Home Blog Page 1570

स्टार गोल्ड थ्रिल्स या नव्या चॅनेलवर पहा हॉलिवूड चित्रपट हिंदीत

मुंबई– स्टार गोल्ड थ्रिल्स या डिस्ने स्टार नेटवर्कवर नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या चॅनेलवर हिंदीत डब केलेल्या इंग्रजी सिनेमांची मजा घेता येणार आहे. हे चॅनेल डीडी फ्री डिशवर उपलब्ध करण्यात आलं आहे. स्टार गोल्ड थ्रिल्स हे डब केलेले आंतरराष्ट्रीय सिनेमे दाखवण्यासाठी समर्पित असलेलं भारतातील पहिलं चॅनेल असून त्यामुळे भारतातील सिनेमाप्रेमींना हॉलिवूड आणि इतर आंतरराष्ट्रीय सिनेमे घरबसल्या, शिवाय त्यांच्या पसंतीच्या भाषेत- हिंदीत पाहाता येतील.

स्टार गोल्ड थ्रिल्सच्या प्रेक्षकांना अ‍ॅक्शन, फँटसी, अ‍ॅनिमेशन, क्रीएचर फीचर, हॉरर, साय- फाय असे वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे तसेच आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, बॅटमॅन व सुपरमॅन अशा सुपरहिरो मूव्हीजचा आनंद घेता येईल. हे सिनेमे अर्थातच हिंदीत डब केलेले असतील.

स्टार गोल्ड थ्रिल्सवर मार्वल व डी सी चे सर्वोत्तम सिनेमे व त्याचबरोबर मिशन इम्पॉसिबल, गॉडझिला, एक्स- मेन, ट्रान्सफॉर्मर्स, डाय हार्ड आणि पायरेट्स ऑफ कॅरेबियन असे प्रसिद्ध सिनेमे पाहायला मिळतील. या चॅनेलवर हिंदीमध्ये डब करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सिनेमांचं सर्वात मोठं कलेक्शन प्रेक्षकांसाठी सज्ज करण्यात आलं आहे.

उन्हाळ्याची सुट्टी सुरू होत असल्यामुळे लहान मुलांनाही स्टार गोल्ड थ्रिल्सवर धमाल सिनेमे पाहाता येतील. रोज सकाळी या चॅनेलवर मुलांच्या आवडीचे दर्जेदार अ‍ॅनिमेशन आणि कौटुंबिक सिनेमे पाहाता येतील, तर संध्याकाळी सात वाजता अ‍ॅक्शन आणि थ्रिलचा अनुभव देणारे सिनेमे दाखवले जातील.

स्टार गोल्ड थ्रिल्स डीडी फ्री डिशवर उपलब्ध करण्यात आलं असल्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना ते सहजपणे पाहाता येईल. तेव्हा वाट कशाची पाहाताय? तुमचा डीडी फ्री डिश सेट टॉप बॉक्स रिट्यून करा आणि स्टार गोल्ड थ्रिल्स ट्यून करा व हॉलिवूडमधले सर्वात मोठे सिनेमे हिंदीत पाहाण्याचा आनंद घ्या.

“केंद्रीय कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन’

पुणे-“संपूर्ण भारतात राष्ट्रीय सहा कामगार संघटनांनी  ” धरता आंदोलन” पुकारण्यात आले.त्यामधे एल.आय.सी., बॅंक , टेलीकॉम ,या संघटनांनी पुकारलेल्या धरणा आंदोलनात पुणे शहरात  सकाळी ११ ते २ या दरम्यान  PGMT ऑफिस , सातारा रोड, पुणे या ठिकाणी धरणा आंदोलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने बीएसएनएल व डी.ओ.टी. चे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.त्यांच्या एकूण ‌१५ मागण्या आहेत त्यापैकी काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत-

१) १/१/२०१७ पासून रखडलेले पेन्शन रीवीजन १५ टक्के सहित सर्व बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळावि. २)कोरोना काळातले १८ महिन्याचा थकीत IDA मिळावा. ३) महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्यात सीजीएचएसचा दवाखाना उघडण्यात यावा. ४) संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना फीक्स मेडिकल अलाउन्स‌रुपये १०००ऐवजी दरमहा रुपये ३००० मिळावा.५)रिस्टोरेशन ऑफ फुल्ल पेन्शन पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षे मर्यादा करण्यात यावी,६) सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी.यावेळी ऑल इंडिया बीएसएनएल व डीओटी पेन्शनर असोसिएशनचे महाराष्ट्राचे परिमंडळ सचिव युसुफ जकाती, महाराष्ट्र बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नागेश नलावडे,AIBDPA उपाध्यक्ष शशांक नायर, अखिल भारतीय सहसचिव पुष्पा फराटे, बबन सूर्यवंशी, पुणे जिल्हा सचिव नफीस काजी, अध्यक्ष नरेंद्र माने, संभाजी मस्तुद , यांनी मार्गदर्शन केले.व केंद्र सरकारकडे जोरदार मागणी केली.केंद्र सरकारने चालवलेली अन्यायकारक नीती बंद केली पाहिजे, आणि आमच्या मागण्या ताबडतोब मान्य केले पाहिजे अन्यथा २१ जुलै २०२३ ला दील्लीमध्ये   केंद्र सरकार विरूद्ध वरील मागण्या संदर्भात  भव्य मोर्चा काढण्यात येईल असे याप्रसंगी सांगण्यात आले.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

पुणे, दि. २४: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी-उंटवाल, प्रकल्पाशी संबंधित विकसक व रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकंमत्री श्री. पाटील म्हणाले, दांडेकर पूल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र १९ लाभार्थ्यांना येत्या महिन्याभरात घरभाडे वाढवून देण्याची विकासकाने कार्यवाही करावी. श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत उच्च न्यायालयातील प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. त्याअनुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाने कार्यवाही करावी. गुजरात कॉलनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अनुषंगाने इमारतीची उंची ५६ मीटर पर्यंत वाढविण्याबाबत आलेल्या प्रस्तावाबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रशासनाला दिल्या.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गटणे यांनी योजनांबाबत माहिती दिली.

पर्वती येथील दांडेकर पुल झोपडपट्टी पुनर्वसन योजना, श्री पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, कसबा पेठ, आणि ७२१ गुजरात कॉलनी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.
000

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे दि.२३: नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. लोणावळा येथे होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या व निपुण भारत अंतर्गत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान परिषदेत शिक्षण विभागाने सर्व समावेशक बाबींचे सादरीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिवाजीनगर येथील सभागृहात आयोजित निपुण भारत अभियान अंतर्गत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान व नवीन शैक्षणिक धोरण याविषयी होणाऱ्या शिक्षण परिषदेच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, संचालक (योजना) महेश पालकर, संचालक (बाल भारती) के. बी. पाटील, शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझाडे आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात धोरण मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. प्राथमिक पातळीवरील विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.

श्री. केसरकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना नोकरी देणारे शिक्षण मिळावयास हवे. १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आज विकसीत देशात कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्या देशांना आपण मनुष्यबळ पुरवू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व समावेशक कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावयास हवे.

शिक्षणक्षेत्रात काही स्वयंसेवी संस्था चांगल्याप्रकारे कार्य करीत आहेत. सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातूनही शिक्षण क्षेत्रात चांगले काम होत आहे. मुंबईत कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल. लोणावळा येथे होणाऱ्या परिषदेत कौशल्य विकासावरील १० चांगले विषय निवडावेत.

विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. स्काऊट व गाईड, एनसीसी विषयक अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना गरज आहे. अभिनय, नृत्य, छायाचित्रण, कृषि, व्यावसायिक प्रशिक्षण, सामाजिक कार्य, भाषा इत्यादी विषयात विद्यार्थ्यांनी चमकले पाहिजे. एकूणच विद्यार्थ्यांना बहुउद्देशिय शिक्षण मिळावयास हवे. शिक्षण विभागाकडून यादृष्टीने प्रयत्न केले जावेत.

विद्यार्थी संख्या कमी असेल अशा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मुंबईत ५०० शिक्षक अधिसंख्य आहेत. त्यांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्यात येईल. शाळेत सर्व पायाभूत सुविधा असाव्यात. शाळेचा परिसर स्वच्छ असावा. शाळेत सौर यंत्रणा उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत. परिषदेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देवून सादरीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

”टीडीएम’चे अहमदनगर कनेक्शन काय आहे? दिग्दर्शक भाऊरावांनी सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

पुणे :’ ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या सिनेमांच्या अभूतपूर्व यशानंतर रोमँटिक आणि आशयघन कथा घेऊन दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातून पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने हे दोन नवे चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. मराठी सिनेरसिकांना ‘टीडीएम’ची प्रतिक्षा लागली असताना दिग्दर्शक भाऊरावांनी या सिनेमाबद्दल काही पडद्यामागच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘टीडीएम’चे शूटिंग कसे झाले आणि त्याचे अहमदनगर कनेक्शन काय आहे?, याबद्दल भाऊराव बोलले आहेत. 

‘टीडीएम’मधील कथेबद्दल सांगताना भाऊराव म्हणाले, “हा सिनेमा मातीतला आहे. प्रत्येक घरातली, प्रत्येक तरुणाच्या मनातली ही गोष्ट आहे. जरी या सिनेमाची पार्श्वभूमी गावची असली तरीही सर्व संदर्भ शहरी, आजच्या काळातील आहे. नव्या सिस्टिममुळे गावची आणि शहरातील सामान्यांची काय अवस्था झाली आहे?, यावर टीडीएम भाष्य करतो.” 

यादरम्यान ‘टीडीएम’चे संपूर्ण शूटिंग अहमदनगर जिल्ह्यात झाले असल्याचा गौप्यस्फोट भाऊरावांनी केला. “टीडीएमचे संपूर्ण शूटिंग नगरमधील पारनेर तालुक्यातील कोकणी गावात झाले आहे. ४८ दिवसांत सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले. पृथ्वीराज, कालिंदी, अहमदनगरचे नाना मोरे यांच्याबरोबरच कलाकारांची मोठी टीम टीडीएमचा भाग आहे. जवळजवळ ३०ृ-३८ कलाकारांचा सिनेमात समावेश आहे. तर सिनेमातील काही सिनमध्ये १००-१५० लोकांचा क्राउड आहे. तर काही सीन मोठे असून त्यात हजारचा क्राउड आहे”, अशी माहिती दिग्दर्शक भाऊरांवांनी दिली. 

नगरचे कौतुक करताना भाऊराव म्हणाले, “पुणे आणि मुंबईचा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नगर हे शहर शूटिंगसाठी सर्वोत्तम आहे. विशेष म्हणजे, या जिल्ह्यात पाठिंबा देणारी खूप माणसं आहेत. तसेच जिल्ह्यात अनेक गुणी कलाकार आहेत. नगरमध्ये खूप चांगल्या लोकेशन आहेत, सर्व सोई सुविधा आहेत. नगरमध्ये फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळं रोपटं तयार होतंय.” तसेच “हा मेड इन नगर टीडीएम पाहायला विसरू नका, त्याला भरभरून प्रेम द्या,” असे आव्हानही भाऊरावांनी नगरवासींयांना केले आहे.

सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करावे

पुणे: कोथरुड मधील सोसायट्यांना सोलार, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करण्याची ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संवाद साधून, समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या सह नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या अडचणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितल्या. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती आदींचा समावेश होता. या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर, तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यासोबतच सोसायटींनी ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण सोलार पॅनल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करु, असे आश्वास्त केले. त्यासोबतच प्रत्येक सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकीन आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवून देण्याची ग्वाही दिली. तसेच, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सोसायट्यांनी पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

सुट्टीच्या दिवसात मुलांच्या भेटीला    प्रेरक गोष्टी !
पुणे :
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी संस्थेच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे निर्मित , डॉ.प्रकाश बोकील लिखित ‘गोष्टी,गोष्टी,पन्नास गोष्टी !’ या ५ पुस्तकांच्या  संचाचे  प्रकाशन रविवार,दि २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाले.विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा पद्मश्री डॉ निवेदिता भिडे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ झाला.विमलाबाई गरवारे प्रशाला(डेक्कन कॉर्नर) येथे  हा कार्यक्रम झाला.
विवेकानंद केंद्राचे प्रांत प्रमुख अभय बापट,सचिव सुधीर जोगळेकर , नितीन कीर्तने यावेळी उपस्थित होते. जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ५० प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी या पुस्तक संचात एकत्र करण्यात आल्या आहेत. सुटीच्या दिवसात मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,यासाठी हे गोष्टींचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.वाचनातून मूल्य शिक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची रचना केलेली आहे  
  डॉ.निवेदिता भिडे म्हणाल्या,  ‘मुलांच्या भाव जागरणासाठी गोष्टी उपयुक्त  असतात. स्वभावाला समजून जीवनाला दिशा देण्यासाठी हे माध्यम वापरावे.
हे गोष्टी सांगणं, कमी होऊ नये. गोष्टी फुलवण्याची कला कमी होऊ नये. घरातील सर्वांनी कला शिकून घ्यावी. त्यासाठी वाचन वाढवावी. चांगल्या गृहस्थाश्रमासाठी हे होणे आवश्यक आहे.
 ‘ कोणत्याही वयोगटात गोष्टी आकर्षून घेतात. भारतात गोष्टी मोठया प्रमाणात सांगितल्या जातात. महान व्यक्तीमत्वांवर गोष्टी , किस्से, कहाण्या तयार होतात. त्या परत परत सांगीतल्या जातात.  त्यातून काय संदेश घ्यायचा हे मुलांना कळत असते ‘, असेही त्यांनी सांगीतले.

प्रकाश बोकील म्हणाले, ‘सद्वर्तनाच्या प्रवासाचा प्रारंभ या पुस्तक वाचनातून होते.चांगल्या वागण्याची प्रेरणा होणार आहे. संवेदनशीलता वाढण्यास मदत होणार आहे.उपदेशाचे डोस न पाजता हसत खेळत मूल्य संवर्धनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मंजुषा लिमये यांनी सूत्रसंचालन केले.  वसुधा करंदीकर, वैदेही गोडबोले, सुमीत शिवहरे, हार्दिक मेहता, विश्वास लापालकर, श्रीकांत काशीकर ,विवेक गिरीधरीकर, अंजली भडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. दीपक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

*युवक अभिवाचन  समारंभ उत्साहात*……………..
या प्रकाशन समारंभा आधी ३ ते ५ या वेळेत डॉ. निवेदिता भिडे यांच्या उपस्थितीत युवकांसाठी अभिवाचनाचा १०० वा भाग समारंभ उत्साहात पार  पडला. विवेकानंद केंद्र ची १६ ऑडिओ बुक, यु ट्यूब वाहिनी या विषयी माहिती देण्यात आली. युवकांनी मनोगते सादर केली.

लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

• स्थानिकांना रोजगार, लातूरच्या विकासाला गती मिळणार

लातूर, दि. २३ : येथील रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपर्यंत हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु असून याठिकाणी १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती केली जाणार असल्याचे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे सांगितले. मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार गोविंद केंद्रे, मध्य रेल्वेचे आर. के. मंगला, शिशिर दत्ता यावेळी उपस्थित होते.

केंद्र शासनाने लातूर येथे रेल्वे बोगी कारखाना उभारण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा उघडल्यानंतर भारतीय रेल्वेची आरव्हीएनएल कंपनी आणि रशियातील एका कंपनीसोबत कराराची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष बोगी निर्मितीला येत्या ऑगस्टपर्यंत सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात नवीन ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करण्याची घोषणा केली असून यापैकी १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती लातूर येथील कारखान्यात होईल. आवश्यकता भासल्यास आणखी ८० रेल्वे निर्मितीचे कामही लातूर येथील कारखान्यात केले जाईल, असे श्री. दानवे यावेळी म्हणाले.

लातूर येथील रेल्वे बोगी कारखाना सुरु झाल्यानंतर लातूरसह मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना याठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच या परिसरात छोटे-छोटे व्यावसायिक तयार होवून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही श्री. दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, नवीन रेल्वे मार्ग आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, अहमदनगर-बीड-परळीवैजनाथ रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरु असून येत्या मार्चअखेरपर्यंत बीडपर्यंत रेल्वे पोहचणार आहे. मनमाड-नांदेड महामार्गाच्या दुहेरीकारणाच्या पहिला टप्प्याला लवकरच मंजुरी मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या सोलापूर-तुळजापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून भूसंपादनाची कार्यवाही सुरु झाली आहे, असे श्री. दानवे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात रेल्वेचे आणखी प्रकल्प मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्नशी असल्याचे ते म्हणाले.

स्वावलंबी भारत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून रेल्वे बोगी निर्मितीत भारत स्वावलंबी बनण्यासाठी लातूर येथील रेल्वे बोगी कारखाना महत्वाची भूमिका बजाविणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वंदे भारत रेल्वेची निर्मिती याठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यावेळी म्हणाले.

मराठवाड्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी लातूर येथे रेल्वे बोगी कारखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ भूमिपूजन करून न थांबता या प्रकल्पाची उभारणी गतीने होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. राज्यात सर्वाधिक कुशल मनुष्यबळ मराठवाड्यात असून या रेल्वे बोगी निर्मिती कारखान्यामुळे बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार असल्याचे सांगून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा प्रकल्प लातूरला दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले.

मध्ये रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी शिशिर दत्ता यांनी यावेळी मराठवाडा रेल्वे बोगी निर्मिती कारखान्याबाबत माहिती दिली. 350 एकरावर उभारण्यात आलेल्या या कारखान्यात रेल्वे बोगी निर्मितीसाठी आवश्यक यंत्रणा उभारताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचे सांगितले.

कारखान्याची पाहणी, सद्यस्थितीचा आढावा

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्वप्रथम भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. रेल्वेचे अधिकारी राजकुमार मंगला, अभय मिश्रा यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी प्रकल्पाबाबत पीपीटी व व्हिडीओद्वारे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी मराठवाडा बोगी निर्मिती कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्टोअर वार्ड, शेल शॉप, फिनिशिंग शॉप, पेंट शॉप आणि बोगी शॉप आदी विभागांना भेटी देवून माहिती जाणून घेतली.

स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासात सातत्य ठेवायला हवे- मंत्री चंद्रकांत पाटील 

पुणे : “बँकिंग, एमपीएससी यांसारख्या परीक्षा तुम्हाला शासकीय सेवेची संधी देतात. बँक अधिकारी, सरकारी अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासात सातत्य ठेवायला हवे,” असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
देशातील नामवंत बँकिंग इन्स्टिट्यूट असलेल्या विनर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजिलेल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभात चंद्रकांत पाटील बोलत होते. नवी पेठ येथील इंदुलाल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते ३५२ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभागृह नेते धीरज घाटे होते. यावेळी विनर इन्स्टिट्यूटचे संचालक अभय सात्यकी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, लोकसेवा पब्लिकेशनचे आप्पा हातनुरे, जयश्रद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संस्थापक जयराज हाडके, विनर इन्स्टिट्यूटच्या चेअरपर्सन मृदुल मेश्राम आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “एमपीएससी, यूपीएससी आणि बँकेच्या परीक्षा खडतर असतात. मात्र, अभ्यासातील सातत्य, चिकाटी अशा परीक्षांमध्ये यश मिळवून देते. त्याला चांगल्या मार्गदर्शनाची जोड गरजेची असते. विनर इन्स्टिट्यूट मार्गदर्शकाची ही गरज अत्यंत चांगल्या रीतीने पूर्ण करत असल्याचे तुमच्या यशावरून दिसते.”
श्रेयस तळपदे म्हणाले, “आतून प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. आपल्या जडणघडणीत गुरुचे योगदान मोठे असते. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा मार्ग कसा निवडावा आणि त्यावर यशस्वी प्रवास कसा करावा, याची दृष्टी देणारा हा कार्यक्रम आहे. जिंकण्याची उमेद देणारा ‘विनर’चा हा मंच बँकिंग व सरकारी अधिकारी होऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहे.”
विनर इन्स्टिट्यूट बँकिंगसह इतर अनेक सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भात अभ्यासक्रम शिकवणारी अग्रणी संस्था आहे. गेल्या १२ वर्षात संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना आयबीपीएस, एसबीआय, पीओ, आरबीआय, एसएससी, कॅट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करून घेतली आहे, असे प्रास्ताविकात अभय सात्यकी यांनी सांगितले.

धीरज घाटे यांनी अध्यक्षयीय मनोगत व्यक्त केले. सरस्वती शेंडगे, रजनीश कुमार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

दृष्टिहीन मुला-मुलींच्या अनोख्या विवाहसोहळयात जुळले रेशीमबंध


…अन् त्यांनीही अनुभविला ह्रद्य विवाहसोहळा
सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार

पुणे : सनई-चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी व-हाडी मंडळी… देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठया हौसेने मामा लोकांनी सजविलेले रुखवत… आणि आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवित अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन बांधव अशा ह्रद्य वातावरणात दृष्टीहिन वधू-वरांनी विवाहसोहळा अनुभवला. डोळ्याने दिसत नसूनही उपस्थितांचे प्रेम आणि आपुलकीने त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे दोन दृष्टिहीन मुला – मुलींच्या अनोख्या विवाह सोहळ्याचे. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर, खडक पोलीस स्टेशनचे गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, राजाभाऊ कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

चंदूकाका सराफ पेढीचे संचालक सिद्धार्थ शहा व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी हेमंत गोसावी यांनी सपत्नीक कन्यादान केले. मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष सागर कुलकर्णी, अमर लांडे, सचिन ससाणे, उमेश कांबळे, योगेश पासलकर, तन्मय तोडमल, साहिल आंबेडकर, सदाशिव कुंदेन, शेखर देडगावकर आदिंनी आयोजनात सहभाग घेतला.

सातारा जिल्ह्यातील महेश घोडपडे यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील मैना राजोरे यांच्याशी झाला. तर रायगड जिल्ह्यातील नीरज कोळी यांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील रेखा सोनवणे यांच्याशी झाला. दोन्ही वधू -वरांचे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झाले आहे. मामा मंडळी व पुणेकरांतर्फे नवविवाहित जोडप्याना संसारासाठी लागणारे सर्व साहित्य भेट देण्यात आले.

सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेच्या सहकार्याने हा विवाह सोहळा पार पडला. गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून सर्व जबाबदारी पाडली. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि सामान्य नागरिकांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा मोठया उत्साहात पार पडला.

नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.23 : पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-२ व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

येथील सेंटर पाँईट हॉटेलमध्ये  उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष २०२३-२५ साठी नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी  ते बोलत होते. जिल्हाधिकारी  डॉ.विपीन इटनकर , महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी., क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष गौरव अग्रवाला, महासचिव  एकलव्य  वासेकर, कोषाध्यक्ष आशिष लोंढे आदी मंचावर उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, मागील दशकापासून नागपूर शहर बदलत आहे. या शहराने नुकताच सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्यातील पहिला पुरस्कार पटकाविला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या शहरासाठी  भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. मलनि:सारणात नागपूर शहर अन्य शहरांच्या पुढे आहे. नुकताच महानगर पालिकेने स्विडीश कंपनी सोबत करार केला असून येत्या १८ महिन्यात आंतरराष्ट्रीय  मानकाप्रमाणे  नागपूर  शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरू होणार, असल्याचेही  त्यांनी सांगितले.

रियल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची  मागणी  निर्माण होत असते. म्हणूनच सरकारचेही  या क्षेत्राकडे  लक्ष आहे. नागपुरात जवळपास ४० कि.मी. परिसरात मेट्रोरेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मेट्रो टप्पा-२ व्दारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे रियल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन उपाययोजना राबवणार आहे. यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होईल. भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात उद्योग येत आहेत. यासाठी  भौगोलिकदृष्ट्या  केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराला लॉजिस्टीक  कॅपिटल म्हणून विकसित करण्यात येणार, असल्याचेही  श्री फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोन धावपट्टया सुरू करणार तसेच येत्या काळात उत्तमोत्तम रस्ते निर्मिती करून नागपूरात  खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले. त्यांनी क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीला जोमाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी, श्री फडणवीस यांच्या हस्ते क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारीणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.  निवर्तमान अध्यक्ष विजय दर्गण आणि नवनियुक्त अध्यक्ष  गौरव अग्रवाला यांनी उपस्थितांना संबोधित केले.

बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

पुणे,23 एप्रिल 2023

बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याची ग्वाही देतानाच विकसित भारताच्या उभारणीमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राने भरीव योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यानी आज पुण्याजवळील बालेवाडी इथे बोलताना केले.

राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि कर्ज पुरवठादार वित्तीय संस्था त्याचबरोबर बांधकाम क्षेत्राशी संबंधित अन्य व्यावसायिकांच्या एक दिवसीय परिषदेत डॉ .कराड बोलत होते. राज्यभरातून सुमारे 250 हून अधिक प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.

कोरोना पश्चात काळात बांधकाम व्यावसायिकांसमोर विविध प्रकारची आव्हाने निर्माण झाली असून सध्याची कर रचना, अत्याधुनिक तंत्ज्ञानाचा वापर, कुशल मनुष्य बळाची कमतरता यासारखे अनेक प्रश्न असल्याचे विचार काही बांधकाम व्यावसायिक वक्त्यांनी मांडले, त्याचा उल्लेख करून डॉ .कराड यांनी तुमच्या सर्व समस्यांवर एकत्रित बसून चर्चेद्वारे समाधानकारक तोडगा काढण्यास सरकार कटिबध्द असल्याचे सांगितले.

जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत असून 2047 पर्यंत म्हणजे आगामी 25 वर्षांच्या अमृत काळात विकसित आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी करणे हे आपल्या सर्वांचे मुख्य ध्येय आहे, देशाच्या सकल उत्पन्नात बांधकाम क्षेत्राचा तिसरा क्रमांक असून या क्षेत्राने विकसिन भारत निर्मितीच्या या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केले.

स्वामी नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस: ४ जणांचा मृत्यू-२२ प्रवासी जखमी

अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती गठित

पुणे, दि. २३: मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील स्वामी नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपूस केली. जखमी व्यक्तींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, आपत्कालिन वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथिलेश हराळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश चापे आदी उपस्थित होते.

अपघातग्रस्त रुग्णांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघाताबाबत आढावा घेण्यात आलेला आहे. येथे होणाऱ्या अपघाताची कारणे व त्याअनुषंगाने उपाययोजना सुचविण्याबाबत ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ या संस्थेला काम देण्यात आले होते. या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी स्ट्रिप्स लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालादेखील याबाबत सूचना देण्यात आल्या असून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने काम करण्यात येत आहे.

खासगी बस आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये २२ प्रवासी जखमी झाले आहेत. ससून रुग्णालय येथे ५ व्यक्ती, चव्हाण मल्टीस्पेशालिटी रुग्णालय येथे ९ व्यक्ती, नवले रुग्णालय येथे ६ व्यक्ती, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे २ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती बरी आहे. एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. रुग्णांना आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना संबंधित रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती गठित
अपघाताची तीव्रता लक्षात घेता या घटनेची चौकशी करण्यासाठी वाहतुक शाखचे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केल्याचे आदेश डॉ. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी निर्गमित केले आहे. या समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सदस्य तर प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम समावेश करण्यात आला आहे.

समितीने घटनेचा अभ्यास करुन सात दिवसात अहवाल सादर करावा. या प्रकारचे अपघात कमी करण्याच्या अनुषंगाने कमी कालावधीत (तात्काळ) करावयाच्या उपाययोजना आणि प्रदीर्घ कालावधीत करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात याव्यात. या ठिकाणांच्या आपघातांबाबत ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ या संस्थेने सुचविलेल्या उपाययोजना व केलेल्या उपाययोजना याचाही अहवालात अंतर्भाव असावा, अशा सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

ससून रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची नावे पुढीलप्रमाणे: वैभव अनिल वनारसे (वय ४६ वर्ष) रा.बदलापूर, हरिदास मुगुट मांढरे (वय ४७ वर्ष), रा.धनवडी जि. सातारा, ओमकार अनिल वनारसे (वय १७), रा. बदलापूर, साहेबराव कोंडींबा वाघमोडे (वय २६ वर्ष) बुलढाणा आणि अधिरा प्रमोद भास्कर (वय ६ वर्षे) रा. कोल्हापूर अशी रुग्णांची नावे आहेत

४५ वर्षीय महिलेला अटक:मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या खालील हॉटेलात रात्री अकरानंतर धिंगाणा घातल्याचा आरोप

पुणे-हॉटेलमध्ये जेवताना भाकरी न मिळाल्याच्या रागातून मद्यधुंद महिलेने धिंगाणा घातल्याचा प्रकार पुण्यात मार्केटयार्ड परिसरात घडला. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच उपहारगृहात गोंधळ घातल्या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची माहिती मिळताच, घटनास्थळी आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला देखील महिलेने मारहाण केल्याची प्रकार घडला. याप्रकरणी नूतन (वय -४५) नामक महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन शिवसागर हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी शनिवारी रात्री आली होती. तिने मद्यपान केले होते. जेवणात भाकरी न दिल्याने सुर्वे चिडली. तिने हॉटेल मधील कामगार आणि व्यवस्थापकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी हॉटेल मध्ये जेवण करणाऱ्या ग्राहकांच्या ताटात पाणी ओतले तसेच ग्राहकांना तिने थेट शिवीगाळ केली.

याप्रकरणी पोलीस नाईक वनिता माने यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वनिता माने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या वाहनतळाजवळ श्रीसागर हाॅटेल आहे.

हॉटेल व्यवस्थापकाने त्वरीत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस कर्मचारी वनिता माने संबंधित ठिकाणी आला त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील महिलेने गणवेशात असलेल्या माने यांच्या नावाची पट्टी जोरात खेचली. तसेच माने यांना धक्काबुक्की करुन त्यांचा अंगठा पिरगळला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणणे तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पुढील तपास करत आहेत.

काॅसमाॅस बँक सायबर हल्ल्यातील 11 आरोपींना 94 कोटी 42 लाखांचे फसवणूक प्रकरणी शिक्षा

पुणे-काॅसमाॅस बँकेवर झालेल्या सायबर हल्ला प्रकरणातील 11 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांपैकी एका आरोपीचा मृत्यू झाला होता.आरोपी सलमान बेग, फिरोज शेख यांना दोषी ठरवून न्यायालयाने तीन वर्षे साधी तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये तीन वर्षे साधी कैद, तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.फहिम मेहफूज शेख (रा. भिवंडी, ठाणे), फहिम अझीम खान (रा. आझादनगर, सिल्लोड, ओैरंगाबाद), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (रा. सिल्लाेड, ओैरंगाबाद), महेश साहेबराव राठोड (रा. भोकर, जि. नांदेड), नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (रा. विरार, जि. पालघर), मोहम्मद सईद इक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (रा. हमालवाडा, दर्गा रस्ता, नांदेड), युस्टेस अगस्टीन वाझ (रा. जोगेश्वरी, मुंबई), अब्दुला अफसरअली शेख (रा. मिरा रोड, जि. ठाणे), बशीर अहमद अब्दुल अझीज शेख (रा. भायखळा, मुंबई), सलमान मोहम्मद नईम बेग (रा. तनवरनगर, मुंब्रा, जि. ठाणे), फिरोज यासीन शेख (रा. काळा चौकी, मुंबई) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

काॅसमाॅस सायबर हल्ला प्रकरणातील आरोपींनी काॅसमाॅस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करुन काॅसमाॅस बँकेची एकूण मिळून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लांबविली होती. आरोपींनी काही रक्कम परदेशातील बँक खात्यात वळविली होती.सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपींनी परदेशातील ज्या बँकेत रक्कम वळविली होती. त्या बँकेशी तातडीने संपर्क साधून खाती गोठविली होती. त्यासाठी पोलिसांना हाँगकाॅंग पोलिसांनी सहकार्य केले होते. भारतातील आरोपींनी बनावट डेबिट कार्डचा वापर करुन रक्कम काढली होती.

आरोपी फहिम शेख, फहिम खान, शेख जब्बार, महेश राठोड, नरेश महाराणा, मोहम्मद जाफरी, युस्टेस वाझ यांना न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्ष साधी कैद, २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन दिवसांची कैद, तसेच अन्य कलमांन्वये तीन वर्षे साधी कैद, १०० रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये तीन वर्षे साधी कैद, १०० रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी अब्दुल शेख, बशीर शेख यांना विविध कलमांन्वये दोषी ठरवून चार वर्षे साधी कैद, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये तीन वर्षे साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी कोल्हापूर, अजमेर, इंदूर, मुंबई परिसरातून १८ आरोपींना अटक केली होती. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, संभाजी कदम, सहायक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, उपनिरीक्षक सागर पानमंद, हवालदार अस्लम अत्तार, संतोष जाधव आदींनी या प्रकरणाचा तपास केला.