Home Blog Page 21

हिंजवडी-बाणेर मेट्रो 15 जुलैपर्यंत धावणार:’पीएमआरडीए’ आयुक्तांची घोषणा, ऑगस्टपर्यंत शिवाजीनगरपर्यंत विस्तार

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो लाईन ३ अंतर्गत माण-हिंजवडी ते बाणेर (रामनगर) या १२ स्थानकांचा पहिला टप्पा १५ जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल, अशी घोषणा ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केली आहे. ही मेट्रो ऑगस्टअखेरपर्यंत शिवाजीनगरपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. चौधरी यांनी ‘पीएमआरडीए’च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना प्राधिकरणाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडीची समस्या आणि प्रशासकीय पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आगामी काळात विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. मेट्रो, इनर रिंगरोड, पाणीपुरवठा, मान्सूनपूर्व तयारी आणि अनधिकृत बांधकांवरील कारवाई या मुद्द्यांवरही त्यांनी प्राधिकरणाची भूमिका स्पष्ट केली.

महानगर आयुक्तांनी सांगितले की, माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ चे काम वेगाने सुरू असून, डिसेंबर २०२६ पर्यंत ही मेट्रो पूर्ण क्षमतेने धावेल. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांसाठी १५ ते २० जून दरम्यान ‘सीएमआरएस’कडून तांत्रिक पाहणी व सुरक्षा तपासणी केली जाईल. या तपासणीनंतर जूनअखेर किंवा १५ जुलैपर्यंत सेवा निश्चितपणे सुरू होईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी पहिल्या ७ स्थानकांपर्यंत दर्जेदार फूटपाथ तयार केले जात आहेत.

नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि फाईल्सचा प्रवास गतिमान व्हावा, यासाठी ‘पीएमआरडीए’मध्ये ‘सिंगल विंडो इनवर्ड-आउटवर्ड’ सुविधा सुरू करण्यात येत आहे. या तांत्रिक प्रणालीमुळे एखादी फाईल नेमकी कुठे थांबली आहे, हे त्वरित कळेल. प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी लवकरच ‘एमपीएससी’मार्फत लिपिक संवर्गातील ७० कर्मचारी मिळणार असून, इतरही अधिकारी प्रतिनियुक्तीवर येत आहेत. यामुळे सर्व विभागीय कार्यालये पूर्ण क्षमतेने चालवली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. चाकणमधील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असून, येथील कोंडी फोडण्यासाठी रोड प्लॅनिंगमधील रस्त्यांची कामे ‘पीएमआरडीए’ स्वतः पुढाकार घेऊन करणार आहे. तसेच, रिंगरोडच्या भूसंपादनाबाबत वरिष्ठ पातळीवर सविस्तर चर्चा सुरू आहे. सर्व तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे स्पष्ट झाल्यानंतरच प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. कोणतीही अर्धवट भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार नाही, असे महानगर आयुक्तांनी स्पष्ट केले.

पुणे शहरातील दोन जोड बोगद्यांचा (ट्विन टनेल) प्रकल्प सध्या ‘पुम्टा’च्या मंजुरीच्या स्तरावर आहे. याचा व्यावहार्यता अहवाल सादर झाला असून, सुचवलेल्या बदलांना मंजुरी मिळाल्यानंतर तो वरिष्ठ स्तरावर पाठवला जाईल. हा प्रकल्प पुणे महापालिका राबवत असून ‘पीएमआरडीए’ त्यात साहाय्य करत आहे.

“दिल्लीनंतर आता पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार -११ जूनला पुणे विद्यापीठात..

‘कॉकरोच जनता पार्टी’चा पुण्यातून मोठा एल्गार; NEET पेपर लीकविरोधात ११ जूनला पुणे विद्यापीठात आंदोलन

पुणे:
देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, NEET-UG पेपर लीक आणि परीक्षा पद्धतींमधील अनियमिततेच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेत आलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढील आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या यशानंतर, आता हा लढा महाराष्ट्रात तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभिजीत दिपके यांनी सांगितले की, दिल्लीतील आंदोलन ही केवळ एक सुरुवात होती. आता या आंदोलनाचा पुढील मुख्य टप्पा ११ जून २०२६ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ येथे पार पडणार आहे. त्यांनी पुणे आणि परिसरातील सर्व विद्यार्थी आणि तरुणांना या शांततापूर्ण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे आणि मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

  • केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: NEET परीक्षेतील घोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरूच राहील.
  • तरुणांच्या भविष्याशी खेळ: केंद्र सरकारवर घणाघाती टीका करताना त्यांनी म्हटले की, सध्याच्या सरकारने देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणणारे सरकार केवळ निवडक लोकांसाठी काम करत असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • २० जूनला पुन्हा दिल्लीत आंदोलन: पुण्याच्या आंदोलनानंतर, कॉकरोच जनता पार्टी आपली पुढील रणनीती म्हणून २० जून रोजी पुन्हा एकदा दिल्लीतील जंतर-मंतरवर भव्य आंदोलन करणार आहे, जेणेकरून सरकारवर दबाव वाढवता येईल.
  • विरोधक आणि ट्रोलर्सना चोख उत्तर: सोशल मीडिया आणि आंदोलनावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी जे लोक विद्यार्थ्यांवर टीका करत आहेत, ते प्रत्यक्षात तरुणांच्या या वाढत्या रोषाला घाबरले आहेत.

महाविकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेसचा गेम? पुण्याच्या राजकीय डावाची चौकशी करा; अरविंद शिंदेंचे पक्षश्रेष्ठींना पत्र”

पुणे:
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या राजकीय हिताला बाधा पोहोचवणाऱ्या आणि कार्यकर्त्यांचा विश्वासघात करणाऱ्या अंतर्गत कारस्थानाची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे (AICC) उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष अरविंद तुकाराम शिंदे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर संघटनात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

अरविंद शिंदे यांनी पत्रात मांडलेले मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  • काँग्रेसला निवडणुकीतून जाणीवपूर्वक बाजूला ठेवले: पुण्यात काँग्रेसकडे सक्षम संख्याबळ आणि भाजपला थेट आव्हान देण्याची क्षमता असतानाही, पक्षाला निवडणुकीच्या रिंगणातून दूर ठेवण्यात आले. हा प्रकार काँग्रेसजनांच्या स्वाभिमानावर घाला घालणारा आहे.
  • आघाडीच्या नावाखाली अंतर्गत डाव: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे उमेदवार शशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ऐनवेळी घेतलेली माघार ही सामान्य राजकीय घटना नाही. काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा, त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवायचे आणि शेवटच्या क्षणी समीकरणे बदलून अप्रत्यक्षपणे भाजपला लाभ मिळवून द्यायचा, असा पूर्वनियोजित राजकीय डाव यात रचला गेल्याचा संशय निर्माण झाला आहे.
  • नेतृत्वाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेतृत्वाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात असून, पुणे शहर काँग्रेस, स्थानिक पदाधिकारी आणि संपर्क नेते श्री. सतेज पाटील यांना पूर्णपणे अंधारात ठेवावे लागले. हे निर्णय कोण्याच्या दबावाखाली घेण्यात आले, असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

बिशप स्कूलचा विद्यार्थी असल्याचा अभिमान : डॉ. सायरस पूनावाला

शाळेसाठी आणखी १० कोटींची मदत:नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सायरस पूनावाला यांनी शाळेच्या पुढील विकासासाठी आणखी १० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. “इमारत उभारण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. शाळेच्या गुणात्मक वाढीसाठी आणि विविध विकासकामांसाठी ही मदत देत आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

द बिशप स्कूलच्या नवीन शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन; डॉ. सायरस पूनावाला आणि अदार पूनावाला यांचा गौरव

पुणे : “बिशप स्कूलने मला केवळ शिक्षण दिले नाही, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा भक्कम पाया घातला. आज मी जे काही आहे, त्यामागे या शाळेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे बिशप स्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. शाळेच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास मी कायम तयार आहे,” असे प्रतिपादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक व पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांनी केले.

कॅम्प परिसरातील द बिशप स्कूलच्या नव्या शैक्षणिक इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळेचे प्राचार्य व मानद सचिव शेन मॅकफर्सन, बिशप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रुडोल्फ वूडमन, डॉ. पूनावाला यांचे नातू डेरीयस पूनावाला, मुख्याध्यापिका मयुरा बारसे तसेच शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक आणि मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेली ही नवीन इमारत प्रतिष्ठित माजी विद्यार्थी डॉ. सायरस एस. पूनावाला आणि अदार सी. पूनावाला यांच्या सहकार्याने साकारण्यात आली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे संस्थेच्या विकासाला महत्त्वपूर्ण गती मिळाली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. सायरस एस. पूनावाला आणि अदार सी. पूनावाला यांचा नवीन इमारतीच्या उभारणीत दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. बिशप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रुडोल्फ वूडमन आणि प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते त्यांना रौप्य फलक प्रदान करून गौरविण्यात आले.

डॉ. पूनावाला म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी या शाळेत येतो, तेव्हा जुन्या आठवणींमध्ये हरवून जातो. १९४९ ते १९५८ या कालावधीत मी येथे शिक्षण घेतले. त्या काळातील अनेक प्रसंग आजही माझ्या स्मरणात आहेत. एकेकाळी या शाळेत खोडकर विद्यार्थी म्हणून वावरणारा मी, आज प्रमुख पाहुणा म्हणून याच शाळेत उपस्थित आहे, यावर माझाच विश्वास बसत नाही. शाळेने उभारलेली ही नवी वास्तू केवळ इमारत नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा पाया आहे. या उपक्रमात माझा हातभार लागला, हे माझे भाग्य समजतो.”

प्राचार्य शेन मॅकफर्सन यांनी सांगितले की, १६० वर्षांहून अधिकचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या द बिशप स्कूलची परंपरा डॉ. सायरस पूनावाला यांच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांमुळे अधिक समृद्ध झाली आहे. त्यांच्या उदार सहकार्यामुळे शाळेला अत्याधुनिक सुविधा असलेली नवी इमारत उभारणे शक्य झाले असून त्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा लाभ होणार आहे.

बिशप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रुडोल्फ वूडमन यांनी शाळेच्या इतिहासाचा आढावा घेताना सांगितले की, १८६४ मध्ये कॅम्प परिसरात सुरू झालेल्या या संस्थेचा विस्तार आज कल्याणीनगर आणि उंड्रीपर्यंत झाला आहे. सध्या शाळेच्या तीनही शाखांमध्ये सहा हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून पुण्याच्या शैक्षणिक परंपरेत संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यापूर्वीही शाळेने डॉ. सायरस पूनावाला यांच्या सन्मानार्थ परिसरातील पादचारी पुलाला त्यांचे नाव देऊन त्यांच्याशी असलेल्या दीर्घकालीन नात्याचा गौरव केला आहे.

सेवाकार्यातून समाधान आणि मनःशांती – ना. चंद्रकांतदादा पाटील.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तपपूर्ती आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह.

पुणे-सेवाकार्यातून समाधान आणि मनःशांती लाभते आणि म्हणूनच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ,हारतुरे, शाल श्रीफळ,भेटवस्तू,मिठाई केक इ न देता कार्यकर्त्यांनी सेवाकार्य करावे किंवा मी करत असलेल्या सामाजिक उपक्रमांना हातभार लावावा असे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. नरेंद्रभाई मोदी यांची पंतप्रधान पदाची तपपूर्ती आणि माझा वाढदिवस हा एकाच दिवशी असल्याने वाढदिवसाचा आनंद द्विगुणित होत असल्याचे मत ही चंद्रकांतदादांनी व्यक्त केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपपूर्ती आणि ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा केला जात आहे या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर, सौ. कल्याणी खर्डेकर,निसर्गछाया च्या संचालिका सौ. अमृता देवगावकर, मंदार देवगावकर,विन विन बाईट्स एल एल पी व विंग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक मयूर पवार,राम मुंडे, प्रदीप काकडे,प्रेम खाडे,गणेश खाडे,अंकुश वाघमारे,सागर पवार,दिलीप साळुंखे,सौरभ पवार, अभिषेक आटोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असून फाउंडेशन च्या वतीने विविध सेवाभावी संस्थांना उपयुक्त साहित्याची मदत करण्यात येते असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
यालाच अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांची पंतप्रधान पदाची तपपूर्ती आणि ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फाउंडेशन ने सेवा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले व आज निसर्गछाया ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेस वॉटर डिस्पेन्सर व स्पीकर सेट भेट देण्यात आल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी ते ग्राहक असे बाजार भरविणारे आणि कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, विपणन व निर्यात यात प्रामुख्याने कार्य करणारे मयूर पवार व त्यांच्या टीम चा मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना टूल बॉक्स सह सोलर लाईट सेट भेट देण्यात आले.
माझ्याच प्रभागात नव्हे तर महाराष्ट्रात दर आठवड्यात विविध ठिकाणी शेतकरी ते ग्राहक हा उपक्रम समर्थपणे आणि सातत्याने राबविण्यात मयूर पवार आणि टीम चा हातखंडा असून त्यांच्या कार्याबद्दल नुकत्याच पार पडलेल्या पुणे हॅकेथॉन मध्ये त्यांना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 लाखाचे बक्षीस मिळाले याचा अभिमान वाटतो असे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
विन विन बाईट्स एलएलपी ने कमी तेलयुक्त, अधिक पौष्टिक आणि चविष्ट तळलेले खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अभिनव व्हॅक्यूम फ्रायिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. या प्रणालीमध्ये व्हॅक्यूम चेंबरमध्येच रिअल-टाइम तेल निरीक्षण आणि सेंट्रिफ्यूगल डी-ऑइलिंग यंत्रणा समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रक्रिया कार्यक्षमता वाढते. हे तंत्रज्ञान विशेषतः मिलेट्स आणि भाजीपाला आधारित उत्पादनांना मूल्यवर्धन करण्यास मदत करते. तसेच शेतकरी, महिला उद्योजक आणि ग्रामीण उत्पादकांसाठी अधिक बाजारपेठीय संधी निर्माण करण्याचे काम करते. या नवकल्पनेद्वारे शाश्वत अन्नप्रक्रिया, निरोगी स्नॅक्स आणि कृषीआधारित उद्योजकतेला चालना देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मयूर पवार यांनी स्पष्ट केले.

अरविंद शिंदेंची थेट हायकमांडकडे प्रदेशाध्यक्ष सपकाळांविरोधात तक्रार

“महाविकास आघाडीत काँग्रेसची गळचेपी”

सपकाळांविरोधात कारवाईची मागणी

पुणे-पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे धाव घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे पुणे काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

असे समजते कि अरविंद शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवली आहे. पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय प्रदेश नेतृत्वाने स्थानिक काँग्रेस नेत्यांना विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.शिंदे यांच्या मते, पुण्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्वाशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून पक्ष संघटनेला धक्का बसला आहे.

अरविंद शिंदे यांनी केवळ प्रदेशाध्यक्षांवरच नव्हे तर महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मित्रपक्षांना पाठिंबा देताना किंवा जागावाटपाचे निर्णय घेताना काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसची सातत्याने गळचेपी होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षाची राजकीय ताकद कमी होत असल्याचा आरोप करत शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक स्तरावरील नेत्यांना डावलून घेतलेले निर्णय भविष्यात काँग्रेसला महागात पडू शकतात, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केल्याचे वृत्त आहे.

निवडणूक आयोग व भाजपा सरकारविरोधात काँग्रेसचे दादरमध्ये तीव्र आंदोलन.

राज्यसभा निवडणुकीत मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द करण्याच्या लोकशाही विरोधी कृत्याचा निषेध.

मुंबई, दि. १० जून २०२६

राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या उमेवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर व मनमानीपणे रद्द करण्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज दादरमध्ये निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, मोदी सरकार, फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘जब जब सरकार डरती है, पुलीस को आगे करती है’, ‘निवडणूक आयोग भाजपाची शाखा आहे’, ‘लोकशाही नाही हुकुमशाही आहे’, अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, जोजो थॉमस, प्रकाश सोनावणे, श्रीरंग बरगे, विश्वजित हाप्पे, मनिष गणोरे, झीशान अहमद, राजा ठाकूर, श्रुती म्हात्रे. डॉ. मनिष पाटील, राहुल पिंगळे, नवीन सिंग यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस मुख्यालय टिळक भवनला पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

“निवडणूक आयोग भाजपा सरकारच्या हातातले कळसुत्री बाहुली बनले असून सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही, कोणताही एफआयआर त्यांच्यावर नाही, तरिही एका खोट्या आक्षेपाची दखल घेत मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आली. निवडणूक आयोग व भारतीय जनता पक्ष यांची अभद्र युती असून असे प्रकार भारतीय लोकशाही व संविधानाला अत्यंत घातक आहे. निवडणूक आयोग व भाजपाने लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य केले असून यामुळे निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला आहे. काँग्रेस पक्ष या लोकशाहीविरोधी शक्तींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढा देत राहील”, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

मुंबई, पुणे महापौर कार्यालय अन् RSS मुख्यालय उडवून देऊ:खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने धमकीचे ईमेल

मुंबई-पुण्याचे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील संघ मुख्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये आज 10 जून ते 20 सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या गंभीर धमकीचे ईमेल मिळावलेत. खालिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे संवेदनशील भागांत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाठवण्यात आलेल्या या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ मुंबई-पुणे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील काही संवेदनशील ठिकाणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या धमकीमध्ये आयईडी बॉम्बस्फोटाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, हा घातपात घडवून आणण्यासाठी काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संशयास्पद संदर्भ या ई-मेलमध्ये देण्यात आला आहे.

नेमके काय म्हटले ईमेलमध्ये

या धमकीच्या ईमेलमध्ये अत्यंत पद्धतशीरपणे वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याच्या महापौर कार्यालयात दुपारी 1:11 वाजता, तर पुण्याचे विधान भवन आणि नागपूरमधील रेशीमबाग येथील आरएसएस मुख्यालय (डॉ. हेडगेवार भवन) येथे दुपारी 3:11 वाजता स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, 10 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुणे आणि नागपूरमधील आरएसएसच्या विविध शाखांना सकाळी 6:11 ते रात्री 9:11 च्या दरम्यान लक्ष्य केले जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
धमकीमागील हेतू स्पष्ट करताना ईमेलमध्ये राजकीय आणि ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. 1984 मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि ‘ऑपरेशन वूडरोझ’ला आरएसएस आणि भाजपने पाठिंबा दिला होता, ज्यामध्ये 20,000 शीख तरुण मारले गेल्याचा दावा यात करण्यात आला आहे. याच घटनेचा ‘बदला’ घेण्यासाठी आरएसएस आणि भाजप संपवण्याची करण्याची भाषा या ईमेलमध्ये वापरण्यात आली असून, हिंदूंनी आपल्या मुलांना वाचवावे, असा थेट इशारा वजा धमकीवजा संदेशही देण्यात आला आहे. या अत्यंत संवेदनशील ईमेलच्या शेवटी इंजि. गुरनाख सिंग, रुकन शाहवाला, डॉ. गुरनीर्वैर सिंग आणि खान राजाडा अशा चार व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे.

धमकीचा हा ई-मेल मिळताच पुणे पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग तात्काळ सतर्क झाले आहेत. हा ई-मेल कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला, तो खरा आहे की केवळ दहशत निर्माण करण्यासाठी पाठवलेला बनावट ई-मेल आहे, याची तांत्रिक तपासणी सायबर विभागाकडून वेगाने केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील इतर संवेदनशील परिसरात सुरक्षा आणि गस्त वाढवण्यात आली आहे.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कसून तपासणीमध्ये संबंधित परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आलेले नाही. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये आज 10 जून ते 20 सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या गंभीर धमकीचे ईमेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा धावपळ करू लागल्या. वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आलेल्या या धमक्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला दुपारी 1:11 वाजता, एएमसी कार्यालयाला दुपारी 3:11 वाजता आणि आरएसएस कार्यालयाला संध्याकाळी 5:11 वाजता स्फोटाने उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही धमकी खालिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने देण्यात आली आहे. तथापि, मुख्यमंत्री कार्यालयाची तपासणी पूर्ण झाली आहे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचले आहेत आणि याच दरम्यान ही धमकी मिळाली होती.

गेल्या 25 मे, 2026 रोजी पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांना एक धमकीचा ईमेल मिळाला होता. ईमेलमध्ये दिलजीत दोसांझचे घर आणि लुधियानाच्या महापौर इंदरजीत कौर यांच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या पद्धतीनुसारच आज CMO, RSS आणि AMC ला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. खालिस्तानी नॅशनल आर्मीनेच पाठवल्याचा उल्लेख आहे. फक्त धमकीसाठीचे ठिकाण बदलले आहे.

अहमदाबाद महानगरपालिकेच्या दाणापीठ येथील मुख्य कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीमुळे तात्काळ संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली होती. सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. पोलीस, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड (BDDS) तसेच सायबर क्राईम टीमद्वारे ईमेलच्या स्त्रोताची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अहमदाबाद महानगरपालिकेच्या दाणापीठ येथील मुख्य कार्यालयात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रतोद यांच्यासह मुख्य कार्यालयातील कर्मचारीही बाहेर आले आहेत. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून इमारतीची तपासणी करत आहे.

संरक्षण खात्याशी पुण्यातील प्रलंबित विषयांना मिळणार गती

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट

पुणे विमानतळ विस्तार, कॅन्टोन्मेंट विलीनीकरण आणि इंदिरानगरच्या जागेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

नवी दिल्ली/पुणे : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेत पुण्याच्या संरक्षण खात्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे पुणे महानगरपालिकेत विलीनीकरण आणि इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना हवाई दलाने बजावलेल्या नोटीसा या प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून विषय मार्गी लावण्यासंदर्भात पुढील कार्यवाहीचे निर्देश संरक्षण मंत्र्यांनी दिले आहे. यामुळे गेली काही महिने प्रलंबित असणाऱ्या या विषयांना गती मिळणार आहे.

नवी दिल्लीतील संरक्षण खात्याच्या कार्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी प्रामुख्याने पुणे विमानतळाच्या विस्ताराचा मुद्दा मांडला. विमानतळाच्या पुढील विस्तारासाठी एकूण ३०० एकर जागा संपादित केली जाणार असून, ही सर्व जागा राज्य सरकार स्वतः संपादित करणार आहे. सद्यस्थितीत, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या टर्मिनलला लागूनच हवाई दलाची ३५ एकर जागा आहे. राज्य सरकारने या ३५ एकर जागेच्या बदल्यात हवाई दलाला त्याच परिसराला लागून ६५ एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. संरक्षण मंत्रालयाने आपल्या स्तरावरून हवाई दलाला याबाबत आवश्यक निर्देश दिल्यास या विस्तारीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू होऊ शकेल, अशी विनंती मोहोळ यांनी संरक्षण मंत्र्यांकडे केली.

पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महानगरपालिकेत विलीनीकरण करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या जमिनी महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने एप्रिल २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी मागणी मोहोळ यांनी या वेळी केली.

लोहगाव येथील इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना हवाई दलाने जागा रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. सुमारे पाच एकरच्या या परिसरात ११०० ते ११५० घरे असून, जवळपास ५५०० ते ६००० नागरिक १९८० पासून येथे वास्तव्यास आहेत. या भागात महानगरपालिकेच्या शाळा, रुग्णालय आणि इतर अनेक नागरी सुविधा देखील उपलब्ध आहेत. या पूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्येही मंत्री मोहोळ यांनी या समस्येबाबत संरक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. या प्रकरणात संरक्षण खाते आणि महापालिकेने समन्वयातून मार्ग काढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांनी या सर्व विषयासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

“पुण्याच्या विकासाशी आणि नागरिकांच्या हिताशी संबंधित संरक्षण खात्याचे अनेक महत्त्वाचे विषय गेल्या काही काळापासून प्रलंबित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. पुणे विमानतळ विस्तार, कॅन्टोन्मेंट विलीनीकरण आणि इंदिरानगरमधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत लवकरच ठोस निर्णय होऊन प्रश्न मार्गा लागतील, असा विश्वास आहे.’’

  • मुरलीधर मोहोळ

काँग्रेसच्या नेतृत्त्वात भारतात शिखांचा कत्लेआम झाला:हे सत्य विसरता येणार नाही

मुंबई– भाजप नेते गिरीश महाजन यांनी पंजाब दौऱ्यात शिखांच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. “काँग्रेसने शिखांवर अन्याय केला, असे वक्तव्य करून देशाची बेअब्रू केली जात आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली होती. शरद पवारांच्या या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काँग्रेसच्या नेतृत्वात दिल्ली आणि संपूर्ण भारतात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य असून ते कोणालाही विसरता येणार नाही. काँग्रेसने केलेल्या या अत्याचाराचा निषेध आम्ही जन्मभर आणि शेवटपर्यंत करू,” असा घणाघाती पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या पंजाब दौऱ्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मी शरद पवार यांचे संपूर्ण भाषण ऐकलेले नाही, त्यामुळे थेट टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. मात्र, गिरीश महाजन यांचे पूर्ण वक्तव्य पाहिले तर कोणताही प्रश्न उरणार नाही. शिखांचे नववे गुरू यांच्या ३०० व्या शहिदी दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. याच कृतज्ञतेपोटी पंजाबमधून महाराष्ट्र सरकारचा गौरव करण्यासाठी गिरीश महाजन यांना निमंत्रण आले होते.”

गिरीश महाजन यांच्या दौऱ्याबाबत पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “गिरीश महाजन यांनी तिथे जाऊन केवळ दर्शन घेतले. ते अतिशय थोडा वेळ त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्या कार्यक्रमाच्या पाठीमागे कोणाचा फोटो लागलेला आहे, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांनी आपल्या भाषणात केवळ शीख समाजाचा गौरव केला आहे. भारताच्या वाटचालीत शीख समाजाचे योगदान आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेले कार्य यावरच महाजन बोलले आहेत. तसेच पंजाबमधील वाढत्या ड्रग्सच्या समस्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे अन्य कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही.”

शरद पवारांनी गिरीश महाजन यांच्या विधानावरून भाजपवर देशाची बेअब्रू केल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी थेट काँग्रेसच्या काळातील शीख दंगलींच्या जखमांवर बोट ठेवले. शिखांचा दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये, संपूर्ण भारताने कत्लेआम झाला. काँग्रेसच्या नेतृत्त्वात हा कत्लेआम झाला, सत्य असून ते कोणालाही विसरता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की, आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून ४ हजार ३९९ दिवस पूर्ण करत नवीन किर्तीमान स्थापित केला आहे. ४३९९ दिवस हा केवळ काळ नाहीये. हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळात लिहिला गेला, असा सुवर्ण काळ आहे.”

“पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ हा देशातील २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आल्याचा काळ आहे. देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे जाळे तयार झाल्याचा हा काळ आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने मोठी भरारी घेत, जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नाव कमावले, तो हा सुवर्ण काळ आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला, तो हा काळ आहे. या काळात आत्मनिर्भर भारत तयार होताना आपण बघितला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवू शकलो. जो भारत संपूर्ण शस्त्रात्रे आयात करत होता, आज तो हजारो कोटी रुपयांचे शस्त्रात्रे निर्यात करतोय. भारताने युपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टम गेटवे जगाला दिला आणि जगातील ३० देश युपीआय वापरत आहेत, असा भारत मोदींनी उभा केला आहे,” असे फडणवीस म्हणाले.

“भारताच्या तरुणाईच्या स्वप्नांना मोठे पंख देण्याचे कार्य मोदींनी या काळात केलेले आहे. म्हणूनच मला असे वाटते की, केवळ लाँगेस्ट सर्व्हिंग असे नाही, तर ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल. विकासही आणि विरासतही अशा पद्धतीने ज्यांनी कार्य केले, त्या पंतप्रधान महोदयांचे मनापासून आभार मानतो,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलंय. आपले जवळपास १०० धरणे पूर्ण करण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारने मदत केली. महाराष्ट्रात वाढवन सारखे बंदर, हायवेज, मेट्रो, ट्रेनचे नेटवर्क, नवी मुंबईचे एअरपोर्ट, मेट्रो-३ असे अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येतील की जे केवळ कागदावर दिसायचे. पण प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इराणला याची किंमत मोजावी लागेल: ट्रम्प

युद्ध देशाच्या हिताचे नाही – इराणचे राष्ट्राध्यक्ष

रशियाचे अमेरिका आणि इराणला लष्करी हल्ले त्वरित थांबवण्याचे आवाहन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सोशल मीडियावर दावा केला की इराणचा पराभव झाला आहे. त्यांनी म्हटले की, इराणचे लष्कर पूर्णपणे कोलमडले असून त्यांचे नौदल आणि वायुदल जवळपास नष्ट झाले आहे.

ट्रम्प यांनी टिप्पणी केली की, इराण केवळ बढाया मारतो पण प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नाही. एकेकाळी ते स्वतःला मध्यपूर्वेतील सर्वात प्रबळ आणि दादागिरी करणारी शक्ती समजत होते, पण आता त्यांचा खेळ संपला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असेही नमूद केले की, इराणने अशा करारासाठी वाटाघाटी करण्यास खूप उशीर केला जो त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकला असता; आता त्यांना याची किंमत मोजावी लागेल.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले आहे की, देशाला ‘युद्धही नाही आणि शांतताही नाही’ अशा स्थितीबाहेर पडणे आवश्यक आहे. त्यांनी असा दावा केला की, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचीही इच्छा होती की हा प्रश्न चर्चेद्वारे सोडवला जावा आणि त्यांनी त्यासाठी मंजुरीही दिली होती.

पेझेश्कियान यांनी नमूद केले की युद्ध हे इराणच्या हिताचे नाही; तरीही, जर एखाद्या देशाने हल्ला केला, तर इराण त्याला चोख प्रत्युत्तर देईल आणि कोणासमोरही झुकणार नाही. सध्याचा तणाव निवळण्यासाठी चर्चा हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.

त्यांनी नमूद केले की, जरी भूतकाळात इराण चर्चा करणार नाही असे वारंवार म्हटले जात होते, तरीही चर्चेविना ही समस्या कशी सोडवता येईल यावर सरकारमध्ये अंतर्गत चर्चा सुरू होत्या. याच कारणामुळे खामेनी यांनी वाटाघाटी सुरू ठेवण्यास परवानगी दिली.

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाबाबत रशियाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. रशियाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि लष्करी हल्ले त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलच्या कृतींमुळे सुरू झालेल्या या नवीन संघर्षामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. त्यामुळे, दोन्ही बाजूंनी शत्रुत्वाची कारवाई थांबवावी आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

रशिया आणि इराण यांचे दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध राहिले आहेत. हे दोन्ही देश विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकमेकांना पाठिंबा देतात आणि अमेरिकेच्या अनेक धोरणांशी असहमत आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, इराणशी घनिष्ठ संबंध राखणे ही रशियाच्या प्रमुख धोरणात्मक प्राधान्यांपैकी एक बाब आहे.

इराणचा बहरीन, कुवेत, जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या तळांवर हल्ला

इराणने बुधवारी बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणने अमेरिकन तळांवर एकूण 21 हल्ले केल्याचा दावा केला. मात्र, अमेरिकन अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावत म्हटले की, नुकसानीची माहिती वाढवून सांगितली जात आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने सांगितले की, हे हल्ले अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले आहेत. यापूर्वी अमेरिकन सैन्याने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली, कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि पाळत ठेवणाऱ्या रडार तळांवर हवाई हल्ले केले होते.

यापूर्वी सोमवारी होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकन सैन्याचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. एका दिवसानंतर ट्रम्प यांनी याचा आरोप इराणवर केला होता. ते म्हणाले होते की, अमेरिका या हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर देईल आणि यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना त्याची किंमत चुकवावी लागेल. मात्र, इराणने अमेरिकन हेलिकॉप्टर पाडण्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

१. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले: होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर अमेरिकेने इराणवर प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले. ट्रम्प यांनी आरोप केला की हेलिकॉप्टर इराणने पाडले होते, तर तेहरानने प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला.

२. ट्रम्प म्हणाले- २ आठवड्यांत इराणवर ‘पूर्ण विजयाची’ घोषणा करणार: रिपब्लिकन रॅलीत ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेने इराणविरुद्ध आघाडी घेतली आहे आणि पुढील दोन आठवड्यांत “टोटल व्हिक्टरी” (पूर्ण विजय) घोषित करेल. ते म्हणाले की यामुळे तेलाच्या किमतीही खाली येतील.

  1. इस्रायलचा इशारा- गरज पडल्यास पुन्हा हल्ला करू: इस्रायली लष्करप्रमुख एयाल जामिर म्हणाले की, अलीकडील ऑपरेशन ही फक्त सुरुवात होती. गरज पडल्यास इस्रायल इराणवर आणखी मोठे हल्ले करण्यास तयार आहे.
  2. ट्रम्प-नेतन्याहू यांच्या संबंधांमध्ये वाढलेले अंतर: इराण-इस्रायल तणावाच्या दरम्यान, ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना इशारा दिला की संघर्ष वाढवल्यास इस्रायल आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दोन्ही नेत्यांमधील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत.
  3. होर्मुझजवळ अमेरिकन अपाचे हेलिकॉप्टर क्रॅश: AH-64 अपाचे हेलिकॉप्टर होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ समुद्रात कोसळले. दोन्ही वैमानिकांना सुरक्षित वाचवण्यात आले. अमेरिकन सैन्याने प्रथमच समुद्रात ड्रोन बोटचा वापर करून बचावकार्य केले. या अपघाताची चौकशी सुरू आहे.

पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समिती बैठक संपन्न

0

पुणे, दि.९ : पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी महत्त्वपूर्ण असून प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी पुढील ५ वर्षांत खर्च करण्यासाठी ५,००० कोटी रुपयांच्या विशेष निधीमधून सुरु करावयाच्या प्रकल्पांचा प्राथम्यक्रम ठरवून प्रकल्प आराखडा तयार करावा,अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिल्या.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी,पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, मॅकेन्झी कंपनीचे रौनक शहा तसेच पीआयसीचे संचालक दिनानाथ खोलकर उपस्थित होते.

श्रीमती तेली-उगले यांनी पुणे परिसरातील आर्थिक वाढ, जीवनमान, गुणवत्ता व शाश्वत विकास या प्रमुख बाबी लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा सादर करावा, प्रकल्पांची यादी तयार करताना प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या वेळी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करावा अशा सूचना दिल्या.

श्री. हर्डीकर म्हणाले, प्रत्येक प्रकल्पासाठी लागणारा अंदाजित खर्च व कालक्रम ठरवावा, अनेक प्रकल्पांना भूसंपादन आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत महानगर प्रदेशांच्या आर्थिक क्षमतेचा उपयोग करुन उद्योग, रोजगार व गुंतवणूक वाढीस चालना आदी बाबींचा विचार करुन बृहत आराखडा तयार करावा.

पुणे महानगर प्रदेश माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल उद्योग, संशोधन संस्था, स्टार्टअप परिसंस्था यांमुळे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या उपक्रमांतर्गत महानगर क्षेत्राच्या विविध विकासासह सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ करणे व रोजगाराकरिता मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचे ध्येय असल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले.

बैठकीत पुणे ग्रोथ हब या संकल्पनेअंतर्गत नीती आयोगाला सादर करावयाच्या मसुद्याचे मॅकेन्झी कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले.
0000

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

मुंबईकरांच्या आरोग्य व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य, नियमितपणे आढावा बैठक घेणार

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश

मुंबई-मुंबईकरांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रशासकीय अडचणी दूर करून सर्वोत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेबाबत प्रशासकीय कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा, त्यात कालसुसंगत बदल करण्यासाठी काय सुधारणा आवश्यक आहेत, त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा. अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तसेच, महानगरपालिका रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. यापुढे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधा आणि उपक्रमाबाबत नियमितपणे आढावा बैठक आयोजित केली जाईल, असेही शेलार यांनी नमूद केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य खात्याबाबतची सद्यस्थिती आणि आधुनिकरण यासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा तसेच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून शेलार हे बोलत होते.

आमदार श्री. अमित साटम, आमदार श्रीमती विद्या ठाकूर आमदार श्री. योगेश सागर, आमदार श्रीमती मनिषा चौधरी, आमदार श्री. संजय उपाध्याय, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा, महानगरपालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शाह, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी, बृहन्मुंबई महानगरपालिका सध्या देत असलेल्या आरोग्य सेवेबाबत संपूर्ण माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

तर सर्व आमदार महोदयांनी या आरोग्य सेवांमध्ये प्रत्यक्ष येत असलेल्या अडचणी, रुग्णांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्या, रुग्णालयांचा पुनर्विकास आणि इतर प्रशासकीय अडचणी याबाबत सूचना मांडल्या तसेच तक्रारी नोंदवल्या.

पालकमंत्री श्री. शेलार यांनी सांगितले की, महानगरपालिकेने राज्याचा आरोग्य विभाग, नगर विकास विभाग या सगळ्यांशी संबंधित असणाऱ्या प्रशासकीय बाबींबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पुढील बैठक आयोजित करावी. रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल आणि एकूणच चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशा दृष्टीने सर्व पैलूंचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा, ज्या प्रशासकीय सुधारणा अपेक्षित आहेत, त्याचा आराखडा सादर करावा, असे श्री. शेलार म्हणाले. जागतिक आणि राष्ट्रीय निकषांप्रमाणे आरोग्य सेवा पुरवठा यावी यासाठी आर्थिक तरतुदींच्या पलीकडे जाऊन आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा (मेडिटेक) अवलंब करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू करावेत, अशी सूचनाही श्री. शेलार यांनी केली.

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यातील आवश्यक ती रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर करावी. कोविड काळामध्ये महानगरपालिकेसाठी कंत्राट तत्त्वावर सेवा बजावलेल्या मनुष्यबळाला या विहित भरती प्रक्रियेत एकवेळचे विशेष धोरण म्हणून प्राधान्य देऊन सामावून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना महापौरांनी केली. सिद्धार्थ रुग्णालय, राजावाडी रुग्णालय यासह ज्या ज्या रुग्णालय आणि दवाखान्यांचा पुनर्विकास लांबला आहे, त्या ठिकाणी प्रशासनाने विशेष लक्ष पुरवावे. अडचणींचे युद्ध पातळीवर निराकरण करावे. प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नर्सिंग कॉटेज सुविधा पुरवावी, झिरो प्रिस्क्रिप्शन सेवा लवकर सुरू करावी, टाटा कर्करोग रुग्णालय लगत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कॉरिडोर करावा, केइएम रुग्णालयामध्ये एआरटी विभाग सुरू करावा तसेच तेथील संग्रहालयाचे नूतनीकरण करावे, कूपर रुग्णालयात ईएमएस वॉर्ड तयार करावा तसेच तेथे महानगरपालिकेने स्वतःच्या अखत्यारीतील शव विच्छेदन केंद्र (post mortem center) सुरू करावे, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयात मॉड्युलर ओटी तयार करावा, यासह इतर विविध निर्देश महापौरांनी दिले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर महापौर वैद्यकीय सहायता कक्ष हा विभाग स्थापन करावा. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर रुग्णांना सहाय्यता पुरवण्यासाठी सुलभ आणि पारदर्शक अशी प्रणाली विकसित करावी, असे निर्देशही महापौर श्रीमती तावडे यांनी दिले.

आमदार श्री. अमित साटम म्हणाले की, मुंबईभर आरोग्य सेवांची उपलब्धता सुधारण्यावर भर द्यावा. डायलिसिस सुविधांचा विस्तार करावा, शहरव्यापी ‘मधुमेहमुक्त मुंबई’ अभियान सुरू करावे, प्रस्तावित कर्करोग उपचार बेड वेळेवर कार्यान्वित करावे, मानसिक आरोग्य केंद्रे स्थापन करावीत आणि प्रत्येक रुग्णालयात रुग्णशय्या संख्या लक्षात घेऊन आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करावी, इत्यादी मागण्या श्री. साटम यांनी यावेळी केल्या.

पुढे ते म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत येत्या काही वर्षांत पाच हजार नव्या रुग्णशय्या उपलब्ध होणार असल्याने त्या प्रभावीपणे चालविण्यासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या नियोजनाबाबतही महानगरपालिकेने आतापासूनच सर्वंकष मनुष्यबळ आराखडा तयार करावा. परिचारिका, ओपीडी डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी आणि रुग्णांशी थेट संपर्कात येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे संवेदनशीलतेबाबत प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना अधिक सहानुभूतीपूर्ण, सन्मानपूर्वक आणि कार्यक्षम सेवा मिळू शकेल, असे श्री. साटम यांनी सांगितले.

कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राला झालंय तरी काय ? आयुक्त राम म्हणाले तातडीने तपासा आणि २ दिवसात समस्या सोडवा

पुणे-महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, यांनी प्रभाग क्र १ व २ तसेच भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राची दिनांक ०९/०६/२०२६ रोजी पाहणी केली.पुणे शहराच्या उत्तर पूर्व भागातील गढूळ / पिवळसर पाणी तसेच कमी दाबाने व कमी वेळेत होत असलेल्या पाणीपुरवठ्या बाबत या भागातील नागरिक व सभासद यांनी वारंवार केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नागपूरचाळ, मुंजाबा वस्ती, धानोरी या भागात व कुरुळी येथे जलशुद्धीकरण प्रकल्पास दिनांक ०९/०६/२०२६ रोजी भेट दिली. यावेळी सभासद अश्विनी भंडारे, संगीता दांगट, अनिल टिंगरे, नंदिनी धेंडे, रवी उर्फ हर्षल टिंगरे, शितल सावंत, सुहास टिंगरे, अनिल सातव, रामदास दाभाडे उपस्थित होते. सदर भेटी दरम्यान सभासदांनी त्यांचे प्रभागातील पाण्याच्या समस्या मांडल्या.महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये कशा प्रकारे पाणी शुध्द केले जाते याचा पूर्णपणे आढावा घेतला. सद्यस्थितीत गढूळ / पिवळसर पाण्याबाबत तज्ञांची मदत घेऊन सदर तक्रारींचे पुढील दोन दिवसात निराकरण करणेचे आदेश याप्रसंगी दिले. त्यानुसार तज्ञ दिनांक १०/०६/२०२६ रोजी पाहणी करणार आहेत. व तज्ञांच्या पाहणी नंतर व त्यांचा निष्कर्षानंतर त्यावर योग्य त्या उपाय योजना तात्काळ करण्यात येतील. तसेच भामा आसखेड प्रकल्पाच्या वारंवार खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने MSEDCL कडील अधिक्षक अभियंता यांच्या समवेत बैठक आयोजित करणे बाबत महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश दिले. त्याप्रमाणे भामा आसखेड प्रकल्पातून शुध्द पाणीपुरवठा होईपर्यंत यावर अवलंबून असणाऱ्या भागात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तूर्त करू नये असे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रसंगी सांगितले. या पाहणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप, भामा-आसखेड प्रकल्प व्यवस्थापक रामदास तारु, अविनाश सपकाळ, विजय केळकर, एकनाथ गाडेकर तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील संबंधित अधिकारी उपस्थित होते.