Home Blog Page 24

मान्सून महाराष्ट्रात दाखल:कोकण, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पुणे- ज्याची वाट आपण चातकाप्रमाणे पाहत होता, तो मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालाय. गोवा, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. जाणून घ्या 5 दिवसांचा अंदाज
देशभरात नैऋत्य मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू आहे.केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने गोव्यात प्रवेश केला. त्यानंतर त्याने आता तळ कोकणात प्रवेश करून महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासांत मान्सून अजून पुढे आगेकूच करणार आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात शनिवार 6 जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वाटा सुटेल.
7 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात रविवार 7 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा सुटेल

8 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात सोमवार 8 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वाटा सुटेल. तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा,वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

9 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात मंगळवार 9 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वाटा सुटेल.

10 जूनचा अंदाज

महाराष्ट्रात बुधवार 10 जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा सुटेल.

पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फेपुणे ट्रॅफिक परिषद आयोजन संपन्न

पुणे : पुण्यातील गंभीर बनत चाललेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस दल ‘तंत्रज्ञान, तज्ज्ञ सल्लागार आणि नागरिकांचे सहकार्य व सूचना’ या त्रिसूत्रीचा अवलंब करणार आहे. शहरात लवकरच ५०० कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कॅमेरे बसवले जाणार असून, मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली जाईल. केवळ तंत्रज्ञानावर विसंबून न राहता नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांनी शनिवारी केले. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो व बससेवा, पार्किंगची समस्या तसेच रस्ते सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्या वतीने ‘पुणे ट्रॅफिक परिषद’ शनिवारी पत्रकार संघात घेण्यात आली. अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील, शहर वाहतूक उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पीएमपीएमएलच्या जॉईन्ट एमडी एलिस पोरे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, आरटीओ चे अधिकारी साखरे, पुणे मेट्रोचे अधिकारी मिहीर कुलकर्णी, हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल सावंत, वाहतूक अभ्यासक व ‘सकाळ’चे मुख्य वार्ताहर मंगेश कोळपकर, नगरसेवक रफिक शेख, काँग्रेसचे गोपाळ तिवारी, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सौरभ अमराळे आदी उपस्थित होते.

मनोज पाटील म्हणाले, पुण्याची वाहतूक कोंडी ही आता केवळ रस्त्यांची समस्या उरलेली नाही, तर ती नागरिकांच्या आरोग्याशी आणि मानसिक तणावाशी जोडली गेली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक पुणेकराच्या आयुष्यातील सरासरी दोन वर्षे केवळ रस्त्यावर वाया जात आहेत. पुणे शहरात लवकरच ५०० ‘एआय’ कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट आणि स्वयंचलित दंडात्मक कारवाई करतील. वाहतुकीचे स्वयंचलित नियमन करण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) चा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाहतूक शाखेने तयार केला असून, त्याचा सविस्तर अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मुंबईत ज्याप्रमाणे अत्याधुनिक ‘ॲडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे संपूर्ण शहरातील वाहतुकीचे एकात्मिक नियंत्रण केले जाते, तशीच यंत्रणा पुण्यातही कार्यान्वित करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

वाहतूक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ‘ट्रॅफिक व्ह्यूअर ॲप’चा प्रभावी वापर केला जात आहे. ‘टॉमटॉम’ या जागतिक वाहतूक अहवालात पुण्याची नोंद जगातील संथ शहरांमध्ये झाली होती. यावर उपाय म्हणून सध्या अरुंद रस्त्यांवर ‘अल्पकालीन वाहतूक नियोजन’ करून जे.एम. रोड आणि एफ.सी. रोडची वाहतूक सामावून घेण्याची क्षमता यशस्वीपणे वाढवण्यात आली आहे.
१९९५ मध्ये केवळ ८६ चौरस किलोमीटर असलेले पुणे आज ३८२ चौरस किलोमीटरवर पोहोचल्यामुळे प्रशासकीय मर्यादा आल्या आहेत. मात्र, आगामी काळात उभे राहणारे १०० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे आणि पोलिसांची ही हायटेक यंत्रणा यामुळे पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न नक्कीच सुटेल, अशी आशा मनोज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

केवळ तंत्रज्ञानावर विसंबून न राहता नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. रस्त्यांवरील खाजगी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी शहरात प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्किंग’चा प्रयोग राबवला पाहिजे, तसेच पुण्यातील विविध आयटी आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ म्हणून पाळला पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस त्यांनी यावेळी त्यांनी मांडली.

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांशी संवाद वाढविणे, युवकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजचे आहे. पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर शहराच्या विकासाशी निगडित गंभीर प्रश्न बनला आहे. मेट्रो सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक स्थानकावर पुरेशी वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. तसेच जुन्या शहरातील वाहतुकीचा विचार करून लहान बससेवेचा पर्याय, नियोजनबद्ध बसथांबे आणि सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रशासन, वाहतूक पोलीस, आरटीओ, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय होणे अत्यावश्यक आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे म्हणाले, “पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येचा मी सध्या सखोल अभ्यास आणि निरीक्षण करत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना राबविण्यात येतील. अनेक रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ व्यवस्था प्रभावीपणे लागू केल्यास वाहनतळाबाबत शिस्त निर्माण होण्यास मदत होईल. तसेच मुंबईच्या धर्तीवर वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.” हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत म्हणाले, वाहतूक कोंडीचा आरोग्यवर परिणाम होत आहे. हृदयविकाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार होणे आवश्यक असते; मात्र डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकल्याने उपचारांमध्ये विलंब होतो. मोठी दुर्घटना होते. वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये तणाव वाढत असून रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच रस्त्यांवरील वाद आणि भांडणांचे प्रमाणही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोरे म्हणाल्या, ब्राझीलमधील यशस्वी बीआरटी मॉडेलचा उल्लेख करत त्यांनी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. बससेवा वेळेवर चालविणे, चालकांचे प्रशिक्षण, छोट्या रस्त्यांवर लहान बस सुरू करणे तसेच बसच्या डिझाइनमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. बससेवा वाढविण्यासाठी आवश्यक जागा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘बस डे’ सारखा उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

 निकम यांनी पुण्यातील वाढत्या वाहनसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. शहरात सुमारे ३० लाख दुचाकी आणि ९ लाख चारचाकी वाहने असून बहुतांश दुचाकी एकाच व्यक्तीद्वारे वापरली जात असल्याचे त्यांनी सांगितले. वाहन नोंदणी, परवाना आणि वाहतूक नियमांचे पालन यावर भर देत नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षा वाढविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाहतूक अभ्यासक व पत्रकार मंगेश कोळपकर यांनी सादरीकरणाद्वारे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेतील समस्या, सद्यस्थिती आणि उपाययोजना, या बाबत सविस्तर आढावा घेतला. शहरातील वाहतूक समस्यांचे स्वरूप कसे बदलत आहे, याचे विश्लेषण त्यांनी केले.
ते म्हणाले, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नागरिकांची सजगता आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न पुरेसे नाहीत तर, लोकप्रतिनिधींचा दबाव आणि नागरिकांचा पाठपुरावा आवश्यक आहे. शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करून त्याची विशिष्ट कालमर्यादेत अंमलबजावणी व्हायला हवी.
पुण्यातील अरुंद रस्ते, ४४ लाखांहून अधिक वाहनांची संख्या आणि वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावत आहे. तसेच शहरातील वाहतुकीचा सरासरी वेगही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. अतिक्रमणे, सक्षम व सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि सुमारे साडेतीन हजार पीएमपीएमएल बस उपलब्ध असूनही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोपाळ तिवारी यांनी यावेळी शहरातील वाहतूक कोंडी विषयी प्रश्न व सूचना मांडल्या. यशराज पारखी यांनी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवरील अभ्यासपूर्ण अहवाल सादर करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आणि शिफारशी मांडल्या.
सूत्रसंचालन अर्चना शहा यांनी केले. अविनाश बागवे यांनी आभार मानले.

‘चपराक’तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ कवितासंग्रहाचे लोकार्पण

पुणे : जातीधर्मभेद न मानणारा, समतेचा आणि बंधुतेचा पुरस्कार करणारा सुधारकांचा विचार सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कवितेतून मांडला. त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी समाजक्रांतीचा विचार आहे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. ही ‘काव्यफुले’ ‘क्रांतीफुले’ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण ही क्रांतीफुले तुमच्या मनामध्ये विचारांच्या ठिणग्या निर्माण करतील, असेही ते म्हणाले.

चपराक प्रकाशनाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या ‘काव्यफुले’ या कवितासंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. भरत नाट्य मंदिर येथे गुरुवारी (दि. ४) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध लेखक, संशोधक संजय सोनवणी, काकडे शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, कार्यक्रमाचे निमंत्रक घनश्याम पाटील, ज्ञानेश्र्वर तापकीर, चंद्रलेखा बेलसरे, शुभांगी गिरमे मंचावर होते.

सध्या जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवत चालली आहे. दुभंगलेला समाज कधीही उत्कर्षाच्या वाटेने जाऊ शकत नाही. समता आणि बंधुता ही राजघटनेतील मूल्ये कृतीत उतरायला हवीत, अशी अपेक्षा व्यक्त करून प्रा. जोशी म्हणाले, सामाजिक आरोग्याची हानी करणारी जातीव्यवस्था, गुलामगिरी, अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरा यांच्या विषयीची चीड सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. अज्ञान हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अविद्येची काजळी दूर होऊन विद्येचा प्रकाश सर्वदूर पोहोचल्याशिवाय जनसामान्यांचा उद्धार होणार नाही, असा विचार त्यांनी कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. मानव्याची प्रतिष्ठापना हेच सावित्रीबाई यांच्या कवितेचे ब्रीद आहे. जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो, तत्त्वांना ग्लानी येते, नीतीचा विपर्यास होतो आणि माणसांचा पशु होतो तेव्हा समाजाला सावरण्याचे काम कवींनी करायचे असते. हेच काम सावित्रीबाईंनी त्यांच्या कवितेतून केले.

संजय सोनवणी म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक दंभावर हल्ले करणाऱ्या, निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या कविता लोकांपासून दूर राहिल्या याचे उत्तर पुरोगाम्यांच्या विचित्र मानसिकतेत आहे. त्यामुळेच त्यांच्या आद्यतेवरचा अधिकार डावलला गेला. सावित्रीबाई फुले यांचा तत्कालीन स्थितीतील सामाजिक आक्रोश, जगाला ज्ञानवंत बनविण्याची तळमळ ते स्वत:च निर्मिक होण्याच्या प्रक्रियेचा सामाजिक-मानसिक प्रवास या काव्यसंग्रहातून अनुभवता येणार आहे.

प्रास्ताविकात घनश्याम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांनी १७२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘काव्यफुले’ या पुस्तकाचे पुन:प्रकाशन करण्यामागील भूमिका विशद केली. ते म्हणाले, तत्कालीन परिस्थितीवर केलेले भाष्य समाजासमोर यावे आणि सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जनक आहेत हे समाजाला समजावे या हेतूने पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. ॲड. शिवाजीराव काकडे, ज्ञानेश्र्वर तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पुन्हा क्रांतिज्योती’ हा एकपात्री नाट्यप्रयोग डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी सादर केला.

महावितरणच्या ५२ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

वर्धापन दिनाच्या पूवसंध्येला सामाजिक बांधिलकीची जोपासना

मुंबई,: महावितरणचा २१ वा वर्धापन दिन शनिवारी (०६ जून) मोठ्या उत्साहात मात्र साधेपणाने साजरा होत आहे. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यालय ‘प्रकाशगड’ येथे शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिराला सामाजिक बांधिलकी जोपासत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर जे. जे. महानगर रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्त बाटल्यांचे संकलन झाले.

मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार महावितरणचा २१ वा वर्धापन साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता ‘प्रकाशगड’ येथील प्रेक्षागृहात आयोजित वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला विधायक व सामाजिक उपक्रमाची जोड देताना पूर्वसंध्येला मुख्य कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. संचालक श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांनी शिबिरात सहभागी होत रक्तदानासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. 

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून बोपोडी, खडकी आणि औंध भागातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणाची प्रत्यक्ष पाहणी

0

पुणे: आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज
प्रभाग क्रमांक ८ मधील बोपडी, खडकी आणि औंध परिसरातील विविध चौकांमध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या समस्येची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. नागरिकांना आणि वाहनचालकांना रोज सामोरे जावे लागणाऱ्या या त्रासातून लवकरात लवकर सुटका करण्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन उपाययोजनांची चाचपणी केली.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, डीसीपी भाजीभाकरे , खडकी आणि चतुःश्रुंगी वाहतूक पोलीस विभागाची टीम, तसेच पुणे महानगरपालिकेच्या पथ विभाग, बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विरोधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व औंध वॉर्ड ऑफिसची टीम उपस्थित होती.
या प्रमुख ठिकाणांची केली पाहणी:
आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने खालील प्रमुख चौकांचा आणि रस्त्यांचा आढावा घेतला:
या सर्व भागात अतिक्रमणा संदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमदारांनी उपस्थित पालिकेच्या अतिक्रमण विभागाला या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या भागातील सर्व प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम होत असल्याने पुणेकर नागरिकांना आणि वाहनचालकांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांच्यात योग्य समन्वय साधून, पर्यायी वाहतूक आराखडा तयार करून ही समस्या लवकरात लवकर सोडवणार अशी ग्वाही शिरोळे यांनी दिली.

गणेशखिंड रस्त्यावरील ५२९ झाडांची नियोजित वृक्षतोड थांबवून वृक्ष संवर्धन करा; आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

७,००० हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी

पुणे:
गणेशखिंड रस्त्याच्या रिझर्व्ह बँक इन्स्टिट्यूट ते संचेती चौक दरम्यानच्या ४५ मीटर रुंदीकरणासाठी सुमारे ५२९ ऐतिहासिक आणि जुने वृक्ष कापण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रस्तावाला आता तीव्र विरोध सुरू झाला असून, या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या मा.उपसभापती आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट हस्तक्षेप केला आहे. मनपा प्रशासनाने १ मार्च २०२६ रोजी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणासमोर मांडला होता आणि २ एप्रिल रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी तब्बल ७,००० हरकती नोंदवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी पुणे मनपा आयुक्तांना पत्र लिहून प्रशासनाचे लक्ष वेधले असून, ही नियोजित वृक्षतोड त्वरित थांबवण्याची आणि वृक्ष संवर्धन करण्याची आग्रही मागणी केली आहे.

​डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन नियमानुसार एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींवर नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून त्यांची सुनावणी घेणे आवश्यक आहे. मेट्रो लाईन-३ च्या पिलर्समुळे रस्त्याची रुंदी काही ठिकाणी आधीच मर्यादित झाली असल्याने, केवळ झाडे कापून वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटणार नाही. याउलट, ‘परिसर’ संस्थेने तसेच पर्यावरण संस्थांनी सुचवलेल्या पर्यायी डिझाईनचा वापर केल्यास, रस्त्याच्या उपलब्ध जागेतच सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गासह उत्तम नियोजन करणे शक्य आहे, ज्यामुळे एकही झाड कापण्याची गरज पडणार नाही.

​या समस्येवर सुवर्णमध्य काढण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी मनपा प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या प्रस्तावाला तूर्तास स्थगिती देऊन, पुढील ८ दिवसांत मनपाचे नगर अभियंता, वाहतूक पोलीस, ‘परिसर’ संस्था आणि मॉडेल कॉलनी पर्यावरण समितीच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीत तज्ज्ञांच्या पर्यावरणपूरक डिझाईनचा प्रत्यक्ष जागेवर पडताळा घेऊन पुढील काम करावे, असे त्यांनी सुचवले आहे. पुणेकरांचा विकासकामांना विरोध नाही, परंतु पर्यावरणाचा समतोल राखून आणि जनभावनेचा आदर करून प्रशासनाने यावर सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, अशी विनंती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

पुणे, दि.५: फुगेवाडी, दापोडी व हडपसर येथील प्रथमदर्शनी मेथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २९ मे ते ४ जून या कालावधीत धडक कारवाई करुन एकूण १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता , प्रसाद सुर्वे, पुणे
विभागीय उपायुक्त सागर धोमकर, यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार पुणे विभागाने अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे.

या कालावधीत एकूण १४२ गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण ११६ आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये ८ हजार ४७२ लि. तयार गावठी दारू जप्त करण्यात आली असून गावठी दारू तयार करण्यासाठीचे ६९ हजार २७१ लि. रसायन जागीच नाश करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ७३३ लि. परराज्यातील व बनावट मद्य ही जप्त करण्यात आले आहे. दारूच्या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एकूण ११ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.

सर्व विक्री व निर्मितीचे हॉटस्पॉट संवेदनशील गाव येथील हातभट्टी केंद्र नेस्तनाबूत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच हातभट्टी निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल पुरवठादारांना गुन्ह्यात आरोपी करून कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सराईत गुन्हेगारा कडून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ नुसार चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी एकूण १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत.

मेथेनॉल मिश्रित दारूप्राशन करून नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याशी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ गुन्हे नोंदविले होते त्यांचा तपास सीआयडी सोबत करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी श्री.गजानन पाटील यांनी पुणे व पिं. चि. मनपा आयुक्त यांना त्यांचे हद्दीमध्ये विषारी दारूचे दुष्परिणाम व त्यास प्रतिबंध घालण्यासाठी ध्वनिफीत घंटागाडीच्या ध्वनिक्षेपावरून वाजविणे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारूच्या नोंदविलेल्या गुन्ह्याची ठिकाणे अवैध बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्याची विनंती केली आहे. अशाच प्रकारच्या सूचना सर्व नगरपरिषद, नगरपालिका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व उप विभागीय दंडाधिकारी , सर्व पोलीस उपायुक्त पुणे व पिंपरी-चिंचवड यांना विषारी दारूसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सराईत गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी कलम ९३ खाली अधिकाधिक रक्कमेचे बंधपत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच,ग्रामसेवक, तलाठी यांना त्यांच्या गावामध्ये गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्याबाबत व सरकारी जमिनीचा अवैध धंद्यांसाठी वापर होत असल्यास त्याला प्रतिबंध करण्याबाबत सूचना देण्याबाबतच्या सूचना (नोटीस) राज्य उत्पादन शुल्क विभाग मार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच महावितरणलाही अशा अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांना देण्यात आलेल्या अधिकृत किंवा अनधिकृत वीज जोडण्या तोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच गावठी दारू निर्मिती करणारऱ्यास गुळाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यानाही कलम १६८ खाली प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या आहेत.

मेथेनॉल बाबत सह आयुक्त, औषध प्रशासन विभाग यांना भेटून पुणे जिल्ह्यातील सर्व मेथेनॉल अनुज्ञप्ती धारक, पुरवठादार यांची यादी प्राप्त करून घेण्यात आलेली आहे. सर्व घटकांना राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन भा.ना.सु. संहितेच्या कलम १६८ नुसार नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. औषध प्रशासन विभागाकडून मेथेनॉलच्या पुरवठादारांच्या व्यवहारांची तपासणी करून अवैध करण्यासाठी मेथेनॉलचा पुरवठा केल्यास कडक कारवाई करण्याबाबत विनंती केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या गुन्हेगारांविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा ०२०-२६१२७३२१ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर अन्नपदार्थांसाठी बंद करण्याचे एफएसएसएआयचे आदेश

मुंबई, 5 जून 2026

मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून अन्न पॅक करण्यासाठी (बांधण्यासाठी) आणि वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे अलीकडेच निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय, पश्चिम क्षेत्र) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) यांनी संयुक्तपणे कारवाई केली.

शहर आणि परिसरात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेऊन, एफएसएसएआय (पश्चिम क्षेत्र) ने अन्नपदार्थ विक्रेत्यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी अन्नपदार्थ बांधण्यासाठी किंवा वाढण्यासाठी, तसेच इतर कोणत्याही प्रकारे अन्नाचा थेट संपर्क येईल अशा गोष्टींसाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करावा. 

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, छपाईच्या शाईमध्ये अनेक हानिकारक रंग, रंगद्रव्ये, बाइंडर्स आणि रसायने असतात, विशेषतः यात शिसे आणि इतर जड धातूंचा समावेश असतो, जे अन्नपदार्थांमध्ये उतरू शकतात आणि त्यामुळे आरोग्याच्या गंभीर आणि दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. वृत्तपत्रांचे वितरण आणि हाताळणीदरम्यान ती अनेकदा अस्वच्छ परिस्थितीच्या संपर्कात येतात, त्यामुळे ती अन्नजन्य आजार निर्माण करणाऱ्या रोगजंतूंचे वाहक बनू शकतात.

अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम, 2018 अनुसार, अन्न साठवण्यासाठी आणि ते गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्र अथवा अशा कोणत्याही साहित्याचा वापर करण्याला सक्त मनाई आहे. याबाबतच्या सूचनाही यापूर्वी जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, रेस्टॉरंट्स, क्लाउड किचन्स, केटरर्स, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स (क्यूएसआर), खाद्यपदार्थ विक्री आस्थापना, किरकोळ विक्रेते, फिरते खाद्यपदार्थ विक्रेते आणि फेरीवाले इत्यादींसह लघु आणि मध्यम खाद्यपदार्थ व्यवसायांनी कोणत्याही खाद्यपदार्थावर प्रक्रिया करताना अथवा त्याच्या विक्रीदरम्यान कोणत्याही टप्प्यावर  वर्तमानपत्रांचा वापर करू नये, यामध्ये अतिरिक्त तेल शोषून घेणे, अन्न घटक किंवा खाद्यपदार्थ झाकणे, खाद्यपदार्थ गुंडाळणे इत्यादींचा समावेश आहे. त्यानुसार, ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने एफएसएसएआय वरील निर्देशांचा पुनरुच्चार करत आहे आणि अन्नपदार्थांची विक्री आणि वितरण करताना केवळ सुरक्षित आणि मान्यताप्राप्त ‘फूड-ग्रेड’ (अन्न-सुरक्षित दर्जाच्या) पॅकेजिंग साहित्याचा वापर करण्याचे निर्देश देत आहे. ग्राहकांनीही या संदर्भात सतर्क राहावे, असे आवाहन आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006, तसेच त्याअंतर्गत करण्यात आलेले नियम आणि तरतुदींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एफएसएसएआय आणि राज्य प्राधिकरणे एकत्रितपणे काम करत आहेत. अन्न आणि पेय क्षेत्रात सुरक्षित आणि टिकाऊ पॅकेजिंगच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, अन्न आणि पर्यावरण सुरक्षेसाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी तसेच ग्राहकांमध्ये अन्न-सुरक्षा जागरूकता निर्माण करण्यासाठी एफएसएसएआय सक्रियपणे काम करत आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल Library Grant Management System (LGMS) या ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या १४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक ग्रंथालयांना वार्षिक अहवाल तसेच लेखापरीक्षण अहवाल LGMS प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार चालू वर्षासाठी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे.
राज्यातील सर्व सहाय्यक ग्रंथालय संचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तसेच शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रंथालयांना आवश्यक मार्गदर्शन करून वार्षिक अहवाल अचूक व वेळेत सादर होतील यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

तसेच, विहित मुदतीत अहवाल सादर न करणाऱ्या किंवा अपूर्ण अथवा चुकीची माहिती सादर करणाऱ्या ग्रंथालयांना अनुदान मंजूर करण्यात येणार नसल्याचा इशाराही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सर्व संबंधित ग्रंथालयांनी वेळेत माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
LGMS प्रणालीवर माहिती भरताना तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यातील ग्रंथालय व्यवस्थापन अधिक पारदर्शक व डिजिटल करण्याच्या दृष्टीने शासनाने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे.

उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वनमहोत्सव व वृक्षारोपण आणि बीज संकलन केंद्र उपक्रम.

पुणे- शहराच्या पर्यावरणाचे संतुलनाठी व शहराचे तापमान आरोग्याचे दृष्टीने योग्य राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. पुणे महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणामार्फत वृक्ष लागवड, संगोपन व संवर्धन तसेच पर्यावरण संवर्धनाकरिता विविध उपक्रम कायम राबवित असते.
पुणे शहर हरित होण्याच्या दृष्टीने यावर्षी “हरित पुणे,समृद्ध पुणे” या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वनमहोत्सवातर्गत अल्प दरात रोपे विक्री व वृक्षारोपण आणि बीज संकलन केंद्र असे विविध उपक्रमांचे उदघाटन शुक्रवार, दिनांक ०५ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, या ठिकाणी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. सदर कार्यक्रमास मकरंद टिल्लू, मुख्य समन्वयक विश्वस्थ, नवचैतन्य हास्ययोग परिवार , अॅड.राजेंद्र आगरवाल व नव चैतन्य हास्ययोग परिवाराचे सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे डॉ.अशोक दि.घोरपडे,सह महापालिका आयुक्त तथा सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण, राजेश बनकर,मुख्य अभियंता,पथ विभाग, संतोषकुमार कांबळे, उद्यान अधिक्षक, प्रिती प्रसाद ,उद्यान अधिक्षक,स्नेहल हरपळे,उद्यान अधिक्षक, रत्नाकर करडे, सहाय्यक उद्यान अधिक्षक तसेच उद्यान विभागाकडील उप अभियंता शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता, हॉर्टीकल्चर मिस्त्री,माळी, कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळी हंगामामध्ये पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये वृक्ष लागवडीचे काम मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वनमहोत्सव उपक्रमांतर्गत इच्छुक वृक्षप्रेमी, नागरिक व स्वयंसेवी संस्थांना अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले व त्यांचे हस्ते छत्रपती संभाजीराजे उद्यान परिसरामध्ये ‘बेल’ प्रजातीचे वृक्ष रोपण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण पुणे शहरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वृक्ष प्राधिकरणामार्फत १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत व उद्यान विभागामार्फत विविध उद्यानात लोकसभा, विधानसभा सदस्य, सभासद, पुणे महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचे उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहर अभियंता यांचे उपस्थितीत पुणे महानगरपालिका नदी पुनर्जीवन प्रकल्पा अंतर्गत देखील वृक्ष लागवड करण्यात आली.

वनमहोत्सवातर्गत इच्छुक वृक्ष प्रेमी, नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये वृक्ष लागवडीसाठी पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणामार्फत दिनांक ०५ जून २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये एक ते दीड वर्षाचे स्थानिक जातींच्या रोपांचे र.रु.५/- प्रति रोप अशा सवलतीच्या दरामध्ये वाटप करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्षांची, फळ झाडांच्या बिया, बीज, गोळे व रोप निर्मितीकरिता बीज संकलन केंद्रात जमा करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. सदर कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत देखील नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
सदर उपक्रम दिनांक ०५ जून २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छ.संभाजीराजे उद्यान येथील रोपवाटिका, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर शेजारी, शिवाजीनगर, पुणे ४११००५ या ठिकाणी सकाळी ०८.०० ते सायंकाळी ०४.०० (रविवार व शासकीय सुट्टी सोडून) या वेळेत सुरु राहील. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व हरित पुणे उपक्रमास हातभार लावावा.
सदर रोपे वाटप उपक्रमाबाबत अधिक माहितीकरिता श्री.रत्नाकर करडे ,सहाय्यक उद्यान अधिक्षक – मो.नं.९६८९९३८५२३ किंवा श्री.रविंद्र कांबळे,वृक्ष निरीक्षक – मो.नं.-८३०८८४१५२५ यांच्याशी संपर्क साधावा.

पुण्यातील विषारी दारुकांड हे सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी, २०१५ च्या मालवणी दारु दुर्घटनेतून काय धडा घेतला?

मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारे गृहविभागांचे निर्देश दुर्लक्षित, राज्य सरकार सर्व विभागात अपयशी.

मुंबई, दि. ५ जून २०२६

पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारुमुळे २२ जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कारवाईचे नाटक करत २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली,पण ही कारवाई समाधानकारक नाही. २०१५ साली मालवणीमध्ये विषारी दारुमुळे १०६ जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, या समितीच्या शिफारशींवर सरकार व प्रशासनातील संबंधित विभागाने काहीही कार्यवाही केलेली नाही. शासन व प्रशासनातील या बेजबाबदारपणामुळेच पुण्यात २२ बळी गेले. मालवणी समितीच्या शिफारसींचे काय झाले? याचा खुलासा फडणवीस सरकारने करावा, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, गृहविभागाने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मालवणी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागाला निर्देश दिले होते. या शिफारशींमध्ये मिथेनॉल निर्मिती ते वाहतुकीपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण, अवैध गावठी दारु निर्मिती केंद्रावर पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर मोहिम राबावावी, माहितीची देवाणघेवाण करावी, संयुक्त मोहिम राबवून अवैध दारु निर्मिती केंद्रे कायमस्वरुपी बंद करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, सातत्यपूर्ण अंमलबजावणी करावी, असे म्हटले होते. त्याचबरोबर संघटित गुन्हेगार, झोपडीदादा, यांच्यावर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्यावर MPAD कायद्याअंतर्गत कारवाई, राजकीय नेत्यांचे पाठबळ असले तरी कठोर कारवाई करावी, अशा अनेक शिफारशी केल्या होत्या. या शिफारसी सर्व विभागांना केल्या असतानाही अशा घटना होणे, याचा अर्थ राज्य सरकार सर्व विभागात अपयशी ठरले आहे, असे सचिन सावंत म्हणाले..

अन्न व औषध प्रशासन विभाग कायदा १९४० व इतर अनुषांगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कारवाई करण्यात येईल आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणात्याही व्यक्ती व संस्थेविरुद्ध शासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे असे या विभागाच्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे, याचाच अर्थ आतापर्यत कारवाई होत नव्हती हे यातून स्पष्ट होत आहे. प्रत्येकवेळी घटना झाल्यानंतरच सरकार जागे होणार का, याचे उतर सरकारने द्यावे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

पुण्यात घडलेली विषारी दारू दुर्घटना ही केवळ एका भागातील प्रशासनाच्या अपयशाची घटना नाही, तर राज्य शासनाने पूर्वीच्या दुर्घटनांमधून काही धडा घेतला की नाही याची परीक्षा आहे. मालवणी दारू दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या. त्या शिफारसी स्वीकारल्यानंतर त्यांची अंमलबजावणी झाली का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याहून गंभीर बाब म्हणजे विषारी दारू दुर्घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी (SOP), अँटिडोटचा साठा, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यांची शिफारस करण्यात आली होती. पुणे दुर्घटनेत या सर्व यंत्रणा कितपत सज्ज होत्या? संबंधित रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होते का?

सचिन सावंत पुढे म्हणाले की, मालवणी समितीने अवैध दारू व्यवसायातील आरोपींना सहज जामीन मिळत असल्याने ते पुन्हा त्याच व्यवसायात सक्रिय होत असल्याची गंभीर नोंद केली होती. त्यामुळे कायद्यात बदल करून कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली होती. सरकारने त्यावर कोणती कार्यवाही केली? जर मालवणी दुर्घटनेनंतरच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी झाली असती, तर पुण्यातील ही दुर्घटना टाळता आली नसती का? सरकारने केवळ स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित करून जबाबदारी संपल्याचे समजू नये. मालवणी समितीच्या प्रत्येक शिफारसीवर आतापर्यंत काय अंमलबजावणी झाली, कोणत्या शिफारसी प्रलंबित आहेत आणि त्या का राबविण्यात आल्या नाहीत, याचा खुलासा सरकारने करावा.

पुण्यातील विषारी दारु दुर्घटनेनंतर भिंवडीसह काही ठिकाणी धाडी टाकून मिथेनॉलचे साठे व हातभट्ट्या उद्ध्वस्थ करण्यात आल्या. एखादी घटना घडल्यानंतरच प्रशासन का जागे होते? इतरवेळी अशा धडक कारवाया का केल्या जात नाहीत? पुण्यातील घटना होईपर्यंत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक यांना या हातभट्ट्या दिसल्या नाहीत का? पुणे भरारी पथक व राज्याचे भरारी पथकाने पुण्यातील गुन्हेगारांवर एकही गुन्हा दाखल केलेला नव्हता..४० वर्षे हातभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या माहिती प्रशासनाच्या एकाही व्यक्तीला नव्हती असे म्हणणे हे खुळेपणाचे ठरले. यामध्येच राज्याचे वरिष्ठ नेतृत्व ते खालच्या अधिकाऱ्यांपर्यत माहिती होती हे स्पष्ट आहे, असेही सावंत म्हणाले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात भाजपाचा ७५५०० झाडे लावण्याचा संकल्प

पुणे- :-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एक पेड मा के नाम या संकल्पनेला अनुसरून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने ३०२०बूथ वर प्रत्येकी २५झाडे लावण्याचा संकल्प केला आहे ७जून पर्यंत चालणाऱ्या ह्या अभियानात सुमारे ७५५०० झाडे लावण्यात येणार आहेत अशी माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली
यावेळी बोलताना घाटे म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात काँक्रेट चे जंगल झाले आहे ज्यामुळे निसर्गाला हानी पोहोचत आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे हे प्राणवायू स्रोत आहेत तीच नष्ट होत असतील तर शहरांची परिस्थिती भयंकर होईल म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम ‘ संकल्पना मांडून वसुंधरा मातेला एक प्रकारे वंदन केले आहे याचेच अनुसरणं पुणे शहरतील भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल हा विश्वास आहे
या पर्यावरण पर्वा निम्मित स्वच्छता अभियान देखील मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याचे घाटे यांनी नमूद केले आहे या अभियानासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या संयोजिका म्हणून खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांची तर पुणे शहराच्या संयोजिका म्हणून नगरसेविका व पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे -शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे
.

महिलांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दिल्यास रोजगार निर्मिती शक्य

स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा संगीता देवकर : रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन तर्फे सेवा उत्कृष्टता गौरव पुरस्कार

पुणे : प्रत्येक महिलेमध्ये कोणत्यातरी प्रकारचे गुण दडलेले असतात. या गुणवत्तेला प्रोत्साहन दिल्यास ती महिला आपल्या पायावर उभी राहू शकते. एक महिला जर आपल्या पायावर उभी राहिली, तर ती निश्चितच आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊन कुटुंबाला आधार देऊ शकते.  महिलांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दिल्यास त्यामधून रोजगार निर्मिती शक्य होते, असे मत पुणे महापालिकेतील स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा राणी लक्ष्मीबाई महिला प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख संगीता देवकर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन तर्फे सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी भांडारकर इन्स्टिट्यूट मधील सभागृहात संगीता देवकर यांना रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांच्या हस्ते सेवा उत्कृष्टता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे प्रमुख  डॉ. चंद्रशेखर वळव्हणकर, हेमंत तोडकर, शोभा सोमाणी आदी यावेळी उपस्थित होते. रोटरी क्लबच्या सामाजिक कार्यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या  डॉ. चंद्रशेखर वळव्हणकर, विद्यासागर जाधव, जोस्ना जाधव, सुनील हिंगमिरे, सचिन देशपांडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

संगीता देवकर म्हणाल्या, पुणे महापालिकेच्या सहयोगाने २००४ मध्ये महाराणी लक्ष्मीबाई महिला प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली . या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार महिलांना ब्युटी पार्लर मोबाईल दुरुस्ती, मेकअप, मेहंदी अशा विविध प्रकारच्या गुणवत्ता प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहे. यामुळे केवळ महिलाच स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या नाहीत तर त्यातून आम्ही कुटुंब स्वयंपूर्ण करण्यास मदत केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, राजकारण हे आळूच्या पानावरील दवा प्रमाणे असते. ते कायमस्वरूपी टिकत नाही. परंतु राजकारणाच्या माध्यमातून जर समाजकारण केले आणि समाजाला आपल्या पदाचा उपयोग करून देता आला, तर त्यामधून मिळणारे समाधान हे वेगळ्या प्रकारचे असते. राजकारण कायमस्वरूपी टिकत नाही, परंतु समाजकारण हे कायमस्वरूपी टिकते आणि त्याचा निश्चितच समाजामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संतोष मराठे म्हणाले, संगीता देवकर यांनी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून स्वयंपूर्ण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आजही समाजामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवाभावी वृत्तीने जागृत राहून इतरांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था कार्यरत आहेत. रोटरीने त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यास निश्चितच थोडासा उशीर केला आहे. इतरांच्या सेवेचा सन्मान ठेवणे आणि त्यातून आदर आणि सेवाभाव वाढीस लावणे, हे रोटरीचे मुख्य उद्देश आहे. त्यामधूनच  संगीता देवकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. संगीता देवकर यांच्या कार्यातून प्रोत्साहन घेऊन इतरांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्यास सहयोग केल्यास त्याचा समाज बांधणीत महत्वाचे योगदान देता येऊ शकते. 

डॉ. चंद्रशेखर वळव्हणकर म्हणाले , समाजहित आणि मानव सेवा केंद्रबिंदू ठेवून रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन कार्य करत आहे. पुणे आणि जुन्नर परिसरात डोळ्यांच्या १ हजार  मोफत शस्त्रक्रिया करण्याचे ध्येय पुन्हा संस्थेने ठेवले असून आतापर्यंत ४०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

महावितरण अधीक्षक अभियंता पदी सुरेश सवाईराम, संजय वाघमारे रुजू

पुणे, दि. ५ जून, २०२६- महावितरण पुणे ग्रामीण मंडलच्या अधीक्षक अभियंता पदी सुरेश सवाईराम पदोन्नतीने तर अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) या पदावर संजय वाघमारे बदलीद्वारे नुकतेच रुजू झाले झाले आहेत. यांचेसोबतच पुणे परिमंडलास ५ नविन कार्यकारी अभियंतेही मिळाले आहेत. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी पुणे परिमंडलात सर्वांचे स्वागत करुन जोमाने व ग्राहकाभिमुख काम करण्याच्या सूचना दिल्या.

सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करुन सुरेश सवाईराम यांनी तत्कालिन वीज मंडळात १९९४ साली चिपळूण येथे सहाय्यक अभियंता म्हणून सेवेला सुरुवात केली. २००२ ते २०१० हातकणंगले येथे उपकार्यकारी अभियंता, २०१० ते २०१४ नाशिक येथे अति. कार्यकारी अभियंता तर २०१६ ते २०२६ या काळात नाशिक शहर विभाग-१, भांडूप शहर विभाग व सांगली ग्रामीण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी काम केले आहे. नुकत्याच झालेल्या पदोन्नतीवर ते पुणे ग्रामीण मंडलात अधीक्षक अभियंता म्हणून ते रूजू झाले आहेत.

महावितरण सांघिक कार्यालयात अधीक्षक अभियंता (अपारंपरिक ऊर्जा) या पदावर कार्यरत असलेले संजय वाघमारे पुणे परिमंडलाच्या पायाभूत आराखडा विभागात अधीक्षक अभियंतापदी नुकतेच बदलीवर रुजू झाले. १९९९ साली वीज मंडळात सहा. अभियंतापदी वाघमारे यांची निवड झाली. त्यानंतर २००६ साली सरळ सेवेतून उपकार्यकारी अभियंता, २०१० साली अति. कार्यकारी अभियंता, २०१६ मध्ये कार्यकारी अभियंता व २०२४ साली सरळ सेवेतूनच ते अधीक्षक अभियंता झाले. या सेवाकाळात त्यांनी अनुक्रमे कल्याण, पुणे, केडगाव, बारामती व मुंबई येथे काम केले आहे.

कार्यकारी अभियंतापदामध्येही बदल

नुकत्याच झालेल्या पदोन्नती व बदल्यांमुळे पुणे परिमंडलात काही विभागांचे कार्यकारी अभियंता बदलले आहेत. यामध्ये रास्तापेठ, पद्मावती, भोसरी या संवसु विभागासह गणेशखिंड व पुणे ग्रामीण चाचणी विभागाचा समावेश आहे. रास्तापेठ विभागाला राहूल पाटील, पद्मावती विभाग- सचिन पाटील, भोसरी विभाग- विश्वनाथ लहाने, गणेशखिंड चाचणी विभाग- मिलिंद चौधरी तर पुणे ग्रामीण चाचणी विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी डॉ. जितेंद्रकुमार राठौर रुजू झाले आहेत.

गणेशखिंड रस्त्यावरील रेंगाळलेल्या फुटपाथच्या कामावरून आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

0

तात्काळ रस्ता पूर्ववत करण्याचे प्रशासनाला निर्देश

पुणे-
​गणेशखिंड रस्त्यावरील फुटपाथच्या रेंगाळलेल्या कामामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि कंत्राटदाराची दिरंगाई पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा फुटपाथ तात्काळ बुजवून पूर्ववत करण्याचे कडक निर्देश दिले.
​गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी रोड डिपार्टमेंटकडून गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे फुटपाथ ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्यासाठी खोदून ठेवण्यात आले होते. मात्र, महिना-दीड महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. फुटपाथ पूर्णपणे उकरून ठेवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉक करणे किंवा चालणे अशक्य झाले आहे, तसेच परिसरातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही ये-जा करताना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
या समस्येची माहिती मिळताच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी तातडीने रोड डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारासह गणेशखिंड रस्त्याला भेट दिली.
​आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना जाब विचारताना सुनावले की:
​”जर तुमच्याकडे कामाचा कोणताही ठोस नियोजन तयार नव्हता, तर मग ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हा महत्त्वाचा फुटपाथ खोदून का ठेवला? कामाचे नियोजन शून्य असताना नागरिकांना वेठीस धरणे खपवून घेतले जाणार नाही.”
​सध्या पावसाळा सुरू होत असल्याने हा रस्ता असाच राहिल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल, ही बाब ओळखून आमदार शिरोळे यांनी स्पष्ट आदेश दिले की, जोपर्यंत कामाचे पुढील नियोजन किंवा मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत हा खोदलेला भाग तात्काळ माती-मुरुम टाकून बुजवण्यात यावा. तसेच, नागरिकांना चालण्यासाठी हा फुटपाथ तातडीने पहिल्यासारखा करून देण्यात यावा.
​आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून, गणेशखिंड परिसरातील नागरिकांनी या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.