Home Blog Page 1513

जी 20 परिषदेनिमित्त पुणे ते पंढरपूर सायकल रॅलीचा शुभारंभ

पुणे, 2 जून 2023

यंदा पुणे शहरामध्ये जी 20 परिषदेनिमित्त विविध देशांचे पाहुणे येणार आहेत त्या दृष्टिकोनातून पुणे महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यकरणाचे विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. या परिषदेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा आज महापालिका भवना पासून शुभारंभ झाला .पुणे ते पंढरपूर या सुमारे 250 किलोमिटर मार्गावर ही रॅली प्रवास करणार असून जी 20 परिषदे बरोबरच पर्यावरण विषयक जन जागृती करणार आहे . मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण देखील केले जाणार आहे.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.यावेळी  विविध मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांसह विविध स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत .

पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार

पुणे, दि. २: सार्वजनिक प्रशासनात नवकल्पनांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने मानाच्या स्वर्गीय एस. एस. गडकरी पुरस्कारासाठी पुणे जिल्हा परिषदेची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कठोर परिश्रमाचा हा सन्मान आहे, अशी भावना प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे सार्वजनिक सेवा प्रशासनात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. याअंतर्गत सूक्ष्म आणि सर्वसमावेशक मूल्यमापन प्रक्रियेद्वारे जिल्हा परिषदेने सर्व विभागांमधील १ हजार १८३ कार्य प्रक्रिया निश्चित केल्या. आवश्यक संकलित माहिती (डेटा), निर्णय घेण्याची आवश्यकता आणि अंमलबजावणी प्रक्रिया विचारात घेऊन प्रत्येक प्रक्रियेचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यात आले.

संबंधित कायदे, नियम, शासकीय ठराव, न्यायालयाचे आदेश, वरिष्ठ कार्यालयांचे स्थायी आदेश आणि निश्चित पद्धती यांचा विस्तृत संशोधनाद्वारे अभ्यास करण्यात आला. २५ जानेवारी २०२२ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार हे निष्कर्ष सुसंगत प्रक्रिया तयार करण्यासाठी सात प्रकारांमध्ये वर्गीकरण आणि सेवा हक्क कायद्याअंतर्गत अधिसूचित करण्यात आले.

या प्रक्रियेअंतर्गत जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अनेक अधिकार प्रदान केले. सुमारे सात महिने चाललेल्या या प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभागी झाले. विस्तृत संशोधन आणि विकास प्रक्रियेद्वारे सर्वांच्या भूमिकांबद्दल अधिक माहितीपूर्ण दृष्टीकोन निश्चित करून सर्वांना प्रशिक्षण दिले. या सर्वांनी क्षमता वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या प्रक्रियांचे संकलन नियमावलीत करण्यात आले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, कमलाकर रणदिवे आणि राहुल काळभोर यांनी जिल्हा परिषदेत हा अभिनव उपक्रम राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जिल्हा परिषदेने महाराष्ट्र ज्ञान महामंडळासह (एमकेसीएल) ‘महालाभार्थी’ या नावाने सहयोगी प्रकल्प राबविण्याची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा उपक्रम दोन टप्प्यात राबविण्यात आला, पहिला टप्पा जुन्नर आणि आंबेगाव येथे आदिवासी समुदायांमध्ये प्रकल्प राबविण्यात आला. आंतरजालावरील सर्च इंजिनच्या वापराद्वारे, नागरिकांनी सादर केलेल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे योजनांची यादी तयार केली गेली. या प्रकल्पाने जनतेत जागरुकता वाढवली आणि मोठ्या संख्येने नागरिकांना विविध योजनांपर्यंत पोहोचण्यास सक्षम केले.

पुणे जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात, नागरीक आणि कुटुंबांना पुणे जिल्हा परिषदेद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांमध्ये सहज प्रवेश मिळवून देणारा ‘सिंगल मास्टर फॉर्म’ विकसित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण ‘फॅमिली फोल्डर’ संकल्पना तयार करण्यात आली. या वैशिष्ट्यपूर्ण प्रणालीद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासह अर्जांवर प्रक्रियादेखील सोपी झाली. ‘केस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’च्या अंमलबजावणीमुळे नागरिकांना सुलभ हाताळणी, कमी वेळेत लाभ आणि नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळाले. परिणामी, पुणे जिल्हा परिषद १५ दिवसांच्या उल्लेखनीय कालावधीत मोठ्या संख्येने अर्जांवर प्रक्रिया करण्यात सक्षम झाली आहे. याचा सुमारे एक लाख लोकांना फायदा झाला आहे.

एमकेसीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, व्यवसाय विकास व्यवस्थापक विनायक कदम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेचे मानद अध्यक्ष आणि माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी हा पुरस्कार जाहीर करून पुणे जिल्हा परिषदेच्या या कामगिरीचा गौरव केला आहे.

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंती निमित्त ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन  चित्रप्रदर्शन सुरू

पुणे : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची यंदा 133 वी जयंती आहे. या निमित्ताने कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023” या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन  येथे बाबूराव पेंटर यांच्या कन्या विजायमाला बाबूराव पेंटर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. 

याप्रसंगी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची सून अनुराधा अरविंद मेस्त्री , नातू अर्जून अरविंद मेस्त्री, नात प्रिया रणजीत बॅनर्जी, चित्रप्रदर्शन स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर ( मुंबई), संजय शेलार ( कोल्हापूर) आदी उपस्थित होते.

या ‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’ मध्ये शनिवार (दि. 3 जून ) सकाळी 9 वा. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा 133 वा जयंती सोहळा व स्पर्धेचा  पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.  या आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन मध्ये संपूर्ण भारतातून 500 हुन अधिक व्यावसायिक कलाकार व कला शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले असून हे  प्रदर्शन 4 जून पर्यंत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन येथे सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत नागरिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.

सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये यकृत आणि मूत्रपिंडाचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण

पुणे०२ जून २०२३: पश्चिम भारतातील रुग्णालयांची सर्वात मोठी शृंखला असलेल्या सह्याद्रि हॉस्पिटल्सने डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण करून आणखी एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते आणि सिनियर कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. अतुल सजगुरे यांच्या नेतृत्वाखालील या अवयवदानाद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तज्ञ वैद्यकीय पथकांनी केल्या.

यकृत प्रत्यारोपणात ५७ वर्षीय प्राप्तकर्त्याचा समावेश होताजो लिव्हर सिरोसिसने ग्रस्त होता. तर सबड्युरल हिमॅटोमामुळे दुर्दैवाने ब्रेन डेथ (Brain Deathझालेला एक ४९ वर्षीय मृत हा अवयव दाता होता. मात्र ही एक अतिशय आव्हानात्मक अशी शस्त्रक्रिया ठरली कारण एक धातूचा स्टेंट यकृताच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये होता आणि थेट हृदयापर्यंत पोहोचला होता. डॉ. बिपिन विभूते यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने १० तासांच्या शस्त्रक्रियेत या आव्हानांवर यशस्वीपणे मात केली. कोणत्याही संभाव्य रक्तस्त्राव समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सुयोग्य पोस्ट-ऑपरेटिव्ह काळजी घेण्यासाठी अवयव प्राप्तकर्ता हा सध्या निरीक्षणाखाली आहे.

अवयवदानाच्या निःस्वार्थी कृत्यामुळे असंख्य जीवनात आशा निर्माण झाली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणातगेल्या ५ वर्षांपासून डायलिसीस घेत असलेल्या ५७ वर्षीय प्राप्तकर्त्याला एक नवे आयुष्य मिळाले आहे. डॉ. अतुल सजगुरे आणि त्यांच्या टीमने मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. प्राप्तकर्ता आता दर तासाला 800-900 मिली लघवी पास करून मूत्रपिंडाच्या कार्याची सकारात्मक चिन्हे दर्शवित आहे. प्राप्तकर्त्याच्या आरोग्यातील ही लक्षणीय सुधारणा अवयवदानाचे महत्त्व आणि मूत्रपिंड च्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी त्याचा काय परिणाम होऊ शकतो यावर प्रकाश टाकते.

यकृत प्रत्यारोपणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सह्याद्रि रुग्णालयातील यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभुते यांनी यशस्वी प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “आमचे प्राथमिक लक्ष हे कायमच आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी देण्यावर असते. आजच्या या यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने एक अनोखे आव्हान सादर केलेज्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि अंमलबजावणीची आवश्यकता होती. १० तासां इतका विस्तृत कालावधी लागणाऱ्या बहु-अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यात गुंतलेली जटिलता आणि अचूकता अधोरेखित करतात. या शस्त्रक्रिया करताना आमच्या टीमने दाखवलेले अपवादात्मक वैद्यकीय कौशल्य आणि अतूट समर्पण याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी ते फार महत्त्वपूर्ण असते.” 

सह्याद्रि हॉस्पिटल्सचे सिनियर कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. अतुल सजगुरेज्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे नेतृत्व केलेत्यांनी अवयव दानाची अत्यंत महत्त्वाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “हे मूत्रपिंड प्रत्यारोपण केवळ प्राप्तकर्त्याला दुसरी संधीच देत नाही तर जगभरात अवयव दान करण्याच्या गरजेचे महत्व सांगते. जनजागृती करणे आणि अधिकाधिक व्यक्तींना अवयव दाता होण्यासाठी प्रोत्साहित करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ऐच्छिक अवयव दान करण्याच्या फॉर्मवर स्वाक्षरी करूनआपण खूप मोठा बदल घडवू शकतो आणि असंख्य जीव वाचवू शकतो.”

सह्याद्रि हॉस्पिटल हे उत्तम नगरशिवणेपुणे येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय उदार अवयवदात्याचे आभार मानते. त्यांच्या निःस्वार्थ कृत्याने प्राप्तकर्त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी अनुकूल बदल झाला आहे. या अवयवदात्याचे एक मूत्रपिंड आणि यकृत सह्याद्रि रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आलेतर दुसरे मूत्रपिंड शहरातील दुसऱ्या एका रुग्णालयात पाठवण्यात आले.

सह्याद्रि हॉस्पिटल अपवादात्मक वैद्यकीय सेवा देण्यासाठीअवयवदानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपचारांद्वारे रुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्यासाठी नेहमीच वचनबद्ध राहील.

अवयव दाता डॉ वैशाली पाठक, फिझिशियन इंटर्नल मेडिसीन यांच्या अंतर्गत उपचार घेत होते. प्रत्यारोपणाच्या टीममध्ये ट्रान्सप्लांट सर्जन – यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभुते, डॉ. शीतल महाजनी, डॉ. अपूर्वा देशपांडे, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अभिजित माने, वरिष्ठ कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि प्रत्यारोपण फिजिशियन डॉ. अतुल सजगुरे, डॉ. केतन पै, डॉ. संजय कोलते, प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ- डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत आणि डॉ. बालाजी मोमाले यांचा समावेश होता. तर प्रत्यारोपण समन्वयक- म्हणून राहुल तांबे, अरुण अशोकन आणि अमन बेले, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते- शर्मिला पाध्ये आणि अजिंक्य बोराटे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

‘पीटी ३’ फॉर्म’ ची सक्ती हवीच कशाला ? जनतेला त्रस्त करण्याचे हे उद्योग…निवडणुकीत परिणाम करतील

पुणे : मिळकतकरातील चाळीस टक्के सवलत कायम ठेवण्याच्या निर्णय झाल्यानंतरही बिलात थकबाकी दाखविण्यात आली असल्याने काही मिळकतधारक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने बिलात २०१९ पासूनची थकबाकी दर्शविल्याने हे नागरिक चिंतेत पडले आहेत. दरम्यान, सध्या फक्त चालू आर्थिक वर्षाचा मिळकतकरच भरायचा असून, ‘पीटी ३’ अर्ज भरून दिल्यास ही थकबाकी माफ होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मात्र हे उद्योग हवेतच कशाला सरसकट सवलत रकम वजा करून बिले पाठवा , जनतेला त्रस्त करणारे हे उद्योग येत्या निवडणुकीत परिणाम निश्चित करतील असे चित्र आहे.महापालिकेतर्फे पुणेकरांना त्यांच्या निवासी मिळकतीसाठी १९७०पासून मिळकतकरातील सर्वसाधारण करात ४० टक्के सवलत दिली जात होती. मात्र, त्यावर महालेखापालांनी आक्षेप घेतल्यानंतर २०१८पासून ही सवलत रद्द करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने २०१९पासून नवीन कर आकारणी केलेल्या मिळकतींची ४० टक्के सवलत काढून घेतली. ‘जीआयएस मॅपिंग सर्व्हे’मध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे आढळलेल्या मिळकतींचीही सवलत काढून घेतली. अशा साधारण एक लाख ६५ हजार मिळकतधारकांसाठी ही सवलत रद्द करण्यात आली. यावर मोठा जनक्षोभ उसळल्यानंतर राज्य सरकारने ही सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला.२०१९पासून ४० टक्के सवलत रद्द झालेल्या मिळकतधारकांनी ‘पीटी ३’ फॉर्म भरून द्यायचा आहे. हे अर्ज महापालिका भवन येथील मुख्य कार्यालयात, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये; तसेच ऑनलाइन पद्धतीनेही उपलब्ध आहेत. अर्ज भरून सर्व पुराव्यांसह क्षेत्रीय कार्यालये अथवा महापालिका भवनातील मिळकतकर विभागात १५ नोव्हेंबरपर्यंत जमा करायचे आहेत. १५ नोव्हेंबरनंतर येणाऱ्या अर्जांचा सवलतीसाठी विचार होणार नाही. अर्ज मिळाल्यानंतर मिळकतींची व कागदपत्रांची कर निरीक्षकांच्या मार्फत तपासणी करण्यात येईल. खोटी माहिती दिल्यास कुठलीही करसवलत लागू होणार नाही. ‘पीटी ३’अर्ज मंजूर झाल्यास त्यापूर्वी थकबाकीपोटी भरलेली रक्कम पुढील चार वर्षांच्या मिळकतकरातून समान हप्त्यांद्वारे समायोजित केली जाईल.ज्या नागरिकांना २०१९पासून १०० टक्के मिळकतकर लागू झाला, त्यांच्या यंदाच्या बिलांमध्ये २०१९पासून ४० टक्के सवलतीची थकबाकीही दर्शविण्यात आली आहे. या बिलात चालू मागणी (२०२३-२४ साठीचा दोन्ही सहामाहींचा कर) व थकबाकी असे दोन्ही पर्याय दर्शविण्यात आले आहेत. त्यानुसार या मिळकतधारकांनी केवळ चालू मागणीचे बिल भरावे. त्याचबरोबर त्यांनी योग्य पुराव्यांसह ‘पीटी ३’ अर्जही भरून द्यायचा आहे. हा अर्ज मान्य झाल्यास त्यांच्या बिलातील थकबाकी माफ केली जाईल. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. अर्ज अमान्य झाल्यास त्यांना ही थकबाकी भरावी लागेल. असे कर आकारणी व कर संकलन उपायुक्त अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

– मिळकतीचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी करीत असल्यास सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र.
– मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, रेशनकार्ड, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड यांपैकी एक ओळखपत्र.
– शहरात अन्यत्र मिळकत असल्यास त्याच्या मिळकतकर बिलाची प्रत.
– २५ रुपये प्रक्रिया शुल्क

महत्त्वाच्या गोष्टी

– सवलत फक्त मिळकतधारकाच्या निवासी मिळकतीसाठीच.
– भाडेकरू असल्यास सवलत लागू होणार नाही.
– पूर्वीपासून ४० टक्के सवलत मिळणाऱ्यांनी ‘पीटी ३’ फॉर्म भरू नये.
– २०१८-१९ पासून नव्याने नोंदणी झालेल्या मिळकतींसाठी अर्ज भरणे आवश्यक.

राष्ट्रीय सहकार धोरणाद्वारे सहकारी बँकांना न्याय द्या !

देशाच्या बँकिंग क्षेत्रात राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका यांच्या जोडीलाच सहकारी बँकांचे योगदान खूप मोठे आहे. देशाच्या सर्व शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये सहकारी बँकांचे मोठे जाळे विणले गेलेले आहे. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगला वाटा असलेल्या या सहकारी बँकांना गेली अनेक दशके विविध अडीअडचणींना, प्रतिकूल परिस्थिती व सतत नवीन आव्हानांना  तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकारने नव्याने राष्ट्रीय सहकार धोरण करण्याचे ठरवले आहे. त्यात नागरी सहकारी बँकांच्या समोरील आव्हानांचा, अडचणींचा विचार करून त्यांना न्याय द्यावा ही काळाची गरज आहे.

भारतामध्ये सहकारी  चळवळ नवीन नाही. या सहकार चळवळीला खरे तर कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. एका अर्थाने सहकार हे मानवी जीवनाचे एक अविभाज्य अंग मानले पाहिजे. भारतामध्ये सहकारी क्षेत्राचा उदय हा अनेक दशकांपूर्वी झालेला आहे.  “विना सहकार नही उद्धार” असे अनेक वेळा म्हटले जाते.  त्याचा अनुभवही भारतीयांनी घेतलेला आहे. सहकार चळवळीमध्ये राजकारण  घुसल्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये ही चळवळ बदनाम झाली हेही मान्य करावे लागेल. त्यामुळे चांगले संस्कार असलेल्या सहकार क्षेत्राची  अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने गरज आहे. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या, गृहनिर्माण किंवा कृषी निगडित सहकारी संस्था यांचा विस्तार अगदी गावागावांमध्ये झालेला आहे.  छोट्या शेतकऱ्यांपासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन सहकाराच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याची ताकद या सहकार चळवळीमध्ये निश्चित आहे. भारतात 1904 च्या दरम्यान सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. सहकारी पतसंस्था, कृषी व अन्य पूरक क्षेत्रांमधील सहकारी संघ यांच्या माध्यमातून तळागाळातील कामगार किंवा शेतकरी यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी चळवळ म्हणून या चळवळीचा उल्लेख केला जातो. याचे संस्थात्मक स्वरूप गेल्या सहा सात  दशकात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.याच सहकारी चळवळीमध्ये नागरी व जिल्हा सहकारी  बँकांचे योगदान खूप मोठे आहे. ग्रामीण व नागरी सहकारी बँकांची आजवरची कामगिरी निश्चितच अभिमानास्पद आहे. या बँकांचा सध्या होत असलेला विस्तार, सर्वसामान्य नागरिक, ग्राहक वर्ग  यांचा त्यांच्यावर असलेला दृढ विश्वास हा राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांनाही मागे टाकेल अशा प्रकारचा होता. देशातील सहकारी क्षेत्रातील बँकांची आकडेवारी पाहिली तर हे निश्चित लक्षात येऊ शकते. आजच्या घडीला देशात ३० कोटीहून अधिक नागरिक विविध सहकारी संस्थांचे सदस्य आहेत. देशातील जवळजवळ 70 ते 75 टक्के ग्रामीण भागात सहकार क्षेत्र पसरलेले आहे.यामध्ये सहकारी पतसंस्था, कृषी पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था, अल्प मुदतीच्या तसेच दीर्घकालीन पतसंस्था,राज्य सहकारी बँका, केंद्र सहकारी संस्था व प्राथमिक कृषी पतसंस्था असा त्याचा व्यापक ढाचा अस्तित्वात आहे.

देशात जशा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खाजगी क्षेत्रातील व्यापारी बँका आहेत त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर  नागरी व जिल्हा सहकारी बँका पण अस्तित्वात आहेत.त्यांचे सर्व काम हे व्यापारी बँकांप्रमाणेच आहे परंतु त्यांचा आकार तुलनात्मकरीत्या छोटा असतो. सर्वसामान्यांकडून ठेवी घेणे, त्यांना गृह, वाहन, शैक्षणिक कर्जे, सोने तारण अशी विविध प्रकारची कर्जे देणे, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बँकिंग सोयी सुविधा पुरवणे, विमा सेवा देणे तसेच बचत  खाते,  मुदत ठेव योजना, रिकरिंग खाती अशा विविध वित्त विषयक सेवा दिल्या जातात.

आज देशातील  साधारणपणे 5 लाख 50 हजार कोटी ठेवी या सहकारी बँकांकडे आहे. त्यांच्यात सध्या प्रतिवर्षी सरासरी ५ टक्के वाढ होताना दिसत आहे. या बँकांमधील थकीत किंवा अनुत्पादित कर्जांचे आकडे लक्षात घेतले तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळजवळ दहा टक्के अनुत्पादित कर्जाचे प्रमाण आहे. अनुत्पादित कर्जाचे हेच प्रमाण सहकारी बँकांमध्ये साधारणपणे सात ते आठ टक्क्यांच्या घरात आहे. त्याचप्रमाणे बँकांमध्ये होणारे मोठे आर्थिक गैरव्यवहार याचे प्रमाण पाहिले तर ते 32 हजार कोटींच्या घरात आहे. यातील 95 टक्के वाटा राष्ट्रीयकृत बँकांचा आहे तर सहकारी क्षेत्रामध्ये जवळजवळ चार टक्के आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत. आज देशात साधारणपणे 1550 नागरी सहकारी बँका,97 हजार ग्रामीण सहकारी बँका; 351 जिल्हा मध्यवर्ती बँका व 33 राज्य सहकारी बँका असे मोठे जाळे आहे. तरीही सहकारी बँकिंग क्षेत्राला जास्त बदनाम केले जाते. या  बँकांमधील ग्राहकाभिमुख सेवा, त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे निश्चितच राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांच्या पेक्षा जास्त चांगले आहेत. मात्र केंद्र व राज्य शासनाचा त्यांना हवा तेवढा भक्कम पाठिंबा मिळत नाही.

सहकारी बँकांवर एका बाजूला प्रमुख नियंत्रक म्हणून रिझर्व बँकेचे नियंत्रण  बँकिंग नियमन कायद्यानुसार असते तर दुसरीकडे त्या राज्यातील सहकारी खात्याचेही त्यांच्यावर सहकारी संस्था कायद्याद्वारे  नियंत्रण असते. त्याचप्रमाणे ज्या सहकारी बँका अनेक राज्यात  कार्यरत आहेत त्यांच्यावर मध्यवर्ती केंद्रीय सहकारी खात्याचेही नियंत्रण असते. एकाच वेळी दुहेरी किंवा तिहेरी नियंत्रण हे सहकारी बँकांना अत्यंत जाचक आणि त्रासदायक ठरते ही वस्तुस्थिती आहे. खरंतर कोणत्याही समाजातील गोरगरीब किंवा अल्प उत्पन्न धारकांना खऱ्या अर्थाने हात देणारी किंवा सहकार्य करणारी संस्था म्हणजे सहकारी बँक होय. बाजारामध्ये छोट्या-मोठ्या व्यवसाय करणाऱ्या सर्व घटकांना सामावून घेणारी संस्था म्हणजे सहकारी बँक होय. त्यात जोडीला नोकरदार पगारदार वर्ग, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना, लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांनाही आर्थिक सहकार्य करणारी संस्था म्हणजे सहकारी बँका मोलाचे व महत्वपूर्ण काम करीत आहेत. मात्र सरकारचे जास्त संरक्षण राष्ट्रीयकृत बँकांना असते. रिझर्व बँकेचा त्यांच्यावर सतत 1 वरदहस्त असतो. मात्र सहकारी बँकांना दोघांकडून सापत्न भावाची वागणूक सातत्याने दिली जात असल्याचे आढळते. या बँकांची भांडवल पर्याप्तता (कॅपिटल अँडीक्वसी); मालमत्ता गुणवत्ता (ॲसेट क्वालिटी);व्यवस्थापन;द्रवता;पद्धती व नियंत्रण आणि उत्पन्न( अर्निग्ज) या  विविध निकषांवर मूल्यमापन केले जाते. अनेक बँकांवर व्यवस्थित नियमांनुसार  कामकाज केले नाही म्हणून सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क (सॅफ) नियंत्रणे लावण्यात आली आहेत.  त्याचप्रमाणे 40-45 नागरी सहकारी बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

गेल्या काही दशकांमध्ये अग्रगण्य सहकारी बँकांमध्मे क्षेत्रात  अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.तसेच त्यांच्या संचालक मंडळामध्येही व्यावसायिक व तज्ञ संचालकांचा समावेश, सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.मात्र छोट्या बँकांमध्ये छोट्या आकाराच्या बँकांमध्ये तंत्रज्ञानाचा  आणि तज्ञ संचालकांचा अभाव जाणवतो. केंद्र सरकारने अलीकडे सहकार क्षेत्रासाठी एक वेगळे मंत्रालय प्रथमच सुरू केले असून त्यांनी सहकार विषयक धोरण मसुदा तयार करण्याचे महत्वाचे काम हाती घेतले आहे.  या धोरणामध्ये सहकारी बँकांच्या धोरणाबाबतचा त्यांच्या अडीअडचणींची दखल घेणारा एक स्वतंत्र भाग असेल अशी अपेक्षा आहे. सहकार क्षेत्रात सरकारने येऊ नये मात्र त्यांना योग्य दिशा देण्याचे, त्यांच्यावर वाजवी नियंत्रण ठेवण्याचे काम जरूर करावे हे निश्चित .

लेखक-प्रा.नंदकुमार काकिर्डे

  • (लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)

मानवतावादी काव्य क्षितिज अधिक विस्तीर्ण व्हावे-संगीता झिंजुरके

– बंधुतादिनी पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : “काव्य, गीत आणि संगीत यांना भाषा, प्रदेश किंवा विदेशाच्या सीमा रोखू शकत नाहीत. मानवतावादी भावविश्व गुंफणारे हे साहित्य सहजपणे सर्वदूर पोहोचते. कवी, गीतकार व संगीतकार यांनी आपल्या उत्कट प्रतिभेला ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हे काव्य क्षितिज अधिकाधीक विस्तीर्ण करावे,” अशी अपेक्षा ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांनी व्यक्त केली. पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्ष स्थानावरून झिंजुरके बोलत होत्या. 
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या काव्य महोत्सवाचे उद्घाटन साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष हरिश्चंद्र गडसिंग, शिवव्याख्याते प्रदिप कदम, डॉ. अशोककुमार पगारिया, प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण उपस्थित होते. यावेळी पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवराज चोले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार’, तर काव्य निर्मितीसाठी ज्ञानेश सुर्यवंशी, नंदा कोकाटे, वीणा व्होरा, नंदकिशोर लांडगे, नितीन गायके, राजश्री मराठे, प्रिती वानखेडे, गजानन गायकवाड, महादेव सुरवसे, कल्पना देशमुख यांना ‘बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेली पाच दशके बंधुतेचा विचार जनमानसात रुजविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचा जन्मदिवस बंधुता दिन म्हणून साजरा करण्यात आला.
संगीता झिंजुरके म्हणाल्या, “कविता, संगीत आणि साहित्यावर प्रेम करणारी माणसे मानवतावादी असतात. साहित्यिकांमध्ये बंधुतेचा विचार घडवण्याची ताकद असते. जगाच्या नकाशावर बंधुतेचे स्थान अढळ करण्यासाठी बंधुतेची जाण असणारे साहित्यिक निर्माण व्हावेत. बंधुतेचा विचारातून मानवतेचे दर्शन कायम घडत आहे.”  
प्रकाश रोकडे म्हणाले, “समाजामध्ये वावरत असताना माणूस होणे गरजेचे आहे. कोणत्याही जातीचे लेबल न लावता बहुभाषीय, बहुधर्मीय होत आम्ही सारे भारतीय आहोत, हा विचार आपल्या मनात रुजला पाहिजे. ‘गर्व से कहो हम बंधू है’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम सुरु आहे. समाजातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका जपण्याचे कार्य व्हावे.”
प्रा. चंद्रकांत वानखेडे म्हणाले, “समाजाला एकसंध ठेवण्यासाठी बंधुतेचा धागा महत्वाचा आहे. जाती-धर्मातील, प्रांतातील भेदाभेद बाजूला ठेवून मानवतेच्या आणि बंधुतेच्या विचारांनी एकत्र आलो, तर जगात शांतता नांदेल. बंधुतेच्या मार्गावरील आपण सर्व पांथस्थानी हा विचार पुढे घेऊन जायला हवा.”
दुपारच्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन झाले. नितीन वायाळ (गुजरात), मधुश्री ओव्हाळ, गुलाब राजा फुलमाळी, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी झाले. यावेळी प्रा. संतोष काळे (पलूस) यांना बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार, डॉ. सुशील सातपुते यांना बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार आणि गोपाळ कांबळे (पुणे) यांना बंधुता प्रकाशगाथा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. अशोककुमार पगारिया, प्रदीप कदम यांनी मनोगते व्यक्त केली. हरिश्चंद्र गडसिंग यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. बंडोपंत कांबळे यांनी आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा दिमाखात साजरा

रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 2 :  किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे,  अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले तसेच इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच  नागरीक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी जातिभेद केला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली. महाराज त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते, जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. राज्य  सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरु केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्र निर्माणाचे व्हिजन दिले. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. आजही जलदुर्ग अढळपणे टिकून आहेत. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्व अद्भुत होते त्यांनी स्वराज्य ही स्थापन केले आणि सुराज्य ही स्थापन केले. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा”, या शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.

नवी दिल्ली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत, हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे, हे  शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही शिवरायांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली, गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनामनात पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे. यापुढील काळात किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंब तलवार देशात आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. महाराजांच्या जीवनावरील गॅझेटीयर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. याशिवाय, तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी पाच कोटी रुपये दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श जगभरातील लोकशाही मानणाऱ्या देशांनी घेतला आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ 1 जूनपासून करण्यात आला आहे.

दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि‌. 2 :- ‘दहावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर निवडीसाठी विविध मार्ग दिसू लागतात. या मार्गावरून पुढे जाण्यासाठी, आवडते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शालेय जीवनात दहावीची परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. हा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल, यशवंत, गुणवंतांचे मनापासून अभिनंदन. आपल्या या यशासाठी मार्गदर्शन करणारे गुरूजन, पाठबळ देणारे कुटुंबीय या सर्वांचेही अभिनंदन. या परीक्षेतील यशानंतर आपल्याला करिअरचे वेगवेगळे मार्ग खूणावू लागतात. हे मार्ग चोखंदळपणे, डोळसपणे निवडल्यास पुढे यश तुमचेच असेल. असे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी, त्यात यश मिळावे यासाठी देखील मनापासून शुभेच्छा !

काहीजणांना या परीक्षेतील यशाने हुलकावणी दिली असेल. तर त्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी. त्यासाठी फेर परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

पुण्यातील स्वराली राजपूरकरला दहावीच्या परीक्षेत मिळाले १०० टक्के,राज्यभरात १५१विद्यार्थ्यानी मिळविले १०० टक्के मार्क

राज्यातील 10 वीचा 93.83 टक्के; मुलींची बाजी ;पुण्याचा निकाल ९५.६४ टक्के

यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के

पुणे-

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. ९३.८३ टक्के इतका निकाल लागला असून दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.८७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ टक्के इतकी आहे.

विभागीय निकाल

मुंबई: 93.66 टक्के

पुणे: 95.64 टक्के

नाशिक: 92.22 टक्के

छत्रपती संभाजीनगर : 93.23 टक्के

कोकण: 98.11 टक्के

लातूर: 92.67 टक्के

नागपूर: 92.05 टक्के

कोल्हापूर: 96.73 टक्के

अमरावती: 93.22 टक्के

राज्यभरातून एकूण प्रविष्ट विद्यार्थी – 15 लाख, 29 हजार, 96

मुलांचा निकाल 92.05 टक्के

मुलींचा निकाल. 95.87 टक्के

दिव्यांगांचा निकाल. 92.49 टक्के

यामध्ये राज्यभरात १०० टक्के मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्याची संख्या १५१ इतकी असून त्यामध्ये पुण्यातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टिळक रोड येथील डीईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. त्या स्कूलमधील स्वराली राजपूरकर या विद्यार्थिनीला १०० टक्के मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वराली राजपूरकर हिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली की, मी वर्षभर दररोज दोन ते तीन तास अभ्यास करीत राहिले. त्यामुळे मला ९५ ते ९८ च्या दरम्यान मार्क मिळतील अशी अपेक्षा होती. पण आज ऑनलाईन रिजल्ट पाहिला. त्यावेळी १०० टक्के मार्क मिळाल्याचे पाहून विश्वास बसत नव्हता.

नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी – १५ लाख ४१ हजार ६६६
परीक्षा दिलेले नियमित विद्यार्थी – १५ लाख २९ हजार ९६
उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी – १४ लाख ३४ हजार ८९८

निकालाची टक्केवारी – ९३.८३

पुनर्परीक्षार्थी नोंदणी – ३७ हजार ७०४

परीक्षा दिलेले पुनर्परीक्षार्थी – ३६ हजार ६४८

उत्तीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी – २२ हजार ३२०

पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ६०.९०

खासगी विद्यार्थी नोंदणी – २१ हजार २१६

परीक्षा दिलेले खासगी विद्यार्थी – २० हजार ५७४

उत्तीर्ण झालेले खासगी विद्यार्थी – १५ हजार २७७

खासगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी – ७४.२५

नियमित आणि पुनर्परीक्षार्थी एकत्रित निकालाची टक्केवारी – ९३.०६

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या

दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 096 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 93.83 अशी आहे, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 60.90 अशी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय

नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 8,397 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,312 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले. त्यातील 7,688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.49 अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.

मुलींची आघाडी

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.87 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.05 इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.82 टक्क्यांनी जास्त आहे.

दहावीच्या एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर 23 हजार 013 शाळांपैकी 6,844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, तर 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.11 टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92.05 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 95.64, औरंगाबाद विभागात 93.23, मुंबई विभागात 93.66, कोल्हापूर विभागात 96.73, अमरावती विभागात 93.22, नाशिक विभागात 92.22 आणि लातूर विभागात 92.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

“खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर 

मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या वेगवेगळ्या कन्टेंटने चर्चेत असलेल्या अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॅार्मवर बहुप्रशंसित मल्याळम भाषेतील ‘खो-खो’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे.  ‘खो-खो’ हा २०२१ चा मल्याळम भाषेतील क्रिडा विषयवर आधारित चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांसाठी मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे.

‘खो-खो’ या चित्रपटाची कथा तिरुअनंतपुरममधील माजी अॅथलीट मारिया फ्रान्सिसभोवती फिरते, जिने काही विशिष्ट परिस्थितींमुळे राष्ट्रीय खो-खो संघात जाण्याची संधी गमावली होती. तिच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ती नंतर मुलींच्या शाळेत पीटी शिक्षिकेची नोकरी स्वीकारते.

‘खो-खो’ हा खेळ एका प्रतिभावान खेळाडूच्या अत्यंत संबंधित कथेची पार्श्वभूमी बनवते आणि तिच्या इच्छेची ठिणगी हसतमुख आणि मजेदार किशोरवयीन मुलांमध्ये हस्तांतरित करते. मुलींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनून ती स्वत: तिच्या करिअरमध्ये जे मिळवू शकली नाही ते मिळवण्याचा तिने कसा प्रयत्न केला याचे वर्णन या चित्रपटातून केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल रिजी नायर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री राजीषा विजयन मुख्य भूमिकेत असून  ममिता बैजू, रंजीत शेखर नायर आदी कलाकार आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एम डी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, “आमच्या जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी ‘खो-खो’ मराठीत प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रेक्षकांना त्याच्या मातृभाषेत चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून ‘खो-खो’ सारख्या चित्रपटाला मराठीत डब करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून संपूर्ण भारतातील प्रादेशिक भाषिक कंन्टेट एकत्र करून विशेष आकर्षक कथा प्रेक्षकांसाठी प्रदान करण्याच्या हक्काच्या प्लॅटफॅार्मची आम्ही बांधिलकी दर्शवितो.”

” अल्टिमेट वेलनेस वॉरियर ” अभिनेत्री शिल्पा शेट्टी !

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ठरली या मासिकाची मॅगझिन कव्हर ! 
अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनायपासून फिटनेस पर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनयाचा पलिकडे जाऊन या अभिनेत्री जे विविध व्यवसायात देखील गुंतवणूक केली आहे. ती नेहमीच तिच्या अनोख्या जीवन शैली मुळे चर्चेत असते.
फिट राहून समतोल आहार सांभाळून आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल सक्रियपणे बोलत असताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने वेलनेस वॉरिअरने ब्रँड् मध्ये गुंतवणूक केली. नवनवीन गुंतवणूक मध्ये फार्म टू टेबलसह ‘किसान कनेक्ट’ ब्रँडमध्ये आहे. 
ती एक खरी मल्टी स्टार आहे कारण तिने आई, अभिनेता, गुंतवणूकदार, रिअ‍ॅलिटी शो जज, फिटनेस उत्साही वेलनेस इन्फ्लुएंसर उद्योजक आणि बरच काही अश्या अनेक भूमिका बजावल्या आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी भारतीय पोलिस दलात रोहित शेट्टीच्या कॉप-व्हर्समध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ” सुखी ” मध्ये ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ” मॅग्नम ओपस केडीमध्ये ” चा पहिला लूक तिने  गुढीपाडव्याला आउट केला.

बॉलिवूड कलाकार अर्जुन कपूर यांच्या हस्ते जगातील पहिली फ्रँचाईझी सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग लाँच

सीएट टायटल प्रायोजक आणि टोयोटा हिलक्स या लीगची अधिकृत वाहन भागीदार

पहिला रेसिंग सीझन दिल्लीतील जेएलएन मैदानात ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होणार

टीएम एसएक्सआयने खेळ बनवला अधिक सोपा, नवे मापदंड प्रस्थापित

दिल्ली, – मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात मोठी क्रांती येत असून बॉलिवूड अभिनेते आणि सुपरक्रॉसचा चाहते असलेल्या अर्जुन कपूर यांनी सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे अनावरण केले. या लीगचे फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या (एफएमएससीआय) सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. ही लीग फ्रँचाईझी पद्धतीची पहिली सुपरक्रॉस रेसिंग लीग असून त्यामध्ये जगभरातील रायडर्स वेगवेगळे फॉरमॅट्स आणि विभागात खेळतील.

सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएस) मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यायासाठी सज्ज आहे. सीएट आयएसआरएसची टायटल प्रायोजक, तर टोयोटा हिलक्स अधिकृत वाहन भागीदार आहे. ब्रँड्स आणि लीगमधील ही भागिदारी नाविन्य, कामगिरी आणि मर्यादा पार करण्याविषयीच्या समान ध्येयांतून करण्यात आली आहे.

शुभारंभाचा सीझन नवी दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू मैदानात ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होईल व त्यानंतर मुंबई, पुणे, अहमदाबादसारख्या प्रमुख शहरात त्याचे आयोजन केले जाईल. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान या शहरातील चाहत्यांना कौशल्य, धाडसी मॅन्युव्हर्स, वेगवान अक्शन यातून उदयास येत असलेले नव्या प्रकारचे सुपरक्रॉस रेसिंग अनुभवता येईल.

‘सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने मोटरस्पोर्ट्स चाहत्यांची मने जिंकण्याचे, त्यातल्या थराराची अनुभूती चाहत्यांना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,’ असे सुपरक्रॉस इंडिया प्रा. लि. चे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे (सीआयएसआरएल) लाँच भारतीय मोटरस्पोर्ट्स आणि वाहन उद्योगासाठी महत्त्वाची घटना आहे. तरुण रायडर्सना आपले कौशल्य दाखवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय रायडर्ससह आपल्या गुणवत्तेचा विकास करण्यासाठी तसेच प्रायोजक आणि उत्पादकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व्यासपीठ पुरवण्याचे ध्येय लीगने ठेवले आहे. वाहन उत्पादकांनाही यात आपली अत्याधुनिक उत्पादने व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर करण्याची संधी मिळणार आहे. आयएसआरएल हे भारतात मोटरस्पोर्ट्सचा विकास करण्याच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. जागतिक स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे या क्षेत्राचा वाहन उद्योगावर चांगला परिणाम होईल.

यारप्रसंगी एफएमएससीआयचे अध्यक्ष श्री. अकबर इब्राहीम म्हणाले, ‘भारतात मोटरस्पोर्ट्स संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी एसएक्सआय टीमने हाती घेतलेल्या उपक्रमाने फेडरेशन भारावून गेली आहे. या उपक्रमामुळे भारतात जागतिक गुणवत्ता येण्यास मदत होईल, शिवाय तरुण गुणवत्तेला भारतात व्यासपीठ मिळेल. या उपक्रमामुळे या खेळात भारताला जागतिक नकाशावर स्थान मिळेल.’

श्री. अर्जुन कपूर म्हणाले, ‘लहानपणापासूनच मला सुपरक्रॉस रेसिंगमधला थरार आकर्षित करत आला आहे. आज या अद्भुत वातावरणात, गरजणाऱ्या इंजिन्सच्या सहवासात वावरताना मी भारावून गेलो आहे. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये जगातील सर्वोत्तम रायडर्स एकमेकांना कडवी टक्कर देतील, शिवाय सुपरक्रॉसचा थरार व आनंद पुढच्या पिढ्यांना अनुभवता यावा म्हणून नवा मार्ग आखून देतील.’

सीएट लिमिटेडचे प्रमुख विपणन अधिकारी श्री. लक्ष्मीनारायणन बी म्हणाले, ‘सुपरक्रॉस रेसिंग लीगचे टायटल प्रायोजक    होताना आम्हाला अभिमान वाटत आहे. स्पर्धात्मक क्रीडा कार्यक्रमांचा थरार, त्यासाठी वाटणारी तळमळ यांना पाठिंबा देण्याची आमची जुनी परंपरा या निमित्ताने परत अधोरेखित झाली आहे. २०१४ पासून सीएट डर्ट बायकिंग क्षेत्रात कार्यरत असून २०२३ मध्ये कंपनी नवी ग्रिप एमएक्स रेंज सादर करणार आहे. सीएटचे आधुनिक आणि उच्च कामगिरी करणारे टायर्स सुपरक्रॉसच्या आव्हानात्मक प्रदेशासाठी अगदी योग्य आहेत. त्याची चांगली पकड रायडर्सना आवश्यक नियंत्रण मिळवून देते. टायटल प्रायोजक या नात्याने आम्ही सुपरक्रॉस रेसिंगचा थरार आणि उर्जा उंचावण्याचे ध्येय ठेवले आहे. एक दमदार सीझन अनुभवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या उर्जादायी खेळाचा भाग होऊन भारतातील त्याच्या विकासासाठी व लोकप्रियतेसाठी योगदान देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.’

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या विक्री आणि धोरणात्मक विपणन विभागाचे उपाध्यक्ष श्री. अतुल सूद म्हणाले, पहिल्यावहिल्या भारतीय सुपरक्रॉस रेसिंग लीगसाठी अधिकृत वाहन भागीदार होताना आम्हाला आनंद होत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला टोयोटा हिलक्ससारख्या ऑफ- रोडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीबरोबर खास सुपरक्रॉस बाइक्सची वाहतूक करण्यासाठी आवश्यक मदत करण्याची संधी मिळाली आहे. जगभरातील मोटरस्पोर्ट्सरोबर आम्ही दीर्घकाळापासून काम करत आहोत आणि आता भारतात इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे.

सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगची पालक कंपनी टीम एसएक्सआय या उपक्रमाच्या केंद्रस्थानी असून त्याचे नेतृत्व माजी आंतरराष्ट्रीय रेसर्स ईशान लोखंडे, वीर पटेल आणि अश्विन लोखंडे करत आहेत. त्यांनी या खेळाचा अनुभव आणि त्याविषयी वाटणाऱ्या ध्यासाच्या मदतीने बारकाईने सर्व आयोजन केले आहे, त्यातील कच्चे दुवे जोडले आहेत आणि जागतिक पातळीवर सुपरक्रॉसची समीकरणे नव्याने प्रस्थापित होतील यावर भर दिला आहे. या खेळाचे सखोल ज्ञान आणि गुणवत्तेच्या मदतीने त्यांना सुपरक्रॉसचे नवे युग सादर करत जगभरातील चाहत्यांना आकर्षित करायचे आहे. 

तमन्ना भाटिया हिच्या ” जी करदा ” ची रिलीज डेट जाहीर !

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या शूटींग करण्यात व्यस्त आहे. ” जी करदा ”  ही तिची आतापर्यंतचा सर्वात प्रतिक्षित वेब शो येणार असून याची रिलीज डेट ठरली आहे. हा वेब शो 15 जून 2023 रोजी Amazon Prime Videos रिलीज होणार आहे. 
या वेबशो ची कथा सात मित्र त्यांच्या आयुष्यात काय घडतंय यावर भाष्य करणारी आहे. जेव्हा हे सगळे मित्र ते 30 वर्षांचे होतात तेव्हा त्यांचा मधील मैत्री आणि सहज सुंदर नात्यावर घडणारी ही गोष्ट आहे.
या वेब शो मध्ये  तमन्ना भाटिया, आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी, आणि सामवेदना सुवाल्का हे मित्रांच्या भूमिकेत आहेत. या वेब शो मध्ये सिमोन सिंग आणि मल्हार ठकर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अरुणिमा शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, हुसैन दलाल, अब्बास दलाल लिखित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित, आठ भागाचा हा वेब शो नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही.

होर्डिंग्जचे फ्लेक्सची करामत पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त :एमआयडीसीमध्ये भारनियमनाची शक्यता

चाकणमध्ये होर्डिंग्जमुळे ४६ हजार ग्राहकांची वीज खंडित

पुणे, दि. ०२ जून २०२३: चाकण येथील महापारेषणच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने सुमारे १० ते १५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यासाठी महावितरणकडून भारव्यवस्थापनाचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र विजेची मागणी अधिक असल्याने गरज भासल्यास चाकण एमआयडीसीमधील काही वीजवाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण येथील ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातून चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी (दि. १) मध्यरात्रीनंतर बिघाड झाला. त्याची तपासणी केला असता तो पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. त्यानंतर महापारेषणकडून नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या कामासाठी मंगळवार (दि. ६)पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान महापारेषणच्या या उपकेंद्रातील उर्वरित दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरवर नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा वीजभार टाकण्यात आला आहे. सध्या विजेची मागणी वाढली आहे व उर्वरित १० ते १५ मेगावॅट विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र गरज भासल्यास नानेकरवाडी, कुरुळी, एमआयडीसी, सारा सिटी, फोर्स मोटर्स, चिंबळी, आळंदी फाटा व खालुंब्रे या २२ केव्ही वीजवाहिन्यांवर दिवसा चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे. या सर्व वीजवाहिन्यांवर उच्चदाबाचे ७४ आणि लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकचे ३८५० असे एकूण ३९२४ ग्राहक आहेत. विजेच्या भारनियमनाची गरज भासल्यास संबंधित वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

चाकणमध्ये होर्डिंग्जमुळे ४६ हजार ग्राहकांची वीज खंडित – चाकण शहर व परिसरात गुरुवारी (दि. १) सायंकाळी वादळासह मुसळधार पूर्वमोसमी पाऊस झाला. या वादळात विविध ठिकाणी लावलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचे फ्लेक्स महावितरणच्या अनेक वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा केवळ होर्डिंग्जच्या फ्लेक्समुळे तर उर्वरित १० टक्के वीजपुरवठा मोठी झाडे व फांद्या यंत्रणेवर पडल्यामुळे खंडित झाल्याचे निदर्शनास आले. सायंकाळनंतर महावितरणकडून वीज यंत्रणेवरील फ्लेक्स काढणे व वीजतारांची दुरुस्ती करण्याचे काम अविश्रांत सुरू होते. शुक्रवारी (दि. २) पहाटे तीन वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र वादळामुळे उडालेले फ्लेक्स वीजवाहिन्यांच्या तारांवर पडल्याने चाकणमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला.