पुणे – बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जेवणाच्या सुट्टीत बीएसएनएलच्या सातारा रोड ऑफिस, पुणे येथे पोस्ट विभागात NFPE संघटनांनी रद्द करण्यात आलेली मान्यता पुन्हा देण्यात यावी याकरिता केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली.या निदर्शनं कार्यक्रमात २०० कर्मचारी यांनी सहभाग घेतला.प्रामुख्याने बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन आणि वर्कींग वूमन को -ऑर्डीनेशन कमिटी पुणे यांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.यामधे कॉम्रेड युसुफ जकाती, विकास कदम, संदिप गुळुंजकर, नितीन कदम, यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.या निदर्शनं कार्यक्रमात दिलीप कदम, खालीद सय्यद, किशोर गवळी, अविनाश कांबळे,नरेश सुसगोहर, राम वनपाल,मनीष पालकर, विजय मोरे, शशी पवार,सलीम शेख , कैलास निकम,समीर देखणे, अनिल जगताप, बाळासाहेब बिबवे, सुभाष कुदळे,शामा गांधी, गीता चीलवेरी,मंदा थोपटे, मंजुषा लचके, संगिता नागपूरे, आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी इंडियन्स, मंगतानी टायटन्सची विजयी सलामी
आसवानी क्रिकेट कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन; पिंपरीमध्ये २२ मेपर्यंत रंगणार स्पर्धा
पुणे : आसवानी क्रिकेट कप क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये पिंपरी इंडियन्सने तिलवानी चार्जर्सचा, तर मंगतानी टायटन्सने डायमंड सुपरकिंग्जचा पराभव करत विजयी सलामी दिली. ‘ये है पिंपरी का त्योहार’ या संकल्पनेवर होत असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एकूण १४ संघ खेळत असून, टी-१० असे स्पर्धेचे स्वरूप आहे. ‘आसवानी क्रिकेट कप’ या युट्युब व फेसबुक पेजवरून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होत आहे.
पिंपरी येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर २२ मे पर्यंत चालणाऱ्या ‘एसीसी २०२३’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच झाले. प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्पर्धेचे प्रमुख संयोजक व आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी यांच्यासह १४ संघांचे मालक उपस्थित होते.
सिंधी समाजात खेळ आणि तंदुरुस्तीबाबत गोडी निर्माण करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. व्यवसायाबरोबरच खेळातही प्रगती करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरेल. पुणे व पिंपरीसह ठाणे, कल्याण, बारामती, सातारा, कर्नाटक, गुजरातमधील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचे श्रीचंद आसवानी यांनी सांगितले.
पिंपरी इंडियन्स आणि तिलवानी चार्जर्स यांच्यात पहिला सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना इंडियन्सने १० षटकांत ५ गडी गमावत ८१ धावा केल्या. ध्रुव मलिक याने दोन षटकारांसह १५ चेंडूत २२, सुरज रामचंदानीने दोन चौकार व एक षटकारासह १७ चेंडूत २२, तर धीरज दोडवानीने एक चौकार व षटकार लगावत १५ चेंडूत १७ धावा केल्या. हितेश दादलानी आणि पंकज रामवानी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. ८२ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चार्जर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पंकज रामवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. गौरव छाब्रियाच्या भेदक गोलंदाजीपुढे चार्जर्सचा डाव गडगडला. एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. गौरव छाब्रियाने ३ षटकांत ११ धावा देत ४ गडी बाद केले. निखिल जवारानी याने दोन, तर धीरज दोडवानी आणि महेश श्रॉफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. गौरव छाब्रियाला सामनावीराचा किताब देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात मंगतानी टायटन्सने प्रथम फलंदाजी करत १० षटकांत ८ गडी गमावत ८० धावा केल्या. मयूर ललवाणी याने ५ उत्तुंग षटकार आणि दोन चौकार मारत १९ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याला सलामीवीर पवन पंजाबीने ११ धावत करत साथ दिली. बिट्टूने ८ धावांत २, दक्ष खेमचंदानीने १८ धावांत २ गडी बाद केले. दीप चंदनानी व साहिल तेजवानी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. विजयासाठी ८१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या डायमंड सुपरकिंग्जच्या डावाची सुरुवात डळमळीत झाली. दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाल्यानंतर ऋषी तेजवानीच्या ९ चेंडूत १२ धावा वगळता अन्य फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. मामाने ५ धावांत ३, बंटी मेंगनानीने ५ धावांत २, तर मयूर ललवाणी १२ धावांत २ गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा मयूर ललवाणी सामनावीराचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
पिंपरी इंडियन्स – (१० षटकांत) ५ बाद ८१ (ध्रुव मलिक २२, सुरज रामचंदानी २२, धीरज दोडवानी १७, हितेश दादलानी २-२२, पंकज रामवानी २-१६) विजयी विरुद्ध तिलवानी चार्जर्स – (७.५ षटकांत) ८ बाद ३५ (हितेश दादलानी ९, अंकुश मुलचंदानी ८, गौरव छाब्रिया ४-११, निखिल जवारानी २-३)
————–मंगतानी टायटन्स – (१० षटकांत) ८ बाद ८० (मयूर ललवाणी ४४, पवन पंजाबी ११, बिट्टू २-८, दक्ष खेमचंदानी २-१८) विजयी विरुद्ध डायमंड सुपरकिंग्ज – (९.३ षटकांत) ८ बाद ४१ (ऋषी तेजवानी १२, बिट्टू ९, मामा ३-५, बंटी मेंगनानी २-५, मयूर ललवाणी २-१२).
या १४ संघांचा सहभाग
पिंपरी इंडियन्स (विशाल प्रॉपर्टीज), रत्नानी नाईट रायडर्स (रोझ ग्रुप), मंगतानी टायटन्स (कोमल असोसिएट्स), तिलवानी चार्जर्स (गीता बिल्डर्स), फ्रेंड्स वॉरियर्स (फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप), रॉयल चॅलेंजर्स वरुण (एसएसडी एक्स्पोर्ट्स), केसवानी किंग्ज इलेव्हन (हॉटेल राधाकृष्ण), वाधवानी सनरायझर्स (साई वैष्णवी असोसिएट्स), मोटवानी रॉयल्स (रोहित इन्फ्रा), आसवानी डेअरडेविल्स (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स), संत कंवरम लायन्स (विजयराज असोसिएट्स अँड लखवानी असोसिएट्स), देव टस्कर्स (सतनाम ड्रायफ्रुट्स), डायमंड सुपरकिंग्ज (एमएसव्ही स्टील अँड अल्युमिनियम) आणि रामचंदानी सुपरजायंट्स (एव्हीआर स्पेसेस) हे १४ संघ स्पर्धेत खेळत आहेत.
विजेत्यांना भरघोस बक्षिसे
विजेत्या संघाला ५,५५,५५५/-, तर उपविजेत्या संघाला ३,३३,३३३/- रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक दिला जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी चेतक स्मार्ट इलेक्ट्रिक स्कुटर, हॅट्रिक विकेटसाठी १,०१,०००/-, हॅट्रिक सिक्सेससाठी ५१,०००/-, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी १०,०००/-, प्रत्येक सिक्ससाठी १०००/-, प्रत्येक चौकारासाठी ५००/- रुपये बक्षीस दिले जाणार आहे, असेही श्रीचंद आसवानी यांनी नमूद केले.
लाठी-काठी, तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर: अखिल मंडई मंडळातर्फे मर्दानी खेळांचे मोफत प्रशिक्षण
पुणे : अखिल मंडई मंडळातर्फे मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन विश्रामबाग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांनी लाठीकाठी, तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके अनुभवली.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, प्रशिक्षक कुंडलिक कचाले, मंडळाचे विश्वस्त विश्वास भोर, पीयुष शहा, सुरज थोरात, प्रणव मलभारे, ओम थोरात, हरिष मोरे उपस्थित होते. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला चालवणे आदी खेळांचे प्रशिक्षण शिबिरात देण्यात येणार आहे.
सुनील माने म्हणाले, अखिल मंडई मंडळातर्फे अतिशय चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणामुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढते आणि स्वसंरक्षण देखील करता येते. मुलांसह विशेष करुन मुलींनी देखील असे प्रशिक्षण घेणे ही आजच्या काळात गरजेचे आहे.
अण्णा थोरात म्हणाले, सुट्ट्यांमध्ये मुले मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आहारी जातात. अशावेळी मुलांना मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिल्यास मुलांची भिती कमी होईल आणि स्वसंरक्षण करण्यासाठी ते सक्षम होतील. मंडई मंडळातर्फे यापूर्वी एक शिबिर घेण्यात आले होते. त्याला मुलांनी चांगला प्रतिसाद दिला होता आताही २०० पेक्षा अधिक मुलांनी सहभाग घेतला आहे. दिनांक २५ मे २०२३ पर्यंत हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.
कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर, बांधकामांबाबत धोरण निश्चित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २ :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्वेक्षण करा. गरज भासल्यास समिती स्थापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
या २७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्री संत सावळाराम महाराज स्मारक, तसेच भिंवडी-कल्याण-शीळफाटा रुंदीकरणातील बाधितांना मोबदला याबाबतही चर्चा झाली. त्याबाबत विविध शिष्टमंडळांनी आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले.
मंत्रालयात समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ भाऊसाहेब दांगडे, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, कैलास जाधव यांच्यासह सर्वपक्षीय संघर्ष समितीचे राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, राजेश कदम, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, महेश पाटील, गजानन मंगरूळकर आदींसह जयेश भाग्यवंत महाराज, आर्किटेक्ट राजीव तायशेटे आदी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित झालेल्या विविध मुद्यांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले.
ते म्हणाले की, श्री. संत सावळाराम यांचे यथोचित स्मारक व्हावे ही ग्रामस्थांची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत आणि हे स्मारक यासाठीचा संयुक्त भूखंडही निश्चित करण्यात आला आहे. इमारत व स्मारकाबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. हे स्मारक भव्य आणि उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी नियोजन करा.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांबाबत त्यांच्या नागरी समस्या सोडविण्याकरिता सर्वंकष धोरण आखण्याची आवश्यकता आहे. या गावांच्या मालमत्ता कराबाबत आणि या गावातील बांधकामांबाबत एक धोरण निश्चित करावे लागेल. त्यासाठी सर्वेक्षण करणे, आवश्यकता भासल्यास समिती स्थापन करणे याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणात काही गावांतील जमिनींचे भूसंपादन झाले, पण त्यांचा मोबदला योग्यदराने गेला नाही. त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करावी आणि त्याबाबतचे धोरण आणि दर निश्चित करावे. जेणेकरून या गावांना वारंवार मोबदल्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीत खासदार डॉ. शिंदे, आमदार श्री. पाटील यांनीही सहभाग घेतला. या २७ गावांना मालमत्ता करात सवलत मिळावी, बांधकामांबाबत धोरण निश्चित व्हावे यासाठी त्यांनी भूमिका मांडली. या २७ गावांतील रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपये, तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.
साहेब, यांचं ऐकू नका, निर्णय मागे घेऊ नका, प्रतिभाकाकूंचा पवारांच्या निर्णयाला फुल्ल सपोर्ट
मुंबई : शरद पवार यांच्या सक्रीय राजकारणातून बाजूला जाण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते पूर्णपणे कोलमडून गेले. आतापर्यंत शरद पवारांनी सांगायचं आणि पक्षातल्या सगळ्यांनी ऐकायचं, असा शिरस्ता होता. मात्र आज पहिल्यांदा अनेक नेते आणि शेकडो कार्यकर्ते पवारांना सांगत होते अन् पवार किलकिल्या डोळ्यांनी फक्त समोरच्या गर्दीकडे बघत होते. तब्बल दीड तास नेते कार्यकर्ते पवारांना मनवत होते. पण पवार त्यांच्या निर्णयापासून मागे हटायला तयार नव्हते. यादरम्यान अनेक नेत्यांनी भावुक भाषणे करुन पवारांना एक पाऊल मागे येण्याची विनंती केली. पण पवार यांच्या पत्नी प्रतिभा काकी- तुमचा निर्णय योग्यच असल्याचं सांगत शरद पवार यांच्या मागे उभ्या राहिल्या. आपण निर्णय मागे घेऊ नका, असं पवारांच्या कानात सांगत राहिल्या.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, नेते समजावू लागले. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल वगळता सगळ्या नेत्यांनी आपण निर्णय मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी केली. यादरम्यान जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांनी अतिशय भावुक भाषणे केली. आपण आम्हाला घडवलंत, आता तुम्हीच राजकारणात नाही म्हटल्यावर आम्ही कुठे जायचं, अशी याचना नेते करु लागले. हे सगळं घडत असताना प्रतिभा काकी शरद पवार यांच्या खुर्चीला खुर्ची लावून शेजारी बसून राहिल्या.आपला निर्णय योग्यच आहे. हा निर्णय घ्यावाच लागणार होतो. तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहा, कार्यकर्ते नेत्यांच्या मागणीवर निर्णय मागे घेऊ नका, असं प्रतिभाकाकी शरद पवार यांना सांगत राहिल्या. कार्यकर्ते रडत होते. पण प्रतिभा काकी शरद पवार यांना स्मितहास्याने साथ देत होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत शरद पवार यांनी नेते कार्यकर्त्यांचं न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिले.साहेब तुमच्याकडे बघून आम्ही राजकारणात आलो, मतं मागितली, मंत्री झालो, आमदार झालो, पण या सगळ्यांना घडवणारा नेताच जर पक्षाध्यक्ष राहणार नसेल, तर आम्ही कुणाकडे बघायचं, अशी सगळ्याच नेत्यांनी एकसुरी खंत व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवारांची मनधरणी केली. तब्बल दीड तास वाय बी चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्ते नेते शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. अजित पवार-प्रफुल्ल पटेल भावनिक कार्यकर्त्यांची समजूत काढत होते, कधी दटावत होते. पण पवार आपल्या निर्णयापासून मागे येत नव्हते. माझा निर्णय झालाय, सक्रीय राजकारणातून जरी बाजूला जाणार असलो तरी पक्षापासून बाजूला जाणार नाही, लोकांपासून वेगळं राहणार नाही, असा शब्द भावुक कार्यकर्त्यांना देत शरद पवार सिल्वर ओककडे रवाना झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांनी पवारांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते गाडीसमोर झोपले. पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत शरद पवार यांच्या गाडीचा रस्ता रिकामा केला. शरद पवार जावई सदानंद सुळे आणि नातू विजय यांच्यासह गाडीत बसून सिल्वर ओककडे रवाना झाले.
साहेब, अशा पद्धतीने पद सोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही; जयंत पाटील यांना अश्रू अनावर
शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीतला निर्णय, थोड्याच वेळात सिल्व्हर ओकवर जाणार
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद अशा पद्धतीने एकाएकी सोडण्याचा अधिकार साहेब तुम्हालाही नाही. हवे असल्यास आम्हा सर्वांचे राजीनामे घ्या. पक्ष नव्या लोकांच्या हातात द्या. मात्र, प्रमुख पदावरून बाजूला होऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी शरद पवारांच्या निवृत्तीला विरोध केला आहे.शरद पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. त्यांच्या या निर्णयामुळे जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी बड्या नेत्यांसह सर्वच लहान मोठे अचंबित झाले. सर्वजण पवारांना हा निर्णय रद्द करण्याची मागणी करू लागले. जयंत पाटलांसह अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले. पण पवारांनी हा निर्णय काही अचानक घेतला नाही. त्यांनी नुकतेच भाकरी फिरवण्याचे विधान करून याचे संकेत दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच, यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी ही घोषणा केली. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भरकार्यक्रमातच तीव्र विरोध केला आहे. शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही. असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
यावेळी आपली भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना अश्रू अनावर झाले. अक्षरश: रडत रडत जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांनी वाटल्यास आम्हा सर्व नेत्यांचे राजीनामे घ्यावे. पक्ष नव्या लोकांच्या हातात द्यावा. मात्र, त्यांनी प्रमुख पदावरून बाजुला होण हे राष्ट्राच्या, राज्याच्या हिताचे नाही. आम्हाला शरद पवारांच्या छायेखालीच काम करण्याची सवय आहे.
शरद पवार म्हणाले, शरद पवार यांना अनुभव मोठा आहे. त्यांचा अनुभव आम्हाला अजूनही हवा आहे. आम्ही त्यांच्याकडे बघूनच राजकारण केले. देशाच्या सर्वोच्च ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची जी प्रतिमा आहे, ती केवळ शरद पवारांमुळे आहे. ती सर दुसऱ्या कुणालाही येणार नाही.
राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले – शरद पवारांनी आपल्या राजीनाम्यावर फेरविचार करावा. पवार म्हणतील तेच पक्षात होईल. पक्षात बदल करण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच आहेत. तत्पूर्वी, जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आपले अश्रू आवरत म्हणाले – पवारांनी थेट राजीनामा देण्याची गरज नव्हती. पवारांशिवाय आम्ही जनतेपुढे कसे जाणार? त्यांच्या या भूमिकेनंतर अजित पवारांनीही शरद पवारांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली.
दरम्यान, शरद पवारांच्या एका निर्णयामुळे अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस एकजूट झाल्याचे चित्र आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचीच चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा, यापुढे निवडणूकही लढवणार नाही
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच, यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी कार्यक्रमात ही घोषणा करताच समोर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.
धनंजय मुंडेंनी शरद पवारांचे पाय धरले
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहातील अनेक नेते व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडेंसह काही नेत्यांनी तर व्यासपीठावर जात शरद पवारांचे पाय धरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, नेते व कार्यकर्त्यांच्या या भूमिकेवर शरद पवार आता काय बोलतात? आपला निर्णय मागे घेणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
‘लोक माझे सांगाती’चे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, कुठे थांबायच हे मला कळत. गेली सहा दशके राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी समिती
शरद पवार म्हणाले, आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक समिती नेमावी. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवर, जंयत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, झिरवळ आदी असतील. राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय या समितीने घ्यावा. सर्व कार्यकर्ते, नेत्यांना अधिकाधिक वेळ देणार, सर्वांना सोबत घेऊ जाणारा, असा अध्यक्ष निवडावा. राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडताना, या सर्वांचा विचार करावा.
सार्वजनिक निवृत्ती नाही
आपण केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहोत. ही सार्वजनिक निवृत्ती नाही, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. गेली सहा दशके मी जनसामान्यांसाठी जे काम करत गेलो आहे, त्या सेवेत आताही खंड पडू देणार नाही. विकास, शेती अशा काही क्षेत्रासाठी मी आता अधिक वेळ देईल, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार नेमके काय म्हणाले?
१ मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्याच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी मी पुणे शहर युवक काँग्रेसचा सभासद झालो. मी काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहत असल्याने माझी पुण्याच्या काँग्रेस भवनात जाण्यास सुरूवात झाली. साधारणतः तीनेक वर्षांनंतर माझ्या कामाची पद्धत बघून मला युवकांच्या राज्य संघटनेत काम करण्याची संधी मिळाली आणि माझा मुक्काम पुण्यातून हलून मुंबईमधील दादर भागात असलेल्या टिळक भवन मध्ये झाला. तिथून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या संघटनेमधील युवक काँग्रेस मित्रांशी माझा संपर्क सुरू झाला. राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांशीही माझा संपर्क होऊ लागला. ह्याच कालावधीत राष्ट्रीय युवक काँग्रेसने ‘अन्य देशांमध्ये नव्या पिढीतील नेतृत्व कसे तयार केले जाते, त्यासाठी कोणता कृती कार्यक्रम आखला जातो’ याचा अभ्यास करण्यासाठी माझी ‘वर्ल्ड असेम्ब्ली ऑफ युथ शिष्यवृत्तीतून निवड झाली. त्याद्वारे मला जापान, अमेरिका, कॅनडा, डेन्मार्क या देशांत जाता आले व तेथील वरिष्ठ नेते व संघटनेच्या कामकाजाची पद्धत पाहता आली.
दरम्यान १९६६च्या वर्षात भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूकीची हालचाल सुरू झाली व मला परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. या काळात काँग्रेस पक्षामध्ये लोकसभा व विधानसभा उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. ह्या सार्वत्रिक निवडणूकींमध्ये काही जागा युवकांना देण्यात याव्यात असा वरिष्ठ नेतृत्वाचा आग्रह होता. ह्याच आग्रहामुळे बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझी निवड झाली. या निवडणूकीत माझ्या समोरचा उमेदवार सहकारी चळवळीतील शक्तीशाली व्यक्ती होता. परंतू युवक काँग्रेसच्या चळवळीमध्ये कार्यरत असताना हजारो तरुणांशी आलेल्या माझ्या संपर्कामुळे तमाम युवा शक्तीने माझी निवडणूक हाती घेतली आणि मोठया मतांनी मी विधानसभेत निवडून आलो. विधानसभेवर निवडणून गेलो तेव्हा मी २७ वर्षांचा तरूण होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेस पक्षातून माझ्यासह अनेक नवीन चेहरे आले. मी उमेदीने विधीमंडळाच्या कामात रस घेऊ लागलो. याचीच दखल घेतली जाऊन विधीमंडळ काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी म्हणून माझी निवड झाली.
ह्या पदामुळे विधानसभेच्या कामाकाजात मला अधिक लक्ष देण्याची संधी मिळाली, त्याच काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक होते. नव्या सदस्यांना त्यांच्याकडून फार प्रोत्साहन मिळत असे. माझा विधानसभा सदस्यपदाचा हा ५ वर्षांचा काळ कधी व कसा संपला हे लक्षातही आले नाही. मी पुन्हा १९७२ साली दूसऱ्या विधानसभा निवडणूकीला सामोरा गेलो. पहिल्या निवडणूकीपेक्षा दुसऱ्या निवडणूकीत मी अधिक मतांनी निवडून आलो. यावेळी वसंतराव नाईकांच्या मंत्रीमंडळात सामान्य
प्रशासन आणि गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. १९६७ साली संसदीय कामकाजाची मला संधी मिळाली तेव्हापासून सार्वजनीक जीवनात मी अनेक चढउतार पाहिले. परंतू १९६७ ते आजपर्यंत सतत कुठल्या ना कुठल्या पदावर – मग ते विधानसभा सदस्य विधा परिषद सदस्य असो अथवा त्यानंतर संसदेमधील लोकसभा सदस्य अथवा राज्यसभा सदस्य पद असो, मी अखंडीतपणे लोकप्रतिनिधित्व केले. ह्या प्रदीर्घ कार्यकाळात मी राज्य सरकार मध्ये विविध विभागांची मंत्रीपदे, विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपद, राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्रीपद, केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद व युपीए सरकारच्या काळात पुन्हा कृषिखात्याचे मंत्रीपद अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. अशा रितीने मी एकूण ५६ वर्षे सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून सतत कार्यरत आहे.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील १ मे, १९६० ते १ मे, २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल.
आपणास माहित आहे कि, माझा अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कामकाजामध्ये सहभाग आहे.
रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर (मुंबई), महात्मा गांधी सर्वोद संघ ( उरळी कांचन,पुणे), शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (बारामती), अखिल भारतीय मराठा शिक्ष परिषद (पुणे) ह्या संस्थांमधून साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेतात. तसेच मुंबई शहरामध्ये वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारे नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसंबंधी अभ्यास करणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करणारी, काही लाख ग्रंथांचे संवर्धन करणारी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्था, पुणे जिल्ह्यातील मांजरी बु. येथील ऊस व साखरकारखानदारी क्षेत्रात संशोधन- विस्तार कार्य करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक संस्थांची मी जबाबदारी सांभाळत आहे व माझे योगदान देत आहे. ह्या कार्यावर यापुढे मी अधिक लक्ष देणार आहे.
गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो.
सदर समितीत खालीलप्रमाणे सदस्य असावेत.
श्री. प्रफुल्ल पटेल, श्री. सुनील तटकरे, श्री. के.के. शर्मा, श्री. पी. सी. चाको, श्री. अजित पवार, श्री. जयंत पाटील, श्रीमती सुप्रिया सुळे, श्री. छगन भुजबळ, श्री. दिलीप वळसे पाटील, श्री. अनील देशमुख, श्री. राजेश टोपे, श्री. जितेंद्र आव्हाड, श्री. हसन मुश्रीफ, श्री. धनंजय मुंडे, श्री. जयदेव गायकवाड तसेच इतर सदस्य : श्रीमती फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, श्री. धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कु. सोनिया दूहन, अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.
हि समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो. माझ्या सहकाऱ्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल.
सततचा प्रवास’ हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम, सभा – समारंभाना येत राहिल. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहिल.
जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार! त्यामुळे भेटत राहू, धन्यवाद !
अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन
राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रकाशनाचा सोहळा झाला. लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीत 70 पानांची जोड आहे. या आवृत्तीत 2019नंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती कशी तुटली? आणि महाविकास आघाडीची निर्मिती कशी झाली?, यावर शरद पवारांनी सुधारित आवृत्तीत महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर येत आहे. तसेच, याशिवाय 2019नंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींवरही शरद पवार यांनी या आवृत्तीत भाष्य केल्याचे समजते. त्यामुळे या आवृत्तीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. ‘लोक माझे सांगाती’, या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर ‘लोक माझे सांगाती’च्या दुसऱ्या आवृत्तीत शरद पवार नेमके काय म्हणाले?, हे त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया…
2019मध्ये राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या. सरकारस्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं. २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,’ अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता.
‘महाविकास आघाडी’चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकीच एक- दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं.
‘महाविकास आघाडी’चा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. ‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,’ असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं.
मराठी सिनेमा संपवला जात आहे : भाऊराव कऱ्हाडे
‘ख्वाडा’,’बबन’ या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.भाऊराव कऱ्हाडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत,”टीडीएम’ हा सिनेमा प्रेक्षकांना आवडत आहे आणि सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मात्र सिनेमागृहात शो नसल्या कारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही”. माझा सिनेमा आवडला नसेल तर लोकांनी तसं स्पष्ट सांगावं. तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस. त्या दिवशी मी सिनेमा करण्याचं बंद करेन, असं म्हणताना भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले आहेत.
भाऊराव कऱ्हाडे पुढे म्हणाले,”आमचा सिनेमा चांगला आहे असं मी म्हणत नाही. पण या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना शो रद्द करणं कितपत योग्य आहे. पिंपरी चिंडवडमध्ये या सिनेमाचे दोन शो होते. सिनेमागृह तुडुंब भरलेलं असतानाही शो वाढवून दिला नाही. हा सिनेमा पाहण्याची प्रेक्षक मागणी करत होते. त्यामुळे मी त्या थिएटर मालकांकडे विचारपूर केली. त्यांनी मला सांगितलं की,या सिनेमाचा एकच शो लावण्याचं वरुन प्रेशर आहे. माझ्या सिनेमाला मिळालेले शो प्राइम टाइममधील नसून ऑड टाइममधील आहेत. या सर्व गोष्टींचा मला सिनेमाच्या टीमला खूप त्रास होत आहे”.
माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय मिळवून द्या, हात जोडत अभिनेत्याने प्रेक्षकांना केली विनंती
भाऊराव कऱ्हाडे नेहमी नवोदित कलाकारांना घेऊन सिनेमा बनवण्याचं धाडस करत असतात. ‘टीडीएम’ (TDM) या सिनेमातील अभिनेता पृथ्वीराज थोरातनेदेखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला,”मायबाप प्रेक्षकांना टीडीएम सिनेमा पाहायला आहे. मराठी सिनेमा पुढे यायला हवा. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. या क्षेत्रातील जाणकारांकडून आम्ही काय आदर्श घ्यावा? आम्ही खरचं कामं करावी की नाही. महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा हा सिनेमा पाहा आणि आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की कळवा”. हात जोडत त्याने प्रेक्षकांना विनंती केली आहे की,”माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय मिळवून द्या”.
‘टीडीएम’ हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण या सिनेमाला शो मिळत नसल्याने दिग्दर्शकासह कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. मराठी सिनेमांना स्क्रीन न मिळणं हे मुद्दा जुना आहे. आजवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी स्क्रीन मिळण्यासाठी आवाज उठवला आहे. पण अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.
स्वारगेट वर एसटी बस मध्ये बसलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल पळविला
पुणे -स्वारगेट बस स्थानकावर महिला ,पुरुष , ज्येष्ठ नागरिक प्रवासी चोरट्यांचे लक्ष बनू लागले आहेत .बाहेरगावाहून आलेल्यांना लुटणे त्यांना सोपे पडते सहसा ते पोलिसात तक्रारी करत नाहीत ,पण आता अगदी एस ती बस मध्ये खिडकीजवळ बसलेले प्रवासी देखील चोरट्यांनी लक्ष केले आहेत . अशीच एक घटना येथे घडली आहे.५ क्रमांकांच्या फलाटावर मुंबई ठाणे बस लागली होती , सकाळी पावणे अकरा ते अकरा ची वेळ होती .पवई येथे राहणारी एक ४२ वर्षीय महिला जी खिडकी शेजारी बसलेली होती आणि मोबाईल वर बोलत होती तिला चोरट्यांनी लक्ष केले . बस च्या खिडकीत हात घालून त्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून त्यांनी पळ काढला . अर्थात या घटनेत देखील स्वारगेट पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक येवले8888802252 अधिक तपास करत आहेत .
स्वारगेट एसटी स्टँडवर एसटीत चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सव्वालाखाचे मंगळसूत्र चोरट्याने पळविले
पुणे- पीएमपीएमएल च्या बस बरोबर आता महिलांना स्वारगेट येथील एसटी स्थानक हि सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना येथेही घडू लागल्या आहेत.मुंबई ते लातूर या बस मध्ये प्रवासासाठी चढत असणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हिसकावून नेले . हि महिला रायगड जिल्ह्यातील नेरे नेवाळी येथील आहे.एस ती बस च्या दरवाजातच हि चोरी झाली सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार झाला .फौजदार अशोक येवले8888802252 अधिक तपास करत आहेत
रजनीश कर्नाटक यांची बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती
मुंबई– श्री. रजनीश कर्नाटक यांची आघाडीची पीएसबी बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रजनशी कर्नाटक यांच्याकडे २९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक पद स्वीकारण्यापूर्वी ते पंजाब नॅशनल बँकेत प्रमुख व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ते वाणिज्य शाखेचे पोस्ट ग्रॅज्युएट (एम.कॉम) आहेत तसेच इंडियन इन्सिट्यूट ऑफ बँकर्सचे (सीएआयआयबी) सर्टिफाइड असोसिएट आहेत.
बँकिंग करियरमध्ये त्यांनी आतापर्यंत मोठ्या कॉर्पोरेट क्रेडिट शाखा आणि धोरणात्मक विभागांमध्ये काम केले असून त्यात ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समधील क्रेडिट मॉनिटरिंग, डिजिटल बँकिंग आणि मिड कॉर्पोरेट क्रेडिट विभागातील व्यवस्थापदावर काम केल्याचा समावेश आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण होण्यापूर्वी त्यांनी क्रेडिट मॉनिटरिंग विभागाचे प्रमुख पद भूषवले आहे तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या कॉर्पोरेट क्रेडिट विभागाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांना प्रकल्पासाठी निधी उभारणी आणि जोखीम व्यवस्थापनासह वर्किंग भांडवल निधी उभारणी विभागाचा तसेच क्रेडिट रिस्कवर जास्त भर देणाऱ्या कामाचा दीर्घ अनुभव आहे.
त्यांनी आयआयएम- कोझीकोड आणि जेएनआयडीबी हैद्राबाद येथून लीडरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आणि प्रशिक्षण केले आहे तसेच ते आयएमआय (इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट) दिल्ली येथून अडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले होते. ते एफएसआयबीने (पूर्वीचे बीबीबी) आयआयएम बेंगळुरू आणि इगॉन झेंडरसाठी निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पहिल्या बॅचचाही भाग होते.
श्री. कर्नाटक यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने युबीआय सर्व्हिसेस लि. मध्ये नॉन- एक्झक्युटिव्ह अध्यक्षपदी काम केले आहे. त्याशिवाय त्यांनी युबीआय (युके) लिमिटेडच्या नॉन- इंडिपेंडंट नॉन- एक्झक्युटिव्ह संचालक पदावर काम केले आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या (आयआयबीएम) गुवाहाटी गर्व्हनिंग बोर्डाचेही सदस्य होते. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने पीएनबी हाउसिंग फायनान्स लि. च्या संचालक मंडळावर नॉमिनी संचालक पदावर आणि इंडिया एसएमई असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडमध्ये काम केलं आहे. त्यानीं आयएएमसीएलमध्ये (आयआयएफसीएल असेट मॅनेजमेंट कं.लि.) संचालक मंडळाचे विश्वस्तपद भूषवले आहे.
मुंबई भाजपाच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा
मुंबई:
संयुक्त महाराष्ट्राच्या निमिर्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या १०५ हुतात्म्यांचे स्मरण करीत मुंबई भाजपाच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महापालिका, रेल्वे, बेस्ट कामगारांचा गौरव, झेंडावंदन, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, साहित्य तसेच श्रमकार्ड वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अंधेरी तहसील कार्यालय आणि वांद्रे येथील बीपीई सोसायटी हायस्कूलमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
राज्याचे महिला व बालविकास, पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी हुतात्मा चौक येथे महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. चेंबूर सुभाषनगर येथे आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते सफाई कर्मचारी आणि आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंभरहून अधिक तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खा. गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते रेल्वे स्थानकांतील सफाई कामगार, हमाल, बूटपॉलिश, डबेवाले तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार, टॅक्सी, रिक्षाचालक व महिला पोलिस यांच्या सन्मानार्थ बोरिवली पश्चिम रेल्वे स्टेशनलगत कार्यक्रम घेण्यात आला. खा. मनोज कोटक, आ. मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीत मुलुंड येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आ. पराग शाह यांच्या पुढाकाराने घाटकोपर पंतनगर येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. आ. विद्या ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी शिव वाहतूक संघटनेच्या वतीने बेस्ट कामगारांचा गौरव करण्यात आला. माजी नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते दत्तक वस्ती तसेच नालेसफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. वरळी विधानसभेत दीपक पाटील यांनी सफाई कामगारांना भेटून शुभेच्छा दिल्या. भाजपा नगरसेवक, पदाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या महापालिका कामगारांचा सन्मान करत कामगार दिन साजरा केला.
महाराष्ट्र दिनी ‘रेडिओ मिरची’सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’चा नवा व्हिडीओ प्रदर्शित
१ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिरची सादर करत आहे, मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओ द्वारे. या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे, स्मिता गोंदकर, सेलिब्रिटी शेफ मधुरा बाचल आणि लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर, आरोह वेलणकर यांच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मिरची Rjs जसे कि, RJ निधी, RJ राहुल, RJ गौती, RJ सौरभ, RJ भूषण, RJ निमी सुद्धा दिसणार आहेत.
हा व्हिडीओ १ मे रोजी मिरची च्या ‘mirchimarathi’ या youtube चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याचं पुनर्निर्माण ‘मिरची’ ने केलं असून, संगीत यश पहाडे यांनी दिलं आहे आणि RJ निधी, कौस्तुभ नाईक आणि यश पहाडे यांनी गायलं आहे. या सर्वांना, मिरचीच्या कंटेंट हेड स्मिता रणदिवे आणि मिर्ची लव चे प्रोग्रामिंग हेड मंदार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
हा व्हिडीओ Natives Communication ने तयार केलाय.
या राज्यगीताचे मूळ गायक शाहीर साबळे हे आहेत. राजा बढे यांचे शब्द आणि श्रीनिवास खळेयांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे. या दिग्गजांना मिरचीने त्रिवार मुजरा करत आदरांजली वाहिली असून नव्या ढंगातील ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’चा हा व्हिडीओ रसिकांनी नक्की पहावा.
नव्या ढंगातील ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’चा हा व्हिडीओ पहाण्यासाठी लिंक.
https://youtu.be/Q3bAV2mbq3c
https://fb.watch/kfbqC6eC0j/?mibextid=qC1gEa
https://www.instagram.com/reel/CrsS1dapRam/?igshid=YmMyMTA2M2Y=
कुस्ती संघाच्या अध्यक्ष ला अटक करावी या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा देत आपची निदर्शने !
पुणे:
भारतीय कुस्ती संघाचा अध्यक्ष व भाजपची खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले असून या कुस्तीसंघाचे अध्यक्ष यांना अटक करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीने पुण्यामध्ये सणस क्रीडा संकुलाजवळ निदर्शने केली.
‘खरे तर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केल्यानंतर आरोपीला तातडीने अटक व्हायला हवी होती परंतु अजूनही ब्रिज भूषण सिंग यांना अटक झालेली नाही, या मागणीसाठी दिल्लीमध्ये जवळपास ५० क्रीडापटू आंदोलन करीत आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर ८० पेक्षा जास्त गुन्हे या आधीच दाखल आहेत असे असतानाही मोदी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप यावेळेस करण्यात आला.
‘बेटी बचाव, बेटी पढाव परंतु भाजपचे गुंडों से बचाव’ असा नारा या वेळेस देण्यात आला.
ज्यांच्या कुस्तीतील कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला सन्मान मिळाला आहे त्या खेळाडूंना रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागणे हे दुर्दैवी आहे. सुप्रीम कोर्टाची पायरी चढल्यावर या आरोपीवर एफआयआर नोंदवली गेली आहे. जर या खेळाडूंना न्याय मिळत नसेल तर सामान्य महिलेला न्याय मिळणे अशक्य आहे. सर्व नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठवायला हवा आणि या घटनेनंतर यापुढे कुठल्याही क्रीडा प्रशिक्षकांनी खेळाडूंचे शोषण करू नये यासाठी कठोर नियम व नियंत्रण करण्याची गरज यावेळेस व्यक्त करण्यात आली.
या निदर्शनात आप चे सुदर्शन जगदाळे, मिलिंद ओव्हाळ, किरण कांबळे ,रामभाऊ इंगळे, सुरेखा भोसले ,अंजली इंगळे ,ज्योती ताकवले ,सीमा गुट्टे, आरती करंजावणे ,सतीश यादव, सेंथिल अय्यर ,अमोल काळे ,सरफराज मोमीन, समीर आरवडे, निलेश वांजळे, आसिफ मोमीन, साजिद खान, सुहास पवार, शंकर थोरात, आबासाहेब कांबळे, विकास सुपनार, अक्षय शिंदे, शंकर थोरात, घनश्याम मारणे, जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
