मुंबई, दि. ०२ जून २०२३ : कर्मचाऱ्यांचे अपघात कमी झाल्याबद्दल तसेच कंपनीत सुरक्षिततेचे वातावरण जोपासल्याबद्दल महावितरणला ग्रीनटेक सुरक्षा पुरस्कार २०२३ मिळाला असून नवी दिल्ली येथे नुकताच महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आसामचे माजी राज्यपाल डॉ. जगदीश मुखी यांच्या हस्ते श्री भादीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे प्रशिक्षण व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यास कॅनरा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. दुबे आणि ग्रीनटेक फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.के. शरण उपस्थित होते.
महावितरणच्या नियमित आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे अपघात कमी व्हावेत यासाठी कंपनीतर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. एका वर्षात जीवघेणे अपघात ४२ टक्क्यांनी कमी झाले तर गंभीर इजा झाली असे अपघात ४३ टक्क्यांनी कमी झाले याची नोंद घेऊन महावितरणला पुरस्कार देण्यात आला.
विजेची वायर तुटणे, उपकरणात दोष, आग लागणे, वायर्स किंवा विजेच्या खांबावर झाडे कोसळणे, विजेचे खांब मोडणे अथवा विजेचा झटका बसणे अशा कारणांनी विद्युत कर्मचाऱ्यांचे अपघात होतात. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी कंपनीतर्फे सातत्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते तसेच त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली जाते. विशेषतः पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. या खेरीज सुरक्षितता प्रशिक्षण दिले जाते. कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने व्हॉटस अपच्या माध्यमातून संदेशही पाठविले जातात