Home Blog Page 1511

आज मान्सून केरळला धडकणार; मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता

सातारा, सोलापूर, रायगड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, बीड, पुणे, हिंगोली, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.असा पुणे वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे.

नैऋत्य मान्सून आज केरळमध्ये पोहोचणार आहे. आता तो देशाच्या सागरी हद्दीत दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) लवकरच त्याचे केरळमध्ये आगमन झाल्याची घोषणा करू शकते. मान्सून सामान्यतः 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये तो 29 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. तर तत्पूर्वी 2021 मध्ये तो 1 जूनला पोहोचला होता.

अनुभवल्या पहिल्या सरी…. गाव राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथील जलधारांचा हा व्हिडीओ

IMD ने सोमवारपासून केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD च्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून सध्या लक्षद्वीप व दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागातून पुढे सरकत आहे.

रविवारी एका अलर्टमध्ये आयएमडीने म्हटले आहे- राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, अंदमान व निकोबार बेट समूह, केरळ, कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, किनारपट्टी आंध्र प्रदेश व यानाम, तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाट, मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत केरळच्या पठानमथिट्टा व इडुक्की जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दहावी परीक्षेत कात्रजच्या नॅशनल पब्लिक स्कुलचा सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के निकाल

पुणे :

अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नॅशनल पब्लिक स्कुल (कात्रज जाधवनगर)चा निकाल दहावी(शालांत) परीक्षेत शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे.अनुष्का गोरख साळुंखे हिने ८९.४० टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर संतोषकुमार रामनरेश यादव याने ८१.६० टक्के गुण मिळवून द्वीतिय क्रमांक पटकावला.सलग चौथ्या वर्षी नॅशनल पब्लिक स्कुल चा निकाल शंभर टक्के लागला आहे.

मुख्याध्यापक सौ.अंजुम फिरदौस पटेल, संस्थापक अॅड. तारिक अन्वर पटेल,सर्व संचालक,शिक्षक वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट ही अल्पसंख्यांक शिक्षण कायद्याखाली नोंद झालेली शिक्षण संस्था असून गरीब,सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी येथे शिकतात,असे संस्थापक अॅड. पटेल यांनी सांगितले.

पर्वती मतदारसंघात उद्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

पुणे: पर्वती विधानसभा मतदार संघ अंतर्गत ५ जुन २०२३ रोजी ग्लोबल हॉस्पिटल समोरील अग्रवाल शाळा दत्तवाडी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाला आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.

विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी एकत्र येवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. अभियांनातर्गत नागरिकांना विविध योजनांची माहिती पोहोचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे, योजनेचा आणि सेवेचा प्रत्यक्ष लाभ देणे आदी कामे करण्यात येतील.

नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार राधिका हावळ- बारटक्के यांनी केले आहे.
000

लावणी कला महाराष्टाची शान – वैशाली वाफळेकर

भीमथडी मराठी साहित्य संमेलनात दशरथ यादव यांनी घेतली प्रकट मुलाखत

दौंड : लावणीकला महाराष्ट्राचे वैभव असून,जगाच्या बाजारात लावणीकलेला महत्वाचे स्थान आहे.मात्र लावणीला बदनाम करणारे चोरून लावणीला दाद देतात.असे परखड मत सुप्रसिद्ध लावणी कलावंत वैशाली वाफळेकर यांनी व्यक्त केले.चौफुला येथे राज्यस्तरीय दुसरे भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.लावणी व तमाशाचे बदलते स्वरुप या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी वैशाली वाफळेकर व संगीता काळे यांची प्रकट मुलाखत घेतली,त्यावेळी त्यांनी लावणीकलेचा वैभवशाली वारसा मांडताना बावनखणी लावणी ही महाराष्ट्राची शान आहे असे सांगितले.

वैशाली वाफळेकर या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ वाफळे गावच्या.मुंबईत झालेल्या राज्य सरकारच्या लावणी मोहोत्सवात त्यांनी पारितोषक मिळवले होते.अकलूज येथे झालेल्या सहकार महर्षी शंकरराव महिते पाटील लावणी मोहत्सवात प्रथम क्रमांक मिळविला.दिलखेचक अदा,खुलणाऱ्या अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली.वाफळेकर यांनी त्यांच्या लावणी कलेच्या प्रवासाविषयी सांगताना लावणीने जीवन समृद्ध केले.सुरेखा पुणेकर यांच्या लावण्यामुळे महिलांचा सहभाग लावणीच्या कार्यक्रमात वाढला.लावणीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अलीकडे वैशाली जाधव, रेश्मा परितेकर, मोहिनी नगरकर, राजश्री नगरकर, अप्सरा जळगावकर, सारिका नगरकर, प्रमिला लदगेकर, वैशाली मनेगावकर अशा अनेक कलावंतानी प्रयत्न केले.

लावणी जशी शृंगाररसाने सजली आहे,तशी ती वीर,करुण, प्रेमरसाने भारावलेली आहे.

माझ्या कातड्याचा जोडा शिवावा,
तुमच्या पायात हवा.
कसं गाऊ मी तुमचे गुण,
किती तुमचे माझ्यावर रुण.

अशा दिलखेचक अदांनी लावणीचा चौक सादर करीत वैशाली वाफळेकर यांनी रसिकांची मने जिंकून घेतली.

आमदार नवरा नको ग मला
त्याला दौरे करायची सवय गं

भलत्याच वेळी उठल गं आणि उद्घाटन करीत बसलं गं !

अशा कोपरखिळ्या मारणा-या लावणीने रसिकांना हसवले.विडंबनपर लावणी वैशाली व संगिता काळे यांनी सादर करताना रसिकांना मनमुराद हसवले.संगीता काळे यांनी लावणी कलेचा प्रवास मांडताना जगलेल्या वेदना कशा डसत होत्या हे सांगितले.काशीचा बामन लावणी सादर करुन अभिनयाची ताकद दाखवली.भीमथडी मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदाच लावणी कलावंताना संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डाँ.अशोक जाधव, रेणुका कलाकेंद्राच्या संचालिका रेखा काळे, सुरेखा नेर्लेकर, बाळासाहेब काळे यांनी समाधान व्यक्त केले. मुलाखत प्रसंगी कथाकार अरुण गिरी,दिपक पवार संजय सनवणे उपस्थित होते.

लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली

मुंबई, : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. लोकेश चंद्र (भाप्रसे) यांनी शुक्रवारी (दि. २) पदाची सूत्रे स्वीकारली आहे. याआधी ते मुंबई ‘बेस्ट’ उपक्रमाचे  महाव्यवस्थापक पदी कार्यरत होते.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र हे १९९३ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी (दिल्ली) मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी  आणि एमटेक (स्ट्रक्चर्स) पदवी प्राप्त केली आहे.

श्री. चंद्र यांनी यापूर्वी सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,  नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. तसेच नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि नागपूर सुधार प्रन्यासचे  अध्यक्ष म्हणून श्री. चंद्रा कार्यरत होते. सन २००८  ते २०१५  या कालावधीत ते केंद्र शासनाच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर होते. या काळात श्री. चंद्र यांनी पोलाद मंत्रालयाचे सहसचिव व ऊर्जा मंत्रालयाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.

पंतप्रधान म्हणाले- अपघात विचलित करणारा, दोषींना सोडले जाणार नाही

बालासोर

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घटनेत जे दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. यावेळी पीएम मोदीदेखील खूप उदास दिसत होते. या रेल्वे अपघातात आतापर्यंत 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत.

सरकारी डीडी न्यूज या माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, ‘हा एक अतिशय वेदनादायक आणि अस्वस्थ करणारा अपघात आहे, हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, देव सर्वांना बळ देवो जेणेकरून ते दुःखाच्या वेळी मात करू शकतील.’

पीएम म्हणाले, ‘या दु:खाच्या वेळी सरकार मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहे.’ या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, रेल्वेने बचाव कार्य आणि रेल्वे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आम्ही आमच्या व्यवस्थेला अधिक प्राधान्य देऊन पुढे जाऊ.

तत्पूर्वी, अपघाताच्या ठिकाणी पीएम मोदींनी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि यावेळी त्यांनी एकजुटीने काम करण्यास सांगितले. घटनास्थळावरून पीएम मोदी मोबाइल फोनवर बोलताना दिसले, पंतप्रधानांनी थेट कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी फोनवर चर्चा केली. लोकांना चांगली सुविधा मिळावी, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले. अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला असून, त्यात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड समोर आला आहे.

250 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

या अपघातात 250 हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर सुमारे 1000 लोक जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, सिग्नलच्या समस्येमुळे कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली आणि मालगाडीला धडकली तेव्हा मालगाडी लूप लाइनवर उभी होती.

या भीषण धडकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्यामध्ये अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड उघड झाला आहे.

शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या( एसजीपीसी) वरिष्ठ शिष्टमंडळाने केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची घेतली भेट

नवी दिल्ली-

शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या (एसजीपीसी) वरिष्ठ शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

शिष्टमंडळाने देशभरातील गुरूद्वारांचे कामकाज आणि एसपीजीसी संबंधी इतर विषयांशी संबधित मुद्यांवर निवेदन दिले. एसजीपीसी मंडळांच्या व्यवस्थापनाअंतर्गत गुरूद्वारांचा समावेश  करण्यासंबंधीच्या  मुद्याचाही समावेश होता. यामुळे देशभरातील गुरूद्वारांचे व्यवस्थापन सुरळीत चालवता येईल, अशी शिष्टमंडळाची भावना होती. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी नेत्यांना सर्व प्रकारचे  समर्थन  आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

देशातील 88 टक्के कामगारांचे वेतन मे 2023  पर्यंत  आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम(एबीपीएस) द्वारे करण्यात आले

बँक खात्याच्या क्रमांकात लाभार्थीने केलेल्या वारंवार बदलामुळे, तसेच संबंधिक कार्यक्रम अधिकाऱ्याने नवीन खाते क्रमांक अद्ययावत केला नसल्याने, लाभार्थीने नवीन  खाते क्रमांक वेळेवर दिला नसल्याने संबंधित बँक शाखेक़डून अनेक वेतनाचे देयक व्यवहार नाकारले जात आहेत, असे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

विविध भागधारकांशी केलेल्या सल्लामसलतीनंतर, असे नाकारण्याचे प्रकार टाळण्यासाठी; थेट लाभार्थी हस्तांतरणच्या माध्यमातून वेतन देण्यासाठी एबीपीएस हा सर्वोत्कृष्ट मार्ग  आहे असे आढळले आहे. त्यामुळे लाभार्थींना आपले वेतन वेळेवर मिळण्यासाठी सहाय्य होणार आहे.

योजनेच्या डेटाबेसमध्ये एकदा आधार क्रमांक अद्यय़ावत केल्यानंतर, स्थळ बदलल्यामुळे किंवा बँक खात्यातील बदलामुळे लाभार्थीला आपला खाते क्रमांक वारंवार अद्ययावत करण्याची आवश्यकता नाही. ज्या आधार क्रमांकाशी खाते क्रमांक जोडला गेला आहे, त्या खाते क्रमांकात रक्कम थेट जमा केली जाईल. लाभार्थींचे एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर, जे मनरेगाच्या संदर्भात असे क्वचितच आढळले जाते, लाभार्थीला आपले बँक खाते निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

जेथे आधार क्रमांक डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरणशी संलग्न आहे, तेथे यशस्वीतेची टक्केवारी 99.55 टक्के अशी उच्च आहे, असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आकडेवारी सांगते. जेथे खात्याशी  आधारित देय व्यवहार केले जातात , तिथे यशाचे प्रमाण 98 टक्के आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत, 2017 पासून एबीपीएस प्रणाली  उपयोगात आणली जात आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला सार्वत्रिक आधार क्रमांकाची उपलब्ध केल्यानंतर, आता भारत सरकारने योजनेंतर्गत लाभार्थींना एबीपीएस पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जी खाती एबीपीएसशी संलग्न आहेत, त्यांना एबीपीएसच्या माध्यमातून वेतन जमा केले जाईल, ज्याचा अर्थ वेतन जमा करण्याची हा सर्वात सुरक्षित आणि जलद मार्ग आहे.

14.28 कोटी सक्रीय लाभार्थींपैकी, 13.75 कोटी लाभार्थ्यांचे आधार संलग्नीकरण  झाले आहे. य़ातील  12.17 कोटी आधार संलग्नीकरण  हे अधिकृत ठरले आहेत.  यातील  77.81 टक्के लाभार्थी एबीपीएससाठी अगोदरच पात्र ठरले आहेत. मे 2023 महिन्यात, योजनेचे  88 टक्के वेतन हे एबीपीएसच्या माध्यमातून वितरीत  केले गेले आहे.

य़ूआयडीएएलच्या आकडेवारीनुसार, देशातील 98 टक्क्यांहून अधिक  प्रौढ व्यक्तींकडे  आधार क्रमांक आहे. एखाद्या व्यक्तीला आधार क्रमांक हवा असेल तर तो किंवा ती संबंधित सक्षम एजन्सीकडे जाऊन किंवा जवळच्य आधार केंद्राला भेट देऊन मिळवू शकते.

100 टक्के एबीपीएस पद्धती लागू करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील सर्व  राज्यांना शिबीरे आयोजित करण्याची तसेच लाभार्थींचा पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

जो लाभार्थी काम मागण्यासाठी येईल त्याला आधार क्रमांक पुरवण्याची विनंती करण्यात यावी पण तो नसला तर त्या आधारावर त्याला काम नाकारले जाऊ नये, असे सर्व राज्यांना मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

जर एखादा लाभार्थी कामाची मागणी करत नसेल तर त्या प्रकरणात एबीपीएससाठी त्याच्या किवा तिच्या पात्रतेच्या असलेल्या दर्जाचा परिणाम कामाच्या मागणीवर होणार नाही.

कामगार एबीपीएससाठी पात्र नाही, या कारणामुळे  जॉब कार्ड रद्द केले जाणार नाहीत. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही मागणी चालित योजना असून विविध आर्थिक घटकांचा तिच्यावर परिणाम होत असतो.

दसऱ्यापूर्वी कोल्हापूर एअरपोर्ट होण्यासाठी कामे गतीने पूर्ण करा -केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती देणारी विमानतळ टर्मिनल इमारत व्हावी

 कोल्हापूर, दि.3 : कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीची बांधणी करा, अशी अपेक्षा व्यक्त करुन येत्या दसऱ्यापूर्वी इमारतीचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने जलदगतीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केल्या.

 कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या कामाची पाहणी आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, माजी आमदार अमल महाडिक व सुरेश हळवणकर, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक रमेश कुमार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रोजेक्ट प्रमुख प्रशांत वैद्य, समरजीतसिंह घाटगे, महेश जाधव, सत्यजित कदम, चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. सिंधिया म्हणाले, विमानतळ टर्मिनल इमारतीचे प्रवेशद्वार हे दगडी बांधकामातून करा, येथील कामानींवर मशालीच्या प्रतिकृती ठेवा, ज्यामधून कोल्हापूरचा समृद्ध ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित होईल. इमारतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, प्रसिद्ध वस्तू, उत्पादने, कला, संस्कृती, उद्योग यांची छायाचित्रे, व्हिडीओ वॉल आदी बाबींचा समावेश याठिकाणी करा, अशा सूचना केल्या.

प्रवेशद्वाराजवळ विस्तीर्ण बगीचा तयार करुन यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा आकर्षक पुतळा बसवावा. या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. भविष्यात कोल्हापूर विमानतळावरुन अधिकाधिक विमान सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून  आतापर्यंत झालेल्या कामाचे श्री. सिंधिया यांनी कौतुक केले.

विमानतळ टर्मिनल परिसरात तयार करण्यात येणारा प्रशस्त बगिचा, याठिकाणी उभारण्यात येणारा छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा, पर्यटन स्थळांवर आधारित छायाचित्रे व व्हिडीओ वॉल आदी बाबींबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी चर्चा केली.

61 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यंत सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी अनिल शिंदे यांनी दिली.

लव्ह जिहादच्या घटनांत वाढ:कायदा बनविणार -उपमुख्यमंत्री

पुणे- “राज्य सरकार लव्ह जिहाद प्रकरणावर सजग आहे. आम्ही यावर कायदा तयार करण्याचा विचार करत आहोत. आम्ही सध्या वेगवेगळ्या राज्यातील कायद्यांचा अभ्यास करत आहोत,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येथे स्पष्ट केलंआहे.

ते म्हणाले,’“दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसला पाहिजे. मात्र, सध्या महिलांची दिशाभूल करून, खोटी आश्वासनं देऊन लग्नं केली जात आहेत. ज्या लोकांचं आधीच लग्न झालं आहे ते वेगळी ओळख सांगून महिलांना फसवत आहेत. त्यावरून लव्ह जिहादच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत,

बेपत्ता महिला आणि लव्ह जिहादच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बेपत्ता महिलांच्या तक्रारींवर आम्ही खूप संवेदनशील आहोत. आकडे पाहिले तर बेपत्ता महिलांच्या प्रकरणात या महिलांचा शोध घेण्याचं प्रमाण ९० टक्के आहे. काही ठिकाणी तर हे प्रमाण ९५ टक्के आहे. असं असलं तरी यात अधिक जास्त लक्ष देण्याची गरज आहे.”

सूर्यकांत तिवडे यांची राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदावर नियुक्ती

पुणे -शहरातील फुले शाहू आंबेडकर विचार चळवळीतील कार्यकर्ते ,निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक ज्येष्ठ रंगकर्मी सूर्यकांत तिवडे स यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली हे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या हस्ते देऊन त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला. याप्रसंगी पुणे शहर सांस्कृतिक अध्यक्ष राजेंद्र आलमखाने कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश नलावडे , शहर पदाधिकारीमदन कोठुळे आणि इतर कलावंत पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा ‘अभिमान पदयात्रे’मध्ये सहभाग

पुणे, दि.३: दरवर्षी जगभरात जून महिन्यात ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या अभिमान पदयात्रा (प्राइड परेड्स) आयोजित केल्या जातात. यंदा पुण्यातील ‘युतक’ या संस्थेच्या अभिमान पदयात्रेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे सहभागी होत आहे.

निवडणूक यंत्रणा अभिमान पदयात्रेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही पदयात्रा ४ जून रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान संभाजीराजे उद्यान – डेक्कन बस स्थानक, गूड लक चौक – एफसी गेट – शिरोळे रोड – संभाजीराजे उद्यान या मार्गावर आयोजित केली जाणार आहे.

जून १९६९ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) समुदायातील लोकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. तेव्हापासून जून महिना हा या समुदायासाठी ‘प्राइड मंथ’ म्हणून ओळखला जातो. या महिन्यात ‘एलजीबीटीआयक्यू+’ समुदाय आपल्या विविध रंगांच्या रंगीबेरंगी झेंड्यासह ठिकठिकाणी पदयात्रा काढतात.

पुण्यातील या अभिमान पदयात्रेत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, ‘युतक’चे संस्थापक अनिल उकरंडे आणि ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदाय हे सहभागी होणार आहेत. तसेच २ जून ते ३ जून या कालावधीत मांगल्य कार्यालय, दगडूशेठ दत्त मंदिर येथे तृतीयपंथी समुदायासाठी मतदार नोंदणीचे शिबिरही आयोजित करण्यात आले आहे.

तृतीयपंथी समुदाय आणि एकूणच एलजीबीटीक्यूआयए+ समुदाय यांना मुख्य प्रवाहातील समाजाची स्वीकारर्हता मिळण्यासाठी सर्वसामान्य पुणेकरांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

पुण्यात लावलेले महिला खेळाडूंवरील अत्याचार विरोधातील फलक काढले ,पुन्हा लावाल तर खबरदार म्हणाले …

भाजपाच्या तालावर महापालिका अन पोलीस देखील …? कॉंग्रेसचा सवाल

भाजपची हुकुमशाही गल्लीपर्यंत पोहोचू देऊ नका : कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आवाहन ..

पुणे- दिल्लीतील आंदोलन मोडून काढल्यानंतर , गंगेच्या तीरावर देखील विरोध झालेल्या महिला कुस्तीगीर आंदोलकांना पाठींबा देणारे फलक लावणे देखील आता पुण्यात गुन्हा ठरणार आहे. पुण्यातील भाजपच्या तालावर महापालिका तर महापालिका पण पोलीस देखील चालू लागल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचे झाले असे कॉंग्रेसच्या संजय बालगुडे यांनी सांगितले कि,’ऑलम्पिक पदक विजेत्या महिला खेळाडूंना होणाऱ्या अत्याचार विरोधात त्यांना पाठिंबा देणारा फ्लेक्स पुण्यामध्ये घोरपडे पेठ खडकमाळ येथे लावण्यात आला होता गेली महिनाभर हा फ्लेक्स लावण्यात आला होता परंतु आज अचानक सायंकाळी सहा पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पोलीस व “पुणे महानगरपालिका प्रशासन यांनी आम्हाला दूरध्वनीद्वारे असं सांगण्यात आले की या बोर्डामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे हा बोर्ड ताबडतोब काढण्यात यावा”पोलीस अधिकारी व काही कर्मचारी सायंकाळी सात पासून ते रात्री बारापर्यंत या बोर्डापाशी काढण्यासाठी स्वतः उभे होते पुणे मनपाचे कर्मचारी व अधिकारी लांडगे हे घरी गेलेले असताना सुद्धा त्यांना फोन द्वारे कळविण्यात आले व त्यांनी आता आपली मुलाखत देताना सुद्धा सांगितले की पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले सामाजिक सलोखा बिघडत आहे त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथून ताबडतोब खडक माळी घोरपडे पेठ या ठिकाणी यावं व महिला कुस्तीपटूंना पाठिंबा दिलेला बोर्ड त्वरित काढण्यात यावा.आणि अखेरीस तो काढून टाकण्यात आला.


वडाची पाने व पारंब्यांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर 

वटपौर्णिमा – शास्त्रीय मीमांसा अनोखा उपक्रम ; श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन
पुणे : वडाची पाने, पारंब्या, विविधरंगी फुलांनी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. वडाचे छोटे रोप मंदिराच्या सभामंडपात ठेवण्यात आले, तसेच पारंपरिक पद्धतीने वडाचे पूजन देखील झाले. केवळ झाडाचे पूजन न करता, वडाचे व वटपौर्णिमेचे महत्व हे शास्त्रीय मीमांसा या कार्यक्रमाद्वारे यावेळी उलगडण्यात आले. 
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे वटपौर्णिमेनिमित्त मंदिरात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वटपौर्णिमा – शास्त्रीय मीमांसा या उपक्रमांतर्गत या सणाचे शास्त्रीय दृष्ट्या महत्व भाविकांना सांगण्यासोबतच जनजागृतीपर फलक देखील लावण्यात आले. 
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्या अ‍ॅड.ईशानी जोशी, भाग्यश्री मंठाळकर, डॉ.अंजली काळकर, ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार आदी उपस्थित होते. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बापूसाहेब कुतवळ, उज्वला कुतवळ, गौरव कुतवळ, प्रियांका कुतवळ, मीरा कुतवळ यांच्या हस्ते दत्तयाग झाला. 
अ‍ॅड.ईशानी जोशी म्हणाल्या, सर्वात दाट सावली वडाची असते. वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. त्यामुळे याविषयीची केवळ परंपरा व संस्कृती ही नव्या पिढीपर्यंत न पोहोचविता त्याबद्दलची शास्त्रीय मीमांसा देखील पोहोचणे गरजेचे आहे. 
भाग्यश्री मंठाळकर म्हणाल्या, वडाची सावली अत्यंत गुणकारी आहे.र्वाधिक आॅक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणून वडाची ख्याती आहे. त्यामुळे वडाच्या वृक्षाचा सामाजिक संदर्भ देखील लोकांपर्यंत पोहोचायला हवा. मंदिरात एकत्र येऊन वडाचे पूजन व महत्व जाणून घेण्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले. 
युवराज गाडवे म्हणाले, धार्मिक उपक्रमामागील प्राचीन काळापासून प्रगत शास्त्रीय मीमांसा भाविकांसमोर मांडण्याचा ट्रस्टचा उद्देश आहे. जेणेकरून नवीन पिढीला त्यामध्ये रूची वाढेल. डॉ.अंजली काळकर, अ‍ॅड.रजनी उकरंडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

पुण्यात शिंदे गटाचे राऊतांविरोधात आंदोलन

पुणे-खासदार श्रीकांत शिंदे व आमदार संजय शिरसाठ यांचे नाव घेत खासदार संजय राऊत हे प्रसारमाध्यमा- समोर थुंकले. याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर शिवसेना, युवासेनेच्या वतीने पुण्यातील डेक्कन येथील गुडलक चाैकात ‘जाेडाे माराे’ आंदाेलन करण्या आले.यावेळी राऊत यांच्या निषेधार्थ जाेरदार घाेषणाबाजी शिवसैनिकांनी करत महिलांनी चपलेने राऊत यांचे फाेटाेस जाेडे मारले. संजय राऊत यांची मानसिक स्थिती खालवल्याने त्यांचे नाव पुण्यातील येरवडा मनाेरुग्णालयात लवकरच दाखल करणार असल्याची भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली.

पुणे शिवसेनेचे अध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले,खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर पुणे शहर शिवसेना,युवासेना आक्रमक झाली असून,संजय राऊतला काहीच दिवसात वेड्याच्या इस्पितळात भरती करणार असून,पुणे शहर शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या वतीने आज गुडलक चौक येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले, यावेळी किरण साळी म्हणाले की ज्याप्रमाणे ते माईकवर थुंकलेत येणाऱ्या निवडणुकीत मतदार मतपेटीतून संजय राऊतच्या तोंडावर थुंकतील तसेच सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले म्हणाले कोणतेही काम नसलेल्या संजय राऊत यांच डोकं ठिकाणावर नसून माध्यमांनी त्यांना महत्त्व देऊ नये प्रत्येक वेळेस बेताल वक्तव्य करून ते महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरतात, आता हे सहन केल्या जाणार नाही,यावेळी पुणे शहर सह संपर्कप्रमुख अजय बापू भोसले,युवासेना राज्यसचिव किरण साळी, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे,युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझीरे,शहर संघटक श्रीकांत पुजारी,महिला आघाडी अध्यक्षा लीनाताई पानसरे,महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर,युवासेनेचे आकाश शिंदे,उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,संजय डोंगरे, विकास भांबुरे,राजाभाऊ भिलारे,सचिन थोरात,नितीन लगस, गौरव साइनकर,महिला संघटिका श्रद्धा शिंदे,चैत्राली गुरव व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.