पुणे : हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेने सुमारे ५.८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे. या कामासाठी मे. संरचना स्ट्रक्चरल स्ट्रेंग्थनिंग प्रा. लि. (ठाणे) या कंपनीची सर्वात कमी दराची निविदा स्वीकारण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
या प्रकल्पासाठी मूळ पूर्वगणनपत्रक सुमारे ६.९ कोटी रुपयांचे होते. निविदा प्रक्रियेनंतर संबंधित कंपनीने ४ कोटी ५७ लाख ४२ हजार २२५.९६ रुपयांची निविदा सादर केली असून ती अंदाजपत्रकापेक्षा सुमारे २२ टक्क्यांनी कमी आहे.या कामासाठी चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तीन पात्र तर एक अपात्र ठरली. सर्वात कमी दर देणाऱ्या ‘संरचना’ कंपनीची निविदा प्रचलित बाजारभावाशी सुसंगत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या कामासाठी ‘फ्रेसिनेट प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट कंपनी’ आणि ‘एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर्स’ या कंपन्यांनीही निविदा सादर केल्या होत्या.
दुरुस्तीच्या कामामध्ये उड्डाणपुलावरील विस्तार सांधे, बेअरिंग, भेगा भरणे, इपॉक्सी ग्राउट, कार्बन लॅमिनेट आणि स्कॅफोल्डिंग आदी तांत्रिक कामांचा समावेश आहे. प्रकल्प विभागामार्फत हे काम राबविण्यात येणार असून २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात यासाठी तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हडपसर परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर या उड्डाणपुलाची दुरुस्ती आवश्यक असून मान्यतेनंतार दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण केले जाणार आहे.

