पुणे ता. २० :- ”शिक्षक असल्याचा अभिमान बाळगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी सतत वाचन, लिखाण आणि संशोधन करत राहिले पाहिजे त्यातून मिळणाऱ्या माहितीचे संक्रमण करून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृतीला चालना देण्याचे काम करत राहिले पाहिजे,” असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांनी व्यक्त केले.
डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ज्येष्ठ शिक्षनतज्ञ प्र. ल. गावडे यांचा ९१व्या वर्षातील पदार्पणाच्या वेळी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, सौ. हेमंती कुलकर्णी,ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड,अभिनेत्री दीप्ती भोगले व डॉ. अरुणा ढेरे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. प्र. ल. गावडे यांचा सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल व एक लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप होते. माझ्या सत्कारासाठी सर्व विद्यार्थी एकत्र आले याचा मला खूप आनंद आहे अशी भावना डॉ. गावडे यांनी व्यक्त केली.
नवलगुंदकर पुढे म्हणाले, ” व्यक्तिमत्व विकासासाठी बुद्धी, मन, शरीर या तीन गोष्टी आवश्यक आहेत पण आजच्या तंत्रज्ञानामुळे माणसाची बुद्धी पुढे पण शरीर आणि भावना मात्र पुढे जावू शकले नाही.” याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली. आयुष्य जगत असताना त्यात आलेल्या संकटाना तोंड देताना नेहमी सकारात्मक भूमिका असावी आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचा आनंदाने स्वीकार करावा ही भावना सरांनी आमच्या मनात रुजवली अशी प्रतिक्रिया डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली.
डी. एस. कुलकर्णी म्हणाले , मी विद्यार्थी असताना सरांनी दिलेले ज्ञान आजही मला उपयोगी पडते व त्यांचा प्रेरणेतून देशातील तरुणांना सतत आपल्या देशासाठी काम करण्यासठी प्रोत्साहित करीत राहीन त्याचबरोबर देशाचे नाव उज्वल करण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
श्री. श्याम भुर्के यांनी डीएसके फाउंडेशनच्या कार्याची माहिती मांडली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण खोरे तर सूत्रसंचालन अरुण नूलकर यांनी केले.