पुणे-मुंबईचे सलग तीन दिवस तीनतेरा वाजविल्यानंतर पावसाने राज्यभर दमदार पणे आपले आगमन नोंदविले आहे
कोकण आणि विदर्भावर पावसाने जोरदार वृष्टी केली आहे आहे. शनिवारी व रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.त्यानंतर सोमवारी हि सकाळी तो बरसतच होता राज्यातील अनेक गावांमध्ये एका महिन्यात पडणारा पाऊस गेल्या २४ तासांत रत्नागिरी आणि चंद्रपुरात बरसला, तर रत्नागिरीतील संगमेश्वर येथे राज्यातील सर्वाधिक २३० तर चंद्रपूर येथे २०० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. गेल्या आठवड्यापासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत पुणे शहरालाही रविवारी आणि पुन्हा सोमवारी सकाळी देखील पावसाने सुखद धक्का दिला
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याला रविवारीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीतील शिरगाव येथे रविवारी घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. सर्वत्र पाऊस झाल्याने बस व रेल्वे वाहतूक विस्कळित झाली.
रविवारी मान्सूनने उत्तरेकडे आणखी मजल मारली. छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात तसेच झारखंडच्या काही भागात मान्सून दाखल झाला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरात ते केरळपर्यंतच्या किनारपट्टीवरील द्रोणीय स्थिती यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. पुढचे दोन-तीन दिवस या हवामानात बदल होणार नसल्याने पावसाचा जोर टिकून राहील, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणातील अनेक गावांना शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाने झोडपले. काही गावांमध्ये तर पावसाने दोनशे मिलिमीटरचा आकडा ओलांडला. विदर्भातही सर्वदूर सरासरी पन्नास मिलिमीटर पाऊस झाला. तुलनेने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता.
मुंबईत सलग तिसर्या दिवशी रविवारी संततधार कायम हाेती. शनिवारी रात्री वांद्र्यातील फूल गल्लीत इमारतीचे बांधकाम चालू असताना पावसामुळे काही भाग खचून झालेल्या दुर्घटनेत यास्मीन इम्रान शेख (२७) आणि सरीना इम्रान शेख (१३) य मायलेकींचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पुरात एक वाहून गेला तर दरड काेसळून महिलेचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात वीज पडून दाेघे ठार झाले. दुसरीकडे चंद्रपूरमध्ये खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून इंिजनिअर मेकॅनिकल एस. एम. ढोबळे यांचा मृत्यू झाला.