मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावर पुन्हा सदस्यांचा विश्वास
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पॅनेलमधील सर्व उमेदवार विजयी झाल्याने चित्रपट क्षेत्रातील सदस्यांनी समर्थ पॅनेलच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.महामंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ३ जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या १४ जागांवर समर्थ पॅनेलने सर्व जागा जिंकत दणदणीत विजयाची नोंद केली.निवडणूक अधिकारी रागिणी खडके यांनी निवडणूक अधिकारी म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली .भाजपनेते राजेश पांडे यांनी या पॅनेलला पाठींबा दिला होता त्यांनी म्हटले आहे कि,’ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलचे निर्माता विभागाचे उमेदवार श्री. सुनील महाजन यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल, त्यांच्यासह श्री मेघराज राजे भोसलेजी आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! निवडणुकीपूर्वी त्यांना दिलेला पाठिंबा हा त्यांच्या कार्यक्षमतेवरील आणि चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी असलेल्या त्यांच्या बांधिलकीवरील विश्वासातूनच होता. आज मिळालेला हा विजय त्या विश्वासाचीच पावती आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि या क्षेत्राशी निगडित प्रत्येक घटकाच्या हितासाठी ते प्रभावीपणे काम करतील, याबाबत पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या समर्थ पॅनेलमध्ये सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काझी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे या सर्व उमेदवारांचा समावेश होता. या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत समर्थ पॅनेलचा संपूर्ण पॅनेल निवडून आणला.केवळ अभिनेत्री वर्षा उसगावकर याच फक्त चित्रकर्मी पॅनेल च्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालिका म्हणून काम पाहतील . त्यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले . अपक्ष उमेदवारांना देखील मतदारांनी नाकारले.
या निकालामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात पुढील पाच वर्षांसाठी समर्थ पॅनेलच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीकडे सूत्रे जाणार असून, महामंडळाच्या विकासासाठी आणि चित्रपट क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मेघराज राजेभोसले म्हणाले, “निवडणुकीच्या काळात विरोधी पॅनेलकडून आमच्यावर अनेक बेछूट आरोप करण्यात आले. मात्र आजच्या निकालातून महामंडळाच्या सभासदांनी ते सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले असून, गेल्या दहा वर्षांत आम्ही केलेल्या कामावर विश्वास व्यक्त केला आहे. हा विजय आमच्या कार्याची पावती आहे. सभासदांनी दाखविलेल्या या विश्वासामुळे त्यांच्यासाठी अधिक समर्पितपणे आणि जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. महामंडळाच्या सर्व सभासदांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. पुढील काळातही सर्व घटकांना सोबत घेऊन महामंडळाच्या विकासासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”
विजयानंतर समर्थ पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत सदस्यांचे आभार मानले. महामंडळाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक, विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक कामकाज करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

