नवी दिल्ली-
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत यमुना नदी पुनरुज्जीवनाच्या मुद्द्यावर आढावा बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, दिल्लीचे उपराज्यपाल तरनजीत सिंग संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता, प्रवेश साहिब सिंग आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. यमुनेची स्वच्छता करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने हाती घेतलेला एक संकल्प आहे आणि हे उद्दिष्ट लवकरच साध्य करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे असे ते म्हणाले. दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारांसह सर्व संबंधित मंत्रालयांनी यमुनेच्या स्वच्छतेसाठी तुकड्या तुकड्यात काम न करता, संघभावनेने आणि एकात्मिक कृती आराखड्याच्या आधारे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

हरयाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांनी मिळून यमुना नदीत एक प्रमाणित पर्यावरणीय प्रवाह सुनिश्चित केला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली. दिल्लीतील दुग्धालयांमधील कचरा यमुनेत जाण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली महानगरपालिका आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्यात एका सामंजस्य करार केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. या करारांतर्गत हा कचरा नदीत जाण्याऐवजी त्याचे बायोगॅस आणि खतामध्ये रूपांतर केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.


