Home Blog Page 1512

पुणे महापालिकेत सत्ता असताना भाजपचे कोणते पदाधिकारी गब्बर श्रीमंत झाले ? त्यांचा व्यवसाय काय होता ? विचार करा आपचे जनतेला आवाहन

पुण्यात आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रेची जाहीर सभा

पुणे-“ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ठेकेदार बनायचं आहे ते लोक भाजपमध्ये जातात. ज्यांना केवळ पद हवय ते लोक काँग्रेसमध्ये जातात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे देशाची सेवा करायची ते लोक आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते बनतात. जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते”, असे मत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया यांनी काल पुण्यात झालेल्या स्वराज्य सभेमध्ये व्यक्त केले.

“पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षात शहराचे वाटोळे केले. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला. नागरिकांचे कोणतेही प्रश्न सुटण्यास भाजपच्या राजवटीचा फायदा झाला नाही. पुणेकर नागरिक येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा जाब विचारतील. कसब्यापासून सुरू झालेले भाजप विरोधी वातावरण संपूर्ण पुण्यात पसरेल”, असे मत पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी व्यक्त केले.

काल पुण्यामध्ये आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा रॅली व जाहीर सभा पार पडली. आझम कॅम्पस येथून सुरू झालेली ही रॅली पावर हाऊस, लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता मार्गे हिराबाग चौकात आली आणि हिराबाग चौक येथे जाहीर सभा पार पडली. या यात्रेचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव व राज्य सहप्रभारी गोपाल इटालीया आणि पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केले. यावेळी मंचावर मुकुंद कीर्दत, संदीप देसाई, संदीप सोनवणे, सुनीता काळे हे उपस्थित होते. अभिजीत गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्रामध्ये स्वराज्य यात्रेची सुरुवात 28 मे रोजी भक्ती स्थळ पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन 6 जून राज्याभिषेक दिनी शक्तिस्थळ रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे.

स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी जनसामान्यांपर्यंत पोहचत आहे. दिल्ली, पंजाब, गोवा व गुजरात येथे मिळालेल्या मतदारांच्या पाठिंब्यामुळे पक्ष स्थापनेच्या एका दशकातच आम आदमी पार्टी एक राष्ट्रीय पार्टी बनली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील राज्य समिती व विभागीय समित्या बरखास्त करून संघटनात्मक पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
पुण्यामध्ये स्वराज यात्रेचे स्वागत सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, आम आदमी पार्टी रिक्षा संघटना, कंत्राटी कामगार सफाई कामगार तसेच अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने महाराष्ट्राचे सह प्रभारी श्री गोपाल भाई इटालिया यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

दिल्ली व पंजाब या ठिकाणी नागरिकांना मोफत वीज, मोफत पाणी, महिलांना मोफत बस प्रवास , मोफत दर्जेदार शिक्षण, मोफत अद्यावत हॉस्पिटल्स, व्यापाऱ्यांसाठी घेतलेले हिताचे निर्णय, ज्येष्ठांसाठी मोफत तीर्थयात्रा, सर्व शहरांमध्ये जागोजागी असणारे सीसीटीव्ही कॅमेरे, घरपोच सुविधा देणाऱ्या एकमेव राज्य अशा एक ना अनेक कामे करून आम आदमी पार्टीने दिल्ली, पंजाब, गोवा, गुजरात त्यानंतर महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. पुण्यामध्ये येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी आपलं वर्चस्व सिद्ध करेल असे या ठिकाणी सांगण्यात आले

लोकसभेत साडेतीनशे पेक्षा जास्त जागा भाजपा मिळवेल- जावडेकर

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साडेतीनशे पेक्षा जास्त जागा तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा खासदार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. देशाला विकसित भारत करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असून २०२४ च्या निवडणुकीनंतर विकासाची गती वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत खासदार प्रकाश जावडेकर बोलत होते.,माजी आमदार आणि राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष प्रा. मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेली नऊ वर्षे एका पक्षाचे पूर्ण बहुमत असलेले एनडीए सरकार आहे. त्यामुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले. लोकांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास ही आमची मोठी ताकद आहे. 2024 साली लोकसभा निवडणुकीत 350 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला आणि एनडीए ला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील असा आमचा ठाम विश्वास आहे. देशाला विकसीत भारत, होण्याच्या दृष्टीने मोठी वाटचाल झाली आहे व 2024 नंतर विकासाची गती आणखी वाढेल.

प्रधानमंत्री मोदी यांनी विकासाचे सकारात्मक राजकारण केले. विकासाचा लाभ देण्यात जात, धर्म, प्रांत, लिंग, मतदाराचा कल या कोणत्याही कारणावरून भेद केला नाही. जनतेनेही स्वच्छ भारत, डिजिटल भारत, नागरिकांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, शाश्वत विकास, घर घर तिरंगा अशा अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास-सबका प्रयास ह्या सूत्रावर मोठी प्रगती झाली.

मध्यमवर्गाला शांतता, सुबत्ता, सुलभ सुविधा आणि विकासाच्या विपुल संधी हव्या असतात. 2004 ते 2014 या कालखंडात विविध शहरात होणारे बॉम्बस्फोट संपले, माओवाद्यांचा प्रभाव 90 टक्के कमी झाला. जम्मु काश्मीर व पूर्वोत्तर राज्यात विकास व शांतता वाढली. 7 लाख उत्पन्नावर आता आयकर भरावा लागत नाही. रेरा, सेल्फ ॲटेस्टेशन, शासकीय सेवा ऑनलाईन, फेस लेस ॲसेसमेंट, ई रिटर्न फायलींग, 15 दिवसात रिफंड, मूलभूत सुविधांचा विकास आणि 1 लाख रेराअंतर्गत तक्रारीचा झटपट निपटारा याशिवाय अपूर्ण घरबांधणी प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी 25 हजार कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले. आर्थिक प्रगतीमुळे विकास व रोजगाराच्या संधी वाढल्या.

डिजिटल इंडिया मोहीमेने अदभूत यश मिळवले. जगात सर्वात जास्त डिजीटल व्यवहार भारतात होतात, भीम, यूपीआय, को-विन ही ॲप जगभर सर्वोत्कृष्ट ठरली. सोशल प्लॅटफॉर्मवर 60 कोटी भारतीय आहेत.

जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश भारत ठरला आहे. जेव्हा अमेरीका, चीन, युरोप यांचा विकासाचा वेग 2-4 टक्के असताना भारताच्या विकासाचा वेग 7% आहे. जागतिक बँक, मॉनिटरी फंड, मॉर्गन स्टॅन्ले सारख्या संस्थांच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. युरोप मधील अनेक देशात मंदीचे सावट आहे, पण भारताची वेगवान प्रगती चालू आहे आणि गरीबी एक टक्के पेक्षा कमी आणि बेरोजगारींचा दर ही कमी झाला आहे.

महागाईचा दर इंग्लंड 9 टक्के, युरोप 8 टक्के अर्जेंटीना 100 टक्के, ब्राझील 24 टक्के, इंडोनेशीया 9 टक्के असताना भारताने उत्तम आर्थिक व्यवस्थापन करीत हा दर सातत्याने 5 टक्के च्या खाली ठेवण्यात यश मिळविले.

आपली निर्यात सतत वाढून ती 750 बिलियन यापेक्षा जास्त झाली, परकीय चलनाची गंगाजळी अत्युच्च पातळीवर आहे. यामुळे भारत हे जगात होणाऱ्या गुंतवणूकीचे आकर्षण केन्द्र बनला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक चमकता तारा म्हणून ओळखला जातो. औद्यौगिक, शेती आणि सेवा क्षेत्रांचा सतत विकास, मजबूत मागणी आणि सुधारणा यामुळे हे घडून आले.

50 हजार किमी. चे नवे हायवे, 4 लाख किमी. चे ग्रामीण रस्ते, 70 नवे विमानतळ आणि 111 नवे जलवाहतुक मार्ग, 20 शहरात मेट्रोची प्रगती, 18 वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वे मध्ये मोठी गुंतवणूक, सुमारे 70 छोट्या बंदरांची निर्मिती, उडान योजना, स्वच्छ रेल्वे स्टेशन, हा प्रत्यक्ष विकास सर्व जगात वाखाणला जातो.

100 कोटी नागरिकांना मोफत कोविड प्रतिबंधक लस, 80 कोटी नागरिकांना गेले 35 महिने मोफत रेशन, 50 कोटी नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज, 11 कोटी शेतकऱ्यांना शेत सुधारण्यासाठी प्रत्येकी 26 हजार रुपये, 48 कोटी नागरिकांची जनधन खाती, महिलांना नवीन व्यावसायासाठी योजनेतून कर्ज, 30 कोटी नागरिकांना सुरक्षा विमा तर 13 कोटी नागरिकांना जीवन विमा, 11 कोटी घरात शौचालय, 10 कोटी महिलांना उज्वल गॅस योजना, 10 कोटी घरात नव्याने नळ जोडणी, 3.5 कोटी नागरिकांना प्रधान मंत्री आवास, 3 कोटी घरात वीज असा जन कल्याणकारी योजनेतून गरीबांना सक्षम बनवले.

शेतकऱ्यांना एमएसपी उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक देण्याचा क्रांतिकारी निर्णय अमलात आणला, विमा योजनेत शेतकऱ्यांना 1 लाख 33 हजार कोटींची नुकसान भरपाई मिळाली. 1260 ई मंडीमुळे शेतकरी आपला माल कुठेही पाठवू शकतात.

खतांच्या अनुदानात 5 पट वाढ, शेती अर्थसंकल्पात 5 पट वाढ, 10 कोटी शेतकऱ्यांना मृदा संधारण कार्ड, 20 लाख कोटींचे शेती कर्ज या सर्वाचा परिणाम धान्य उत्पादन व निर्यात वाढली.

370 कलम हटवल्यांनातर काश्मीर मधील दगडफेक संपली, आतंकवाद कमी झाला, देशी-विदेशी गुंतवणूक व पर्यटन सतत वाढत आहे. आता तो प्रदेश मोठी प्रगती करीत आहे.

केदारनाथ, महाकाल, सोमनाथ, काशी, देवधर, चारधाम, करतारपूर साहेब या सांस्कृतिक वारसाच्या महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांचा विकास,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाच्या 5 स्थानांचा विकास, सरदार पटेल व नेताजी बोस यांचे पुतळे अशी अनेक कामे 9 वर्षात झाली.
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांची ‘देश प्रथम’ निती त्यासाठी सतत कष्ट आणि ‘सन्यस्त कर्मयोगी’ ही प्रतिमा देशाला पुढे नेत आहे.
नऊ वर्षाच्या कामाचा अहवाल 20 कोटींहून अधिक घरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देणार आहेत.

महापालिकेच्या शिक्षणाधिकारी मॅडमकडे सापडले कोट्यवधींचे घबाड

50 हजारांची लाच घेताना पकडले :१ वर्षात रिटायर होणार होत्या …. 85 लाख रुपयांची रोकड ,32 तोळे सोने,उच्चभ्रू वस्तीत दोन प्लॅट ,आणि प्लॉट ..आणखीही शोध सुरूच

पुण्याप्रमाणे नाशिकच्या महापालिकेत होता बोगस कर्मचारी -त्याच्याकरवी गेला तपास पुढे ..

नाशिक- महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

निवृत्तीसाठी अवघा एक वर्षांचा कालावधी बाकी असताना सुनीता धनगर यांना 50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्यात. त्यानंतर त्यांची घरझडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती असल्याचे समोर येत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या घरात 85 लाख रुपयांची रोकड सापडली. सोबतच 32 तोळे सोने मिळाले. धनगर यांच्या नावावर नाशिकमधील उच्चभ्रू वस्तीत दोन प्लॅट आहेत. उंटवाडी परिसरात असलेल्या एका प्लॅटची किंमत दीड कोटी असल्याचे समजते. तसेच त्यांचा प्लॉटही असल्याचे समोर आले आहे. धनगर यांची बँक खाती, लॉकर्सचा तपास सुरू आहे. त्यातूनही मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका खासगी शैक्षणिक संस्थेतून बडतर्फ करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाला सेवेत न घेणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी पत्र देण्याच्या मोबदल्यात धनगर यांनी हे पैसे स्वीकारलेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस सुनीता सुभाष धनगर व त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नितीन अनिल जोशी यांच्याविरोधात लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.तक्रारदार हे बाविस्कर नाशिकमधील एका खासगी शैक्षणिक संस्थेत मुख्याध्यापकपदावर कार्यरत होते. मात्र, त्याना संस्थेने गैरवर्तनाचा – उपका ठेवत मुख्याध्यापक पदावरून बडतर्फ केले होते. या बडतर्फीविरोधात मुख्याध्यापकाने शैक्षणिक न्यायाधीकरणाकडे दाद मागितली असता त्यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यात आली. दरम्यान, न्यायाधीकरणाच्या निकालानुसार मुख्याध्यापकाने संस्थेकडे सेवेत दाखल करून घेण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी टाळाटाळ केली. या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने शिक्षणाधिकान्यांकडे अर्ज केला असता त्यावर पत्र देण्यासाठी मुख्याधापकाकडे 50 हजारांची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने मुख्याध्यापकाने लाचलुचपत प्रतिबंधित विभागाकडे तक्रार केली. तेव्हा शुक्रवारी धनगर यांच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून धनगर यांना 50 हजारांची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचवेळी धनगर यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नितीन जोशी याने हे पत्र बनवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेतल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले.धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईत पकडलेला लिपिक जोशी हा महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा कर्मचारीच नाही. तो नाशिकरोडच्या खासगी शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी आहे. प्रतिनियुक्तीवर त्याची शिक्षणाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. ती नियुक्तीदेखील नियमानुसार आहे की नाही? हा मुद्दादेखील चर्चेत आहे.

पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर EDची छापेमारी! 18 कोटी 54 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

पुणे-व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज आणि उद्याेजक विनाेद खुटे व त्यांचे नातेवाईक यांच्याद्वारे व्यवस्थापित व नियंत्रित मेसर्स ग्लाेबल एफिलिएट व्यवसायाद्वारे फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी (इडी) अंमलबजावणी संचालनायलयाने २५ मे पासून छापेमारी सुरू केली. आतापर्यंत याप्रकरणी पुणे व अहमदनगर येथील कंपनीशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करुन राेख रक्कमेसह, बँकेतील विविध खात्यातील एकूण १८ कोटी ५४ लाख रुपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने शुक्रवारी दिली आहे.

ईडीने उद्याेजक विनाेद खुटे व इतरांविरुध्द फेमा कायदा १९९९ चे उल्लंघन केल्याप्रकरणी तपास सुरु केला. खुटे सध्या दुबई मध्ये राहून विविध बेकायदेशीर व्यापार, क्रिप्टाे एक्सचेंज, वाॅलेट सेवा व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपन्यांच्या माध्यमातून चालवत आहे. त्यातून मिळालेली रक्कम हवालाद्वारे विविध देशात पळवली जात हाेती.

ईडीच्या चाैकशीत असे निष्पन्न झाले आहे की, मेसर्स ग्लाेबल एफिलिएट बिझनेस द्वारे ई -काॅर्मस शाॅर्पिंग पाेर्टलद्वारे विविध उत्पादनांची विक्री करुन संलग्न विपणन व्यवसायाचे मार्केटिंग केले जात हाेते. त्यासाठी ग्लाेबल एफिलिएट बिझनेस नावाचा अ‌ॅप्लिकेशनचा वापर करण्यात येत हाेता. हा व्यवहार बेकायदेशीर व अनाधिकृतरित्या साखळी पद्धतीने चालवला जात हाेता. ज्यात जर एखाद्या व्यक्तीने सदस्य म्हणून कोणत्या याेजनेची निवड केली आणि त्याबाबतचा अर्ज/वेबसाईटवर इतर ग्राहक यांचा संर्दभ दिला तर त्याच्यावर कमिशन संबंधितांना त्यांचे खात्यावर मिळत हाेते.

अशाप्रकारे विविध गुंतवणुकदारांकडू १२५ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. ईडीचे तपासात ही बाब समाेर आली की, व्याज/कमिशनच्या नावाखाली विविध गुंतवणुकदारांकडून शेल कंपन्या, फर्मच्या नावाखाली बँकिंग चॅनलद्वारे तसेच राेख स्वरुपात १२५ कोटीहून अधिक रक्कम गाेळा केली गेली आहे. त्यामुळे फेमा कायद्याचे उल्लंघन प्रकरणी कंपनीचे बँकेतील १७.२२ कोटी रुपये गाेठवले गेले आहे.

मेसर्स ग्लाेबल एफिलिएट बिझनेस कंपनी ही ब्राेकरेज कंपनी मेसर्स काना कॅपिटलच्या व्यवसायाचे मार्केटिंग करत असल्याचे ही ईडी तपासात आढळून आले आहे. काना कॅपिटल्स व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांशी सल्लामसलत करुन मेसर्स ग्लाेबल एफिलिएट बिझनेसच्या ग्राहकांसाठी व्हीआयपीएस वाॅलेट, व्हीआयपीएस इन स्टाॅक मधील गंतवणुकीसाठी विविध साप्ताहिक प्रशिक्षण कार्यक्रम आयाेजित करतात.

क्रिप्टाे करन्सी, स्टाॅक्स व इतर ग्राहकांना बेकायदेशीर व अनाधिकृत साखळी पद्धती मार्केटिंग याेजनेत कसे आकर्षिक करावयाचे याची माहिती याद्वारे दिली जाते. धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट साेसायटी लिमिटेड,पुणे येथे विनाेद खुटे यांनी गुंतवणुकदारांना खाेट्या याेजनेत आकर्षित करण्यासाठी सुरु केलेला एक उपक्रम आहे. याद्वारे दरमहा दाेन टक्के ते चार टक्के व्याज ग्राहकांना दिले जाते. विविध ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक राेख स्वरुपात देखील गाेळा करण्यात आली हाेती. सदर रक्कम ही हवाला चॅनेलद्वारे तसेच देशाबाहेर पळवली गेली हाेती.

धनकवडीत बिल्डरकडून फसवणूक पोलिसांची साथ:विभागीय पोलिस प्राधिकरणाने दिले चौकशीचे आदेश

बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशीची सरकारला शिफारस

एका सदनिका खरेदी प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विरोधात गुन्हा नोंद न करता हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची सविस्तर चौकशी करण्याची शिफारस विभागीय पोलिस प्राधिकरणाने राज्य सरकारला केली आहे.पुणे विभागीय पोलीस प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. व्ही. जटाले आणि सदस्य बी.जी. गायकर यांनी हे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी शोभना मोहन डेंगळे (रा. गणेश प्रसाद बिल्डींग, पुण्याईनगर, धनकवडी,पुणे) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक बापु खेंगरे यांच्या विरोधात पोलिस प्राधिकरणात धाव घेतली होती. संबधित दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार डेंगळे यांनी बी. डी. कन्स्ट्रक्शनच्या तिसर्‍या मजल्यावर ११ नंबरचा फ्लॅट खरेदी केला होता. बांधकाम व्यवसायिक यास सांगितल्यानंतर त्यांनी रक्कम भरूनही त्यांना तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट न देता इमारतीच्या पाचव्या मजल्यावर 19 व्या नंबरचा फ्लॅट देण्यात आला होता.

यामुळे तक्रादारांनी संबंधीत भागीदार असलेले बिल्डर बर्गे आणि देशमुख यांच्या विरोधात 31 ऑगस्ट 2019 मध्ये न्यायधिकरनकडे तक्रार दिली होती. तसेच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक खेंगरे आणि पोलिस निरीक्षक शेवाळे यांची भेट घेतली. परंतु त्यांनी संबंधीत बांधकाम व्यवसायिक विरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नाही.

दरम्यान, त्यांनी याप्रकरणी प्राधिकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याबाबत रीतसर लेखी तक्रार केली होती. त्यावर प्राधिकारणाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून याबाबतची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच आदेशाची प्रत गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना व पुणे पोलिस आयुक्तांना याची प्रत देण्यात यावी असे आदेशात सांगण्यात आले आहे.

साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी साठ्यावर लागू केली मर्यादा

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उचललेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल

नवी दिल्ली-

साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी तसेच तूर डाळ आणि उडीद डाळीचे दर ग्राहकांना परवडतील असे ठेवण्यासाठी भारत सरकारने एक आदेशाद्वारे या डाळींच्या साठ्यावर मर्यादा घातली आहे. हे निर्बंध घाऊक, किरकोळ विक्रेते, मोठे साखळी विक्रेते, डाळ मिलर्स आणि आयातदार यांना बंधनकारक असतील. यासंदर्भातला आदेश आजपासून  लागू करण्यात आला आहे.

या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत तूर आणि उडीद डाळ साठा मर्यादा विहित करण्यात आली आहे. घाऊक विक्रेत्यांसाठी प्रत्येक डाळीला वैयक्तिकरित्या लागू होणारी साठा मर्यादा घाऊक विक्रेत्यांसाठी 200 एमटी; किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 एमटी; मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी प्रत्येक किरकोळ विक्री केंद्रावर 5 एमटी आणि गोदामामध्ये 200 एमटी; मिलर्ससाठीची मर्यादा त्यांच्या उत्पादनाचे मागचे 3 महिने किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25%, यापैकी जे जास्त असेल ती. तर, आयातदारांच्या संदर्भात, आयातदारांनी सीमाशुल्क क्लीअरन्स तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त आयातीत  साठा ठेवू नये अशी मर्यादा घालण्यात आली आहे. संबंधित कायदेशीर संस्थांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp)  साठ्याची स्थिती घोषित करायची आहे आणि त्यांच्याकडे असलेला साठा विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, त्यांनी अधिसूचना जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत विहित मर्यादेपर्यंत साठा व्यवस्थापित करावा.

तूर आणि उडदाच्या डाळ साठ्यावरची  मर्यादा लादणे हे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणखी एक पाऊल आहे. ग्राहक व्यवहार विभाग स्टॉक डिस्क्लोजर पोर्टलद्वारे तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच राज्य सरकारसोबत या साठ्याचा साप्ताहिक आधारावर आढावा घेण्यात आला आहे. साठा उघड करणे सुनिश्चित करण्यासाठी आयातदार, मिलर्स, किरकोळ विक्रेते यांसारख्या विविध भागधारकांशी व्यापक संवाद साधण्यात आला आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांना भेटी दिल्या आहेत.

गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनचे लॉंचिंग रद्द, ओडिशा रेल्वे अपघातानंतर निर्णय; PM मोदी हिरवा झेंडा दाखवणार होते

ओदीशामध्ये  रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  तीव्र दुःख  व्यक्त केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“ओदीशात झालेल्या  रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो. या दुःखद  प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना.  जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी  मदत केली जात आहे.

गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे शनिवारी होणारे लॉंचिंग रद्द करण्यात आले आहे. पीएम मोदी हिरवा झेंडा दाखवणार होते. ओडिशा रेल्वे अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मडगाव स्थानकावर येणार होते. मात्र त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ओडिशात शनिवारी सकाळी रेल्वे मंत्री रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले.

सध्या महाराष्ट्रात 16 डब्यांच्या वंदे भारत गाड्या सीएसएमटी मुंबई-साईनगर शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर आणि मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गावर धावत आहेत. दुसरी ट्रेन नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे. पुढील आठवड्यापासून वंदे भारत गोवा मार्गावर नियमित धावण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार ही ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्याचे उर्वरित सहा दिवस धावणार आहे.

वंदे भारत ट्रेनला गोवा-मुंबई मार्गावर 7 थांबे देण्यात आले आहेत. सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव स्थानकांवर थांबे असतील. यापूर्वी 16 मे रोजी सीएसएमटी ते मडगाव दरम्यानच्या ट्रायल रनदरम्यान ट्रेनने सुमारे सात तासांत हे अंतर कापले होते.

तिकिटांची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, परंतु एका तिकिटाची किंमत सुमारे 1400 रुपये असेल अशी अपेक्षा आहे. ट्रेनच्या वेगवेगळ्या श्रेणीनुसार तिकीट दरात बदल होऊ शकतो.

जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क भारताकडे आहे. येथे 1.25 लाख किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर दररोज 11 हजारहून अधिक ट्रेन धावतात. या गाड्यांमधून दररोज सुमारे 3 कोटी लोक प्रवास करतात. इतका मोठा आणि लोकांशी जोडलेला असल्यामुळे भारतात रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 2016 मध्ये मोदी सरकारने ही 92 वर्षे जुनी प्रथा बंद केली.

अंधारात प्रियजनांचे तुकडे शोधत राहिले; कुणी हात गमावले, कुणी पाय, हे पाहून काही वेळ माझा आवाज गेला : प्रत्यक्षदर्शी

भुवनेश्वर

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता झालेला रेल्वे अपघात इतका भीषण होता की कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे अनेक डबे उद्ध्वस्त झाले. एक इंजिन मालगाडीच्या रॅकवरच चढले. ही टक्कर इतकी भीषण होती की खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि जवळपास 50 लोक बाहेर फेकले गेले.

अंधारामुळे लोक रडत रडत आपल्या प्रियजनांना शोधत राहिले. काहींना धड मिळाले पण डोके मिळाले नाही. लोक ओरडताना आणि आपल्या प्रियजनांचे तुकडे गोळा करताना दिसले. बोगीत अडकलेल्या लहान मुलांना आणि महिलांना डब्यातून बाहेर काढण्यासाठी शिडीचा सहारा घ्यावा लागला. रेल्वेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकही रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम करताना दिसले. रुग्णालयातही अनेक लोक जखमींच्या मदतीसाठी उभे राहिले.

या अपघातात सकाळी ६ वाजेपर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याचवेळी 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. अपघाताचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समजू शकते.

 पंखा धरून वरच्या सीटवर बसलो, नंतर इतरांना मदत केली
एका प्रवाशाने सांगितले की आम्ही S5 बोगीत होतो आणि अपघात झाला तेव्हा मी झोपलो होतो. मोठ्या आवाजाने मला जाग आली. मी पाहिले की ट्रेन उलटली होती. माझी सीट वरच्या मजल्यावर होती, मी पंखा धरून बसलो. ट्रेनमध्ये चेंगराचेंगरी झाली. लोक आम्हाला वाचवा असे ओरडत होते.

त्यानंतर पॅन्ट्री कारने पेट घेतला. पलीकडे पळत गेलो तर तिथे हात नसलेली, पाय नसलेली मृत माणसे पडलेली दिसली. तोपर्यंत बाहेरचे कोणीही मदतीला आले नव्हते. ट्रेनमधून उतरल्यावर लोक एकमेकांना मदत करत होते. चांगली गोष्ट म्हणजे आमच्या सीटखाली एक 2 वर्षाचा मुलगा होता, जो पूर्णपणे सुरक्षित होता. आम्ही त्याच्या कुटुंबाला वाचवण्यास मदत केली.

ट्रेन उलटली, 10 लोक माझ्या अंगावर पडले, बाहेर आलो तर मृतदेह पाहिले
एक जखमी म्हणाला, मी झोपेत होतो. डबे उलटताच १०-१२ माणसे माझ्या अंगावर पडली. मी कसाबसा डब्यातून बाहेर आलो. भयंकर दृश्य होते. काहींनी हातपाय गमावले होते. मला धक्काच बसला. माझा आवाज गेला होता. एक महिला म्हणाली, सगळे सामान, प्रवासी एकमेकांवर पडले. आम्हाला श्वास घेणेही कठीण झाले होते. तरीही मी कशीबशी बाहेर पडले. माझा हात आणि मानेला दुखापत झाली आहे.

ओडिशात रेल्वे अपघातात 238 ठार, 900 हून अधिक जखमी; एक दिवसाचा राजकीय दुखवटा

भुवनेश्वर

ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल ट्रेल मालगाडीला धडकली. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रुळावरून उलटले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्या.

बहानागा येथे पोहोचण्यासाठी दोन्ही गाड्यांमध्ये ३ तासांचा फरक होता, पण त्या एकत्र आल्या

ट्रेन क्रमांक १२८६४ बेंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस 1 जून रोजी सकाळी 7:30 वाजता बेंगळुरूमधील यशवंतपूर स्थानकावरून निघाली. 2 जून रोजी रात्री 8 च्या सुमारास हावडा येथे पोहोचणार होती. नियोजित वेळेपेक्षा 3.30 तासांच्या विलंबाने 06:30 वाजता भद्रक येथे पोहोचली. पुढचे स्टेशन बालासोर होते, जिथे ट्रेन 4 तासांच्या विलंबाने 7:52 वाजता पोहोचणार होती.

तर ट्रेन क्रमांक १२८४१ शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस हावडाहून २ जून रोजी दुपारी ३.२० वाजता निघाली. 3 जून रोजी दुपारी 4:50 वाजता चेन्नई सेंट्रलला पोहोचते. ती संध्याकाळी ६.३७ वाजता बालासोरला वेळेवर पोहोचली. पुढचे स्टेशन भद्रक होते जिथे ट्रेन 7:40 ला पोहोचणार होती. पण, 7 वाजण्याच्या सुमारास बहानागा बाजार स्थानकाजवळ दोन्ही गाड्या समोरासमोर गेल्या, त्यावेळी हा अपघात झाला.

हेल्पलाइन नंबर…

आपत्कालीन नियंत्रण कक्ष: 6782262286
हावडा: ०३३-२६३८२२१७
खरगपूर: ८९७२०७३९२५, ९३३२३९२३३९
बालासोर: 8249591559, 7978418322
कोलकाता शालीमार: 9903370746

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. म्हणाले- मी नुकताच रेल्वे अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मी उद्या सकाळी घटनास्थळी भेट देईन.
  • ओडिशा सरकारने एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
  • गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा शनिवारी होणारा उद्घाटन सोहळा रेल्वे अपघातानंतर रद्द करण्यात आला आहे.
  • जिल्हाधिकारी, एसपी, रेंज आयजी पोलिसांसह 3 एनडीआरएफ टीम आणि 20 हून अधिक अग्निशमन सेवा आणि बचाव पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
  • भुवनेश्वरमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनास्थळी 115 रुग्णवाहिका, 50 बस आणि 45 मोबाईल हेल्थ युनिट तैनात करण्यात आले होते. याशिवाय 1200 बचाव कर्मचारीही हजर आहेत.
  • केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अपघातस्थळी रवाना झाले आहेत. भुवनेश्वर आणि कोलकाता येथून बचाव पथके रवाना करण्यात आल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. एनडीआरएफ, राज्य सरकारची टीम आणि एअरफोर्स हेलिकॉप्टर बचावासाठी पोहोचले आहेत.
  • जखमींना मदत करण्यासाठी 2000 हून अधिक लोक रात्रभर बालासोर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहेत. अनेकांनी रक्तदानही केले.
  • यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार ब्युरो (एससीए) ने बालासोर ट्रेन दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
  • केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. एम्स भुवनेश्वरमध्ये जखमींसाठी बेड, आयसीयू आदींची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
  • या अपघातग्रस्त मार्गावरील 6 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांचे अपघात कमी झाल्याबद्दल महावितरणला पुरस्कार

मुंबई, दि. ०२ जून २०२३ : कर्मचाऱ्यांचे अपघात कमी झाल्याबद्दल तसेच कंपनीत सुरक्षिततेचे वातावरण जोपासल्याबद्दल महावितरणला ग्रीनटेक सुरक्षा पुरस्कार २०२३ मिळाला असून नवी दिल्ली येथे नुकताच महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आसामचे माजी राज्यपाल डॉ. जगदीश मुखी यांच्या हस्ते श्री भादीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे प्रशिक्षण व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यास कॅनरा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. दुबे आणि ग्रीनटेक फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.के. शरण उपस्थित होते.

महावितरणच्या नियमित आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे अपघात कमी व्हावेत यासाठी कंपनीतर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. एका वर्षात जीवघेणे अपघात ४२ टक्क्यांनी कमी झाले तर गंभीर इजा झाली असे अपघात ४३ टक्क्यांनी कमी झाले याची नोंद घेऊन महावितरणला पुरस्कार देण्यात आला.

विजेची वायर तुटणे, उपकरणात दोष, आग लागणे, वायर्स किंवा विजेच्या खांबावर झाडे कोसळणे, विजेचे खांब मोडणे अथवा विजेचा झटका बसणे अशा कारणांनी विद्युत कर्मचाऱ्यांचे अपघात होतात. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी कंपनीतर्फे सातत्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते तसेच त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली जाते. विशेषतः पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. या खेरीज सुरक्षितता प्रशिक्षण दिले जाते. कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने व्हॉटस अपच्या माध्यमातून संदेशही पाठविले जातात

नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे नेतृत्व करणारे पुण्याचे सुपुत्र विनायक देशपांडे यांचा रविवारी सत्कार

  • स्मार्ट पुणे फौंडेशनच्या वतीने ‘ नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :
भारताच्या नव्या संसद भवनाचे नुकतेच २८ मे २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे ६,२०,००० चौ. फुटाचे अद्वितीय बांधकाम २१ महिन्यात पूर्ण करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व टाटा प्रोजेक्ट्स चे प्रमुख सल्लागार आणि कोथरुडचे सुपुत्र श्री. विनायकजी देशपांडे यांनी केले. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ स्मार्ट पुणे फौंडेशन यांच्या आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, ४ जून २०२३ ला हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी दिली.
कोथरुड, मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. देशपांडे यांचा सत्कार पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात विनायक देशपांडे यांची मुलाखत प्रसिद्ध वास्तुविशारद केतन सुधीर गाडगीळ हे घेणार आहेत. यामध्ये हा प्रकल्प उभारताना आलेली आव्हाने, त्यावर केलेली मात, विविध अडीअडचणी यावर सविस्तर चर्चा करून याची माहिती देणार आहेत. ‘ नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा’ असे याचे स्वरूप असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक आणि स्मार्ट पुणे फौंडेशनचे अधक्ष डॉ. बुटाला यांनी सांगितले. नवीन संसद भवनाच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि कोथरुडकर असलेल्या विनायक देशपांडे यांच्या कौतुक समारंभाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील डॉ. बुटाला यांनी केले आहे.

मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास वंदे भारत रेल्वे सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल

पंतप्रधान 3 जून रोजी दाखवणार हिरवा झेंडादेशातील ही 19वी वंदे भारत रेल्वेगाडी 

नवी दिल्ली, 2 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी  देशातील 19वी वंदे भारत रेल्वे असेल.

ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वेगाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासाची बचत होईल.

स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल

जी 20 परिषदेनिमित्त पुणे ते पंढरपूर सायकल रॅलीचा शुभारंभ

पुणे, 2 जून 2023

यंदा पुणे शहरामध्ये जी 20 परिषदेनिमित्त विविध देशांचे पाहुणे येणार आहेत त्या दृष्टिकोनातून पुणे महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यकरणाचे विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. या परिषदेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा आज महापालिका भवना पासून शुभारंभ झाला .पुणे ते पंढरपूर या सुमारे 250 किलोमिटर मार्गावर ही रॅली प्रवास करणार असून जी 20 परिषदे बरोबरच पर्यावरण विषयक जन जागृती करणार आहे . मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण देखील केले जाणार आहे.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.यावेळी  विविध मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांसह विविध स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत .

पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार

पुणे, दि. २: सार्वजनिक प्रशासनात नवकल्पनांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने मानाच्या स्वर्गीय एस. एस. गडकरी पुरस्कारासाठी पुणे जिल्हा परिषदेची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कठोर परिश्रमाचा हा सन्मान आहे, अशी भावना प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे सार्वजनिक सेवा प्रशासनात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. याअंतर्गत सूक्ष्म आणि सर्वसमावेशक मूल्यमापन प्रक्रियेद्वारे जिल्हा परिषदेने सर्व विभागांमधील १ हजार १८३ कार्य प्रक्रिया निश्चित केल्या. आवश्यक संकलित माहिती (डेटा), निर्णय घेण्याची आवश्यकता आणि अंमलबजावणी प्रक्रिया विचारात घेऊन प्रत्येक प्रक्रियेचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यात आले.

संबंधित कायदे, नियम, शासकीय ठराव, न्यायालयाचे आदेश, वरिष्ठ कार्यालयांचे स्थायी आदेश आणि निश्चित पद्धती यांचा विस्तृत संशोधनाद्वारे अभ्यास करण्यात आला. २५ जानेवारी २०२२ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार हे निष्कर्ष सुसंगत प्रक्रिया तयार करण्यासाठी सात प्रकारांमध्ये वर्गीकरण आणि सेवा हक्क कायद्याअंतर्गत अधिसूचित करण्यात आले.

या प्रक्रियेअंतर्गत जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अनेक अधिकार प्रदान केले. सुमारे सात महिने चाललेल्या या प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभागी झाले. विस्तृत संशोधन आणि विकास प्रक्रियेद्वारे सर्वांच्या भूमिकांबद्दल अधिक माहितीपूर्ण दृष्टीकोन निश्चित करून सर्वांना प्रशिक्षण दिले. या सर्वांनी क्षमता वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या प्रक्रियांचे संकलन नियमावलीत करण्यात आले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, कमलाकर रणदिवे आणि राहुल काळभोर यांनी जिल्हा परिषदेत हा अभिनव उपक्रम राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जिल्हा परिषदेने महाराष्ट्र ज्ञान महामंडळासह (एमकेसीएल) ‘महालाभार्थी’ या नावाने सहयोगी प्रकल्प राबविण्याची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा उपक्रम दोन टप्प्यात राबविण्यात आला, पहिला टप्पा जुन्नर आणि आंबेगाव येथे आदिवासी समुदायांमध्ये प्रकल्प राबविण्यात आला. आंतरजालावरील सर्च इंजिनच्या वापराद्वारे, नागरिकांनी सादर केलेल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे योजनांची यादी तयार केली गेली. या प्रकल्पाने जनतेत जागरुकता वाढवली आणि मोठ्या संख्येने नागरिकांना विविध योजनांपर्यंत पोहोचण्यास सक्षम केले.

पुणे जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात, नागरीक आणि कुटुंबांना पुणे जिल्हा परिषदेद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांमध्ये सहज प्रवेश मिळवून देणारा ‘सिंगल मास्टर फॉर्म’ विकसित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण ‘फॅमिली फोल्डर’ संकल्पना तयार करण्यात आली. या वैशिष्ट्यपूर्ण प्रणालीद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासह अर्जांवर प्रक्रियादेखील सोपी झाली. ‘केस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’च्या अंमलबजावणीमुळे नागरिकांना सुलभ हाताळणी, कमी वेळेत लाभ आणि नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळाले. परिणामी, पुणे जिल्हा परिषद १५ दिवसांच्या उल्लेखनीय कालावधीत मोठ्या संख्येने अर्जांवर प्रक्रिया करण्यात सक्षम झाली आहे. याचा सुमारे एक लाख लोकांना फायदा झाला आहे.

एमकेसीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, व्यवसाय विकास व्यवस्थापक विनायक कदम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेचे मानद अध्यक्ष आणि माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी हा पुरस्कार जाहीर करून पुणे जिल्हा परिषदेच्या या कामगिरीचा गौरव केला आहे.

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंती निमित्त ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन  चित्रप्रदर्शन सुरू

पुणे : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची यंदा 133 वी जयंती आहे. या निमित्ताने कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023” या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन  येथे बाबूराव पेंटर यांच्या कन्या विजायमाला बाबूराव पेंटर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. 

याप्रसंगी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची सून अनुराधा अरविंद मेस्त्री , नातू अर्जून अरविंद मेस्त्री, नात प्रिया रणजीत बॅनर्जी, चित्रप्रदर्शन स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर ( मुंबई), संजय शेलार ( कोल्हापूर) आदी उपस्थित होते.

या ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’ मध्ये शनिवार (दि. 3 जून ) सकाळी 9 वा. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा 133 वा जयंती सोहळा व स्पर्धेचा  पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.  या आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन मध्ये संपूर्ण भारतातून 500 हुन अधिक व्यावसायिक कलाकार व कला शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले असून हे  प्रदर्शन 4 जून पर्यंत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन येथे सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत नागरिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.