मुंबई-केवळ राज्य सरकारने खबरदारी न घेतल्याने महाराष्ट्र भूषण सोहळ्यात दुर्घटना घटना घडली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराला एवढे लोक बोलावणे याचा अर्थ प्रचंड शक्ती जमवून आगामी निवडणुकीच्या संदर्भात स्वतःच्या राजकारणाला अनुकूल वातावरण तयार करायचे हा होता, पण त्याची किंमत निष्पापांना मोजावी लागली, असा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.घाटकोपरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर झाले. या सोहळ्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पवार यांनी केंद्र सरकार, राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सरकारी होता. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम होता. धर्माधिकारींचा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्काराने झाला, पण हा कार्यक्रम त्यांच्या संघटनेने आयोजित केलेला नव्हता. तो महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी नक्की आकडा माहिती नाही, पण काय आकडा असेल ते असेल पण लोक मृत्यूमुखी पडले. केवळ राज्य सरकारने खबरदारी न घेतल्याने ही घटना घडली. उष्माघाताची शक्यता असतानाही हा कार्यक्रम उघड्यावर घेतला गेला. उन्हाळ्यात व्यवस्था करायला हवी होती. मंडप टाकावा. वाईट प्रसंग येऊ नये अशी काळजी घेतली नाही.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्काराला एवढे लोक बोलावणे याचा अर्थ एकच होता की, प्रचंड शक्ती जमवून त्यातून स्वतःच्या राजकारणाला अनुकूल वातावरण आणि आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात करायचे होते. त्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला गेला आणि त्याची किंमत निष्पापांना मोजावी लागली.
शरद पवार म्हणाले, जितेंद्र आव्हाडांनी सांगितले की, ती चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत व्हावी. तसेच जयंत पाटील यांनीही विद्यमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली. पण त्या मागणीकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. या प्रकरणाची चौकशी एका प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत केली जात आहे. तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे यात दुमत नाही. पण शेवटी तो सरकारी अधिकारी आहे, तो कितीही प्रामाणिक असला तरीही आपल्या बाॅससमोर सत्य सांगू शकत नाही त्यामुळे हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशामार्फतच चौकशी व्हायला हवी.