नवी दिल्ली-भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर धरणे देत आहेत. शनिवारी या निदर्शनाचा 7 वा दिवस आहे. या आंदोलनात शुक्रवारी सकाळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी तर सायंकाळी 4 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दाखल झाले.
यावेळी केजरीवाल म्हणाले की, संपूर्ण देशाला आवाहन आहे की त्यांनी सुटी घेऊन पैलवानांना साथ देण्यासाठी इथे यावे. देशातील पैलवान 1 आठवड्यापासून आंदोलन करत आहेत. कारण भाजपच्या बाहुबली नेत्याने मुलींसोबत गैरवर्तणूक केली आहे. कुणाच्याही लेकीसोबत चुकीचे काम करणाऱ्याला लगेच फासावर लटकावले पाहिजे. मात्र हे खूपच दुर्दैवी आहे की, ज्या मुलींनी देशाचे नाव उज्ज्वल केले त्यांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. यावेळी केजरीवालांनी आंदोलनकर्त्यांना धीरही दिला.
दिल्ली पोलिस त्रास देत असल्याचा आरोप कुस्तीपटू बजरंग पुनियाने सकाळी केला. रात्रीचे जेवण करत असताना वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर त्या ठिकाणी असलेले पाण्याचे टॅंकरही नेण्यात आले. फिरते सार्वजनिक स्वच्छतागृह देखील पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणावर नेण्यास सांगितली.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही जंतरमंतरवर पोहोचल्या होत्या. विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी संवाद साधला. जवळपास अर्धा तास प्रियंका आंदोलनस्थळी थांबल्या होत्या. तत्पूर्वी, शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात बृजभूषण यांच्या विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पहिली- अल्पवयीन कुस्तीपटूचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण विरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी अन्य 6 महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी खेळाडूंकडून जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता विविध स्तरातून पाठिंबा मिळत असताना अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. पी. टी उषा यांनीही साक्षी मलिक, विनेश फोगाटसह रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर टीका केली होती. आता विनेश फोगाट यांची बहिण बबिता फोगाट यांनी या आंदोलनाबाबत ट्वीट केलं होतं. या ट्वीटला प्रत्युत्तर देताना विनेश फोगाट यांनी बबिता फोगाट यांना कळकळीची विनंती केली आहे.
बबिता फोगाट भाजपाच्या तिकिटावरून हरियाणा विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. बबिता फोगाट यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्वीट केले होते. “महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा यासाठी प्रियंका वड्रा त्यांचे स्वीय सचिव संदीप सिंग यांच्यासोबत जंतरमंतरवर पोहोचले आहेत. पंरतु, या व्यक्तीने स्वतः महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे, तसंच त्यांनी दलित महिलांविरोधातही वक्तव्य केलं होतं,” असं ट्वीट केलं होतं.
बबिता फोगाट यांचं ट्वीट आल्यानंतर त्यावर अनेकांनी विरोधात प्रतिट्वीट केले आहेत. तर, विनेश फोगाट यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “जर पीडित महिला कुस्तीपटूंच्या हक्कासाठी उभे राहता येत नसेल तर बबिता तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या आंदोलनाला कमजोर करू नका”, असं ट्वीट विनेश फोगाट यांनी केलं आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, “महिला कुस्तीपट्टूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला वर्षे लागली आहेत. तुम्हीही महिला आहात आणि आमचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा.”