Home Blog Page 570

खाजगी हाॅस्पिटलचे डायलिसिस चे दर तब्बल ५०% ने वाढवले,ते त्वरीत कमी करा…

डायलिसिस चे जास्ती दर आकारणाऱ्या काही खाजगी हाॅस्पिटल्सच्या सोयीसाठी हे दर जाणूनबुजून वाढवले असावेत, अशी शंका घ्यायला नक्कीच जागा आहे. कारण या निर्णयामुळे महापालिका आता शहरी गरीब योजनेअंतर्गत सर्व हाॅस्पिटल्सना १३५० ऐवजी १९५० रुपयांचा दर डायलिसिस साठी देणार आहे. ज्यामुळे दरमहा महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहेच. याशिवाय शहरी गरीब योजनेअंतर्गत असलेली डायलिसिस उपचारांची २ लाखांची लिमिट लवकर संपून रुग्णांना उर्वरीत ट्रीटमेंट महागड्या दराने घ्यावी लागणार आहे.‌ त्यामुळे या नवीन समितीच्या महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या शिफारशी रद्दबातल करुन जुन्या समितीच्या शिफारशीनुसार दर निश्चित करण्यास सांगावे.
-विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

पुणे- शहरी गरीब योजनेतील डायलिसिस दरांचे सुसूत्रीकरण करुन दरनिश्चिती सुचवणाऱ्या नवीन समितीकडून आधीच्या समितीच्या एक वर्षापूर्वीच्या अहवालाला खो देऊन तब्बल ५० % ने डायलिसिस चे दर वाढवण्याची शिफारस केली आहे. याने महापालिकेचे आणि गरीब रुग्णांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. तसेच जुन्या समितीच्या शिफारशीनुसार दर निश्चित करण्यास सांगावे. अशी मागणी वेलणकर यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदन नुसार पुणे मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील गरीब , गरजू व अल्प उत्पन्न असणारे व झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना तसेच पुणे मनपा आजी माजी सभासद, सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचारी यांचेसाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना राबविण्यात येते. पुणे महापालिका व खाजगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण शहरात आठ डायलिसिस सेंटरमध्ये तसेच पुणे मनपा पॅनेलवरील ३७ खाजगी रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत डायलिसिस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सर्व ठिकाणी डायलिसिस उपचार सुविधा दर वेगवेगळा आहे. ज्यामध्ये प्रति डायलिसिस १३५० रुपयांपासून ( रुबी हाॅस्पिटल, पूना हाॅस्पिटल , कृष्णा हाॅस्पिटल) प्रति डायलिसिस २९०० रुपयांपर्यंत ( रत्ना हाॅस्पिटल ) वेगवेगळे दर आकारले जातात आणि महापालिका त्याप्रमाणे पैसे अदा करते. महापालिका व खाजगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या सेंटर्स मध्येही हे दर प्रति डायलिसिस ४०० रुपयांपासून प्रति डायलिसिस २३५४ रुपयांपर्यंत आहेत व महापालिका त्याप्रमाणे पैसे अदा करते. शहरी गरीब योजनेतील रुग्णांना प्रतिवर्षी डायलिसिस साठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये महापालिका देते. त्यापेक्षा जास्त खर्च आल्यास रुग्णांना तो स्वतः करावा लागतो आणि त्यामुळे जास्ती दर असणाऱ्या रुग्णालयात डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांना दरवर्षी काही हजार रुपये स्वतः खर्च करावा लागतो.

वेलणकर यांनी पुढे म्हटले आहे कि, या गोष्टी लक्षात घेऊन पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांकडे डायलिसिस दरांचे सुसूत्रीकरण करुन दरनिश्चिती करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यासाठी १९/०१/२०२४ रोजी परवानगी मागितली व त्याप्रमाणे समिती स्थापन ही झाली . या समितीमध्ये भारत सरकारचे सल्लागार असलेल्या डाॅ. लोबोंसारख्या अनुभवी व्यक्ती होत्या. या समितीने संपूर्ण अभ्यास करुन १३/०३/२०२४ रोजी या संदर्भातील दरनिश्चिती सुचवली ज्यामध्ये महापालिका संयुक्त प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त ११३० तर पॅनेलवरील हाॅस्पिटल्समध्ये जास्तीतजास्त १३५० रुपयांचा डायलिसिस दर असावा अशी शिफारस केली. याशिवाय गरजेनुसार वापराव्या लागणार्या इंजेक्शनची सुद्धा दरनिश्चिती केली. या शिफारशींना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतर ८ महिन्यांनी आरोग्य विभागाने नवीनच टूम काढून या विषयावर नवीन समितीचे गठन २२/११/२०२४ रोजी केले.‌ या समितीने आधीच्या समितीने केलेल्या शिफारशींकडे डोळेझाक करुन खाजगी हाॅस्पिटलचे डायलिसिस चे दर तब्बल ५०% ने वाढवले आहेत. आधीच्या समितीने डायलिसिस चा दर ( डायलिसिस, डायलायझर, ट्युबिंग, कन्झुमेबल्स सह) १३५० रुपये ठरवला होता. आता नवीन समितीने हा दर (डायलिसिस, डायलायझर, ट्युबिंग, कन्झुमेबल्स सह) १९५० रुपये ठरला आहे. जेंव्हा की रुबी,पूना हाॅस्पिटलसह अनेक मोठ्या हाॅस्पिटल्सचा डायलिसिस चा दर १३५० च आहे. अशी माहिती वेलणकर यांनी दिली आहे.

अनंतराव पवार अभियांत्रिकीची औद्योगिक अभ्यास सहल संपन्न…

पुणे-               अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच  एरंडवणे येथील पुणे महानगरपालिकेच्या आयएसओ प्रमाणित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना पुणे सारख्या महानगरांमध्ये शाश्वत सांडपाणी प्रक्रियांची आवश्यकता समजली. विद्यार्थ्यांना प्राथमिक,  माध्यमिक आणि तृतीय श्रेणीतील सांडपाणी प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले विविध टप्पे, बागकाम, स्वच्छता, बांधकाम क्रियाकलापांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी आणि गाळ विल्हेवाट लावण्याचे शाश्वत मार्ग या विषयी मार्गदर्शन मिळाले. शेवटी सर्व सहभागींनी उज्वल भविष्यासाठी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची शपथ घेतली. या अभ्यास सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ.रविराज सोरटे यांनी केले. या अभ्यास सहलीचे समन्वयक प्रा. रणजितसिंग गायकवाड, प्रा.अमृता चव्हाण यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या  औद्योगिक अभ्यस सहलीत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा,  सांडपाणी प्रक्रियांचा जवळून  अनुभव घेता आल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाने औद्योगिक अभ्यस सहलीचे  आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिलाताई गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

पुण्यात मद्यधुंद टोळक्याचा धिंगाणा:हॉर्न वाजवल्याच्या रागातून जोडप्याला मारहाण, कारच्या काचा फोडल्या; तिघांना अटक

0

पुणे– चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे हद्दीत पाषाण सर्कल येथे मद्यधुंद अवस्थेतील बाईकस्वारांनी हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कारचालकास थांबवून जाेडप्याला मारहाण करत कारच्या काचा दगडाने फाेडल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आराेपींना अटक करण्यात आले आहे.

पाषण परिसरात रहाणारे एका कुटुंबातील पती व पत्नी हे त्यांच्या कारने पाषाण सर्कल येथून जात हाेते. त्यावेळी सदर ठिकाणी पाच ते सहाजणांचे एक टाेळके त्याठिकाणी थांबलेले हाेते. त्यांनी कार थांबवून सदर जाेडप्याला मारहाण केली. त्यांनी जाब विचारला असता त्यांच्या कारवर दगडफेक करुन काचा फाेडण्यात आला. याबाबत तक्रारदार केतकी भुजबळ म्हणाल्या, 18 एप्रिल राेजी रात्री सव्वाअकरा वाजता मी व माझे पती अमरदेव रमन हे मित्रांसाेबत जेवण करुन मुकुंदनगर येथून घरी परतत हाेताे. पाषाण सर्कल येथून नेहमीप्रमाणे आम्ही जात असताना, दुचाकीवर दाेनजण त्याठिकाणी हाेते. ते मद्यधुंद अवस्थेत हाेते आणि रस्त्याचे मधून गाडी चालवत असल्याने पतीने गाडीचा हाॅर्न वाजवला. त्यांनी राग येऊन पतीच्या बाजूचा कारचा दरवाजाची खिडकी उघडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांना रागाने पाहून आम्ही घाबरलाे. त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, तुम्ही हाॅर्न काेणाला पाहून वाजवला आहे.

तुम्ही रस्त्याचे मध्ये गाडी चालवू नकाे बाजूने चालवा असे सांगितले. परंतु त्यांनी आम्हाला काहीवेळ पुढे जाऊनच दिले नाही. अनेकवेळ त्यांनी अडवून धरल्याने आम्ही गाडी बाजूला घेऊन पती रस्त्यावर खाली उतरले. त्यावेळी दाेघांना विचारणा करुन तुम्हाला राग येण्याचे कारण काय? तुझ्यात काय खूप ताकद आहे का? तु आम्हाला मारहाण करणार का? असे म्हणत असताना मागून तीन ते चारजण त्याठिकाणी आले. त्यांनी पतीला पाठीमागून धरुन मारहाण सुरु केली.

UPSC सिव्हिल सर्व्हिसचा अंतिम निकाल जाहीर:प्रयागराजची शक्ती दुबे टॉपर; पुण्याचा अर्चित डोंगरे भारतात तिसरा..राज्यातील पास नावांची यादी पहा

मुंबई-एकूण 1009 उमेदवारांनी यूपीएससी सीएसई उत्तीर्ण केले आहे. यामध्ये, सामान्य वर्गातून 335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातून 109, ओबीसी वर्गातून 318, अनुसूचित जातीतून 160 आणि अनुसूचित जमातीतून 87 उमेदवार पात्र ठरले आहेत.

यूपीएससी सीएसई प्रिलिम्स परीक्षा 16 जून 2024 रोजी झाली होती, तर मुख्य परीक्षा 20 ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान घेण्यात आली होती. तर मुलाखत जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात आली होती.
यूपीएससीने 2024 च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. प्रयागराजची शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. एकूण 1009 उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत समाविष्ट आहेत. गुणवत्ता यादी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रँक 1 – शक्ती दुबे
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. शक्तीने अलाहाबाद विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. परीक्षेत राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांचे पर्यायी विषय होते.

रँक 2 – हर्षिता गोयल
हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आहे. हर्षिता शाह मूळची हरियाणाची आहे आणि अनेक वर्षांपासून गुजरातमधील वडोदरा येथे राहत आहे. हर्षिताचा जन्म हरियाणामध्ये झाला. यानंतर हे कुटुंब गुजरातमधील वडोदरा येथे आले. ती इथेच वाढली. ती पात्रतेनुसार सीए आहे. हर्षिताने थॅलेसेमिया आणि कर्करोगाने ग्रस्त मुलांसाठी अहमदाबाद येथील बिलीफ फाउंडेशनसोबत काम केले आहे.

रँक 3 – अर्चित पराग डोंगरे
अर्चितने वेल्लोरमधील व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) पदवी घेतली आहे. त्यांच्या वैकल्पिक विषयांपैकी एक तत्वज्ञान होता.

रँक 4 – मार्गी चिराग शाह
अहमदाबाद येथील गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून संगणक अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या शाह मार्गीने समाजशास्त्र हा पर्यायी विषय घेऊन चौथा क्रमांक पटकावला आहे.

रँक 5 – आकाश गर्ग
दिल्लीतील गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातून संगणक विज्ञान विषयात तंत्रज्ञानाची पदवी घेतलेल्या आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या आकाश गर्गने समाजशास्त्र हा पर्यायी विषय घेऊन पाचवे स्थान पटकावले आहे.

राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार

अर्च‍ित पराग डोंगरे (03) शिवांश सुभाष जगदाळे (26) शिवानी पांचाळ (53) अदिती संजय चौघुले (63) साई चैतन्य जाधव (68) विवेक शिंदे (93) तेजस्वी प्रसाद देशपांडे (99) दिपाली मेहतो (105) ऐश्वर्या मिलिंद जाधव (161) शिल्पा चौहान (188) कृष्णा बब्रुवान पाटील (197) गौरव गंगाधर कायंदे पाटील (250) मोक्ष दिलीप राणावत (251)प्रणव कुलकर्णी (256) अंकित केशवराव जाधव (280) आकांश धुळ (295) जयकुमार शंकर आडे (300) अंकिता अनिल पाटील (303) पुष्पराज नानासाहेब खोत (304) राजत श्रीराम पात्रे (305) पंकज पाटले (329) स्वामी सुनील रामलिंग (336)अजय काशीराम डोके (364) श्रीरंग दीपक कावोरे (396) वद्यवत यशवंत नाईक (432) मानसी नानाभाऊ साकोरे (454) केतन अशोक इंगोले (458) बच्छाव कार्तिक रवींद्र (469) अमन पटेल (470) संकेत अरविंद शिंगाटे (479) राहुल रमेश आत्राम (481) चौधर अभिजीत रामदास (487) बावणे सर्वेश अनिल (503) आयुष राहुल कोकाटे (513) बुलकुंडे सावी श्रीकांत (517) पांडुरंग एस कांबळी (529) ऋषिकेश नागनाथ वीर (556) श्रुती संतोष चव्हाण (573) रोहन राजेंद्र पिंगळे (581) अश्विनी संजय धामणकर (582) अबुसलीया खान कुलकर्णी (588) सय्यद मोहम्मद आरिफ मोईन (594)वेदांत माधवराव पाटील (601) अक्षय विलास पवार (604) दिलीपकुमार कृष्ण देसाई (605) गायकवाड ऋषिकेश राजेंद्र (610) स्वप्नील बागल (620) सुशील गिट्टे (623)
सौरव राजेंद्र ढाकणे (628) अपूर्व अमृत बलपांडे (649) कपिल लक्ष्मण नलावडे (662) सौरभ येवले (669) नम्रता अनिल ठाकरे (671) ओंकार राजेंद्र खुंताळे (673) यश कनवत (676) बोधे नितीन अंबादास (677) ओमप्रसाद अजय कंधारे (679) प्रांजली खांडेकर (683) सचिन गुणवंतराव बिसेन (688) प्रियंका राठोड (696) अक्षय संभाजी मुंडे (699)अभय देशमुख (704) ज्ञानेश्वर बबनराव मुखेरकर (707) विशाल महार (714)
अतुल अनिल राजुरकर (727) अभिजित सहादेव आहेर (734) भाग्यश्री राजेश नायकेले (737) श्रीतेश भूपेंद्र पटेल (746) शिवांग अनिल तिवारी (752) पुष्कर लक्ष्मण घोळावे (792) योगेश ललित पाटील (811) श्रुष्टी सुरेश कुल्ये (831) संपदा धर्मराज वांगे (839) मोहिनी प्रल्हाद खंदारे (844) सोनिया जागरवार (849) अजय नामदेव सरवदे (858) राजू नामदेव वाघ (871) अभिजय पगारे (886) हेमराज हिंदुराव पनोरेकर (922) प्रथमेश सुंदर बोर्डे (926)गार्गी लोंढे (939) सुमेध मिलिंद जाधव (942) आनंद राजेश सदावर्ती (945) जगदीश प्रसाद खोकर (958) विशाखा कदम (962) सचिन देवराम लांडे (964) आदित्य अनिल बामणे (1004)

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ – भावनांनी भरलेला, थरारक अनुभव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असलेला आणि तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट लव फिल्म्सच्या मराठी सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

‘देवमाणूस’ मध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांसारख्या ताकदीच्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाची कथा अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भावनिक, रहस्यपूर्ण आणि गूढ यांचा मेळ असलेला ‘देवमाणूस’ एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट आहे. दमदार कथानक, उत्कंठा वाढवणारे प्रसंग आणि मनाला भिडणारे संगीत यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवेल.

चित्रपटातील दोन खास गाणी देखील सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. सोनू निगम यांच्या आवाजातील ‘पांडुरंग’ हे हृदयस्पर्शी भक्तिगीत, रोहन-रोहन यांचे संगीत आणि प्रसाद मडूपवार यांचे गीत असलेले हे गाणं श्रद्धा आणि भक्तीचा सुरेल संगम आहे. महेश मांजरेकर यांच्या वारी यात्रेतील भावनिक दृश्यांनी परिपूर्ण हे गाणे आध्यात्मिक आणि भावनिक दृष्टिकोनातून प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारे आहे. तर दुसरे गाणे ‘आलेच मी’ या लावणीमध्ये, सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसत आहे. तेजस देऊस्कर लिखित या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले असून बेला शेंडे आणि रोहन प्रधान यांच्या आवाजात ते सादर झाले आहे. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशीष पाटील यांच्या संकल्पनेत साकारलेली ही लावणी प्रेक्षकांना उत्साह आणि सौंदर्याचा अनुभव देणारी ठरत आहे.

दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “‘देवमाणूस’ हा माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नसून एक भावनिक प्रवास आहे. लव फिल्म्सने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि संपूर्ण टीमची मेहनत यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. ट्रेलरला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे दिसतेय. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”

निर्माते लव रंजन म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला आमची आदरांजली आहे. ‘देवमाणूस’ केवळ आमचा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवेश नाही, तर दर्जेदार आणि अर्थपूर्ण कथानक सादर करण्याचा संकल्प आहे.”

निर्माते अंकुर गर्ग यांचा विश्वास आहे की, “तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन आणि कलाकारांची सशक्त कामगिरी ‘देवमाणूस’ला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. आम्हाला या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान आहे.”

लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित ‘देवमाणूस’ २५ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

एम्प्रेस गार्डनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण रोपण

पुणे, : पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनातर्फे आज जागतिक वसुंधरा दिनाच्या औचित्यानिमित्तप एक दुर्मिळ व आकर्षक वृक्ष अर्थात ‘उर्वशी वृक्ष’ याचे रोपण करण्यात आले. सकाळी १० वाजता संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मानद सचिव सुरेश पिंगळे, यशवंत खैरे, वनस्पती तज्ञ प्रा.श्री. द. महाजन, श्रीकांत इगळहळीकर,शर्वरी बर्वे, प्रशांत चव्हाण यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
यावेळी शिवण, पिवळा कांचन, सोनचाफा, तामन, शेंदरी आदी वृक्षाचे रोपण करण्यात आले.

उर्वशी वृक्ष मूळचा म्यानमार (ब्रम्हदेश) येथील असून, जगातील हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा अतिसुंदर वृक्षांमध्ये त्याचा वरच्या क्रमांकावर गौरवाने उल्लेख होतो. अम्हर्स्टिया नोबिलिस हा सदाहरित वृक्ष आहे आणि त्याच्या विलक्षण सौंदर्यामुळे ‘उर्वशी वृक्ष’ म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.

एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनाने नेहमीप्रमाणे या उपक्रमाचाही उद्देश पर्यावरण पूरकतेस प्रोत्साहन देणे, दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करणे व नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात एक सकारात्मक अनुभव देणे हा आहे. बागेमधील सौंदर्य व नैसर्गिक रचना अबाधित ठेवत, अशा दुर्मिळ वनस्पतींचे संकलन व रोपण करण्याचे काम संस्थेने सातत्याने चालू ठेवले आहे.

एम्प्रेस गार्डन हे केवळ वनस्पतीप्रेमींसाठीच नव्हे, तर पर्यटन व कुटुंब सहलीसाठीसुद्धा एक आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. बागेतील निसर्गरम्य व शांत वातावरण, सुसज्ज बसण्याची व्यवस्था व वाहत्या पाण्याच्या स्रोतांनी या ठिकाणाचे महत्व अधिकच वाढवले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत एम्प्रेस गार्डनने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
संजय गायकवाड
9604764228

“हम जैनो ने ठाना है; मंदिर वही बनाना है‌”मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघातर्फे पुण्यात धरणे आंदोलन

पुणे : बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघ,पुणे तर्फे आज (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
जय बोलो महावीर की‌” , “हम शांत है पर कमजोर नही‌”, “मंदिर तोडा चूप नही रहेंगे, शांतीसे मार्च करेंगे‌”, “हम शांतीसे चलते है, अपनी बात करते है‌’, “जय जयकार जैन धर्म की जय जयकार‌”, “जैन धर्म अमर रहे‌” अशा घोषणा देत जैन समाजातील हजारो स्त्री-पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निमाण व्हावे, अशा मागणीचे पत्र सकल जैन संघ, पुणेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने दि. 16 एप्रिल रोजी विलेपार्ले येथील जैन मंदिर चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने पाडले. सर्व कायदेशीर बाबी समजून न घेता बृहन्मुंबई महापालिकेतर्फे अत्यंत क्रूर पद्धतीने बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्य यांची विटंबना करण्यात आली आणि मंदिरातील मूर्ती देखील भंग करण्यात आली. प्रशासनाच्या या जुलमी कार्यामुळे देशातील समस्त जैन धर्मिय व समाज अत्यंत आक्रोशित झाला आहे, असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. निषेधाचे निवेदन सकल जैन संघाच्या वतीने अचल जैन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनाच्या स्वीकार करून जैन समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून जैन धर्माच्या तीर्थस्थळांवर अतिक्रमण, यात्रेकरुंवर हल्ले तसेच जैन गुरू, साधू, साध्वी यांच्यावरही हल्ले असे प्रकार हेतूपूर्वक सुरू असून या मागे कोणाचा कुटील हेतू आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. याच बरोबर जैन धर्मावर, समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी सकल जैन संघातर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आहेत मागण्या…
राज्य-देशातील सर्व जैनधर्मीय तीर्थक्षेत्रे, मंदिरे, स्थानक, उपाश्रय, साधू-साध्वींचे निवासस्थान अशा सर्व धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी सुरक्षा सुनिश्चित करणारा कायदा व्हावा, जैन धर्मिय साधू-साध्वी संतविहार करताना संपूर्ण वेळ राज्य सरकारच्यावतीने त्यांना संरक्षण देण्यात यावे, जैन धर्मियांची अत्यंत प्राचिन व हजारो वर्षांची परंपरा असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांवर जसे, पालिताना, गीरनार, समद शिखरजी, राजगृही, राणकपुर तसेच अन्य ठिकाणी पूजा-भक्ती करण्यापासून विविध समाजकंटकांकडून रोखले जात आहे त्याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून कारवाई होऊन जैन धर्मियांना संरक्षण मिळावे. मागील काही वर्षांत समाजकंटकांकडून जैन धर्मिय साधू-संतांवर वारंवार हल्ले होत आहेत. संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करून साधू-संतांना संरक्षण देणारा केंद्रीय स्तरावरील कायदा मंजूर करावा.

सकल जैन संघ, पुणेतर्फे अचल जैन (संयोजक) विजयकांत कोठारी, मिलिंद फडे, महावीर कटारिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा ते १२ या वेळात धरणे आंदोनल करण्यात आले. धरणे आंदोलनात पुणे आणि परिसरातील जैन बंधू-भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांनी “हम जैन है हम रुकेंगे नही, झुकेंगे नही‌”, “डरके नही, डटके खडे रहेंगे, अहिंसक है कायर नही‌” , “जैन मंदिर नही टूटने देंगे, हम अपनी आस्था बचाएंगे” , “हम शांत है लेकिन कमजोर नहीं”, “मंदिर पर हमला बंद करो” , “बीएमसी चोर है” , “जैन समुदाय को न्याय चाहिए”, “एक है तो सेफ है” , “हम जैनो ने ठाना है मंदिर वही बनाना है”, “जिओ और जिने दो‌” अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनाच्या सुरुवातीस व शेवटी नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. ८७ वर्षांचे सुरेश शहा यांनी आंदोलनात सहभाग घेत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इरादा व्यक्त केला.
राजकीय पक्षातील लोकांनी अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रशांत जगताप, अभय छाजेड, अविनाश बागवे व बाळा ओसवाल, डॉ. कल्याण गंगवाल, राजेश शहा यांनी आपले विचार व्यक्त केले.
जैन समाजबांधवांना संबोधित करताना मिलिंद फडे म्हणाले, मुंबईतील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सर्व समाजबांधव एकत्र झाले आहेत याचा आनंद असून ‌ “हम एक है तो सेफ है‌” असा नारा त्यांनी दिला.
अचल जैन म्हणाले, समाजाच्या भावना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. समाजाच्या भावनांचा जर विचार झाला नाही, न्याय मिळाला नाही तर पुढील भूमिका ठरवू.

युवराज शहा, अभय छाजेड, प्रविण चोरबेले, सुरेखा शहा, अजित पाटील, इंद्रकुमार छाजेड, प्रिती पाटील, सुरेश शहा, लक्ष्मीकांत खाबिया, सुरेंद्र गांधी, संपत जैन,सतीश शहा, समीर जैन, नितीन जैन, भरत सुराणा, ॲड. योगेश पांडे, अभय जैन, अल्पेश गोग्री यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी निषेधात्मक भावना व्यक्त करत आंदोलनाला पाठींबा दिला.

२६/११ केस’चे वास्तव सरकारी वकील, भाजप’वासी ॲड.उज्वल निकम यांचे कडुन भांडारींनी समजून घ्यावे..!


जोखीम घेऊन, शहीदत्व स्वीकारून कसाब व अफ़ज़ल गुरू यांना काँग्रेस काळात पकडले व एनकाऊंटरने नव्हे तर न्यायीक प्रक्रियेने फाशी दिली.!
११ वर्षे सत्तेत राहून केले काय..?
छड़ा लावण्या ऐवजी आरोपच
करत बसणार काय..?

  • काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी ..

पुणे – दि २१
२६/११ केस’चे वास्तव तत्कालीन सरकारी वकील व भाजप’चे लोकसभेचे उमेदवार अँड उज्वल निकम यांचे कडुन माधव भांडारी यांनी समजून घ्यावे व मगच उथळ व हास्यास्पद आरोप करावेत असा खुलासा काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या २६/११ च्या हल्ल्यात काँग्रेस चा हात” या आरोपावर, उत्तर देतांना सांगीतले.
ते पुढे म्हणाले की, २६/११ अतिरेकी हल्ला तेंव्हाच्या काँग्रेस शासन काळात सक्षम पोलीस अघिकाऱ्यांनी जीवावर जोखीम घेऊन प्रसंगी शहीदत्व स्वीकारून अजमल कसाब यास पकडले व त्यास एनकाऊंटर ने नव्हे तर रितसर न्यायीक प्रक्रिया चालवून फाशी दिली.. अजमल कसाब असो वा अफजल गुरू या अतिरेक्यांना मृत्युदंडाची शिक्षा देणारे काँग्रेस सरकारच होते मात्र भाजप शासीत काळात, कंदहार येथे अतिरेक्यांना सोडण्याचे काम वा संसदेवर गोळीबाराची नामुष्की, काश्मिर पंडीतांची हत्या वा पुलवामा मधील ४० सीआरपीएफ जवानांची हत्या वा चिन कडुन घुसखोरी व २० भारतीय जवानांची हत्या हे सर्व देशास नामुष्की आणणारे प्रकार व हल्ले मात्र ‘भाजप सत्ताकाळातच’ झाले याचा खरेतर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी आकलन करावे, बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारी व तथ्यहीन वक्तव्ये ऊठसूठ काँग्रेस वर पुन्हा करू नयेत अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.

8000 कोटीच्या थकीत कर्जामुळे 6 बँका संकटात

मुंबई: दूरसंचार कंपनी एमटीएनएल सात बँकांकडून आणि इतर काही ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडण्यात अपयशी ठरली आहे.सतत तोट्यात चालणाऱ्या या कंपनीने सात सरकारी बँकांकडून घेतलेले 8,346 कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. म्हणजेच ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनीने स्वतः नियामक फाइलिंगद्वारे शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.31 मार्च 2025 पर्यंत, कंपनीवरील एकूण थकित कर्ज 33,568 कोटी रुपये आहे. यामध्ये 8,346 कोटी रुपये बँक कर्ज, 24,071 कोटी रुपये सॉवरेन गॅरंटी बाँड आणि 1,151 कोटी रुपये दूरसंचार विभागाकडून रोख्यांवर व्याज देण्यासाठी घेतलेले कर्ज आहे.एमटीएनएलच्या थकीत कर्जांमध्ये सर्वात मोठा वाटा युनियन बँक ऑफ इंडियाचा आहे, या बँकेकडून कंपनीने 3,633 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यतिरिक्त:

इंडियन ओव्हरसीज बँक – ₹ 2,374 कोटी

बँक ऑफ इंडिया – ₹ 1,077 कोटी

पंजाब नॅशनल बँक – ₹ 464 कोटी

स्टेट बँक ऑफ इंडिया – ₹ 350 कोटी

युको बँक – ₹ 266 कोटी

इतर कर्जांसह एकूण रक्कम – ₹ 8,346 कोटी

कंपनीने म्हटले आहे की ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान या बँकांना कर्ज आणि व्याजाची परतफेड करण्यात आलेली नाही.कंपनीला होत असलेला तोटा आणि कर्जामुळे एमटीएनएलने आधीच अनेक वेळा सरकारकडे मदत मागितली आहे. आता प्रश्न असा आहे की सरकार या संकटात सापडलेल्या कंपनीला आणखी एक बेलआउट पॅकेज देणार की ही कंपनी खाजगी कंपन्यांना विकणार हा मोठा प्रश्न आहे.
एमटीएनएल म्हणजेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही एक सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) दूरसंचार कंपनी आहे. ही कंपनी 1 एप्रिल 1986 रोजी स्थापन झाली. ही कंपनी भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या (दूरसंचार विभाग – दूरसंचार विभाग) अंतर्गत येते.एमटीएनएलची सुरुवात विशेषतः दिल्ली आणि मुंबई सारख्या दोन प्रमुख महानगरांमध्ये टेलिफोन सेवा देण्यासाठी करण्यात आली होती. बीएसएनएल सारख्या मोठ्या दूरसंचार नेटवर्कला पाठिंबा देणे आणि शहरी भागात जलद, आधुनिक दूरसंचार सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट होते.

मुंबई-पुणे महामार्गावरील पुण्यातील तिघांचा मृत्यू

पुणे:मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा परिसरात रविवारी रात्री भरधाव ट्रकने मोटारीला धडक दिली. त्यानंतर मोटार पुण्याकडे येणाऱ्या मोटारीवर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेसह तिघे जण पुण्यातील आहेत. अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिया सागर इंगुळकर (वय ३५, रा. टिळक रस्ता, १०४१, शुक्रवार पेठ), निलेश संजय लगड (वय ४२), श्राव्या निलेश लगड (वय १२, दोघे रा. गिरिजाशंकर अपार्टमेंट, सदाशिव पेठ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत सागर पांडुरंग इंगुळकर (वय ४०) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अपघातात शरयू लगड, रुद्राक्ष लगड, अंशिका मोगल, आरव मोगल, अर्श लगड, अर्षित लगड, तसेच मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील अश्विनी रमेश जाडकर (वय ४३), ओमकेश रमेश जाडकर (वय २३), सुमीत तुकाराम कदम (वय २४), पुष्कर लक्ष्मण शेळकंदे (वय २५), जिग्नेश रमेश जाडकर (वय १२), संजय नामदेव वाल्हेकर (वय ४२), विमल नामदेव वाल्हेकर (वय ६९, सर्व रा. भिवंडी, जि. ठाणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगड आणि इंगुळकर हे नातेवाईक आहेत. ते कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते. रविवारी रात्री जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन ते मोटारीतून पुण्याकडे परतत होते. त्या वेळी मुंबईकडे भरधाव वेगात ट्रक निघाला होता. मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या वेळी मोटारचालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार पुण्याकडे येणाऱ्या मोटारीवर आदळली.

अपघातात सागर इंगुळकर यांची पत्नी प्रिया, साडू निलेश लगड आणि त्यांची मुलगी श्राव्या गंभीर जखमी झाले. मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील चालकासह सात जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड तपास करत आहेत.

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात:भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आहे. एखादा राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भंडारी यांच्या आरोपावर पलटवार केला आहे.
उतारवयात विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांच्या उपचारासाठी काही सहकार्य लागलं तर राष्ट्रवादी तन-मन-धनाने भंडारींना सहकार्य करणार आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी माधव भंडारींवर बोचरी टीका केली. भंडारींना पक्षात कोणीच विचारत नाहीय.‌ ते आऊटडेटेड झालेली बॅटरी असल्याचा टोला देखील मिटकरी यांनी लगावला आहे.

मुंबईवरील 26/11 च्या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते माधव भंडारी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेसने माधव भंडारी एक सडकछाप व्यक्ती असल्याचा आरोप करत या प्रकरणी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.माधव भंडारी यांच्या हस्ते पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकर हत्या व मी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त आरोप केला. मुंबई शहरावर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. मुंबईवर हल्ला होणार याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होणे अशक्य आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश व एम एम कलबुर्गी या हत्याकांडाद्वारे हिंदुत्त्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले.

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकर व सचिन अंदुरे यांना शिक्षा झाली. पण या प्रकरणी ते निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे माधव भंडारी म्हणाले.

माधव भंडारी यांनी यावेळी गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप केला. भारतात गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाल्यानंतर व्यवस्थेमुळे हिंदुत्त्ववादी संघटनांना बदनाम केले जात आहे. कारण, व्यवस्था म्हणजे पोलिस, महसूल, न्यायव्यवस्था तीच आहे. ही व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

‘चित्र’ कलेच्या दुनियेत रमले कलाप्रेमी  

द्विज आर्ट्सच्या माध्यमातून ‘कला उत्सव’ चित्र प्रदर्शनाचे आयोजन ; तब्बल ११२ कलाकारांच्या ६५० हून अधिककलाकृतींचा समावेश
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन, दिलीप जोशी (जेठालाल) यांचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी चित्ररूप…अयोध्या श्रीराम मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, ताज महाल…भगवान श्रीकृष्ण, महादेव, गणपती, नटराज यांच्या विविध रूपांचे दर्शन अशा ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांच्या सुंदर कलाकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. ऐतिहासिक स्मारकांची भव्यता, धार्मिक व पौराणिक कलाकृती यांसह विविध कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या.

द्विज आर्ट्सच्या माध्यमातून पुण्यातील कला क्षेत्रात विशेष स्थान मिळवलेल्या चार कलाकारांनी एकत्र येत ‘कला उत्सव’ या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाचे आयोजन बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, महेश थोरात आणि  हनुमंत जगनगडा हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. चित्रकार हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती कारंजावाला आणि मोहिनी गेंदे या आपापल्या कला वर्गांमधून कलाकार घडवणाऱ्या गुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुंदर कलाकृती प्रदर्शनात आहेत.

दीपाली जगताप म्हणाल्या, या प्रदर्शनात एकूण ११२ कलाकार सहभागी झाले आहेत, विशेष म्हणजे ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनात एकूण ६५० हून अधिक चित्रे आहेत. चारकोल, सॉफ्ट पेस्टल, वॉटर कलर्स, ऍक्रेलिक पेंटिंग्स, कॅलिग्राफी, टेक्स्चर आर्ट अशा विविध माध्यमांतील कलाकृती प्रदर्शनात आहेत. दिनांक २२ एप्रिल पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहण्यास खुले आहे.

फर्ग्युसनमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात यंदा 81 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या असून, ग्रीन वॉर्बलर, रेड ब्रेसेड फ्लायकॅचर आणि ट्री पपेट असे युरोपातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती कॉलेजच्या नेचर क्लबने नुकत्याच केलेल्या पक्षीगणनेत आढळून आली आहे.

वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी महाजन म्हणाल्या, “हे पक्षी खूप अंतर प्रवास करून भारतात येतात. त्यांचा आकार छोटा असतो. प्रवासादरम्यान त्यांचे वजन कमी होते. या कालावधीत युरोपात बर्फ आणि थंडी असते. त्यांना खाद्य मिळत नाही. ते सुरक्षित आणि खाण्यापिण्यासाठी योग्य अधिवासाच्या शोधात असतात. फर्ग्युसनचा आवार जैववैविध्य संपन्न असल्याने या परिसरात ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान ते वास्तव्य करतात.”

तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट) हा पक्षी वारंवार आपल्या घरट्याकडे येताना निरीक्षणात दिसला. तो जमिनीपासून 10 ते 12 फूट उंचीवरील वाळलेल्या खोडावर खालच्या बाजूने घरटे बनवितो. त्याबरोबर घार, पोपट, मैना, वेडा राघू, स्वर्गीय नर्तक, तांबोली, शिपाई बुलबुल, घुबड हे स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने आढळले.

या वर्षी 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत पक्षी गणना करण्यात आली. त्यामध्ये 68 विद्यार्थ्यांनी सहभागी होत 81 प्रकारच्या पक्षांची नोंद केली. त्यासाठी 2186 निरीक्षणे ॲपद्वारे नोंदविण्यात आली. हा उपक्रम ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या जागतिक उपक्रमाचा भाग होता. कॅर्निल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी आणि नॅशनल ऑडुबॉन सोसायटीचा त्यासाठी पुढाकार होता.

देशभरात साडेसहा हजार सहभागींनी 66 हजार निरीक्षणे सादर करीत 1086 प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले. राज्यात 500 हून अधिक सहभागींनी पाच हजारहून अधिक निरीक्षणे करीत 400 प्रजातींची नोंद केली.

सिद्धांत म्हात्रे हा विद्यार्थी म्हणाला, “हवामान बदलामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. त्यांना अधिवास गमवावा लागत आहे. शहरीकरणामुळे पक्षी संकटात आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना जागृती करण्यासाठी पक्षीगणनेसारखा उपक्रम प्रेरणादायी वाटला.”

पर्यावरणशास्त्र शिकणारी मुस्कान श्रीवास्तव म्हणाली, “या उपक्रमामुळे पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. विज्ञान, सर्जनशीलता आणि महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांना आपले कौशल्य एकत्र उपयोगात आणता आले. त्यामुळे शिक्षणाला कृतिशील उपक्रमाची जोड मिळाली.”

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. विजय तडके, डॉ. मीनाक्षी महाजन यांनी मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २१: कौशल्य रोजगार उद्योजकता नावीन्यता विभागाच्यावतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतर्गत कार्यप्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ ६ महिने ऐवजी आता ११ महिने करण्यात आला आहे. तसेच प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन डीबीटीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

त्यामुळे ज्या उमेदवारांनी १० मार्च २०२५ किंवा त्यापूर्वी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणाचीना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव ५ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व याजनेचा नव्याने लाभ घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांची आधार व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे, यांचेकडे सादर करणे अनिवार्य आहे यापुढे आधार जोडणीनंतर डीबीटीद्वारे आर्थिक लाभ दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधारशी संलग्न करुन घेणे आवश्यक आहे.

आधार व कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे, त्याच बँक खात्याचा क्रमांक योजनेच्या विद्यावेतन स्वीकारण्यासाठी नमूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराचे स्वतःचे आधार अद्यावत असणे आवश्यक आहे. आधार संलग्न मोबाईल नंबर व बँक खाते याबाबतची पडताळणी उमेदवारांनी स्वतः करायची असून, ही जबाबदारी ही उमेदवाराची असेल,

सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, प्रशिक्षणार्थीनी आधार पडताळणी करणे तसेच, आस्थापना / नियोक्ते यांनी कागदपत्र तपासणीसाठी जिल्हा कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८२. रास्ता पेठ, पुणे येथे ३० एप्रिल, २०२५ पर्यंत संपर्क साधून आवश्यक तो तपासणी करुन घ्यावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसंच, आस्थापना / नियोक्ते यांनी घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सा. वा. मोहिते, प्र. सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्याेजकता, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
0000

“अध्यात्म आणि विकास यांचे नाते अतूट” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते अध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान

सन्मान सोहळ्याचे प्रभावी संयोजन अक्षय भोसले यांनी केले होते

पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते आज अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा विशेष सोहळा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने महिलांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक सन्मानासाठी या उपक्रमाला बळ मिळाले आहे. अध्यात्म आणि विकास यांचे नाते अतिशय जवळचे असून महिलांनी अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.”

“आळंदीच्या धाडसी महिलांचा उल्लेख करत भावनिक आठवण”

लाडक्या बहिणींच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मला आठवतंय, निधी वितरणाच्या वेळी मी आळंदीला आले होते. तिथल्या महिलांचे धाडस, आत्मसन्मान आणि कष्ट पाहून मला नेहमीच अभिमान वाटतो.”
अक्षय महाराज भोसले यांनी या महिलांचा सन्मान करण्याची कल्पना मांडली आणि ती लगेच मनापासून स्वीकारली गेली, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणात त्यांनी संत जनाबाईंचे उदाहरण देत सांगितले की, “समाजात टीका झेलूनही त्यांनी आपले अध्यात्मिक कार्य थांबवले नाही.” ही परंपरा आजच्या महिलांनीही पुढे नेली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी माहिती दिली की, “३ मे ते १० मे या कालावधीत धर्मवीर सेनेच्या वतीने, महानगरपालिका व स्थानिक संस्थांच्या सहकार्याने भव्य अध्यात्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.”

सन्मान सोहळ्याचे प्रभावी संयोजन

यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार अनिताताई सुद्रिक, जेष्ठ कीर्तनकार गयाबाई यादव, मृदंगाचार्य देविदास महाराज मांडगे, विठ्ठल महाराज कापसे व वारकरी संप्रदायातील मोठे योगदान असणाऱ्या सर्व महिलांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, श्रीमंत माऊली प्रतिष्ठानच्या प्रमुख विनित माऊली सबनीस आणि सहअध्यक्ष प्रभंजन दादा महातोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तर, अखिल वारकरी गुरुकुल संघाचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज शेळके, माऊली महाराज सुरडकर, ज्ञानेश्वर माऊली जाधव, कैलास महाराज गायकवाड, अनंत महाराज धर्मे, किशोर महाराज धुमाळ, अंकुश महाराज कदम व सर्व आळंदीतील गुरुकुलाचे अध्यक्ष महाराज मंडळी यांचा प्रमुख सहभाग होता.

त्याचबरोबर शिवसेना प्रवक्त्या, उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या सुलभा उबाळे, संर्पक प्रमुख सारिका पवार, जिल्हा प्रमुख मनिषा परांडे, तालुका प्रमुख प्रिया पगडे, आळंदी नगराध्यक्ष सौ.घुंडरे, रामशेठ गावडे, नितीन गोरे, प्रकाश वाडेकर, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते.