मुंबई : शरद पवार यांच्या सक्रीय राजकारणातून बाजूला जाण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते पूर्णपणे कोलमडून गेले. आतापर्यंत शरद पवारांनी सांगायचं आणि पक्षातल्या सगळ्यांनी ऐकायचं, असा शिरस्ता होता. मात्र आज पहिल्यांदा अनेक नेते आणि शेकडो कार्यकर्ते पवारांना सांगत होते अन् पवार किलकिल्या डोळ्यांनी फक्त समोरच्या गर्दीकडे बघत होते. तब्बल दीड तास नेते कार्यकर्ते पवारांना मनवत होते. पण पवार त्यांच्या निर्णयापासून मागे हटायला तयार नव्हते. यादरम्यान अनेक नेत्यांनी भावुक भाषणे करुन पवारांना एक पाऊल मागे येण्याची विनंती केली. पण पवार यांच्या पत्नी प्रतिभा काकी- तुमचा निर्णय योग्यच असल्याचं सांगत शरद पवार यांच्या मागे उभ्या राहिल्या. आपण निर्णय मागे घेऊ नका, असं पवारांच्या कानात सांगत राहिल्या.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, नेते समजावू लागले. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल वगळता सगळ्या नेत्यांनी आपण निर्णय मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी केली. यादरम्यान जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांनी अतिशय भावुक भाषणे केली. आपण आम्हाला घडवलंत, आता तुम्हीच राजकारणात नाही म्हटल्यावर आम्ही कुठे जायचं, अशी याचना नेते करु लागले. हे सगळं घडत असताना प्रतिभा काकी शरद पवार यांच्या खुर्चीला खुर्ची लावून शेजारी बसून राहिल्या.आपला निर्णय योग्यच आहे. हा निर्णय घ्यावाच लागणार होतो. तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहा, कार्यकर्ते नेत्यांच्या मागणीवर निर्णय मागे घेऊ नका, असं प्रतिभाकाकी शरद पवार यांना सांगत राहिल्या. कार्यकर्ते रडत होते. पण प्रतिभा काकी शरद पवार यांना स्मितहास्याने साथ देत होत्या. त्यामुळे शेवटपर्यंत शरद पवार यांनी नेते कार्यकर्त्यांचं न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिले.साहेब तुमच्याकडे बघून आम्ही राजकारणात आलो, मतं मागितली, मंत्री झालो, आमदार झालो, पण या सगळ्यांना घडवणारा नेताच जर पक्षाध्यक्ष राहणार नसेल, तर आम्ही कुणाकडे बघायचं, अशी सगळ्याच नेत्यांनी एकसुरी खंत व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरद पवारांची मनधरणी केली. तब्बल दीड तास वाय बी चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्ते नेते शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. अजित पवार-प्रफुल्ल पटेल भावनिक कार्यकर्त्यांची समजूत काढत होते, कधी दटावत होते. पण पवार आपल्या निर्णयापासून मागे येत नव्हते. माझा निर्णय झालाय, सक्रीय राजकारणातून जरी बाजूला जाणार असलो तरी पक्षापासून बाजूला जाणार नाही, लोकांपासून वेगळं राहणार नाही, असा शब्द भावुक कार्यकर्त्यांना देत शरद पवार सिल्वर ओककडे रवाना झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांनी पवारांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते गाडीसमोर झोपले. पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत शरद पवार यांच्या गाडीचा रस्ता रिकामा केला. शरद पवार जावई सदानंद सुळे आणि नातू विजय यांच्यासह गाडीत बसून सिल्वर ओककडे रवाना झाले.