पीसीसीओई जॉब फेअरमध्ये २,२२३ विद्यार्थ्यांना रोजगार

Date:

१५,००० जागांसाठी २०५ कंपन्यांचा सहभाग, १३,९९१ विद्यार्थ्यांची नोंदणी

पिंपरी, पुणे (दि. २२ एप्रिल २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे आयोजित “पीसीसीओई जॉब फेअर २०२६” मध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टीने मोठा टप्पा गाठत उल्लेखनीय यश साध्य केले. पीसीसीओई, भारत सरकारच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (बोट), महाराष्ट्र असोसिएशन ऑफ टीपीओ (एमएटीपीओ) आणि ऑल इंडिया टीपीओ असोसिएशन (एआयटीपीओ) यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या भव्य रोजगार मेळाव्यात देशभरातील २०५ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. या कंपन्यांनी मिळून १५,००० पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा, ग्रुप डिस्कशन, तांत्रिक मुलाखती व वैयक्तिक मुलाखती घेतल्या. ज्यामध्ये नोकरी, अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिपच्या संधींचा समावेश होता. या उपक्रमासाठी एकूण १३,९९१ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. विविध शाखांतील डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या विस्तृत निवड प्रक्रियेतून २,२२३ उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या अशी माहिती पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या जॉब फेअरमध्ये कमिन्स इंडिया, पियाजिओ व्हेईकल्स, दाना आनंद इंडिया, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, व्हॅरॉक इंजिनिअरिंग, महिंद्रा अँड महिंद्रा, जयहिंद इंडस्ट्रीज, ह्युंदाई, अ‍ॅटलस कॉप्को, शिंडलर इंडिया, टेक्समो इंडस्ट्रीज, फॉरेशिया, ब्रेम्बो इंडिया, प्रीमियम ट्रान्समिशन, सँडविक, ल्यूमॅक्स, फियाट इंडिया, भारत संचार निगम लिमिटेड, ईटन, भारत इलेक्ट्रॉनिक्स, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, एक्साइड इंडस्ट्रीज, टाटा ऑटोकॉम्प, फोर्ब्स मार्शल, जेबीएम ऑटो, युनो मिंडा, महिंद्रा अँड महिंद्रा, धूत ट्रान्समिशन, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, हार्मन इंटरनॅशनल, कॉन्टिनेंटल, जॅबिल सर्किट तसेच लिअर ऑटोमोटिव्ह इंडिया यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा सक्रिय सहभाग होता. यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित उद्योगांमध्ये करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध झाल्या.
जॉब फेअरचे उद्घाटन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे (बोट) संचालक पी. एन. जुमले, उपसंचालक एन. एन. वडोदे, भारत सरकार कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाच्या डेप्युटी डायरेक्टर ऋजुता बनकर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंटचे सचिव नवनाथ सूर्यवंशी, व्हायब्रंट एच. आर. माइंड्सचे संस्थापक दीपक खोत, अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जुमले यांनी सांगितले की, केंद्र सरकार तांत्रिक व अतांत्रिक प्रशिक्षणार्थींसाठी नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम च्या माध्यमातून २०२५-२६ या वर्षात २५० कोटी रुपयांचा केंद्र सरकारचा विद्यावेतन हिस्सा उमेदवारांना देण्यात आला आहे. देशाच्या पश्चिम विभागात ५,५०० आस्थापनांद्वारे १,५१,००० पेक्षा जास्त उमेदवारांना अप्रेंटीसशीपची संधी देण्यात आली. या उमेदवारांनी एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना कौशल्य प्रवीणता प्रमाणपत्र देण्यात येते ते नोकरीचा अनुभव म्हणून समजले जाईल. अप्रेंटिसशिप ॲक्टनुसार सर्व क्षेत्रातील कंपन्यांना नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम योजनेअंतर्गत उमेदवार नियुक्ती करणे बंधनकारक आहे. बीई, बीटेक, बी फार्मसी, आर्किटेक्ट यासह आता बीएससी, बीकॉम, बीबीए आदी शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांना देखील www.nats.education.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून यामध्ये सहभाग घेता येईल. निवड झालेल्या पदवीधर उमेदवारांना किमान १२,३०० रुपये, पदविका धारकांसाठी किमान १०,९०० रुपये विद्यावेतन देण्यात येते. यापैकी ५० टक्के हिस्सा केंद्र सरकारचा असतो.
कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाच्या डेप्युटी डायरेक्टर ऋजुता बनकर यांनी सांगितले की, नवोन्मेषाच्या आघाडीवर असलेल्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवणे, हे यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच, कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात असतानाच, इंटर्नशिपचा अनुभव घेणे महत्त्वाचे ठरते. २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’अंतर्गत, १८ ते २५ वयोगटातील तरुणांना भारतातील आघाडीच्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये इंटर्नशिपची संधी देऊन प्रतिमाह ९,००० रुपयांचे मानधन भारत सरकारद्वारे दिले जाते. इंटर्नशिप कालावधी ६ ते ९ महिन्यांचा असतो. आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर तसेच १० वी, १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. या इंटर्नशिपसाठी www.pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे असे बनकर यांनी सांगितले.
डिप्लोमा बरोबरच कंपन्यांनी डिग्रीच्या विद्यार्थ्यांना देखील संधी द्यायला हवी, असे वडोदे यांनी सांगितले. स्वागत, प्रास्ताविक डॉ. शीतलकुमार रवंदळे, सूत्रसंचालन रोशनी गोडबोले यांनी केले.
पीसीइटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, युवा उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओइ संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी तसेच बोट चे संचालक पी. एन. जुमले, उपसंचालक एन. एन. वडोदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.

या जॉब फेअरच्या यशस्वी आयोजनात पीसीइटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा. संदीप पिल्लेवार, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे, प्रा. दीपक वाघ, प्रा. हीना शर्मा, प्रा. डेन्झेटा लोबो, प्रा. पायल काळे, मंगेश काळभोर यांच्यासह २०० हून अधिक विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घटनास्थळी जखमींची भेट घेत दिला आधार

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा’ तयार करण्याची गरज पालघर दि.२३:...

मिळकतकर देयकांची छपाई बँकेमार्फत; महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार

पुणे: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडील देयके, नोटीस व वॉरंट...