पुणे :
“पुण्यभूषण फाऊंडेशन'(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा “पुण्यभूषण पुरस्कार’ श्री. प्रतापराव पवार यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना प्रसारमाध्यम, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी महामहीम राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात येत आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 26 जून 2015 रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे होणार आहे. अशी माहिती “पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.
एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरित असलेली चांदीची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कार्थी प्रतापराव पवार यांना गौरविण्यात येणार आहे. पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर हे या निवड समितीचे अध्यक्ष आहेत.
सी. विद्यासागर राव (राज्यपाल, महाराष्ट्र) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, शरद पवार (माजी केंद्रीय मंत्री) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराबरोबर पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे, या पुरस्काराचे यंदाचे 27 वे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या स्थळी प्रवेश पत्रिका (निमंत्रण) आणावी. पार्कींगची व्यवस्था कॉंग्रेस भवन आणि मॉडर्न कॉलेजच्या मोकळ्या मैदानावर वेगळी केली आहे. सर्वांनी 10.15 पर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आधी “पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ गायक कै.पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे कै.काका केळकर, कै.शंतनुराव किर्लोस्कर, कै.डॉ.बानुबाई कोकाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक कै.पु.ल.देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी.के.अय्यंगार, कै.डॉ.रा.ना.दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ.जयंत नारळीकर, कै.प्रतापराव गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, कै.जयंतराव टिळक, डॉ.जब्बार पटेल, राहुल बजाज, कै.डॉ.के.बी.ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका कै.डॉ.रोहिणी भाटे, डॉ.बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू, शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.शां.ब.मुजुमदार, डॉ.रा.चिं.ढेरे, डॉ.ह.वि.सरदेसाई, निर्मला पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ.सायरस पूनावाला या मान्यवरांना प्रदान करण्यात आले होते.
पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सुरक्षेच्या दृष्टिने बालगंधर्व रंगमंदीराची पहाणी केली आहे. या पुरस्काराची पुर्व तयारीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला महापौर दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, पोलिस उपायुक्त मंदार जोशी उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्याच्या तयारीसाठी 27 प्रकारच्या नियोजन समित्या तयार करण्यात आल्या आहेत, असे ही डॉ. देसाई यांनी सांगितले.