पुणे : अखिल मंडई मंडळातर्फे मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन विश्रामबाग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांनी लाठीकाठी, तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके अनुभवली.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, प्रशिक्षक कुंडलिक कचाले, मंडळाचे विश्वस्त विश्वास भोर, पीयुष शहा, सुरज थोरात, प्रणव मलभारे, ओम थोरात, हरिष मोरे उपस्थित होते. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला चालवणे आदी खेळांचे प्रशिक्षण शिबिरात देण्यात येणार आहे.
सुनील माने म्हणाले, अखिल मंडई मंडळातर्फे अतिशय चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणामुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढते आणि स्वसंरक्षण देखील करता येते. मुलांसह विशेष करुन मुलींनी देखील असे प्रशिक्षण घेणे ही आजच्या काळात गरजेचे आहे.
अण्णा थोरात म्हणाले, सुट्ट्यांमध्ये मुले मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आहारी जातात. अशावेळी मुलांना मर्दानी खेळांचे प्रशिक्षण दिल्यास मुलांची भिती कमी होईल आणि स्वसंरक्षण करण्यासाठी ते सक्षम होतील. मंडई मंडळातर्फे यापूर्वी एक शिबिर घेण्यात आले होते. त्याला मुलांनी चांगला प्रतिसाद दिला होता आताही २०० पेक्षा अधिक मुलांनी सहभाग घेतला आहे. दिनांक २५ मे २०२३ पर्यंत हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे.
लाठी-काठी, तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर: अखिल मंडई मंडळातर्फे मर्दानी खेळांचे मोफत प्रशिक्षण
Date: