Home Blog Page 20

मांजरीत पोलिसांनी दरोडेखोरांची टोळी पकडली , 2 पिस्तुले, 6 काडतुस अन् तीक्ष्ण शस्त्रांचा साठा हस्तगत

पुणे-दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मांजरीतील भापकर वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा तीक्ष्ण शस्त्रे आणि मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय 26, रा. भापकर वस्ती, मांजरी, हडपसर), रामजीतसिंग रणजीतसिंग टाक (वय 27,रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) आणि अभयसिंग सिंकदसिंग जुनी (वय 21,रा. सुखकर्ता कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलिस हवालदार अमित कांबळे यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मांजरीतील भापकर वस्ती भागातील रेल्वे पुलाजवळ चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. हे चोरटे वाहन चालकांना लुटण्याच्या तयारीत होते. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दुधानी, टाक आणि जुनी यांना पकडले. झटापटीदरम्यान त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

अटक करण्यात आलेले चोरटे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा कोयते, मिरची पूड आणि दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एन. डिगोळे करत आहेत.

मोदी यंत्रणेच्या बळावर आलेले पंतप्रधान:भारतीय जहाजावर हल्ला झाला तरी पंतप्रधान गप्प का?

शहांनी त्यांच्यावर उपकार करणाऱ्यांचेच पक्ष फोडले- राऊत

मुंबई-अमित शहा यांच्यावर ज्या पक्षाने उपकार केले आहेत त्यांचा पक्ष फोडण्याचे काम अमित शहा यांनी केले हे कपट कारस्थान नाही तर काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विक्रम केला नाही. पंडित नेहरू हे 1947 पासून 16 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मंत्री होते. तर सरदार पटेल हे त्याच काळात देशाचे गृहमंत्री होते मग ही लोकं त्यांना पण देशाचे गृहमंत्री मानत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायदामंत्री माणायला मोदी तयार नाहीत जर नेहरुंचा 4 वर्षांचा तो कालखंड त्यांना मान्य नसेल तर, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, नेहरुंनी 16 वर्षांमध्ये देश उभा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजून खूप काम करायचे आहे. त्यांनी अजून काम करण्यास सुरूवात केलेली नाही. ते कट कारस्थान करण्यातच व्यस्त आहेत. नेहरुंनी हे कधी केले नाही. त्यामुळे मोदींचे भाषणं आम्ही काही गांभीर्याने घेत नाही. 2014 ला लोकांनी त्यांना निवडून दिले. 2019 आणि 2024 मध्ये जनतेने पराभूत केले पण यंत्रणेचा वापर करत ते निवडून आले. 2024 मध्ये त्यांना बहुमतच नाही. ते निवडून आलेले पंतप्रधान नाही.
संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस देशात मजबूत झाला पाहिजे. काँग्रेसमधून गेलेल्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. या संदर्भात शरद पवारांनी पुढाकार घेत नेतृत्व केले पाहिजे. काँग्रेस विचारधारेतून बाहेर पडलेले आणि आजही काँग्रेससोबत असलेल्या पक्षांनी काँग्रेससोबत आले पाहिजे. तर जनतेच्या हिताचे काम करता येईल.

संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प मोदी यांच्याबद्दल काही म्हणाले हे आम्ही ऐकले नाही. पण ट्रम्प कोणाचीही वाह वाह करतात आणि दोन दिवसानंतर वेगळी भूमिका घेतात. भारताविषयी त्यांनी काय काय म्हटले हे सर्वांना माहिती आहे. कालच ओमानमध्ये भारतीय जहाजावर हल्ले झाले अमेरिकेच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आमचे टेल टँकर बुडवले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही, हे केवळ निषेध व्यक्त करतात.

संजय राऊत म्हणाले की, प्रभु श्रीराम मन से अत्यंत दुखी और व्यथित हैं… अयोध्या लौटकर क्या यही दर्दनाक दृश्य देखना था? हृदय काँप उठता है सोचकर। समझ नहीं आता, लेकिन श्रीराम आज पुकार रहे हैं… प्रेम की गहरी, करुण साद दे रहे हैं। जैसे कह रहे हों – “बेटा, आ जा..” अयोध्या एक बार जाना ही पड़ेगा, उन चोर मंडली का समाचार लेने के लिए। श्रीराम की यही इच्छा, यही पुकार प्रतीत हो रही है। हे प्रभु, आपके दुख को हम महसूस कर रहे हैं… जय श्री राम असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी अन् अभिजीत दीपकेंची अमेरिकेत गुप्त भेट, माझ्याकडे फोटो…संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई-एकीकडे काल विश्वंभर चौधरी यांनी अभिजीत दीपकेंच्या कॉकरोच जनता पार्टी च्या आंदोलनाला भारतीयांचे आंदोलन म्हणत या आंदोलनामुले भाजपचेच नुकसान होणार आहे , या आंदोलनाशी कोणत्याही विरोधी पक्षांचा संबध नसल्याचे सांगून राहुल गांधी हाच चेहरा PM पदासाठी घोषित करावा असे म्हटलेले असताना आज कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके आणि मोदींची अमेरिकेत बैठक झाली असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. अभिजीत दीपके आणि मोदी यांच्या भेटीचे फोटो मला एकाने पाठवले असाही दावा संजय राऊत यांनी केला, मोदींच्या भेटीनंतरच दीपके भारतात आल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अभिजीत दीपके यांनी अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर आज पुण्यामध्ये त्यांच आंदोलन होत आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी चर्चा सुरू असताना आता संजय राऊत यांनी हा मोठा दावा केलेला आहे, अमेरिकेमध्ये मोदी आणि दीपके यांच्या भेटीच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत जी मीटिंग झाली त्याचे फोटो एकाने पाठवले आहेत. त्याच्यानंतर दिपके भारतात आले अशी माहिती काही लोकांनी सांगितली. मी हे आरोप करत नाही, माझी माहिती लोकांनी पोहोचवलेली आहे, ती मी सांगत आहे, आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं, मात्र जेव्हा काही माहिती या सगळ्या संदर्भात समोर येते, तेव्हा माध्यमांसमोर मांडणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनाला गेला नाही. तरुणांचे प्रश्न आणि तरुणांना आम्ही पाठिंबा दिला. जे तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्या तरुणांचे सरकारने ऐकायला हवं यासाठी आम्ही भूमिका मांडली. या माध्यमातून सरकारला मदत करत असेल तर त्यावर लक्ष ठेवणं आमचं काम आहे, असंही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांचं खरं पंतप्रधान पद हे २०१४ ते २०१९ लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यानंतर चोरलेल्या निवडणुकीतून ते पंतप्रधान झालेले आहेत. २०१४ मध्ये लोकांनी त्यांना निवडून दिले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत जनतेने पराभूत केलेले असताना निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, ईडीचा वापर या माध्यमातून ते निवडून आले. गेल्या निवडणुकीत २०२४ मध्ये ते निवडून आलेलेच नाही. ते कुठे इलेक्टेड प्रायमिनिस्टर आहेत? असा टोला राऊतांनी लगावला. निवडणूक यंत्रणा आणि प्रशासनात घोटाळा करून जिंकल्या आहेत, पक्ष फोडा तुरुंगात टाका हे काम मोदी यांनी केले, २०१४ ते २०१९ हे मोदींचे खरं सरकार आहे, नंतर चोरलेलेले लोक आहेत, त्यानंतर दोन्ही निवडणुका जनतेने पराभूत केले असताना ते ते संस्थांचा वापर करून चोऱ्या करून जिंकले आहेत

वाढदिवसानिमित्त ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कार्यकर्त्यांकडून सेवा कार्य आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन

कोथरुड मधील सेवा उपक्रमांसाठी सढळ हाताने आर्थिक योगदान

पुणे – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे आणि कोथरुड मध्ये अनेक कार्यकर्त्यांनी विविध सेवा कार्ये आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी सामाजिक भान जपले आहे. ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर, महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडी वाटप, वृक्षारोपण, गोसेवा, नोकरी मेळावा अशा विविध कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘वाढदिवस सेवा दिन’ म्हणून साजरा करत कार्यकर्त्यांनी समाजातील वंचित घटकांना मदत पोहचवली.

“वाढदिवसाला हार, तुरे, पुष्पगुच्छ आणू नका,” असे आवाहन चंद्रकांतदादांनी केले होते. त्याऐवजी कोथरुड मधील सेवा उपक्रमांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छांवर होणारा विनाकारण खर्च टाळला. कार्यकर्त्यांनी कोथरुड परिसरातील विविध सामाजिक आणि सेवा उपक्रमांसाठी सढळ हाताने आर्थिक योगदान दिले.

वाढदिवसाच्या थाटामाटापेक्षा समाजोपयोगी कामांना प्राधान्य देण्याची चंद्रकांतदादांची परंपरा या निमित्ताने कार्यकर्त्यांनी पुढे चालू ठेवली आहे. यामुळे यंदाचा वाढदिवस खऱ्या अर्थाने ‘सेवा दिन’ म्हणून साजरा झाला

दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. दिवसभर त्यांच्या निवासस्थानी आणि शुभारंभ लॅान्स येथे कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

सखी-सुखदा उपक्रमाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशन आणि सूर्य प्रभा नर्सिंग होमच्या वतीने वस्ती भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते झाले. या उपक्रमात ४८९ जणांनी आपली वैद्यकीय तपासणी केली.

यावेळी सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील, सूर्य प्रभा नर्सिंग होमचे जितेंद्र आग्रवाल, नगरसेविका अर्चना पाटील, तनिषा पाटील, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, भाजप पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, माजी नगरसेविका छाया मारणे, स्वाती मोहोळ आदी उपस्थित होते.

नगरसेवक पुनीत जोशी यांच्या माध्यमातून महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना विशेष भेट

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक पुनीत जोशी यांच्या माध्यमातून ‘महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा’ व ‘साडीरूपी भेटवस्तू देण्यात आली. यावेळी सर्व महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी नगरसेवक सुनील पांडे, नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष मा. गिरीश खत्री आणि प्रभाग अध्यक्ष प्राची बगाटे उपस्थित होते.

शिंदे हायस्कूलजवळ रात्रीच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार

पुणे- पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पुन्हा एकदा गोळीबाराची थरारक घटना समोर आली आहे. नुकतीच पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका सराईत गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता थेट पुणे शहरात गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिंदे हायस्कूलजवळ ही धक्कादायक घटना घडली असून, या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शिंदे हायस्कूल परिसरात हा गोळीबार झाला. रात्रीची वेळ असताना अचानक बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. यामुळे घाबरलेल्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांची आपला जीव वाचवण्यासाठी एकच धावाधाव सुरू झाली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली असून, पोलिसांकडून या गोळीबाराचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.

पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेजवळ गोळीबाराची थरारक घटना घडली असून, यात एक जण जखमी झाला आहे. हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांकडून त्याच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण शहरात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लागोपाठ घडणाऱ्या या गोळीबाराच्या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, यापूर्वी शिरूर तालुक्यातील करडे घाटात विशाल काळे या कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आता थेट पुणे शहरात झालेल्या या नव्या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकेचा इराणवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ला,इराणनेही अमेरिकेच्या तळांवर केले हल्ले, होर्मुझ पुन्हा बंद

अमेरिकेने गुरुवारी सकाळी इराणच्या अनेक ठिकाणांवर नवीन हवाई हल्ले केले आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर सलग दुसऱ्या दिवशी हा मोठा हल्ला आहे.इराणी माध्यमांनुसार, केशम बेट, बंदर अब्बास, मिनाब आणि सिरिक येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर अनेक भागांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टिम) सक्रिय करण्यात आली.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराण कराराच्या वाटाघाटीत विलंब करत आहे, त्यामुळे अमेरिका दबाव कायम ठेवेल. त्यांनी दावा केला की, अमेरिकन सैन्याने 49 टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली आणि लढाऊ विमानांनीही हल्ले केले.याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, कोणत्याही नुकसानीची अधिकृत पुष्टी झालेली नाही.इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी (स्ट्रेट ऑफ होर्मुझ) सर्व जहाजांसाठी बंद केली आहे. मात्र, अमेरिकन सेंट्रल कमांडने हे फेटाळून लावले.


तेलवाहू जहाजावरील अमेरिकेच्या हल्ल्यात दोन भारतीय ठार
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ‘एमटी सेट्टेबेलो’ या तेलवाहू जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशी ठार झाले आहेत, तर जहाजाचा मुख्य अभियंता अद्याप बेपत्ता आहे. ही माहिती फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाने (FSUI) दिली आहे.एफएसयूआयचे महासचिव मनोज यादव म्हणाले की, जहाजाशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या मते, उपलब्ध माहितीनुसार, दोन भारतीय खलाशी ठार झाले आहेत, तर जहाजाचा मुख्य अभियंता असलेला एक भारतीय अद्याप बेपत्ता आहे.जहाजावरील भारतीय आणि इतर परदेशी नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची माहिती अमेरिकन नौदलाला होती, असे सांगून यादव यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जर जहाजाने कोणत्याही सूचनांचे पालन केले नसते, तर त्याला ताब्यात घेणे हा एक पर्याय असू शकला असता.यापूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘एमटी सेट्टेबेलो’वरील हल्ल्याचा निषेध केला होता. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील २४ भारतीयांपैकी २१ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर तीन भारतीय बेपत्ता आहेत. भारतीय दूतावास ओमानच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शोध आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहे.


पश्चिम आशिया अधिक गंभीर संकटाकडे वाटचाल करत आहे – UN
संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, हा प्रदेश संभाव्य जागतिक परिणामांसह एका गंभीर संकटाकडे वाटचाल करत आहे.गुटेरेस यांनी लिहिले की, गेल्या काही दिवसांत हल्ले वाढले आहेत आणि शस्त्रसंधी कमकुवत झाली आहे. त्यांनी इशारा दिला की, हा मर्यादित संघर्ष कोणत्याही क्षणी पूर्ण-प्रमाणातील युद्धात बदलू शकतो.


होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या घोषणेनंतर तेलाच्या किमतीत २ टक्क्यांहून अधिक वाढ
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर होऊ लागला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीत २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.ब्रेंट क्रूड २.५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९५.४० डॉलरवर पोहोचले, तर यूएस डब्ल्यूटीआय क्रूड २.९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ९२.६३ डॉलरवर पोहोचले.इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने दावा केला आहे की, अमेरिकेच्या ताज्या हल्ल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी तेलवाहू जहाजे आणि व्यापारी जहाजांसाठी बंद करण्यात आली आहे. तसेच, या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन सकारात्मक; कलाकारांच्या मागण्यांवर विभागीय समन्वय बैठकीचे निर्देश

– मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र शासनाकडून पात्र दशावतार कलापथकांना अनुदान दिले जाते. तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपयांचे मानधनही उपलब्ध आहे. मात्र, दशावतार नाट्यमंडळाच्या मागण्या ह्या विविध विभागांशी संबंधित असल्याने या मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर समन्वय बैठक घेण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेच्या जतन, संवर्धन आणि कलाकारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार मंडळांचे प्रतिनिधी, कलावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, कोकणातील दशावतार महोत्सवांची संख्या वाढवून मुंबई आणि ठाणे येथेही शासनाच्या माध्यमातून विशेष दशावतार महोत्सव आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर दशावतार विषयक प्रशिक्षण कार्यशाळा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक संस्थांशी समन्वय साधण्याचे निर्देशही मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

महाराष्ट्रातील लोककलांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याबाबत बालभारतीला पत्र पाठविण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी कलाकारांच्या प्रवास सवलतीसाठी परिवहन विभागाशीही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दशावतार कलाकारांच्या वाहनांवरील करसवलत, विश्रांतीगृहे, मुंबई-ठाणे परिसरात निवास व्यवस्था, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीच्या मागण्यांवरही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री शेलार यांनी यावेळी सांगितले.

कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार यांनी दशावतार कलाकारांची अधिकृत निर्देशिका (डिरेक्टरी) तयार करण्याच्या प्रस्तावालाही यावेळी मान्यता दिली.

मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा- पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई, दि. १० : मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा पॉवरच्या ताब्यातील जमिनींवरील अतिक्रमणे हटवून ती जागा चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या मूळ उद्देशासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मानखुर्द येथील अतिक्रमित झालेल्या जागेसंदर्भात पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह मुंबई महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, महिला व बालविकास, टाटा पॉवर यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मानखुर्द परिसरातील महामार्गालगत नव्याने उभारली जात असलेली बेकायदेशीर गोदामे, उच्चदाब वीजवाहिन्यांखाली सुरू असलेली बांधकामे आणि विविध स्वरूपातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करुन ते हटविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले. तसेच या भागातील गॅस पाइपलाइन आणि उच्चदाब वीजवाहिन्यांच्या सुरक्षितता क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत वापरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

चिल्ड्रन्स एड सोसायटी, टाटा पॉवर, पीडब्ल्यूडी आणि शासकीय जमिनींच्या सीमा निश्चित करण्यासाठी सिटी सर्व्हे विभागाने तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून सर्व संबंधित विभागांच्या स्वाक्षरीसह अधिकृत नकाशे उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

पालकमंत्री मंत्री ॲड.शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत कारवाईची प्रक्रिया गतीमान करण्यासंबंधी निर्देश दिले. तसेच विविध विभागांनी स्वतंत्र कारवाई करण्याऐवजी समन्वित पद्धतीने नोटिसा बजावून अतिक्रमणे हटविण्याचे सांगितले. त्याचबरोबर बेकायदेशीर गोदामांना देण्यात आलेले परवाने, अग्निसुरक्षा परवानग्या, वीजजोडण्या, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा तपासून आवश्यक त्या रद्द करण्याचेही निर्देशही देण्यात आले.
0000

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सात दिवसांत अहवाल तयार करा

— मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. १० : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांत सविस्तर अहवाल तयार करावा, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगातील दुर्गम भागातील वाड्या, वस्तीवर 5जी मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत आमदार प्रमोद जठार, शेखर निकम, अतुल काळसेकर
यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, दूरसंचार विभाग, बीएसएनएल तसेच विविध दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांचे प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले होते.

यावेळी मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, केवळ टॉवर उभारणे पुरेसे नसून त्या टॉवर्सची सिग्नल क्षमता, कव्हरेज आणि कार्यस्थिती यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी टॉवर्स असूनही सिग्नल मिळत नसल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी टॉवर नाहीत तेथे नवीन टॉवर्स उभारणे, विद्यमान टॉवर्सचे सॅच्युरेशन व सिग्नल इंटेन्सिटी विश्लेषण करणे आणि वीजपुरवठा किंवा बॅटरी बॅकअपसारख्या देखभालविषयक अडचणी त्वरित दूर करण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

त्याचप्रमाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा ब्रॉडबँड समितीच्या नियमित बैठका घेण्याचे निर्देश देत, नेटवर्क कमकुवत असलेल्या गावांची स्वतंत्र यादी तयार करून अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले. तसेच बीएसएनएलसह खासगी दूरसंचार कंपन्यांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

एकाच टॉवरवर विविध सेवा पुरवठादारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या “वन टॉवर, मल्टिपल सर्व्हिस प्रोव्हायडर” संकल्पनेचाही विचार करून, या संदर्भात दूरसंचार विभाग व संबंधित कंपन्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

ई-पीक पाहणीसंदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा स्वतंत्र अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाकडे पाठवावा, तसेच आवश्यक असल्यास ऑफलाईन प्रक्रियेबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आजच्या काळात रोटी, कपडा आणि मकाननंतर इंटरनेट ही मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे कोकणातील प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार मोबाईल आणि इंटरनेट सेवा पोहोचलीच पाहिजे, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
0000

विश्वशांती, विश्वकल्याण आणि समृद्धीसाठी पुण्यात पवित्र दत्तयाग संपन्न

अधिक मासाच्या शुभ काळात १००८ दांपत्यांचा सहभाग ; तब्बल ९ हवनकुंडांवर हवन
पुणे : विश्वशांती, समृद्धी आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी भगवान दत्तांना प्रार्थना करण्याच्या पवित्र संकल्पाने सिंहगड रस्त्यावरील श्री गणेश गार्डन लॉन्स अँड बॅन्क्वेट येथे भव्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारा दत्तयाग संपन्न झाला. संध्या भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दत्तभक्त, हितचिंतक व समर्पित स्वयंसेवकांच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्यात अधिक मासाच्या शुभ काळात १००८ दांपत्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात सहभागी दांपत्यांनी श्रद्धा आणि भक्तिभावाने एकत्रित संकल्प करून केली. पुढे ९ हवनकुंडांवर मिळून यज्ञ पार पडला, ज्यामुळे सर्व सहभागी भक्तांना शिस्तबद्ध पद्धतीने विधीमध्ये सहभागी होता आले. कार्यक्रमाची सांगता आरती आणि महाप्रसादाने झाली. पूजेत सहभागी झालेल्या तसेच फक्त दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांना प्रेमपूर्वक प्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाला २१ गुरुजींचे आशीर्वाद लाभले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने विधींचे संचालन आणि पावन संकल्पना पूर्ण केली. संध्या भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी कोणत्याही वैयक्तिक अपेक्षेशिवाय निःस्वार्थ भावनेने अथक सेवा केली.

आजच्या तणावपूर्ण आणि अस्थिर जगात हा याग शांती, आरोग्य, समृद्धी आणि सौहार्दाचा विनम्र माध्यम ठरावा, हीच सर्वांची प्रार्थना आहे. पुढील अधिक मासात आणखी एक १००८ दत्तयाग करण्याचा संकल्प आहे. तसेच बहरीन येथे पुढील दत्तयागासाठी तयारी सुरू असून हे पवित्र कार्य भारताच्या सीमांपलीकडेही पुढे नेले जात आहे.

दत्त संप्रदायात भगवान दत्त हे भक्तांच्या निष्कपट प्रार्थनेला तत्काळ प्रतिसाद देणारे करुणामय दैवत मानले जातात. याग किंवा यज्ञ हा असा पवित्र आध्यात्मिक मार्ग आहे, ज्याद्वारे दैवी आशीर्वाद सूक्ष्म स्वरूपात विस्तृत परिसरात प्रसारित होतात. या मंगल स्पंदनांमुळे सर्व जीवांची उन्नती, संरक्षण आणि मुक्ती साधण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे.

ही उदात्त परंपरा दत्त संप्रदायातील दिव्य संत नरहरी प्रभू काळे, म्हणजेच प्रेमाने ओळखले जाणारे अण्णा महाराज, यांनी १९६० च्या दशकात सुरू केली आणि दृढ केली. विश्वशांती व आध्यात्मिक सौहार्द प्रसारित करण्याच्या संकल्पाने अण्णा महाराजांनी भारतभर १०८ दत्तयाग संपन्न केले. त्यांच्या कार्यातून भक्ती, सेवा आणि सामूहिक प्रार्थनेवर आधारित आध्यात्मिक चळवळीचे बीज रोवले गेले.

पुढे श्रीपाद प्रभू कुलकर्णी, म्हणजेच अप्पा महाराज, यांनी ही परंपरा अधिक व्यापक केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या धर्मकार्याची पवित्र ज्योत अधिक तेजस्वी झाली आणि समाजकल्याणासाठी सामूहिक आध्यात्मिक साधनेत अधिकाधिक भक्त सहभागी झाले. श्री विद्यासागरजींनी या परंपरेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले.त्यांनी प्रथम अधिक मासात एकाच दिवशी एकाच ठिकाणी १०८ दत्तयागांचे आयोजन केले आणि नंतर ही संकल्पना १००८ दत्तयागांपर्यंत विस्तारली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे दत्तयागाचा आध्यात्मिक संदेश भारताच्या सीमा ओलांडून जगभरातील भक्तांपर्यंत पोहोचला.

सन २०२१ मध्ये विद्यासागरजी आपल्या गुरूंच्या चरणी विलीन झाल्यानंतर त्यांच्या गुरुभगिनी संध्या भाटे यांनी भक्ती, शिस्त आणि नम्रतेने या धर्मकार्याची धुरा स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पवित्र कार्य भारतात आणि परदेशात अधिक प्रमाणात पुढे जात आहे. यंदाचा पुण्यातील दत्तयाग या पवित्र परंपरेचा आणि सामूहिक आध्यात्मिक ध्येयाचा प्रभावी पुढचा टप्पा ठरला.

भिंद्रनवालेच्या काळात जवळपास 30 हजार हिंदूंच्या हत्या झाल्या:ठाऊक आहे काय ? रतन शारदा महाजनांना म्हणाले ,आपण महाराष्ट्रात परत जा..

गिरीश महाजन यांच्या या कार्यक्रमातील सहभागावर आणि त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रतन शारदा यांनी महाजनांना पंजाबचा इतिहास आणि खलिस्तानी दहशतवादाची खरोखरच जाण आहे का, असा संतप्त सवाल केला आहे.रतन शारदा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अत्यंत नम्रपणे मी गिरीश महाजन यांना विचारू इच्छितो की, त्यांना खरोखरच पंजाबचा इतिहास किंवा खलिस्तानी दहशतवाद माहित आहे का? आम्ही तो काळ अनुभवला आहे. भिंद्रनवालेच्या काळात जवळपास 30 हजार हिंदू आणि 50 हजार शिखांच्या हत्या झाल्या, मात्र संघ किंवा भाजप त्यांच्यासमोर कधीही झुकला नाही. कृपया आपण महाराष्ट्रात परत जावे आणि पंजाब भाजप तसेच शीख-हिंदू संबंध खराब करू नयेत.

पंजाबमध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या कारवाईचा ‘काळा दिवस’ असा उल्लेख केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाजनांची ही भूमिका निव्वळ वैयक्तिक असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट करत, कदाचित त्यांना या विषयाची पूर्ण माहिती नसल्याने त्यांच्याकडून असे विधान झाले असावे, असे केंद्रीय वर्तुळातून सांगण्यात आले आहे. तसेच, या कार्यक्रमाशी किंवा महाजनांच्या वक्तव्याशी भाजपच्या रणनीतीचा कोणताही संबंध नसून, अशा प्रकारची कोणतीही रणनीती पक्षाला मान्य नसल्याचेही वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले होते गिरीश महाजन

दरम्यान, जून 1984 मधील शीख इतिहासाच्या संघर्षमय परवंट शहीद झालेल्या सर्व शीख वीर-विरांगनांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित 42 व्या शहीद समागम कार्यकरमास उपस्थित राहिल्याचे गिरीश महाजन यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाजन यांनी केलेल्या विधानाला सवरण्याचे काम करताना दिसून आले आहेत.

कायदा सुव्यवस्थेसाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलीस दलाच्या सन्मानाचा उपक्रम कौतुकास्पद- राज्यपाल

पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीस मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याचा विचार व्हावा

पुणे, दि. १०: आपले सण उत्सव निर्विघ्नपणे साजरे व्हावेत म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा लेक्सिकॉन समुहाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. विकसित भारताकडे वाटचाल करत असताना राष्ट्र उभारणीस मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन कसे मांडायचे याबाबतही पत्रकारितेमध्ये विचार झाला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

पुणे टाइम्स मिरर आयोजित ‘बिग सॅल्युट – ऑनरिंग हिरोज इन खाकी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल शाळेमध्ये आयोजित या कार्यक्रमास पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, लेक्सिकॉन ग्रुपचे प्रेसिडेंट पंकज शर्मा, व्हॉईस चेअरमन नीरज शर्मा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. वेदप्रकाश शर्मा, पुणे टाइम्स मिररच्या संचालक शीतल बियाणी, लेक्सिकॉन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन सुखदेव शर्मा आदी उपस्थित होते.

पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मानाचा ‘बिग सॅल्यूट’ कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लेक्सिकॉन समूहाचे अभिनंदन करून राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, पोलीस दल सतत कार्यरत दिसत असूनही पोलीस दलाच्या कामाची फारच क्वचित प्रशंसा होते. शहरांची लोकसंख्या लक्षात घेता भारतीय पोलिसांवर खूप ताण असतो. त्यामुळे पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा कौतुकास्पद उपक्रम पुढे सुरूच रहावा.

ते पुढे म्हणाले, तरुण युवा युवतींना पोलिसांचे काम समजले पाहिजे. यासाठी विशेषतः शैक्षणिक संस्थेत असे कार्यक्रम होणे महत्वाचे आहे. राष्ट्र चालवणे ही सामुहिक जबाबदारी असून समाज आणि सरकार बरोबरीने काम करतात, तेव्हा यश मिळते, असेही ते म्हणाले.

पुणे मिररच्या मुंबई आवृत्तीच्या आरंभाबद्दल अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात बदल घडत आहेत. विज्ञान, कला, नागरी समाज, न्यायशास्त्र, पत्रकारिता, छायाचित्रण या सर्व क्षेत्रांत वेगाने बदल होत आहेत. जुन्या पिढीला बातम्या, दृष्टिकोन, मते आणि अफवा यामध्ये फरक करणे कठीण होत चालले आहे. प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. हा स्तंभ मजबूत असली पाहिजे. चांगल्या पत्रकारितेची परिभाषा प्रामाणिकपणातून प्रतिबिंबीत होते आणि प्रामाणिकपणासाठी भीतीपासून मुक्ती आवश्यक असते, असेही राज्यपाल म्हणाले.

आज तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असून छापील वृत्तपत्रांपासून आज समाजमाध्यमे ऑनलाइन न्यूज पोर्टल्सकडे आलो आहोत. पत्रकारिता असो, तंत्रज्ञान असो किंवा विकास असो, चांगले आणि वाईट याचा निर्णय त्यामागील नैतिकतेवर अवलंबून असतो. पत्रकारितेचे मोजमापही त्याच निकषावर केले पाहिजे. माध्यमांनी दुर्बल घटकांचे प्रश्नही मांडले पाहिजेत, असे विचारही त्यांनी व्यक्त केले.

शैक्षणिक संस्थांमध्ये संगीतासारख्या कलागुणांनाही वाव देणे आणि पाठ्यपुस्तकाबाहेरच्या जगातील अनुभवातून शिकता येणाऱ्या गोष्टी आत्मसात करणे महत्त्वाचे असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

पंकज शर्मा म्हणाले, आपण आपल्या बरोबरच्या लोकांना प्रोत्साहन देत पुढे नेण्याने खूप मोठे काम होते. आज सत्कार होत असलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी असेच आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास या सहकाऱ्यांकडून अधिक चांगली कामगिरी होईल. पुणे शहराची मोठी लोकसंख्या पाहता पुणे पोलिसांकडून खूप आव्हानात्मक काम यशस्वीरित्या होत आहे, असेही ते म्हणाले.

नीरज शर्मा यांनीही आपल्या भाषणात पोलीसांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी पुणे टाइम्स मिररच्या मुंबई आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला बिग सॅल्युट कार्यक्रमात सन्मानित केले जाणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, लेक्सिकॉन समुहाचे पदाधिकारी, लेक्सिकॉन इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार

• एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी

क्लीव्हलँड, ओहायो | 10 : ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया (अध्यक्ष, कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन), डॉ. फाल्कोने (अध्यक्ष, इमर्जिंग मार्केट्स) आणि आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष तसेच क्लीव्हलँड क्लिनिकचे संचालक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मी मित्तल यांनी केले. आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन याही क्लीव्हलँड येथे उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. मिहाल्जेविक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्लीव्हलँड क्लिनिक नेतृत्वाचे तसेच विशेषतः डॉ. समीर कपाडिया आणि लक्ष्मी मित्तल यांचे या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले.”

भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून संकल्पित करण्यात आलेली नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर विकसित केली जाणार आहे.

प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल. या प्रकल्पातून सुमारे 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि 10,000 हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

एनएमआयएमसीची संकल्पना केवळ आरोग्य सेवा पुरविण्यापुरती मर्यादित नाही. या परिसंस्थेमध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सेवा नवोन्मेष, वेलनेस पायाभूत सुविधा आणि संबंधित आरोग्य सेवा एकाच सहयोगी कॅम्पसमध्ये विकसित करण्यात येणार आहेत.

मेडिसिटीभोवती विकसित होणाऱ्या व्यापक नवोन्मेष परिसंस्थेचा भाग म्हणून, लक्ष्मी एन. मित्तल यांनी स्थापन केलेल्या एलएनएमआयआयटी, जयपूरने क्लीव्हलँड क्लिनिक आणि एनएमआयएमसीसोबत संशोधन पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान क्षमता आणि शैक्षणिक कौशल्य उपलब्ध करून अत्याधुनिक आरोग्य सेवा नवोन्मेष, ट्रान्सलेशनल रिसर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रिसिजन मेडिसिन उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. टॉम मिहाल्जेविक म्हणाले, “क्लीव्हलँड क्लिनिक जगभरातील धोरणात्मक भागीदारीद्वारे रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहे. एनएमआयएमसी हा भविष्यातील रुग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि संशोधकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या दूरदर्शी आरोग्य परिसंस्थेत आमचे कौशल्य योगदान देण्याची संधी आहे. महाराष्ट्र शासन, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भारतात क्लिनिकल उत्कृष्टता, नवोन्मेष आणि शिक्षणासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उभारण्यासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.”

ब्रुकफिल्डचे व्यवस्थापकीय भागीदार आणि आशिया पॅसिफिक विभागाचे रिअल इस्टेट प्रमुख अंकुर गुप्ता म्हणाले, “नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक परिणाम घडवून आणणारी पायाभूत सुविधा उभारण्याची एक अद्वितीय संधी आहे. महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भविष्यातील अनेक पिढ्यांना लाभदायी ठरणारे जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा केंद्र उभारण्याचा आम्हाला अभिमान आहे.”

आरोधन हेल्थ सिटीच्या संस्थापक आणि संचालक डॉ. सलोनी पटवर्धन म्हणाल्या, “जगातील सर्वोत्तम संस्थांना एकत्र आणून एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आजचा हा टप्पा आम्हाला त्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन गेला असून नवी मुंबईमध्ये जागतिक आरोग्य सेवा केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे.”

महाराष्ट्र शासन या भागीदारीसाठी आवश्यक सहकार्य करेल तसेच लागू असलेल्या धोरणे आणि नियमांनुसार आवश्यक मंजुरी आणि परवानग्या मिळविण्यासाठी या समूहाला मदत करेल.

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विषयी
नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी हा महाराष्ट्र शासन विकसित करत असलेला एक परिवर्तनकारी आरोग्य आणि जीवन विज्ञान उपक्रम आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक म्हणून विकसित होणारा हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत उभारला जाणार आहे. जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा प्रदाते, संशोधक, शिक्षक, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणून क्लिनिकल उत्कृष्टता, संशोधन, नवोन्मेष आणि वैद्यकीय शिक्षणावर आधारित जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक आरोग्य सेवा केंद्र निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

००००

मातीच्या फलकांपासून पुण्याच्या मंगळवार पेठेपर्यंत : जनगणनेचा इतिहास

आज आपण जनगणनेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर घराघरांत जाऊन माहिती गोळा करणारे कर्मचारी, संगणक, टॅबलेट आणि लोकसंख्येचे प्रचंड आकडे उभे राहतात. परंतु जनगणनेचा इतिहास हा केवळ लोक मोजण्याचा इतिहास नाही; तो मानवी संस्कृती, राज्यकारभार, करव्यवस्था, युद्ध, व्यापार आणि नागरी विकासाचा इतिहास आहे. एखाद्या राजव्यवस्थेला आपल्या राज्यात किती लोक आहेत, किती जमीन लागवडीखाली आहे, किती कर मिळू शकतो आणि युद्धकाळात किती सैनिक उभे राहू शकतात हे जाणून घेण्याची गरज होती. या गरजेतूनच जनगणनेचा जन्म झाला.

इतिहासकारांच्या मते जगातील सर्वात जुन्या जनगणनांचे पुरावे सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीच्या बाबिलोनिया आणि इजिप्तमध्ये आढळतात. त्या काळात लोकसंख्या, जनावरे, शेती उत्पादन आणि मालमत्तेच्या नोंदी मातीच्या फलकांवर कोरल्या जात होत्या. प्राचीन इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुरानंतर जमिनीचे पुनर्वाटप आणि कर आकारणीसाठी या नोंदी वापरल्या जात असत. चीनमध्ये इ.स. २ मध्ये झालेल्या जनगणनेत तब्बल ५ कोटी ७६ लाख लोकांची नोंद झाली होती, जी त्या काळातील जगातील सर्वात मोठी लोकसंख्या नोंद मानली जाते. रोमन साम्राज्यात तर जनगणना ही शासनव्यवस्थेचा अविभाज्य भाग होती. दर पाच वर्षांनी नागरिक, त्यांची मालमत्ता आणि सैनिकी क्षमता यांची नोंद घेतली जात असे. आज वापरला जाणारा “सेन्सस” हा शब्दही रोमन भाषेतील “सेन्सेरे” या शब्दापासूनच आला आहे.

भारतामध्येही जनगणनेची परंपरा फार जुनी आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नागरिकांची, त्यांच्या व्यवसायांची आणि मालमत्तेची नोंद ठेवण्याचे निर्देश आढळतात. मौर्यकालात प्रशासनाकडे अशा प्रकारच्या नोंदी उपलब्ध असत. मोगल काळात अबुल फजलने लिहिलेल्या आइन-ए-अकबरीमध्ये राज्याची लोकसंख्या, शेती, महसूल, उद्योग आणि सामाजिक जीवनाची विस्तृत माहिती दिली आहे. जरी ती आधुनिक अर्थाने जनगणना नसली तरी लोकसंख्याविषयक माहितीचा तो एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो.

महाराष्ट्रात जनगणनेसाठी “खानेसुमारी” हा शब्द प्रचलित होता. पेशवाईच्या काळात महसूल, कर आकारणी आणि प्रशासनासाठी शहरातील घरे, वाडे, दुकाने, देवळे, मठ आणि रहिवाशांची नोंद ठेवली जात असे. या नोंदी आज इतिहास संशोधकांसाठी अमूल्य ठेवा ठरल्या आहेत. पुण्यातील विविध पेठांची खानेसुमारी त्यापैकीच एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
याचे सर्वात रोचक उदाहरण म्हणजे मंगळवार पेठेची इ.स. १८१८ नंतरची खानेसुमारी. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पुण्याचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत ही नोंद तयार करण्यात आली. आज ही कागदपत्रे आपल्याला दोनशे वर्षांपूर्वीच्या पुण्यात प्रत्यक्ष फिरून आल्याचा अनुभव देतात.

या खानेसुमारीनुसार मंगळवार पेठेत एकूण २६१ घरे आणि ७०५ खण होते. आज एखाद्या मध्यम आकाराच्या गृहनिर्माण सोसायटीत जितकी घरे असतात, तितकी संपूर्ण पेठेत नव्हती. त्या घरांपैकी ७४ माडीची, ८३ एकमजली आणि ८५ छपरी घरे होती. म्हणजेच त्या काळातही घरांच्या प्रकारांवरून आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला जात होता. विशेष म्हणजे १७ खुल्या जागांची आणि दोन देवळांची स्वतंत्र नोंद करण्यात आली होती. यावरून प्रशासनाची माहिती संकलित करण्याची पद्धत किती तपशीलवार होती याची कल्पना येते.

या पेठेतील सामाजिक रचनाही तितकीच मनोरंजक होती. ४२ ब्राह्मण, ४६ कुणबी-मराठे, २७ वाणी, १२ तेली, ६ मुसलमान, ४ जैन, ३ कुंभार, ३ गोसावी आणि १ सोनार यांची घरे येथे होती. आज ज्या विविधतेचा अभिमान पुणे बाळगते, तिची मुळे दोनशे वर्षांपूर्वीच्या या नोंदीत स्पष्ट दिसतात.

मंगळवार पेठेतील जीवन केवळ निवासी नव्हते; ते आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्याही महत्त्वाचे होते. येथे चार सरकारी चौक्या कार्यरत होत्या. म्हणजेच त्या काळातही कायदा आणि सुव्यवस्थेसाठी संघटित यंत्रणा अस्तित्वात होती. दोन प्रमुख देवळे होती आणि त्यांना करमाफी देण्यात आली होती. गोसाव्यांचे मठ आणि काही इतर संस्थांनाही करसवलती मिळत होत्या. आजच्या करसवलतींच्या संकल्पनेची ही ऐतिहासिक झलक म्हणता येईल.

या नोंदीत त्या काळातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही उल्लेख आहे. महादेव मायेनकर, सिताराम नाईक चिकटे, बालाजीपंत दामले, भिकाजीपंत सुभेदार, हाणवतराव सितोले यांसारखे सावकार, सरदार आणि मुत्सद्दी या पेठेत राहत होते. त्यामुळे ही खानेसुमारी केवळ लोकसंख्येची नोंद नसून त्या काळच्या पुण्याच्या सामाजिक आणि आर्थिक अभिजनांचा आराखडाच ठरते.

ब्रिटिशांनी १८७२ मध्ये भारतात पहिली व्यापक जनगणना करण्याचा प्रयत्न केला आणि १८८१ मध्ये पहिली अधिकृत, देशव्यापी आणि एकाच वेळी होणारी जनगणना पार पडली. तेव्हा भारताची लोकसंख्या सुमारे २५ कोटी होती. आज भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. परंतु जनगणनेचे महत्त्व मात्र बदललेले नाही. पूर्वी ती कर आणि सैन्यासाठी वापरली जात होती; आज ती विकास, नियोजन, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक न्यायासाठी वापरली जाते.

म्हणूनच जनगणना ही केवळ आकडेवारी नसते. ती इतिहासाची टाइम मशीन असते. जशी मंगळवार पेठेची १८१८ मधील खानेसुमारी आपल्याला पेशवाईनंतरच्या पुण्याचे जिवंत चित्र दाखवते, तशीच आजची जनगणना भविष्यातील इतिहासकारांना आपल्या काळातील भारताचे दर्शन घडविणार आहे. दोनशे वर्षांनंतर कदाचित एखादा संशोधक आजच्या नोंदी वाचत असेल आणि आपल्या समाजाची कथा उलगडत असेल. म्हणूनच जनगणना म्हणजे केवळ लोकांची मोजणी नव्हे, तर काळाची नोंद होय. त्यामुळे सर्व जनतेनी यात सहभाग नोंदवावा. आलेल्या प्रगणकाला आपल्या देशाच्या विकासाच्या पायाभरणीचा दूत समजून त्याला सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. याबाबतीत प्रशासनानेही वेळोवेळी सहकार्याचे आवाहन केले आहे. चला आपण या शतकातल्या सर्वात मोठ्या जनगणनेत सहभाग नोंदवून साक्षीदार होऊ या…!!

  • युवराज पाटील
    जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्री, गर्भलिंग निदान आणि विषारी दारू प्रकरणातील संघटित गुन्हेगारीसंदर्भात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची घेतली भेट

मुंबई.दि.१०:राज्यातील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थांची विक्री, गर्भलिंग निदान आणि पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील संघटित गुन्हेगारी यासह विविध विषयांवर शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्याबाबत तपशील सूचना व मुद्दे मांडले.

या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या व मुंबईतील अमली पदार्थ विक्री, विषारी दारू प्रकरणातील गुन्हेगारी साखळी उघड करण्यासह राज्यातील गर्भलिंग निदान प्रकरणांमध्ये होत असलेल्या तपास व कायदेशीर प्रक्रियेच्या विलंबाकडे लक्ष वेधले. संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना देऊन कारवाईला गती द्यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.

अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या संशयित ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्ती व वाहनांवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे प्रभावी नजर ठेवण्याची गरजही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. तसेच, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील महिलांना तात्काळ न्याय व मानसिक आधार मिळावा यासाठी ‘भरोसा सेल’ आणि कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली होती. या सूचनांची प्रशासनाने दखल घेत परिपत्रक जारी केल्याची माहिती दाते यांच्याकडून देण्यात आली.

सर्व जिल्ह्यांतील दक्षता समित्यांमध्ये सदस्य नियुक्त करण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी पूर्वी केलेल्या सूचनेचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, लवकरच सर्व जिल्ह्यांत सदस्य नियुक्ती करण्याबाबतचे परिपत्रक काढले असल्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी स्पष्ट केले. या निर्णयाबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी दाते यांचे आभार मानले.

डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांची तात्काळ दखल घेत पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या. तसेच, या प्रकरणांवर संबंधित पोलीस महानिरीक्षकांसोबतच्या नियमित बैठकीत हे विषय घेऊन कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.