Home Blog Page 1560

सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे शैक्षणिक केंद्र आणि व्यायामशाळेचे उद्घाटन

मुबंई 01 मे 2023

लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी आज, 1 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे गावाला भेट दिली आणि भारतीय सशस्त्र दलांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय तसेच सुलभ भर्ती प्रक्रियेच्या उद्देशाने उभारण्यात आलेले शैक्षणिक केंद्र तसेच व्यायामशाळा यांचे उद्घाटन केले.

राज्यातील सातारा, सांगली, कराड, सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे भारतीय सेनादलातील भरतीसाठी पारंपारिकरीत्या प्रसिध्द आहेत. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावाची लोकसंख्या सुमारे 3000 आहे आणि या गावात राहणाऱ्या साडेतीनशे कुटुंबांपैकी प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य सशस्त्र सेना दलात कार्यरत आहे. या गावातील 46 जवानांनी पहिल्या जागतिक महायुद्धात हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून ब्रिटीश सरकारने गावाच्या केंद्रस्थानी विजय स्तंभ उभारला आहे. याखेरीज 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान तसेच 1965 आणि 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या दोन युद्धांमध्ये या गावातील अनेक सैनिकांनी शत्रूशी लढताना प्राणार्पण केले आहे. या गावातील मुलांना लहानपणापासूनच भारतीय सशस्त्र सेनादलांमध्ये कारकीर्द घडविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यात येते आणि त्यादृष्टीने प्रशिक्षण देखील देण्यात येते.या गावाने भारतीय सेनेला दिलेल्या अशा प्रकारच्या अद्वितीय योगदानासाठी षण्मुखानंद कला आणि संगीत सभेने अपशिंगे गावाला षण्मुख शौर्य पुरस्कार 2022 देऊन गौरव केला. याप्रसंगी गावातील 75 माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय सशस्त्र दलांमध्ये देशातील तरुण मुलामुलींना भर्ती करून घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नुकत्याच सुरु केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीसह पात्रतेच्या इतर मापदंडांची पूर्तता होणे अनिवार्य आहे. त्या दृष्टीने या जिल्ह्यांमधील युवावर्गाला प्रेरित करून आवश्यक पात्रता मिळवता यावी या दृष्टीने देशातील माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन, षण्मुखानंद कला आणि संगीत सभा तसेच साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थांनी संयुक्तपणे त्यांच्या संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाद्वारे सुमारे 80 लाख रुपये खर्चून अपशिंगे गावात सुविधा केंद्राची उभारणी केली आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागाचे कमांडर इन चीफ, लेफ्टनंट जनरलएच.एस.कहलोन आणि एसआयईएस तसेच षण्मुखानंद कला आणि संगीत सभा या संस्थांचे अध्यक्ष डॉ.व्हीशंकर यांच्यासह साताऱ्याच्या अपशिंगे गावातील अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

पुणे, दि. १: राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार आहे, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षकागृह, चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व जन आरोग्य संचालनालय पुणे विभागाचे संचालक एम. आर. पाटील, बाष्पके विभाग पुणे विभागाचे संचालक डी. पी. अंतापुरकर, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

डॉ. खाडे म्हणाले, कामगारांना हक्काच्या सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येईल. कामगारांना आरोग्यविषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्यात ६ मल्टीस्पेशालटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात असे रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

कामगारांचा अपघात झाल्यावर त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी विमा कंपनीबाबत योजना तयार करण्यात येत आहे. सुरक्षा मंडळातील कर्मचारी, अर्धवेळ काम करणाऱ्या कामगाराला एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. खाडे पुढे म्हणाले, कामगारांना शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले असून ही पुस्तिका सर्व तालुक्यात पोहोचविण्यात यावी. कामगारांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देणार असून याकरिता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून सल्ला घेण्यात येईल. प्रामाणिकपणे काम करा, उद्योगवाढीसाठी प्रयत्न करा. उद्योग टिकला तर कामगार टिकेल असा संदेश देत त्यांनी कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहनही केले.

कामगार भूषण आणि गुणवंत कामगाराची घोषणा
यावेळी मंत्री डॉ. खाडे यांनी कामगार भूषण आणि गुणवंत कामगारांची घोषणा केली. लवकरच मुबंई येथे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खासदार श्री. बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्याची, कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते. कामगारांना हक्काचे घर, मोफत उपचार, विमा, पाल्याना शिष्यवृत्ती, सुरक्षा आदी सुविधा शासनाच्या वतीने पुरविण्यात येत आहे

श्रीमती सिंघल म्हणाल्या, औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. कामगारांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

श्री. देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले, केंद्र आणि राज्य शासन कामगार कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी कायदे करुन त्यांचे जीवनमान सुखकर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबियाचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी सामाजिक सुरक्षा, आरोग्य योजना, आर्थिक, शैक्षणिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे.

आमदार श्रीमती खापरे आणि श्रीमती जगताप यांनीही विचार व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

बाष्पके संचालनालयाच्या बाष्पके कामगारासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने तयार करण्यात आलेली चलचित्रफीत दाखविण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, अजित अभ्यंकर, बाबा कांबळे, केशव घोळवे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना २ लाख रुपये अर्थसहाय्य, बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसाला ५ लाख रुपये, नैसर्गिक मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसाला २ लाख रुपये, बांधकाम कामगारांच्या नैसर्गिक मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस २४ हजार रुपये, अत्यंविधीकरीता १० हजार रुपये, कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप, शिवणयंत्र वाटप करण्यात आले. घरेलू कामगाराना मदत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
0000

आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात; बसस्थानकेही होणार स्वच्छ, सुंदर

मुंबई दि. १ : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठिशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. सध्या मुंबई–ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत मात्र एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी कारण एसटीला परंपरा आहे. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत.

स्वच्छ सुंदर बसस्थानकाची अपेक्षा    

एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे.

एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे, त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषणही कमी

आज राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली आहे याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.

आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यात राज्यातील थांबलेल्या कामांना चालना दिली. अगदी पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडविणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्ष पुर्ण झालेल्या ८ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवाशी याचा लाभ घेत आहेत, यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे ३ लाख प्रवासी होते, आता ५४ लाख प्रवासी झाले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक एसटीत मोफत प्रवास करतात तसेच महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते त्यामुळे दररोज एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १० लाख झाली आहे.

यावेळी बोलतांना सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी बालपणापासून आपण एसटीचा प्रवास करीत आलो असल्याचा उल्लेख केला तसेच एसटी प्रवासातल्या वाहक चालकांच्या आठवणी सांगितल्या. आधुनिक काळाशी जोडून घेण्याची गरज असून एसटीचा कारभार सर्वांपर्यंत पोहचेल याची जबाबदारी मी घेईल असेही ते म्हणाले.

यावेळी हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एक मिनिट स्वच्छतेसाठी … एक मिनिट महाराष्ट्रासाठी या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.

या कार्यक्रमास परिवहन व बंदरे प्रधान सचिव पराग जैन, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

दक्ष पुणे पोलिसांनी स्टेजवर जाऊन प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा शो बंद पाडला

संयोजकांच्या कडून, वेळ दिली ६ वाजताची प्रत्यक्षात कार्यक्रम सुरु झाला साडेसात वाजता ..

पुणे- आपल्या संगीताने रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा, बॉम्बे आणि रोजा सारख्या चित्रपटांना अनवट चाली देणारा, ऑस्करपर्यंत धाव घेणारा सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा पुण्यातला शो रात्री १० नंतर काही नाही सांगत दक्ष पोलिसांनी बंद पाडला.रहमान यांनी पोलिसांच्या आदेशाचे सत्वर पालन केले पण त्यामुळे रसिकांचा मात्र हिरमोड झाला

.पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात रविवारी रात्री हा शो रंगला होता. हजारो रसिक यावेळी उपस्थित होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रहमान यांना हा शो बंद करावा लागला.रसिकांनी २ हजारापासून ते २० हजारापर्यंत चे शुल्क असलेली या शो ची तिकिटे खरेदी केली होती . १ लाख २१ हजाराचेही विशेष तिकीट यासाठी होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.तिकीट दर पुढील प्रमाणे होते. ) (Rates With Us (All Inclusive):Silver – Rs.1,499Gold – Rs.2,999Gold Premium – Rs.6,999Platinum – Rs.10,999Solitaire – Rs.15,900Online Rates:Silver – Rs.1,587Golden – Rs.3,175Gold Premium – Rs.7,411Platinum – Rs.11,647Solitaire – Rs.121,178)

पुण्यात रविवारी रात्री सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची रसिकांना अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. विशेष म्हणजे हजारो जण या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक पोलिसांची कुटुंबे या कार्यक्रमाचा आनंद घेत होती. पिंपरी चिंचवडसह दूरन अनेक जण या कार्यक्रमाला आलेले. शो एकदम रंगात आलेला. टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस सुरू होता. अनेकांनी रहमान यांच्या गीतावर ताल धरलेला. मात्र, पोलिसांनी ऐनवेळी हा कार्यक्रम बंद पाडला. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण फेरले गेले.

संगीतकार ए. आर. रहमान यांचा कार्यक्रम रात्री दहानंतरही सुरू होता. कार्यक्रमात रंगत चढलेली. मात्र, रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास न्यायालयाने मनाई केलेली आहे. याच कारणामुळे पोलिस निरीक्षकांनी रहमान यांचा शो बंद पाडला. तसेच रात्री दहानंतर तुम्ही कार्यक्रम कसा काय सुरू ठेवला, तुम्हाला नियम माहिती नाही का, असा सवाल पोलिसांनी रहमान यांना केला. मात्र, त्यांनी पोलिसांचे ऐकूण घेतले आणि निमूटपणे काहीही न बोलता स्टेजच्या पाठीमागे निघून गेले. . या कार्यक्रमांची वेळच ६ ते १० अशी देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम साडेसात वाजता सुरु करण्यात आला .

ए. आर. रहमान यांनी त्यांच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ट्विट शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं, ‘काल रात्री पार पडलेल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! हा रोलर कोस्टर कॉन्सर्ट होता. शास्त्रीय संगीताचं माहेरघर म्हणजे पुणे! आम्ही लवकरच तुमच्या समोर गाणं गण्यासाठी परत येऊ!’

दिव्यांगांच्या सक्ष्मीकारणासाठी सर्वोतोपरी मदत करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील.

10 दिव्यांगांना व्हीलचेयर भेट – शंभराव्या मन की बात निमित्त शंभर दिव्यांगांना मदत करणार – संदीप खर्डेकर.

दिव्यांगांनी एकत्र येऊन ऐकली पंतप्रधान नरेंद्र मोदींची शंभरावी मन की बात

पुणे :

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि एनॅबलर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज दिव्यांग बंधू भगिनींसाठी एकत्रित पंतप्रधान नरेंद्र मोदींचा “मन की बात” चा शंभरावा भाग ऐकण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिव्यांगांच्या कल्याणासाठी तत्पर असून त्यांनी एक मन की बात चा भाग हा दिव्यांगांना समर्पित केला होता, म्हणूनच आज दिव्यांग बंधू भगिनींसमवेत शंभरावा भाग ऐकण्याचे नियोजन केले असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. शंभराव्या भागाचे औचित्य साधून शंभर दिव्यांगांना रोजगारासाठी मदत करणे, व्हीलचेयर भेट देणे, शस्त्रक्रिया करणे,बॅटरी वर चालणारे वाहन उपलब्ध करणे असा संकल्प सोडला असून आज उद्योजक संजीव अरोरा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहा दिव्यांगांना व्हीलचेयर भेट देऊन ह्या उपक्रमास प्रारंभ करत असल्याचे संदीप खर्डेकर आणि संयोजिका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.
” दिव्यांगांच्या प्रतीचे कोणतेही सेवाकार्य हे पुण्याचे काम असून अश्या प्रकारे प्रसिद्धीच्या मागे नं धावता समर्पित वृत्तीने सेवाकार्य करणारे उद्योजक संजीव अरोरा, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि एनॅबलर चॅरिटेबलं ट्रस्ट चे संस्थापक अमोल शिनगारे यांच्यासारख्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.” दिव्यांगांना व्हीलचेयर भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. *मी पुण्यातील दिव्यांगांची यादी तयार केली असून येणाऱ्या काळात कोणताही दिव्यांग व्यक्ती हा सक्षम कसा होईल यावर मी लक्ष केंद्रित केले आहे असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तर दिव्यांग बंधू भगिनींना मिळवून देऊच पण पुणे शहरात संजीव अरोरा सारखे उद्योजक, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे संदीप खर्डेकर व मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी यासारखी अनेक व्यक्ती काम करत आहेत ज्यांच्या माध्यमातून दिव्यांगांना जे जे लागेल ते ते पुरविण्याचा माझा ही प्रयत्न असल्याचेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
मन की बात कार्यक्रमादरम्यान दिव्यांग बंधू भगिनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टाळयांच्या गजरात अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अमोल शिनगारे व राहुल अवघडे,उद्योजक संजीव अरोरा, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे, भाजप आय टी सेल च्या प्रमुख सौ. कल्याणी खर्डेकर, राजू दाभाडे, ऍड. अमोल काजळे पाटील, सतीश कोंडाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन, अमोल शिनगारे यांनी आभार प्रदर्शन तर मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांचे सत्कार केले.

अवयवदान चळवळीला बळकटी मिळण्यासाठी जनजागृती आवश्यक- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील


पुणे-रक्तदानाप्रमाणे अवयवदान चळवळीला बळकटी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात संवाद कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचे औचित्य साधून अवयवदान चळवळीत मोलाचे योगदान देणार्‍या २१ घटकांचा देवदूत पुरस्कार देऊन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मॉडर्न विकास मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संयोजक डॉ. संदीप बुटाला, मनिषा बुटाला, भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस (कार्यालय) रवी अनासपुरे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, मन की बातच्या गेल्या भागात मोदींनी अवयवदान चळवळीवर भाष्य केले होते. त्यामुळे या विषयाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून नियोजनबद्ध योजना आखून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महापालिका स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सुचना करण्यात येतील.
देवदूत पुरस्काराने सन्मानित
अवयव दाते – स्वराली गुजर, स्वप्निल केदारी, सौ. टोकेकर
अवयव प्रत्यारोपण सर्जन व अतिदक्षता विभाग – डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. रविंद्र कोलते, डॉ. वृषाली पाटील
समन्वयक – आरती गोखले, वृंदा पुसाळकर, मयुरी बर्गे, शर्मिला पाध्ये
ग्रीन कॉरिडोअर – पीएसआय इनामदार, प्रकाश मोहिते, बाबाजी आहेर, जिवाजी पोटे, सत्यवान साबळे
स्वयंसेवी संस्था – वंचित विकास व शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट, रिबर्थ ङ्गाउंडेशन, रोटरी इंटरनॅशनल क्लब, जनकल्याण समिती, लायन्स इंटरनॅशनल क्लब
रुग्णवाहिका – शंकर नेटके, अविनाश शिंदे

पुण्यातील शिवाजी नगर जम्बो कोविड सेन्टर घोटाळा, एकाला पोलिसांकडून अटक

पुणे- सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस चा भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेन्टर च्या गैरव्यवहार प्रकरणी आज पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मध्ये ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला.भाजप नेते डॉ किरीट सोमैय्यानी हा घोटाळा उघडकीस आणला होता.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार ही केली होती. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.शिवाजीनगर कोविड सेन्टर मध्ये ३रुग्णांचा मृत्यू झाला होता डॉ सोमैय्या यांच्या तक्रारीनंतर पुणे महानगरपालिकेने तसेच PMRDA ने सदर कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

शासनाने केंद्राकडे पाठविलेल्या हुतात्म्यांच्या टपाल तिकिटाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणार… डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, ता. १: महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेल्या लढ्यात अजरामर ठरलेल्या १०६ वीरांचे स्मृतिस्थळ असलेल्या हुतात्मा चौकात आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाऊन स्मारकाला अभिवादन केले. यावेळी त्यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी नुकताच प्रकाशित केलेला “उपसभापती कार्यालयाचा कार्य अहवाल” यावेळी स्मारकाजवळ लोकार्पण केला. हुतात्मा स्मारकाच्या टपाल तिकीटाची निर्मिती करण्यासाठीचा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

शासकीय निवास स्थानी ध्वजवंदन
आज सोमवार, दिनांक १ मे, २०२३ रोजी विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान “पुरंदर” येथे महाराष्ट्रदिना निमित्त ध्वजवंदन केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रवींद्र खेबूडकर, विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब, संतोष उडतेवार, स्विय सहाय्यक अनिल कदम,
योगेश जाधव, कौस्तुभ खांडेकर आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्राची निर्मिती करताना ज्या ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान केले आहे, त्यांचे स्मरण कायमच या राज्याला राहील. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये हुतात्मा झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न घेऊन या पुढील काळात काम करणार आहे.”

महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विधान भवन, मुंबई येथे ध्वजवंदन कार्यक्रमात प्रमुख सहभाग
यानंतर विधान भवन येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते विधान भवनातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ११ सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधान भवनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

रिंकू राजगुरू, ललित प्रभाकर यांच्या ‘खिल्लार’मधून होणार बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

  • मकरंद माने दिग्दर्शित आगामी चित्रपटाची घोषणा

महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे ‘खिल्लार’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी ‘खिल्लार’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल.

मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून स्थान निर्माण केलेल्या मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेला रिंगण हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर मकरंदनं यंग्राड, कागर, सोयरीक, पोरगं मजेतंय असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मूळचा पश्चिम महाराष्ट्रातला असल्यानं मकरंदनं बैलगाडा शर्यतींचं वातावरण अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय तो ‘खिल्लार’ चित्रपटातून मांडत आहे. रिंकू राजगुरूनं कागर या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यामुळे मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे.

चित्रपटाविषयी मकरंद माने म्हणाला, की बैलगाडा शर्यतीचा विषयच अगदी जिव्हाळाचा आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ पडद्यावर रंगवताना ‘खिल्लार’मधून मैदान जोरदार रंगणार माझी खात्री आहे.

भाजपा सरकारकडून राज्याची होत असलेली अधोगती थांबवूया : नाना पटोले

कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपालाच आता घरी बसवा.

काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार उत्साहात साजरा.

मुंबई, १ मे २०२३
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर देशात पहिल्या नंबरचे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीपथावर आणून ठेवले. परंतु मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या आदेशावरून भाजपा सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहे. ही अधोगती थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी आणण्याचा संकल्प महाराष्ट्रदिनी करुयात, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी के. राजू, माजी मंत्री व आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकिम,सोशल मीडीयाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने महाराष्ट्रात गुंतवणूक वाढावी यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले, कायदा सुव्यवस्था उत्तम राखली ज्यामुळे महाराष्ट्र देशात सधन व गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंदीचे राज्य म्हणून उभे राहिले परंतु राज्यात सध्या गुंतवणुक येऊ दिली जात नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवले जात आहेत परिणामी राज्यातील बेरोजगारी वाढण्यात होत आहे. महाराष्ट्राची ही अधोगती रोखण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

देशाच्या जडणघडणीत कामगारांचे मोठे योगदान आहे. कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळाले पाहिजेत यासाठी काँग्रेस सरकारने कायदे केले पण भाजपा सरकारने ते कायदे बदलून भांडवलदारधार्जिणे कायदे बनवले आहेत. नव्या कामगार कायद्याने कामगारांना मालकांचे गुलाम बनवण्याचे काम केले आहे. कामगारांना उद्धवस्त करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. कामगारदिनी भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प करा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जनतेचा आशिर्वाद ज्या पक्षाला त्या पक्षाचा मुख्यमंत्री..

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु असली तरी त्यावर आता भाष्य कण्याची गरज वाटत नाही. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, ते प्रश्न हाती घेऊन काँग्रेस जनतेला न्याय देण्यासाठी लढत आहे. सध्या निवडणुका नाहीत त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, जे लोक त्यावर चर्चा करत असतील तर त्यांना करु दया. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय जनताच करेल. ज्या पक्षाला जनता आशिर्वाद देईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.
राज्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच नंबर एकचा पक्ष म्हणून विजयी झालेला आहे. जनतेचा विश्वास काँग्रेस पक्षावर आणखी दृढ झालेला आहे. भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडाला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.

वाणिज्य क्षेत्रात नोकरी, व्यवसायाच्या मोठ्या संधी-विवेक वेलणकर

‘आयटॅप’तर्फे नोकरी मिळालेल्या १२१ विद्यार्थ्यांचा सत्कार

पुणे : “वाणिज्य शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. झटपट श्रीमंती व मोठ्या ब्रँडमागे जाऊन विद्यार्थी चूक करतात. एकाच ठिकाणी सातत्याने चांगले काम करणे हेच यशाचे गमक आहे,” असे मत करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.
पुण्यातील ‘आयटॅप’ संस्थेच्या वतीने नुकतेच एका रोजगार विषयक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या ९० दिवसात ‘आयटॅप’ संस्थेच्या वतीने वाणिज्य क्षेत्रात नोकरी मिळालेल्या १२१ तरुण-तरुणींचा सत्कार करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. नवनीत मानधनी, ‘आयटॅप’चे संस्थापक सीए पंकज मानधने यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

उद्योगाची गरज ओळखून, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी ‘आयटॅप’ने तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे, तसेच विद्यार्थ्याना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे वेलणकर यांनी कौतुक केले. डॉ. नवनीत मानधनी यांनी वेळेचे नियोजन, स्वयंशिस्त, चिकाटी आणि मेहनत याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. नोकरी मिळालेल्या, व्यवसाय सुरु केलेल्या तरुणांनी तसेच त्यांच्या पालकांनी मनोगते व्यक्त केली. 
सीए पंकज मानधने यांनी संस्थेची उद्दिष्टे आणि आत्तापर्यंत केलेले काम याचा आढावा घेतला. ‘आयटॅप’ ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत असून, आजवर दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत रोजगार उपलब्ध करून दिला आहे, असे मानधने यांनी नमूद केले.

आसमंतात दुमदुमले वैभवशाली महाराष्ट्र गीताचे स्वर 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी चा पुढाकार ; महाराष्ट्र शाहीर साबळे यांना १०० बाल व युवा शाहिरांची गीत सादरीकरणातून मानवंदना ; महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजन
पुणे : जय जय महाराष्ट्र माझा… या गीताचे स्वर दुमदुमले आणि जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी असा एकच जयघोष झाला. तब्बल १०० बाल व युवा शाहिरांनी पारंपरिक वेशात भगवे फेटे परिधान करुन महाराष्ट्र गीत सादरीकरण करीत पद्मश्री महाराष्ट्र शाहीर साबळे यांना अनोखी मानवंदना दिली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिकेजवळील मंगला थिएटर प्रांगणात आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या सोबत प्रबोधिनीच्या पोवाडे वर्गातील १०० विद्यार्थ्यांनी गीत सादरीकरण केले. यामध्ये प्रा.संगीता मावळे, होनराज मावळे यांसह प्रबोधिनीतील सेवाव्रतींनी त्यांना साथ देत समूहगीत सादर केले. 
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतील ज्येष्ठ नाव म्हणजे पद्मश्री महाराष्ट्र शाहीर साबळे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे सादरीकरण देखील होत आहे. त्यानिमित्ताने प्रबोधिनीतर्फे १०० शाहिरांनी महाराष्ट्र गीत सादरीकरण करुन त्यांना मानवंदना दिली.  शाहीर साबळे यांनी आपल्या आवाजातून हे गीत अजरामर केले आहे. गीत सादरीकरण झाल्यानंतर सर्वांना हा चित्रपट देखील दाखविण्यात आला.

“एखादी जखम पुरेशी असते , कवितेसाठी….

*’कवितेस कारण की..’  कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद !

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः
 भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘आरपार’ प्रस्तुत ‘कवितेस कारण की..’   या  कार्यक्रमाला तरुणाईचा भरभरून  प्रतिसाद मिळाला ! 
‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला..या कार्यक्रमात जयेश पवार,नैनेश तांबे,भैरवी चितळे,सारंग पांपटवार,अपूर्व राजपूत  यांनी कवितांचे, गझलांचे प्रभावी  सादरीकरण केले. कवितांच्या या सादरीकरणाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

  “एखादी जखम पुरेशी असते , कवितेसाठी  कविता नसते, नुसती शब्दांची दाटी “
असे सांगत कविता,गजल, गप्पांची ही बहारदार मैफल उत्तरोत्तर रंगत गेली
“आज ऐकायला फक्त आहेस तू,  गोष्ट ऐकायला फक्त आहेस तू,नजर लावायला जग उभे राहिले,नजर काढायला फक्त आहेस तू !
अशा आर्त आणि सार्थ कवितांना भरभरून दाद मिळाली.
मला बघायची आहे , तुझ्या डोळयातली दरी,काजळाने माखलेली !
 अशी सादही या कवींनी घातली.
या कैदेतून सुटका नाही,  विचार कर या मिठीत येण्याआधी,  लिहिली जाते कहाणी आपली दोनच भागामध्ये ,  मला भेटल्यानंतर, मला भेटण्याआधी “
 अशा ओळीही दाद मिळवून गेल्या.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी युवराज गाडवे

पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी २०२३-२४ या मंदिराच्या १२६ व्या वर्षाकरीता युवराज गाडवे यांची निवड झाली. तर कार्यकारी विश्वस्तपदी डॉ.पराग काळकर, खजिनदारपदी अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई आणि उप उत्सवप्रमुख म्हणून सुनिल रुकारी यांची नियुक्ती झाली आहे.  
यासोबतच अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे हे विश्वस्तपदी असणार आहेत. ट्रस्टचे नवनियुक्त अध्यक्ष युवराज गाडवे हे काका हलवाई चे संचालक असून त्यांनी दत्तमंदिर ट्रस्टवर मागील पंचवार्षिक कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष व विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय अनेक सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत. डॉ.पराग काळकर हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर, विधी क्षेत्रात अ‍ॅड.रजनी उकरंडे व अक्षय हलवाई हे व्यावसायिक आहेत. 
अ‍ॅड. प्रताप परदेशी, अ‍ॅड.शिवराज कदम-जहागिरदार यांनी यापूर्वी दत्तमंदिर ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तर, महेंद्र पिसाळ हे पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. यंदाचे मंदिराचे १२६ वे वर्ष असून वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम होणार आहेत. तसेच ट्रस्टकडे असलेल्या निधीचा विनियोग सामाजिक कार्याकरिता करणार असल्याचा निर्धार नवनियुक्त अध्यक्ष युवराज गाडवे यांसह नवनियुक्त विश्वस्त मंडळाने केला आहे.