पुणे: आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी आणि प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात काल, बुधवारी पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली . या बैठकीत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक प्रश्नांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.महत्त्वाच्या प्रकल्पांना गती दिली पाहिजे ,आणि वाहतूक कोंडी सुटेल यासाठी यशस्वी प्रयत्न केले पाहिजे असे आ. शिरोळे यांनी आयुक्तांना सांगितले आहे.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि कामांचा आढावा:
साखर संकुल ते जुना मुंबई-पुणे रस्ता उड्डाणपूल
या उड्डाणपुलाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्याचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होईल.
औंध बॉडीगेट पोलीस चौकी स्थलांतर
औंध परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी बॉडीगेट पोलीस चौकी हटवण्याचे काम येत्या १० ते १५ दिवसांत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकी महाविद्यालय रस्ता रुंदीकरण
शेतकी महाविद्यालय परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. याठिकाणी झालेल्या मोठ्या खड्ड्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, आयुक्तांनी त्यावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्मारक
पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात महाराजांचा भव्य पुतळा बसवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून, हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास येणार आहे.
बी.एम.सी.सी. रस्ता दुरुस्ती
२४x७ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी बी.एम.सी.सी. रस्ता खोदण्यात आला होता, ज्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त केला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
उड्डाणपुलाचे काम, पोलीस चौकीचे स्थलांतर आणि रस्ता रुंदीकरण या तिन्ही महत्त्वाच्या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. आयुक्तांनी सर्व संबंधित विभागांना ही सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

