Home Blog Page 1561

ज्येष्ठ नृत्य गुरु मनीषा साठेंच्या नृत्यप्रस्तुतीने गाजला ‘अनुवेध’चा नृत्यदिन !

पुणे :

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधून मनीषा नृत्यालय संस्थेने आयोजित केलेला ‘अनुवेध’ हा कार्यक्रम ज्येष्ठ नृत्य गुरु मनीषा साठे आणि शिष्यांच्या नृत्यप्रस्तुतीने गाजला ! बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला.

मंजिरी कारूळकर, शांभवी दांडेकर, शिल्पा दातार, पूर्वा शाह, मानसी गदो, पद्मश्री जोशी, तेजस्विनी साठे, डॉ. माधुरी आपटे, गौरी स्वकुळ, मिथिला भिडे, ईशा काथवटे, पायल गोखले, अदिती कुलकर्णी, मधुरा आफळे, वल्लरी आपटे, अदिती लेले यांच्या बहारदार नृत्यसंरचना प्रस्तुत झाल्या. त्यांच्या शिष्याही प्रतिवर्षीप्रमाणे ह्या नृत्यसंध्येत उत्तम तयारीने सहभागी झाल्या होत्या.

ज्येष्ठ नृत्यगुरु मनीषा साठे यांच्या दुर्गा स्तवन आणि लक्ष्मीताल प्रस्तुतीने उपस्थित भारावून गेले. तराणा, सरगम, होरी, चतरंग, ध्रुपद यासारख्या पारंपरिक बंदिशींसह शिवभूषण, नरनारायण कवित्त, मोजार्ट सिम्फनी, सप्तचक्र अशा विषयांच्या कल्पक हाताळणीने रसिक तृप्त झाले. एकाच नृत्यगुरूंच्या १४ शिष्यांनी एकत्र येऊन अशी प्रस्तुती एकदिलाने साकार करण्याचे असे उदाहरण विरळाच!

मनीषा साठे यांनी छोटेखानी मनोगताद्वारे नव्या पिढीला मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ”माझ्या दृष्टीने सहृदय कलाकारांनी असे एकत्र राहणे, एकमेकांना तत्परतेने मदत करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. नृत्य तर त्यांनी विचारपूर्वक आणि चांगले केलेच पाहिजे पण एकमेकांबद्दलचे प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात जमेची बाजू!”

डॉ. माधुरी आपटे यांनी निवेदनाची बाजूही सांभाळली.

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन

0

पुणे दि.१: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अनमोल मित्तल यांनी केले. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल, पुणे शहर गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- ११२ पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक, पुणे मनपा अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल १०८ सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला.

पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले. पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त आणि तत्कालीन पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे शाखा रंजन कुमार शर्मा यांना एनसीआरबी नवी दिल्ली यांच्याकडून सीसीटीएनएस प्रणालीबद्दल सादरीकरणाबद्दल मिळालेले प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायत टिकेकरवाडी (ता. जुन्नर) यांना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहानिमित्त केंद्र शासनाचा ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्काराबद्दल सन्मान करण्यात आला. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आले. तसेच कामगार आयुक्ताल यांच्याकडील पुरस्कार पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक यांना, उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्राचे पुरस्कार, महसूल विभाग आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध विभागात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रही यावेळी प्रदान करण्यात आले.

पोलीस वाहनांचे हस्तांतरण
जिल्हा नियोजन समितीतून दिलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे शहर पोलीस आयुक्तालयासाठी घेण्यात आलेल्या 24 चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण शहर पोलीस दलाला पालकमंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून अधिकाधिक निधी देण्यात येईल, असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हा व राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री
महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती, गड-किल्ले, सुधारक आणि क्रांतीकारी विचार, इथला इतिहास, शैक्षणिक परंपरा हे आपले वैभव आहे. हे वैभव जपताना समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवित राज्याला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाचा असून जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमीत्त तसेच कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, अमृतकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी; सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास; पायाभूत सुविधांचा विकास; सक्षम कुशल रोजगारक्षम युवा घडवणे आणि रोजगारनिर्मिती; पर्यावरणपूरक विकास ही ध्येये साध्य करण्यासाठी योग्य नियोजन समाविष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील पायाभूत विकासासह ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला गती देण्यात येत आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या हवेली तालुक्यातील तुळापूर आणि शिरुर तालुक्यातील समाधीस्थळ वढू (बु.) येथील स्मारकाच्या विकासकामांची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

शासनाने कायमच शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य दिले असल्याचे सांगून श्री. पाटील पुढे म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजेच ४ हजार २६८ कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. सलग दोन वर्षे पीक कर्जवाटपाचा नवा उच्चांक गाठण्यात आपल्याला यश आले आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राच्या विकासालाही प्राधान्य देण्यात येत आहे. जलयुक्त शिवार २.० अभियान राबविण्यात मान्यता देण्यात आली असून ही योजना जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यांमध्ये उद्योजकांचा सहभाग वाढावा आणि अधिकाधिक उमेदवारांना रोजगार मिळावा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्ह्यातील नामांकित उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात येत्या ५ मे ते ६ जूनपर्यंत मोफत व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील विविध विकासकामे, जी 20 परिषदेचे आयोजन, शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे निर्णय, ग्रामविकासाची कामे आदींचा उल्लेख करून जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी नागरिकांनी योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री श्री.पाटील यांनी केले.
000

सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत; बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना चालू आहेत

मुंबई:  सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालू असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली आहे.

बार्टीच्या माध्यमातून सध्या आयबीपीएस, बँकिंग व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या 30 संस्थाचा करार कालावधी संपृष्टात आलेला असुन कोविडच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया न राबवता एक वर्ष मुदतवाढ देण्याचा तत्कालिन परिस्थितीत सन 2021 मध्ये निर्णय घेण्यात आला होता. सदर निर्णय हा बार्टीच्या नियामक मंडळाने घेतलेला आहे.

सन 2017-18  मध्ये एकूण 6900 विद्यार्थ्यांना 23 हजार प्रति विद्यार्थी याप्रमाणे 34 लक्ष 50  हजार एका संस्थेला निधी देण्यात येत होता, अशा राज्यातील एकूण 46 संस्थांना 16 कोटी 21 लाख रुपये या योजनेच्या अंतर्गत देण्यात येत होते. त्यामध्ये नंतर पोलीस भरती प्रशिक्षण योजनेचा समावेश करण्यात आला आहे. विभागाने या प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला असता असे निर्देशनास आले की, ज्या संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे तेथील विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण पूर्ण घेतल्यानंतर होणारी निवड व रोजंदारीचे प्रमाण हे अत्यल्प आहे. तसेच बार्टीने मध्यंतरीच्या काळात या संस्थांची तपासणी केली असता काही संस्थांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यामुळे अशा संस्थांकडून प्रशिक्षण देणेबाबत भविष्यात विभागाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण करणारे आहेत. तसेच दिवसेंदिवस प्रशिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत चालली असून सन 2023-24 या वर्षात 27600 विद्यार्थ्यांवर प्रतिसंस्था 4 कोटी 41 लक्ष याप्रमाणे 46 संस्थांवर एका वर्षासाठी 202 कोटी 86 लक्ष तर पाच वर्षाकरिता 1 हजार 14 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. शासनाच्या मार्गदर्शक धोरणाप्रमाणे रूपये 10 लक्ष पेक्षा अधिक रकमेच्या खर्चांच्या योजनांसाठी ई निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण योजनांवर पुढील पाच वर्षात रूपये एक हजार कोटी पेक्षा अधिकचा खर्च येणार असल्याने ई निविदा प्रक्रिया राबविल्याशिवाय प्रशिक्षण संस्थाची निवड करणे शासनाच्या मार्गदर्शक धोरणाच्या विपरीत होणार आहे. सदर प्रक्रिया ही शासनाच्या कामगार व उद्योग विभागाच्या शासन निर्णय सन 2016 च्या निर्देशानुसार व चीफ़ विजिलन्स कमिशन (CVC) यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक धोरणाप्रमाणेच काम करावे लागणार आहे.

विद्यार्थी हिताला कोणतीही बाधा निर्माण होईल असे कार्य बार्टी व सामाजिक न्याय विभागाकडून होणार नाही. पारदर्शक पध्दतीने प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाची निवड, गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण व विद्यार्थी हीत याबाबींचा विचार करुन बार्टीचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम अधिक खंबीर, प्रभावीपणे पद्धतीने राबविण्याचे निश्चित केले आहे. बार्टी ने सर्व प्रश्न सक्षमपणे हाताळले आहेत व येणाऱ्या काळात देखील विभागाने तसेच बा्र्टीने अधिक पारदर्शकपणे व गतिमान पद्धतीने योजना राबविण्यावर भर दिलेला आहे.

विभागात अनेक कामे पारदर्शक पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण योजनांची प्रभावी व यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे व येणाऱ्या काळात देखील तितक्याच गतिमान पद्धतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे.  राज्याचा सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्था त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्था सदैव कार्यरत असुन कायम प्रयत्नशील आहे.

शासनाने तसेच बार्टी संस्थेने विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे कार्य केले आहे व विद्यार्थी कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे असेही बार्टीचे महासंचालक  सुनील वारे  यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीसाठी दिले आहे.

स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जगाचा भारताप्रती दृष्टिकोन बदलला – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाचवेळी अनेक क्रांतीकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरु करून एक अभेद्य जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील विश्वधर्म संमेलनातील भाषणातून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या दुसऱ्या नरेंद्र यांनी, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आपण भारतीय आहोत याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो, असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या जनसंवादाच्या शंभराव्या भागाच्या सामुहिक प्रदर्शनानंतर राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री.बैस बोलत होते.

यावेळी हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मधुमेह विशेषज्ञ व कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे, भरडधान्य उद्योजिका व प्रचारक शर्मिला ओस्वाल, राज्यातील अनेक पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी व नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, प्रसाद ओक, शैलेश लोढा, अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते.

भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश झाला असल्याचे सांगून या लोकसंख्येचा देशाला फायदा व्हावा यादृष्टीने प्रधानमंत्र्यांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल, रिस्कील व अपस्कीलचा मंत्र दिला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

‘मन की बात’ चे प्रसारण दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा आकाशवाणीवरून झाल्यापासून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. स्वच्छ भारत, बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ, पाण्याची बचत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह, खादी, भारतीय खेळण्यांचा उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष तसेच अंतराळातील प्रगती यासह अनेक विषयांवर मोदी यांनी ‘मन की बात’ मधून भाष्य केले. संवादात्मक शैलीमुळे ते ‘परीक्षेवर चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचले. ‘मन की बात’ ही खऱ्या अर्थाने लोकांची विकासाची चळवळ झाली आहे, असे सांगून ‘मन की बात’ चा शंभरावा भाग ही देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

सुरुवातीला केंद्रीय संचार ब्युरो यांनी ‘मन की बात’ मधील भागांवर आधारित मांडलेल्या प्रदर्शनाला राज्यपालांनी  भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय प्रकाशन विभागाच्या पुस्तक दालनाला देखील भेट दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘देखो आपला महाराष्ट्र’ टुर पॅकेज जाहीर

मुंबई, : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ७५ टुर पॅकेज उद्या दि. ०१ मे २०२३ रोजी सुरु करण्यात येत आहे.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली व पर्यटनाला नवीन चालना देण्याच्या दृष्टीकोनातून सदर टुर पॅकेजची आखणी करण्यात आली आहे. प्रधान सचिव (पर्यटन) सौरभ विजय, व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे टुर पॅकेज संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्र किनारा, व्याघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, जणू प्रत्येकासाठी इथे काहीना काही आहेच.

सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात.

अजिंठा व वेरुळच्या लेण्या ह्या सर्वांनाच भूरळ घालतात. कोकणात गणपतीपुळे, तारकर्ली सारखे समुद्र किनारे असंख्य पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहेत. विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव, नाशिक मधील मंदिरे, पुण्यातील संस्कृती आकर्षण ठरत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हे बघूनच संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यटक निवास (MTDC Resort) व उपहारागृह (Restaurant) उघडले आहेत. यामुळे पर्यटनांसाठी राहण्याची, खाणपाणाची सोय या पर्यटनाच्या मूलभूत सुविधेतून प्राप्त झाल्या आहेत.

पर्यटक आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासातून मनसुक्त भ्रमंती करु शकतात. एमटीडीसी पर्यटक निवासाचे जाळे तारकर्ली, गणपतीपुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, माथेरान, खारघर एलिफंन्टा, टिटवाळा, माळशेज घाट, भंडारदरा, नाशिक, कार्ला, शिर्डी, पानशेत, कोयना, महाबळेश्वर, छत्रपती संभाजी नगर, अजिंठा, वेरुळ, भिमाशंकर, ताडोबा, पेंच, बोधलकसा, नागपूर, चिखदरा इत्यादी ठिकाणी पसरले आहेत.

दि.01 मे 2023 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) 75 टुर पॅकेज सुरु करत आहेत. या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल.

अनुभावत्मक पर्यटन अंतर्गत कोकणातले काताळ शिल्प, विदर्भातले वन्यजीव, भंडारदरा येथील निसर्ग भ्रमंती, गिर्यारोहण, अवकाश निरीक्षण, कांदळवन इत्यादींचा अनुभव घेता येईल. सोबत गाईडची साथ असणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा विश्वास आहे की, या टुर पॅकेज मधून पर्यटकांना एक मोठी सुविधा उपलब्ध होईल आणि पर्यटनाला प्रत्येक व्यक्ती जाण्यास उत्सुक राहील.

लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थानी

पुणे – राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशांनुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने प्रलंबित १६ हजार ६४६ आणि दाखलपूर्व १ लाख २ हजार ११९ अशी एकूण १ लाख २१ हजार १७७ प्रकरणे निकाली काढून महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थान मिळवले आहे.

या लोकन्यायालयामध्ये एकूण ५९ हजार ३१७ प्रलंबित व एकूण १ लाख ५५ हजार ७५७ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांतील ८ प्रकरणात सामंजस्याने तडजोड करुन त्यातील पती पत्नी दोन्ही पक्षकार आनंदाने नांदण्यास तयार झाले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव मंगल कश्यप यांनी दिली.

व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रकरण निकाली

वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश जे. एस. भाटीया यांच्या पॅनलवर आलेल्या प्रकरणांपैकी दोन प्रकरणांमध्ये काही पक्षकार त्यांच्या वैयक्तीक कारणामुळे न्यायालयात उपस्थित राहू शकले नसल्यामुळे न्यायालयाच्या पुर्व परवानगीने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करुन सदर प्रकरणे सामंजस्याने तडजोडकरुन मिटविण्यात यश आले.

प्रथमच डिजीटली ई-फायलिंगचे प्रकरण निकाली
जिल्हा न्यायाधीश-६ एस. आर. नावंदर यांच्या पॅनलवरील मोटार अपघात दावा प्राधिकरणाचे प्रकरण महाराष्ट्रात पहिल्यांदाच डिजीटली ई-फायलिंगचे प्रकरण लोकअदालतमध्ये निकाली काढण्यात आले. या प्रकरणाची संपूर्ण प्रक्रिया ही पेपरलेस घेण्यात आली. याच पॅनलवर एका प्रकरणात पक्षकार तिरुपती येथे असल्यामुळे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे लोक अदालतमध्ये सहभागी झाले व प्रकरणात तडजोड केली. ‘न्याय तुमच्या दारी’ या तत्वानुसार हा खटला निकाली निघाला.

दिव्यांग पक्षकारासाठी न्यायालय कक्षाबाहेर लोकअदालत

मोटार अपघात दावा प्राधिकरणाच्या प्रकरणांपैकी दोन प्रकरणामध्ये पक्षकार दिव्यांग असल्यामुळे त्यांना न्यायालयातील इमारतीमध्ये येणे शक्य झाले नाही. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश-६ एस. आर. नावंदर यांनी स्वतः न्यायालय कक्षाबाहेर येवुन पक्षकारास नुकसान भरपाई धनादेश दिला.

जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, तसेच पुणे व जिल्ह्यातील सर्व तालुका विधिज्ञ संघटना व इतर विविधि शासकीय, सामाजिक संस्था यांचे विशेष सहकार्याने लोकअदालत यशस्वी झाल्याचे श्री. चांडक यांनी सांगीतले. ग्रामपंचायत संदर्भातील प्रकरणे निकाली काढण्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांचे सहकार्य लाभले.

राज्य शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार होण्याची अपेक्षा केली व्यक्त

पुणे: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदींच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्राकांतदादा पाटील यांनी केले.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे येथे हृदयमित्र प्रतिष्ठानच्यावतीने निसर्गोपचार भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी, हृदय मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मुंदडा उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले, निसर्गोपचार अत्यंत चांगला उपचार असल्याचा स्वतः अनुभव घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, कोरोना परिस्थितीने माणसाला वैद्यकीय उपचाराचे महत्व लक्षात आणून दिले. आज आजारांवरील उपचारांसाठी, औषधांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हे पाहता निसर्गोपचार, प्राणायाम, मेडिटेशन, हीलींग उपचारपद्धती आदी पर्यायी उपचारपद्धतींना प्रोत्साहन दिले पाहिजे. यातील उपचारांची, औषधांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी प्रचार प्रसाराची गरज आहे. कोंढवा येथे होत असलेले राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे निसर्गोपचार रुग्णालय निसर्गोपचाराच्या प्रसारासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी म्हणाल्या, निसर्गोपचाराच्या प्रसारासाठी संस्था काम करत असून संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. चंद्रकांतदादा पाटील राज्याचे महसूलमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून संस्थेला अद्ययावत निसर्गोपचार रुग्णालयासाठी कोंढवा येथे २५ एकर जागा मिळाली आहे. लवकरच येथे २५० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. या आवारात ५०० बाह्यरुग्ण सुविधा, निसर्गोपचार महाविद्यालय तसेच प्राध्यापक, विद्यार्थी यांची निवासाचीही व्यवस्था असणार असून गुरुकुल मॉडेलप्रमाणे येथे काम चालणार आहे.

इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादार म्हणाले, देश विदेशात निसर्गोपचार, योगाचा प्रसार करण्याचे काम करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडूनही स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना, पर्यायी उपचार पद्धतींचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे.

श्रीकांत मुंदडा यांनी प्रास्ताविकात हृदय मित्र प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. आजारांवर विविध उपचारपद्धतीच्या समन्वयातून उपचार करणे लाभदायक ठरते, असे ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमात मंत्री श्री. पाटील यांच्याहस्ते डॉ. अनंत बिरादार यांना निसर्गोपचार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळी प्रियंका, दुपारी केजरीवाल जंतर-मंतरवर दाखल

नवी दिल्ली-भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर धरणे देत आहेत. शनिवारी या निदर्शनाचा 7 वा दिवस आहे. या आंदोलनात शुक्रवारी सकाळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी तर सायंकाळी 4 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दाखल झाले.

यावेळी केजरीवाल म्हणाले की, संपूर्ण देशाला आवाहन आहे की त्यांनी सुटी घेऊन पैलवानांना साथ देण्यासाठी इथे यावे. देशातील पैलवान 1 आठवड्यापासून आंदोलन करत आहेत. कारण भाजपच्या बाहुबली नेत्याने मुलींसोबत गैरवर्तणूक केली आहे. कुणाच्याही लेकीसोबत चुकीचे काम करणाऱ्याला लगेच फासावर लटकावले पाहिजे. मात्र हे खूपच दुर्दैवी आहे की, ज्या मुलींनी देशाचे नाव उज्ज्वल केले त्यांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. यावेळी केजरीवालांनी आंदोलनकर्त्यांना धीरही दिला.

दिल्ली पोलिस त्रास देत असल्याचा आरोप कुस्तीपटू बजरंग पुनियाने सकाळी केला. रात्रीचे जेवण करत असताना वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर त्या ठिकाणी असलेले पाण्याचे टॅंकरही नेण्यात आले. फिरते सार्वजनिक स्वच्छतागृह देखील पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणावर नेण्यास सांगितली.

दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही जंतरमंतरवर पोहोचल्या होत्या. विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी संवाद साधला. जवळपास अर्धा तास प्रियंका आंदोलनस्थळी थांबल्या होत्या. तत्पूर्वी, शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात बृजभूषण यांच्या विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पहिली- अल्पवयीन कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण विरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी अन्य 6 महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी खेळाडूंकडून जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत असताना अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. पी. टी उषा यांनीही साक्षी मलिक, विनेश फोगाटसह रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर टीका केली होती. आता विनेश फोगाट यांची बहिण बबिता फोगाट यांनी या आंदोलनाबाबत ट्वीट केलं होतं. या ट्वीटला प्रत्युत्तर देताना विनेश फोगाट यांनी बबिता फोगाट यांना कळकळीची विनंती केली आहे.

बबिता फोगाट भाजपाच्या तिकिटावरून हरियाणा विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. बबिता फोगाट यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्वीट केले होते. “महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी प्रियंका वड्रा त्यांचे स्वीय सचिव संदीप सिंग यांच्यासोबत जंतरमंतरवर पोहोचले आहेत. पंरतु, या व्यक्तीने स्वतः महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे, तसंच त्यांनी दलित महिलांविरोधातही वक्तव्य केलं होतं,” असं ट्वीट केलं होतं.

बबिता फोगाट यांचं ट्वीट आल्यानंतर त्यावर अनेकांनी विरोधात प्रतिट्वीट केले आहेत. तर, विनेश फोगाट यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “जर पीडित महिला कुस्तीपटूंच्या हक्कासाठी उभे राहता येत नसेल तर बबिता तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या आंदोलनाला कमजोर करू नका”, असं ट्वीट विनेश फोगाट यांनी केलं आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, “महिला कुस्तीपट्टूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला वर्षे लागली आहेत. तुम्हीही महिला आहात आणि आमचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा.”

कात्रजचे डोंगर आणि जंगल नाहीसे करताना हे होते कुठे ?

बालभारती -पौड रस्त्याच्या विरोधामागे पर्यावरण प्रेमींचे ‘ बोलावते धनी’ कोण ? नदी सुधार योजनेला विरोध कोणाचा?


पुणे-कात्रजचे जंगल नाहीसे करून, टेकड्या फोडून तिथे बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या लोकांनी,नदीतील झाडी वाचविण्याच्या नावाने नौटंकी करण्याबाबत राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत असताना आता थेट या विषयाला माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, आणि सुहास कुलकर्णी यांनी हाथ घातला आहे आणि बालभारती -पौड रस्त्याच्या विरोधामागे पर्यावरण प्रेमींचे ‘ बोलावते धनी’ कोण ? नदी सुधार योजनेला नेमका विरोध कोणाचा? असे सवाल केले आहेत.

माजी विरोधी पक्षनेते केसकर, आणि सुहास कुलकर्णी यांनी असे म्हटले आहे कि,’ प्रथम पूल बांधायचे मग ते पूल तोडायचे आणि मग ते पुन्हा बांधण्यासाठी प्रयत्न करायचे कुणाच्या हितासाठी?पुणेकर याचा जाब विचारत आहेत त्यामुळे तोंड लपवायला देखील जागा नाही सिंहगड रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्याला पर्याय असलेला रस्ता उखडून टाकला.
अपयश झाकण्यासाठी राजकीय पक्षांचे षडयंत्र
केसकर आणि कुलकर्णी यांनी पुढेअसेही म्हटले आहे,’ सद्यस्थितीत शहरात सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे ती अपुरी आहे, सत्तेवर असताना ती नीट करण्याचा सक्षम करण्याचा प्रयत्न झाला नाही, त्यामुळे जीवघेण्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांत बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक कोंडीत पुणेकरांचा श्वासही गुदमरत आहे.मात्र सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीच्यादृष्टीने होणाऱ्या शाश्वत विकासाला काही राजकीय पक्षांकडून ‘खो ‘घालण्याचे कारस्थान सुरु झाल्याच्या वास्तवतेचाही आता पर्दाफाश होत आहे. सत्ता भोगूनही पुणेकरांसाठी काय केले? या प्रश्नाला सोईस्कर बगल देताना अपयश झाकण्यासाठीच काही राजकीय पक्षांकडून आता स्वयंसेवी संस्थांचा आधार घेत ,पर्यावरणाच्या नावाखाली ‘ टाहो’ फोडला जात आहे. परिणामी अचानक पर्यावरणप्रेमींचे पेव का फुटले,त्यामागे राजकारण कुणाचे आणि पर्यावरण प्रेमींचे ‘ बोलविते धनी’ कोण ? हे प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत.
ते पुढे म्हणाले,’ यासंदर्भात राजकीय आकसापोटीच बालभारती -पौड रस्त्याला विरोध होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. आज विकासाच्या दिशेने पुणे गतिमान होत आहे आणि नियोजनबद्धपणे शाश्वत विकासाचे प्रकल्प साकारत आहेत.केंद्रात मोदींचे सरकार आहे आणि राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे आणि ते शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. नदी सुधार योजनेसाठी माजीमंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी ‘जायका’ मधून निधी आणला आहे.अकरा एसटीपी प्लांटद्वारे शुद्ध केलेले पाणी नदीत सोडले जाणार आहे. शिवाय नदीचे सुशोभीकरण होणार आहे. मात्र केवळ राजकीय आकसातून विरोधाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातून पुणेकर नागरिकांसह युवा पिढीचा दिशाभूल करण्याचे डावपेच आखले जात आहे. असेच कारस्थान बालभारती -पौड रस्त्याला विरोध करण्यासाठी रचले जात आहेत. सुंदरलाल बहुगुणा अशा थोर व्यक्तीने केलेल्या “चिपको” आंदोलनाचा आधार घेऊन किंबहुना गैरवापर करून राजकीय स्वार्थासाठी काही पक्षांनी ‘भासवा- भासवी’ सुरु केली असून पर्यावरण प्रेमींचीच फसवणूक केली जातेआहे.

ज्या सदनिकांमध्ये राहतो त्या इमारती उभारताना इमारतीचा पाया किती खोलीवर घेण्यात आला आहे, किती नैसर्गिक जलस्रोत बंद झाले. याची माहितीही कथित पर्यावरण प्रेमींनी द्यावी
केसकर पुढे म्हणाले कि,’ सत्ता भोगताना ‘आधी बांधायचे मग तोडायचे आणि पुन्हा बांधायचे’ या कारभारात कुणाचे हित जोपासले ? आणि पुण्यासाठी ठोस प्रकल्प कोणते दिले? या प्रश्नांना सामोरे जावे लागू नये यासाठी आता पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्थांना पुढे करून सत्तेत आलेले अपयश झाकण्याचा प्रकार राजकीय पक्षांकडून होत आहे आणि त्याला पर्यावरण प्रेमी बळी पडत आहेत. त्यातही बालभारती -पौड रस्ता असो अथवा नदी सुधार योजनेला ज्यापद्धतीने विरोध केला जात आहे. त्यात अचानक पर्यावरण प्रेमींचे पेव का फुटले ? हाच संशोधनाचा भाग आहे. शिवाय पर्यावरण म्हणजे नेमके काय ? आणि पर्यावरणवादीची व्याख्या काय? याचे स्पष्टीकरण बालभारती -पौड रस्त्यासह नदी सुधार योजनेला विरोध करणाऱ्या कथित पर्यावरणप्रेमींनी द्यावे, त्यासाठी दैनंदिन कामकाजात पर्यावरण कसे जोपासले जाते, ज्या सदनिकांमध्ये राहतो त्या इमारती उभारताना इमारतीचा पाया किती खोलीवर घेण्यात आला आहे, किती नैसर्गिक जलस्रोत बंद झाले. याची माहितीही कथित पर्यावरण प्रेमींनी द्यावी. प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर कितीजण करतात यासह अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी. मात्र वाढते शहरीकरण पाहता पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकासाचे प्रकल्प महत्वाचे आहेत आणि त्यासाठी बालभारती – पौड रस्ता, नदी सुधार असे प्रकल्प काळाची गरज आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का; भाजप पुरस्कृत पॅनेलचा १३ जागांवर विजय,खासदार विखेंना,पंकजा मुंडेंना धक्का,अशोक चव्हाण,जयंत पाटलांनी गड राखला

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची तब्बल २० वर्षांनी झालेली निवडणूक चुरशीची झाली. निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने १८ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवून निर्ववाद वर्चस्व मिळवले. बाजार समितीच्या राजकारणात भाजप शिरकाव केल्याने राष्ट्रवादीच्या वर्चस्वाच्या धक्का बसला.

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल आणि भाजपा पुरस्कृत सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने एकमेकांसमोर होते. राष्ट्रवादी पॅनेलचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले. भाजप पुरस्कृत पॅनेलचे नेतृत्व जिल्हा बॅकेचे संचालक विकास दांगट आणि भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनी केले होते.

मतमोजणीचा पहिला निकाल हमाल मापाडी मतदार संघाचा जाहीर झाला आहे. या गटातून संतोष नांगरे विजयी झाले. नांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली. त्यांनी हमाल मापाडी महामंडळाचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी जाहीर केलेल्या राजेंद्र चोरघे यांचा पराभव केला. चोरघे यांना ४०३ मते मिळाली तसेच गोरख मेंगडे ३१४ मते मिळाली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरी भोवली. बाजार समितीच्या राजकारणात भारतीय जनता पक्षासह ठाकरे गटाने प्रवेश केला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन गुलालाची उधळण केली.

माझ्यावर कारवाई करणार्‍यांना हवेली तालुका समजून घेण्यास दहा जन्म घ्यावे लागतील : विकास दांगट

 माझ्यावर कारवाई करणार्‍यांना (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर) हवेली तालुका समजून घेण्यास दहा जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विकास दांगट यांनी टोला लगावला. हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत विकास दांगट यांचा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल विजयी झाला आहे. यावर विकास दांगट यांना विचारले असता त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपाच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला १८ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय मिळविण्यात यश आले आहे. तर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे २ उमेदवार विजयी, तर ३ जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी स्वतंत्र पॅनल तयार करून सर्वपक्षीय उमेदवारांना संधी दिली होती. त्यामुळे ही निवडणूक विशेष अर्थाने चर्चेत राहिली. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी करीत असल्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयानंतर गारटकर आणि दांगट या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. या सर्व राजकीय घडामोडीदरम्यान हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत विकास दांगट यांचा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलच विजयी झाला आहे.

 व्यापारी, अडते गटातून जय शारदा गजानन पॅनेलचे गणेश घुले, अनिरुद्ध भोसले विजयी

 पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी, अडते मतदारसंघातून जय शारदा गजानन पॅनेलचे गणेश घुले, अनिरुद्ध भोसले विजयी झाले.

गणेश घुले यांना सर्वाधिक मते मिळाली. घुले पाच हजार ८५२ मते मिळवून विजयी झाले. अनिरुद्ध भोसले यांना पाच हजार ८१६ मते मिळाली. व्यापारी अडते संघातील १३ हजार १७४ मतदारांपैकी आठ हजार ७०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली होती. निवडणुकीत बाजार समितीचे माजी संचालक विलास भुजबळ यांच्यासह अमोल घुले, सौरभ कुंजीर पराभूत झाले. व्यापारी अडते मतदारसंघातील आठ हजार २९१ मते वैध ठरली. ४१६ मते अवैध ठरली.

पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे – सौरभ कुंजीर – १६४०, अशोक गावड, १२८, अमोल घुले – ३७४, रमेश बडदे – ३२, सुहास बनसोडे – १९, उमर फारुख बागवान – १५९, बाळासाहेब भिसे – १९४, विलास भुजबळ – ६५०, अविनाश शेवते – ३८, शिवाजी सूर्यवंशी – १२७०

खासदार विखेंना धक्का

पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास मंडळाने सर्व १८ जागांवर विजय मिळवत भाजप प्रणित जनसेवा मंडळाला धोबीपछाड दिली. बाजार समिती निवडणुकीच्या इतिहासात गेल्या ४० वर्षात झालेल्या बिनविरोध झालेल्या दोन निवडणुका वगळता एकाच मंडळाने प्रथमच सर्व १८ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे सतरा उमेदवार २०० ते ५४० मतांच्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे आमदार नीलेश लंके यांनी केलेला किमान ५०० मताधिक्क्याचा दावा खरा ठरला आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी उमेदवार निवडीपासून या निवडणुकीत लक्ष घातल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मतमोजणीत कुठेही चुरस दिसून आली नाही. भाजप प्रणित जनसेवा मंडळाचा पराभव हा खासदार विखे यांना धक्का मानला जात आहे.

अशोक चव्हाणांनी गड राखला

– भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसची सत्ता कायम. 18 पैकी 15 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विजयी. काँग्रेसच्या खात्यात 13 तर 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी. निवडणुकीत खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का. भाजप-शिंदे गटाचा दारूण पराभव आणि बीआरएस देखील बेदखल.

केंद्रेंचे पॅनल विजयी

– गंगाखेड जिल्हा परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने जिंकल्या 18 पैकी 11 जागा. भाजपा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पॅनलचा पराभव. डॉ मधुसूदन केंद्रे हे आमदार धनंजय मुंडे यांचे मेहुणे आहेत.

सातार्‍यात रविवारी मतदान

– सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला. स्थानिक राजकीय संदर्भ लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे, ठाकरे गट) आणि भाजप हे पक्ष आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने मतदारांचा भाव वधारला आहे. कराडमधील काही मतदार हैदराबाद, सहलीवर गेले आहेत.

शिवेंद्रसिंहराजेंचे पॅनल विजयी

– जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील व शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला.

हर्षवर्धन जाधवांना धक्का

– छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना धक्का. हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव आणि शिंदे गटाचे नितीन पाटील यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलने पंधरा पैकी पंधरा जागा जिंकत मारली बाजी.

जयंत पाटलांनी गड राखला

– सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. इस्लापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा गड आहे. तर विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने विजय मिळवला आहे.

पंकजा मुंडेंना धक्का, धनंजय मुंडेंचा विजय

– बीडमधील परळी आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे पुन्हा आमने-सामने आले होते. मात्र, या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. अंबाजोगाई बाजार समितीत 18 पैकी 15 जागांवर धनंजय मुंडे यांचे समर्थक उमेदवार विजयी झाले आहे. दणदणीत विजय मिळवून धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली आहे. महाविकास आघाडीचा हा मोठा विजय झाले. तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना अवघ्या तीनच जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासोबतच भाजपलाही हा मोठा धक्का आहे. भाजपने ही निवडणूक पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात लढली होती.

परळीत घेतली आघाडी

दुसरीकडे, परळी बाजार समितीत धनंजय मुंडे यांचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत. तर, पंकजा मुंडे यांचा एकच उमदेवार आघाडीवर आहे. परळी बाजार समितीही धनंजय मुंडे यांच्या ताब्यात जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बीडमधील या दोन्ही महत्त्वाच्या बाजार समितीवर आता मविआचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

छगन भुजबळ यांचे वर्चस्व

– येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 13 जागा मिळवीत दोन अपक्षांसह एकूण 15 जागांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी. तर आमदार दराडे गटाला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. येवला विधानसभा मतदारसंघात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिंदे गटाची बाजी

– छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 15 पैकी 11 जागा भाजप-शिंदे गटाच्या खिशात गेल्या आहेत. महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आल्याने मविआला हा धक्का समजला जात आहे.

एकनाथ खडसे यांना भुसावळमध्ये धक्का

– भुसावळ कृषी उत्पन्न समिती भाजपच्या ताब्यात

तिवसा बाजार समितीत महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय

– अमरावतीत तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रणित सहकार पॅनलचा १८ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मविआने या निवडणुकीत बाजी मारली आहे.

थोरातांच्या पॅनलने उघडले खाते

– अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर बाजार समितीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलने खाते उघडले आहे. एकूण 18 जागांपैकी चार जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात बाळासाहेब थोरातांच्या शेतकरी विकास मंडळाने खाते उघडले असून चारही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पॅनल पिछाडीवर. तिसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी. विखे गटाला अद्याप एकही जागा मिळालेली नाही.

दिग्रस बाजार समितीत ठाकरेंचा शिंदे गटाला धक्का

– शिवसेनेचे नेते आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना आपल्याच होमग्राऊंडमध्ये धक्का बसला आहे. ठाकरे गटाने संजय राठोड यांच्या समितीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.

खेडमध्ये राष्ट्रवादीचा विजय

– पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोधकांना चितपट करत खेड बाजार समितीवर झेंडा लावला.

देवळ्यात राष्ट्रवादी, भाजपचा झेंडा

– देवळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सर्व समावेशक पॅनलची निर्मिती केली होती. या देवळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि राष्ट्रवादीचे योगेश आहेत यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलची सरशी झाली. यापूर्वी या पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. आज झालेल्या 10 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवला.

मोशीत भाजपला धक्का

– अमरावतीच्या मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉ अनिल बोंडे यांना धक्का बसला आहे. मोर्शीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी झाले असून भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत.

लातूर बाजार समितीवर काँग्रेस

– भाजप आमदार रमेश कराड यांनी लातूर कृषी बाजार उत्पन्न समितीच्या निवडणूकीत काँग्रेसला मोठे आव्हान दिल्यानंतर भाजपमधील राजकारण चांगलेच तापले होते.18 जागा खेचत काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे.

पालघरमध्ये महाविकास आघाडी

– पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. 17 पैकी 17 जागा जिंकत मविआने वर्चस्व प्राप्त केले. आज झालेल्या व्यापारी अडते निवडणूकीत मविआचे दोन उमेदवार निवडणून आले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपला पालघर बाजार समितीत एकही जागा मिळवता आली नाही.

एचसीएमटीआरसाठी आबा बागुल करणार आमरण उपोषण,म्हणाले ,’ बिल्डर्स लॉबीसाठी पुणेकरांचा श्वास वाहतूक कोंडीत गुदमरू देणार काय ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त यांना जाहीर आव्हान

पुणे- आज सहा हजार कोटी रुपयांचा असणारा हा प्रकल्प उद्या पन्नास हजार कोटी रुपयांवर पोहचवल्यावर निविदा काढणार का ? मूठभर बिल्डर्स लॉबीचे हित जोपासण्यासाठी पुणेकरांचा श्वास वाहतूक कोंडीत गुदमरू देणार काय ? असे सवाल उपस्थित करत पुण्याचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आता एचसीएमटीआरसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे .

या संदर्भात आबा बागुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि,’ सद्यस्थितीत शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. जीवघेण्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांत  बळींची संख्याही  दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक कोंडीत पुणेकरांचा श्वासही  गुदमरत आहे.मात्र मूठभर बांधकाम व्यावसायिकांच्या हितसंबंधासाठी  प्रशासन   पुणेकरांना मृत्यूच्या खाईत   लोटत आहे, असेच आता खेदाने म्हणावे लागत आहे.   शहरासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार  [एच. सी. एम. टी. आर] मार्गाबाबत मी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. आज ४२ वर्षे होत आली तरी हा सुरक्षित आणि गतिमान वाहतुकीसाठी दिलासादायक ठरणारा  एच. सी. एम. टी. आर मार्ग अद्यापही रखडलेला आहे.  सातत्याने माझा पाठपुरावा सुरु आहे.  निविदा प्रक्रियेपर्यंत आलेल्या या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  निधीचा मुद्दा उपस्थित करून  लांबणीवर टाकण्याची    भूमिका  घेण्यात आली होती.  मुळात सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने एच. सी. एम. टी. आर प्रकल्प निधी नाही म्हणून रद्द करता येत नाही. जर रद्दच करायचा असेल तर तो डी. पी. मध्येच रद्द करायला पाहिजे होता. आजमितीस वेगवेगळ्या बाबींवर त्यासाठी दहा ते बारा कोटी रुपये खर्च झालेले आहेत. तसेच भूसंपादनपोटी टीडीआर, एफएसआयही  देण्यात आलेले आहेत. त्यामुळे  केवळ अलाइनमेंट बदलण्याच्या नावाखाली किंवा ९ मीटर रस्ते या भानगडीत न पडता आपण २४ मीटरनुसारच  या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी.  सध्या विकास आराखड्यात दर्शविण्यात आल्यानुसार एकही रस्ता  प्रत्यक्ष जागेवर नाही ही वस्तुस्थिती आहे  आणि शासनानेही आपल्याला रस्ते आखण्याचे निर्देश दिलेले आहेत. हेही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे निधी नाही हे कारण देऊन आपण  पुणेकरांच्या हितासाठी महत्वपूर्ण असणारा हा प्रकल्प रद्द अथवा लांबणीवर टाकू   शकत नाही. निधीबाबत मार्ग काढणे सहजशक्य आहे.  आज सहा हजार कोटी रुपयांचा असणारा हा प्रकल्प उद्या पन्नास हजार कोटी रुपयांवर पोहचवल्यावर निविदा काढणार का ? हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. त्यामुळे सर्व खात्यांची बैठक घेऊन  उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार  [एच. सी. एम. टी. आर] मार्गाला चालना देण्यात यावी. गेली ४२  वर्षे आपण या रस्त्यासाठी हलगर्जीपणा करत आहोत, डीपीमध्ये दर्शविलेल्या या महत्वाच्या रस्त्यासाठी आपण चालढकल करत आहोत आणि नको ते रस्ते रुंद  करण्याचा घाट घालत आहोत. हे अत्यंत चुकीचे आहे. या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार रस्त्यासाठी होणाऱ्या चालढकल कारभाराविरोधात आता आम्हाला आपल्या दालनासमोर आमरण उपोषण करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी. कृपया मूठभर बिल्डर्स लॉबीचे हित जोपासण्यासाठी पुणेकरांचा श्वास वाहतूक कोंडीत गुदमरू देऊ नका. जीवघेण्या वाहतुकीत पुणेकरांना मृत्यूच्या खाईत लोटू नका. अशी आपणांस कळकळीची विनंती आहे.    उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला आता  प्राधान्यक्रम द्या, अशी विनंती बागुल यांनी केली आहे.

व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !

आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर   सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला सातत्याने उपद्रव होतो. चीनची विस्तारवादी भूमिका आणि उभय देशांमधील लष्कराच्या झालेल्या चकमकी  चिंताजनक आहेत. मात्र आर्थिक व  व्यापारी संबंध अधिक दृढ करून दोन्ही देश सामंजस्याने राहू शकतील. या दृष्टिकोनातून घेतलेला हा आढावा.

भारत स्वतंत्र झाल्यापासून सातत्याने आपण चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्यात अपयशी ठरलेलो आहोत. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध हे हिंदू – मुस्लिम धार्मिक वादातून निर्माण झाले असून त्याच्या झळा  मोठ्या प्रमाणावर भारताला बसत आहेत. चीन बरोबर आपली धार्मिक तेढ अजिबात नाही.  मात्र चीनची विस्तारवादी भूमिका आणि जागतिक पातळीवर कोणालाही भीक न घालण्याची त्यांची वृत्ती जास्त त्रासदायक ठरत आहे. करोना नंतरच्या काळात चीनची आर्थिक प्रगती काहीशी मंदावलेली आहे. त्याचवेळी भारताची अर्थव्यवस्था खूप चांगली वेगाने विकसित होत असून जर भारताने चीन बरोबरची व्यापारी आणि आर्थिक संबंध अधिक दृढ केले तर कदाचित आपले संबंध भविष्यकाळात सुधारू शकतील अशी शक्यता आहे.

गेल्या दोन-तीन वर्षात आणि विशेषतः 2020 मध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील लष्करामध्ये झालेली चकमक आणि त्यात उभय देशांच्या जवानांचा झालेला मृत्यू हा निश्चितच  खेदजनक, क्लेशकारक  घटना होती.  दुर्दैवाने त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याच्या ऐवजी त्यात जास्त तणाव निर्माण होताना दिसत आहे. चीनकडून सातत्याने दबावाचे राजकारण केले जात आहे हेही नाकारता येणार नाही. मात्र अशावेळी आपली लष्करी क्षमता आणखी बळकट करून व आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी प्रतिमा निर्माण करून आपण  चीनवर काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर अप्रत्यक्षरित्या दबाव निर्माण केला आहे.  भारताचे रशियाशी असलेले संबंध चांगल्या पद्धतीने सुधारलेले असून आपण अमेरिकेच्या तुलनेत रशियाकडे काही प्रमाणात  झुकलेलो आहोत हेही गेल्या वर्षा दोन वर्षात प्रकर्षाने जाणवलेले आहे. एकाच वेळेला अमेरिका, रशिया, युरोपातील काही देश व चीन यांच्याशी  अंतर राखून संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपले स्वातंत्र्य, सार्वभौमत्व याला कोठेही तडा जाऊ न देता आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळ्या प्रकारे जगाचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे. जी-ट्वेंटी या वीस देशांच्या  समूहाचे नेतृत्व करत आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. 

गेल्या पाच वर्षात भारत आणि चीन यांच्यातील व्यापारात चांगली वाढ होत आहे. 2017-18 मध्ये भारत आणि चीन यांच्यात केवळ 89 बिलियन डॉलर एवढा व्यापार  होता. त्यात सतत चांगली वाढ होत आहे. 2022 मध्ये उभय देशात  136 बिलियन डॉलरच्या घरात व्यापार उदीम  झालेला आहे. यात चीनने भारतात 118 बिलियन डॉलरची मालाची निर्यात केली तर आपण चीनमध्ये 18 बिलियन डॉलरच्या मालाची निर्यात केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच संसदेमध्ये बोलताना चीनशी असलेले संबंध हे “नॉर्मल” नाहीत असे मान्य करून जोपर्यंत चीन  नियंत्रण रेषेमध्ये एकतर्फी बदल करते किंवा सीमारेषांवर लष्करी बळ वाढवत रहाते तोपर्यंत हे संबंध सुधारणार नाहीत असे नमूद केले होते.  उभय देशांमध्ये अनेक वाद,  अडचणी, असूनही व्यापारात मात्र सातत्याने जोरदार वाढ होत आहे.

भारत आणि चीन यांच्यातील संबंध हे सलोख्याचे असणे हे उभयतांच्या हिताचे निश्चित आहे. त्याच दृष्टिकोनातून जर आपण आगामी काळामध्ये चीन बरोबरचे व्यापारी संबंध जास्त दृढ केले तर त्याचा लाभ दोघांनाही होऊ शकेल.  दोन्ही देशातील आर्थिक, व्यापारी व्यवहाराचे प्रमाण लक्षात घेतले तर  आपण चीनला टाळून काही आर्थिक व्यवहार किंवा व्यापार करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी साधे उदाहरण झाले द्यायचे झाले तर  भारतातील औषध निर्माण किंवा मोबाईल उत्पादन क्षेत्र  मोठ्या प्रमाणावर चीनी उत्पादकांवर अवलंबून आहे हे   दुर्लक्षून चालणार नाही. औषध उत्पादक मोठ्या प्रमाणावर चीनच्या कच्च्या मालाच्या आयातीवर अवलंबून आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यात  590 ते 600 बिलियन डॉलर इतका व्यापार होतो.  त्यापेक्षा जास्त व्यापार हा युरोपियन देशांची होत असून तो साधारणपणे 650 बिलियन डॉलरच्या घरात आहे . त्याचप्रमाणे जपान बरोबरही 320 बिलियन डॉलरच्या घरात व्यापार आहे. आपल्या तुलनेत चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे.जगात चीन दुसऱ्या क्रमांकावर तर आपण पाचव्या क्रमांकावर आहोत. चीनने सतत बावीस वर्षे दहा टक्क्यांपेक्षा विकासदर जास्त राखला.आपल्याला एकदाही दहा टक्के विकासदर गाठता आला नाही. काही वेळा तर आपला विकासदर नकारात्मक होता.चीनचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न(जीडीपी)आपल्यापेक्षा पाच पट जास्त आहे.

आपण दोघे आशियाई खंडामध्ये असलो तरी आपल्यापेक्षा चीनचा व्यापार अन्य देशांशी  लक्षणीय आहे. व्हिएतनाम, थायलंड , इंडोनेशिया या देशांचा व्यापार  भारतापेक्षा जास्त आहे. एका दृष्टीने चीनला भारत हा काही मोठा व्यापारी देश नाही परंतु दोन्ही देशांची  लोकसंख्या ही आज जगाच्या २५ टक्के झालेली आहे. चीनमध्ये लाखभर भारतीय रहातात. त्यामुळे भारताकडे  एक चांगला व्यापारी भागीदार म्हणून चीन पाहण्यास लागलेला आहे. गेल्या काही वर्षात भारतात निर्माण उत्पादन केलेले मोबाईल आयफोन किंवा इलेक्ट्रिक वाहने यांची संख्या लक्षात घेतली तर त्यात चिनी उत्पादकांचा  सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. ऑप्पो, व्हिवो, फोसून, मिडीया, हायर हे चिनी उत्पादक आहेत. आपलेही अदानी, डॉ.रेड्डीज, जिंदाल, गोदरेज, बीएचईएल व अरोबिंदो फार्मासारखे उत्पादक तेथे कार्यरत आहेत. चीनलाही भारतीय बाजारपेठेचे  आकर्षण आहे. अशावेळी  चीनशी मतभेद किंवा वादविवाद  करून जर प्रश्न सुटणार नसतील तर उभय देशांमधील आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक व्यापार आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढवून संबंध सुधारण्याचे प्रयत केले पाहिजेत. उभय देशांमध्ये  नवीन माहिती तंत्रज्ञान किंवा अन्य क्षेत्रामध्ये भागीदारी करता आली तर अनेक नव्या उत्पादन कंपन्यांची स्थापना  मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. पुढील काही काळामध्ये व्यापारात भरघोस वाढ झाली तर कदाचित आपसातील  मतभेद किंवा वादविवादाचे विषय मागे पडतील. आजच्या घडीला युरोपातील अनेक देश चीन बरोबरचे संबंध व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणावर वाढवत आहे त्यात जर्मन, फ्रान्स तसेच ऑस्ट्रेलिया यांनी  चीन बरोबरचे व्यापारी संबंध वाढवलेले आहेत.  ही स्थिती ब्राझीलच्या बाबतही आहे त्यांच्यातही चांगल्या प्रकारे व्यापार व्यवसाय वाढत आहे. इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांच्या बरोबर  सागरी सीमांवरून वाद आहेत परंतु त्यांच्यात होणारा व्यापार हा यावर एक चांगला मार्ग आहे असे दिसते.  देशहिताच्या दृष्टिकोनातून चीन बरोबरचे संबंध सुधारण्यासाठी व्यापार वृद्धीचा मार्ग चोखळला  अयोग्य ठरणार नाही असे वाटते. लष्करी बळांचा वापर करण्याकडे कोणाचाही कल यापुढे  राहणार नाही हे नव्या जगाचे मॉडेल लक्षात घेऊन भारतानेही अशाच प्रकारे उभय देशांमधील लोकसंख्या, कामगार व तरुण पिढी  यांचा लाभांश घेण्याच्या दृष्टिकोनातून व्यापार  वाढवला तर ते  हितकारक ठरेल परंतु सातत्याने  जुन्या गोष्टी न उगाळता जर व्यापाराच्या माध्यमातून जर एकमेकांशी चांगले संबंध निर्माण करता आले तर असे वाटते की हा एक चांगला मार्ग ठरू शकेल. अमेरिका रशिया आणि युरोपातील अनेक राष्ट्रे चीनबरोबरचे व्यापारी संबंध वाढवताना दिसत असतील तर भारताने त्याला अपवाद करण्याची गरज नाही. आपल्या औषध उत्पादकांना अजून चीनची बाजारपेठ खुली नाही. परंतु व्यापार वृद्धीचा मार्ग आज तरी हाताळायला हरकत नाही.

लेखक :प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)

जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

कोरोनाच्या महामारीत राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे आरोग्य विभागाचे कार्य – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

पुणे, दि. २९: जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन नागरिकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि कायाकल्प बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता निस्वार्थपणे सेवा देऊन संकटातून बाहेर काढले, असे गौरवोद्गार काढून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोना संकटात सेवा बजावताना जिल्ह्यातील ३८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाची दखल घेत त्यांचे जिल्हा परिषदेत येथे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

निष्ठापूर्वक करीत असलेल्या कार्याची दखल बक्षिसाच्या स्वरूपात घेतली जाते असे सांगत श्री. पाटील यांनी पुरस्कार प्राप्त आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहू, अशीही ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे आरोग्य विभागाचे कार्य – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्र राज्याची कठीण प्रसंगात त्यागाची, बलिदानाची परंपरा असून कोरोनाच्या महामारीच्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे काम आरोग्य विभागाने केले आहे. कोरोनाच्या काळात बलिदान दिलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आशा स्वयंसेविका आदींना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी स्वतंत्र आस्थापना स्थापन करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागातर्फे राज्यात १८ वर्षावरील महिला, गरोदर स्त्रीया, माता यांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ आणि शून्य ते अठरा वर्षांपर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. विभागाने घेतलेल्या निर्णयांची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. अशा अभियानामुळे राज्याचे आरोग्य पत्रक आपल्या समोर येईल आणि त्यानुसार आगामी काळात काम करावे लागणार आहे.

महाराष्ट्र हे पुरोगामी, प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. रुग्णाला योग्य पद्धतीने आरोग्य सेवा देऊन त्यांचे समाधान केले पाहिजे. आपण आपली सेवा प्रामाणिकपणे पार पाडत असून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपल्या मागण्या व अडीअडचणीबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले.

जिल्हा परिषद देशात अव्वल स्थानी येण्यासाठी प्रयत्न- मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाअंतर्गत सुमारे ९ हजार महिलांची तसेच ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियानाअंतर्गत बालकांचीही आरोग्य तपासणी केली आहे. जिल्ह्यात ३ लाख २८ हजार बालकांपैकी १६९ बालके कुपोषित आहेत. त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने शासनाच्या योजना राबविण्यावर भर देणार आहे. येत्या काळात जिल्हा परिषद देशात अव्वल येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. प्रसाद यांनी सांगितले.

यावेळी २०२२-२३ आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली, ता. हवेली (प्रथम क्रमांक), प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडवगण फराटा, ता. शिरुर (द्वितीय क्रमांक), आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, केंदूर, ता. शिरुर (तृतीय क्रमांक) यांचा तसेच तालुकास्तरीय प्रथम व द्वितीय पुरस्कार देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचा सन्मान करण्यात आला.

आशा स्वयंसेविका पुरस्कार अंतर्गत हवेली तालुक्यातील वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका मयुरी रवी पवार यांना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव प्राथ. आरोग्य केंद्राच्या शोभा सोनबा खेडकर यांना द्वितीय क्रमांक, पासली प्राथ. आरोग्य केंद्राच्या (ता. वेल्हा) राणी बापू जोरकर यांना जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार तर तळेगाव ढमढेरे प्राथ. आरोग्य केंद्राच्या (ता. शिरूर) आरती अमोल घुले यांना जिल्हास्तर प्रथम गट प्रवर्तक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच आशा स्वयंसेविकांना तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय पुरस्कारही वितरित करण्यात आले.
000

लंडनच्या इंपीरियल कॉलेज महाविद्यालयात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 4,00,000 पाऊंड्सची शिष्यवृत्ती जाहीर

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2023 

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतातील तरुणांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे, विशेषत: पंतप्रधान मोदींनी गेल्या 9 वर्षांत त्यांच्या मार्गातील अनेक अडथळे दूर केले आहेत आणि एक सक्षम वातावरण निर्माण केले आहे. यामुळे तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करता येतील.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज इंग्लंडची राजधानी लंडन इथल्या इंपीरियल कॉलेजला भेट दिली आणि महाविद्यालयातील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या युवा-केंद्री धोरणांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर, भारतातील तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी हा कदाचित सर्वोत्तम काळ असल्याचे सिंह यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंग यांच्या इम्पीरियल कॉलेज लंडनच्या भेटीच्या प्रसंगी महाविद्यालय व्यवस्थापनाने येथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 400,000 पाऊंड्सची शिष्यवृत्ती जाहीर केली असून यापैकी 50% शिष्यवृत्ती भारतातील महिला विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

पेनिसिलिन, होलोग्राफी आणि फायबर ऑप्टिक्स यासह इतर अनेक गोष्टी जगाला देणाऱ्या युरोपमधील सर्वात नाविन्यपूर्ण विद्यापीठाला भेट देण्याचा मला आनंद आहे, असे यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. 

इंपीरियल कॉलेज लंडन हे इंग्लंडमधील लंडनस्थित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. इम्पीरियल कॉलेज लंडन हे संशोधन परिणामांसाठी आणि संशोधन वातावरणासाठी इंग्लंडमध्ये प्रथम, तर संशोधन प्रभावासाठी रसेल विद्यापीठ समुहामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ही संशोधन केंद्र, ‘मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन रोग आणि संबंधित स्थिती असलेल्या व्यक्तींनी दान केलेल्या केंद्रीय मज्जासंस्थेच्या ऊती नमुन्यांचा संग्रह’ असणारी मल्टिपल स्क्लेरोसीस आणि पार्किन्सन्स टिश्यू बँक देखील आहे. या सोबतच हे संशोधन केंद्र इंग्लंडमधील सर्वात मोठी ब्रेन बँक संग्रह बनवणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. या केंद्रात सुमारे 1,650 मेंदू नमुन्यांच्या रुपात उणे 80ºC तापमानात साठवले जातात. हे नमुने जगभरातील 100 हून अधिक विविध संस्थांमध्ये संशोधन प्रकल्पांमध्ये वापरले जातात.

गेल्या पाच वर्षांत इंपीरियलमधील विद्यार्थ्यांनी 300 हून अधिक भारतीय संस्थांमधील भागीदारांसह सुमारे 1,200 संशोधन प्रकाशनांचे सह-लेखन केले आहे. संशोधन भागीदारांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर, भाभा अणु संशोधन केंद्र आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अशा संस्थांचा समावेश आहे. या महाविद्यालयात सध्या 700 भारतीय विद्यार्थी आहेत आणि भारतात या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या 3,000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांचा समूह आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतीय विद्यार्थ्यांशी सुमारे तासभर संवाद साधला. भारतातील तरुणांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. याचे विशेष कारण म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत अनेक विद्यार्थ्यांच्या मार्गातील अनेक अडथळे दूर केले आहेत, अनेक प्रतिबंधक नियम आणि एक सक्षम वातावरण तयार केले आहे. यामुळे तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करता येतील असे, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

भारतातील होतकरू तरुण विद्यार्थी म्हणून, इम्पीरियल कॉलेज लंडन हे तुमचे आयुष्यभर गुरुकुल राहणार आहे, परंतु त्याच वेळी तुम्ही भारतात परत यावे आणि येथून गोळा केलेले तुमचे सर्व ज्ञान आणि शिक्षण देशाला समर्पित करावे, असे डॉ. सिंह म्हणाले. डॉ. जितेंद्र सिंग इंग्लंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. 

दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने केले राजा हरिश्चंद्र चित्रपटाचे प्रदर्शन

मुंबई, 29 एप्रिल 2023

भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 30 एप्रिलला असलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज (29 एप्रिल 2023) भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय- ‘एनएफडीसी’ने मुंबईत पेडर रोड इथल्या आपल्या संकुलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमांतर्गत भारताचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ व प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या दोन चित्रपटांचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. त्याबरोबरच ‘दादासाहेब फाळके यांचा वारसा’ या विषयावर एका परिसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारताचा पहिला चित्रपट तसेच मूकपट असलेला हा चित्रपट पाहण्याचा एक दुर्मिळ आनंद युवा वर्ग, विद्यार्थी व चित्रपट रसिकांना घेता आला, ज्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. राजा रवी वर्मा यांच्या चित्रांपासून प्रेरित झालेल्या दादासाहेब फाळके यांनी सर्वाधिक प्रसिद्ध पौराणिक कथांपैकी एकावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला, ज्या चित्रपटाला त्या काळात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक यश मिळाले. या चित्रपटाने भारतीय चित्रपट क्षेत्रातील मूकपटांचे युग सुरू झाले. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या आणखी एका प्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. परेश मोकाशी यांचा हा चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाच्या निर्मितीची गाथा सांगणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या परेश मोकाशी यांच्या या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळाला.

या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर निर्माते व दिग्दर्शक परेश मोकाशी, चित्रपट इतिहासकार व फाळकेंच्या कार्याचे अभ्यासक अमृत गांगर, तसेच चित्रपट विश्लेषक, आशय निर्माते व ‘फेबल्स ऑफ फिल्म’चे संस्थापक अंकित सिन्हा यांनी या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याविषयी चर्चा केली. दादासाहेब फाळके यांचा वारसा, त्यांचे योगदान, भारतीय चित्रपटावर व त्याच्या प्रेक्षकावर त्याचा पडलेला प्रभाव यावर या मान्यवरांनी प्रकाश टाकला. दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर व नात मृदुला पुसाळकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. दादासाहेब फाळके यांची काही दुर्मिळ छायाचित्र, ते वापरत असलेली, नाशिक येथे असलेली गाडी यांसारख्या त्यांच्या दुर्मिळ वस्तूंचे या दोघांनी जतन केले असून तेच या दुर्मिळ वस्तूंचे सांभाळकर्ते आहेत.

“आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी विशेष आहे, कारण आज आपण पाहात असलेल्या चित्रपटांच्या या जादुई दुनियेचा पाया दादासाहेब फाळके यांनी घातला होता. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय- एनएफडीसी येथे भारताच्या चित्रपट इतिहासाचा एक खजिना आहे आणि एक संपूर्ण दालन दादासाहेब फाळके यांना समर्पित करण्यात आले आहे. भारतातील व जगातील प्रत्येक चित्रपटरसिकाने या संग्रहालयाला भेट दिलीच पाहिजे,” असे नामवंत चित्रपटतज्ञ गांगर यांनी सांगितले. भारतीय चित्रपट संग्रहालयाची उभारणी करताना ज्यांची मदत घेण्यात आली त्या सल्लागारांपैकी ते एक आहेत.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा (एनएफडीसी) एक भाग म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्राखाली भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय भारतीय चित्रपटाच्या समृद्ध इतिहासाचे जतन व प्रदर्शन करण्यासाठी पुढाकार घेत आहे. या संग्रहालयाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना चित्रपट निर्मितीची कला व तंत्रज्ञान शिकण्याची संधी जुन्या व आधुनिक चित्रपटनिर्मिती प्रक्रियेच्या संवादात्मक मार्गदर्शनाच्या माध्यमातून देत आहे. मुंबईत पेडर रोड येथे असलेले एनएमआयसी-एनएफडीसी हे भारतीय चित्रपटांचे अग्रणी संग्रहालय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019मध्ये त्याचे उद्घाटन झाले होते.