Home Blog Page 25

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजयुमो मुंबईच्या ‘पेडल फॉर प्लॅनेट’ ग्रँड सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पेडल फॉर प्लॅनेट’ ग्रँड सायक्लोथॉनचे आयोजन आज सकाळी बोरीवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पर्यावरण संवर्धन, आरोग्याविषयी जनजागृती आणि हरित व शाश्वत भविष्यासाठी संकल्प या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सायक्लोथॉनमध्ये युवक, क्रीडाप्रेमी तसेच विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

निसर्ग आणि आरोग्याविषयी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात सहभागी नागरिकांनी सायकल प्रवासाद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला आणि संपूर्ण परिसरात “निरोगी शहर, हरित भविष्य” हा संकल्प घुमत राहिला. पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी सायकलिंगला प्रोत्साहन देण्याच्या जागतिक भावनेला अनुसरून हा उपक्रम युवकांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे प्रतीक ठरला.

या प्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम जी, आमदार संजय उपाध्याय जी, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक जी, भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, श्रीमती श्वेता परुळेकर जी, बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह नेते गणेश खणकर जी, नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना जी, लोकप्रतिनिधी, उद्योजिका श्रीमती सीमा सिंह जी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, वरिष्ठ पदाधिकारी तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी युवकांचा उत्साह वाढवत पर्यावरण संरक्षणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले.

यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम जी म्हणाले की, आज संपूर्ण जग ऊर्जा संकटासारख्या गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी कार पूलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि परकीय चलन बचतीबाबत केलेले आवाहन जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भाजयुमो मुंबईने ‘पेडल फॉर प्लॅनेट’ ग्रँड सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेशात ३५० किलोमीटर मेट्रो नेटवर्कचे काम सुरू असून त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होत आहे. मुंबई पारंपरिकदृष्ट्या सायकलिंग शहर नसले तरी लहान अंतरासाठी सायकलचा वापर वाढविल्यास आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींचा लाभ होईल. भविष्यात समुद्राची वाढती पातळी यांसारख्या आव्हानांचा विचार करता सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देणे हे पर्यावरण संरक्षणासाठी दूरदृष्टीचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह जी म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘पेडल फॉर प्लॅनेट’ हा केवळ सायक्लोथॉन नसून स्वच्छ, हरित आणि निरोगी मुंबई घडविण्याचा एक सामूहिक संकल्प आहे. वाढते प्रदूषण, घटणारे हरित क्षेत्र आणि हवामान बदल यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी समाजाने, विशेषतः युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाची नवी उंची गाठत आहे आणि भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम जी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील युवा हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त मुंबईचा आदर्श निर्माण करतील, जो भविष्यातील भारताची दिशा ठरवेल, असे त्यांनी सांगितले.

तसेच ‘पेडल फॉर प्लॅनेट’ हा केवळ कार्यक्रम नसून एक लोकचळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा एखादा युवक सायकलचा पर्याय निवडतो, तेव्हा तो स्वच्छ हवा, कमी प्रदूषण आणि उज्ज्वल भविष्याची निवड करत असतो. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे, प्लास्टिकचा वापर कमी करावा, पाणी आणि ऊर्जेची बचत करावी आणि पर्यावरण संरक्षणाला आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राची सर्वात मोठी ताकद ही युवा शक्ती आहे. युवक जागृत झाला तर देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जातो, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व युवकांचे, स्वयंसेवकांचे, आयोजकांचे आणि पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या प्रत्येक मुंबईकराचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. युवकांना संदेश देताना ते म्हणाले, “आज आपण फक्त सायकलचे पॅडल चालवू नये, तर परिवर्तनाचे चक्रही पुढे नेऊया. चला, केवळ सायकल चालवू नका, तर हरित भविष्याच्या दिशेने एक पाऊल टाका.”

पीएम सूर्यघर वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला केंद्र शासनाचे तब्बल आठ पुरस्कार

दोन वर्षांच्या कामगिरीमध्ये देशात आघाडीवर; नागपूरही चमकले

मुंबई, दि. ५ जून २०२६: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीसाठी केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राचा गुरुवारी (दि. ४) विविध वर्गवारीमध्ये तब्बल आठ पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. देशात इतर राज्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक पुरस्कार आहेत. छतावरील सौर प्रकल्पांची संख्या, नागपूर, जळगाव, पुणे जिल्ह्यांची देशात आघाडी आणि ‘मंथ ऑफ सोलर’मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचा हा सन्मान करण्यात आला.

नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवनात आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांच्याहस्ते महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके (नागपूर), अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राहुल सोनटक्के यांनी हे पुरस्कार स्विकारले. यावेळी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा सचिव श्री. संतोषकुमार सारंगी उपस्थित होते.

येत्या मार्च २०२७ पर्यंत देशभरात १ कोटी घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचे उद्दिष्ट ठेवून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात फेब्रुवारी २०२४ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. अवघ्या दोन वर्षांत देशातील ४० लाखांहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्र राज्यानेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पीएम सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीला मोठा वेग दिला आहे. त्यामुळे महावितरणने गेल्या दोन वर्षांत ६ लाख ५ हजार ८४७ घरांच्या छतावर सौर प्रकल्प कार्यान्वित असून देशात द्वितीय स्थान मिळवले आहे. तर गुजरातने ६ हजार ८१ हजार ४११ सौर प्रकल्पांसह प्रथम आणि उत्तर प्रदेशने ५ लाख ६४ हजार ८४६ सौर प्रकल्पांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

यासोबतच देशपातळीवर १० टॉपर जिल्ह्यांमध्ये (कंसात छतावरील सौर प्रकल्पांची संख्या) नागपूर जिल्ह्याने (८९,२५५) देशात द्वितीय क्रमांक, जळगाव जिल्ह्याने (४२,५७४) नववा क्रमांक आणि पुणे जिल्ह्याने (४२,१५१) दहावा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या दहा क्रमांकात महाराष्ट्राच्या सर्वाधिक या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे हे विशेष.

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून मे २०२६ मध्ये ‘मंथ ऑफ सोलर’ ही मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान महाराष्ट्रामध्ये तब्बल ६५ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले. घराच्या छतांवर तब्बल ५४ हजार २४६ सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. या दोन्ही वर्गवारीत महाराष्ट्राने देशात द्वितीय स्थान प्राप्त केले. दि. २९ मे रोजी देशपातळीवर एका दिवसात सर्वाधिक १५ हजार घरांवर सौर प्रकल्प बसविण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्राने ४ हजार ७०० घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून प्रथम स्थान पटकावले. तसेच ६९ हजार १५६ सौर प्रकल्पांची तपासणी करून देशात अव्वल स्थान पटकावले. यासह ४१३ पुरवठादारांची नोंदणी करून ‘मंथ ऑफ सोलर’मध्ये द्वितीय स्थान मिळवले आहे.

वृक्षारोपण, पर्यावरण प्रभात फेरी, आरोग्य तपासणी शिबिरांनी केला जागतिक पर्यावरण दिन संपन्न

पुणे-वृक्षारोपण, पर्यावरण प्रभात फेरी, आरोग्य तपासणी शिबिरांनी आज येथे जागतिक पर्यावरण दिन संपन्न झाला .

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत खासदार, नगरसेवक , कोथरूड भागातील विविध क्षेत्रातील नागरिक, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ , जनवानी सहकारी संस्था, कमिन्स इंडिया लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, पर्यावरण व स्वच्छता रॅलीचे आयोजन,आरोग्य तपासणी शिबिर इत्यादी अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले.
प्रभाग क्रमांक १०,११,३१ गोपीनाथ नगर टेकडी पायथा याठिकाणी जनसेवक अमित तोरडमल आयोजित वृक्षारोपण खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, गिरिश खत्री, क्रीडा समितीचे सदस्या अल्पना वर्पे, नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, डॉ. मनिषा बुटाला, महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे आरोग्य निरीक्षक करण कुंभार, राजेश आहेर, दतात्रय दळवी, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, गणेश चोंधे, किरण जाधव, नासिर शेख, ब्रँड अँबेसिडर व मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे त्या भागातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच कोथरूड मधील थोरात उद्यान, आयडियल, गुजरात, मयूर कॉलनी, शिवतीर्थ नगर, ए. आर. ए. आय. टेकडी, डहाणूकर कॉलनी, भुसारी कॉलनी अशा विविध ठिकाणी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार, परिमंडल कार्यालय क्रमांक २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ, सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या, प्रभाग समितीच्या अध्यक्षा मा. ॲड. वासंती जाधव, नगरसेवक दिनेश माथवड जनसेवक नवनाथ जाधव यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये महिला व पुरुषांच्या बी. पी. मेमोग्राफी, रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये २३५ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या तपासण्या करून घेतल्या.
तसेच सुतारदरा, म्हातोबा नगर, हनुमान नगर, केळेवाडी, किष्किंधा नगर, या परिसरामध्ये पर्यावरण व स्वच्छतेची प्रभात फेरी काढण्यात आली. सदर प्रभात फेरी नागरिकांना “झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करा, सार्वजनिक ठिकाणी व नदी नाल्यात कचरा टाकून नैसर्गिक प्रवाह दूषित करू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, जंगल, जल, जमीन सर्वांचे संरक्षण करा, वृक्षतोड करू नका भविष्य धोक्यात टाकू नका, काम करा लाख मोलाचे निसर्ग आणि संवर्धनाचे, निसर्गाशी मैत्री, प्रगतीची ग्वाही, पृथ्वी एकच तिची काळजी घ्या, हरित भविष्यासाठी आज पाऊल उचला अशाप्रकारच्या घोषणा दिल्या.

सांख्यिकीय माहिती राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास उपयुक्त-आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार

‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवात

पुणे, दि. ५: महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभागाच्यावतीने प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (पीएलएफएस) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसयुएसई) या सर्वेक्षणाच्या क्षेत्रीय कामासाठी पुणे व कोकण विभागातील नियुक्त केलेल्या अन्वेषक व पर्यवेक्षकांची आयोजित विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे येथे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे सहसंचालक डॉ. रुही कुलकर्णी, मुंबई मुख्य कार्यालयाचे सहआयुक्त भीष्म बिरादार, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त (नियोजन) संजय मरकळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उप आयुक्त प्रियांका बोकोल, सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार टोपराणी, इप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लि. संचालक तृप्ती शर्मा उपस्थित होते.

विकसित भारत @ २०४७ नुसार जिल्हा हे विकासाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्याकरिता जिल्हास्तरीय रोजगार-बेरोजगार आकडेवारी, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या तसेच रोजगार निर्मिती आदी निर्देशकांची सविस्तर सांख्यिकीय माहिती आवश्यक आहे. ‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’हे दोन्ही सवेक्षण एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत घेण्यात येत आहे. या दोन्ही सर्वेक्षणाद्वारे निर्माण होणारी सांख्यिकीय माहिती वेगवेगळ्या निर्देशकांद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास उपयुक्त होईल. शासनाच्या विविध योजना आखण्यात, वेगवेगळ्या क्षेत्रातील धोरणे निश्चित करण्यात या दोन्ही सर्वेक्षणांचे अनन्य साधारण महत्त्व आहे, असेही डॉ. पडियार म्हणाल्या.

कार्यक्रमात ‘पीएलएफएस’ व ‘एएसयुएसई’ही महत्वाची सर्वेक्षणे असून या सर्वेक्षणामधून प्राप्त होणारी आकडेवारी ग्रामपातळीवर, जिल्हा आणि विभागस्तरावरील कल्याणकारी योजना व धोरण निर्मितीसाठी खुप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्व प्रगणकांनी आकडेवारी गोळा करतांना दक्षता घ्यावी तसेच सर्व नागरिकांनी अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी चित्रफीतद्वारे केले.

डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, विकसित भारत @२०४७ चे ध्येय पूर्ण करण्यासाठी अचूक व अद्यावत माहिती अत्यावश्यक आहे. तसेच ‘एव्हिडन्स बेस्ड डेटा’ चा उपयोग धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनास उपयोग होतो. त्यामुळे हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणापूरती मर्यादित नसून या दोन्ही सर्वेक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक मजबूत पाया घालणारी महत्वपूर्ण प्रक्रिया आहे, असेही त्या म्हणाल्या.

श्री टोपराणी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मोजमापामध्ये या दोन्ही सर्वेक्षणाचे अनन्यसाधारण महत्व असलयाचे मत व्यक्त केले.

पाचदिवशीय (५ ते १० जून) या प्रशिक्षण सत्रात इप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लि. मुंबई या बाह्यसंस्थेकडून नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना पीएलएफएस सर्वेक्षणांतर्गत रोजगार बेरोजगारीची स्थिती, कामगार सहभाग दर, उद्योग व व्यवसायनिहाय रोजगाराची रचना याबाबत तसेच एएसयुएसई सर्वेक्षणांतर्गत असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या, स्वरुप, आर्थिक स्थिती, रोजगारनिर्मितो व उत्पन्न खर्च यासंबंधी माहिती संकलनाच्या संकल्पना, व्याख्या व कॅपी तंत्रज्ञानाद्वारे टॅबलेटवर माहिती नोंदणीचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्यामध्ये पीएलएफएस आणि एएसयुएसई सर्वेक्षणांतर्गत एकूण ६ हजार ८२८ इतक्या नमुना घटक असून २७६ अन्वेषक व निरीक्षक यांच्याद्वारे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे व कोकण विभागात पीएलएफएस आणि एएसयुएसई या दोन्ही सर्वेक्षणांसाठी शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण २ हजार ९५६ नमुना घटकांचे सर्वेक्षण होणार आहे व हे सर्वेक्षण ७५ अन्वेषक आणि २८ पर्यवेक्षक यांच्या पथकाद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहआयुक्त जयसिंग मेहेत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्र.सह आयुक्त वृषाली माकर यांनी केले

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता संपुष्टात

पुणे, दि. ५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुका-२०२६ अंतर्गत पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने संबंधित निवडणुकीचा निकाल यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध होऊन निकाल जाहीर करण्यात आले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये लागू असलेली आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने संपुष्टात आली आहे.

त्याअनुषंगाने पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीत 150 कोटींचा घोडेबाजार:उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार, संजय राऊतांचा आरोप

मुंबई–महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत 5 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 12 जागांवर आता थेट लढती रंगणार आहेत. मात्र या सर्व घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बिनविरोध निवडीसाठी आणि उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना माघार प्रक्रियेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, बिनविरोध निवडीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आणि उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी झालेल्या राजकीय हालचालींमध्ये एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले. विरोधी पक्षातील काही उमेदवारांनी स्वतःचा भाव ठरवून व्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला. कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे झालेल्या घडामोडी लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, अर्ज माघारीनंतर राज्यातील 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. या जागांमध्ये महायुतीने मोठे यश मिळवले असून दोन जागांवर शिवसेना शिंदे गट, दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एका जागेवर भाजपचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे मतदानाआधीच महायुतीने काही मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे चित्र दिसत आहे. या बिनविरोध निवडींमुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुतिन म्हणाले- अमेरिकेने मोदींवर दबाव टाकणे व्यर्थ:भारत महान देश आणि आमचा सहयोगी,भारतावर दबाव टाकणे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी हानिकारक

सेंट पीटर्सबर्ग-रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, अमेरिका भारतावर रशियासोबतच्या त्याच्या संबंधांसह अनेक मुद्द्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण असे प्रयत्न निरुपयोगी आहेत. भारत याचा विरोध करेल.पुतिन यांनी पीटीआयसह जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. ते म्हणाले- भारत एक महान देश आणि लोकशाही आहे. रशिया त्याला आपला विश्वासार्ह भागीदार मानतो.

रशियन अध्यक्षांनी पुढे म्हटले- भारत आपल्या राष्ट्रीय हितांना प्राधान्य देतो. अमेरिकेशी त्याचे वाढते संबंध असले तरी भारत-रशियाच्या भागीदारीवर कोणताही परिणाम होणार नाही. रशियासोबतचे त्याचे संबंध पूर्वीसारखेच मजबूत राहतील.
पुतिन म्हणाले- भारत-रशियामधील व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल

पुतिन म्हणाले- आम्हाला आनंद आहे की भारत त्या सर्व देशांशी संबंध वाढवत आहे, ज्यांना तो आपल्या राष्ट्रीय हितासाठी आवश्यक मानतो. पुतिन यांनी विश्वास व्यक्त केला की येत्या काही वर्षांत भारत आणि रशियामधील व्यापार 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल.

ते म्हणाले- भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशांमध्ये गणला जातो. ही उपलब्धी अचानक मिळालेली नाही, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अथक प्रयत्नांचे आणि धोरणांचे ते परिणाम आहे.

रशियन अध्यक्षांनी सांगितले की, काही पाश्चात्त्य देशांनी भारतावर रशियासोबतचे सहकार्य कमी करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, आता सर्वांना समजले आहे की पंतप्रधान मोदी आणि भारतावर दबाव आणणे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी हानिकारक ठरेल.

पुतिन यांचे हे विधान भारत दौऱ्यापूर्वी आले आहे. ते पुतिन 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या BRICS परिषदेत सहभागी होतील. भारत यावर्षी BRICS चे अध्यक्षपद भूषवत आहे. एका वर्षाच्या आत पुतिन यांचा हा दुसरा भारत दौरा असेल. पंतप्रधान मोदीही याच वर्षी रशिया दौऱ्यावर जातील.

रशियन अध्यक्ष 23व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 4 डिसेंबर 2025 रोजी भारतात आले होते. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा होता. यापूर्वी ते शेवटचे 2021 मध्ये भारतात आले होते.

ट्रम्प म्हणाले- भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापाराबद्दल बोलताना सांगितले की, भारताने दीर्घकाळापासून अमेरिकेवर उच्च शुल्क (टॅरिफ) लावले आणि त्याचा फायदा घेतला. ट्रम्प यांनी दावा केला की, आता परिस्थिती बदलली आहे आणि अमेरिका भारताकडून चांगली कमाई करत आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले की, अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच एक मोठा व्यापार करार होऊ शकतो, कारण मला मोदी खूप आवडतात. मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. आमचे संबंध चांगले आहेत आणि आम्ही एकमेकांना चांगले समजतो. मला मोदी खूप आवडतात.

ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेच्या एका पथकाने नुकतीच नवी दिल्लीत भारत सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक फेऱ्यांची चर्चा केली आहे. दोन्ही देश एका तात्पुरत्या व्यापार करारावर सहमती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून व्यापाराशी संबंधित काही समस्यांचे लवकर निराकरण करता येईल.

भारताच्या वाणिज्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की चर्चा सकारात्मक झाली आहे आणि दोन्ही देशांना असा करार करायचा आहे ज्यामुळे भारत आणि अमेरिका, दोघांनाही फायदा होईल. म्हणजेच दोन्ही पक्ष अजूनही व्यापार करार पुढे नेण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
करारांबाबतच्या वाटाघाटी सुरू असतानाच एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. अमेरिकेने काही देशांवर अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की हे देश सक्तीच्या मजुरीशी संबंधित प्रकरणे रोखण्यासाठी पुरेशी पावले उचलत नाहीत.

या प्रस्तावित यादीत भारताचे नाव देखील समाविष्ट आहे. जर हा निर्णय लागू झाला, तर अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय वस्तूंवर 12.5% अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते. यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारात महाग होऊ शकतात आणि निर्यातदारांवर परिणाम होऊ शकतो.

भारत सरकारचे म्हणणे आहे की सध्या या अतिरिक्त शुल्काबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. अमेरिका प्रथम या प्रस्तावावर लोकांची आणि संबंधित पक्षांची मते घेईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेईल.

भारताचे असेही म्हणणे आहे की या मुद्द्यानंतरही दोन्ही देशांमध्ये मोठ्या व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू आहेत आणि दोन्ही पक्ष एखाद्या सहमतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करारासाठी आराखडा तयार

भारत आणि अमेरिकेने फेब्रुवारी 2026 मध्ये यावर सहमती दर्शवली होती की दोन्ही देश एक अंतरिम व्यापार करार (इंटरिम ट्रेड डील) करतील. याचा उद्देश दीर्घकाळापासून चर्चा सुरू असलेल्या व्यापारी समस्या लवकर सोडवणे हा होता.

दोन्ही देशांना असे वाटत होते की व्यापक आणि मोठ्या व्यापार करारापूर्वी एक प्रारंभिक करार केला जावा, जेणेकरून व्यापार वाढवण्याचा आणि शुल्क (टॅरिफ) विवाद कमी करण्याचा मार्ग मोकळा होईल.

मात्र, नंतर अमेरिकेत शुल्क (टॅरिफ) धोरणासंदर्भात कायदेशीर वाद सुरू झाला. एका अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प सरकारने लावलेल्या काही शुल्कांवर (टॅरिफवर) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते रद्द केले. यानंतर हे स्पष्ट राहिले नाही की अमेरिका भविष्यात कोणते शुल्क (टॅरिफ) लागू ठेवू शकेल आणि कोणते नाही. या कायदेशीर अनिश्चिततेचा परिणाम अमेरिकेच्या इतर देशांसोबत सुरू असलेल्या व्यापारी वाटाघाटींवरही झाला.

याच दरम्यान भारत आणि अमेरिकेदरम्यान टॅरिफ, बाजारपेठ प्रवेश, कृषी उत्पादने, ऑटोमोबाईल, ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यापार यांसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू राहिली, परंतु अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अंतिम सहमती होऊ शकली नाही. परिणामी, ज्या वेळेत अंतरिम व्यापार कराराला अंतिम स्वरूप द्यायचे होते, ती पूर्ण होऊ शकली नाही.

आता दोन्ही देश चर्चा सुरू ठेवत आहेत आणि प्रयत्न करत आहेत की आधी एक मर्यादित किंवा अंतरिम करार व्हावा. त्यानंतर व्यापक द्विपक्षीय व्यापार करारावर पुढे जावे, जेणेकरून दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला आणखी चालना मिळेल.

मुळशी पॅटर्न-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

“तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट” या टॅगलाईनमुळे रंगले तर्कवितर्क; वाळू माफियांवर भाष्य होणार का?

युवा उद्योजक पुनीत बालन आणि अभिजीत भोसले यांची घोषणा

पुणे-
मराठी चित्रपटसृष्टीत प्रचंड गाजलेल्या मुळशी पॅटर्न च्या यशानंतर आता मुळशी पॅटर्न-२ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट” अशी वेगळी आणि उत्सुकता वाढविणारी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजीत भोसले जेन्युन प्रॉडक्शन हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.. युवा उद्योजक पुनीत बालन, अभिजीत भोसले आणि अभिनेता प्रविण तरडे यांनी आज या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट’ ही टॅग लाईन असल्याने या चित्रपटात नेमकी वाळूच्या संघर्षाची कथा पाहायला मिळणार आहे की, मुळशी पॅटर्न प्रमाणेच वाळू माफियांच्या वाढत्या जाळ्यावर आणि त्यामागील वास्तवावर भाष्य करण्यात येणार आहे, का सामान्य माणसाचे घराचे महाग होत च लेले ले स्वप्न याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ग्रामीण भागातील वास्तव, संघर्ष आणि व्यवस्थेतील काळी बाजू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे करणार असून. मुळशी पॅटर्न नंतर दुसरा भाग कधी येणार, याची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, प्रविण तरडे यांच्या देऊळ बंद-२ या चित्रपटाचे काम सुरू असल्याने मुळशी पॅटर्न-२ चे काम काहीसे लांबले होते.

आता मात्र ही प्रतीक्षा संपणार असून ‘पुनीत बालन स्टुडिओ’ आणि जेन्युन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून तो नेमका कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, पहिल्या भागातील कोणते कलाकार पुन्हा दिसणार, तसेच कथानकाची दिशा नेमकी काय असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुळशी पॅटर्न-२ हा चित्रपट पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख झाडे लावणार

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. आरे परिसरातील तब्बल ८० एकर रिक्त जागेत ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिली.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आरे कॅम्प परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, “आरेला कागदावर जंगल म्हणून ओळख मिळाली होती; आता आम्ही ते केवळ नोंदीपुरते न ठेवता प्रत्यक्षात हिरवाईने बहरलेले, समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल निर्माण करणार आहोत. आरे परिसरातील ८० एकर जागेमध्ये ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्याची सुरुवात आज करण्यात येत आहे.”

यावेळी आमदार मुरजी पटेल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेच्या अनुषंगाने ॲड. आशिष शेलार यांनी आरे कॅम्प, मेट्रो कारशेड परिसरातील रिक्त जागा, मेट्रो भवनाच्या राखीव जागा, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ परिसर, कृषी उद्योग विकास महामंडळ, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, फोर्स वन, महानंद डेअरी तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या अहवालानुसार या विविध ठिकाणी मिळून सुमारे ८० एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम असल्याचे ॲड. शेलार यांनी यावेळी नमूद केले. या मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीआयएस आधारित नियोजन, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली आणि वृक्षसंवर्धनासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्षाची वाढ, त्याचे संवर्धन आणि टिकाव यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.

याशिवाय पारंपरिक वृक्षारोपण पद्धतीसोबतच घनदाट, स्वयंपोषक आणि जैवविविधतेने समृद्ध शहरी जंगले निर्माण करण्यासाठी मियावाकी पद्धतीचाही अवलंब करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधत मुंबई उपनगराला अधिक हिरवे, अधिक सुंदर आणि अधिक पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राहुरीच्या तनपुरेंकडे पुण्यात 4 कोटींचे दोन फ्लॅट्स

मुंबई-अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांची संपत्ती १ कोटीने वाढली असून उत्पन्न घटल्याचे उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या एकूण स्थावर मालमत्तेचे चालू बाजार मूल्य १० कोटी ८२ लाख ५ हजार रुपये इतके आहे. यामध्ये पुण्यातील विमाननगर (लोहगाव) सारख्या उच्चभ्रू भागात असलेल्या प्रत्येकी १७५० चौरस फुटांच्या दोन आलिशान फ्लॅट्सचा समावेश आहे. या दोन्ही फ्लॅट्सची एकत्रित खरेदी किंमत ४ कोटी १९ लाख रुपये आहे.

जंगम मालमत्ता: शेअर्स आणि बँकेतील ठेवींचा मोठा भरणा

प्राजक्त तनपुरे यांच्याकडे २ कोटी ३६ लाख १७ हजार ८६९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांची पत्नी सोनाली तनपुरे यांच्या नावावर १ कोटी ७३ लाख ३५ हजार ३२५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. २०२४ मध्ये १ कोटी ३१ लाख ९२ हजार होती.
वार्षिक उत्पन्न आणि कर्जाचा डोंगर

वार्षिक उत्पन्न : तनपुरे यांचे वार्षिक उत्पन्न ३५ लाख ६८ हजार १३० रुपये इतके आहे, तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ४१,१३० रुपये नोंदवले गेले आहे. २०२४ मध्ये वार्षिक उत्पन्न ४६ लाख ८२३० इतके होते. तनपुरे यांच्यावर ४ कोटी ६२ लाख ३५ हजार ६०२ रुपयांचे कर्ज आहे.

सोने-चांदी : तनपुरे दांपत्याकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोने असून, त्याची चालू बाजार किंमत प्रत्येकी १२ लाख रुपये दर्शवण्यात आली आहे. सोनाली यांच्याकडे आणखी १० लाख रुपयांची ज्वेलरी आहे.

कंपन्यांमध्ये गुंतवणूक: ‘प्राजक्त टेक्स्टाईल प्रा. लि.’ मध्ये ४८.१८ लाख व ‘प्रसाद शुगर अँड ॲलाइड ॲग्रो प्रॉडक्ट्स’ मध्ये ४४.६३ लाख.

बँक खात्यांमधील ठेवी: स्टेट बँक ऑफ इंडिया (राहुरी शाखा) खात्यात सर्वाधिक ८१ लाख २९ हजार ९९१ रुपये जमा आहेत.

बेकायदा होर्डींग्ज वर जोरदार कारवाई सुरु:लोणकर चौकातील १४ होर्डींग्ज हटविले

पुणे- महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने बेकायदा होर्डींग्ज वर जोरदार कारवाई सुरु केली आहे. काल केशवनगर ,मुंढवा येथील लोणकर चौक , शरद नगर येथील 14 बेकायदा होर्डींग्ज महापालिकेने हटविले . हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ही कारवाई महापालिका उपायुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत अधीक्षक महेश निम्हण यांच्या नेतृत्वाखाली विजय धनवाल, योगेश काकडे, विनोद लांडगे, कुणाल कांबळे आणि स्वप्नील रासकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत अनधिकृत फलक आणि होर्डिंग हटविण्याची कारवाई केली
. यात २० बाय २० च्या होर्डींग्ज सह त्याहून मोठी ३ होर्डींग्ज होती. शहरात, उपनगरात जिथे जिथे बेकायदा होर्डींग्ज असतील ते शोधून तिथे तिथे जाऊन महापालिका त्यावर कारवाई करेल असे यांनी यावेळी म्हटले आहे.

स्टेंट निष्प्रभ ठरल्यास लेझर ठरते जीवनदायी: प्रगत कार्डिअॅक उपचारांद्वारे रुग्णांना मिळते आयुष्याची दुसरी संधी

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे प्रगत कार्डिअॅक लेझर थेरपीमुळे पारंपरिक हृदय उपचार पुरेसे ठरत नसलेल्या रुग्णांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळत आहे

पुणे: भारतात हृदयविकारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या कमी वयात वाढताना दिसत आहे. अभ्यासानुसार, भारतातील कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू हे ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये होतात, तर प्रत्येक चार हृदयविकाराच्या झटक्यांपैकी एक झटका ४० वर्षांखालील व्यक्तींना येतो. महाराष्ट्रातही तरुणांमधील हृदयविकारांचे प्रमाण वाढत असून, ३० वर्षांच्या आसपासच्या पुरुषांमध्ये तसेच ४० ते ६० वयोगटातील महिलांमध्ये याची नोंद होत आहे. पुण्यातही किशोरवयीन आणि ३० वर्षांखालील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यामागे बैठी जीवनशैली, अयोग्य आहार, वाढता ताणतणाव आणि इतर जीवनशैलीशी संबंधित घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अँजिओप्लास्टी करून घेतलेल्या रुग्णांचे आयुष्य वाढत असताना, अनेक रुग्ण काही वर्षांनंतर पुन्हा ब्लॉकेज, अरुंद झालेले स्टेंट्स आणि गुंतागुंतीच्या कोरोनरी आर्टरी डिसीजसह डॉक्टरांकडे परत येताना दिसत आहेत. अशा रुग्णांसाठी पुन्हा स्टेंट बसवणे, वारंवार हस्तक्षेप करणे किंवा बायपास शस्त्रक्रिया हा पर्याय असू शकतो. अशा परिस्थितीत, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे प्रगत कार्डिअॅक लेझर थेरपीमुळे उपचारांचे नवे पर्याय उपलब्ध होत आहेत. ही मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धत रक्तप्रवाह सुरळीत करण्यास, जलद पुनर्वसनास मदत करण्यास आणि निवडक रुग्णांमध्ये अतिरिक्त स्टेंट किंवा बायपास शस्त्रक्रिया टाळण्यास सहाय्य करते.

या उपचारांचा सकारात्मक परिणाम विविध वयोगटांतील रुग्णांमध्ये दिसून येतो. पूर्वी बसवलेल्या स्टेंटमध्ये गंभीर ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या ७६ वर्षीय रुग्णाला बायपास शस्त्रक्रिया टाळता आली आणि तो पुन्हा आपल्या दैनंदिन आयुष्यात परतू शकला. एका २१ वर्षीय तरुणाच्या गुंतागुंतीच्या कोरोनरी ब्लॉकेजवर उपचार करताना अतिरिक्त कायमस्वरूपी इम्प्लांट टाळून रक्तप्रवाह सुरळीत करण्यात आला, ज्यामुळे त्याच्या स्वप्नांना आणि भविष्यातील आयुष्याला नवी दिशा मिळाली. तसेच दोनदा हृदयविकाराचा झटका आलेल्या ५६ वर्षीय रुग्णावर पुनरावृत्ती झालेल्या ब्लॉकेजसाठी लेझर-असिस्टेड अँजिओप्लास्टी करण्यात आली, ज्यामुळे त्याला आणखी एका मोठ्या शस्त्रक्रियेच्या ओझ्याशिवाय पुढील आयुष्य जगता आले. त्यांच्या कथा वेगळ्या असल्या तरी त्यांचा अनुभव एकच होता—आयुष्य, आरोग्य आणि आशेची नवी संधी.

प्रगत कार्डिअॅक लेझर थेरपी ही विशेषतः निष्प्रभ ठरलेल्या स्टेंट्स, गुंतागुंतीचे ब्लॉकेज आणि कॅल्सिफाइड धमन्यांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरते. ही मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धत असून बहुतांश रुग्णांना २४ तासांच्या आत डिस्चार्ज दिला जातो.

या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबद्दल बोलताना, डॉ. अभिजित पळशीकर, संचालक – कार्डिओलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, म्हणाले, “अधिकाधिक रुग्ण अँजिओप्लास्टी करून घेत असून त्यांचे आयुष्य वाढत असल्याने, पुन्हा हस्तक्षेपाची गरज भासणाऱ्या गुंतागुंतीच्या कोरोनरी आर्टरी डिसीजच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रगत कार्डिअॅक लेझर तंत्रज्ञानामुळे अशा आव्हानात्मक प्रकरणांचे अधिक अचूकपणे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. पूर्वी बसवलेले स्टेंट निष्प्रभ ठरलेल्या रुग्णांमध्ये आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी उपचार करत आहोत आणि अनेकांना बायपास शस्त्रक्रिया टाळण्यास मदत करत आहोत.”

डॉ. निलेश सिंग, हॉस्पिटल डायरेक्टर, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना,“अॅडव्हान्स्ड कार्डियाक लेझर तंत्रज्ञानाचा परिचय आणि त्याचा वापर हा रुग्णांसाठी आधुनिक हृदयविकार उपचार अधिक सुलभ करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. या पद्धतीमुळे गुंतागुंतीच्या कोरोनरी आजारांच्या व्यवस्थापनात कमी आक्रमक (मिनिमली इनवेसिव्ह) उपचार पद्धतीचा वापर शक्य झाला आहे. अशा नवोपक्रमांमुळे क्लिनिकल परिणाम आणि रुग्णांचा अनुभव सुधारण्यास मदत होत असून, योग्य रुग्णांमध्ये पुन्हा पुन्हा हस्तक्षेप करण्याची गरज कमी करण्यासही हातभार लागत आहे. कालांतराने, विविध क्लिनिकल परिस्थितींतील अनेक रुग्णांच्या उपचारात याचा उपयोग झाला आहे.”

निष्प्रभ ठरलेले स्टेंट्स, पुनरावृत्ती होणारे ब्लॉकेज आणि गुंतागुंतीच्या कोरोनरी आर्टरी डिसीजने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी प्रगत कार्डिअॅक लेझर थेरपी हा केवळ एक पर्यायी उपचार नाही, तर त्यांना पुन्हा आपल्या कुटुंबाकडे, करिअरकडे आणि दैनंदिन आयुष्याकडे आत्मविश्वासाने परतण्याची नवी आशा देणारा मार्ग आहे.

महामंडळातील गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार हटवा-अभिनेत्री भाग्यश्री देसाईंचे आवाहन

पुणे(अभिषेक लोणकर)- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामंडळ बचावो अपक्ष संघ उमेदवारांना पाठींबा देत पुण्यातील ख्यातनाम अभिनेत्री, निर्माती भाग्यश्री देसाई यांनी मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनल वर कडाडून हल्ला केला आहे त्यांनी यावेळी महामंडळाच्या संचालकांनी मतदार यादीतून माझेच नाव नाही तर अनेकांची नावे हटविली आणि स्वतःला मतदान करतील याचा विश्वास असलेल्यांची नावेच मतदार यादीत राहतील याचे कुभांड रचल्याचा आरोप करत महामंडळातील गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार हटवा असे आवाहन केले .या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक अमोल भावे, निर्माता महादेव शिरोळकर, मानसिंग कदम, कला दिग्दर्शक उल्हास नांद्रे या उमेदवारांसह अपक्ष संघाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री, निर्मात्या भाग्यश्री देसाई या उपस्थित होत्या. अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि शाहीर संभाजी भगत यांच्यासह अनेकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा अपक्ष संघाच्या वतीने करण्यात आला

मतदार यादीच्या मुद्द्यावर बोलताना भाग्यश्री देसाई म्हणाल्या मतदार यादी करताना जाणूनबुजून आपल्याला मते मिळणार नाहीत असा संशय असलेल्यांची नावे वगळून मतदार यादी करण्यात आली ,मी स्वतः कित्येक वर्षे मतदार होते आणि आता माझे मत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले . मृत व्यक्तींची माहिती असून त्यांची नावे मतदार यादीत ठेवण्यात आली त्यामुळे त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे . चांगली लोकं महामंडळावर यावीत म्हणून मी या अपक्ष उमेदवारांना पाठींबा देत आहे. भाग्यश्री देसाई यांनी सुमारे ४० हजार संभाव्य मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप केला. चित्रपटसृष्टीशी काडीचा संबंध नसलेल्या लोकांची नावे मतदार यादीत घुसवली आहेत. हा सर्व गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार असल्याची टीका अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी केली.

उमेदवार व चिन्हे
१) अमोल अरविंद भावे – दिग्दर्शक विभाग – फेटा
२) शरद निवृत्ती लोणकर – प्रसिद्धी विभाग – तबला-डग्गा
३)संतोष मारुत्तीराव शिंदे – अभिनेता विभाग – मोरपीस
४) अवधुत मनोहर जोशी – दिग्दर्शक विभाग – गिटार
५) मनोज उदयसिंह मराठे – निर्मिती व्यवस्था विभाग – मोटारगाडी
६) महादेव यशवंत शिरोळकर – निर्माता विभाग – शिट्टी
७) मानसिंग परशुराम कदम – निर्माता विभाग – छत्री
८) उल्हास भालचंद्र नांद्रे – कलादिग्दर्शक विभाग – पाटी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत समोरासमोर दिसणारी दोन प्रमुख पॅनल प्रत्यक्षात एकाच विचारधारेची असून त्यांच्यातील संघर्ष हा केवळ दिखावा असल्याचा गंभीर आरोप यावेळी अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत महामंडळाच्या कारभारात असलेल्या संचालकांनी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याऐवजी अंतर्गत वाद आणि राजकारणातच वेळ घालवल्याचा आरोप त्यांनी केला. प्रस्थापितांची मुजोरी मोडीत काढून महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवारांनी एकत्र येऊन संघ उभा केल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना लोणकर म्हणाले की, दोन्ही पॅनलमधील अनेक माजी संचालक वेगवेगळ्या गटांतून निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातील परस्पर समन्वय स्पष्ट दिसून येतो. काही उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी दोन्ही गटांनी एकमेकांना मदत केल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला “मिलीभगत” असे संबोधले.
महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा देखील त्यांनी फेटाळून लावला. काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांमधील संबंध सर्वश्रुत असल्याचे सांगत, निवडणूक प्रक्रियेवर राजकीय प्रभाव अद्याप कायम असल्याचे त्यांनी म्हटले.
वितरण आणि प्रसिद्धी विभागातून निवडणूक लढवत असलेल्या लोणकर यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवरही टीका केली. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी आणि वितरण व्यवसायाच्या नावाखाली आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत, आपण गेली चार दशके विनामूल्य प्रसिद्धीचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
महामंडळात नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज व्यक्त करताना लोणकर म्हणाले की, विद्यमान गटांच्या राजकारणाला कंटाळलेल्या सभासदांनी यावेळी बदलाचा निर्णय घ्यावा. पुणे, मुंबई आणि राज्यातील सर्व सुज्ञ मतदारांनी मतदानासाठी पुढे आल्यास चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तींना संधी मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दशकातील कारभारावर टीका करताना दिग्दर्शक अमोल भावे यांनी सभासद, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गरीब कलाकारांच्या निवासासाठी आणि वृद्धाश्रमासाठी दिलेल्या जागेवर अद्याप कोणतेही ठोस काम झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महामंडळाच्या निधीचा वापर कार्यालयांसाठी करण्यात आला, मात्र कलाकारांच्या कल्याणासाठी अपेक्षित उपक्रम राबवले गेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
महामंडळाच्या घटनेतील बदल, मालमत्ता निर्मिती आणि आर्थिक निर्णयांविषयी सभासदांना पुरेशी माहिती देण्यात आली नसल्याचाही आरोप महादेव शिरोळकर यांनी केला. पुणे महापालिकेकडून अत्यल्प भाडेतत्त्वावर उपलब्ध होऊ शकणारी कार्यालयाची जागा नाकारून नंतर स्वतंत्र कार्यालयांवर खर्च करण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

लोकेश चंद्र यांना महा आयकॉन पुरस्कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान

मुंबई

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांचा विजेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‌‘महा आयकॉन 2026‌’ हा जीवनगौरव पुरस्कार देऊन पुढारी‌’ माध्यम समूहातर्फे गौरव करण्यात आला.

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्गमंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत गुरुवारी हा पुरस्कार देण्यात आला.

राज्याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर, पुढारी समुहाचे मुख्य संपादक श्री. प्रतापसिंह जाधव आणि संपादक श्री. योगेश जाधव मंचावर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत आणि राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी ‌‘पुढारी‌’ माध्यम समूहाने ‌‘महा आयकॉन 2026‌’ या नव्या उपक्रमाचे आयोजन केले होते.