Home Blog Page 1572

पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.

एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्णप्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन (MICE) यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे. समाज माध्यम, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाइन, डिजिटल मार्केटिंग-प्रसिद्धी- आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आल्या आहे.

या फेलोशिप उपक्रमासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून  २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये छात्रवृत्ती आणि ५ हजार रुपये  प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या gm@maharashtratourism.gov.in आणि dgm@maharashtratourism.gov.in या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह  १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.

हडपसरमधील नऊ वर्षाच्या प्रणवने केला विश्वविक्रम

पुणे : जयवंत पब्लिक स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षाच्या प्रणव प्रविण गुंड याने एक नवा विश्वविक्रम केला आहे. त्याची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नुकतीच झाली आहे. प्रणव याने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे ३९ सेकंदात बोलत हा विक्रम प्रस्थापित केला आहे. अशा प्रकारचा विश्वविक्रम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रणवच्या नावाने ह्या विश्वविक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे.

प्रणव गुंड हडपसरमधील ड्रीम्स आकृती सोसायटीमध्ये राहत असून, त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. आई डॉ. मीनाक्षी गुंड आयुर्वेद चिकित्सक आहे, तर वडील डॉ. प्रविण गुंड हे पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. मुलाने केलेल्या कामगिरीमुळे आई वडील समाधानी आहेत व भावी आयुष्यात त्याला प्रोत्साहन देण्याच्या संकल्प त्यांनी दिला आहे.

प्रणवच्या आई वडिलांनी भावना व्यक्त करताना सांगितले की प्रणव लहानपणापासून हुशार आहे. तो पटकन गोष्टी आत्मसात करतो. प्रणव चार वर्षाचा असताना तो विविध शहर, राज्य यांची नावे घेत असे व ती वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्यामधील स्मृती व सातत्य लक्षात घेवुन त्याला प्रोत्साहन दिले. नुकतेच त्याने स्केटिंगमध्ये जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल मिळवले आहे. क्यूब सोडविण्यातही त्याला रस असून, तो त्याचा नियमित अभ्यास करत आहे.
प्रणवच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो शिकत असलेल्या शाळेच्या प्रिन्सिपल यांनी त्याचे फोन करून विशेष अभिनंदन केले. त्याच्या समवयस्क मुलासाठी ती एक प्रेरणा स्त्रोत बनला आहे. त्याने केलेला विश्वविक्रम ह्याचा व्हिडिओ इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या यूट्यब चॅनलवर अपलोड झाला आहे. तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या अधिकृत सर्व प्लॅटफॉर्म वर हा विश्वविक्रम प्रकाशित झाला आहे. प्रणव इथे न थांबता नवनवीन गोष्टी आत्मसात करून पुढे जाण्याच्या तयारीत आहे व ते नक्की करेन, असे विश्वासाने प्रणवने सांगितले.

आगामी काळात तुम्हाला दंगली घडवायच्या आहेत का? फडणवीसांचा आव्हाडांना सवाल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे अतिशय आक्षेपार्ह आहे. यामुळे प्रभू श्री राम भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.आव्हाडांनी राज्यात जातीय दंगली होतील, असे वक्तव्य केले. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आगामी काळात तुम्ही राज्यात दंगली करणार आहात असा तुमच्या वक्तव्याचा अर्थ घ्यावा का, असा सवालही केला आहे. .

जितेंद्र आव्हाड यांचे जे विधान हे आक्षेपार्ह आहे. राम नवमी असेल किंवा हनुमान जयंती असेल ती अत्यंत शांतपणे साजरी केली जाते. लोकांच्या मनामध्ये प्रभू श्रीराम आणि आणि हनुमानाच्याबाबतील प्रचंड श्रद्धा आहे. हा समस्त समाजाचा आणि राम भक्ताचा अपमान आहे. मला असे वाटते की त्यांनी संवेदनशीलपणे बोलावे.महाराष्ट्रात आगामी काळात काही दंगली होतील म्हणजे तुम्ही काही ठरवले आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे. मला असे वाटते की किमान नेत्यांनी तरी सनसनाटी तयार करु नये, शांतपणे बोलावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भाजप नेते आमदार राम सातपुते यांनीही ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राम सातपुते ट्विटमध्ये म्हणाले की, या अफजलखानाच्या औलादींचा माज दिवसागणिक वाढतच चालला आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान करणारा जीतूद्दीन हिंदू धर्माला समजतो तरी काय? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पवित्र हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या या चिंपाट वर कारवाई झालीच पाहिजे! अशी मागणी त्यांनी केली आहे.

अजित पवारांचा राज ठाकरे होणार; विजय शिवतारेंची टीका

मुंबई- बदनाम करुन अजित पवारांना त्यांच्याच पक्षातून बाहेर ढकलण्यात येत आहे. ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होईल.त्यांचाही राज ठाकरेच होईल ,मुलीच्या हातात पक्ष द्यायचाय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये अशी टिप्पणी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे.

अजित पवार यांनी कोणी आमच्या वाट्याला आले तर त्यांची मस्ती उतरवण्याची धमक आमच्यात आहे, असे म्हणत शिवसेनेच्या विजय शिवतारेंवर टीका केली होती. आता विजय शिवतारेंनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ना घर का ना घाट का असे म्हणत अजित पवारांचा पुढचा राज ठाकरे होणार, अशी टिप्पणीही शिवतारेंनी केली आहे.

विजय शिवतारे म्हणाले, अजित पवार यांचे रोखठोक, परखड बोलणे असले तरी त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढला जात आहे. स्वतः त्यांच्या घरातून त्यांना विरोध आहे. जे शिवसेनेत घडले होते तेच अजित पवार यांच्या बाबतीत होत आहे. ताकद चांगली असतानाही राज ठाकरेंना डावलून महाबळेश्वरच्या सभेत उद्धव ठाकरे यांना वारस करण्यात आले होते.

विजय शिवतारे म्हणाले, अजित पवारांना पक्षाबाहेर ढकलण्याचे काम सुरु आहे. शरद पवार म्हणाले होते, माझ्या पक्षातून कोणी जात असेल तर जाऊ दे. दुसऱ्या दिवशी सामनात रोखठोक सदरात याबाबत छापून आले. बदनाम करुन अजित पवारांना पक्षातून ढकलण्यात येत आहे. ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होईल.विजय शिवतारे म्हणाले, अजित पवारांची पक्षात अडचण होत आहे. शरद पवारांना मुलीच्या हातात पक्ष द्यायचा आहे, त्यासाठी ही डिप्लोमसी सुरु आहे. तसेच अजित पवार यांनी माज उतरवण्याची भाषा करू नये. स्वतःच्या मुलाला का निवडून आणू शकले नाहीत? असा सवाल विजय शिवतारे यांनी यावेळी केला.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार आपल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, विजय शिवतारे हे माझी बहीण सुप्रिया सुळे आणि आमचे दैवत शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत होते. पवारसाहेबांची उंची आणि सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील काम पाहून त्यांच्यावर टीका होणे, मला योग्य वाटत नाही. त्यामुळे कुणाला मस्ती आली तर ती जिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, असा इशारा अजित पवार यांनी पुन्हा दिला.

सर्वाधिक लोकसंख्या-  आव्हान नव्हे संधी !

संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच  जागतिक लोकसंख्या अहवाल प्रसिद्ध केला.  त्यानुसार भारत हा जगातील सर्वाधिक  म्हणजे 142 कोटी 86 लाख लोकसंख्येचा देश झाला आहे. या निकषावर आपण चीनलाही मागे टाकले असून त्यांची लोकसंख्या 142 कोटी 57 लाख लाखाच्या घरात आहे. भारताला लाभलेली  सर्वाधिक लोकसंख्येची ओळख हे मोठे आव्हान असले तरी त्याचे रूपांतर संधी मध्ये करून जागतिक नेत्तृत्वाकडे वाटचाल केली पाहिजे.

संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगाची आजची
लोकसंख्या आठशे कोटींच्या घरात  आहे. यातील सर्वाधिक लोकसंख्येचा मान भारताला मिळाला असून ही लोकसंख्या 142.86 कोटींच्या घरात आहे.  आपल्या खालोखाल चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी  25 टक्के लोकसंख्या केवळ भारत व चीन या दोन देशात  असून ती 285 कोटींच्या घरात जाते. यानंतरचा तिसरा क्रमांक अमेरिकेचा असून त्यांची लोकसंख्या 34 कोटींच्या घरात आहे. यानंतर इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया. बांगला देश, रशिया आणि मेक्सिको यांचा क्रमांक लागतो. या अहवालानुसार आपण लोकसंख्येच्या निकषावर जुलैमध्ये चीनला मागे टाकण्याची शक्यता होती.  परंतु त्या आधीच भारताने चीनला मागे टाकले आहे.  या अहवालात जी काही आकडेवारी दिली आहे त्यानुसार 15 ते 64 या वयोगटात असलेल्या नागरिकांची संख्या देशात वेगाने वाढत असून 2055 सालापर्यंत हाच वेग कायम राहणार आहे. देशातील 50 टक्के लोकसंख्या तीस वर्षांपेक्षा कमी असून त्यांचे सरासरी वय हे 28 वर्षे आहे. त्याचबरोबर देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही वाढत आहे. अहवालानुसार भारतातील पुरुषाचे सरासरी आयुष्यमान 71 वर्षे आहे तर महिलांचे आयुष्यमान 74 वर्षे आहे. पुढील दोन दशकांमध्ये दर पाच व्यक्तींमध्ये एका ज्येष्ठ नागरिकांच्या नागरिकाची गणना होणार आहे.  त्यामुळे  लोकांच्या कार्यक्षमतेचा चांगला वापर करून घेण्याची आपल्याला संधी आहे. एका अर्थाने काम करणाऱ्या सक्षम लोकांचा हा फुगा वाढणारा  आहे. देशातील केंद्र व राज्य शासनांची एकूण आर्थिक क्षमता, विकासाची स्थिती लक्षात घेता आपला महसूल आणि खर्च यात सतत वाढ होताना दिसत आहे.  यामुळे आगामी दोन तीन दशकांमध्ये   शिक्षण, बेरोजगारी, आरोग्यसेवा व गृहनिर्माण या क्षेत्रांमध्ये जाणीवपूर्वक जास्त गुंतवणुक  करण्याची आवश्यकता आहे. आजही देशामध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य असून  किमान अन्न वस्त्र व निवारा  ही प्राथमिक गरज भागवली जात नाही.  त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व त्या पाठोपाठ रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या पाहिजेत. देशातील वयोवृद्ध किंवा निवृत्ती झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक ती आरोग्य सेवा सुविधा देणे,  यासाठीची तरतूद  व दीर्घकालीन योजना आखण्याची गरज आहे. आपल्याकडे प्रत्येक राज्यातील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक स्थिती ही वेगवेगळी आहे.  आपल्या देशातील विविध जाती, धर्म, पंथ यांची विविधता लक्षात घेऊन सर्वांच्या हिताची व्यापक भूमिका घेणे  महत्त्वाचे आहे. आर्थिक, शैक्षणिक असमानतेपोटी असंतोषाला कुठेही खतपाणी घातले जाणार नाही अशा प्रकारची भूमिका, धोरणे आखली पाहिजेत. नोकरीच्या शोधामध्ये  विविध भागातून होणारे स्थलांतर हेही लक्षात घेतले पाहिजे. उत्तरेकडील राज्यातून दक्षिणेकडील राज्यांमध्ये येणारा बेरोजगारांचा लोंढा याचे नियमन व्यापक पद्धतीने करण्याची गरज आहे. केंद्र व  राज्यांमध्ये असलेली प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम व लोकाभिमुख  विकसित केली पाहिजे. दारिद्र्य निर्मूलनांबरोबरच अशिक्षितांचे प्रमाण कमी करून  सर्वांगीण विकासावर भर दिला तर वाढत्या लोकसंख्येचे आव्हान  पेलणे अवघड जाणार नाही.  रोजगार निर्माण करतानाही आपल्या देशातील जाती व्यवस्था आणि राखीव जागा यांचे गणित हा मोठा शाप बनत आहे.  आपली अखेरची जनगणना 2011 मध्ये झाली.  त्यानंतर 2021 मध्ये ती होणे अपेक्षित होते.  दोन वर्षांच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची दशवार्षिक जनगणना आपण दोन वर्षे पुढे ढकलली.  यापुढील जनगणनेमध्ये सर्व जाती धर्मांची पंथांची योग्य पद्धतीने जनगणना झाली तर त्यामुळे आर्थिक सामाजिक आणि राजकीय समानतेसाठी निश्चित योजना आखता येऊ शकतील. त्यासाठी राजकीय परिपक्वता, एकमत होण्याची गरज असून ते मोठे आव्हान आहे. त्याचबरोवर लोकसंख्या नियंत्रण हा एक गंभीर विषय असून तो धर्माच्या पलीकडे जाऊन त्याची सोडवणूक करण्याची निश्चित गरज आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये शिफारस केलेल्या समान नागरी कायद्याची अंमलबजावणी, लोकसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात आणण्याला पर्याय दिसत नाही. देशातील बालविवाह किंवा मुलींमध्ये लहानपणी येणारे मातृत्व रोखण्यासाठी सर्वसमावेशक धोरण अमलात आणले पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण करत असताना सर्वांगीण शाश्वत विकास, प्रगती डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क कशा पद्धतीने जतन केला जाईल याची ग्वाही दिली पाहिजे. देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व जाती पंथ धर्मांची योग्य जनगणना नव्याने  करण्याशिवाय अन्य मार्ग नाही. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे अभिनिवेश बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी  योग्य भूमिका सर्वांनी घेण्याची नितांत गरज आहे आणि हेच देशापुढचे मोठे आव्हान आहे असे वाटते. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत सर्व पक्षांना सत्तेवर येण्याची घाई आहे.   सर्वाधिक लोकसंख्येचे  बिरुद मिरवताना देशातील लहान मुले, युवक तसेच महिला वर्ग  यांच्यावर लक्ष केंद्रित करून सर्वांगिण विकासाची योजना आखल्या पाहिजेत. वाढती लोकसंख्या शाप किंवा आव्हान न मानता त्याचे रूपांतर योग्य संधीमध्ये केले तर विकसनशील राष्ट्र न रहाता विकसित राष्ट्र निर्माण होऊ शकते. सर्वांगिण आर्थिक विकास, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती याच्या जोरावर जागतिक नेतृत्व करण्याची संधी निश्चित चालून येईल. चीन सारखा शेजारी देश कुशल मनुष्यबळावर ज्या पद्धतीने भर देत आहे त्याच प्रमाणात भारतानेही कुशल मनुष्यबळावर भर देणे आवश्यक आहे यासाठी सर्व अंतर्गत विरोध संपुष्टात आणून राष्ट्रीय भावनेने एकत्र येण्याची तीच वेळ आहे. हीच वाढत्या लोकसंख्येचा  योग्य लाभांश मिळवण्याची संधी आहे हे निश्चित.

लेखक -प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)

जगतज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९२ वी जयंती उत्साहात

पुणे : जगतज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९२ वी जयंती तसेच श्री श्री श्री जगदगुरु एकोरामाराध्य आणि चैत्र शुद्ध पंचमीला श्री श्री श्री जगदगुरु मरूळाराध्य यांचा प्रकट दिन अश्या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून हिंदू वीरशैव लिंगायत मंच या वीरशैव लिंगायत समाजात कार्य करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बसवेश्वर महाराज यांना ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली.

हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या पुणे महानगर शाखेतर्फे बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला उद्योजक महेश कुगांवकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सयोजक शरद गंजीवाले, सहसंयोजक अविनाश कुलकर्णी, पुणे महानगर सचिव अतुल सरडे, सुभाष जेयुर, ऍड. वैजनाथ विंचूरकर, अमोल महांकाळे, रामलिंग शिवणगे, आशिष हिंगमिरे आदी उपस्थित होते. महिलांच्या हस्ते प्रतिमांना औक्षण करून आरती देखील करण्यात आली.

महेश कुगांवकर म्हणाले, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचे अनुकरण आपण करायला हवे. बसवेश्वर महाराजांनी समाजाला दिलेली शिकवण सर्वधर्म समभावाची आहे. त्याप्रमाणे सर्वाना एकत्र घेऊन चालणे आज गरजेचे आहे. प्रत्येकाला माणसाची गरज असते. त्यामुळे सर्वानी समाजाला धरून एकमेकांची प्रगती साधायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

कुटुंबवत्सल, नात्यांची घट्ट वीण दर्शवणारी ‘असीमांत रेखा’-डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : स्त्रीच्या शरीरापेक्षा तिच्या मनावर, त्यागावर प्रेम करायला हवे. भारतीय कुटुंबव्यवस्था कुटुंबवत्सल आणि नात्यांची गुंतागुंत असलेली आहे. या नात्याची घट्ट वीण आणि वात्सल्य दर्शवणारी ‘असीमांत रेखा’ मनाला भिडते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.वेदांत प्रकाशन प्रकाशित व महेश सावळे लिखित ‘असीमांत रेखा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध लेखक श्रीकांत चौगुले, प्रकाशिका सुनिताराजे पवार, लेखक महेश सावळे, पत्नी रेखा, मुलगा अनुप, स्नुषा डॉ. पारुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,” महात्मा गांधींजींचे सत्य, अहिंसा ही तत्वे सुखी संसाराची बीजे आहेत. प्रेम, विश्वासाने संसार अधिक फुलतो, बहरतो. सावळे दाम्पत्याने हेच सुञ अवलंबल्याने त्यांच्या संसाराचा हा रथ अधिक जोमाने पुढे सरकत आहे. समर्पण, सहनशीलता, प्रेम अशा विविध पैलुंचे दर्शन या पुस्तकात घडते. स्त्री कर्तृत्वाचा आणि सांसारिक वाटचालीचा छत्तीस वर्षाचा हा प्रवास उत्तम पद्धतीने मांडला आहे.”

महेश सावळे म्हणाले, “समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. सांसारिक सहजीवनाची छत्तीस वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पत्नीचा वेगळेपणा, तिची आपुलकी, तिचा प्रेमळ सहवास आणि तिच्या अस्तित्वाचा परिघ शब्दबद्ध करण्यासाठी, तसेच पत्नीच्या नात्याप्रती ऋणनिर्देश म्हणून ‘असीमांत रेखा’ हे पुस्तक रेखाटले.”

सुनिताराजे पवार म्हणाल्या, “स्त्रीचे आयुष्य एखाद्या नदीप्रमाणे असते. ती जेव्हा शांत असते, तेव्हा सर्वांना आपुलकीने सामावून घेत तिचा प्रवाह सुरू असतो. माञ जेव्हा ती आक्रमक होते, तेव्हा महापुर येतो आणि संहार होतो. ‘असीमांत रेखा’ या पुस्तकात लेखकाने त्यांच्या पत्नीच्या कर्तृत्वाची गौरवगाथा समर्पक शब्दात मांडली आहे. निश्चितच या प्रेरक साहित्यकृतीचे वाचक स्वागत करतील. लोकांना सोपी वाटणारी गृहिणीची भुमिका ही अवघड असते.”

श्रीकांत चौगुले म्हणाले, “वसुधैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीला धरून लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक घरातील कथा वाटावी अशी आहे. पुस्तकातील त्याग, सर्मपणाची भावना प्रेरणा देणारी आहे.” प्रास्ताविक डॉ. पारुल सावळे यांनी केले. सूत्रसंचालन रुपाली अवचरे यांनी केले. आभार अनुप सावळे यांनी मानले.

मोग-यासह सुवासिक फुलांचा महालक्ष्मीला महाअभिषेक 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन ; अक्षयतृतीयेला मंदिरात आकर्षक पुष्पसजावट
पुणे : मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीला केलेला पुष्पाभिषेक… पुष्पमुकुट व पुष्पपोशाख परिधान केल्यानंतर देवीचे दिसणारे विलोभनीय रुप आणि मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरीता देवीभक्तींनी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोग-याच्या हजारो फुलांचा सुगंध दरवळत होता. 
निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने आयोजित वासंतिक मोगरा व पुष्पोत्सवाचे. मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १५१ किलो मोगरा, २५१ गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. भाविकांनी अक्षयतृतीयेनिमित्त देवीदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करिता उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे प्रसिद्धीपत्रक आयोगामार्फत जारी केले आहे.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना’ यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य असेल. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल अथवा १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

बाणेर – औंध लिंक रोडवरील अतिक्रमणांवर महापालिकेचा हथोडा

पुणे- पुण्यात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांची कमतरता नाही ,पण म्हणून कारवाई देखील हतबल झालेली नाही आणि होणार नाही हे दर्शविण्यासाठी काल पुन्हा बाणेर मध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामे , अतिक्रमणे यांवर धडक कारवाई करण्यात आली .बाणेर येथील बाणेर येथील बाणेर – औंध लिंक रोड ( मेडि पॉइंट चौक ते बाणेर स्मशान भूमी ) येथे अनेक अनधिकृत हॉटेल्स ,व्यवसायिक पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर धडक कारवाई बांधकाम विकास विभाग झोन ३ व औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने संयुक्त कारवाई नियोजित करण्यात आलेली होती.सदर कारवाई मधे सुमारे १,१०,७३० चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख,बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – श्रीकांत वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली,उप अभियंता निवृत्ती उतळे,कनिष्ठ अभियंता संदेश कुवळमोडे, अजित सणस, विश्वनाथ बोटेआरेखक नविन महेत्रे,टूलीप इंजिनियर सुरज शिंदे, प्राची सर्वगोड यांचे पथकाने तीन जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर, १० अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.

‘दगडूशेठ’ गणपती ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य (व्हिडीओ)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;
ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये होणार आंब्याच्या प्रसादाचे वाटप

पुणे :  साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

यापूर्वी पहाटे ४ ते सकाळी ६ पर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता विशेष गणेशयाग आणि  रात्री ९ वाजता भजन विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन झाले. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार राज्यस्तरीय “महाराष्ट्र श्री २०२३” शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा – ४ आणि ५ रोजी होणार स्पर्धा

पुणे – तरूणांना फिटनेस व शरीर सौष्ठवाच्या लागलेल्या ध्यासाला एक सकारात्मक व हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच उदयोन्मुख व शरीरसौष्ठव पटूना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पिंपरी चिंचवड येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मान्यता प्राप्त महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन, पिंपरी-चिंचवड संघटना व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष किरण सावंत यांच्या सौजन्याने महाराष्ट्र श्री २०२३ भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव ही स्पर्धा गुरूवार, ४ मे व शुक्रवार, ५ मे २३ या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या सर्व अजिंक्यपद स्पर्धा सिल्व्हर बँक्वेट हॉल जवळ डांगे चौक रावेत बीआरटी रोड ताथवडे. पिंपरी चिंचवड, पुणे येथे होणार आहे.

यामध्ये पुरुष शरीर सौष्ठव, मेन्स फिजिक, महिला शरीर सौष्ठव व वूमन मॉडेल फिजिक या गटात स्पर्धा असतील. वर्ल्ड बॉडिबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स फेडरेशन चे जनरल सेक्रेटरी श्री चेतन पठारे यांच्या शब्दाला मान देऊन ही महाराष्ट्र श्री या स्पर्धेच्या आयोजनासाठी जबाबदारी किरण सावंत यांनी स्वीकारली, महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष पदावर निवडून आलेले किरण सावंत यांच्या आज पर्यंत शरीरसौष्ठव या खेळासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद असून भविष्यात ते अजून चांगल्याप्रकारे स्पर्धेचे आयोजन करतील तसेच महाराष्ट्रातील खेळाडूंना वेळोवळी मदत करतील असे वर्ल्ड बॉडिबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन व एशियन बॉडीबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार श्री. विक्रम रोठे यांनी नमूद केले. या स्पर्धासाठी साऊथ एशियन बॉडिबिल्डींग अँण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रशांत आपटे यांनी शूभेच्छा दिल्या. महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण आणि खजिनदार सूनिल शेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धचे आयोजन बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड करत आहे.अशी माहिती आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ही स्पर्धा १२ गटांमध्ये होणार असून महाराष्ट्रातील २२ जिल्हातील खेडाळू सहभाग घेणार आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने मुंबर्ईचा रस्सेल डिब्रोटो, अजिंक्य रेडेकर, नितीन म्हात्रे, निलेश दगडे, सूशांत राजंणकर, उमेश गूप्ता, रोहन गूरव, पिंपरी चिंचवडचा श्रीनिवास वास्के, तोसिफ मोमीन, अदिती बंब, रेणूका मूदलीयार, शितल वाडेकर व तन्विर हक यांच्यामध्ये चुरस होणार आहे. राज्यभरातून अधिकाधिक तरूण- तरूणींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनने केले आहे.

दोन गटात होणार स्पर्धा…
स्पर्धेतंर्गत वजन तपासणी व स्पर्धा होणार आहे. मेन्स फिजिक दोन गटात होणार असून ही स्पर्धा दिनांक गुरूवार, ४ मे रोजी सायंकाळी ४ ते १० या वेळात होईल. तर पुरूष शरीर सौष्ठव आणि महिला शरीर सौष्ठव व वूमन मॉडेल फिजिक स्पोर्ट्स ही स्पर्धा शुक्रवार ५ मे २०२३ रोजी फिजिक वजन तपासणी सकाळी १० ते दुपारी ३ व स्पर्धा संध्याकाळी ५ ते ११ या वेळी होईल.

लाखोंची बक्षिसे…
स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सहा लाख ५० हजार अशी रोख रकमेची बक्षिसे ट्रॉफी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. तर अजिंक्यपद पटकाविणाऱ्या विजेत्यास १ लाख २५ हजार रूपये, उपविजेत्यास ५० हजार व रनर अप २५ हजार रूपये रकमेचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच उत्तेजनार्थ ६ ते १० क्रमांक स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रूपये व प्रशस्तीपत्र देखील प्रदान केले जाणार आहे. असून मेन्स फिजिक, महिला शरीर सौष्ठव व वूमन मॉडेल फिजिक स्पोर्ट्स महिलांना देखील रोख रकमेची पारितोषिके ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
क्रीडा प्रकार व स्पर्धा अधिकधिक तरूण-तरूणींपर्यंत पोहचवणार – किरण सावंत

किरण सावंत यांनी नुकतीच महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. ते स्वतः विविध क्रीडा प्रकार, व्यायाम व फिटनेस विषयी जागरूक असून ते यासंबंधाने ते या बाबतीत कमालीचे पॅशनेट आहेत. हा क्रीडा प्रकार, स्पर्धा, तसेच या क्रीडा प्रकाराप्रति तरूणांमध्ये जागरूकता, आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उत्तम व भव्य अशा स्पर्धेसाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, अशी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष किरण सावंत यांनी सांगितले.

सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. 21 : सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका पद भरावयाचे आहे. इच्छुक महिलांनी सांताक्रुझ येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहा. वसतिगृह अधिक्षिका म्हणून नेमणूक करावयाची आहे. (पद संख्या – 01) या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मुत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य) तसेच, त्यांचे  शिक्षण – दहावी उत्तीर्ण असावे. एमएससीआयटी पास व टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा – 30 ते ५० वर्षे असावी. मानधन रू. २३,२८३/- दरमहा असून, यासाठीची मुलाखत २५ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्जासोबत युद्ध विधवा/ विधवा/ माजी सैनिक/ आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.

अधिक माहितीसाठी ०२२-३५०८ ३७१७, ७९३३३५, २२७९३३३५. या क्रमांकावर किंवा ईमेल zswo_mumbaiupnagar@maharashtra.gov.in वर संपर्क करावा.

पुरुष गटातून भारताची विजयी सलामी:सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा

चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

पुणे : भारतीय संघाने पोलंडला पराभूत करताना पुरुष गटातून वरिष्ठ गटाच्या सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्टेडीयम येथे सुरु झालेल्या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन उच्च तंत्र, शिक्षण तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, उद्योगपती पुनीत बालन, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, यांच्यासह पुणे मनपाच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ज्योती कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेसाठी सर्वच संघाना शुभेच्छा देताना भारतीय संघाच्या जर्सीचे अनावरण केले. पुण्यात जन्मलेला हा खेळ सुमारे ५० पेक्षा अधिक देशात खेळला जात आहे. सहावी विश्वकरंडक स्पर्धा पुण्यात होत असल्याचा आनंद होत आहे. या स्पर्धेत सुमारे २७ देश सहभागी झाले असून भविष्यात अजून देश सहभागी होतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

उद्घातानावेळी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या वतीने तलवारबाजी, भाले, ढाल-तालवर यांचे विविध प्रयोग करताना महाराष्ट्राची लोककला प्रदर्शित केली. रॅम्बो सर्कसच्या कलाकारांनी विविध कलाकारी सादर करताना स्पर्धेच्या उद्घाटनात जान आणली. यावेळी पोलीस बँडने देखील सर्वच देशांच्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी विविध गीते सादर केली. यामुळे खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला.

सलामीच्या लढतीत पुरुषांच्या गटात भारतीय संघाने पोलंड संघाला १४-१ अशा फरकाने पराभूत करताना विजयी सलामी दिली. मध्यंतराला भारतीय संघाने ८-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून आकाश गणेशवाडेने ४ (१२.३३, १३.५५, १४.२२ व ३२.०९ मिनिटे), हर्षल घुगेने २ (५.१० व ३१.० मिनिटे), सचिन सैनीने २ (२.४७ व ३९.०८ मिनिटे) मिहीर सानेने १ (६.३६ मिनिटे), श्रीकांत साहूने १ (१७.००मिनिटे), विकी सैनीने १ (१०.२४ मिनिटे), आदित्य सुतारने १ (२४.२० मिनिटे), गुरुवचन सिंगने १ (२६.५६ मिनिटे) व प्रदीप टी.ने १ (३६.४३ मिनिटे) गोल केला. पोलंड संघाकडून रडदिया सत्यमने (२५.२८ मिनिटे) एक गोल केला.

महिलांच्या गटातील इजिप्त व नेपाळ लढतीला सुरुवात झाली आहे. थोड्या वेळात अपडेटेड बातमी पाठवतो.पुरुष गटातून भारताची विजयी सलामी

मिळकत कर सवलत : मंत्रिमंडळ निर्णयाची अंमलबजावणी सुरू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई दि.21 पुणे महापालिकेने सन 1970 पासून, नागरिकांना मालमत्ता करात दिलेली सवलत पूर्वलक्षी प्रभावाने पुन्हा लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत(दादा)पाटील यांनी दिली.

या शासन निर्णयानुसार आता घरमालक स्वतः राहत असलेल्या मालमत्तेचे वाजवी भाडे 60टक्के धरून मालमत्ता करात सन 1970 पासून देण्यात येणारी 40टक्के सवलत कायम करण्यात आली आहे. तसेच, दि.17 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार या सवलतीच्या रक्कमेची पूर्वलक्षी प्रभावाने वसुली करण्यात येणार नाही.
निवासी व बिगर निवासी मालमत्ता देखभाल दुरुस्ती करीता देण्यात येणारी 15टक्के वजावट रद्द करण्यात येऊन महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दि.01 एप्रिल, 2023 पासून 10टक्के वजावट करण्यात येणार. मात्र, दि.28 मे 2019 रोजीच्या पत्रानुसार सन 2010 पासून करण्यात येणाऱ्या 5टक्के फरकाच्या रक्कमेची वसुली दि.31 मार्च 2023 पर्यंत माफ करण्यात आली आहे.
नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या निवासी मालमत्तांची आकारणी दि.01 एप्रिल 2019 पासून पुढे झालेली असून त्यांना 40टक्के सवलतीचा लाभ देण्यात आलेला नाही अशा प्रकरणांची तपासणी करून त्यांना दि.01 एप्रिल 2023 पासून ही सवलत लागू करण्यात येणार आहे.
*सन 2019 ते 23 या कालावधीत ज्यांनी मालमत्ता कर भरणा केला आहे. त्यांच्या फरकाची रक्कम पुढील देयकामधून वळती करण्यात येणार असून या सर्व निर्णयांचे नियमितिकरण करण्यासाठी आवश्यक असलेली कायद्यातील दुरुस्ती देखील आगामी अधिवेशनात करण्यात येईल,असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.