Home Blog Page 3599

प्रतापराव पवार यांना यावर्षीचा “पुण्यभूषण पुरस्कार’ – दिनांक 26 जून रोजी बालगंधर्व येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा…

0

 

पुणे :

“पुण्यभूषण फाऊंडेशन'(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा “पुण्यभूषण पुरस्कार’ श्री. प्रतापराव पवार यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना प्रसारमाध्यम, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी  महामहीम राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात येत आहे.

हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 26 जून 2015 रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे होणार आहे. अशी माहिती “पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.

एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरित असलेली चांदीची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कार्थी प्रतापराव पवार यांना गौरविण्यात येणार आहे. पद्‌मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर हे या निवड समितीचे अध्यक्ष आहेत.

सी. विद्यासागर राव (राज्यपाल, महाराष्ट्र) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, शरद पवार (माजी केंद्रीय मंत्री) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराबरोबर पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे, या पुरस्काराचे यंदाचे 27 वे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या स्थळी प्रवेश पत्रिका (निमंत्रण) आणावी. पार्कींगची व्यवस्था कॉंग्रेस भवन आणि मॉडर्न कॉलेजच्या मोकळ्या मैदानावर वेगळी केली आहे. सर्वांनी 10.15 पर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आधी “पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ गायक कै.पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे कै.काका केळकर, कै.शंतनुराव किर्लोस्कर, कै.डॉ.बानुबाई कोकाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक कै.पु.ल.देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी.के.अय्यंगार, कै.डॉ.रा.ना.दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ.जयंत नारळीकर, कै.प्रतापराव गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, कै.जयंतराव टिळक, डॉ.जब्बार पटेल, राहुल बजाज, कै.डॉ.के.बी.ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका कै.डॉ.रोहिणी भाटे, डॉ.बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू, शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.शां.ब.मुजुमदार, डॉ.रा.चिं.ढेरे, डॉ.ह.वि.सरदेसाई, निर्मला पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ.सायरस पूनावाला या मान्यवरांना प्रदान करण्यात आले होते.

पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सुरक्षेच्या दृष्टिने बालगंधर्व रंगमंदीराची पहाणी केली आहे. या पुरस्काराची पुर्व तयारीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला महापौर दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, पोलिस उपायुक्त मंदार जोशी उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्याच्या तयारीसाठी 27 प्रकारच्या नियोजन समित्या तयार करण्यात आल्या आहेत, असे ही डॉ. देसाई यांनी सांगितले.

दलित पँथर संघटनेच्या राज्य सरचिटणीस पदी स्वप्नील कांबळे

0
unnamed
पुणे – दलित पँथर महाराष्ट्र राज्य सर चिटणीस पदी स्वप्नील कांबळे यांची  श्री सुखदेव (तात्या) सोनावणे यांच्या नेतृतावाखाली व कार्यकर्त्यांच्या उपस्थित पत्र देऊन  हि नियुक्ती करण्यात आली.
  कार्यशीलता व सामाजिक दृष्टीकोन यांचा विचार करून हि नियुक्ती करण्यात आली असून समाजाच्या सर्व क्षेत्रात विकास करण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य व झोपडपट्टी- वासियांसाठी असणारी आत्मीयता व तळमळ पाहून सर्व स्तरातील लोकांपर्यंत आपल्या कार्यातून व प्रबोधनातून यशस्वीपणे पोहचवण्याची जबाबदारी या पत्रा  द्वारे देण्यात आली.

सुरेल स्वरांनी रंगला ‘मर्डर मेस्त्री’ संगीत सोहळा

0

1 2

उत्साहात आणि झगमगाटात संपन्न झालेल्या मर्डर मेस्त्री या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात शब्द-सुरांची अनोखी मैफल सजली. कलाकारांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले.  क्रांती रेडकर आणि संजय खापरे यांच्या धमाकेदार स्कीटने चांगलीच धमाल उडवली तर आरोही आणि आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी सगळ्यांनाच चिंब भिजवून टाकले. या सगळ्यावर कळस चढवला मानसी नाईकच्या दिलखेचक अदांनी. विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मर्डर मेस्त्री चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला.

 

अलिकडे मराठी सिनेसंगीताचा दबदबा वाढताना दिसतोय. गाण्याचे सादरीकरण हटके करण्याकडे संगीतकारांचा ओढा असतो. संगीताकडे नव्या दृष्टीने पाहणारी नवी फळी मराठी सिनेसंगीतात सक्रीय होताना दिसते आहे. आगामी बहुचर्चित मर्डर मेस्त्री या सिनेमातही सुमधुर गीतांचा हा नजराणा अनुभवता येणार आहे. ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटात एकूण ३ गीते आहेत. गीतकार गुरु ठाकूर व मंदार चोळकर यांच्या शब्दांनी यातील गीते सजली आहेत. ‘संशयाचा किडा’, ‘जीवाला लागला घोर’ ही दोन गीते गायक आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केली आहेत. रसिकांच्या मनावर आपल्या सुरेल स्वरांची मोहिनी घालणाऱ्या आशातांईचे ‘अळीमिळी गुपचिळी चिडीचूप’ हे एक भन्नाट गीत या चित्रपटात आहे. नव्या दमाचे संगीतकार पंकज पडघन यांचा संगीतसाज या चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुंदर कथेच्या कॅनव्हासवर मर्डर मेस्त्री सिनेमातील गीतांनी सुरेख रंग भरण्याचा प्रयत्न केल्याची भावना गायक संगीतकारांनी व्यक्त केली.

 

नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस यांची संयुक्त निर्मिती असलेला मर्डर मेस्त्री हा सिनेमा हिंदीतील प्रसिद्ध निर्माते अब्रार नाडियादवाला यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित या चित्रपटात एखादया छोट्याशा सवयीनेसुद्धा माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतं हे दाखवण्यात आलं आहे. आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने अनेक चित्रपटांना नेत्रसुखद करणाऱ्या राहुल जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन व छायांकन केलं आहे.

 

सस्पेस्न्स कॉमेडी मर्डर मेस्त्री ची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लॊके यांनी लिहिलेत. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, क्रांती रेडकर, मानसी नाईक, कमलाकर सातपुते अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे.

 

मर्डर मेस्त्री मधल्या रहस्याचा गुंता १० जुलैला आपल्यासमोर उलगडणार आहे.

मुंबईचे तीन तेरा वाजवून राज्यभर पावसाची दमदार सुरुवात- पर्यटक आनंदी …

0

पुणे-मुंबईचे सलग तीन दिवस तीनतेरा वाजविल्यानंतर पावसाने राज्यभर दमदार पणे आपले आगमन नोंदविले आहे
कोकण आणि विदर्भावर पावसाने जोरदार वृष्टी केली आहे आहे. शनिवारी व रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.त्यानंतर सोमवारी हि सकाळी तो बरसतच होता राज्यातील अनेक गावांमध्ये एका महिन्यात पडणारा पाऊस गेल्या २४ तासांत रत्नागिरी आणि चंद्रपुरात बरसला, तर रत्नागिरीतील संगमेश्वर येथे राज्यातील सर्वाधिक २३० तर चंद्रपूर येथे २०० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. गेल्या आठवड्यापासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत पुणे शहरालाही  रविवारी आणि पुन्हा सोमवारी सकाळी देखील पावसाने सुखद धक्का दिला
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याला रविवारीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीतील शिरगाव येथे रविवारी घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. सर्वत्र पाऊस झाल्याने बस व रेल्वे वाहतूक विस्कळित झाली.

पुण्यात यंदाच्या पावसाळी हंगामात प्रथमच शहरभर पडलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांवर साचलेले पाणी आणि मध्यवर्ती भागातील काही मुख्य चौकातील बंद पडलेले सिग्नल यामुळे रविवारी वाहतुकीचा बोजवारा उडाला.
रविवारी मान्सूनने उत्तरेकडे आणखी मजल मारली. छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात तसेच झारखंडच्या काही भागात मान्सून दाखल झाला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात ते केरळपर्यंतच्या किनारपट्टीवरील द्रोणीय स्थिती यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. पुढचे दोन-तीन दिवस या हवामानात बदल होणार नसल्याने पावसाचा जोर टिकून राहील, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणातील अनेक गावांना शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपले. काही गावांमध्ये तर पावसाने दोनशे मिलिमीटरचा आकडा ओलांडला. विदर्भातही सर्वदूर सरासरी पन्नास मिलिमीटर पाऊस झाला. तुलनेने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता.
मुंबईत सलग तिसर्‍या दिवशी रविवारी संततधार कायम हाेती. शनिवारी रात्री वांद्र्यातील फूल गल्लीत इमारतीचे बांधकाम चालू असताना पावसामुळे काही भाग खचून झालेल्या दुर्घटनेत यास्मीन इम्रान शेख (२७) आणि सरीना इम्रान शेख (१३) य मायलेकींचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पुरात एक वाहून गेला तर दरड काेसळून महिलेचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात वीज पडून दाेघे ठार झाले. दुसरीकडे चंद्रपूरमध्ये खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून इंिजनिअर मेकॅनिकल एस. एम. ढोबळे यांचा मृत्यू झाला.
महाबळेश्वर मध्ये  गेल्या दाेन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये नियमित सुरू असलेल्या पावसाचा शनिवारपासून चांगलाच जाेर वाढला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तब्बल १८४ मिलिमीटर म्हणजेच ७.५ इंच पावसाची नाेंद झाली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५३.४ मिमी (६.१ इंच) पाऊस बरसला. म्हणजेच ३३ तासांमध्ये १३.५ इंच पाऊस बरसला.
दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने पंचगंगेचे पात्र दुथडी भरून वाहू लागले. तसेच जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या दाेन दिवसांत ७१८ मिमी , तर एक जून पासून २१३२ मिमी पावसाची नाेंद झाली. करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज आणि शिरोळ येथे मध्यम पाऊस असला तरी उर्वरित आठ तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

देशात आणीबाणी ;अडवानींचे विधान गंभीरतेने घ्या -शरद पवार

0

कुपवाड -देशात आणीबाणी येवू शकते अशी भीती लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पाशवी बहुमताच्या जोरावरील सरकार आणीबाणी लादू शकते काय ?   अशी चर्चा उसळली असताना शरद पवार यांनी तिला हवा देण्याचे काम आज येथे केलेसुषमा स्वराज  यांच्याविषयीची चर्चा निरर्थक आहे असेही नमूद करून अडवाणी यांचे आणीबाणी बद्दलचे विधान गंभीरतेने घ्यायला हवे असे ते म्हणाले
ते म्हणाले ‘भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी यापूर्वीच्या आणीबाणीच्या झळा सोसलेल्या आहेत. त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत त्यांना साम्य वाटत असावे. म्हणूनच त्यांचे विधान देशाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे,’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी अंजनी (तासगाव) येथे बोलताना व्यक्त केले.
तासगाव तालुक्यातील अंजनी येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलचे आर. आर. पाटील असे नामकरण आणि शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शरद पवार रविवारी अंजनीत आले होते. या वेळी आमदार पतंगराव कदम, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रयतचे अध्यक्ष अनिल पाटील, माजी खासदार निवेदिता माने आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आबांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांनी केले. प्रास्ताविक स्मिता पाटील यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘सरकारने साखर कारखानदारांना दिलेले सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज फसवे आहे. ती रक्कम मिळायला आणखी आठ महिन्यांचा कालावधी जाणार आहे. शिवाय चार महिन्यांचे व्याजही कारखानदारांना द्यावे लागणार आहे. कर्जाची मुदत एक वर्षाची आहे. आमचे सरकार असताना साखर कारखानदारांना दीर्घ मुदतीचे कर्ज दहा टक्के व्याज दराने दिले होते. व्याजाची रक्कम सरकारने स्वतः भरली होती.’
दरम्यान, जयंत पाटील, खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या जिल्हा बँकेच्या युतीबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची स्थिती उत्तम आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने छोट्या छोट्या युत्या होत असतात. त्यामुळे कोण कोणाबरोबर गेला आणि कोण आपल्याबरोबर आला, याला फारसे महत्व देण्याचे कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापुढेही राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे.’
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, ‘लालूप्रसाद यादव, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि नितीशकुमार यांचा पक्ष असे आम्ही चार पक्ष एकत्र येवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची तेथील जनतेची भावना आहे. म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अगोदर तेथील विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याचे जागावाटप झाले असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा आली आहे. सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा फॉर्म्युलाही लवकर तयार केला जाणार आहे.
सध्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि ललित मोदी यांच्या भेटीवरुन होत असलेली चर्चा निरर्थक आहे. परदेशात असलेल्या भारताच्या नागरिकाला भेटणे हा काही गुन्हा नाही. नको त्या गोष्टीचे राजकारण केले जात असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

योग ही आयुष्य पुरेपूर जगण्याची जडीबुटी-पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

 12_39_0_0_0_0_0yogadaypmmoditop10rajpath-yoga1348632-reuters-modi-doing-yoga-3-ed

१९१ देशांच्या २ अब्ज लाेकांनी केली याेगासने

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज राजपथावर झालेल्या पहिल्यावाहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्यात राजनैतिक अधिकारी, जवान, सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह सुमारे 35 हजार नागरिक सहभागी झाले. मोदींनी यावेळी स्वतः विविध आसने केली .
रफी मार्ग ते विजय चौक ओलांडून इंडिया गेटपर्यंतचा दोन किलोमीटरचा संपूर्ण मार्ग हिरव्या कारपेटवरील निळ्या आणि लाल चटयांनी भरून गेला होता. सर्व वयोगटांतील लोकांनी एकत्रितपणे 35 मिनिटे योगासनांचे 21 प्रकार केले. यात ध्यानधारणा तसेच काही सुलभ आसनांचा समावेश होता.
राजपथवर झालेला हा योग सोहळा आजवरचा सर्वांत विक्रमी असून, या सोहळ्याची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्‍यता आहे. एकाच वेळी इतक्‍या मोठ्या संख्येने योगसाधना करण्याचा हा जगातील पहिलाच सोहळा असल्याचा आयोजकांचा दावा असून, या सोहळ्याची गिनेसमध्ये नोंद व्हावी, यासाठी अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती “आयुष‘ अर्थात योग मंत्रालयाने दिली. भव्य योगसाधना सोहळ्याचा यापूर्वीचा गिनेस विक्रम विवेकानंद केंद्राच्या नावावर आहे. विवेकानंद केंद्राच्या वतीने 19 नोव्हेंबर 2005 रोजी ग्वाल्हेर येथे योगशिबिर भरविण्यात आले होते. त्यात 29,973 लोकांनी सहभाग घेतला होता
नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोर ठेवलेल्या प्रस्तावाला 177 देशांनी पाठिंबा दर्शविला आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे ठरले. यामध्ये 47 मुस्लिम देशांचा समावेश होता. शांती आणि एकजुटीच्या नव्या उंचीचे मोजमाप करण्यासाठी मानवी मनाला प्रशिक्षित करण्याचे नवे पर्व सुरू झाले असल्याचे सांगून मोदी यांनी आजच्या कार्यक्रमादरम्यान योगाच्या व्यापारीकरणाविरुद्धही सावधनतेचा इशारा दिला.
एकत्रित योगाभ्यास कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येकाला आश्‍चर्यचकित करण्यापूर्वी 64 वर्षे वयाचे मोदी म्हणाले, की कोणी विचार केला होता की राजपथ योगपथ बनेल? अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांच्यासह विविध देशांचे राजदूत या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवालयातील उच्चपदस्थ अधिकारी तसेच पंतप्रधान कार्यालयातील अधिकारीही या वेळी उपस्थित होते.
योगसाधना केवळ शरीराचा व्यायाम नसून, मनुष्याच्या आंतरिक विकासासाठी योगसाधना आवश्‍यक आहे. ते तणावमुक्ती आणि शांततेचेही साधन आहे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी योगासनाच्या कार्यक्रमापूर्वी आपले विचार मांडताना केले. ते म्हणाले, की विकासाचे नवनवे टप्पे पादाक्रांत केले जात आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक बदल घडताहेत. पण या सर्वांमध्ये माणूस तिथेच राहिला आहे, असे व्हायला नको. तसे झाले तर ते संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक असेल. योगसाधनेमुळे मनुष्याचा आंतरिक विकास होतो. ते केवळ शरीराचे व्यायामप्रकार नाहीत. मन, बुद्धी, शरीर आणि आत्मा हे सगळे संतुलित करण्यासाठी योगसाधनेची भूमिका महत्त्वाची आहे.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केल्याबद्दल त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे, त्याचबरोबर या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार मानले. आज सूर्याची पहिली किरणे जिथे उगवतात तेथपासून ते सूर्याच्या शेवटच्या किरणांपर्यंत जगातील सर्व देशांमध्ये योगसाधना केली जाईल, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. योगसाधना पुढे घेऊन जाणाऱ्या ऋषी-मुनींचे, योगशिक्षकांचे, योगगुरूंचे त्यांनी आभार मानले. या वेळी उपस्थित योगगुरू रामदेव बाबा यांनीही योगा हा वैज्ञानिक, सार्वत्रिक आणि धर्मनिरपेक्ष असल्याचे नमूद केले.

जगण्याचा सकारात्मक मंत्र देणारा रोमॅंटीक ‘वेलकम जिंदगी’

0

मराठी सिनेमांमधील सुपरस्स्टार स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर पहिल्यांदाच एकत्र एका सिनेमात दिसणार असून ‘वेलकम जिंदगी’ असं या सिनेमाचं टायटल आहे. आकर्षक इंग्लिश हिंदी टायटल असलेला ‘वेलकम जिंदगी’ हा मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी सजलेला सिनेमा असणार आहे. येत्या २६ जून रोजी हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दिग्दर्शक उमेश घाडगे यांनी ‘वेलकम जिंदगी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि लोकप्रिय अभिनेत्री अमॄता खानविलकर हे दोघे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहेत. त्यामुळे या सिनेमाची रंगत ह्या गोडजोडीने वाढणार आहे. दोघांची अभिनयाची जुगलबंदी बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकताही वाढली आहे. ‘वेलकम जिंदगी’ सिनेमाची निर्मिती अजित साटम, संजय अहलुवालिया आणि बीभास छाया यांनी केली असून या सिनेमामुळे प्रेक्षकांना एक दर्जेदार सिनेमा लवकरच बघायला मिळणार आहे.

‘वेलकम जिंदगी’ सिनेमात स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, डॉ.मोहन आगाशे, मुरली शर्मा, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, प्रशांत दामले, उर्मिला कानेटकर, पुष्कर श्रोत्री, विवेक लागू, सतिश आळेकर आणि जयंत वाडकर अशी लोकप्रिय कलाकारांची भलीमोठी लिस्ट आहे. यावरून या सिनेमात काय धमाल बघायला मिळणार याकडे नजरा लागल्या आहेत. सिनेमाचे लेखन गणेश मतकरी यांनी केलं आहे. आता इतकी मोठी स्टारकास्ट आणि गणेश मतकरी यांच्यासारख्या प्रतिभावंत लेखकाने सिनेमाचे लेखन केले आहे, याने आणखीनच सिनेमाची उत्सुकता वाढणार आहे.

सिनेमाला अमित राज, पंकज पडघन, शामीर टंडन, सौमिल आणि सिद्धांत या संगीतकरांनी संगीत दिले आहे तर सिनेमाची गीते गुरू ठाकूर, ओमकार मंगेश दत्त, मंदार चोळकर, वरूण लिखाते यांनी लिहिली आहेत. येत्या २६ जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

औंध रस्ता वृक्ष तोड प्रकरणी खा . अनिल शिरोळे यांच्याकडून प्रशासनाची कानउघाडणी

0

वृक्ष प्रेमींच्या तीव्र विरोधानंतर पुन्हा पाहणीचा पालिकेचा निर्णय

पुणे :

पुणे विद्यापीठ -औंध रस्त्यावरील वृक्ष तोडीला आलेल्या हरकतींची सुनावणी करण्यासाठी  शनिवारी  डॉ आंबेडकर कक्षात आलेल्या उपायुक्त राजेंद्र जगताप आणि अधिकाऱ्यांची खासदार अनिल शिरोळे यांनी चांगलीच कान उघाडणी केली .

‘प्रशासनाने पर्यावरण आणि झाडे वाचविण्याचे काम केले पाहिजे ,तोडण्याचे नाही . त्यामुळे ‘कोर्टात जा ‘ ही भाषा योग्य नाही . पर्यावरण प्रेमी पुणेकर झाडे वाचविण्यासाठी सुनावणीला आले आहेत ,त्यांच्या भावना प्रशासनाने समजावून घेतल्या पाहिजेत. आतापर्यंत तोडलेल्या ६ हजार झाडांच्या बदल्यात १८ हजार झाडे लावली का ? वृक्ष प्राधिकरण झाडांची काळजी करायला आहे ,झाडे तोडायला नाही . हा विषय केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यानाही कळविणार आहोत  ‘ अशा शब्दात शिरोळे यांनी सुनावणीत सुनावल्यावर  आणि वृक्ष -पर्यावरण प्रेमींनी कडाडून विरोध केल्यावर ‘या संदर्भात पुन्हा पाहणी करू ‘ असा पवित्रा प्रशासनाला घ्यावा लागला

पुणे विद्यापीठ ते राजभवन रस्ता रुंदीकरणासाठी वृक्ष तोड करण्यास आक्षेप घेणाऱ्या पर्यावरण प्रेमी संस्था आणि व्यक्तींना महापालिकेतर्फे सुनावणीसाठी बोलावले होते . पर्यावरण प्रेमी पुणेकर  मोठ्या संख्येने उपस्थित होते . खासदार अनिल शिरोळे ,विनोद जैन ,विवेक वेलणकर आदींनी वृक्ष तोडीवर जोरदार आक्षेप घेतले .

बेकायदेशीर वृक्ष प्राधिकरण ,वृक्ष अधिकारी,सदस्य  यांच्या बेकायदेशीर नेमणुका  या मुद्द्यापासून विद्यापीठ रस्त्यावरील वृक्ष तोडीपर्यंत सर्व मुद्द्यांवर  पालिका उपायुक्त राजेंद्र जगताप यांना बचावात्मक पवित्र्यात जावे लागले .

सुनावणी फक्त औंध वृक्ष तोड प्रस्ताव या विषयावर केंद्रित आहे ‘ असे वारंवार राजेंद्र जगताप यांनी सांगितले ,तर वृक्ष प्राधिकरण अस्तित्वातच नसल्याने या सुनावणीला कायदेशीर दर्जा नाही ‘ असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे होते

‘इथून पुढे आम्ही प्रत्येक वृक्ष तोडीकडे लक्ष देणार आहोत . पालिकेला उगाचच झाडे तोडून देणार नाही. तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात तीन झाडे लागतात का ती जगतात का हेही तपासणार आहे  ‘ असे शिरोळे यांनी बजावले

वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग हे दोन वेगळ्या अस्थापना आहेत मात्र पुणे पालिका उद्यान विभागालाच वृक्ष प्राधिकरण संबोधून रेटून वृक्ष तोडीचे निर्णय बेकायदेशीरपणे स्वार्थी हेतूने घेत आहे ‘ असे विनोद जैन यांनी यावेळी सांगितले

सुजित पटवर्धन ,डॉ सुषमा दाते ,माधवी राहिरकर,कनिझ सुखराणी , प्रशांत इनामदार ,रणजीत गाडगीळ ,सारंग याद्वाडकर,सचिन पुणेकर ,शैलेंद्र पटेल असे अनेक जण  उपस्थित होते

‘सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह च्या वतीने अध्यक्ष दीपक बिडकर आणि सचिव ललित राठी उपस्थित होते

a b

चार दिग्दर्शक, चार कवी, १८ कलाकारांचा ‘बायोस्कोप’

0

मराठीतील एक अभूतपुर्व प्रयोग

मराठी सिनेमाचा आत्मा त्यातील आशय समजला जात असला तरी हल्ली दिग्दर्शक कोण हे बघूनही

सिनेमाला गर्दी होण्याचा ‘ट्रेंड’ आला आहे. त्यामुळे जसे कलाकारांच्या नावाने चित्रपट चालतात तसेच

दिग्दर्शकाच्या नावानेही सिनेमे चालू लागले आहेत. परंतु सशक्त आशय, प्रसिध्द कलाकार आणि

सर्जनशील दिग्दर्शक असे भक्कम ‘पॅकेज’ घेऊन ‘बायोस्कोप’ हा सिनेमा येतआहे. चार दिग्दर्शक, चार

कवितांवरील वेगवेगळ्या चार गोष्टी, चार कवी, चार संगीतकार अशा चौकोनी भिंगाच्या चौकटीतून सादर

होणारा ‘बायोस्कोप’ दि. १७ जुलै रोजी  प्रदर्शित होत आहे.

टाईमपास, बालक-पालक, बालगंधर्व, नटरंग यासारख्या एकापेक्षा एक हीट देणारे दिग्दर्शक रवी जाधव तसेच

पिपाणी, टुरिंग टॉकीज, पोस्टकार्ड, अनवट, अनुमती यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्याचप्रमाणे

गुरूपौर्णिमा, भारतीय, तुला शिकवीन चांगला धडा, बे दुणे चार अशा चित्रपटांद्वारे घराघरात पोहचलेले तसेच

सध्या सुरू असलेल्या ‘येक नंबर’चे दिग्दर्शक गिरीश मोहिते तर खेळ मांडला, गोजिरी, ती रात्र, शर्यत अशा

चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने या चारही दिग्गजांनी एकत्र येऊन एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

परंतु असे जरी असले तरी प्रत्येकाच्या दिग्दर्शनाचे वेगळेपण आणि खासियत रसिकांना अतिशय ठळक

आणि स्पष्टपणे जाणवणार आहे. कारण चार वेगवेगळ्या कविंच्या कविता निवडून

त्यांच्या चार कथांचा ‘बायोस्कोप’ येथे साकारण्यात आला आहे. यात मिर्झा गालिब यांच्या गझलवर गजेंद्र

अहिरे यांनी  ‘दिल-ए-नादान’ हा लघुपट तर संदीप खरेच्या कवितेवर रवी जाधव यांनी ‘मित्रा’ हा लघुपट

साकारला आहे.या लघुपटाला राष्ट्रीय पुरसकार मिळाला असून त्याचे सुमारे १५ नामांकित आंतरराष्ट्रीय

लघुपट महोत्सवांमध्ये सादरीकरण झाले आहे.  तसेच सौमित्र यांच्या कवितेवर ‘एक होता काऊ’ हा लघुपट

विजू माने यांनी दिग्दर्शित केला आहे. हा लघुपट व मित्रा या दोन्ही लघुपटांचे प्रतिष्ठेच्या ‘इंडियन

पॅनारोमा २०१४’ मध्ये निवड झाली होती. तर विदर्भातील प्रसिध्द कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर

गिरीश मोहिते यांनी ‘बैल’ नावाचा लघुपट बनविलाआहे. कविता आणि त्यातून व्यक्त होणारी भावनिक

कैफियत हा समान धागा धरून हे चौघे दिग्दर्शक या सिनेमाच्यानिमित्ताने एकत्र आले आहेत.

असे  म्हणतात दोन मराठी माणसं  एकत्र कधीच काम करू शकत नाहीत. मात्र हे ज्याने कोणी म्हणून

ठेवले आहे, त्याच्या  मताला छेद देणारी कामगिरी या चार सर्जनशील दिग्दर्शकांनी करून दाखविली आहे.

याविषयी रवी जाधव म्हणातात, ‘‘ठाणे आर्ट गील्डच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सगळेच कलाकार एकत्र

जमलेलो होतो. त्यावेळी आपण एकत्रितरित्या काहीतरी करायला हवे असे सुचले. आम्ही दिग्दर्शक आहोत,

त्यामुळे एकत्रित सिनेमा काढण्याचे ठरले.त्यावेळी चार वेगवेगळ्या कथा एकाच सिनेमात मांडणे ही

कल्पनाच अत्यंत अनोखी होती. हा अभूतपूर्व प्रयोग साकारताना एक समान धागा असावा म्हणून

कवितेवर सिनेमा काढण्याचे ठरविले. भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजवर कवितेवर एकही सिनेमा

झालेला नाही. ही संकल्पना अद्वितीय असून, यामुळे अजून तीन सर्जनशील दिग्दर्शकांसोबत काम

करण्याची, त्याच्याकडून बरेचकाही शिकण्याची दुर्मिळ संधीही या सिनेमामुळे मिळाली.’’

दिग्दर्शक विजू माने म्हणाले, ‘‘प्रत्येक कवितेत एक गोष्ट असते.ती साकारणे जसे आव्हानात्मक होते

तसेच मनोरंजन करणारेही होते.आम्हा चौघांची आवड कविता असल्याने  या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही

कविता निवडताना चर्चा केल्या. संहिता एकमेकांना वाचून दाखविल्या. एरवी असे कधीच होत नाही. हा

खुलेपणा या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवता आला. प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या क्षेत्रात यशस्वी असल्याने

प्रत्येकाच्या कामाची पध्दत जवळून पाहण्याची ही जणू सुवर्णसंधी होती. एकंदरीतच हा प्रकल्प करताना

खूप मजा आली आणि खूप शिकताही आले.’’

‘‘मैत्रीत, नात्यात किंवा अगदी कामातही अहंकार मध्ये आला की, मतभेद होणारच, याचीच भिती वाटत

होती. परंतु जेथे अहंकार बाजुला सरतो तेथेच कलेचा जन्म होते,’’ असे सांगत दिग्दर्शक गिरीश मोहिते

म्हणाले, ’’सुरूवातीला मला याची भिती वाटत होती. परंतु आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेले हे सगळेच

दिग्दर्शक अत्यंत खेळीमेळीने एकत्र काम करत होते. आम्हा चौघांमध्ये कधीच इगो प्रोब्लेम झाला नाही.

त्यामुळे सगळेच सुरळीत झाले. प्रत्येकाने  एकमेकांना आपापली मते दिली परंतु कोणीही एकमेकाच्या

कामात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आपण जे करत आहोत त्याची चांगली वाईट दोन्ही बाजू समजल्या

आणि काम अधिक चांगले झाले. ’’

दिग्दर्शक अहिरे म्हणाले, ’’पहिल्यांदाच मराठीतील चार दिग्दर्शक एकत्र येऊन काम करत असल्याने हा

प्रयोग आमच्यासाठीही तेवढाच उत्सुकता वाढविणारा होता. हा संपूर्ण अनुभव ङ्गार सुखद होता. ’’

अभय शेवडे यांच्या ‘गोल्डन ट्री एंटरटेंन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने ‘बायोस्कोप’ची निर्मिती केली

आहे. तर ‘पीएसजे एंटेरटेंन्मेंट’चे शेखर ज्योती यांनी चित्रपट प्रस्तुत केला आहे. ’अथांश

कम्युनिकेशन’,’विजू  माने प्रॉडक्शन्स’, ’प्री. टु .पोस्ट फिल्म्स’ व ’गोदा टॉकीज’ हे सहनिर्माते आहेत.

महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटीमध्ये योग दिनी २०० विद्यार्थी -विद्यार्थिनीचा सहभाग

0

पुणे :

: पुण्यातील महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटी  (आझम कॅम्पस ) मध्ये  २१ जून रोजी   ‘ आंतरराष्ट्रीय योग दिवस ‘ साजरा करण्यात आला

 
आझम स्पोर्ट्स एकेडमी ,एंग्लो उर्दू बॉयज हायस्कूल ,एंग्लो उर्दू गर्ल्स  हायस्कूल ,अबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज ,अबेदा इनामदार सिनियर कॉलेज ,इंग्लिश प्रायमरी स्कूल ,तय्यबिया ऑर्फनेज  या शैक्षणिक संस्था चे २०० विद्यार्थी -विद्यार्थिनी योगासन करून सहभागी झाले
 
संस्थेचे अध्यक्ष पी  ए इनामदार  उपस्थित होते . स्पोर्ट्स डायरेक्टर गुलझार शेख ,मजीद सय्यद ,शबनम पिरझादे  यांनी योगासनासाठी मार्गदर्शन केले 
 

‘ड्रिम मॉल- एका रात्रीची गोष्ट’ २६ जुन ला ….

0

 

व्हाईट लाईन प्रस्तुत “ड्रिम मॉल”हा  चित्रपट दिग्दर्शक सुरज मुळेकर तर याची  निर्मिती रेखा पेंटर  सह निर्माता  विजय वैद्य  यांनी केली आहे येत्या २६ जून ला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित होत आहे  या  चित्रपटासाठी सिद्धार्थ जाधव यास झी गौरव पुरस्कार – उत्कृष्ट खलनायकाच पारितोषिक मिळालाय
चित्रपटाची निर्मिती एका स्त्रीनेच केलीय समाज्यातील निर्भय स्त्रियांसाठी हा सिनेमा आहे रेखा पेंटर याचं म्हणणं.
सिद्धार्थचा पहिला खलनायक म्हणून साकारलेला चित्रपट आहे.
हि कथा आहे एका रात्रीची… एक रात्र… सई  २२ वर्षाची मुलगी… ड्रिंम मॉल मधल्या ऑफिस मध्ये  काम करते. एक दिवस तिला ऑफिस मधून निघायला उशीर होतो… आणि ती अडकते त्या मॉल मध्येच … मॉल चा सुरक्षा रक्षक तिला स्वतः च्या सापळ्यात  अडकवतो … आणि सुरु होतो एक खेळ … मानवी मनाच्या अनाकलीन भावना आणि तिचा प्रवास … एका रात्रीचा संपूर्ण बंद मॉल मध्ये होणारा पाठलाग आणि सई  चा प्रतिकार स्वतःचा जीव आणि शिव वाचवण्यासाठी केलेली धडपड …. हि धडपड फक्त सई ची नाही तर आज घराबाहेर पडणाऱ्या अनेक तरुणींची ,स्त्रियांची आहे जी सई च्या  माध्यमाच्या या चित्रपटात मांडलेली आहे.
काय होते त्या रात्री? सई  सुटते कि संपते ? कि  सई  संपवते? आयुष्यात आलेली एक रात्र सई ला कुठल्या वळणावर नेऊन  ठेवते ?
या चित्रपटात  मुख्य  कलाकार सिद्धार्थ जाधव, नेहा जोशी आहेत तर सह कलाकार ओमकार कुलकर्णी ,केदार वैद्य,पूर्वा सुभाष,राहुल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत शिक्षकांनी प्रयत्न करावेत डॉ. शं. ना. नवलगुंदकर याचे मत ; डॉ गावडे यांचा सत्कार

0

पुणे ता. २० :- ”शिक्षक असल्याचा अभिमान बाळगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी सतत वाचन, लिखाण आणि संशोधन करत राहिले पाहिजे त्यातून मिळणाऱ्या माहितीचे संक्रमण करून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृतीला चालना देण्याचे काम करत राहिले पाहिजे,” असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांनी व्यक्त केले.

डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ज्येष्ठ शिक्षनतज्ञ प्र. ल. गावडे यांचा ९१व्या वर्षातील पदार्पणाच्या वेळी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.  ज्येष्ठ उद्योगपती  डी. एस. कुलकर्णी, सौ. हेमंती कुलकर्णी,ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड,अभिनेत्री दीप्ती भोगले व डॉ. अरुणा ढेरे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती  डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. प्र. ल. गावडे  यांचा सत्कार करण्यात आला.  पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल व एक लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप होते. माझ्या सत्कारासाठी सर्व विद्यार्थी एकत्र आले याचा मला खूप आनंद आहे अशी भावना डॉ. गावडे यांनी व्यक्त केली.

नवलगुंदकर पुढे म्हणाले, ” व्यक्तिमत्व विकासासाठी बुद्धी, मन, शरीर या तीन गोष्टी आवश्यक आहेत पण आजच्या तंत्रज्ञानामुळे माणसाची बुद्धी पुढे पण शरीर आणि भावना मात्र पुढे जावू शकले नाही.” याबद्दलची  खंत त्यांनी व्यक्त केली. आयुष्य जगत असताना त्यात आलेल्या संकटाना तोंड देताना नेहमी सकारात्मक भूमिका असावी आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचा आनंदाने स्वीकार  करावा ही भावना सरांनी आमच्या मनात रुजवली अशी प्रतिक्रिया डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली.

डी. एस. कुलकर्णी म्हणाले , मी विद्यार्थी असताना सरांनी दिलेले ज्ञान आजही मला उपयोगी पडते व त्यांचा प्रेरणेतून देशातील तरुणांना सतत आपल्या देशासाठी काम करण्यासठी प्रोत्साहित करीत राहीन त्याचबरोबर देशाचे नाव उज्वल करण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

श्री. श्याम भुर्के यांनी डीएसके फाउंडेशनच्या कार्याची माहिती मांडली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण खोरे तर सूत्रसंचालन अरुण नूलकर यांनी केले.

निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम ज्ञान घ्या : ना. दिलीप कांबळे

0

पुणे-

 

” स्वत:ची क्षमता जाणीवपूर्वक विकसित करा. सर्वच क्षेत्रात संधी असतात फक्त आपण सर्वोच्चतेचा ध्यास घेतला पाहिजे ” असे प्रतिपादन प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले यांनी केले. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, पेस कॉम्प्यूटर्स व स्पेक्ट्रम फाउंडेशन आयोजित ” यशाची गुरुकिल्ली ” या करिअर मार्गदर्शन व्याख्यानात ते बोलत होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि दीप-प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सिरम चे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप दवे, महापालिका माध्यमिक शिक्षण विभागप्रमुख मीनाक्षी राउत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश होले, अमिताभ मेहता, अरिहंत कॉलेजचे विकास घोगरे, अनिल रोकडे, संतोष जाधव, विलास लोंढे उपस्थित होते. गणेशवंदन नृत्याने कार्यक्रमाचा आरंभ झाला. व्याख्यानास मोठा प्रतिसाद लाभला.

कांबळे म्हणाले  ” निवडलेल्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून सर्वोत्तम ज्ञान प्राप्त करा. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून  विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य आत्मसात करावीत. ”

टिळेकर म्हणाले  ” सोशल नेट्वर्किंग हि मोठी ताकत असून त्याचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी करावा. शिक्षणा बरोबरच खेळ आणि कलांचीही जोपासना करावी ”

या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्र संचालन संतोष देशमुख यांनी केले.  राष्ट्रीय एकत्मतेवरील फ्याशन शो सादर करण्यात आला. पसायदानाने कार्याक्रमची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत बनकर, कृष्णा चव्हाण, हर्शल सोनानी, सुनील जाधव, जय मेहता प्रतिक जोशी, आयुष तिवारी, प्रतिक अगरवाल, यश शहा, केदार संगारे, चेतन गुंड, मिलिंद चव्हाण, सौरव क्षीरसागर, स्नेहल जगताप, किरण नरके, संजना जांभूळकर, प्रियांका रोकडे , सुकन्या कारंडे, नेहा चनालीया, पूजा कदम, विजय खोत, साफिर मोतीवाला, दर्शन चौधरी यांनी परिश्रम घेतले.

‘किल्ला’ २६ जूनपासून सर्वत्र ….

0

आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर काळ कोणता ? हा प्रश्न येताच ‘बालपण’ हे उत्तर तसं  अपेक्षितच असतं आणि या बालपणातही सर्वात रम्य आठवणी असतात त्या शाळेच्या,  मित्रांच्या आणि आईने पुरवलेल्या लाडाच्या. बालपणात मनसोक्त हुंदडताना, मित्रांसोबत खेळताना अनेक निर्जिव गोष्टीही आपल्या जगण्याचा भाग बनलेल्या असतात. कधी ते एखादं खेळणं असतं, कधी क्रिकेटची बॅट, पेन, पुस्तक, वही, कधी सायकल तर कधी असं एखादं  ठिकाण ज्यामधे आपलं मन पूर्ण गुंतलेलं असतं. अशा गोष्टी आपल्या मनात कायम घर करून राहतात,ज्यांच्यापासून आपण दुरावलो तरी त्याच्या आठवणी जपत आपलं मन कायम त्याकडे ओढलं जातं. कारण अनेकदा आपलं आयुष्यच बदलवून टाकणा-या या गोष्टी आपल्या जगण्याची जणू शिदोरीच बनतात. अशाच काही  मित्रांची, शाळेची, आईच्या प्रेमाची आणि मनात घर केलेल्या ठिकाणाची गोष्ट सांगणारा किल्ला हा चित्रपट येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एमआर फिल्मवर्क्स, जार पिक्चर्स आणि एस्सेल व्हिजन प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय अविनाश अरूण यांनी. फॅंड्री’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो सारखे वेगळ्या पठडीतले चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनची ही नवी निर्मिती आहे.

किल्ला ची कथा आहे चिन्मय उर्फ चिनूची. आईच्या नोकरीतील बदलीमुळे पुण्यातून कोकणात आलेल्या चिनूला नवी जागा आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेणं अवघड जातंय ज्यामुळे त्याचं एकाकीपण वाढतंय. अशातच त्याची मैत्री शाळेतील काही उनाड मुलांशी होते. ‘बॅक बेंचर्स’ असलेल्या या मुलांचं स्वतःचं असं वेगळं विश्व आहे ज्यामध्ये चिनूही नकळत सामील होतो. शाळेत चालणारी धम्माल मजा मस्ती आणि शाळेबाहेरही फुलत जाणा-या या मैत्रीने चिनूचंही मन तिथे रमायला लागतं. या सर्व वातावरणाशी नुकतंच जुळवून घेत असतांना एक अशी घटना घडते की चिनू परत एकटेपणाच्या कोशात हरवून जातो पण इथूनच त्याचा स्वतःला शोधण्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. जवळच्या लोकांपासून दुरावलेल्या चिनूचा स्वतःच्या शोधाचा हा प्रवास त्याला अधिक प्रगल्भ बनवून जातो. त्याच्या याच प्रवासाची कथा म्हणजे किल्ला हा चित्रपट.

यावर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आणि रजत कमलावर आपलं नाव कोरणा-या किल्ला या चित्रपटाने बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासहित अनेक ठिकाणी मानाचे पुरस्कार पटकावले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मानाचा संत तुकाराम पुरस्कारही किल्लाला मिळाला शिवाय झी चित्र गौरवपुरस्कारामध्ये तब्बल पाच पुरस्कारांवर ‘किल्ला’ने आपलं नाव कोरलं.

‘किल्ला’ या चित्रपटात चिनूची भूमिका केलीये अर्चित देवधरने तर आईच्या भूमिकेत आहे अमृता सुभाष. याशिवाय त्याच्या मित्राच्या भूमिकेत पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी हे बालकलाकार आहेत. यातील बंड्याच्या भूमिकेसाठी पार्थ भालेरावला यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांत उल्लेखनीय कामगिरीच्या प्रमाणपत्रानेही सन्मानित करण्यात आलं होतं. कोकणातलं सौंदर्य आपल्या छायाचित्रणातून टिपलंय अविनाश अरूणने. चित्रपटाची कथा अविनाशचीच असून पटकथा तुषार परांजपेची आहे तर संवाद उपेंद्र शिधयेंनी लिहिले आहेत. संकलन चारूश्री रॉयचं असून कला दिग्दर्शन प्रशांत बिडकर यांचं आहे.

लहान मुलांचं भावविश्व अतिशय तरल आणि संयत पद्धतीने केवळ मांडणाराच नव्हे तर त्या भावविश्वात आपल्याला अलगदपणे डोकायला लावणारा हा चित्रपट येत्या २६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मधुकर मुसळे (एमआर पिक्चर्स), अजय राय आणि अॅलन मॅक्लेक्स (जार पिक्चर्स), नितिन केणी आणि निखिल साने (एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स) यांची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळी अनुभुती देणारा ठरणार आहे.

बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्याची महावितरणमध्ये अंमलबजावणी सुरु

0

पुणे,  : बेरोजगार विद्युत अभियंत्यांना महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपनीमधील ठराविक नवीन व
देखभाल दुरुस्ती संबंधीची कामे थेट लॉटरी पद्धतीने देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीला सुरवात महावितरणसह तिन्ही वीज कंपन्यांमधील विभागांतर्गत एकूण वार्षिक कामांपैकी किमान 50 टक्के ठराविक नवीन आणि देखभाल व दुरुस्तीची कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी प्रत्येकी
10 लाखांपर्यंत ची;वार्षिक 50 लाखांची कामे मिळणार आहे. ही कामे मुदतीत पूर्ण केल्यानंतर दुसर्‍या वर्षी 15
लाखांपर्यंतची एकूण वार्षिक पाच कामे अशी एकूण 75 लाखांपर्यंतची कामे देण्यात येणार आहे.
महावितरण अंतर्गत कामे मिळविण्यासाठी बेरोजगार विद्युत अभियंत्यांना कार्यकारी अभियंता, विभाग
कार्यालयात नोंदणीसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावा लागेल. अर्ज व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधीत बेरोजगार विद्युत अभियंत्यांच्या नोंदणीचा प्रस्ताव सात दिवसांत अधीक्षक अभियंता, मंडल कार्यालयामध्ये पाठविला जाईल. या कार्यालयात कागदपत्रांची शहनिशा करून तसेच नोंदणी शुल्क 15 हजार रुपये भरल्यानंतर कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सोबतच बेरोजगार अभियंत्यांना मंडल कार्यालयातून पासबूक देण्यात येणार असून त्यामध्ये दिलेल्या कामांची सविस्तर नोंद करण्यात येणार आहे.
बेरोजगार विद्युत अभियंत्यांना थेट लॉटरी पद्धतीने कामाचे वाटप केल्यानंतर कार्यादेश देण्यापूर्वी बयाणा रक्कम
(अर्नेस्ट मनी) भरण्यापासून पूर्ण सूट व सुरक्षा ठेव (सिक्यूरीटी डिपॉझिट) भरण्यापासून 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. बेरोजगार अभियंत्यांना विनास्पर्धा कामे वाटप करण्यासाठी जिल्हावार काम वाटप समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधीत मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता हे समितीचे अध्यक्ष आहेत. मंडल कार्यालयातील कार्यकारी अभियंता समितीचे सदस्य सचिव आणि सदस्य म्हणून व्यवस्थापक (वित्त व लेखा), कामे वाटप करावयाच्या विभागातील कामांशी संबंधीत कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी / अतिरिक्त कार्यकारी अभियंता काम पाहणार आहेत. सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी नोंदणीसाठी व योजनेच्या अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता, विभाग कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.