Home Blog Page 22

गणेशखिंड रस्ता वृक्षतोडीची नोटीस मागे; बेकायदेशीर वृक्षतोडीविरुद्ध विशेष हेल्पलाईन सुरू होणार… डॉ.नीलम गोऱ्हे

महापालिका पर्यावरण तज्ञ व वाहतुक तज्ञांना विश्वासात घेऊन गणेशखिंड रुंदीकरण करण्याची शिफारस आयुक्तांकडून मागण्या मान्य

पुणे.दि.९:गणेशखिंड रस्त्यावरील नियोजित वृक्षतोडीमुळे पुणेकरांमध्ये निर्माण झालेला संभ्रम तातडीने दूर करा आणि प्रशासनाने काढलेली वृक्षतोडीची जाहीर नोटीस तात्काळ मागे घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. ती पुणें मनपाने स्विकारली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील विकासकामे आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये संतुलन साधण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वाची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी करत, शहरात नागरिकांच्या नकळत कोणी बेकायदेशीरपणे झाडे कापत किंवा छाटत असेल, तर त्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी महापालिकेने एकच अधिकृत हेल्पलाईन सुरू करावी, अशी सुचना दिली . यावर सकारात्मक पाऊल उचलत पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी येत्या शुक्रवारपर्यंत अशी विशेष हेल्पलाईन जाहीर करण्याचे आश्वासन दिले.
तसेच, वृक्षतोडीबाबतची जुनी नोटीस रद्द करून, रस्त्याचे अंतिम डिझाईन फायनल झाल्यानंतरच नव्याने प्रक्रिया केली जाईल , अशी मोठी घोषणा आयुक्तांनी बैठकीत केली.

या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पुणे मेट्रो लाईन-३ चे मुख्य अभियंता योगेश कुलकर्णी यांच्यासह ‘परिसर’ संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ, वाहतूक नियोजक प्रांजली देशपांडे व इतर तज्ज्ञ उपस्थित होते. बैठकीत बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रस्ता रुंदीकरणामुळे होणाऱ्या वृक्षतोडीबाबत नागरिकांमध्ये असलेल्या तीव्र संभ्रमाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. “केवळ अंतर्गत समित्या नेमण्यापेक्षा नागरिकांच्या प्रत्यक्ष सूचना व हरकती मागवून त्यावर खुली चर्चा करणे अधिक उपयुक्त ठरेल,” असे सांगत पुण्याच्या शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांच्या भूमिकेला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले की, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मी झाडे तोडण्याचे विरोधात असुन याबाबत पुनःपरीक्षण करण्यात येईल. त्यांच्या शास्त्रोक्त पुनर्लागवडीवर (Transplantation) भर दिला जाईल. सामाजिक संस्थांशी चर्चा करूनच पुढील अंतिम आराखडा बनवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, ‘परिसर’ संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ यांनी केवळ रस्ते रुंद करणे हा वाहतूक कोंडीवर उपाय नसल्याचे सांगत झाडे वाचवणारा सुधारित रस्ते आराखडा महापालिकेला सादर केल्याची माहिती दिली. एकदा स्थलांतरित केलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने मूळ झाडे वाचवण्यालाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तर वाहतूक नियोजक प्रांजली देशपांडे यांनी औंध आणि जंगली महाराज रस्त्यांच्या धर्तीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्याची सूचना केली. एकूणच, शहरातील विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत, नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील पावले टाकण्यावर या बैठकीत एकमत झाले.

24 भारतीय नाविकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात यश

नवी दिल्ली, 9 जून 2026

भारतीय तटरक्षक दलाच्या मुंबई येथील सागरी बचाव समन्वय केंद्राला (एमआरसीसी)  दिनांक 08 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजून 20 मिनिटांनी ओमान मधील मसिरा बंदरावर नांगरलेल्या आणि कर्मचारी दलात 24 भारतीय नाविकांचा समावेश असलेल्या, एमटी मॅरीव्हेक्स या पलाऊचा ध्वज असलेल्या जहाजावर क्षेपणास्त्राचा हल्ला झाल्याची माहिती मिळाली.त्यानुसार, या केंद्राने ओमानच्या सागरी शोध आणि बचाव केंद्राशी (ओएमएससी) संपर्क साधला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ओएमएससीसह निकटचा समन्वय राखला. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला, ओमानच्या नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी सर्व 24 भारतीय नाविकांची  सुरक्षित सुटका केल्याची खात्रीलायक बातमी ओमानच्या ओएमएससीने दिली. बचावलेले सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही दुखापत झालेली नाही अशी माहिती देण्यात आली आहे. हे जहाज अजूनही ओमानच्या मसिरा बंदराजवळ नांगरलेले आहे.

ही यशस्वी बचाव कार्यवाही, आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्याची परिणामकारकता तसेच या क्षेत्रातील सागरी बचाव संस्थांदरम्यान असलेल्या सशक्त समन्वय यंत्रणा अधोरेखित करते. तसेच ती भारतीय नाविकांना सुरक्षित राखण्याप्रती आणि सागरी आपत्कालीन स्थितीदरम्यान वेळेवर मदत उपलब्ध करून देण्याप्रती भारतीय तटरक्षक दलाच्या बांधिलकीला देखील अधोरेखित करते. 

दुप्पट सोडा हो,सिंगल हि जमा नाही,मिळकत कर विभागाचे पितळ उघड

पुणे- आजकाल सारेच डिजिटल मिडीयाचा वापर करतात,महापालिकाही मागे नाही…महापालिका देखील आपले विविध उपक्रम त्यातून मांडत असते. असे करायला हरकत अर्थात कोणाचीही नसते.पण जे मांडावे ते सत्य मांडावे अशीच अशा शासकीय,निमशासकीय संस्था अगर संघटना यांच्या कडून अपेक्षा असते,पुणे महापालिकेच्या अशाच सोशल मिडीयाचा आधार घेत मिळकत कर विभागाने आमचीच ‘लाल ‘ कशी ? हे दाखविल्याचा किस्सा सध्या महापालिकेत चर्चेने चघळला जातोय.अर्थात अद्यापावेतो आयुक्तांनी याकडे गांभीर्याने पहिले नसले तरीही अशा दाव्याने हसून मात्र होते आहे.

काय आहे आमचीच लाल म्हणणारा मिळकत कर विभागाचा दावा

पहा यात महापालिकेने असे म्हटले कि गेल्या वर्षी जेव्हा नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय राजवट होती तेव्हा म्हणजे २५ – २६ च्या एप्रिल आणि मे महिन्यात महापालिकेने फक्त ५२८ कोटी ८९ लाख रुपये मिळकत कराचे उत्पन्न मिळवले.आणि यंदा मात्र तब्बल १२३० कोटी आणि २७ लाखांचे उत्पन्न मिळविले..आता हि जादू केली..मिळकत कर विभागाने…नवे मिळकत कर विभागप्रमुख रवी पवार दाखल झाल्यावर…हे आकडे आणि दावा पाहून सामान्य माणूस चकित निश्चित होईल आणि वाहव्वा हि करेल…

पण..आपण वास्तविकता समजून घेऊ

महापालिकेचा मिळकतकर विभाग सवलत काळात महसूल वाढल्याचे चित्र मांडत असला, तरी प्रत्यक्षात यंदा महसूल घटल्याचे समोर आले आहे. २०२६-२७ मध्ये पहिल्या दोन महिन्यांत पालिकेला १२३०.२७ कोटींचा मिळकतकर मिळाला.मात्र,मागील वर्षीच्या याकाळातील तुलना या वर्षाच्या या काळात करता येणार नाही..ती का ? तर गेल्या वर्षी मिळकत कर विभागाकडून ४० टक्के सवलतीच्या विषयावरून दरवर्षी प्रमाणे १ एप्रिलला बिलेच गेली नव्हती.. ४० टक्के सवलत देऊनच मिळकत कर वसुली व्हावी असा खुद्द राज्य सरकारचाही आग्रह होता.भाजपाचा हि होताच आणि अन्य राजकीय पक्षांचाही होताच.त्यामुळे मागील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ४० टक्के सवलत असलेल्या अशा मिळकतकर धारकांची संख्या निश्चित नव्हती . आणि गेल्या वर्षी १ मे पासून ४० टक्के सवलती सह बिले वाटप सुरु झाले नंतर PT3 अर्ज देण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली.पर्यायाने या २ महिन्यात ५२९ कोटी रुपये त्यावेळी जमा झाले..मात्र ७ जुलै पर्यंत दिलेल्या सवलतीच्या काळात १२४६.९० कोटी वसुली झाली होती.

आता या वर्षी काय झाले : या वर्षाच्या एप्रिल आणि मे महिन्यात १२३० कोटींचा मिळकत कर वसूल झाला आहे .पण नेहमीप्रमाणे (गेल्या वर्षीप्रमाणे नाही ) या वर्षी ४० टक्के सवलत दिल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने १ एप्रिलला मिळकत करांची बिले वाटप झालेली होती.. म्हणजे ऑनलाईन १ एप्रिलाच सर्वांची बिले दिसत होती आणि ३१ मे पर्यंत बिल भरले तर ५ ते १० टक्के सवलत देण्यात आली होती.तरीही या वर्षी १२३० कोटी २७ लाख रुपयांचा मिळकत कर भरणा झाला.म्हणजे सवलतीच्या काळातील बिल भरण्याच्या रकमेत यंदा तब्बल १६.६३ कोटी रुपये कमी महसूल मिळाला आहे. त्यातच या वर्षी नव्याने कर आकारणी झालेल्या मिळकतींची संख्या तब्बल ८० हजारांनी अधिक असल्याने सवलतीच्या काळात १३०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित होते तरीही दिशाभूल करत सुमारे ७० कोटीने मिळकतकर कमीच वसूल होऊनही स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या कर संकलन विभागाच्या दाव्याने मात्र हसू होते आहे.

एकूणच मिळकत कर विभाग म्हणजे पालिकेतील मलईदार खाते मानले जाते. आणि तिथे खूप चांगले काम केले म्हणजे बदलीचा प्रश्न येणार नाही या अनुषंगाने चाललेली हि धडपड केविलवाणी आणि हास्यास्पद ठरते आहे.
म्हणजे करायला गेलो एक झाले भलतेच अशी आपल्याकडे म्हण आहे त्याप्रमाणे या खात्याचे या आवई ने पितळ उघडे केले आहे.आता महापालिका आयुक्त नवल किशोर राम याकडे कसे पाहतील हे येत्या मुख्य सभेत कदाचित दिसून येईल असे वाटते आहे.

उद्योग क्षेत्राला आर्थिक बळ देण्यासाठी बँकांचा संयुक्त पुढाकार

▪️ ECLGS 5.0 जनजागृती परिषद पुण्यात संपन्न

पुणे, दि. ९ जून : केंद्र शासनाच्या इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0 (ECLGS 5.0) या योजनेचा व्यापक प्रसार आणि उद्योग क्षेत्राला सक्षम आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे राज्यस्तरीय विशेष जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग (डीएफएस), नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी (एनसीजीटीसी), ‘जनसमर्थ’ संकेतस्थळ आणि पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र (एसएलबीसी) आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी परिषदेसाठी प्रमुख समन्वयकाची भूमिका बजावली.

परिषदेस महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच प्रमुख खासगी बँकांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि कर्ज विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय एमएसएमई वाणिज्य मंडळ, व्यापारी संघटना आणि विविध बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

यावेळी ECLGS 5.0 योजनेचा लाभ राज्यातील पात्र उद्योग व व्यावसायिकांपर्यंत पारदर्शक आणि जलद पद्धतीने पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘जनसमर्थ’ या राष्ट्रीय डिजिटल संकेतस्थळाच्या माध्यमातून कर्ज अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, कागदपत्रविरहित आणि पूर्णपणे संगणकीकृत करण्याबाबत प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.

कर्ज वितरण प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी बँकांनी तांत्रिक अडथळे दूर करून रोख प्रवाहाधारित पतमूल्यांकनास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही परिषदेत करण्यात आले. तसेच एनसीजीटीसीकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शंभर टक्के पतहमी संरक्षणाच्या आधारे पात्र उद्योगांना तातडीने आणि विनासंकोच कर्जपुरवठा करण्यावर विशेष भर देण्यात आला. यामुळे उद्योग क्षेत्रातील खेळत्या भांडवलाची कमतरता दूर होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

उपस्थित सर्व सरकारी आणि खासगी बँकांच्या प्रतिनिधींनी ECLGS 5.0 योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली. शाखास्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, तसेच किरकोळ कर्ज व एमएसएमई कर्ज प्रक्रिया केंद्रे अधिक सक्रिय करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

वित्तीय सेवा विभागाच्या उपसचिव गरिमा कपूर आणि अवर सचिव शैलेन्द्र कुमार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर मिश्रा, उपमहाप्रबंधक हृषिकेश सावंत, सहसंचालक अभय दफ्तरदार तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक आणि एसएलबीसी महाराष्ट्रचे संयोजक विवेक नाचणे उपस्थित होते. त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

पात्र उद्योजक आणि व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळील सरकारी अथवा खासगी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा ‘जनसमर्थ’ संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे,: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पुणे येथील सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक कार्यालयीन वेळेत सैनिकी मुलांचे वसतिगृह, पर्वती, पुणे तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवी पेठ, पुणे येथे उपलब्ध आहेत.
युद्धविधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक तसेच सेवारत सैनिक यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज संबंधित वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका यांच्याकडे २५ जून २०२६ पर्यंत सादर करावेत. विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्यास अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात येणार असल्याची माहिती मेजर (डॉ.) शिल्पा मारोती खरपकर (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून तरुणांना संधी

पुणे, : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१ हजार ४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेंतर्गत १८ ते २५ वर्षे वय, भारतीय नागरिकत्व असलेले, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेमध्ये पुणे जिल्ह्यामधील ज्युबिलंट फूडवर्क्स लि. (१९२), बजाज ऑटो लि. (३०९), भारत फोर्ज (७), रिलायन्स इंडिस्ट्रीज लि. (३३), टेक महिंद्रा (४२), स्कोडा ऑटो व्होल्क्सवॅगन इंडिया प्रा. लि. (१९), इमामी लि. (१५), फिनोलेक्स केबल्स ‍लि. (६०), कॉग्नीझंट टेक्न्कॉलॉजी सोल्युशन्स इं. प्रा. लि. (१४), पिरामल फार्मा लि. (१) आदी नामांकित कंपन्यांमध्ये रिक्तपदांसाठी उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध आहे. तरी या कंपनीमध्ये अर्ज करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्यामुळे https://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. ०२०-२६,१३३६०६, वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
0000

आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृहाची सुविधा उपलब्ध

पुणे, दि. ८: आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षा देण्याच्या अनुषंगाने सुरक्षागृह शासकीय विश्रामगृह (जुने), २९ क्वीन्स गार्डन, ता. हवेली, जि. पुणे येथे स्थापन करण्यात आले आहे.

सुरक्षेची आवश्यकता असलेल्या जोडप्यांनी सुरक्षागृह सुविधेचा लाभ घेण्याबाबत अर्ज करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

पाणीपुरवठा समस्येची महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; तातडीने उपाययोजनांचे निर्देश

पुणे-

पुणे शहरातील धानोरी, टिंगरेनगर, नागपूर चाळ, शांतीनगर, विमाननगर, वडगाव शेरी व परिसरातील नागरिकांकडून मागील काही दिवसांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी येणे तसेच अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी भामा-आसखेड जलयोजनेअंतर्गत करेळी येथील संबंधित पंपगृह व जलशुद्धीकरण केंद्राची शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली.

या वेळी नगरसेविका अश्विनी भंडारे, संगीता दांगट, रेखा टिंगरे, अनिल टिंगरे, नंदिनी झेंडे, हर्षल टिंगरे, शितल सावंत, सुहास टिंगरे, श्रेयस खांदवे, अनिल सातव, ऐश्वर्या पठारे, रामदास दाभाडे, शैलजीत बनसोडे, रत्नमाला सातव, तृप्ती भरणे, सुरेंद्र पठारे, नारायण गलांडे, श्वेता गलांडे, कविता गलांडे, योगेश मुळीक, अविनाश साळवे, सायरा शेख, अश्विनी लांडगे, विशाल मलके तसेच पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, संबंधित स्थापत्य अभियंते व विद्युत अभियंते उपस्थित होते.

समस्येचे मूळ कारण

पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भामा-आसखेड जलयोजनेच्या पंपगृह व जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा करणारी चाकण-करंजविहिरे विद्युत वाहिनी वारंवार खंडित होत असल्यामुळे पंपिंग प्रक्रिया प्रभावित होत आहे. परिसरातील विविध विकासकामांमुळे विद्युत वाहिनीला वारंवार अडथळे निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.

महापौरांचे निर्देश

महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी जलशुद्धीकरण प्रक्रियेची सखोल माहिती घेऊन खालील निर्देश दिले:

• जलशुद्धीकरण केंद्रापासून वितरण व्यवस्थेपर्यंत संपूर्ण यंत्रणेची तपासणी करण्यात यावी.
• नागरिकांच्या घरांपर्यंत विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन वैज्ञानिक तपासणी करण्यात यावी.
• पिवळसर पाणी येण्यामागील मूळ कारण शोधून तातडीने उपाययोजना कराव्यात.
• भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी विद्युत पुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार आहे.
• धरण परिसरातील जॅकवेल व जलउपसा यंत्रणेची अंडरवॉटर ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अत्याधुनिक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापौरांचे नागरिकांना आश्वासन

“पुणेकरांना स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.”
— सौ. मंजुषाताई नागपुरे, महापौर, पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

देशविरोधी वक्तव्ये करून भारतीय सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे गिरीष महाजन यांच्या भूमिकेशी सहमत आहेत का? नसतील तर त्यांनी देशाची आणि सैन्यदलाची माफी मागावी

ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचाही निषेध महाजन करणार का?

मुंबई, दि. ९ जून २०२६ :

भाजप नेते व मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यालाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून व भाजप पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती, तर भारताचे तुकडे करण्याचे कारस्थान रचणाऱ्या सशस्त्र खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली अत्यंत कठीण आणि आवश्यक मोहीम होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही देशाच्या एकता व अखंडतेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. या मोहिमेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वांच्या त्यागाचा अवमान करण्याचे काम गिरीष महाजन करत आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाने भारतीय जनता पक्ष व रा. स्व. संघाची राष्ट्रविघातक प्रवृत्ती समोर आली आहे. इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबविले नसते तर देशाचे तुकडे पडले असते, देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजी यांना बलिदान द्यावे लागले त्यावरही महाजन शंका उपस्थित करतात हे अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

विशेष म्हणजे देशाचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या कारवाईशी संबंधित सुरक्षा मोहिमांमध्ये सहभागी होते. मग गिरीष महाजन त्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार आहेत का? त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहेत का? त्यांच्यात ती हिंमत आहे का, असा सवाल सपकाळ यांनी केला.

भारतीय सैन्यदलाने देशाच्या अखंडतेसाठी राबविलेल्या मोहिमेची महंमद शाह अब्दालीशी तुलना करून गिरीष महाजन यांनी प्रत्यक्षात भारतीय सैन्यदलाचाच अपमान केला आहे. एवढेच नव्हे तर खलिस्तानी दहशतवादी जर्नैलसिंग भिंद्रनवाले याचे उदात्तीकरण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. देशाच्या सार्वभौमत्वाविरोधात शस्त्रे उगारणाऱ्या दहशतवाद्यांविषयी सहानुभूती निर्माण करणारी भूमिका घेणे अत्यंत गंभीर बाब आहे.

भिंद्रनवालेच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रमाला राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून देशाच्या एकता व अखंडतेच्या विरोधात वक्तव्य करणे हे राज्य सरकारचे अधिकृत धोरण आहे काय, याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरीष महाजन यांच्या भूमिकेशी सहमत आहेत का, याचे स्पष्ट उत्तर देशाला आणि महाराष्ट्राला द्यावे. जर ते गिरीष महाजन यांच्या वक्तव्याशी सहमत नसतील, तर त्यांनी सार्वजनिकपणे या वक्तव्याचा निषेध करून देशाची आणि भारतीय सैन्यदलाची माफी मागावी. अन्यथा गिरीष महाजन यांची भूमिका ही भाजपची अधिकृत भूमिका आहे असे समजले जाईल.

भाजपचे नेते मतांच्या राजकारणासाठी देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्याशी तडजोड करण्यास तयार असल्याचे त्यांच्या भूमिकेतून दिसून येत आहे. भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा, देशासाठी बलिदान दिलेल्या नेतृत्वाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अवमान करणाऱ्या आपल्या वक्तव्याबद्दल गिरीष महाजन यांनी देशाची आणि भारतीय सैन्यदलाची तात्काळ माफी मागावी. तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी खास व्यासपीठ सुरू होणार

दोन व तीन टप्प्यांतील परीक्षेच्या प्रक्रिया ६ महिने व ११ महिन्यात पूर्ण करण्यासाठी आयोग सकारात्मक

​शिवसेना नेत्या व आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांची आयोगाच्या अध्यक्ष व सचिवांसोबत महत्वपूर्ण चर्चा; विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर

​मुंबई.दि.९: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करावी आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये थेट सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी एक विद्यार्थी व्यासपीठ ‘ सुरू करण्याची आवश्यकता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली, ज्यावर आयोगाने सहकार्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.

​डॉ.गोऱ्हे यांनी आज MPSC कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार, सचिव श्री. महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली आणि त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. याप्रसंगी महेश बडे व रवींद्र बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

​बैठकी दरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी सुचविले कि परीक्षांच्या तारखा ऐनवेळी बदलण्याऐवजी, त्यांचे अचूक पूर्वनियोजन करून त्या वेळेतच जाहीर कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. जिल्हा स्तरावर आयोगाची स्वतःची हक्काची परीक्षा केंद्रे सुरू करण्यासाठी शासन स्तरावर विशेष पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि तांत्रिक अडचणींना तत्काळ उत्तरे मिळण्यासाठी ‘FAQ’ आधारित स्वयंचलित उत्तर व्यवस्था (Automated Response System) विकसित करावी. यासोबतच २४x७ हेल्पडेस्क, डिजिटल तक्रार निवारण व्यवस्था आणि आयोगाचे स्वतंत्र मोबाईल ॲप सुरू करून तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, ज्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.

​महिला परीक्षार्थींचा संवेदनशीलतेने विचार करून, महिला उमेदवारांना प्रसूती काळात विशेष सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. दिव्यांग उमेदवारांसाठीच्या सवलती आणि अटींमध्ये योग्य सुधारणा करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

​निवेदनातील अन्य प्रमुख मागण्या:

  • ‘एक उमेदवार, एक पद’ धोरणाची तातडीने व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, जेणेकरून जागा वाया जाणार नाहीत.
  • ​प्रतीक्षा यादी (Waiting List) पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता आणली जावी.
  • ​गट-क (Group C) परीक्षांची नवीन व सुधारित योजना त्वरित जाहीर करावी.
  • ​पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी.
  • पूर्व – मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यातील प्रक्रिया ११ महिन्यात पूर्ण करण्यात येईल व ज्या पूर्व – मुख्य या दोन टप्प्यातील प्रक्रिया आहेत त्या ६ महिन्यात पूर्ण कराव्यात.

​प्रलंबित परीक्षांच्या तारखा तातडीने घोषित करून संपूर्ण भरती प्रक्रिया १ वर्षाच्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावी.

राज्य सरकारसमवेत चर्चा करून पाठपुरावा करणार

​ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षांमधील विलंब आणि अनिश्चिततेमुळे मोठा मानसिक व आर्थिक ताण येत आहे. या बैठकीत उपस्थित केलेल्या सर्व धोरणात्मक मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विशेष चर्चा करून शासन स्तरावर याचा गतीने पाठपुरावा केला जाईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

​आ डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा सविस्तर विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच दोन व तीन टप्प्यांतील परीक्षेच्या प्रक्रिया ६ महिने व ११ महिन्यात पूर्ण करण्यात येतील असे आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी या बैठकीत सांगितले.

माध्यमांसाठी नोंदणीची शेवटची संधी: शेवटच्या क्षणी अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी मिफ्फ 2026 माध्यम अधिस्वीकृती पोर्टल दोन दिवसांसाठी पुन्हा खुले

मुंबई, 9 जून 2026

देशभरातील पत्रकार, माध्यम व्यावसायिक आणि चित्रपट परीक्षकांकडून प्रचंड संख्येने प्राप्त विनंत्यांचा विचार करून, अतिरिक्त नोंदण्यांची प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीचे (मिफ्फ 2026) माध्यम अधिस्वीकृती  पोर्टल  10 जून  ते  11 जून 2026   या मर्यादित कालावधीसाठी पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या माध्यम प्रतिनिधींना या क्षेत्रातील एका सर्वात गाजलेल्या चित्रपटीय कार्यक्रमासाठी अधिस्वीकृती  मिळवण्यासाठी नोंदणीची यापूर्वीची कालमर्यादा गाठता आली नव्हती अशांना नोंदणीसाठी ही विशेष खिडकी सुविधा एक अंतिम संधी उपलब्ध करून देत आहे. मात्र 11 जून 2026 नंतर यासाठी आणखी कालमर्यादा वाढवून मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिनांक 15 ते 21 जून 2026 या कालावधीत मुंबईत गोपाळराव देशमुख मार्गावरील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) परिसरात आयोजित 19 व्या वर्षीचा मिफ्फ सोहोळा चित्रपट रसिकांसाठी चित्रपट सादरीकरणे, चर्चा, मास्टरक्लासेस, उद्योगांतील महत्वाच्या व्यक्तींशी संवाद तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण असा भरगच्च कार्यक्रम घेऊन येणार आहे.

महोत्सवातील सादरीकरणे, पत्रकार संवाद, माध्यमांवर आधारित विशेष कार्यक्रम यासाठी, माध्यम प्रतिनिधींना पुन्हा खुल्या झालेल्या नोंदणीकरण कालावधीत आपापली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रोत्साहन  देण्यात येत आहे.

माध्यम अधिस्वीकृती  पोर्टल केवळ 10 आणि 11 जून 2026 या दोन दिवशीच खुले असेल. माध्यमांमध्ये कार्यरत व्यक्तींना मिफ्फ 2026 साठी नोंदणी करण्याची ही शेवटची आणि अंतिम संधी आहे.

नोंदणी प्रक्रियेचे तपशील

माध्यमांच्या प्रतिनिधींना मिफ्फसाठीचे   https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx  हे अधिकृत संकेतस्थळ अथवा खालील क्यूआरकोड चा वापर करून माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करता येईल.

19 वा मिफ्फ (MIFF) 2026

नॉन-फीचर (बिगर-कथात्मक) चित्रपट निर्मितीला समर्पित असलेला, दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि भव्य चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जाणारा, मिफ्फ (MIFF), अर्थात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन चित्रपट निर्मितीचा एक चैतन्यमय उत्सव म्हणून दीर्घकाळापासून लोकप्रिय ठरला आला आहे. 1990 मध्ये स्थापन झालेला आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत आयोजित केला जाणारा, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ), आज एक प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून विकसित झाला असून, तो जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार आणि चित्रपट प्रेमींना आकर्षित करतो.

19 वा मिफ्फ देखील एक मंत्रमुग्ध आणि समृद्ध करणारा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन घेऊन आला असून, यात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांची चोखंदळपणे निवडलेली मालिका, तसेच उद्योग-केंद्रित उपक्रमांची चित्ताकर्षक श्रेणी समाविष्ट आहे. 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) स्पर्धा विभागासाठी भारतासह 47 देशांमधून 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या महोत्सवात 42 पेक्षा जास्त भारतीय भाषा आणि भारताबाहेरील 30 पेक्षा जास्त भाषांमधील चित्रपट प्रदर्शित होणार असून, ही गोष्ट या महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता दर्शवते. जगभरातील नामवंत चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात काही उत्कृष्ट माहितीपट, लघुपट, अॅनिमेशन, दिग्दर्शकांचे पदार्पणाचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील. चित्रपट प्रदर्शनाबरोबरच, दुसऱ्या ‘डॉक बझार’ मध्ये, समृद्ध करणारे मास्टरक्लासेस आणि आयडीपीए द्वारे आयोजित ‘ओपन फोरम’, या महोत्सवातील सिनेमॅटिक आणि सर्जनशील आदान-प्रदान आणखी वाढवतील.

चला तर, मिफ्फ 2026 मध्ये कथाकथनाच्या चैतन्यमय विश्वात प्रवेश करूया, आणि प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि प्रेरणादायी स्वरांनी एकत्र येऊन साकारलेल्या माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट निर्मितीच्या अविस्मरणीय सोहळ्यात सहभागी होऊया.

19 व्या मिफ्फ साठी माध्यम मान्यता धोरण पुढील लिंकद्वारे पाहता येईल: link

अनुकरणीय गणेशोत्सवासाठी समाजोपयोगी उपक्रमांची गरज : मंदार लवाटे

पुणे :  गणेशोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. पेशव्यांच्या काळापासून ते विविध समाजघटकांपर्यंत गणेशोत्सव साजरा होत आला आहे.  प्लेगची साथ असो वा पानशेत धरण फुटीचे संकट, गणेशोत्सव कधीच थांबला नाही आणि भविष्यातही त्यात खंड पडणार नाही. अनुकरणीय गणेशोत्सवासाठी समाजोपयोगी उपक्रमांची गरज असते असे प्रतिपादन इतिहासकार, लेखक आणि संशोधक मंदार लवाटे यांनी केले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या पर्यावरण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘रोटरी माय सिटी माय प्रॉमिस’ या शिस्त व पर्यावरणपूरक वर्तन बदल अभियानाच्या तसेच जय गणेश व्यासपीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अनुकरणीय गणेशोत्सव २०२६ – मार्गदर्शन शिबिर’ मध्ये ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. मिलिंद भोई, संगणकतज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर, चंद्रशेखर भेडा, मनोज धारप, शैलेन्द्र गाडेकर, विष्णू भेडा, पियुष शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

लवाटे म्हणाले, “गणेशोत्सवात भक्तीची सर्वात मोठी लाट अनुभवायला मिळते. आषाढ महिन्यात सुरू झालेली ही भक्तीची भावना भाद्रपद पौर्णिमेच्या सुमारास सर्वोच्च बिंदूला पोहोचते.  पुण्यातील गणेशोत्सवाचा इतिहास  जुना असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीही विविध ठिकाणी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जात होता. गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच समाजोपयोगी कार्यात योगदान दिले आहे. भविष्यातही ही परंपरा अधिक व्यापक व्हावी.”

डॉ. दीपक शिकारपूर यांनी गणेशोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ते म्हणाले, “प्रत्येक गणेश मंडळाने स्वतःचा AI चॅटबॉट विकसित करावा. त्यामुळे मंडळाची माहिती विविध भाषांमध्ये सहज उपलब्ध होईल. उत्सवकाळातील गर्दी व्यवस्थापन, ‘लॉस्ट अँड फाऊंड’ सेवा तसेच संभाव्य धोके ओळखून त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी AI प्रभावी ठरू शकते.”

डॉ. मिलिंद भोई म्हणाले, “गणेशोत्सवानंतर अनेक पोलीस कर्मचारी, विक्रेते तसेच मिरवणूक मार्गांवरील नागरिक आरोग्याच्या तक्रारींसह डॉक्टरांकडे जातात. बहिरेपणा, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तसेच लेझर लाईटमुळे डोळ्यांशी संबंधित १८ प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यापैकी १२ आजारांवर प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत.”

गणेशोत्सवाचे विधायक आणि संस्कारक्षम स्वरूप जपण्यासाठी गणेश मंडळे व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “पुण्याचा गणेशोत्सव हळूहळू व्यावसायिकतेकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. हे बदलण्यासाठी सुरू झालेला हा प्रयत्न स्वागतार्ह असून रोटरी संस्थेची साथ महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रशेखर भेडा यांनी पारंपारिक हस्तकले चा वापर करून देखावे करण्याबाबत नवनवीन कल्पना सुचवल्या. कमी खर्चात आणि उपलब्ध साहित्यातून कशी आरास करावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. तर  मनोज धारप यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरवात रोटेरिअन विष्णू भेडा यांनी ‘रोटरी माय सिटी माय प्रॉमिस’ या संकल्पनेची मांडणी केली.  कार्यक्रमाच्या समारोपावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ पर्यावरण विभागाचे प्रमुख राजेंद्रकुमार सराफ, महेश सूर्यवंशी, सूर्यकांत पाठक, रवींद्र (अण्णा) माळवदकर, शिरीष मोहिते, उदय जगताप, बाळासाहेब मारणे,  विश्वास भोर, बबलू रमजानी  आदी मान्यवरांच्या चर्चासत्राने शिबिराची सांगता झाली. यावेळी 100 मंडळानी प्लाझ्मा मुक्त गणेशोत्सव करावा अशी मागणी केली, तसेच  यंदाच्या गणेशोत्सवात मंडळे  निर्माल्याचे  खतात रूपांतर करण्यासाठी  रोटरी 3131 सहकार्य करणार आहेत.  शिबिरात शंभरहून अधिक मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन रोटेरिअन महेश भागवत यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप पाटील तसेच रोटेरिअन लीना कारंडे, रेणुका माडीवाले, पृथ्वीराज पाटील, विशाल कुलकर्णी व सुनीता भेडा यांचे आयोजनात मोलाचे योगदान होते.

चिखली-कुदळवाडीत पहाटे ३ वाजता पाच धार्मिक स्थळांवर अतिक्रमण कारवाई

पुणे-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आज पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास चिखली-कुदळवाडी परिसरात मोठी अतिक्रमण कारवाई केली. या कारवाईत पाच धार्मिक स्थळे पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, कारवाईपूर्वीच अर्शद अस्लम खान आणि स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांना निवेदन देऊन कारवाईत पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली होती. तसेच कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करून कारवाई करू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती.

शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्यात आली आहेत. मग चिखली-कुदळवाडीतील रहिवाशांनाही समान न्याय का दिला जात नाही? अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्याप पाणी, मलनिस्सारण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यातच १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या कारवाईत प्रार्थनास्थळे, दुकाने, लघुउद्योग आणि घरे जमीनदोस्त करण्यात आली होती.मात्र, निवेदन दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच पुन्हा पहाटेच्या अंधारात कारवाई झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर सर्वांवर समान कारवाई होत असेल तर केवळ विशिष्ट भाग आणि विशिष्ट समाजाच्या बांधकामांवरच वारंवार बुलडोझर का चालतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.अर्शद खान यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की,महापालिकेने कायद्याचे राज्य राखावे, पण कोणत्याही समाजाला टार्गेट केल्याचा आभास निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. समान न्याय आणि पारदर्शकता हीच आमची मागणी आहे.दरम्यान, या कारवाईमुळे चिखली-कुदळवाडी परिसरात भीती, असुरक्षितता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक आता न्यायासाठी पुढील कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा उभारण्याच्या तयारीत आहेत.

प्रतीक्षा यादीतील ३३० लाभार्थ्यांना लॉटरीत सदनिका जाहीर; १८ जूनपर्यंत स्वीकारण्याची मुदत!

– ‘पीएमआरडीए’ गृहयोजना: दि. ९ ते १८ जून कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे पर्याय उपलब्ध

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ गृहयोजनेतील प्रतीक्षा यादीतील ३३० लाभार्थ्यांना अखेर सदनिका जाहीर करण्यात आल्या आहेत. मूळ सोडतीमधील लाभार्थ्यांनी सदनिका रद्द केल्यामुळे किंवा मुदतीत न स्वीकारल्यामुळे प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे.

‘पीएमआरडीए’कडून पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील एकूण १,०२९ सदनिकांसाठी दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सोडत काढण्यात आली होती. या लॉटरी प्रक्रियेमध्ये एकूण ८७१ लाभार्थी पात्र ठरले होते, तर ३,८४१ अर्जदार अयशस्वी ठरले होते. तसेच, ६५५ लाभार्थ्यांचा समावेश प्रतीक्षा यादीत करण्यात आला होता. पात्र ठरलेल्या ८७१ लाभार्थ्यांना त्यांची सदनिका स्वीकारण्यासाठी किंवा समर्पित (सरेंडर) करण्यासाठी दि. ११ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

‘पीएमआरडीए’ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सोडतीतील ८७१ विजयी लाभार्थ्यांपैकी ४०१ लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकारली आहे. उर्वरित ४७० लाभार्थ्यांनी तात्पुरते देकारपत्र निर्गमित होण्यापूर्वीच सदनिका रद्द केली, तर काहींनी मुदतीत पर्याय निवडला नाही. त्यामुळे सदनिका रिक्त राहिल्याने ‘पीएमआरडीए’ने दि. ८ जून २०२६ रोजी प्रवर्गनिहाय प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली. एकूण ६५५ प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांपैकी ३३० लाभार्थ्यांची नावे प्रवर्गनिहाय प्रतीक्षा यादीतून अंतिम मंजुरीनंतर विजयी म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व कमी उत्पन्न गट (एलआयजी) मधील विविध प्रवर्गांचा (सर्वसाधारण, अनुसूचित जाती व नवबौद्ध, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व दिव्यांग) समावेश आहे.

प्रतीक्षा यादीतून विजयी घोषित झालेल्या या ३३० लाभार्थ्यांना सदनिका स्वीकारण्यासाठी किंवा सोडून देण्यासाठी (सरेंडर) दि. ९ जून २०२६ ते १८ जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे पर्याय (‘एक्सेप्ट’ अथवा ‘सरेंडर’) उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी केले आहे. तसेच, सदनिका स्वीकारल्यानंतर ४५ दिवसांत २५ टक्के रक्कम भरणे अपेक्षित आहे. गृहकर्ज घ्यायचे असल्यास १० टक्के रक्कम भरून नाहरकत प्रमाणपत्र दिले जाईल. उर्वरित रक्कम भरण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.

मान्सून 13 राज्यांत, उद्या मुंबईला धडकणार

मुंबई- पाच दिवसांत मान्सूनने १३ राज्यांमध्ये धडक दिली आहे. सोमवारी त्याने तेलंगणात प्रवेश केला. सध्या तो मुंबईपासून सुमारे १५० किमी अंतरावर असून, पुढील ४८ तासांत शहरात दाखल होऊ शकतो. त्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत तो गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या वाटचालीमुळे मैदानी प्रदेशांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे; मात्र, मान्सूनपूर्व हालचालींमुळे अनेक राज्यांमध्ये ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत आहेत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

केरळ आणि कर्नाटकात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील बेंगळुरू आणि बेळगाव येथील रस्त्यांवर पाणी साचले होते, तसेच अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना दिसली.

दुसरीकडे पश्चिमेकडील राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये उष्णतेपासून अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. या राज्यांव्यतिरिक्त, देशातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) इशारा देण्यात आला आहे. सोमवारी श्री गंगानगर येथे ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.