श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;
ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये होणार आंब्याच्या प्रसादाचे वाटप
पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.
यापूर्वी पहाटे ४ ते सकाळी ६ पर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता विशेष गणेशयाग आणि रात्री ९ वाजता भजन विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन झाले. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.