Home Blog Page 23

धायरी सिंहगड रोड परिसरात धुडगूस घाणाऱ्या टोळक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस रस्त्यावर

आम आदमी पक्षाच्या पाठपुराव्याला यश

पुणे:दाट लोकसंख्येच्या सिंहगड रोड ,धायरी गाव परिसरात मध्यरात्री पासुन पहाटे पर्यंत दारु पिऊन धुडगूस घालणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत.
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले होते तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आम आदमी पक्षाच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.मुख्य धायरी गाव रस्त्यावरील आबासाहेब नगर कॉलनी, बेनकर नगर , उंबऱ्या गणपती चौक, धायरी-नऱ्हे रोड आदी परिसरात नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व सशस्त्र पोलीस जवान रात्रीची गस्त घालत आहेत.
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून आबासाहेब नगर, बेनकरवस्ती, सिंहगड रोड परिसरात
सराईत गुन्हेगारांसह तरुणांच्या टोळ्या भर रस्त्यावर मद्यपान करून तसेच अंमली पदार्थांचे सेवन करून रात्रभर जवळजवळ पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत धिंगाणा घालत आहेत.महिलांची छेडछाड करुन आरडाओरडा करत आहेत. त्यामुळे महिला, मुली , प्रवाशांसह स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त तसेच नांदेड सिटी पोलीसांकडे याबाबत तक्रार केली होती.तसेच आम आदमी पक्षाच्या वतीने निवेदने दिली होती.याची दखल घेत नांदेड सिटी पोलीसांनी रात्री पासुन पहाटे पर्यंत या परिसरात दर दीड तासाला गस्त सुरू केली आहे.त्यामुळे या परिसरातील उनाड तरुणांच्या टोळ्या गायब झाल्या आहेत. त्याबद्दल आबासाहेब नगर कॉलनी परिसरातील नागरिकांनी खासदार सुप्रिया सुळे , पोलीस आयुक्त अमितेशकुमार ,नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांना धन्यवाद दिले आहेत.

धायरी गावात इतर सुद्धा ठिकाणी कुठे असा त्रास होत असेल तर नागरिकांनी पोलिसांकडे तसेच आम आदमी पक्षाकडे तक्रार करावी. त्यांची नावे नाव गुप्त ठेवण्यात येतील असे आवाहन आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केले आहे.

यमुना नदी पुनरुज्जीवनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आढावा बैठक

नवी दिल्ली-

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत यमुना नदी  पुनरुज्जीवनाच्या मुद्द्यावर आढावा बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, दिल्लीचे उपराज्यपाल तरनजीत सिंग संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता, प्रवेश साहिब सिंग आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. यमुनेची स्वच्छता करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने हाती घेतलेला एक संकल्प आहे आणि हे उद्दिष्ट लवकरच साध्य करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे असे ते म्हणाले. दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारांसह सर्व संबंधित मंत्रालयांनी यमुनेच्या स्वच्छतेसाठी तुकड्या तुकड्यात काम न करता, संघभावनेने आणि एकात्मिक कृती आराखड्याच्या आधारे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

हरयाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांनी मिळून यमुना नदीत एक प्रमाणित पर्यावरणीय प्रवाह सुनिश्चित केला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली. दिल्लीतील दुग्धालयांमधील कचरा यमुनेत जाण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली महानगरपालिका आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्यात एका सामंजस्य करार केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. या करारांतर्गत हा कचरा नदीत जाण्याऐवजी त्याचे बायोगॅस आणि खतामध्ये रूपांतर केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

स्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) पथ नामकरण सोहळा

महाराष्ट्रातील मल्लांच्या मोठ्या परंपरेत निवृत्ती मारणे यांचे योगदान महत्त्वपूर्णकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ :

कुंजीर तालीम मित्रपरिवार आणि मारणे परिवार यांच्या वतीने आयोजन

पुणे : कुस्ती क्षेत्राने महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा आणि वैभव दिले आहे. मल्लांच्या मोठ्या परंपरेत निवृत्ती नारायण मारणे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी अनेक मल्ल घडवले आणि कुस्ती संस्कृती मजबूत केली. पुण्यानेही कुस्तीची ही परंपरा जपली असून, निवृत्ती मारणे यांचे कार्य आणि आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

कुंजीर तालीम मित्रपरिवार आणि मारणे परिवार यांच्या वतीने स्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) पथ नामकरण सोहळ्याचे आयोजन फर्ग्युसन रस्त्यावरील कुशल वॉल स्ट्रीट शेजारी करण्यात आले होते. फर्ग्युसन रस्त्यावरून आपटे रस्त्याकडे जोडणारा रस्ता येथे असलेल्या या नामफलकाचे उद्घाटन मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर, दीपक मानकर, नाम फलकाची संकल्पना असलेल्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, आयोजक डॉ. रामदास निवृत्ती मारणे आणि शाम निवृत्ती मारणे, कुंजीर तालीम मित्र परिवार यांच्यासह स्थानिक नगरसेवक, राजकीय व कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, निवृत्ती मारणे यांच्यासह ज्यांनी उल्लेखनीय काम करून समाजात योगदान दिले आहे, त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे आणि भविष्यातही असे प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले. कुस्तीचे स्वरूप बदलले असून, आता मातीऐवजी मॅटवर आधुनिक कुस्ती शिकवली जाते. लाल मातीचे वैभव कमी झाले असे वाटत असले तरी पुण्यातील कुस्ती परंपरा आणि लाल मातीचे महत्त्व कायम राहील.                                            

उल्हास पवार म्हणाले, तालमींचे महत्त्व काळाच्या ओघात कमी होत गेले असून, त्यांची जागा आता जिम आणि आधुनिक व्यायामशाळांनी घेतली आहे. मात्र, क्रीडा संस्कृती जपण्याचे काम काही प्रमाणात राजकारणाच्या माध्यमातून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दीपक मानकर म्हणाले, वस्ताद निवृत्ती दादा हे कमालीचे शिस्तप्रिय होते परंतु अतिशय आनंदी वातावरणात व्यायाम आणि कुस्तीचा सराव करून घ्यायचे, कोणत्या ऋतुमध्ये काय आहार घ्यावा याचे मार्गदर्शन करायचे. त्यांच्या शिस्तबद्ध परंतु प्रेमळ वागणुकी मुळे अनेक नामवंत पैलवान घडू शकले.

स्व. गुरुवर्य निवृत्ती नारायण मारणे (वस्ताद) हे मुळशी तालुक्यातील उरवडे- आंबेगाव या छोट्या खेड्यातून व्यायामाच्या ओढीने आणि कुस्तीच्या आवडीमुळे पुण्यात आले. त्यांचे चुलते बापूसाहेब मारणे यांनी त्यांना “वाघाच्या बछड्याने वाघासारखे असावे” असे सांगितले, हा शब्द त्यांच्या मनावर खोल ठसला आणि त्यांनी त्या जिद्दीने व्यायामास सुरुवात केली. बघता बघता त्यांनी अनेक मैदान गाजवली. गावाकडील उरूस, जत्रा येथील कुस्तीच्या फडांमध्ये त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या आणि त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. चांगले पैलवान देखील त्यांना लढत देण्यासाठी पुढे येत नसत. सन १९६१–१९६२ मध्ये नागपूर येथे ते सलग महाराष्ट्र चॅम्पियन राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कुमठेकर रस्त्यावरील कुंजीर तालमीत अनेक मल्ल उदयास आले. त्यांचे नाव छत्रपती शिवाजी नगर येथील एका मार्गाला देण्यात येत असून, ही बाब पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातील सर्व पैलवान आणि कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाची आहे.

समारंभात पाच तालमीना लाल मातीच्या खुराकासाठी मारणे परिवाराकडून, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे,उल्हास पवार, दीपक मानकर, यांच्या हस्ते रुपये २१ हजार चा खुराक देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै. श्रीकृष्ण बराटे यांनी केले. आभार प्रदर्शन पै. संदीप मोहोळ यांनी केले.

श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त  पुस्तक तुला 

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त महिनाभर कार्यक्रम 

पुणे : दानाचे महत्व भारतीय संस्कृतीमध्ये आणि अधिक मासात सर्वाधिक आहे. हा मास सर्वत्र आनंदाने आणि हर्षाने साजरा केला जातो. दानाचे महत्व या महिन्यात अधिक असल्याने  सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुस्तक तुला करण्यात आली. ही पुस्तके व वह्या पुण्यातील विविध शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येणार आहे. 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त मंदिरात महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ही पुस्तक तुला करण्यात आली. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांसह विश्वस्त मंडळाने उपक्रमांचे संयोजन केले आहे. यावेळी विश्वस्त प्रवीण चोरबेले, नारायण काबरा, हेमंत अर्नाळकर हे उपस्थित होते. 

श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री विष्णू भगवान यांच्या उत्सवमूर्तीची तुला करण्यात आली. श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे गरजू विद्यार्थ्यांना सुमारे १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. पुण्यातील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या आणि शालेय साहित्य देण्यात येणार आहेत. सोमवार, दि. १५ जून पर्यंत दररोज सायंकाळी ५ नंतर मंदिरामध्ये उपक्रम होणार  आहेत. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्त आफळे यांचे कीर्तन यांसह श्री सूक्त हवन, सुवर्ण कमल रजत कमल अर्चना, सहस्त्र बेल पत्र अर्चना, तुळशी अर्चना, पुष्प अर्चना, दीप उत्सव असे धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. तरी देवी भक्तांनी मोठया संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘ सुवर्णद्वीप’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; इंडोनेशियातील भारतीय संस्कृतीच्या वारशावर प्रकाश

भारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी – डॉ. गो. बं.  देगलूरकर

पुणे :  भारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी असल्याचे उत्तम उदाहरण इंडोनेशिया या देशावरून दिसून येते.  आम्ही धर्माने मुस्लिम असलो.  तरी संस्कृतीने हिंदू आहोत,” असे इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अभिमानाने सांगितल्याचे ज्येष्ठ पुरातत्व तज्ज्ञ  डॉ. गो. बं.  देगलूरकर यांनी नमूद केले.

प्राचीन इंडोनेशियातील हिंदू-बौद्ध संस्कृती, परंपरा आणि राजसत्तेचा इतिहास उलगडणाऱ्या ‘सुवर्णद्वीप : हिंदू बुद्धीस्ट किंग्डम्स् ऑफ एन्शंट इंडोनेशिया’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे  आयसीएचआरचे माजी अध्यक्ष डॉ. ए. पी. जामखेडकर  यांच्या हस्ते आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं.देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.  पुस्तकाच्या लेखिका संगीता चाफेकर आणि  ऋता उंबरजे, डाॅ. अंबरीष  खरे,  विभा ओक,  प्रकाशक पराग पुरंदरे आदि मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रभावाची अनेक उदाहरणे दिली. इंडोनेशियातील सांस्कृतिक जीवनात रामायण आणि महाभारत आजही जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी महर्षी अगस्तींच्या इंडोनेशियातील कार्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या इंडोनेशियाशी संबंधित आठवणींचाही उल्लेख केला.

डॉ.  जामखेडकर यांनी इंडोनेशियातील मंदिरांबद्दल लोकांच्या मनात आजही असलेली पावित्र्याची भावना अधोरेखित केली. इस्लामधर्मीय बहुसंख्य देश असूनही तेथील हिंदू मंदिरांचे संवर्धन आणि जतन करण्यात आले आहे. दक्षिण-पूर्व आशियातील भारतीय संस्कृतीच्या प्रभावाचा अभ्यास करताना काही पाश्चात्त्य इतिहासकारांनी या प्रदेशाला ‘इंडियनाइज्ड स्टेट्स ऑफ साउथ-ईस्ट एशिया’ असे संबोधल्याचा उल्लेख त्यांनी केला.

संगीता चाफेकर यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीचा प्रसार हा आक्रमणातून नव्हे तर व्यापार, धर्म, तत्त्वज्ञान, कला आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे झाला. भारतीय व्यापारी आणि विद्वानांनी आग्नेय आशियात विचार व परंपरा पोहोचवल्या. स्थानिक संस्कृतींसोबत झालेल्या संवादातून तेथे एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा विकसित झाली. भारतीय संस्कृती ही संवाद साधणारी असून ती कोणावरही लादली जात नाही, असे त्यांनी नमूद केले.

ऋता उंबरजे यांनी जावा आणि बाली बेटांवरील भारतीय संस्कृतीच्या प्रभावाची उदाहरणे दिली. रामायण, महाभारत आणि पुराणकथांतील मूळ भारतीय संकल्पना स्थानिक समाजाने स्वीकारून आपल्या सांस्कृतिक संदर्भात त्यांचे रूपांतर केले. पात्रांची नावे आणि काही तपशील बदलले असले तरी मूळ विचार भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले. जावा येथील मंदिरांमध्ये रामायणाचे भव्य शिल्परूप दर्शन घडते, असेही त्यांनी नमूद केले.

डाॅ. अंबरीष खरे यांनी इंडोनेशियाचा अभ्यास करताना तेथील भाषा, कला, स्थापत्य, शिलालेख, इतिहास आणि भूगोलाचा सखोल अभ्यास केल्याचे सांगितले. इंडोनेशियामध्ये आजही भारतीय संस्कृतीचा प्रभाव अनेक ठिकाणी जाणवतो. देशाचे राष्ट्रीय प्रतीक ‘गरुड’ असून त्यावरूनच राष्ट्रीय विमानसेवा ‘गरुडा’चे नाव ठेवण्यात आले आहे. इस्लाम धर्म स्वीकारलेल्या अनेक कुटुंबांमध्येही हिंदू परंपरेबद्दल आदरभाव असून भगवद्गीतेसारख्या ग्रंथांची ओळख नव्या पिढीला करून दिली जाते, असे त्यांनी सांगितले.

कंबुज पुस्तकाच्या मराठी अनुवादक विभा ओक यांनी भारतीय संस्कृती, कला आणि स्थापत्याचा आशियातील व्यापक वारसा अधोरेखित केला. दोन्ही लेखिकांनी विषयाचा सखोल अभ्यास करून पुस्तक लिहिले असून अनुवाद करताना प्राचीन भाषांतील शब्दांचे अचूक अर्थ आणि उच्चार समजून घेणे आव्हानात्मक होते, असे त्यांनी सांगितले. मराठी वाचक या पुस्तकाच्या अनुवादाची आतुरतेने वाट पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी शहाणे यांनी केले.

“असो चैतको मयना” : ‘कलाली’ चा गोडवा

वयाची पंच्याहत्तरी आणि पंच्याहत्तरच कविता असा ‘असो चैतको मयना ‘ या कविवर्य प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘कलाली’ बोलीतील पहिला कविता संग्रह आहे.

कवी प्राचार्य डॉ. रामदास चवरे हे गेल्या चाळीस वर्षांपासून अध्ययन, अध्यापन, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवाय ललित, काव्य, कथा, कादंबरी, समिक्षा, वैचारिक लेखन, संशोधन, शब्दकोश व संपदा अशी साहित्य निर्मिती त्यांच्याकडून झाली आहे.

विशेष म्हणजे लुप्तप्राय होत चाललेल्या बोली भाषेचा जीवनदायी दस्तावेज अथवा भाषिक वारशाचे जतन करणारा ‘कलाली मराठी’ शब्दकोश त्यांनी निर्माण केला आहे.

भारतामध्ये पूर्वेकडे हिंदी भाषेचा अधिक प्रभाव आहे. दक्षिण भारतात कानडी, तेलुगू, मल्ल्याळम आदी भाषा व त्या त्या राज्याच्या विविध बोली आहेत. तसेच मध्य भारतात विशेषतः मध्य प्रदेशात हिंदी भाषेचा अधिक वापर केला जातो. महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी भाषा बोलली जाते. मात्र वेगवेगळ्या भागात विविध बोलींचाही वापर होत असतो. पूर्व विदर्भात जसे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये मराठी बोलली जात असली तरी ती हिंदी मिश्रीत असते. पूर्व विदर्भाला मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशची सीमा लागून असल्यामुळे बोलताना मराठीत काही हिंदी शब्द
आपसूकच येतात.

भंडारा, गोंदियात जिल्ह्यांमध्ये कलाली बोली बोलणाऱ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांनी अस्तंगत होत चाललेल्या कलाली बोलीच्या कविता संग्रहाच्या माध्यमातून कलाली बोलीला पुन्हा जीवंत केले आहे. बारकाईने अभ्यास किंवा निरीक्षण केले तर कलाली बोली फार अवघड न वाटता सहज समजू शकेल, असे या बोलीतील शब्द आहेत. आपल्या बोलीचा समावेश अभ्यासक्रमात व्हावा, व्यवहारात तिचा वापर वाढावा, समूह गटाचे मेळावे आयोजित करावे किंवा सभा संमेलनाचे आयोजन करून बोलीचे संवर्धन करावे, असे विचारमंथन सुरू असते असे या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी म्हटले असून ते बरोबरही आहे.

कवी डॉ. रामदास चवरे हे कलाली बोलीचे जाणकार अभ्यासक आहेत. कलाली बोलीचे शब्द सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य त्यांच्यातील कवीला भूरळ पाडून गेले. त्यातूनच ‘असो चैतको मयना ‘ हा कलाली बोलीतील पहिला आधुनिक कविता संग्रह उदयास आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या अहिराणी बोलीत कविता रचून ती अजरामर केली. तशी डॉ. चवरे यांनी कलाली बोलीत कवितांची निर्मिती करून ही बोली अजरामर केली.

‘ भारत माता महान ‘ या कवितेतून भारतभूमीची थोरवी गाताना कवी म्हणतात ,
“कोटी कोटी कंठ,
खुशिसे करे नीती गुणगान
दुनियामे हमारी
भारत माता महान
गंगा, यमुना नित्य हमारी
जीवनदायिनी सरिता
काश्मीरचे कन्याकुमारी
जनमनकी एकता
संत, महंत, प्रज्ञावंत भूमिके भूषण
राष्ट्रनिष्ठा रहोय हमारी
आण, बाण अन् शान…”

कलाली भाषेची थोरवी गाताना कवी म्हणतात,
“माय कलाली भाषा आपली
झुळझुळती ममता
मन प्रसन्न होत खुशीसे
ओको थोरवी गाता…”

मराठी पंचांगानुसार चैत्र हा वर्षातला पहिला महिना तर इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना साधारण मार्च आणि एप्रिल महिन्यात येतो. या महिन्यात वसंत ऋतू बहरतो. झाडांना नवीन पालवी फुटते. गुलमोहर आणि बहावा फुलतो. तसेच फळांचा राजा आंबा मोहरण्यास सुरवात होते. त्याचप्रमाणे या महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा येतो. मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते. या महिन्याचे महत्त्व लक्षात घेता कवीने ‘असो चैतका मयना’ असे नाव त्यांच्या कविता संग्रहास दिले असावे आणि त्यातूनच या कवितांची निर्मिती झाली असे म्हणावयास हरकत नाही.
कवी म्हणतात,
“पिपरके शेंडापर
पान इवलोसे डोले
उन्हाराने दिनभर
मार तपनको झेले
गाय हंबरे कोठाने
आखो वासरू दिखेना
दोही आँखोनेको पाणी
ओको बोवनो थांबेना
असो चैतको मयना
नदीनालाभी
कोळले पाखरूखे
नाहाय पाणी
कारी धरणीभी उरे
किती कळक तपन
कसे राबत मजूर
पोटपीठ एक होय
अन् नाहाय पोटभर…”

कवीने ‘एक गाव’ या कवितेत गावाचे वर्णन केले आहे.
सर्व जण एकत्र राहतात, जेवतात. त्यांची सुख दुःखे मात्र सगळ्यांची एकच असतात.
“मिने एक गाव देख्यो
जो हू वहाॅं काम करे
कोई नहाय शिक्यो तरी
समृद्धी वहाॅं राज करे
संगमंगने राहोत
घरे सोबत जेवत
एकके सुखदुख
यहाँ सबको होवोत…”
एक गाव हीच एक संस्कृती असते. सुख, दु:ख, जात, धर्म, ना मस्जिद ना देऊळ, ना कुणी मुखिया. भारतीय संविधानामुळे जातपात, भेदभावाचे समूळच नष्ट झालेले आहे. गावात समजूतदारपणा असते. त्यामुळे तेथे सुख दुःखाच्या काळात सर्व एकत्र येतात, ते वाटून घेतात. यातच मानवी संस्कृतीचे अस्तीत्व दडलेले आहे.

‘तू रावण नोको होऊ’ या कवितेत कवीने माणसातील मनुष्यत्वाला आवाहन केल्याचे दिसून येते.
“किती समजाऊ तोखे
नोको अशी माती खाऊ
तोरे घरे नांदे सीता
तू रावण नको होऊ…”
तुझ्या घरीच सीता नांदते आहे, त्यामुळे तू रावण बनू नको, अशाप्रकारचे शहाणपण माणसाजवळ आल्याशिवाय समाजाचे चित्र बदलणार नाही. म्हणूनच ‘ अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस ‘ असा प्रश्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी उपस्थित केला. तोच प्रश्न कदाचित कवी डॉ. चवरे यांना पडला आहे.

आज दुर्दैवाने शिकली सवरलेली माणसे देखील बुवाबाजी, अंधश्रद्धेत गुंतलेली दिसत आहेत. नाशिकच्या भोंदू बाबा प्रकरणात हेच चित्र दिसून आले. शिक्षित माणसाने, समाजाने चांगले काही स्वीकारले पाहिजे, असे कवीला वाटते. ते म्हणतात
“शिके सवरे माणसा
तोरी अजब दुनिया
बुवाबाजी चले यहाँ
बुद्धी तोरी गयी कहाॅं…”
भोंदू बाबा आणि त्याच्या कारनाम्याला बळी पडणारे पुरुष आणि महिला उघडे डोळे ठेवून पाहत नसतील तर समाज कुठे चालला आहे, यावर विचारमंथन करण्याची गरज आहे. कवीला देखील हेच अपेक्षित असावे.

कवी डॉ. रामदास चवरे यांनी या कवितासंग्रहामध्ये निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, आर्थिक, कला, साहित्य असे जवळपास सर्वच विषय हाताळले आहेत. जीवनाची अनेक रूपे आहेत. ‘जिंदगी के रूप’ या कवितेत कवीने
“जपे गुलाब खुशीसे
काटा संगणे पराग
उसे मरेखे सारखे
तोरे राग अनुराग
जसी तपन बारीस
दोही नीत आत जात
काल सुख की बरात
आज दुख की खैरात…”

‘जिंदगी के रूप’ ही कविता एक उत्कृष्ट गीत आहे. गझल गंधर्व श्री. सुधाकर कदम यांनी ते संगीतबद्ध केले तर ते सुप्रसिद्ध गायिका प्राजक्ता सावरकर यांनी सुरेल आवाजात गायिले आहे. गीताला जाणकार रसिकांनी भरभरून दाद दिली.

शेतकरी हा साधासुधा माणूस आहे. तो शेतात राबराब राबतो,स्वतः अर्धपोटी राहतो पण सगळ्यांना खायला अन्न पुरवतो. म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. कवीने या शेतकऱ्याची तसेच बिबा आणि कडू कारल्याची महती देखील ‘ सादो सुदो माणूस ‘ या कवितेतून विषद केली.
“नाव बिबाके ठेवत
बिबा बळो गुणकारी
होय अंग की जखम
बिबा भरणेसे बरी
कळू कहोत करेला
ओके गुण अनगीन
नायनाट करे सब
रोग आंग के दारुण
सधोसुदो खेतकरी
किती सोशिक रहयो
सोता अर्ध पोट
तरी सब दुनिया पोसत…”

मातीचे महत्त्व सांगताना,
‘ सब सिमीट को बन’ या कवितेत कवी म्हणतो,
“सुख येको होय
माणूस उभारणे उळे
दुःख एक होय
हू मातीको नाता तोळे
माती मायकोच रुप
अनपानी उपजाये
माय उपासी तापासी
कभी मातीपर सोये
सिमीटके जंगलने
मातीसाठी झुरे मन
जिते देखो उते हय
सब सिमीट के बन…

माणसाने मातीशी नाते तोडले. मात्र माती हे मायचे रुप आहे, त्याच मातीतून अन्नधान्य तयार होते. माय उपासीतापासी असली तरी ती मातीवर झोपते. सिमिटाच्या जंगलांमुळे मातीसाठी मन झुरते. जिकडे पाहावे तिकडे सिमेंटचेच जंगल झाले, अशा भावना कवीने या कवितेतून व्यक्त केल्या आहेत.

दुसऱ्या एका कवितेत आईची महती कविने विषद केली.
‘ माय फक्त माय हय’ या कवितेत कविने मायची लीला अधोरेखित केली आहे. साने गुरुजींनी देखील आईची महती गायली आहे. मायसारखं व्यक्तीमत्व या जगात कुणीच नाही, असे म्हणत कवी डॉ. चवरे यांनी आईप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
“माय रोज पहेटखे
करी एकटी झाळलोट
हम सब सोये सोये
देखो ओकी पायपीट
माय बळे हरिखसे
सळासारवन करे
ओके चेहराबी खुसी
आमोरा दुख सारे
सबखे दे चहापाणी
सोता कभेच पिकेना
हम सब जेये बिना
घास अनको लेयेना…

या कविता संग्रहास मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावतीचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी आपल्या भाषा, साहित्यविषयक अनुभवातून प्रस्तावना लिहून मांडणी केली, ती वाखाणण्यासारखी आहे. संयम, संवेदनशीलता, अरूपाक्षरत्व हे या कविता संग्रहाचे स्पृहणीय विशेष ठरावेत.

कलाली भाषेचा मराठी शब्दकोष तयार करताना ‘असो चैतका मयना’ या कविता संग्रहाची कवी डॉ. रामदास चवरे यांच्या मनात निर्मिती होत होती, असे त्यांनी त्यांच्या मनोगतात नमूद केले आहे. एवढेच नाही; तर कलाली बोली बोलणाऱ्या कलाल समाजातील लोकांच्या व्यथा, दुःख, दैन्य, त्यांची परिस्थिती कवीने मांडली. कलाली बोलीतील हा एक कायमचा दस्तावेज तयार झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

प्रकाशन व्यवसायात मुरत चाललेल्या आणि धाडसाने पावले टाकणाऱ्या शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यातून संचालक पदावरून निवृत्त झालेल्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ या प्रकाशन संस्थेचे प्रमुख व संपादक देवेंद्र भुजबळ यांनी या कविता संग्रहाच्या प्रकाशनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पेलत तो प्रकाशनाच्या माध्यमातून वाचक, रसिकांच्या स्वाधीन केला आहे.

बोलीची उत्सुकता आणि त्यातील शब्दांची गोडी वाचताना हा कविता संग्रह प्रत्येकाला निश्चितच आनंद देऊन जाईल, याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही. कलाली बोलीतील अशाप्रकारचा ‘असो चैतका मयना ‘ हा पहिलाच कविता संग्रह असल्यामुळे त्याला वाचक रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.
या पुस्तकाची किंमत २५० रुपयेच इतकी वाजवी असल्याने तो सहज विकत घेऊन वाचता येईल आणि मनी आनंदही मिळवता येईल, असे वाटते.

  • शेषराव वानखेडे
    ज्येष्ठ पत्रकार.
    9869484800.

हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’!

७ ते ९ ऑगस्टदरम्यान सॅनहोजेमध्ये तिसरा नाफा मराठी चित्रपट महोत्सव
अमेरिकेतील भारतीयांसाठी मनोरंजन, संस्कृती आणि ग्लॅमरचा भव्य उत्सव

सॅनहोजे (कॅलिफोर्निया) प्रतिनिधी : अमेरिकेतील भारतीयांच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेतील सर्वात प्रतिष्ठित आणि बहुचर्चित ठरलेल्या ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवा’च्या तिसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यंदाचा महोत्सव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक भव्य, अधिक ग्लॅमरस आणि अधिक दिमाखदार स्वरूपात साजरा होणार आहे. ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सॅनहोजे थिएटरमध्ये रंगणारा हा सोहळा केवळ मराठी चित्रपटांचा उत्सव राहणार नसून, अमेरिकेतील संपूर्ण भारतीय समुदायाला एकत्र आणणारा सांस्कृतिक महाकुंभ ठरणार असल्याची माहिती नाफाचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अभिजित घोलप यांनी दिली.

मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा, वैभव आणि सांस्कृतिक समृद्धी उत्तर अमेरिकेतील नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयातून स्थापन झालेल्या ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ (नाफा)ने अवघ्या काही वर्षांत अमेरिकेतील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. २०२६ मधील हा महोत्सव हॉलिवूडच्या रेड कार्पेट परंपरेची झलक, चित्रपटांचे भव्य प्रीमियर, कलाकारांशी थेट संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाच्या विविध रंगांनी सजलेला असेल.

अमेरिका आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीयांसाठी ‘नाफा’ हे आता केवळ एक व्यासपीठ नसून भारतीय चित्रपट, कला आणि संस्कृती यांना जोडणारा सशक्त सांस्कृतिक पूल बनला आहे. विशेषतः मराठी चित्रपटांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘नाफा’ने केलेल्या प्रयत्नांमुळे उत्तर अमेरिकेतील प्रेक्षकांना महाराष्ट्रातील चित्रपट त्याच दिवशी चित्रपटगृहात पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘संगीत मानापमान’, ‘चिकीचीकी बुबुम्बुम’, ‘पाणी’, ‘गुलाबी’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘अशी ही जमवा जमावी’, ‘स्थळ’ आणि ‘सलतात रेशीम गाठी’ यांसारख्या चित्रपटांना अमेरिकेत आणि कॅनडामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीचा वाढता सहभाग हा नाफाच्या यशाचा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

अभिजित घोलप म्हणाले, “अमेरिकेत भारतीय आणि विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीसाठी स्वतंत्र आणि सक्षम व्यासपीठ निर्माण करण्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते. आज नाफाशी एक हजारहून अधिक सदस्य जोडले गेले आहेत. कलाकार, दिग्दर्शक, लेखक, गायक, तंत्रज्ञ, सिनेमॅटोग्राफर्स आणि विविध क्षेत्रातील सर्जनशील व्यक्तींचा सहभाग वाढत आहे. नाफाच्या फिल्म क्लबद्वारे अनेक लघुपट आणि कलाकृतींची निर्मिती होत असून, उत्तर अमेरिकेत भारतीय चित्रपटसृष्टीचा नवा अध्याय लिहिला जात आहे.”

नाफाच्या या प्रवासात प्रख्यात दिग्दर्शक, अभिनेते आणि कलावंतांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळेच अल्पावधीत नाफाने एक प्रभावी सांस्कृतिक चळवळ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. निर्मितीसोबतच रेडिओसह ओटीटी क्षेत्रातही नाफाचा विस्तार झाला आहे. ‘नाफा २०२६’ च्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या नेतृत्वाखाली एक अनुभवी आणि समर्पित संचालक मंडळ कार्यरत असून, सह-समन्वयक म्हणून टेक्सासच्या अर्चना सराफ आणि कॅलिफोर्नियाच्या रिया ठोसर यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कोषाध्यक्ष म्हणून विनायक फडणवीस (कॅलिफोर्निया) आर्थिक नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. विविध नियोजन समित्यांमध्ये मास्टरक्लासेस विभागासाठी गौरी कुलकर्णी (इंडियानापोलिस), चित्रपट स्पर्धा विभागासाठी भालचंद्र कुलकर्णी (टेक्सास), रेड कार्पेट समन्वयासाठी पूजा कारखानीस (कॅलिफोर्निया), आयटी इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी योगी पाटील (रिचमंड) यांच्याकडे असून, प्रसिद्धी जनसंपर्क नियोजन मानसी देवळेकर(कॅलिफोर्निया), अतिथी संपर्क विभागात लक्ष्मण आपटे यांचेही विशेष योगदान लाभत आहे. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदाचा नाफा फिल्म फेस्टिव्हल अधिक भव्य, व्यावसायिक आणि संस्मरणीय ठरणार आहे.

महोत्सवाची शान अधिकच वाढवण्यासाठी यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलावंत अमेरिकेच्या भूमीवर येणार आहेत. जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, महेश मांजरेकर, महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, नागराज मंजुळे, गुरु ठाकूर, श्रुती मराठे आणि गिरिजा ओक यांची विशेष उपस्थिती महोत्सवाला चार चाँद लावणार आहे. गेल्या वर्षी डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, संध्या गोखले, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, अवधूत गुप्ते, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांनी रसिकांची मने जिंकली होती, तर त्याआधी दिलीप प्रभावळकर, सचिन-सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, सुबोध भावे, जब्बार पटेल, उमेश कुलकर्णी, प्रसाद ओक आणि मृणाल कुलकर्णी यांनी महोत्सवाची शान वाढवली होती. यावर्षीची नावे पाहता हे सातत्य आणखी उंचावलेले दिसते!

हॉलिवूडच्या झगमगाटासोबत भारतीय संस्कृतीचा अभिमान, मराठी चित्रपटसृष्टीची ताकद आणि भारतीय कलावंतांची सर्जनशीलता यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी देणारा ‘नाफा २०२६’ हा उत्तर अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी वर्षातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि मनोरंजन सोहळा ठरणार असल्याची उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे.

हरित क्रांतीचा नवा अध्याय; पाच लाख वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाला बळ

पाच लाख वृक्ष लागवडीचा टप्पा केला पार; सुयश चॅरिटेबल ट्रस्टची मोठी कामगिरी

पुणे : सुयश चॅरिटेबल ट्रस्टने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत पाच लाख वृक्ष लागवडीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. पुणे, नंदुरबार, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांसह राजस्थान आणि आसाम या राज्यांमध्ये विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून संस्थेने हरित पर्यावरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमामध्ये स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी तसेच आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना स्वच्छ, निरोगी व समृद्ध पर्यावरण मिळावे या उद्देशाने ही वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली.

वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवडीचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. याची जाणीव ठेवून सुयश चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे कार्य करत आहे. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संरक्षण यावरही संस्था विशेष भर देत आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास आणि स्मिता घैसास कार्याध्यक्ष शलाका घैसास यांनी या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “वृक्ष लागवड ही केवळ मोहीम नसून पर्यावरण रक्षणासाठीची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी होईल.”

“सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रासह राजस्थान आणि आसाममध्ये हरित संदेश पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या ५० वर्षांपासून ट्रस्ट सातत्याने कार्यरत असून, आज पाच लाखांहून अधिक वृक्ष लागवडीचा टप्पा गाठणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आगामी काळातही वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प आहे.”

– शलाका घैसास
कार्याध्यक्ष, सुयश चॅरिटेबल ट्रस्ट

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावर पुन्हा सदस्यांचा विश्वास

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पॅनेलमधील सर्व उमेदवार विजयी झाल्याने चित्रपट क्षेत्रातील सदस्यांनी समर्थ पॅनेलच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.महामंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ३ जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या १४ जागांवर समर्थ पॅनेलने सर्व जागा जिंकत दणदणीत विजयाची नोंद केली.निवडणूक अधिकारी रागिणी खडके यांनी निवडणूक अधिकारी म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली .भाजपनेते राजेश पांडे यांनी या पॅनेलला पाठींबा दिला होता त्यांनी म्हटले आहे कि,’ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलचे निर्माता विभागाचे उमेदवार श्री. सुनील महाजन यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल, त्यांच्यासह श्री मेघराज राजे भोसलेजी आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! निवडणुकीपूर्वी त्यांना दिलेला पाठिंबा हा त्यांच्या कार्यक्षमतेवरील आणि चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी असलेल्या त्यांच्या बांधिलकीवरील विश्वासातूनच होता. आज मिळालेला हा विजय त्या विश्वासाचीच पावती आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि या क्षेत्राशी निगडित प्रत्येक घटकाच्या हितासाठी ते प्रभावीपणे काम करतील, याबाबत पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या समर्थ पॅनेलमध्ये सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काझी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे या सर्व उमेदवारांचा समावेश होता. या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत समर्थ पॅनेलचा संपूर्ण पॅनेल निवडून आणला.केवळ अभिनेत्री वर्षा उसगावकर याच फक्त चित्रकर्मी पॅनेल च्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालिका म्हणून काम पाहतील . त्यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले . अपक्ष उमेदवारांना देखील मतदारांनी नाकारले.

या निकालामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात पुढील पाच वर्षांसाठी समर्थ पॅनेलच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीकडे सूत्रे जाणार असून, महामंडळाच्या विकासासाठी आणि चित्रपट क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मेघराज राजेभोसले म्हणाले, “निवडणुकीच्या काळात विरोधी पॅनेलकडून आमच्यावर अनेक बेछूट आरोप करण्यात आले. मात्र आजच्या निकालातून महामंडळाच्या सभासदांनी ते सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले असून, गेल्या दहा वर्षांत आम्ही केलेल्या कामावर विश्वास व्यक्त केला आहे. हा विजय आमच्या कार्याची पावती आहे. सभासदांनी दाखविलेल्या या विश्वासामुळे त्यांच्यासाठी अधिक समर्पितपणे आणि जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. महामंडळाच्या सर्व सभासदांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. पुढील काळातही सर्व घटकांना सोबत घेऊन महामंडळाच्या विकासासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”

विजयानंतर समर्थ पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत सदस्यांचे आभार मानले. महामंडळाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक, विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक कामकाज करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुण्यात येत्या 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

पुणे: मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि खडकवासला धरण साखळीतील झपाट्याने घटणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. शहरात येत्या सोमवारपासून ( १५ जून) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. नव्या वेळापत्रकाबाबतचे सविस्तर परिपत्रक पुढील दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

पुढील तीन महिने पिण्याच्या पाण्याची गरज, आषाढी वारीसाठी लागणारे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक आवर्तने यांचा विचार करता उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याचे या वेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सर्वपक्षीय नेत्यांपुढे नमूद केले.
उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदू कदम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर; तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप या बैठकीस उपस्थित होते.‘ज्या भागांमध्ये आधीपासूनच कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, त्या भागांवर अतिरिक्त कपात लादली जाणार नाही,’ असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये हडपसर, काळेपडळ, कोल्हेवाडी, नांदोशी, महंमदवाडी, शिवाजीनगर परिसरातील काही भाग, भाग्योदयनगर, कोंढवा आणि धायरी या परिसरांचा समावेश आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने चिंता वाढली आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, वाढती लोकसंख्या आणि वाढलेली मागणी लक्षात घेता पुढील तीन महिने उपलब्ध जलसाठ्यावर तग धरण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.
पाणी बचतीसाठी निर्बंध
-शहरातील सर्व वाहन धुलाई केंद्रे (वॉशिंग सेंटर) बंद करण्यात येणार.
-वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी.
-बांधकाम प्रकल्पांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णतः बंद.
-बांधकामे आणि उद्यानांसाठी शुद्ध केलेले सांडपाणी (एसटीपी वॉटर) वापरणे बंधनकारक.
-व्यावसायिक, तसेच खासगी जलतरण तलावांवर निर्बंध.
-शहरातील विहिरी आणि कूपनलिकांचे सर्वेक्षण करून, पर्यायी जलस्रोतांचा वापर वाढविण्याचा निर्णय.

धरणांमधील पाणीसाठा

खडकवासला -४२. ३३%
पानशेत -२१. ३६
वरसगाव –१४. ८२

टेमघर –०. ०
एकूण -१७. १९
%

उपलब्ध पाणीसाठ्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पुणेकरांनी पाण्याचा जपून वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे. पाणी कपातीबाबतचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला दोन दिवस देण्यात आले आहेत. परिस्थितीनुसार येत्या सोमवारपासून पाणीकपात करण्यात येईल. – मंजूषा नागपुरे, महापौर

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजनच्या उपाध्यक्षपदी वीरेंद्र चित्राव यांची निवड

पुणे : फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजनच्या पुण्यात ७ जून रोजी पार पडलेल्या मिटींगमध्ये आशय फिल्म क्लबचे सचिव तसेच अनेक महोत्सवांचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याच मिटींगमध्ये कार्यकारीणीचे १२ सदस्य व ७ स्वीकृत सदस्यांची देखील निवड २०२६-२८ या कालावधीसाठी करण्यात आली.

वीरेंद्र चित्राव हे गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, कला व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून आशय फिल्म व सांस्कृतिक क्लबचे सचिव आहेत. पुलोत्सव, आशियाई चित्रपट महोत्सव, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मुंम्बा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, शि. द.100 महोत्सव इत्यादी अनेक महोत्सवांचे ते संयोजक असून आजपर्यंत देशभरात सुमारे ४५० महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले आहे. फिल्म सेंसॉर बोर्ड, महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांची कारकिर्द लक्षणीय ठरली आहे. विविध विषयांवर आपले विचार त्यांनी लेखन व भाषणांमधून सातत्याने व्यक्त केले आहेत.

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ वेस्टर्न रीजनच्या कार्यकारीणीवर निवड झालेल्या सदस्यांचा तपशील :

1 किरण व्ही. शांताराम (अध्यक्ष), मुंबई,  2 वीरेंद्र चित्राव (उपाध्यक्ष), पुणे, 3 संदिप मांजरेकर (सचिव), मुंबई,  4 दिलीप बापट (कोषाध्यक्ष), कोल्हापूर,  5 जितेंद्र पाटील (विभागीय सचिव), लातूर,  6  डॉ. सुनिल पुणतांबेकर (सदस्य), डोंबिवली, 7 राजभूषण सहस्त्रबुध्दे (सदस्य), सातारा, 8 हेमंत बेळे (सदस्य), नासिक, 9 डॉ. नवनीत तोष्णीवाल (सदस्य), सोलापूर, 10 विनित जोशी (सदस्य), जळगाव, 11 राजेंद्र तालक (सदस्य), मडगांव-गोवा, 12 ऋता धर्माधिकारी (सदस्य), नागपूर.

स्विकृत सदस्य : 1 शिरीष चिटणीस, सातारा, 2 सतीश जकातदार, पुणे, 3 अमित चव्हाण, मुंबई, 4 सचिन चट्टे, पणजी-गोवा, 5 मयुर कुलकर्णी, कोल्हापूर, 6 सुधीर मुळे, रत्नागिरी.

कार्यालयीन सचिव : प्रणव साळगांवकर, ठाणे

मिटींगचा समारोप करताना आपल्या भाषणात वीरेंद्र चित्राव म्हणाले की, फिल्म सोसायटी चळवळीचा काळ हा आव्हानात्मक आहे. परंतु ओ.टी.टी. प्लॅटफॉर्ममुळे निराश झालेला रसिक आगामी काळात मोठ्या प्रमाणात पुन्हा आपल्या चळवळीकडे येईल यात शंकाच नाही. फिल्म सोसायटी चळवळ जास्तीत जास्त तरूणाभिमुख होईल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्या प्रमाणे कार्यक्रमांची रचना करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात पाच कॉलेज फिल्म क्लब हे आपले ध्येय असून त्यासाठी आपण पुढील दोन वर्षात कार्यरत असले पाहिजे.

उत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

  • ​लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ऑनलाईन बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
  • ​बँकांच्या जाचक अटींविरोधात लेखी तक्रारी करण्याचे आवाहन; बचत गट भवनासाठी २१ लाखांचा निधी जाहीर

​लातूर. दि.०६: “महिला बचत गटांची चळवळ ही केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित नसून, महिलांच्या सामाजिक व कौटुंबिक सक्षमीकरणाचा तो एक मुख्य आधार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात महिला बचत गटांनी आता पारंपरिक चौकटीबाहेर पडून उत्पादन, वितरण आणि बाजारपेठ अशी मजबूत साखळी निर्माण केली पाहिजे. यासाठी महिलांनी आपले कौशल्य ओळखून बचत गटांचे व्यावसायिक वर्गीकरण करावे,” असे प्रतिपादन शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या मा.उपसभापती आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या विशेष ऑनलाईन संवाद बैठकीत त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अधिक मासाचे औचित्य साधून या विशेष सभेचे आयोजन संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आले होते.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. गोऱ्हे यांनी बचत गटांच्या बँक खात्यांसंदर्भात आणि कर्ज वितरणात येणाऱ्या अडचणींवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “अनेक बँकांमध्ये संवेदनशील अधिकारी नसल्यामुळे लाडक्या बहिणींना आणि बचत गटांना नाहक हेलपाटे मारावे लागतात. जर एखादी बँक बचत गटाचे खाते उघडण्यास, महासंघाचे नाव लावण्यास किंवा कर्ज देण्यास नकार देत असेल, तर महिलांनी अजिबात घाबरू नये. बँकांना त्याचे लेखी कारण विचारा आणि त्या निवेदनाची एक प्रत माझ्याकडे पाठवा, मी स्वतः शासनाकडे त्याचा पाठपुरावा करेन.” बँकांमध्ये जनतेचेच कोट्यवधी रुपये जमा असतात, त्यामुळे त्यांनी जनतेशी आणि महिलांशी सन्मानानेच वागले पाहिजे, असा कडक इशाराही त्यांनी दिला. तसेच महिलांनी आर्थिक सुलभतेसाठी बँकांच्या ‘ओव्हरड्राफ्ट’ (Overdraft) सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही त्यांनी सुचवले.



महिलांच्या व्यवसायाला व्यावसायिक गती देण्यासाठी बचत गटांचे चार प्रमुख भागांत वर्गीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामध्ये १) खाद्यपदार्थ तयार करणारे गट, २) कपडे शिवणारे गट, ३) आर्टिफिशियल ज्वेलरी व शोभेच्या वस्तू तयार करणारे गट, आणि ४) शेती व शेतीपूरक व्यवसाय करणारे गट अशा पद्धतीने कामाची विभागणी करावी. अन्नपूर्णा, माणदेशी फाउंडेशन तसेच पुण्याच्या ‘स्वयं सिद्ध’ संस्थेचे यशस्वी उदाहरण देत ३० ते ४० बचत गटांनी एकत्रित येऊन स्वतःचे छोटे मॉल किंवा साखळी दुकाने सुरू करावीत, जेणेकरून उत्पादनांना ॲमेझॉनसारख्या थेट बाजारपेठा मिळतील, असा सल्ला त्यांनी दिला.

औसा आणि उमरगा परिसरातील किल्लारी भूकंपाचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे यांनी एक मोठी संधी महिलांसमोर ठेवली. त्या म्हणाल्या की, “२०१४ मध्ये विशेष प्रयत्न करून आम्ही शासन निर्णय (GR) काढून घेतला होता, ज्याद्वारे वन विभागाच्या मदतीने जुन्या गावठाणांच्या जागा साफ करून तिथे सुंदर उद्याने विकसित केली आहेत. या उद्यानांची देखभाल व रखवालीचे काम महिला बचत गटांना मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी व वन विभागाशी चर्चा सुरू आहे. यासाठी ‘सीएसआर’ (CSR) फंडही मिळवून दिला जाईल.” याच धर्तीवर लातूर जिल्ह्यात ‘महिला बचत गट भवन’ उभारण्यासाठी आपल्या निधीतून २१ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या नावामागे आईचे नाव (एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे) लावून महाराष्ट्रात महिलांचा सर्वोच्च सन्मान केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातूनही महिलांना मोठी मदत केली जात आहे,” असे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना नकारात्मकता सोडून सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. शेवटी अधिक मासाच्या (धोंड्याच्या महिन्याच्या) मराठवाड्यातील पारंपरिक संस्कृतीचा उल्लेख करत त्यांनी सर्व महिलांना पुरणपोळीचा आस्वाद घेत आनंदी व समृद्ध जीवन जगण्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट- ‘जे काही करायचं आहे ते करून घ्या’

मुंबई-टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये कबूल केले होते की, तिने ‘भाभीजी घर पर हैं’ या टीव्ही शोच्या निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले होते.

या वक्तव्यानंतर असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेदरम्यान शिल्पाने एक व्हिडिओ शेअर करून टीकाकारांना उत्तर दिले आहे.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने एक अधिकृत निवेदन जारी करून शिल्पा शिंदेच्या या कबुलीजबाबावर तीव्र निराशा व्यक्त केली आहे. असोसिएशनचे म्हणणे आहे की, अशा पावलांचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

असोसिएशनने म्हटले आहे की, लैंगिक छळाच्या खोट्या आरोपांमुळे कोणत्याही व्यक्तीच्या सन्मानाला, कुटुंबाला, मुलांना, करिअरला आणि मानसिक स्थितीला कधीही भरून न येणारे नुकसान पोहोचते. यामुळे समाजात त्या व्यक्तीची प्रतिमा कायमची खराब होते.
असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. AICWA नुसार, जर हे सिद्ध झाले की, कोणीतरी जाणूनबुजून खोटे आरोप केले आहेत, तर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे.

असोसिएशनने म्हटले की, जेव्हा कोणी जाणूनबुजून असे खोटे खटले दाखल करतो, तेव्हा यामुळे त्या खऱ्या पीडितांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते जे न्यायाच्या अपेक्षेने पुढे येतात. यामुळे बॉलिवूड आणि चित्रपट उद्योगात छळ सहन करणाऱ्या खऱ्या लोकांना आपली बाजू मांडणे कठीण होईल.
जे करायचं आहे ते करून घ्या’

सोशल मीडियावर सतत होत असलेल्या टीकेदरम्यान, शिल्पा शिंदेने इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ पोस्ट करून स्वतःचा बचाव केला आहे. तिने तिच्या फोटो आणि व्हिडिओसह एक रील शेअर केली, ज्यावर लिहिले होते, “एक स्त्री बना, नेहमी हे म्हणायला तयार रहा की जे करायचं आहे ते करून घ्या.” त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की जळणारे जळत राहतील. एका दुसऱ्या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटले की, आयुष्यात सर्व काही स्पष्टपणे बोलण्याच्या नादात अर्धे लोक तसेच साफ झाले आहेत.
2016 मध्ये निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते

शिल्पा शिंदेने 2015 मध्ये ‘भाभीजी घर पर हैं’ या टीव्ही शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारली होती. एक वर्षानंतर, शिल्पाने निर्माते आणि प्रोड्यूसर यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आणि शो सोडला.

शिल्पा शिंदेने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते, “ही गोष्ट कोणालाच माहीत नाही. मी आता सत्य बोलण्यास घाबरत नाही. मी माझ्या प्रोड्यूसरविरोधात लैंगिक छळाचा (Sexual Harassment) गुन्हा दाखल केला होता, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. करार (Contract) वाद मिटवण्यासाठी मी असे केले आणि नंतर सेटलमेंट करून मी त्या परिस्थितीतून बाहेर पडले.”

शिल्पाने पुढे दावा केला की, त्या स्वतः कायद्याच्या पार्श्वभूमीतून येतात आणि पोलिसांचे म्हणणे होते की, जर एफआयआर नोंदवायचा असेल, तर गंभीर आरोप लिहावेच लागतील.

पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा-वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर बिनविरोध झाली आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यानंतर, भाजपमधून ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांनी निष्ठावंतांना डावलून उमेदवारी मिळवली. यादरम्यान, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसार अनपेक्षितपणे आपली उमेदवारी मागे घेतली. या सर्व माघारींमुळे विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. मात्र या राजकीय घडामोडींवरून काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी प्रथम शरद पवार गटावर विश्वासघाताचा आरोप केला त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वसंत मोरे म्हणाले, महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला आहे, तिसऱ्यांदा हा विश्वासघात झाला आहे. अंकुश काकडे यांचा फॉर्म भरण्यासाठी फोन आला होता, शंभर टक्के सेटलमेंट आहे, भाऊंबदकी आहे. त्यांनी बारामतीत भाऊबंदकी करावी. ठाण्यात मदत केली, म्हणून साताऱ्यात शिवसेनेला मदत करणार, शरद पवार गटाचे शहरात तीन नगरसेवक आहेत, त्यांनी विचार करायला पाहिजे. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला आहे, असा आरोप मोरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, महाविकास आघाडी कायम राहील की नाही हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मी वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. शरद पवार गटामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी आतून एक आहेत, ही भाऊबंदकी आहे. याचे सर्व परिणाम महाविकास आघाडीला भोगावे लागतील. घोडेबाजार नाही, सेटलमेंट झाली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर भाऊबंदकी करणार असाल तर महाविकास आघाडीचे वाटोळे होणार आहे, असेही मोरे यांनी म्हटले.
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना झालाच नाही

महाविकास आघाडीमध्ये पुण्याची विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटली होती. यानुसार, पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज, तर तुषार कामठे यांनी डमी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली आणि राजकीय सूत्रे वेगाने फिरली. या नाट्यमय भेटीनंतर लगेचच श्रीकांत पाटील आणि तुषार कामठे या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

दुसरीकडे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मोठी धाकधूक पाहायला मिळाली. प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतरही, अर्ज मागे घेण्याची वेळ संपत आली तरी ते निवडणूक कार्यालयात पोहोचले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रचंड धास्ती वाढली होती. अखेर, मुदत संपायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना प्रदीप कंद हे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत या राजकीय नाट्यावर पडदा टाकला.

पुणे भाजपा प्रचार प्रसिद्धी प्रमुखपदी पुष्कर तुळजापूरकर तर सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून नितीन पंडित व अजय दुधाने यांची नियुक्ती


पुणे :-
भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या प्रचार व प्रसिद्धी प्रमुख पदी श्री पुष्कर तुळजापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्तीचे पत्र शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांनी त्यांना दिले तसेच पुणे शहराच्या सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी नितीन पंडित व डॉक्टर अजय दुधाने यांची नियुक्ती करण्यात आली


श्री पुष्कर तुळजापूरकर यांची सलग तिसऱ्यांदा या पदी निवड करण्यात आलेली आहे पक्षाने जी जबाबदारी सोपवलेली आहे ती उत्तम प्रकारे व पक्षाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता पार पाडणार असल्याचे पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले तसेच हे पद नसून ही जबाबदारी आहे या भावनेतून इथून पुढे काम करणार आहे या पदाचा वापर हा सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे