Home Blog Page 1573

अखेर अजित पवार म्हणाले ,’ बीआरटी काढा …नगर रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल थेट विमाननगरपर्यंत करणार

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अतिक्रमणे प्रथम काढा नदी काठच्या रस्त्याच्या सात दिवसात निविदा

बीआरटी ला विरोध करूनच अजित पवारांनी घालविली होती कलमाडींची सत्ता

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी थेट विमाननगर मधील हयात हॉटेल पर्यत दुमजली उड्डाणपूलाचा आराखडा तयार करण्यात येईल अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकऱयांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शुक्रवारी दिली. तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी या मार्गावरील बीआरटी काढून टाकून अतिक्रमणांवर कारवाई करावी अशा सूचना पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासदर्भात उपाययोजना करण्यासाठी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नुकतेच महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगर रस्त्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीचा आढावा घेतला. यावेळी आमदार टिंगरे यांच्यासह एनएचएआयचे संजय कदम, महापालिका अतिरिक आयुक्त विकास ढाकणे, अधिक्षक अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी तसेच पीडब्लूडी, पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय मगर आणि महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी वाहतूक कोंडीच्या कारणांची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या माध्यमातून पुणे ते औरंगाबाद या महामार्गाचे जे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात शिक्रापूर ते वाघोली पर्यत जे दुमजली उड्डाणपूल करण्यात येणार आहे तो थेट विमाननगर मधील हयात हॉटेल पर्यत करण्यासंबंधीचा आराखडा तयार करावा. त्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यास मंजुरी मिळवून देऊ असे पवार यांनी सांगितले. तसेच महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दीक्षित यांच्याशी पवार यांनी फोनवरून संपर्क साधून उड्डाणपूलाच्या कामानुसार मेट्रोचा सुधारित डीपीआर करण्याच्या सुचना दिल्या. एनएचआयच्या अधिकऱयांनी त्यास सहमती दिली. तसेच केंद्र शासनाच्या जे एनएनयुआरएम योजनेंतर्गत रस्त्यासाठी निधी आणताना त्यावर बीआरटी योजना बंधनकारक होती. त्यानुसार त्यावेळेस बीआरटी योजना राबविली होती. आता मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्याने बीआरटी मार्ग काढून टाकावा अशा सूचना पवार यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या. तसेच वाघोली, लोहगावकडून पिंपरी चिंचवड कडे जाणाऱ्या रिंगरोडचे कामही तात्काळ सुरू करण्यास पवार यांनी सांगितले. दरम्यान नगर रस्त्यावरील वाहतूक उपाय योजनांसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सागण्यात आले.

नदी काठच्या रस्त्याच्या सात दिवसात निविदा
नगर रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या खराडी- शिवणे रस्त्याच्या कामाचा आढावा पवार यांनी घेतला. यावेळी अति. आयुक्त ढाकणे यांनी या रस्त्यावरील राहिलेल्या दोन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून ती आता झाली असून आठवडा भरात रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल असे सांगितले.

माझ्या पक्षाच्या लोकांची असेल तरी अतिक्रमणे काढा
नगर रस्त्यावर वाघोली पर्यत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तात्काळ कारवाई करा. त्यात माझ्या पक्षाच्या लोकांची जरी अतिक्रमणे असली तरी त्यावर कारवाई करून ती काढून टाका अशा स्पष्ट सूचना पवार यांनी दिल्या.

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. २१ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. या मुहूर्तावर बालविवाह होण्याच्या शक्यताही लक्षात घेता पुणे जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. बालविवाह झाल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल असाही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला असून बालविवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीची बनत आहेत. कोरोना कालावधीत इतर समस्यासोबत बालविवाह ही भेडसावणारी महत्त्वपूर्ण समस्या बनली होती. सततचे टाळेबंदी (लॉक डाउन), ऑनलाइन शाळा, बेरोजगारी या मुळे बालविवाहचे प्रमाण जिल्ह्यात वाढले होते. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या एक वर्षांच्या काळात पुणे जिल्ह्यात एकूण १६ बाल विवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सामुदायिक तसे एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलने हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला सतर्क केले आहे.

बालविवाहाच्या गुन्ह्यात कठोर शिक्षा
बालविवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार असे विवाह बेकायदेशीर असतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित असून अशा गुन्ह्यात १ लाख रुपये दंड व २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली जाते.

ग्राम बाल संरक्षण समित्यांनी विशेष सतर्कता बाळगावी
या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ग्रामस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीचे सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत.

बालविवाह बाबतची माहिती कोणाला समजल्यास त्यांनी विनाविलंब स्वत: पुढाकार घेवून कार्यक्षेत्रातील नजीकच्या पोलीस स्टेशन अंतर्गत नियुक्त बाल कल्याण पोलीस अधिकारी, सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बाल कल्याण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयासह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती ए.एस. कांबळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र भूषणमागे राजकारणच -शरद पवार

मुंबई-केवळ राज्य सरकारने खबरदारी न घेतल्याने महाराष्ट्र भूषण सोहळ्यात दुर्घटना घटना घडली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराला एवढे लोक बोलावणे याचा अर्थ प्रचंड शक्ती जमवून आगामी निवडणुकीच्या संदर्भात स्वतःच्या राजकारणाला अनुकूल वातावरण तयार करायचे हा होता, पण त्याची किंमत निष्पापांना मोजावी लागली, असा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.घाटकोपरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर झाले. या सोहळ्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पवार यांनी केंद्र सरकार, राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सरकारी होता. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम होता. धर्माधिकारींचा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने झाला, पण हा कार्यक्रम त्यांच्या संघटनेने आयोजित केलेला नव्हता. तो महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी नक्की आकडा माहिती नाही, पण काय आकडा असेल ते असेल पण लोक मृत्यूमुखी पडले. केवळ राज्य सरकारने खबरदारी न घेतल्याने ही घटना घडली. उष्माघाताची शक्यता असतानाही हा कार्यक्रम उघड्यावर घेतला गेला. उन्हाळ्यात व्यवस्था करायला हवी होती. मंडप टाकावा. वाईट प्रसंग येऊ नये अशी काळजी घेतली नाही.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्काराला एवढे लोक बोलावणे याचा अर्थ एकच होता की, प्रचंड शक्ती जमवून त्यातून स्वतःच्या राजकारणाला अनुकूल वातावरण आणि आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करायचे होते. त्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला गेला आणि त्याची किंमत निष्पापांना मोजावी लागली.

शरद पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाडांनी सांगितले की, ती चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत व्हावी. तसेच जयंत पाटील यांनीही विद्यमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली. पण त्या मागणीकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. या प्रकरणाची चौकशी एका प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत केली जात आहे. तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे यात दुमत नाही. पण शेवटी तो सरकारी अधिकारी आहे, तो कितीही प्रामाणिक असला तरीही आपल्या बाॅससमोर सत्य सांगू शकत नाही त्यामुळे हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशामार्फतच चौकशी व्हायला हवी.

“श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंकेची निवडणूक बिनविरोध “

पुणे –येथील ” श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंकेची सन २०२३ ते २०२८ या‌ कालावधीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून बॅंकेच्या अध्यक्षपदी अॅड अभय भाकचंद छाजेड तर उपाध्यक्षपदी अशोकराव झुंबरलाल  नहार यांची एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ.स्नेहा जोशी यांनी कामकाज पाहिले.पुणे शहरातील महत्वाच्या  चार  शाखा पूर्णपणे संगणकीकृत कार्यरत असून.श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंक नाविन्याचा  व नविन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करून व्यवसायवाढ करत आहे.सन २०२३- २०२८ या कालावधीसाठी पुढील संचालकांची निवड बिनविरोध झाली.

नवनियुक्त संचालक   

ऍड .अभय भाकचंद छाजेड, श्री .सुरेश मारुती कोते, श्री. विजयकुमार मर्लेचा, श्री. संजय‌ रमेशलाल गुगळे, श्री.मोरेश्वर देशपांडे, श्री.विरेंद्र किराड, श्री. अशोक नहार , श्री.अमरजितसिंग मक्कड , श्री बाबूराव गायकवाड, श्री.अविनाश गुलाबचंद कोठारी ,  सौ. प्रिया महिंद्रे , सौ. भावना केदारी , श्री. नारायण गोंजारी , श्री विलास पगारीया, श्री.नितीन शहा , श्री. हिंमत संचेती, श्री.संजय लोढा 

सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. २१: सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. श्री. पाटील यांनी वाचक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते, ग्रंथालयातील अधिकारी-कर्मचारी आणि ग्रंथप्रेमींना जागतिक ग्रंथ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गेल्या काही महिन्यात राज्यात वाचन संस्कृती वाढविण्याच्या अनुषंगाने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ, विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा ग्रंथालय अधिकारी’ पदांची निर्मिती, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये बालकुमार ज्ञानकोपरा निर्मिती तसेच महत्त्वपूर्ण ग्रंथालयांना आधुनिकीकरणासाठी निधी आदी निर्णय मंत्री श्री. पाटील यांनी घेतले आहेत.

‘जागतिक ग्रंथ दिवस’ (२३ एप्रिल) निमित्ताने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करावे. समाजात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी सर्व ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी नागरिकांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा. ग्रंथालय चळवळ ही लोक चळवळ व्हावी यासाठी सर्व समाजाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्के वाढ

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी ६० टक्के अनुदानवाढीचा तातडीने निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील १० हजार ९१८ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मिळाला आहे. वाढीव अनुदानासह मागील वर्षातील थकीत अनुदानाचे सुमारे ६० कोटी २० लाख रुपये या ग्रंथालयांना वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रंथालय सेवक व कार्यकर्त्यांचा वाचनसेवेसाठी उत्साह वाढला आहे.

सात जिल्ह्यांत नवीन पदनिर्मिती

ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्त विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला व बुलढाणा या सात जिल्ह्यामध्ये ग्रंथालयांच्या कामकाजात गतिमानता यावी यासाठी अराजपत्रित पदे रद्द करुन त्याऐवजी ‘जिल्हा ग्रंथालय अधिकारी’ या गट ब संवर्गातील नवीन पदांची निर्मिती करण्यात आली.

ग्रंथालयांच्या आधुनिकीकरणासाठी निधी

ग्रंथालयांचे बदलत्या काळानुसार आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार कालिना मुंबई येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी, रत्नागिरी येथील शासकीय विभागीय ग्रंथालयाचे आधुनिकीकरण व डिजिटायजेशन, मुंबई येथील एशियाटिक सोसायटीकडील दुर्मिळ ग्रंथांचे व हस्तलिखितांचे डिजीटायजेशन करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर एशियाटिक सोसायटी मुंबई यांच्या ग्रंथालयाच्या विकासासाठी दरवर्षी एक कोटी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ग्रंथालय अधिनियमामध्ये सुधारणेसाठी समिती गठीत

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम, १९६७ मध्ये कालानुरुप सुधारणा करणे आवश्यक असल्याने राज्य ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन समितीचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये बालकुमार ज्ञानकोपरा

शालेय व कुमारवयीन मुलांमध्ये वाचनाची आवड कमी होत असल्याने तसेच मुलांचा जास्तीत जास्त वेळ भ्रमणध्वनी व दूरचित्रवाणी संचाच्या स्क्रीनसोबत जात आहे. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी व त्यांना पुस्तकांकडे वळवण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये त्यांच्याकरिता बालकुमार ज्ञानकोपरा निर्माण करण्याची संकल्पना ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली जात आहे.

वाचन संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न

राज्यात वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मंत्री श्री.पाटील यांच्या प्रयत्नातून पुणे आणि कोल्हापूर येथे सुरू असलेल्या फिरत्या ग्रंथालयाच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याच धर्तीवर राज्यातील सहा विभागात सहा फिरती ग्रंथालये सुरू करण्यात येणार आहेत.

अ वर्ग ग्रंथालयात ग्रंथ विक्रीस परवानगी

शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत चांगली आणि त्यांच्या आवडीची पुस्तके पोहोचावीत यासाठी अ वर्ग ग्रंथालयात त्यांना स्वतः किंवा प्रकाशक अथवा पुस्तक विक्रेत्यामार्फत ग्रंथ विक्रीस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रंथालय सक्षमीकरणालाही मदत होणार आहे.

“गुजरात दंगलीतल्या आरोपींना निर्दोष सोडणं ही संविधानाची हत्या”, शरद पवारांचा हल्लाबोल!

गुजरातेत दंगलीला सत्ताधारी जबाबदारनिकालाने कायदा, संविधानाचीही हत्या

मुंबई-गुजरातमध्ये अल्पसंख्यांकांची हत्या झाली. ती राजकीय दंगल होती. यामागे तेव्हाचा सत्ताधारी पक्ष जबाबदार होता. त्यात खासदार, आमदार, मंत्र्यांना अटक झाली. जामिन मिळाला. एवढे दिवस केस चालली. पण सर्व लोक निर्दोष झाले. म्हणजे त्यावेळी ज्या लोकांची हत्या झाली ती कशाने झाली? मृत्यूमुखी पडलेल्यांची हत्याच झाली; पण कायदा आणि संविधानाचीही हत्याच झाली. त्याचासुद्धा मर्डर झाला हे कालच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते घाटकोपर (पूर्व ) येथील राखी जाधव यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याला संबोधित करीत होते.

शरद पवार म्हणाले, गुजरातमध्ये अल्पसंख्यांकांची हत्या झाली. हल्ले झाले काही लोक मृत्यूमुखी पडले. ही राजकीय दंगल झाली. यामागे तेव्हाचे सत्ताधारी पक्ष जबाबदार होते. त्यात ज्यांना अटक झाली त्यामध्ये महिला, खासदार, आमदार, मंत्री होते. एवढे दिवस केस चालली. या लोकांना अटक झाली आणि लगेचच जामिनही दिला गेला व त्यानंतर काल हायकोर्टाचा निर्णय आला की, हे सर्व लोक निर्दोष आहेत. म्हणजे त्यावेळी ज्या लोकांची हत्या झाली ती कशाने झाली?

शरद पवार म्हणाले, जर हल्लाच केला नाही तर हत्या होईलच कशी? हत्या झाल्यानंतरही हे निर्दोष म्हणून सोडले जातात. एका दृष्टीने जे मृत्यूमुखी पडले, त्यांची तर हत्याच झाली; पण कायदा आणि संविधानाचीही हत्याच झाली. त्याचासुद्धा मर्डर झाला हे कालच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. हे सर्व आज ज्यांच्या सत्ता हातात आहे, त्या सत्तेचा वापर ज्या पद्धतीने ते करीत आहेत त्यातून हे झाले.

शरद पवार म्हणाले, आज अनेक प्रश्न आहेत, महागाईचे संकट आहे. हजारोंच्या संख्येने लोक शोधत आहेत पण नोकरी मिळत नाही. या देशाचा अन्नदाता उद्धवस्त होत आहे. अन्नधान्य, फळं नुकसानीमुळे रस्त्यावर फेकावा लागला. या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे.

जेलमध्ये टाकण्याची सरकारची नितीविद्यमान सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना तेरा महिने तुरुंगात ठेवले पण आता अहवाल आला की, सव्वा कोटींचा भ्रष्ट्राचार झाला आधी शंभर कोटींचा घोटाळा झाला असे म्हटले गेले होते. एक कोटी रुपये अनिल देशमुखांनी शिक्षण संस्थेला देणगी दिली तर त्यांना तेरा महिने शिक्षा याचा अर्थ काय तर लोकशाहीला आज कुणी भुमिका घेवून पुढे येत असेल पण ती आमच्या सुसंगत नसेल तर त्यांना जेलमध्ये टाकू ही आत्ताच्या सरकारची निती आहे.

शरद पवार म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील केसवर अर्थ नाही पण त्यांनाही तुरुंगात ठेवले गेले. भाजपचे आणि आज आमचे नेते असलेले एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आली. त्यांच्या जावयाची केस सव्वादोन वर्षांपासून दाबुन ठेवली ती कोर्टात नेली जात नाही अशी स्थिती होती. ही सर्व उदाहरणे म्हणजे सत्तेचा गैरवापर करणे होय. हा देश, राज्य आम्ही म्हणेल तशाच पद्धतीने चालावा अशी त्यांची भूमिका आहे.

शरद पवार म्हणाले, जातीयवाद वाढवला जात आहे. धर्म, जात वेगळी आणि विषयांची सुसंगत नसलेल्यांची गळचेपी होत आहे. या काळात जागे राहावे लागले. काहीही किंमत द्यावी लागली तरी त्यांच्या बाजूने जायचे नाही. अन्याय, अत्याचार ज्यांच्यावर झाला त्यांच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे.

उबेरसह चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले

पुणे दि २१ : ‘मोटार वाहन समुच्चयक मार्गदर्शक सूचना- 2020’ मधील आवश्यक तरतुदींची पूर्तता होत नसल्याच्या अनुषंगाने मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे या चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा संवर्गात ‘समुच्चयक अनुज्ञप्ती’ (ॲग्रीगेटर लायसन्स) नाकारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

गुरुवारी (20 एप्रिल) जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चार कंपन्यांचे ॲग्रीगेटर लायसन्स साठीचे अर्ज विचारार्थ ठेवण्यात आले होते. यामध्ये मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे व मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांनी चार चाकी हलकी मोटार वाहने व तीन चाकी ऑटो रिक्षा या दोन्ही संवर्गासाठी तर मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे व मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे यांनी तीन चाकी ऑटो रिक्षा संवर्गासाठी ॲग्रीगेटर लायसन्स मिळण्यासाठी अर्ज केले होते.

मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर गाईडलाईन्स, २०२० मधील तरतुदीन्वये चारही अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमारे सादर करण्यात आले होते. चारही कंपन्यांचे ऑटोरिक्षा संवर्गात ‘समुच्चयक अनुज्ञप्ती’ नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मे. ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. व मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांना चारचाकी हलकी मोटार वाहने संवर्गाकरीता ॲग्रीगेटर लायसन्स जारी करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे, अशीही माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.
0000

संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता

पुणे, दि. २१: शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी राबविण्यात येत असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न करणे, अनावश्यक त्रुटी काढून विमा प्रकरणे नाकारण्याचे प्रकार विमा कंपन्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे.

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करुन संकटातून बाहेर काढत त्यांना मानसिक बळ देणारी योजना म्हणून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ ओळखली जाणार आहे.

योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदास पात्र बाबी
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीजपडून झालेला मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबी या योजनेंतर्गत अपात्र असतील.

ही योजना संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच योजनेच्या विहित कालावधीतील प्रत्येक दिवसांच्या २४ तासांसाठी लागू आहे. तथापि या योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास या योजेनेअंतर्गत लाभ मिळण्यास अपात्र असेल.

योजनेअंतर्गत देण्यात येणारे सानुग्रह अनुदान
अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास अशावेळी 2 लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे
विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गांव नमुना क्र.6 नुसार वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र अथवा ओळख किंवा वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील यांचा माहिती अहवाल तसेच अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/ शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यापासून तीस दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील. प्रस्तावासाठी कृषि विभागाचे संबंधित गावातील कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक आदी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करतील.

प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समित्या
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानास प्राप्त प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जिल्हा अपिलीय समिती आणि योजनेच्या राज्यस्तरीय संनियत्रंणासाठी अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आलेल्या आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त (कृषि) यांना पर्यवेक्षक व संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, गुणांकन कार्यपद्धतीचे नियोजन करावे-चंद्रकांत पाटील

मुंबई, : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
कैवल्यधाम, लोणावळा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने दिनांक १९ व २० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या सुकाणू समितीच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांचे अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी परीसस्पर्श सारखी योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. विद्यार्थी हिताला अधिक प्राधान्य देऊन विद्यापीठे व महाविद्यालयांनी मेजर, मायनर व जेनेरिक विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम रचना, ॲकॅडेमिक बँक क्रेडीट्सची नोंदणी, प्रवेश प्रक्रियेचे स्वरुप यांचे योग्य नियोजन करावे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक, कौशल्याधिष्ठित असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत धोरणाची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती व शासनाद्वारे करण्यात येत असलेले प्रयत्न माध्यमांपर्यंत पोहचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, विद्यापीठ, महाविद्यालय यांच्या नॅक मूल्यांकन व एनआयआरएफ गुणांकनाबाबत डॉ. आर. एस. माळी यांनी मार्गदर्शन केले.
उच्च शिक्षण क्षेत्रात गुणात्मक विकास, उद्योगजगताशी समन्वय, बहुविद्याशाखीय शिक्षणपद्धतीचा अंगीकार होण्यासाठी कला शिक्षणाची सुविधा इतर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन शिक्षण क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, माध्यम क्षेत्राचा सहभाग, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत या चर्चासत्रात दिशानिश्चिती करण्यात आली. तसेच कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची रचना होण्यासाठी व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील तज्ञांचाही या चर्चासत्रात प्रत्यक्ष सहभाग होता.
राज्यातील अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालयांत आगामी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यासाठी करावयाची कार्यवाही व त्याअनुषंगाने धोरणात्मक निर्णय या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, विकासचंद्र रस्तोगी, सुकाणू समितीचे प्रमुख डॉ. नितीन करमळकर व इतर सदस्य, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उपसचिव, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स अध्यक्ष दिपक करंदीकर, उद्योजक रामभाऊ भोगले, संजीव मेहता, माध्यम क्षेत्रातील तज्ञ श्रीरंग गोडबोले, आयटी तज्ञ, दीपक हार्डीकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे संजय नलबलवार हे उपस्थित होते.
यावेळी सुकाणू समितीने राज्य शासनास सादर केलेला अंतरीम अहवाल स्वीकृत करण्यात आला.

अमिताभ बच्चन म्हणाले –’अब तो पैसा भी भर दिये हैं हम … उ नील कमल वापस लगाय दें ट्विटर भैय्या’

ट्विटरवरून ब्लू टिक काढले:

ट्विटरने ब्लू टिक काढलेल्या यादीत अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि राजकीय नेत्यांचा समावेश आहे. एलन मस्क यांनी ट्विटर अकाउंट विकत घेतल्यानंतर यूजर्सना ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे सांगितेले होते. त्यानुसार आता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, विराट कोहली, रोहित शर्मा, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटी आणि नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक आता काढण्यात आली आहे. आता ही ब्लू टिक पुन्हा हवी असल्यास ट्विटर ब्लूच सब्सक्रिप्शन घेणे गरजेचे आहे.

यावर आता सेलिब्रिटी व्यक्त होत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते कॉमेडियन वीर दास, नर्गिस फाखरी यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बींनी तर आता पैसे भरले आहेत, ब्लू टिक परत करा, असे म्हटले आहे.

अमिताभ बच्चन म्हणाले- ‘उ नील कमल वापस लगाय दें ट्विटर भैय्या’
अमिताभ बच्चन यांनी मजेशीर अंदाजात ट्विटरकडे ब्लू टिक परत करा असे म्हटले आहे. त्यांनी लिहिले, “T 4623 – ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम… तो उ जो नील कमल होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया, ताकि लोग जान जायें की हम ही हैं .. हाथ तो जोड़ लिये रहे हम। अब का, गोड़वा जोड़े पड़ी का ??”

खारघर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय सरकारी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक.

खारघर प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प का ?

मुंबई, दि. २१ एप्रिल

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू हे शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत. सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे. सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी असेल? म्हणून सरकारने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. या घटनेतील सत्य जनतेसमोर यावे यासाठी काँग्रेस पक्ष दिनांक २४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषद घेणार आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, खारघरमधील घटनेत १४ लोकांचे मृत्यू झाल्याची सरकारी आकडेवारी आहे परंतु ही संख्या जास्त आहे सरकार मात्र मृतांची खरी संख्या बाहेर येऊ देत नाही. शिंदे सरकार या घटनतील सत्य लपवत आहे. ५०० पेक्षा जास्त लोक उपचार घेत आहेत ही संख्या सुद्धा जास्त आहे पण सरकार वस्तुस्थिती जनतेसमोर येऊ देत नाही. खारघरमधील १४ बळींच्या घटनेवर शिंदे सरकार मूग गिळून गप्प असले तरी आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. भाजपाप्रणित शिंदे सरकारला खारघर प्रकरणी सत्य सांगावेच लागेल.

खारघर प्रकरणी २४ एप्रिल रोजी प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे अहमदनगर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेड, अमरावती येथे माजी मंत्री यशोमती ठाकूर, नागपूर येथे माजी मंत्री सुनिल केदार, चंद्रपूरात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये माजी मंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, सांगलीत माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान ठाणे, आ. कुणाल पाटील धुळे, आ. प्रणिती शिंदे सोलापूर, बसवराज पाटील धाराशीव, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सातारा, यांच्यासह सर्व जिल्ह्यात काँग्रेसचे नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.

उद्योगपती अदानीनंतर आता मंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई- शिंदे – भाजप सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले. पॅनलमधील विजयी उमेदवारांनी आज मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी मंत्री श्री. उदय सामंत .सुशांत शेलार ,सविता मालपेकर देखील उपस्थित होते असे शरद पवारांच्या कडून अधिकृत रित्या सांगण्यात आले.

मात्र सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पडद्यामागून हलचाली तर सुरू नाहीत ना, अशी चर्चा रंगताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व दिले जाते आहे.

निकालाची पार्श्वभूमी…

उद्योगपती गौतम अदानी यांनी कालच शरद पवारांची सिल्व्हर ओक निवासस्थानी जात भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली, हे समोर आले नाही. मात्र, हिंडेनबर्ग अहवाल, राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधानांवर केलेले आरोप, अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी या विषयावर या भेटीत काथ्याकूट झालेला असू शकते, असा अंदाज अनेकांनी वर्तवला. त्यातच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय लवकरच देणार आहे. या पार्श्वभूमीवरही अदाणी पवारांकडे गेले असतील का, असा होराही अनेकांनी वर्तवला.

असे आहे सुरू…

अदानी यांच्या भेटीनंतर आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. ते सिल्व्हर ओकवर पोहचले. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये घाटकोपर येथे कार्यकर्ता शिबिर आहे. मात्र, या शिबिरासाठी अजित पवार यांना निमंत्रण नसल्याचे समजते. त्यांचे पत्रिकेवरही नाव नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक बोलावली आहे. या साऱ्या घडामोडी पाहता सामंत आणि पवार यांची भेटीची चर्चा आहे.

कारण वेगळेच…

उदय सामंत यांनी नाट्य परिषदेच्या निवडणुकीबद्दल शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगितले. ही निवडणूक वगळता कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि अदाणी प्रकरणावर बदलेली राजकीय भूमिका पाहता, सामंत यांच्या दाव्यावर विश्वास ठेवणे अनेकांना अवघड जात आहे. जोपर्यंत राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार नाही, तोपर्यंत अशा गाठीभेटीकडे संशयाने पाहिले जाईल, हे निश्चित.

मराठा आरक्षणावर सरकार दुरुस्ती याचिका दाखल करणार

मुंबई-मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती ( क्युरेटिव्ह) याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते. मराठा आरक्षणाबाबतची फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीचे आयोग नेमून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच बार्टी आणि महाज्योतीच्या योजना सारथीलाही लागू होणार आहेत, अशी माहिती यावेळी शंभूराज देसाई यांनी दिली.

शंभूराज देसाई म्हणाले, काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातली फेरविचार याचिका फेटाळली. त्यासंदर्भात आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण समितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व सदस्य, विधीज्ञ उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींच्या चेंबरमध्येच ही याचिका फेटाळली. त्यावर खुल्या कोर्टात सरकारची बाजू ऐकावी असे सरकारचे म्हणणे होते. पण ही ते ग्राह्य धरले नाही. त्यामुळे सरकारला बाजू मांडण्याची संधी मिळू शकली नाही. या सर्व बाबींवर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे देसाई यांनी सांगितले. आमच्या सरकारचा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात तातडीने क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय मराठा समाजाचे मागासलेपण कसे आहे, याचे सखोल अवलोकन करण्यासाठी आयोग नेमून सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुरुस्ती याचिका काय?

क्युरेटिव्ह याचिका म्हणजे दुरुस्ती याचिका. ही याचिका दाखल करण्यासाठी एका ज्येष्ठ वकिलाचे प्रमाणपत्र गरजेचे असते. त्यात ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी योग्य असल्याची कारणे दिलेली असतात. त्यानंतर या याचिकेवर न्यायाधीशांच्या कक्षात चर्चा होते. या याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी घ्यायची की नाही, याचा निर्णय होतो.

सारथीला योजना लागू

शंभूराज देसाई म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या उपसमितीची जी बैठक झाली. त्यात ज्या योजना बार्टी आणि महाज्योतीसाठी लागू होतात त्याच योजना सारथीसाठीही लागू करण्याचा निर्णय केला. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंत्रिमंडळ बैठकीआधी किंवा नंतर सक्तीने व्हायला हवी. त्यावर नियंत्रण असावे.

यावरही काथ्याकूट

  • आयोगाला आणखी वेळ देता येईल का?
  • लवकरात लवकर हा सर्वे कसा तयार होईल यासाठी प्रयत्न
  • सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा सर्वे करण्याचा निर्णय
  • मराठा समाजाला असुरक्षित वाटावे असे वातावरण नाही.
  • शिंदे – फडणवीस सरकार समाजाच्या पाठीशी ठाम आहे.
  • जे – जे आरक्षणासाठी हवे ते करण्यासाठी आम्ही बांधील आणि तत्पर आहोत.

युपीएल सस्टेनेबल अॅग्री सोल्युशन्स लि. आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना यांच्या ‘शुगरकेन प्रोन्यूटिवा मेळाव्या’स उत्स्फूर्त प्रतिसाद

Ø ऊस पिकामध्ये शाश्वतउच्च उत्पन्न देणाऱ्या लागवडीला प्रोत्साहन 

Ø २५ पेक्षा जास्त गावांमधील २०० हून अधिक शेतकरी या मेळाव्यात  उपस्थित

Ø २०२३-२४ या आर्थिक वर्षात ‘शाश्वत मिठास’ प्रकल्पांतर्गत १०,००० एकर क्षेत्राची नोंदणी करण्याचे आणि उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ करण्याचे यूपीएल (UPL) चे उद्दिष्ट

पुणे२१ एप्रिल२०२३: शाश्वत कृषी उपाय आणि समाधाने प्रदान करणारी भारतातील आघाडीची कंपनी युपीएल सस्टेनेबल अॅग्री सोल्युशन्स लिमिटेडने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यासह ऊस पिकामध्ये शाश्वत उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी आणि गेल्या वर्षी लॉंच झालेल्या ‘शाश्वत मिठास’ प्रकल्पाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शुक्रवारी पुणे येथे ‘शुगरकेन प्रोन्यूटिवा मेळावा’ आयोजित केला होता.

    जे पीक उत्पादन वाढविण्यास व मातीची पोत आणि मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते असे एक शाश्वत कृषी उपाय असलेले प्रोन्यूटिवा पॅकेज आणि ‘शाश्वत मिठास’ प्रकल्पाचे यश शेतकऱ्यांसमोर मांडणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या पॅकेजमध्ये वनस्पतींसाठी पोषक तत्वे, वनस्पती वाढ-नियामक आणि पाण्याची कार्यक्षमता सुधारणारी आणि लागवडीचा खर्च कमी करण्यास मदत करणारी जैव सोल्युशन अशा अनेक प्रकारच्या इन्पुट्सचा समावेश आहे.

     या कार्यक्रमाला अजित चौगुले, कार्यकारी संचालक, वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पांडुरंग राऊत आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दत्ताराम रासकर, ‘शाश्वत मिठास’ प्रकल्पाचे प्रमुख व भारताचे ऊस पीक व्यवस्थापक प्रमुख श्री. हर्षल सोनवणे, आणि अन्य मान्यवरांची उपस्थित होते. या कार्यक्रमाला २५ पेक्षा जास्त गावांतील तब्बल २०० शेतकऱ्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांनी एआरडीएस  शुगरकेन  प्रोन्यूटिवा प्लॉटला  (ARDS Sugarcane Pronutiva Plot) भेट दिली आणि प्रोन्यूटिवा पॅकेज अंतर्गत नवीनतम शेती पद्धती शिकून आणि समजून घेतल्या. पॅकेज पद्धती एआरडीएस शास्त्रज्ञांद्वारे प्रमाणित केल्या आहेत, जेणेकरून शेतकरी या सोल्युशनच्या परिणामकारकतेवर विश्वास ठेवू शकतील. एकूण ५१ एकर प्रोन्यूटिवा किट शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करता येणे शक्य झाले  आणि पीक उत्पादनात सुधारणा करता आली.

     या कार्यक्रमात बोलताना अजित चौगुले, कार्यकारी संचालक, वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन म्हणाले, यूपीएल आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना शाश्वत शेतीसाठी ठोस पावले उचलताना पाहून आम्हाला आनंद होत आहे. ‘शाश्वत मिठास’ प्रकल्प एक उत्तम उपक्रम आहेजो केवळ स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेच णाही तर पर्यावरणाचे रक्षण करण्यासही मदत करतो. आम्हाला खात्री आहे की, प्रोन्यूटिवा पॅकेज पद्धतींचा अवलंब केल्याने पाणलोट क्षेत्रातील शेतकरी त्यांचे उत्पादन वाढवू शकतील आणि जमिनीचे आरोग्य सुधारू शकतील.

     आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या योजनांवर प्रकाश टाकताना यूपीएलचे भारत क्षेत्राचे संचालक श्री. आशिष डोभाल म्हणाले, यूपीएलने शाश्वत मिठास प्रकल्पात १०,००० एकर क्षेत्राची नोंदणी करण्याचे आणि कारखान्याच्या पाणलोट क्षेत्रात शाश्वत पद्धतीने ऊसाच्या पीकाच्या उत्पादनात १०% ते १५% वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मातीच्या आरोग्य सुधारणेवर लक्ष केंद्रित करणेयूपीएल यांत्रिकीकरणाचा वापर करून लागवडीचा खर्च कमी करणे आणि लागवडीसाठी आणि खतांचे योग्य डोस देण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत स्वीकारणेशाश्वत मिठास प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यासाठी गाव पातळीवर हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या मेळाव्यांचे आयोजन करणे हे आमचे ध्येय आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना योग्य सल्ला व शाश्वत पद्धतींची माहिती देऊन सेटची किंमत, बियाणांपासून होणारे रोग आणि खतांना लागणारा खर्च कमी करण्यासाठी सुपर केन नर्सरीच्या वापरावर भर देण्याचे आणि झेबा तंत्रज्ञान वापरुन पाणी वापर कार्यक्षमता वाढवणे आणि जमिनीचे लिचिंग किंवा निक्षालन होऊन पाण्याद्वारे जमिनीतील पोषकतत्वे कमी होऊन पिकाची गुणवत्ता कमी न होवू नये यासाठी प्रयत्न करणे हे  आमचे ध्येय आहे.

              आतापर्यंतच्या यशाबाबत बोलताना श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पांडुरंग राऊत म्हणाले, आम्ही शाश्वत मिठास प्रकल्पाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही या प्रदेशात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या कारखान्याच्या परिसरात ५ बूम फवारा यंत्रे लावली आहेतज्याचा वापर १००० हून जास्त शेतकऱ्यांनी ऊस पिकांवर फवारणीसाठी केला आहे. या प्रकल्पाने गावपातळीवर शेतकरी मेळाव्याचे आणि फील्ड दिवस चे आयोजन करून १६०० शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले आहे. याशिवायकाही शेतकऱ्यांनी लागवडीसाठी सुपर केन नर्सरी सारखी नवीन वैज्ञानिक तंत्रे स्वीकारली आहेतज्यामुळे सेटची किंमत कमी होते आणि दर्जेदार रोपे मिळण्यास मदत होते.

     शाश्वत मिठासचा एक भाग म्हणून साखर कारखान्याच्या ७ ब्लॉक्समध्ये २० प्रोन्यूटिवा मॉडेल प्लॉट तयार करण्यात आले आणि प्रोन्यूटिवा पॅकेजचे परिणाम प्रदर्शित करण्यासाठी तीन प्लॉट्सवर फील्ड दिवस आयोजित करण्यात आले. परिणामी, ४०० शेतकऱ्यांनी एकूण प्रोन्यूटिवा पॅकेजचा वापर १२०० एकर ऊस पिकांवर केला आणि पिकांची वाढ व त्यांचे आरोग्य व गुणवत्तेच्या दृष्टीने ते या प्रोन्यूटिवा पॅकेजच्या परिणामांवर अत्यंत समाधानी होते. या उपक्रमाला FICCI कडून आणि Bonsucro कडून शाश्वत ऊस उत्पादन मोहिमेसाठी प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

     ऊसाच्या शेतीमध्ये सशाश्वत उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक शेतकरी वर्गाला पाठिंबा देण्यासाठी यूपीएल च्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे शुगरकेन प्रोन्यूटिवा मेळावा. कंपनी नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे, जे शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढवण्यास, मातीचे आरोग्य सुधारण्यास आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करते.

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनी महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा

मुंबई, दि. 21 : अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.

महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीने ईच्छा व्यक्त केली. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली. याबाबत जागा निश्चिती, उर्वरित जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यातील हजारो तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रंजन धर यांनी कंपनीची गुंतवणुकीविषयीची माहिती दिली. ही कंपनी आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देणारी असून कंपनीने कोविडमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. भारतात स्टील उत्पादन वाढीसाठी कंपनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. खोपोली, तळेगाव, सातारडा (सिंधुदुर्ग) येथे कंपनीमध्ये हजारो तरूणांना रोजगार मिळाला आहे. आणखी हजारो तरूणांना रोजगार मिळणार असून कंपनी शिक्षण, आरोग्य, विमानतळाच्या पायाभूत सुविधामध्येही काम करणार असल्याचे श्री. धर यांनी सांगितले.

बैठकीला वाहतूक आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह, अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. चे विक्री संचालक आलेन लेगरीस, रंजन धर, ऋषिकेश कामत, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, कंपनीचे राजेंद्र तोंडापूरकर आदी उपस्थित होते.

000