‘आयटॅप’तर्फे नोकरी मिळालेल्या १२१ विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे : “वाणिज्य शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. झटपट श्रीमंती व मोठ्या ब्रँडमागे जाऊन विद्यार्थी चूक करतात. एकाच ठिकाणी सातत्याने चांगले काम करणे हेच यशाचे गमक आहे,” असे मत करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.
पुण्यातील ‘आयटॅप’ संस्थेच्या वतीने नुकतेच एका रोजगार विषयक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या ९० दिवसात ‘आयटॅप’ संस्थेच्या वतीने वाणिज्य क्षेत्रात नोकरी मिळालेल्या १२१ तरुण-तरुणींचा सत्कार करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. नवनीत मानधनी, ‘आयटॅप’चे संस्थापक सीए पंकज मानधने यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
उद्योगाची गरज ओळखून, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी ‘आयटॅप’ने तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे, तसेच विद्यार्थ्याना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे वेलणकर यांनी कौतुक केले. डॉ. नवनीत मानधनी यांनी वेळेचे नियोजन, स्वयंशिस्त, चिकाटी आणि मेहनत याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. नोकरी मिळालेल्या, व्यवसाय सुरु केलेल्या तरुणांनी तसेच त्यांच्या पालकांनी मनोगते व्यक्त केली.
सीए पंकज मानधने यांनी संस्थेची उद्दिष्टे आणि आत्तापर्यंत केलेले काम याचा आढावा घेतला. ‘आयटॅप’ ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत असून, आजवर दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत रोजगार उपलब्ध करून दिला आहे, असे मानधने यांनी नमूद केले.