- स्मार्ट पुणे फौंडेशनच्या वतीने ‘ नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे :
भारताच्या नव्या संसद भवनाचे नुकतेच २८ मे २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे ६,२०,००० चौ. फुटाचे अद्वितीय बांधकाम २१ महिन्यात पूर्ण करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व टाटा प्रोजेक्ट्स चे प्रमुख सल्लागार आणि कोथरुडचे सुपुत्र श्री. विनायकजी देशपांडे यांनी केले. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ स्मार्ट पुणे फौंडेशन यांच्या आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, ४ जून २०२३ ला हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी दिली.
कोथरुड, मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. देशपांडे यांचा सत्कार पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात विनायक देशपांडे यांची मुलाखत प्रसिद्ध वास्तुविशारद केतन सुधीर गाडगीळ हे घेणार आहेत. यामध्ये हा प्रकल्प उभारताना आलेली आव्हाने, त्यावर केलेली मात, विविध अडीअडचणी यावर सविस्तर चर्चा करून याची माहिती देणार आहेत. ‘ नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा’ असे याचे स्वरूप असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक आणि स्मार्ट पुणे फौंडेशनचे अधक्ष डॉ. बुटाला यांनी सांगितले. नवीन संसद भवनाच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि कोथरुडकर असलेल्या विनायक देशपांडे यांच्या कौतुक समारंभाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील डॉ. बुटाला यांनी केले आहे.