राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अतिक्रमणे प्रथम काढा –नदी काठच्या रस्त्याच्या सात दिवसात निविदा
बीआरटी ला विरोध करूनच अजित पवारांनी घालविली होती कलमाडींची सत्ता
पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी थेट विमाननगर मधील हयात हॉटेल पर्यत दुमजली उड्डाणपूलाचा आराखडा तयार करण्यात येईल अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकऱयांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शुक्रवारी दिली. तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी या मार्गावरील बीआरटी काढून टाकून अतिक्रमणांवर कारवाई करावी अशा सूचना पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासदर्भात उपाययोजना करण्यासाठी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नुकतेच महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगर रस्त्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीचा आढावा घेतला. यावेळी आमदार टिंगरे यांच्यासह एनएचएआयचे संजय कदम, महापालिका अतिरिक आयुक्त विकास ढाकणे, अधिक्षक अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी तसेच पीडब्लूडी, पोलिस वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय मगर आणि महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी वाहतूक कोंडीच्या कारणांची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या माध्यमातून पुणे ते औरंगाबाद या महामार्गाचे जे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात शिक्रापूर ते वाघोली पर्यत जे दुमजली उड्डाणपूल करण्यात येणार आहे तो थेट विमाननगर मधील हयात हॉटेल पर्यत करण्यासंबंधीचा आराखडा तयार करावा. त्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यास मंजुरी मिळवून देऊ असे पवार यांनी सांगितले. तसेच महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दीक्षित यांच्याशी पवार यांनी फोनवरून संपर्क साधून उड्डाणपूलाच्या कामानुसार मेट्रोचा सुधारित डीपीआर करण्याच्या सुचना दिल्या. एनएचआयच्या अधिकऱयांनी त्यास सहमती दिली. तसेच केंद्र शासनाच्या जे एनएनयुआरएम योजनेंतर्गत रस्त्यासाठी निधी आणताना त्यावर बीआरटी योजना बंधनकारक होती. त्यानुसार त्यावेळेस बीआरटी योजना राबविली होती. आता मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्याने बीआरटी मार्ग काढून टाकावा अशा सूचना पवार यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या. तसेच वाघोली, लोहगावकडून पिंपरी चिंचवड कडे जाणाऱ्या रिंगरोडचे कामही तात्काळ सुरू करण्यास पवार यांनी सांगितले. दरम्यान नगर रस्त्यावरील वाहतूक उपाय योजनांसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सागण्यात आले.
नदी काठच्या रस्त्याच्या सात दिवसात निविदा
नगर रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या खराडी- शिवणे रस्त्याच्या कामाचा आढावा पवार यांनी घेतला. यावेळी अति. आयुक्त ढाकणे यांनी या रस्त्यावरील राहिलेल्या दोन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून ती आता झाली असून आठवडा भरात रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल असे सांगितले.
माझ्या पक्षाच्या लोकांची असेल तरी अतिक्रमणे काढा
नगर रस्त्यावर वाघोली पर्यत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तात्काळ कारवाई करा. त्यात माझ्या पक्षाच्या लोकांची जरी अतिक्रमणे असली तरी त्यावर कारवाई करून ती काढून टाका अशा स्पष्ट सूचना पवार यांनी दिल्या.