसरी,पिंपरी-चिंचवड २१ एप्रिल, २०२५:
आध्यात्मिकताच मानव एकता मजबूत करु शकते तसेच मानवाला मानवाच्या जवळ आणून परस्पर प्रेम व सौहार्दाचे वातावरण निर्माण करु शकते. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २४ एप्रिल, २०२५ रोजी दिल्लीतील ग्राउंड नं.८, निरंकारी चौक, बुराडी रोड येथे ‘मानव एकता दिवस’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त देशभरातील मिशनच्या समस्त शाखांमधील भाविक भक्तगणदेखील एकत्रित येऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पित करतील व त्यांच्या महान जीवनातून प्रेरणा प्राप्त करतील.
संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण विभागाचे प्रभारी जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सदगुरुंच्या असीम कृपेने यावर्षी देखील जगभरातील सुमारे ५०० पेक्षा अधिक ठिकाणी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक आयोजन केले जाईल ज्यामध्ये जवळपास ५०,००० पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतील.
उल्लेखनीय आहे, की स्थानिक स्तरावर संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्त संकलन करण्यासाठी विविध रुग्णालयाच्या प्रशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय तज्ञांच्या टीम सहभागी होतील ज्यामध्ये वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी,ससून रुग्णालय रक्तपेढी, तसेच संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले ची टीम देखील अंतर्भूत असेल. मानव एकता दिवसाच्या निमित्ताने याच ठिकाणी सायंकाळी ६.०० ते ९.०० यावेळेत विशाल सत्संग समारोहाचे ही आयोजन करण्यात आले आहे.
हे सर्वविदित आहे, की युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी महाराज समाज कल्याणासाठी सातत्याने प्रयासरत राहिले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला त्यांनी वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील. युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन् १९८६ पासून सुरु केलेली रक्तदान अभियानाची ही मोहीम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहचली आहे. मागील जवळपास ४ दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ८६४४ शिबिरांमध्ये मिशनमार्फत १४,०५,१७७ युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले आहे आणि या सेवा निरंतर चालू आहेत. निश्चितच लोककल्याणार्थ चालविण्यात येत असलेले हे अभियान निरंकारी सदगुरुंकडून प्रदत्त शिकवणुकीचे दर्शन घडवत असून एक दिव्य संदेश प्रसारित करत आहे ज्यायोगे प्रत्येक मनुष्य प्रेरणा प्राप्त करुन आपले जीवन कृतार्थ करत आहे.
संत निरंकारी मिशनचे स्वयंसेवक भोसरी आणि दिघी परिसरात घराघरामध्ये जाऊन तसेच दत्तगड पायथा, मॅगझीन चौक, भोसरी चौक, स्पाईन सर्कल अशा अनेक गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे आपण सर्वानी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशनद्वारे करण्यात आले आहे.

पुण्यात तीन पोलिसांकडून लाचखोरी: रात्री काम सुरू असल्याच्या कारणावरून सोसायटी अध्यक्षांकडून ३ हजार उकळले, तिघेही निलंबित

पुणे-रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी एका सोसायटीच्या अध्यक्षाकडून बळजबरीने तीन हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत गंभीर दखल घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी संबंधित तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे.

दिनेश संतोष इंगळे,संतोष जगू शिंदे, प्रतीक महेश त्रिंबके अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.पुणे शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून ‘काॅप्स २४’ही योजना तीन महिन्यांपूर्वी शहरात सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या परिसरात पोलिसांची गस्त घालण्यात येत असून, त्यासाठी विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे. या पथकाची जबाबदारी आणि नियंत्रण करण्याचे काम गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्याकडे देण्यात आली आहे.

१३ एप्रिल रोजी रात्री पाषाण येथील शिवालय सोसायटीत वाहनतळाचे काम उशिरा सुरू होते. ठेकेदाराला उशीरा यंत्र उपलब्ध झाल्याने रात्री उशीरा हे काम सुरू होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी शिंदे, त्रिबंके, इंगळे गस्त घालणाऱ्या कार मधून तेथे गेले. त्यावेळी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना बोलावून घेतले. ‘रात्री उशीरा काम सुरू असल्याने आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाकडे आलेली आहे. तुम्हाला बालेवाडी पोलीस चौकीत यावे लागेल,’ असे पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना सांगितले. त्यापैकी एकाने अध्यक्षांकडे लगेच पैसे मागितले. ‘आम्हाला थोडे पैसे द्या. तुमचे काम लवकर पूर्ण करा’, असे सांगून पाच हजार रुपये मागितले. अध्यक्षांनी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना तडजोडीअंती तीन हजार रुपये दिले. मात्र, याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोसायटीकडून आल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. चौकशीत तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांकडून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले. याबाबतचा अहवाल आल्यावर पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२१: पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरु करण्यात येईल; मेट्रो स्थानके, विमानतळ व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पिंक ई-रिक्षा वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार बापुसाहेब पठारे, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, कायनेटिक ग्रीन कंपनीचे अध्यक्ष सुधांशू अग्रवाल, रितेश मंत्री आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, महिला व बालविकास विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात १० हजार पिंक ई-रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व सोलापूर या आठ शहराचा समावेश करण्यात आला आहे. पिंक ई-रिक्षा योजना महिलांना आर्थिक सक्षम आणि स्वावलंबी करणारी योजना आहे. या माध्यमातून महिलांकरीता रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासोबतच समाजातील स्थान बळकट करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. पिंक ई रिक्षा योजनेकरीता २५ हजार रुपये केंद्रशासन आणि ७५ हजार रुपये राज्यशासनाच्यावतीने अनुदान स्वरुपात देण्यात येत आहे. विविध बँकेच्या माध्यमातून ७० टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

महिला वर्गाच्या सुरक्षिततेकरीता राज्यशासन प्रयत्नशील आहे. पिंक ई रिक्षा योजना समाजातील महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे; चालक महिलांनी रिक्षा सुरक्षितरित्या चालविण्यासोबतच स्वत:बरोबर समाजातील इतर महिलांचीदेखील काळजी घ्यावी. पिंक रिक्षा चालविणाऱ्या महिला समाजातील इतर महिलांकरिता प्ररेणास्त्रोत ठरतील, अशा विश्वास व्यक्त श्री. पवार यांनी व्यक्त केला.

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राज्यात महिलांच्या उन्नती व बालकांच्या विकासाकरीता विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्टया सक्षमीकरणाकरीता महिलांना दीड हजार रुपयांचा ‘सन्मान निधी’ देणारी ‘लाडकी बहीण योजना’आगामी काळातही सुरुच राहणार आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या, महिला व बालविकास विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात १० हजार पिंक ई-रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना “पिंक ई- रिक्षा ” वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी पुणे महानगरपालिकेतील ३८ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील २२अशा एकूण ६० महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात पिंक ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

येत्या काळात पुणे येथे सुमारे एक हजारापेक्षा अधिक ई-वाहन चार्जिंग स्थानक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पिंक ई- रिक्षा मेट्रो स्थानके, विमानतळ, औद्योगिक क्षेत्र व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षांची सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच ओला व उबेर कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात येत आहे. यामुळे महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल, पर्यायाने महिलांना रोजगारही उपलब्ध होईल, असेही श्रीमती तटकरे म्हणाल्या.

उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, महिलाच्या अंगी असलेल्या कौशल्याचा वापर करुन त्या विविध क्षेत्रात काम करीत आहे. त्यांना विविध पुरस्कारही मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. राज्य शासनाच्यावतीने महिलांच्या आर्थिक सबलीकरणाकरीता विविध प्रगतिशील योजना सुरु करण्यात आल्या आहेत. महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी पिंक ई-रिक्षा योजना असून महिलांची सुरक्षितता जतन करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. महिला म्हणून मिळालेल्या या संधीचा उपयोग करुन घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीकरीता या रिक्षांचा वापर करण्याबाबत विचार करावा. पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण सत्रात प्रथमोपचार माहितीचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना श्रीमती गोऱ्हे यांनी केले.

यावेळी महिला व बालविकास विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

मनसे – ठाकरे गटाच्या युतीवर बोलू नका:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निगेटिव्ह सूर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तंबी

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे भाऊ महाराष्ट्र हितासाठी टाळी देणार अशी चर्चा सुरू आहे. यात मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिल्या आहेत.राज ठाकरे हे सध्या परदेशात आहे. ते महाराष्ट्रात परतल्यानंतर मनसे-उबाठाच्या एकत्रित येण्यावर सविस्तर बोलतील. तोपर्यंत युतीच्या मुद्द्यावर कुणीही बोलू नये. संवेदनशील विषयावर बोलणे टाळा असा थेट आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला आहे, असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे.

मनसेचे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले होते की, महाराष्ट्रासाठी एकत्र येत असाल तर अटी-शर्ती कशाला घालता? जेव्हा एक मनाने एक दिलाने महाराष्ट्र पुढे जाऊ, तेव्हा सर्व काही बाजूला पडलेले असेल!.मनसेचे नेते अमेय खोपकर म्हणाले की, अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे म्हटले होते. तर संदीप देशपांडेंनी म्हटले की, तू इतक्या जागा लढव, मी तितक्या लढवतो, तू ही जागा लढव, मी ही जागा लढवतो, तुला हे पद, मला हे पद, इतका मर्यादित विचार करून चालणार नाही. फक्त निवडणूक एवढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल.संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरे यांच्या अटीचा उल्लेख करत म्हटले की, त्यांनी भाजपला धोका दिला, आता पवारांनाही देतील, मनसेने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल विचारला होता. तर संजय राऊत यांनी, महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे यांना कळणार नसले तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करावा लागेल, असा टोला लगावला होता.

संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती, हे जर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कळत नसेल तर मी काय बोलणार. जेव्हा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली तेव्हा आमच्या शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, एकत्र येणे आणि एकत्र राहणे फार कठीण आहे असे मला वाटत नाही. प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे. हा माझ्या वैयक्तिक इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते की आपण महाराष्ट्राचे मोठे चित्र पाहिले पाहिजे. माझा असा विश्वास आहे की महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला पाहिजे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अगदी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. महाराष्ट्राचे हित मग त्याच्या आड जो कुणी येईल त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही त्याचे स्वागत करणार नाही हे आधी ठरवा. मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणे नव्हतीच पण जी काही होती ती मिटवून टाकली चला. त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राने ठरवायचे की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर.

ब्रह्मनाद संगीत महोत्सव संपन्न: स्वरवर्षावात रसिक चिंब

पुणे : युवा कलाकारांचे सहगायन, शब्दप्रधान गायकी दर्शविणारे दादरा, ठुमरी तसेच किराणा घराण्याचे बहारदार गायन असा सुरेल संगम साधत ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा अखेरचा दिवस रसिकांसाठी स्वरवर्षावात चिंब भिजवून टाकणारा ठरला.

ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 24व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे आयोजन कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयातील राजमाता जिजाऊ माँसाहेब बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या महोत्सवाला रसिकांनी भरभरून दाद देत महोत्सवातील स्वरानंद लुटला.

पहिल्या सत्राची सुरुवात सुप्रसिद्ध युवा गायक सुरंजन व शुभम खंडाळकर यांच्या सहगायनाने झाली. सुमधूर आवाज, दमदार गायन सादर करत खंडाळकर बंधूंनी राग मुलतानीतील ‌‘गोकुल गाव कछु नाही‌’ ही सदारंग रचित बंदिश सादर केली. द्रुत लयीत ‌‘सुंदर सूरज नवा साजे रे‌’, ‌‘आयी मोरे साजनवा‌’ या बंदिशींनी मैफलीत रंगत आणली. संत मिराबाई रचित आणि वडिल व गुरू पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी स्वरबद्ध केलेले ‌‘ओ राधे देवो बांसुरी मोरी सुरिली‌’ या हिंदी भजनाने राधा-कृष्णाच्या भावनिक अनुबंधाची सुंदर मांडणी केली. माधव लिमये (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), माऊली फाटक (पखवाज), दिगंबर आसमारे, आर्या लोहकरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

भारतीय संगीत क्षेत्रात शास्त्रीय गायनाबरोबरच उपशास्त्रीय गायनाचीही महान परंपरा आहे. या परंपरेचे विलोभनीय दर्शन घडविताना गुरू शोभा गुर्टू यांच्या गायकीची झलक विदुषी राजश्री पाठक यांनी सादर केलेल्या ठुमरी, दादरा आणि हिंडोला या गायन प्रकारातून दिसली. राजश्री पाठक यांनी शब्दप्रधान गायकीचे वैशिष्ट्य उलगडत ‌‘उमरियां रे सैंय्या‌’ ही परंपरिक ठुमरी सादर केली. यानंतर शोभा गुर्टू यांनी रचनाबद्ध केलेला ‌‘सजना मीत पिहरवा, आजा रे आजा रे मित पिहरवा‌’ हा दादरा, त्यातील शब्दांचे भाव उलगडत प्रभावीपणे सादर केला. ऋतूंचे वर्णन करणाऱ्या उपशास्त्रीय गायकीतील बारामसा प्रकार सादर करताना विरह आणि श्रृंगाराचा गाभा दर्शविणारी ‌‘दुपहरिया बितैला बलम‌’ हा दादरा सुरेल आवाजात सादर केला. साथीदारांमुळे गायकाला अपरिमित आनंद होतो असे सांगून पंडित श्रीकांत देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देत पाठक यांनी शोभा गुर्टू यांनी सुप्रसिद्ध केलेल्या ‌‘तुम तो बलमा हो चितचोर‌’ या दादऱ्याची झलक दर्शविली. मैफलीची सांगता विदुषी गिरीजा देवी यांनी अजरामर केलेला ‌‘देखो सावरे के संग गोरी झुलेली हिंडोला‌’ हा हिंडोला प्रकार सादर करताना जणू रसिकांनाही स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलविले. पंडित अरविंदकुमार आझाद (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाची सांगता किरणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित डॉ. संजय गरुड यांच्या गायनाने झाली. पंडित गरुड यांनी मैफलीची सुरुवात राग जोगकंसमधील ‌‘सुघर बर पायो‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. द्रुत लयीत ‌‘पीर पराये जाने ना‌’ ही रचना सादर केली. खुला, घुमावदार, तीन सप्तकात फिरत असणारा आवाज, दमदार ताना, रागातील बारकावे उलगडून दाखवत पंडित गरुड यांनी रसिकांची मने जिंकली. त्यानंतर पंडित गरुड यांनी ‌‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे‌’ हे सुप्रसिद्ध भजन सादर करून भक्तीरसाची निर्मिती केली. त्यांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथही केली. मैफलीची सांगता ‌‘जो भजे हरिको सदा‌’ या भैरवीतील भक्तीरचनेने केली. या रचनेने मैफलीचा कळसाध्याय गाठला. पंडित संजय गरुड यांच्या रुंजी घालणाऱ्या स्वरांनी रसिकांच्या मनात भक्तीभावाची जागृती झाली. रोहन पंढरपूकर (तबला), तुषार केळकर (संवादिनी), माऊली फाटक (पखवाज), प्रसाद कुलकर्णी, विकास पाटील (तानपुरा, सहगायन), निषाद गरुड (टाळ) यांनी साथसंगत केली.
कलाकारांचा सत्कार काकासाहेब चव्हाण, शिलाताई देशपांडे यांनी केला.

पंडित प्रमोद गायकवाड यांना ब्रह्मनाद पुरस्कार

ह. भ. प. मारुतीराव गरुड स्मृती ब्रह्मनाद पुरस्काराने प्रसिद्ध शहनाईवादक डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण शिलाताई देशपांडे, काकासाहेब चव्हाण, अनिकेत चव्हाण, ह. भ. प. डॉ. विजय महाराज जगताप, पंडित अरविंदकुमार आझाद, सुभाष चाफळकर, पंडित राजेंद्र कुलकर्णी, पं. राजेंद्र कंदलगावकर, पंडित डॉ. संजय गरुड, रागिणी गरुड यांच्या उपस्थितीत झाले.

बालकुमार चित्रपट महोत्सव गुरुवारपासून

दिग्पाल लांजेकर यांचे पाच ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी

पुणे : संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 24 ते बुधवार, दि. 30 एप्रिल 2025 या कालावधीत बालकुमार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे सुनील महाजन, कावरे आईस्क्रीमचे संचालक राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी महोत्सवाच्या सूत्रधार निकिता मोघे, संयोजक केतकी महाजन-बोरकर उपस्थित होत्या. महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणारा बालचित्रपट महोत्सव एकमेव असून महोत्सवाचे यंदाचे 27वे वर्ष आहे. चित्रपट महोत्सव कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट गृहात रोज सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आला असून चित्रपट स्क्रीन क्रमांक 3 येथे दाखविण्यात येणार आहेत. महोत्सव फक्त मुलांसाठी असून पालकांना प्रवेश नाही. महोत्सवासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत.
प्रतिथयश युवा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे पाच ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी बालकुमारांना मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन दि. 24 रोजी सकाळी 9:30 वाजता केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक प्रवीण बढेकर, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी लांजेकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
गुरुवार, दि. 24 रोजी ‌‘शिवरायांचा छावा‌’, शुक्रवार, दि. 25 रोजी ‌‘पावनखिंड‌’, शनिवार, दि. 26 रोजी ‌‘फर्जंद‌’, रविवार, दि. 27 रोजी ‌‘फत्तेशिकस्त‌’, सोमवार, दि. 28 रोजी ‌‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज‌’ (दिग्दर्शक तुषार शेलार), मंगळवार, दि. 29 रोजी ‌‘तेंडल्या‌’ (दिग्दर्शक सचिन जाधव, नचिकेत वाईकर), बुधवार, दि. 30 रोजी ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ हे चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत.
प्रवेशिका मंगळवारपासून सकाळी 10:30 ते 12 या वेळात सिटी प्राईड, कोथरूड येथे मिळणार आहेत. प्रवेशिकांची संख्या मर्यादित असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम:त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे थांबवावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

काय म्हणाले राहुल गांधी?….राहुल गांधी अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसून आले. हे एक वास्तव आहे. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी 5.30 पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी 5.30 ते 7.30 या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. असे घडणे केवळ अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटे लागतात. जर ही वेळ लक्षातघेतली तर रात्री 2 वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा होतो. पण असे कुठेही घडल्याचे पाहण्यास मिळाले नाही.

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. वारंवार होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणालेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मुदत संपल्यानंतर सायंकाळी 5.30 ते 7.30 पर्यंत तब्बल 65 लाख मतदारांनी मतदान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे भारतात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारतीय संविधानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या लोकशाही संस्थांची बदनामी केली. ते सातत्याने अशा प्रकारची बदनामी करतात. ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. निवडणुकांत वारंवार पराभव झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे.राहुल गांधी एका विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यानंतरही ते अशा प्रकारे परदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करत असतील, तर कुठेतरी त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो की, ते नेमका कुणाचा अजेंडा राबवत आहेत? त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे. त्यांनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात फिरून भारताची बदनामी केल्याने त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील. पण ते करण्याऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम त्यांचे सुरू आहे.महाराष्ट्रात ते हरले, हरियाणात हरले, दिल्लीत हरले. आता मतदानात हेराफेरी झाल्याचा आरोप ते करत आहेत. अतिशय बाळबोध प्रकारचा हा प्रकार आहे. त्यांनी जनतेत जावे व भारताची बदनामी करणे बंद करावे, असे आमचे त्यांना आवाहन आहे, असे फडणवीस म्हणाले.

कोणताही देशभक्त अशा प्रकारे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करत नाही. राहुल गांधी ज्या प्रकारे वर्तन करत आहेत, त्यामुळे त्यांच्याच चारित्र्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी जनतेत जावे. जनतेचा विश्वास जिंकावा. त्यातून त्यांना निवडूक जिंकता येईल. जगात जाऊन कितीही बदनामी केली तरी त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही. यामुळे त्यांचीच उंची कमी होत जाईल, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.