जळगाव-सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 लोकांचे राज्य आहे. ते पुढच्या 15 दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचक्र अर्पण करा, अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे आज 23 एप्रिलला जळगावात येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेपूर्वीच वातावरण तापले आहे. आता राऊतांनी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही. तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही. मात्र या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरले आहे.
उद्धव ठाकरेंची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. मात्र सभेपूर्वीच राजकारण तापले असून गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिंदे गटाने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तर संजय राऊत यांनी सरकार कोसळण्याचा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेल, असा इशारा शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाने सभेत घुसून दाखवा आणि रोख 51 हजारांचे बक्षिस घेऊन जा, असे चॅलेंज दिले आहे. त्यामुळे आज सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.