Home Blog Page 1571

राष्ट्र उभारणीत युवकांची महत्त्वाची भूमिका-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

पुणे, 23 एप्रिल 2023

जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेला तिसऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी देशातील प्रामुख्याने युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज पुण्यात केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉ. विखे पाटील अध्यासन आणि नॅशनल युवा को ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी युवा सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी युवकांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून डॉ. कराड पुढे म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी नॅशनल युवा सोसायटी सारख्या संस्थांनी काम करावे, यासाठी त्यांना नाबार्ड सारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेशी जोडून देण्यात येईल .

भारत हा जगातील सर्वाधिक तरुण असलेला देश असल्याने त्यांच्या जोरावर भारताला महाशक्ती बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असून गेल्या 8 वर्षांच्या काळात केंद्र सरकारने विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये 39 हजार सुधारणा केल्या असल्याचे डॉ. कराड म्हणाले. नवे तंत्रज्ञान आणि नवे विचार आत्मसात करण्यात देशातील युवा वर्ग आघाडीवर असल्याने त्यांच्या क्षमतेला प्रोत्साहन देऊन देश जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करीत असल्याचे डॉ. कराड यावेळी म्हणाले .

आगामी काळात नॅशनल युवा को ऑपरटिव्ह सोसायटी च्या सहकार्याने पुणे विद्यापीठात सहकार क्षेत्रातील संशोधन केंद्र सुरू केले जाईल अशी घोषणा प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी यावेळी केली. अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांचेही यावेळी भाषण झाले.

पुरंदर तालुक्यातील सिंगापूरच्या शेतकऱ्याने अंजीर शेतीतून साधली प्रगती

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून १४ टन विक्रमी उत्पादन घेवून १० लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यांना कृषि विभागाकडून शेततळ्याचा लाभ तसेच कृषिविषयक प्रशिक्षण मिळाले असून त्याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.

अभिजित यांची कोरोना महामारीच्या काळात नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे शेतीकडे लक्ष वळवले. त्यांची वडिलोपार्जित ९ एकर शेती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी शेती बारमाही बागायती केली. त्यासाठी कृषि विभागातून शेततळ्यासाठी ३ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान मिळाले.

त्यांनी शेतीत अंजीर ४ एकर, सीताफळ ३ एकर व जांभूळ पाऊण एकर अशी फळझाड लागवड केली. यामध्ये वडील व काकांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळावे यासाठी त्यांनी कृषि विभागात प्रस्ताव सादर केला आहे. कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून कृषी विस्तार योजनांच्या प्रशिक्षण शिबिरातून शेतीमध्ये अनेक सुधारणा घडून आल्या.

अंजिर फळबाग लागवड
अभिजित यांनी ४ एकरामध्ये पुना पुरंदर या वाणाच्या ६०० अंजीर झाडाची लागवड केली. खट्टा आणि मिठा अशा दोन्ही बहारात उत्पादन घेतले जाते. खट्टा बहारमध्ये जून महिन्यात छाटणी करुन साधारण साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. प्रती झाडापासून १०० ते १२० किलो तर एकरी उत्पादन १३ ते १४ टन भेटते. या बहारात प्रती किलोचा दर ८० ते १०० रुपये येतो. मिठा बहारमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात छाटणी व त्यानंतर साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. या बहाराच्या फळांस प्रती किलो ८५ रुपयांपर्यंत दर मिळतो.

अंजीर फळाची बाजारपेठेच्या मागणी प्रमाणे पॅकिंग करून प्रतवारीनुसार मालाची विक्री सासवड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैद्राबाद, गुजरात व दिल्ली येथे केली जाते. मागील वर्षी जर्मनी देशातून अंजिराला मागणी आल्याने त्यांनी प्रायोगिक स्वरुपात वर १०० किलो मालाची निर्यात केली.

महाराष्ट्रासह हैद्राबाद, गुजरात राजस्थान आदी ठिकाणचे शेतकरी श्री. लवांडे यांची अंजीर बाग पाहवयास येतात व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. त्यांच्या अंजीर बागेत ७ ते ८ लोकांना नियमित रोजगार भेटला असून ही देखील एक जमेची बाजू आहे. श्री. लवांडे यांनी अंजिराचे नवीन सुधारित वाणही तयार केले आहेत.

सीताफळ आणि जांभूळही
३ एकर शेतीत त्यांनी सीताफळाच्या फुले पुरंदर वाणाची लागवड केली असून गतवर्षी ४ लाख ६८ हजार रुपयांचा नफा मिळवला. सीताफळाला १२० ते १६० रुपयांचा दर त्यांना मिळाला. अभिजीत यांनी पालघर कृषि विद्यापीठांतून जांभळाचे कोकण बार्डोली हे वाण आणून पाऊण एकरात त्याची लागवड केली आहे. पुढील वर्षी जांभूळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

शेतीपूरक व्यवसाय
श्री. लवांडे हे रोपवाटिकेचा (कानिफनाथ नर्सरी) शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. २०२१ मध्ये अंजिराची २ हजार व सीताफळाची १ हजार रोपे अशी एकूण ३ हजार रोपे तयार करून विक्री केली. सन २०२२ मध्ये अंजिराची १२ हजार रोपे व सीताफळाची ६ हजार, रत्नदीप पेरू ३ हजार अशी एकूण २१ हजार रोपांची विक्री केली तर २०२३ साठी रोपांची आगाऊ नोंदणी करण्यात येत आहे.

सेंद्रिय शेतीचा फायदा
अभिजित लवांडे यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिला आहे. त्यामुळे फळांची गुणवत्ता वाढली आहे. त्यांनी जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र अशा प्रकारचे जीवामृत त्यांनी अंजीर झाडास वापरले. तसेच गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत, भूशक्ती (कोंबडीखत) व हिरवळीच्या खतांचा वापर केला.

अंजिराच्या चांगल्या उत्पादनासाठी इतर शेतकऱ्यांपेक्षा बहार धरण्याचे महिने बदलले, पाचटांचा वापर करुन जिवाणूंची संख्या वाढवली, झाडांच्या भोवती पाचटांचे अच्छादन करुन कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्याकडे भर दिला, यांत्रिकीकरणावर जास्त भर दिला, तोडलेला माल बागेतून बाहेर काढणे आणि फवारणीसाठी आधुनिक यंत्रणा वापरण्याकडे भर दिला. त्यांनी वेळोवेळी कृषि विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले.

अंजिर बागेचा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यापाठीमागे उपविभागीय कृषि अधिकारी बारामती वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी पुरंदर सूरज जाधव यांचे श्री. लवांडे यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. श्री. लवांडे यांच्या कार्याची दखल घेऊन कृषी विभागाने त्यांची पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

अभिजित लवांडे,शेतकरी: शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळावे. कृषि विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जातात त्या संधीचा लाभ घ्यावा. कृषि विद्यापीठाने तयार केलेले फळझाडांचे आधुनिक वाण खरेदी करून लागवड करावी. रासायनिक ऐवजी जैविक आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादित कृषि मालाला चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे.

  • रोहिदास गावडे, माहिती सहायक, उप माहिती कार्यालय, बारामती

शिंदे-फडणवीस सरकारचे ‘डेथ वॉरंट’ निघाले, 15 दिवसांत सरकार कोसळणार; संजय राऊत

ळगाव-सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 लोकांचे राज्य आहे. ते पुढच्या 15 दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचक्र अर्पण करा, अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे आज 23 एप्रिलला जळगावात येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेपूर्वीच वातावरण तापले आहे. आता राऊतांनी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही. तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही. मात्र या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरले आहे.

उद्धव ठाकरेंची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. मात्र सभेपूर्वीच राजकारण तापले असून गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिंदे गटाने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तर संजय राऊत यांनी सरकार कोसळण्याचा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल, असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाने सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा, असे चॅलेंज दिले आहे. त्यामुळे आज सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी युवकांना प्रेरित करावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई: जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागविली पाहिजे व त्यासाठी ‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

बोरिवली मुंबई येथील कोरा केंद्र मैदानावर सुरु झालेल्या दोन दिवसांच्या संरक्षण प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 ‘अथर्व फाउंडेशन’ या संस्थेने सैन्य दलांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये भारताची संरक्षण सिद्धता दाखविणारी युद्धसामुग्री व उपकरणे ठेवण्यात आली आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान येथे एका फॅक्टरीला भेट दिली होती, त्यावेळी तेथील कामगार एक क्षण देखील वाया न दवडता आपले काम करण्यात मग्न असल्याचे त्यांनी पाहिले. आपल्या देशातील युवाशक्तीमध्ये देशभक्तीची भावना जागविली तर वेळ व्यर्थ न घालवता ते देशासाठी कार्य करतील व देश प्रगतीपथावर जाईल, असे राज्यपालांनी सांगितले.

सैन्य दल देशाची शान असून त्यांच्यामुळेच देश निरंतर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहेत. अनेक वर्षे संरक्षण सामग्री आयात करणारा भारत आज संरक्षण सामग्रीबाबत आत्मनिर्भर आणि निर्यातदार देश झाला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

देशाला शिस्तीची गरज आहे, असे नमूद करून, आपले घर, परिसर, कार्यस्थळ स्वच्छ ठेवणे तसेच वीज व पाण्याची नासाडी थांबवणे ही देखील देशसेवाच असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

बॅरिस्टर नाथ पै यांच्या संसदेतील भाषणाचा उल्लेख करून जात, पंथ याचा वृथाअभिमान घेणारी संकुचित मानसिकता सोडून आपण प्रथम भारतीय आहोत हा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

भव्य संरक्षण प्रदर्शन आयोजित करून युवकांना युद्धकथा कथन, जवानांच्या साहस कथा तसेच तज्ज्ञ लष्करी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून सैन्य दलांमध्ये भरती होण्यास प्रेरित करीत असल्याबद्दल राज्यपालांनी अथर्व फाउंडेशनचे कौतुक केले.

सुरुवातीला राज्यपालांनी प्रदर्शनाची पाहणी केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी हुतात्मा जवानांच्या मुलींना लॅपटॉप भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संरक्षण प्रदर्शन उदघाटन सोहळ्याला खासदार गोपाल शेट्टी, अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, प्रदर्शनाचे निमंत्रक कर्नल (नि.) सुधीर राजे, सैन्य दलातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

000

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची बैठक

  • रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या सूचना
  • निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

मुंबई, दि. २३ – ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जयजित सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय राठोड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे, परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबई-नाशिक महामार्ग कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना

भिवंडी-कशेळी मार्गावरील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेले काम ६० टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. भिवंडी शहरातील जे रस्ते खराब आहेत त्यांची डागडुजी तात्काळ

एमएमआरडीएच्या माध्यमातून करून घ्यावी. साकेत-खारेगाव पुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई- नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे कामदेखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत गरज वाटल्यास रात्रंदिवस काम करून अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

ठाणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीदरम्यान अनेकदा काल्हेर ते आर. सी.पाटील दरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या पाईपलाईन रोडचा वापर केला जातो ह्या पाईपलाईन रोडची डागडुजी ताबडतोब करून तो सुस्थितीत आणण्याच्या सूचना यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती द्या

मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती देतानाच त्याच्या दुभाजकादरम्यान झाडे लावण्याचे तसेच त्यांच्या दोन्ही बाजू आधुनिक पद्धतीने बांबूच्या सहाय्याने सुशोभित करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त वॉर्डन

पुढील महिनाभर शहरातील वाहतूक नियमनाच्या कामावर असलेला ताण पाहता ठाणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना अतिरिक्त वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून द्यावे तसेच मुंबईतून अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घ्यावी असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.

सर्व्हिस रोडचा थांब्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांवर कारवाई

ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील घोडबंदर मार्गावरील गायमुख- वाघबीळ मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण करावे तसेच घोडबंदर रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड आणि महमार्ग दोन्ही वापरात आणावे अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व्हिस रोडचा पार्किंगसाठी होणारा वापर थांबवून वाहनांवर कारवाई करावी तसेच बसेस, ट्रक आणि स्कूल बसच्या पार्किंगसाठी खारेगाव टोलनाका तसेच पूर्व द्रुतगती मामार्गालगतचे जकात नाक्यांच्या मोकळ्या जागांचा वापर करावा असे निर्देश दिले.

निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

कामे पूर्ण करताना कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच पावसाळ्यात रस्त्यावर पडणारा छोटा खड्डा देखील जीवघेणा ठरतो त्यामुळे आपल्या अखत्यारितील रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असून ती आपण सर्वांनी पार पडायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जनसेवा फाउंडेशनच्या अनाथालयातून चार मुले अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय

पुणे-पुण्यातील अनाथालयात दाखल झालेली चार अल्पवयीन मुले पसार झाली आहेत.याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज परिसरातील भिलारवाडी याठिकाणी जनसेवा फाउंडेशनचे अनाथ व निराधार मुलांसाठी अनाथालय आहे. याप्रकरणी अविनाश संजय महामुनी (वय- 28 ,रा. कात्रज, पुणे )यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 21 एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. तक्रारदार अविनाश महामुनी हे काम करत असलेल्या जनसेवा फाउंडेशन मधील 12 वर्षाचा, 14 वर्षाचा, आठ वर्षाचा आणि नऊ वर्षाचा अशी चार मुले कुणीतरी आज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी कोणतेतरी आमिष दाखवून फुस लावून पळून नेली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मात्र ,अद्याप या पसार झालेल्या मुलांपैकी कोणीही मुलगा सापडला नसल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस जाधव यांनी दिली आहे.

गडकरींना जाग येणार केव्हा …नवले पूल दूर्घटनेचा मुद्दा संसदेत मांडला ,गडकरींशी बोलल्या आता पुन्हा गडकरींशी बोलणार खासदार सुप्रिया सुळे .

पुणे- स्वामी नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातस्थळी भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी जखमीची भेट रुग्णालयात जाऊन घेतली. नवले पुलावर आणि नजीकच्या परिसरात अपघाताने मृत्यूंचे थैमान मांडलेले असताना गेली ६ वर्षे तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सरकर करत आले आहे . खासदार सुळे यांनी हा विषय संसदेत मांडला तेव्हा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार झाल्याचे लोकांनी पहिले आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी सुळे यांनी यापूर्वी चर्चा केली आहे. पत्रकारांनी येथील अप्घातांवरून गडकरी यांना वारंवार छेडले आहे . पण प्रत्यक्षात ना अपघात थांबले ना मृत्यूंचे थैमान सरकार या विषयावर गंभीर नसल्याचे दिसून आले आहे . या पार्श्वभूमीवर आज खासदार सुळे यांनी घटनास्थळी माध्यमांशी संवाद साधला

तेव्हा त्या म्हणाल्या ,’आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पहाटे ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. प्राथमिक माहितीनुसार ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. नवले पुलावर नोव्हेंबर मध्ये मोठा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, परंतू त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासंदर्भात लवकरच चर्चा करुन आणखी सुधारणा कशा करता येतील यावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहे. रस्ते सुरक्षा हा खुप महत्वाचा विषय आहे, मी या संदर्भात संसदेत देखील मुद्दा मांडला आहे. त्यामुळे सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, शरद दबडे, दिपक बेलदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर ट्रक व बसचा अपघात, अग्निशमन दलाकडून 18 जखमींची सुटका

पुणे-

कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता.रविवारी मध्यराञी सव्वा दोन वाजता पुणे बंगलोर हायवे, नरहे-आंबेगाव, स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर एक मोठा मालवाहतुक करणारा ट्रक व खाजगी बस यांचा अपघात झालार अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ४ अग्निशमन वाहने व १ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून १ रेस्क्यु व्हॅन अशी एकुण ७ अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती . या बचाव कार्यात अग्निशमन दलाकडून १८ जखमींची सुटका करण्यात आली आहे.

घटनास्थळी पोहोचताच अपघातग्रस्त दोन्ही वाहने पलटी झाल्याचे अग्निशामक दलाच्या जवानाचा निदर्शनास येताच घटनेचे गांभीर्य पाहून दलाचे अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून व काही जवानांनी वरील बाजूस जात दोरखंडाचा वापर करीत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसेच, पुढील बाजूस काही महिला व एक अंदाजे १५ वर्षाची मुलगी अडकली असता जवानांनी तिला अतिशय जिकरीचे प्रयत्न करीत जखमी अवस्थेत बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकुण १८ जखमींना बाहेर काढले असून त्यांना शासनाच्या १०८ या रुग्णवाहिकेतून जवळपास असणाऱ्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खाजगी बस एमएच ०३ सीपी ४४०९ निता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. मालवाहतुक करणारा मोठा ट्रक एमएच १० सीआर १२२४ यामधे मोठ्या प्रमाणात साखरीची पोती घेऊन जात होता. पुण्यातील नरहे आंबेगाव नजीक मालवाहू ट्रक व खाजगी बसचा अपघात झाला. त्यानंतर अग्निशमन दलाकडील नवले, सिहंगड, काञज, कोथरुड येथील फायरगाड्या व मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए १ रेस्क्यु व्हॅन दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून विविध अग्निशमन उपकरणे स्प्रेडर, कटर, लिफ्टिंग बॅग, पहार, कटावणी, फुट पंप वापरण्यात आली आहेत. तसेच जखमींना १०८ च्या ६ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना करण्यात आले.

 ‘बोल हरी बोल’चा २८ एप्रिलला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची ‘बोल हरी बोल’मध्ये भन्नाट केमिस्ट्री!

हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ एक नवा कोरा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. मराठी बिगबॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर, चतुरस्त्र अभिनेते रमेश वाणी आणि ‘नागपूर सुंदरी’ हा किताब मिळविणारी अभिनेत्री आकांक्षा साखरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलपासून एक्स्क्लुझिवली ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पहायला मिळणार आहे. निर्माता सुशीलकुमार अग्रवाल यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.

प्रेम, क्षमा आणि दुसऱ्या संधीची हृदयस्पर्शी कथा म्हणजे चित्रपट ‘बोल हरी बोल’. स्वतःच्या सुखवाहू जीवनाची स्वप्न पाहताना, वडिलांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हरी पोंक्षेच्या जीवनावर चित्रपटाची कथा आधारीत आहे. हरीचे वडील, मनोहर पोंक्षे हे सरकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असून, ते एका चाळीत राहतात. मुंबईत स्वत:चा फ्लॅट घेण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि हरीने त्याचे हे स्वप्न पूर्ण करावे अशी त्याची इच्छा आहे. परंतु बाप-लेकाची हि जोडी शेरास-सव्वाशेर आहे. त्यामुळे हि स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच एकमेकांच्या स्वभावासोबत जुळवून घेण्यासाठीची धडपड आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

“कलाकारांची उत्तम फळी लाभलेला ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाचे अनोखे कथानक आणि उत्तम संदेश सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र ट्रेंड होत असून चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता वाढली असून, येत्या २८ एप्रिल रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया ‘अल्ट्रा झकास’च्या वतीने व्यक्त केली जात आहे.

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनिक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी प्लॅटफोर्म अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेण्यासाठी १४९ रुपयांत तीन महिने आणि २९९ रुपयाच्या सवलतीत वर्षभर अमर्यादित मनोरंजचा उपभोग घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. तर, लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.

App link: https://ultrajhakaas.app.link

*‘बोल हरी बोल’ चा ट्रेलर पहाण्यासाठी*

ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

मुंबई, दि.२२ : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.

राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करीत आहे. तसेच बेघर वृद्ध व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटूंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतच्या प्रतिसाद प्रणालीने (रिस्पॉन्स सिस्टम) राज्यात संबंधित क्षेत्रात काम सुरु केले आहे.

या हेल्पलाइनच्या सेवा देशभरात वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व वयोवृद्धांना ही सेवा उपलब्ध करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनच्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधींनी सर्व जिल्ह्यात काम सुरू केले आहे. जिल्ह्यांमध्ये एल्डर लाईन क्रमांक १४५६७ च्या सेवा वाढविण्यासंदर्भात या राष्ट्रीय हेल्पलाईनच्या कार्यकारिणी सदस्यांना प्रशासनाने सहकार्य करुन हेल्पलाईनची माहिती व जनजागृती करण्याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

हेल्पलाईनवर मिळणाऱ्या सेवा

  • ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता, निदान, उपचार, निवारा / वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक ईत्यादीची माहिती दिली जाते.
  • वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही स्तरावरील कायदे विषयक प्रकरणी, मालमत्ता, शेजारी इ. विवाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन, शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाते.
  • चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ. विषयी जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक समर्थन दिले जाते.
  • बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर मदत केली जाते.

‘बॅक टू स्कूल’ चित्रपट २२ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

“बॅक टू स्कूल” मध्ये अनुभवी कलाकारांसह अनेक नवीन कलाकारांना संधी

पुणे (दि. २२ एप्रिल २०२३) :शाळा… या वास्तुशी आपले सगळ्यांचेच एक भावनिक नाते जुळलेले असते. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसांपर्यंतच्या असंख्य आठवणी मनात कायमच कोरलेल्या असतात मग त्या चांगल्या असो वा कटू. प्रत्येकाची नाळ ही शाळेशी जोडलेली असतेच. शाळेच्या याच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी सतिश महादु फुगे घेऊन आले आहेत ‘ बॅक टू स्कूल’. रंगसंस्कार प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे पोस्टर शनिवारी पिंपरीत चित्रपटातील ज्येष्ठ कलाकार व निवृत्त शिक्षिका वीणा वैद्य यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. हा चित्रपट २२ जून प्रेक्षकांच्या भेटीस पुणे, मुंबई सह महाराष्ट्रातील अनेक चित्रपट गृहात येत आहे अशी घोषणा निर्माते दिग्दर्शक सतीश महादू फुगे यांनी केली. अनुभवी कलाकार सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार यांच्यासह आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ. परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी, ईशा अग्रवाल, प्रसाद कुलकर्णी, विराज जाधव,आयुष जगताप, तुषार गायकवाड, यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड, आर्या घारे, विशाखा अडसूळ, प्रगती पिंगळे, हिमांगी टपळे, शर्वरी साठे, तन्वी गायकवाड, नंदिनी पाटोळे, साक्षी शेळके, मौली बिसेन आणि आर्या कुटे आदींनी बॅक टू स्कूल मध्ये भूमिका केल्या आहेत. प्रमुख कलाकार सह सव्वाशे पेक्षा जास्त कलाकार चित्रपटात आहेत. शुभांगी सतिश फुगे, सतिश महादु फुगे या चित्रपटाचे निर्माते असून प्राची सतिश फुगे कार्यकारी निर्माती आहे तर छायाचित्रण दिग्दर्शक श्रीनिवास नामदेव गायकवाड यांनी केले आहे.
या पोस्टर मध्ये एका पाटीवर दोन खडू ठेवलेले असून त्यावर शाळेचे चित्र रेखाटण्यात आले आहे. शाळेची सफर घडवणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर अतिशय आकर्षक असून ते शाळेच्या भावविश्वात नेणारे आहे. सतिश महादु फुगे आणि अमित नंदकुमार बेंद्रे यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या ‘बॅक टू स्कूल’ च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सतिश फुगे यांनी सांगितले की, ” शाळा म्हणजे आपले दुसरे घर. शाळेची गोष्टच निराळी आहे. आईनंतर तीच आपल्याला जगायला शिकवते. अनेक आठवणी शाळा जपते आणि त्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. याच आठवणी नव्याने जागवण्यासाठी ‘बॅक टू स्कूल’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा असा आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी जवळचा असणारा हा सिनेमा आहे.

मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या:आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत

पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक

पुणे, दि. २२: मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.

कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते.

पुनर्रचित टास्क फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. सावंत यांनी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

डॉ. सावंत म्हणाले, कोविड-१९ चाचण्यांची संख्या वाढवावी. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मॉकड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कचा वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोविड बाधितांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉलमध्ये समावेश नाही, असे यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन टास्क फोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण झाल्यावर रुग्णांना ऑक्सिजनची विशेष गरज भासत नाही. पण संसर्ग पाहता कोविडची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

कोविड चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.

कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण जास्त जोखमीची नाही. लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हा संसर्ग पंधरा मेपासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले.
0000

श्री.लक्ष्मीमाता मंदिरात तीन हजार हापूस आंब्यांची आकर्षक आरास …

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे:

अक्षय्य तृतीयेनिमित्त शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिरात सुमारे ३ हजार हापुस आंब्यांची आरास आणि फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याचे चित्र होते.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल , पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या उपस्थितीत श्री. लक्ष्मीमाता देवीची आरती करण्यात आली.यावेळी देवीच्या चरणी तीन हजार हापुस आंबे अर्पण करण्यात आले.
दुपारी चारनंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात छबिना आणि मिरवणुकीनंतर भाविकांना प्रसादस्वरूपात आंब्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, हेमंत बागुल ,कपिल बागुल ,सागर बागुल, सागर आरोळे, महेश ढवळे, बाबालाल पोळके, संतोष पवार, समीर शिंदे, आदींसह पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.

पंचकन्या : एक नृत्यकथी’ कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या
सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘पंचकन्या : एक नृत्यकथी’ ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.शनीवार, २२ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.

शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा हा कार्यक्रम ‘नुपूर नाद ‘ तर्फे प्रस्तुत केला गेला. हा संवाद नृत्याच्या या अभिनव कार्यक्रमात प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यकलाकार डॉ.स्वाती दैठणकर यांनी सोलो प्रकारात स्वरचित हिंदी कविता म्हणत नृत्य सादर केले. भारतीय परंपरेतील अहिल्या,सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी या पंचकन्यांवर आधारित या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.अहिल्या, सीता ,तारा, द्रौपदी, मंदोदरी या जर आजच्या काळात आल्या, तर त्या स्वतः विषयी आणि आजच्या स्त्री विषयी काय बोलतील, असा या नृत्यकथीचा विषय होता.

डॉ. स्वाती दैठणकर यांच्या शिष्यानी याच कार्यक्रमात समूह नृत्य रचना सादर केल्या. त्यात गणेश वंदना, नरसिंह कृती आणि तिल्लाना यांचा समावेश होता.प्रास्ताविक भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले.

महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवन वास्तवावर प्रकाश टाकणारा दीर्घांक

तो’ शेवटचा दिवस! दीर्घांकाचे संहिता पूज
थ्रिलर मध्ये अभिनय करणे हेही आव्हानात्मक थ्रील ! : अभिनेता गिरीश परदेशी

पुणे :

महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या आव्हानात्मक जीवन वास्तवावर प्रकाश टाकणारा ‘ तो ‘ शेवटचा दिवस हा दीर्घांक रंगभूमीवर येत असून पुण्यात अक्षय तृतीयेला सायंकाळी संहिता पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘माय स्टेज’ या निर्मिती संस्थेतर्फे या दीर्घांकाची निर्मिती करण्यात येत असून लेखन दिग्दर्शन विनिता पिंपळखरे यांचे आहे. संहिता पूजन कार्यक्रमासाठी संगीतकार अविनाश-विश्वजित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या नव्या दिर्घाकाच्या संहितेचे पूजन , तालमीचा प्रारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर,२२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजता हॉटेल किमया सभागृह, कर्वे रस्ता (पुणे) येथे झाला. मे महिन्यामध्ये रसिकांच्या भेटीला हा दीर्घांक येणार असून राज्यभर त्याचे प्रयोग होणार असल्याची माहिती निर्माते प्रशांत पद्माकर घैसास यांनी दिली.

गिरीश परदेशी,प्रज्ञा गुरव,प्रशांत घैसास,योगिनी गोखले,नितीन पारेगावकर हे कलाकार या दीर्घांकामध्ये काम करणार आहेत. सुरेंद्र गोखले हे या दीर्घांकाचे सूत्रधार आहेत.

उत्कंठा वाढविणारा सस्पेन्स थ्रिलर

महिला पोलीस अधिकाऱ्याकडे त्यांच्या कारकिर्दीत २५ वर्षांपूर्वीच्या कोडे बनून राहिलेल्या गुन्ह्यासंबंधी अचानक नवी माहिती मिळते. तपास सुरू होतो आणि ‘ तो शेवटचा दिवस ‘ या दीर्घांकाचा उत्कंठावर्धक थरारक प्रवास उलगडू लागतो. ‘महिला पोलीस अधिकाऱ्याच्या जीवन वास्तवाशी संबंधित थ्रिलर ,क्राईम स्टोरी प्रथमच रंगमंचावर येत आहे’,असे लेखिका विनिता पिंपळखरे यांनी सांगितले. त्यातून महिला तपास अधिकाऱ्यांच्या आव्हानात्मक जीवन वास्तवाचे दर्शन रसिकांना घडणार आहे,असे त्यांनी सांगितले.

‘वेगळ्या निर्मितीचे आव्हान म्हणून आम्ही या दीर्घांकाकडे पाहत असून वास्तववादी निर्मितीचा वस्तुपाठ आम्ही समोर आणणार आहोत’,असे निर्माते प्रशांत पद्माकर घैसास यांनी सांगितले.

गिरीश परदेशी म्हणाले, ‘या दीर्घाकाचे कथानक उत्कंठा वाढविणारे आहे. या थ्रिलर प्रकारचा जॉनर मी बऱ्याच दिवसांनी हाताळत आहे. मलाही या निर्मितीची उत्सुकता आहे. थ्रिलर मध्ये काम करणे हेही आव्हानात्मक थ्रील आहे.’ माय स्टेज ‘ ची निर्मिति अतिशय दर्जेदार,भक्कम असते. चांगला संच या निमित्ताने एकत्र आला आहे.त्यामुळे ही निर्मिती गाजणार यात शंका नाही ‘.

संगीतकार अविनाश- अभिजीत ,ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रवीण वानखेडे यांच्यासह नाट्यचित्रसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.