वृक्ष प्रेमींच्या तीव्र विरोधानंतर पुन्हा पाहणीचा पालिकेचा निर्णय
पुणे :
पुणे विद्यापीठ -औंध रस्त्यावरील वृक्ष तोडीला आलेल्या हरकतींची सुनावणी करण्यासाठी शनिवारी डॉ आंबेडकर कक्षात आलेल्या उपायुक्त राजेंद्र जगताप आणि अधिकाऱ्यांची खासदार अनिल शिरोळे यांनी चांगलीच कान उघाडणी केली .
‘प्रशासनाने पर्यावरण आणि झाडे वाचविण्याचे काम केले पाहिजे ,तोडण्याचे नाही . त्यामुळे ‘कोर्टात जा ‘ ही भाषा योग्य नाही . पर्यावरण प्रेमी पुणेकर झाडे वाचविण्यासाठी सुनावणीला आले आहेत ,त्यांच्या भावना प्रशासनाने समजावून घेतल्या पाहिजेत. आतापर्यंत तोडलेल्या ६ हजार झाडांच्या बदल्यात १८ हजार झाडे लावली का ? वृक्ष प्राधिकरण झाडांची काळजी करायला आहे ,झाडे तोडायला नाही . हा विषय केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यानाही कळविणार आहोत ‘ अशा शब्दात शिरोळे यांनी सुनावणीत सुनावल्यावर आणि वृक्ष -पर्यावरण प्रेमींनी कडाडून विरोध केल्यावर ‘या संदर्भात पुन्हा पाहणी करू ‘ असा पवित्रा प्रशासनाला घ्यावा लागला
पुणे विद्यापीठ ते राजभवन रस्ता रुंदीकरणासाठी वृक्ष तोड करण्यास आक्षेप घेणाऱ्या पर्यावरण प्रेमी संस्था आणि व्यक्तींना महापालिकेतर्फे सुनावणीसाठी बोलावले होते . पर्यावरण प्रेमी पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते . खासदार अनिल शिरोळे ,विनोद जैन ,विवेक वेलणकर आदींनी वृक्ष तोडीवर जोरदार आक्षेप घेतले .
बेकायदेशीर वृक्ष प्राधिकरण ,वृक्ष अधिकारी,सदस्य यांच्या बेकायदेशीर नेमणुका या मुद्द्यापासून विद्यापीठ रस्त्यावरील वृक्ष तोडीपर्यंत सर्व मुद्द्यांवर पालिका उपायुक्त राजेंद्र जगताप यांना बचावात्मक पवित्र्यात जावे लागले .
सुनावणी फक्त औंध वृक्ष तोड प्रस्ताव या विषयावर केंद्रित आहे ‘ असे वारंवार राजेंद्र जगताप यांनी सांगितले ,तर वृक्ष प्राधिकरण अस्तित्वातच नसल्याने या सुनावणीला कायदेशीर दर्जा नाही ‘ असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे होते
‘इथून पुढे आम्ही प्रत्येक वृक्ष तोडीकडे लक्ष देणार आहोत . पालिकेला उगाचच झाडे तोडून देणार नाही. तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात तीन झाडे लागतात का ती जगतात का हेही तपासणार आहे ‘ असे शिरोळे यांनी बजावले
वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग हे दोन वेगळ्या अस्थापना आहेत मात्र पुणे पालिका उद्यान विभागालाच वृक्ष प्राधिकरण संबोधून रेटून वृक्ष तोडीचे निर्णय बेकायदेशीरपणे स्वार्थी हेतूने घेत आहे ‘ असे विनोद जैन यांनी यावेळी सांगितले
सुजित पटवर्धन ,डॉ सुषमा दाते ,माधवी राहिरकर,कनिझ सुखराणी , प्रशांत इनामदार ,रणजीत गाडगीळ ,सारंग याद्वाडकर,सचिन पुणेकर ,शैलेंद्र पटेल असे अनेक जण उपस्थित होते
‘सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह च्या वतीने अध्यक्ष दीपक बिडकर आणि सचिव ललित राठी उपस्थित होते