भीमथडी मराठी साहित्य संमेलनात दशरथ यादव यांनी घेतली प्रकट मुलाखत
दौंड : लावणीकला महाराष्ट्राचे वैभव असून,जगाच्या बाजारात लावणीकलेला महत्वाचे स्थान आहे.मात्र लावणीला बदनाम करणारे चोरून लावणीला दाद देतात.असे परखड मत सुप्रसिद्ध लावणी कलावंत वैशाली वाफळेकर यांनी व्यक्त केले.चौफुला येथे राज्यस्तरीय दुसरे भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.लावणी व तमाशाचे बदलते स्वरुप या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी वैशाली वाफळेकर व संगीता काळे यांची प्रकट मुलाखत घेतली,त्यावेळी त्यांनी लावणीकलेचा वैभवशाली वारसा मांडताना बावनखणी लावणी ही महाराष्ट्राची शान आहे असे सांगितले.
वैशाली वाफळेकर या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ वाफळे गावच्या.मुंबईत झालेल्या राज्य सरकारच्या लावणी मोहोत्सवात त्यांनी पारितोषक मिळवले होते.अकलूज येथे झालेल्या सहकार महर्षी शंकरराव महिते पाटील लावणी मोहत्सवात प्रथम क्रमांक मिळविला.दिलखेचक अदा,खुलणाऱ्या अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली.वाफळेकर यांनी त्यांच्या लावणी कलेच्या प्रवासाविषयी सांगताना लावणीने जीवन समृद्ध केले.सुरेखा पुणेकर यांच्या लावण्यामुळे महिलांचा सहभाग लावणीच्या कार्यक्रमात वाढला.लावणीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अलीकडे वैशाली जाधव, रेश्मा परितेकर, मोहिनी नगरकर, राजश्री नगरकर, अप्सरा जळगावकर, सारिका नगरकर, प्रमिला लदगेकर, वैशाली मनेगावकर अशा अनेक कलावंतानी प्रयत्न केले.
लावणी जशी शृंगाररसाने सजली आहे,तशी ती वीर,करुण, प्रेमरसाने भारावलेली आहे.
माझ्या कातड्याचा जोडा शिवावा,
तुमच्या पायात हवा.
कसं गाऊ मी तुमचे गुण,
किती तुमचे माझ्यावर रुण.
अशा दिलखेचक अदांनी लावणीचा चौक सादर करीत वैशाली वाफळेकर यांनी रसिकांची मने जिंकून घेतली.
आमदार नवरा नको ग मला
त्याला दौरे करायची सवय गं
भलत्याच वेळी उठल गं आणि उद्घाटन करीत बसलं गं !
अशा कोपरखिळ्या मारणा-या लावणीने रसिकांना हसवले.विडंबनपर लावणी वैशाली व संगिता काळे यांनी सादर करताना रसिकांना मनमुराद हसवले.संगीता काळे यांनी लावणी कलेचा प्रवास मांडताना जगलेल्या वेदना कशा डसत होत्या हे सांगितले.काशीचा बामन लावणी सादर करुन अभिनयाची ताकद दाखवली.भीमथडी मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदाच लावणी कलावंताना संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डाँ.अशोक जाधव, रेणुका कलाकेंद्राच्या संचालिका रेखा काळे, सुरेखा नेर्लेकर, बाळासाहेब काळे यांनी समाधान व्यक्त केले. मुलाखत प्रसंगी कथाकार अरुण गिरी,दिपक पवार संजय सनवणे उपस्थित होते.