मुंबई:
संयुक्त महाराष्ट्राच्या निमिर्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या १०५ हुतात्म्यांचे स्मरण करीत मुंबई भाजपाच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महापालिका, रेल्वे, बेस्ट कामगारांचा गौरव, झेंडावंदन, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, साहित्य तसेच श्रमकार्ड वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अंधेरी तहसील कार्यालय आणि वांद्रे येथील बीपीई सोसायटी हायस्कूलमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
राज्याचे महिला व बालविकास, पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी हुतात्मा चौक येथे महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. चेंबूर सुभाषनगर येथे आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते सफाई कर्मचारी आणि आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंभरहून अधिक तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खा. गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते रेल्वे स्थानकांतील सफाई कामगार, हमाल, बूटपॉलिश, डबेवाले तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार, टॅक्सी, रिक्षाचालक व महिला पोलिस यांच्या सन्मानार्थ बोरिवली पश्चिम रेल्वे स्टेशनलगत कार्यक्रम घेण्यात आला. खा. मनोज कोटक, आ. मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीत मुलुंड येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आ. पराग शाह यांच्या पुढाकाराने घाटकोपर पंतनगर येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. आ. विद्या ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी शिव वाहतूक संघटनेच्या वतीने बेस्ट कामगारांचा गौरव करण्यात आला. माजी नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते दत्तक वस्ती तसेच नालेसफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. वरळी विधानसभेत दीपक पाटील यांनी सफाई कामगारांना भेटून शुभेच्छा दिल्या. भाजपा नगरसेवक, पदाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या महापालिका कामगारांचा सन्मान करत कामगार दिन साजरा केला.