स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा संगीता देवकर : रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन तर्फे सेवा उत्कृष्टता गौरव पुरस्कार
पुणे : प्रत्येक महिलेमध्ये कोणत्यातरी प्रकारचे गुण दडलेले असतात. या गुणवत्तेला प्रोत्साहन दिल्यास ती महिला आपल्या पायावर उभी राहू शकते. एक महिला जर आपल्या पायावर उभी राहिली, तर ती निश्चितच आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊन कुटुंबाला आधार देऊ शकते. महिलांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दिल्यास त्यामधून रोजगार निर्मिती शक्य होते, असे मत पुणे महापालिकेतील स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा राणी लक्ष्मीबाई महिला प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुख संगीता देवकर यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन तर्फे सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी भांडारकर इन्स्टिट्यूट मधील सभागृहात संगीता देवकर यांना रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांच्या हस्ते सेवा उत्कृष्टता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर वळव्हणकर, हेमंत तोडकर, शोभा सोमाणी आदी यावेळी उपस्थित होते. रोटरी क्लबच्या सामाजिक कार्यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या डॉ. चंद्रशेखर वळव्हणकर, विद्यासागर जाधव, जोस्ना जाधव, सुनील हिंगमिरे, सचिन देशपांडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
संगीता देवकर म्हणाल्या, पुणे महापालिकेच्या सहयोगाने २००४ मध्ये महाराणी लक्ष्मीबाई महिला प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली . या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार महिलांना ब्युटी पार्लर मोबाईल दुरुस्ती, मेकअप, मेहंदी अशा विविध प्रकारच्या गुणवत्ता प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहे. यामुळे केवळ महिलाच स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या नाहीत तर त्यातून आम्ही कुटुंब स्वयंपूर्ण करण्यास मदत केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या, राजकारण हे आळूच्या पानावरील दवा प्रमाणे असते. ते कायमस्वरूपी टिकत नाही. परंतु राजकारणाच्या माध्यमातून जर समाजकारण केले आणि समाजाला आपल्या पदाचा उपयोग करून देता आला, तर त्यामधून मिळणारे समाधान हे वेगळ्या प्रकारचे असते. राजकारण कायमस्वरूपी टिकत नाही, परंतु समाजकारण हे कायमस्वरूपी टिकते आणि त्याचा निश्चितच समाजामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संतोष मराठे म्हणाले, संगीता देवकर यांनी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून स्वयंपूर्ण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आजही समाजामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवाभावी वृत्तीने जागृत राहून इतरांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था कार्यरत आहेत. रोटरीने त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यास निश्चितच थोडासा उशीर केला आहे. इतरांच्या सेवेचा सन्मान ठेवणे आणि त्यातून आदर आणि सेवाभाव वाढीस लावणे, हे रोटरीचे मुख्य उद्देश आहे. त्यामधूनच संगीता देवकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. संगीता देवकर यांच्या कार्यातून प्रोत्साहन घेऊन इतरांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्यास सहयोग केल्यास त्याचा समाज बांधणीत महत्वाचे योगदान देता येऊ शकते.
डॉ. चंद्रशेखर वळव्हणकर म्हणाले , समाजहित आणि मानव सेवा केंद्रबिंदू ठेवून रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन कार्य करत आहे. पुणे आणि जुन्नर परिसरात डोळ्यांच्या १ हजार मोफत शस्त्रक्रिया करण्याचे ध्येय पुन्हा संस्थेने ठेवले असून आतापर्यंत ४०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

