Home Blog Page 1514

“खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर 

मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या वेगवेगळ्या कन्टेंटने चर्चेत असलेल्या अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॅार्मवर बहुप्रशंसित मल्याळम भाषेतील ‘खो-खो’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे.  ‘खो-खो’ हा २०२१ चा मल्याळम भाषेतील क्रिडा विषयवर आधारित चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांसाठी मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे.

‘खो-खो’ या चित्रपटाची कथा तिरुअनंतपुरममधील माजी अॅथलीट मारिया फ्रान्सिसभोवती फिरते, जिने काही विशिष्ट परिस्थितींमुळे राष्ट्रीय खो-खो संघात जाण्याची संधी गमावली होती. तिच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ती नंतर मुलींच्या शाळेत पीटी शिक्षिकेची नोकरी स्वीकारते.

‘खो-खो’ हा खेळ एका प्रतिभावान खेळाडूच्या अत्यंत संबंधित कथेची पार्श्वभूमी बनवते आणि तिच्या इच्छेची ठिणगी हसतमुख आणि मजेदार किशोरवयीन मुलांमध्ये हस्तांतरित करते. मुलींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनून ती स्वत: तिच्या करिअरमध्ये जे मिळवू शकली नाही ते मिळवण्याचा तिने कसा प्रयत्न केला याचे वर्णन या चित्रपटातून केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल रिजी नायर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री राजीषा विजयन मुख्य भूमिकेत असून  ममिता बैजू, रंजीत शेखर नायर आदी कलाकार आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एम डी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, “आमच्या जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी ‘खो-खो’ मराठीत प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रेक्षकांना त्याच्या मातृभाषेत चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून ‘खो-खो’ सारख्या चित्रपटाला मराठीत डब करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून संपूर्ण भारतातील प्रादेशिक भाषिक कंन्टेट एकत्र करून विशेष आकर्षक कथा प्रेक्षकांसाठी प्रदान करण्याच्या हक्काच्या प्लॅटफॅार्मची आम्ही बांधिलकी दर्शवितो.”

” अल्टिमेट वेलनेस वॉरियर ” अभिनेत्री शिल्पा शेट्टी !

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ठरली या मासिकाची मॅगझिन कव्हर ! 
अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनायपासून फिटनेस पर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनयाचा पलिकडे जाऊन या अभिनेत्री जे विविध व्यवसायात देखील गुंतवणूक केली आहे. ती नेहमीच तिच्या अनोख्या जीवन शैली मुळे चर्चेत असते.
फिट राहून समतोल आहार सांभाळून आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल सक्रियपणे बोलत असताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने वेलनेस वॉरिअरने ब्रँड् मध्ये गुंतवणूक केली. नवनवीन गुंतवणूक मध्ये फार्म टू टेबलसह ‘किसान कनेक्ट’ ब्रँडमध्ये आहे. 
ती एक खरी मल्टी स्टार आहे कारण तिने आई, अभिनेता, गुंतवणूकदार, रिअ‍ॅलिटी शो जज, फिटनेस उत्साही वेलनेस इन्फ्लुएंसर उद्योजक आणि बरच काही अश्या अनेक भूमिका बजावल्या आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी भारतीय पोलिस दलात रोहित शेट्टीच्या कॉप-व्हर्समध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ” सुखी ” मध्ये ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ” मॅग्नम ओपस केडीमध्ये ” चा पहिला लूक तिने  गुढीपाडव्याला आउट केला.

बॉलिवूड कलाकार अर्जुन कपूर यांच्या हस्ते जगातील पहिली फ्रँचाईझी सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग लाँच

सीएट टायटल प्रायोजक आणि टोयोटा हिलक्स या लीगची अधिकृत वाहन भागीदार

पहिला रेसिंग सीझन दिल्लीतील जेएलएन मैदानात ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होणार

टीएम एसएक्सआयने खेळ बनवला अधिक सोपा, नवे मापदंड प्रस्थापित

दिल्ली, – मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात मोठी क्रांती येत असून बॉलिवूड अभिनेते आणि सुपरक्रॉसचा चाहते असलेल्या अर्जुन कपूर यांनी सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे अनावरण केले. या लीगचे फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या (एफएमएससीआय) सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. ही लीग फ्रँचाईझी पद्धतीची पहिली सुपरक्रॉस रेसिंग लीग असून त्यामध्ये जगभरातील रायडर्स वेगवेगळे फॉरमॅट्स आणि विभागात खेळतील.

सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएस) मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यायासाठी सज्ज आहे. सीएट आयएसआरएसची टायटल प्रायोजक, तर टोयोटा हिलक्स अधिकृत वाहन भागीदार आहे. ब्रँड्स आणि लीगमधील ही भागिदारी नाविन्य, कामगिरी आणि मर्यादा पार करण्याविषयीच्या समान ध्येयांतून करण्यात आली आहे.

शुभारंभाचा सीझन नवी दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू मैदानात ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू होईल व त्यानंतर मुंबई, पुणे, अहमदाबादसारख्या प्रमुख शहरात त्याचे आयोजन केले जाईल. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान या शहरातील चाहत्यांना कौशल्य, धाडसी मॅन्युव्हर्स, वेगवान अक्शन यातून उदयास येत असलेले नव्या प्रकारचे सुपरक्रॉस रेसिंग अनुभवता येईल.

‘सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने मोटरस्पोर्ट्स चाहत्यांची मने जिंकण्याचे, त्यातल्या थराराची अनुभूती चाहत्यांना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,’ असे सुपरक्रॉस इंडिया प्रा. लि. चे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे (सीआयएसआरएल) लाँच भारतीय मोटरस्पोर्ट्स आणि वाहन उद्योगासाठी महत्त्वाची घटना आहे. तरुण रायडर्सना आपले कौशल्य दाखवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय रायडर्ससह आपल्या गुणवत्तेचा विकास करण्यासाठी तसेच प्रायोजक आणि उत्पादकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व्यासपीठ पुरवण्याचे ध्येय लीगने ठेवले आहे. वाहन उत्पादकांनाही यात आपली अत्याधुनिक उत्पादने व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर करण्याची संधी मिळणार आहे. आयएसआरएल हे भारतात मोटरस्पोर्ट्सचा विकास करण्याच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. जागतिक स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे या क्षेत्राचा वाहन उद्योगावर चांगला परिणाम होईल.

यारप्रसंगी एफएमएससीआयचे अध्यक्ष श्री. अकबर इब्राहीम म्हणाले, ‘भारतात मोटरस्पोर्ट्स संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी एसएक्सआय टीमने हाती घेतलेल्या उपक्रमाने फेडरेशन भारावून गेली आहे. या उपक्रमामुळे भारतात जागतिक गुणवत्ता येण्यास मदत होईल, शिवाय तरुण गुणवत्तेला भारतात व्यासपीठ मिळेल. या उपक्रमामुळे या खेळात भारताला जागतिक नकाशावर स्थान मिळेल.’

श्री. अर्जुन कपूर म्हणाले, ‘लहानपणापासूनच मला सुपरक्रॉस रेसिंगमधला थरार आकर्षित करत आला आहे. आज या अद्भुत वातावरणात, गरजणाऱ्या इंजिन्सच्या सहवासात वावरताना मी भारावून गेलो आहे. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये जगातील सर्वोत्तम रायडर्स एकमेकांना कडवी टक्कर देतील, शिवाय सुपरक्रॉसचा थरार व आनंद पुढच्या पिढ्यांना अनुभवता यावा म्हणून नवा मार्ग आखून देतील.’

सीएट लिमिटेडचे प्रमुख विपणन अधिकारी श्री. लक्ष्मीनारायणन बी म्हणाले, ‘सुपरक्रॉस रेसिंग लीगचे टायटल प्रायोजक    होताना आम्हाला अभिमान वाटत आहे. स्पर्धात्मक क्रीडा कार्यक्रमांचा थरार, त्यासाठी वाटणारी तळमळ यांना पाठिंबा देण्याची आमची जुनी परंपरा या निमित्ताने परत अधोरेखित झाली आहे. २०१४ पासून सीएट डर्ट बायकिंग क्षेत्रात कार्यरत असून २०२३ मध्ये कंपनी नवी ग्रिप एमएक्स रेंज सादर करणार आहे. सीएटचे आधुनिक आणि उच्च कामगिरी करणारे टायर्स सुपरक्रॉसच्या आव्हानात्मक प्रदेशासाठी अगदी योग्य आहेत. त्याची चांगली पकड रायडर्सना आवश्यक नियंत्रण मिळवून देते. टायटल प्रायोजक या नात्याने आम्ही सुपरक्रॉस रेसिंगचा थरार आणि उर्जा उंचावण्याचे ध्येय ठेवले आहे. एक दमदार सीझन अनुभवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या उर्जादायी खेळाचा भाग होऊन भारतातील त्याच्या विकासासाठी व लोकप्रियतेसाठी योगदान देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.’

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या विक्री आणि धोरणात्मक विपणन विभागाचे उपाध्यक्ष श्री. अतुल सूद म्हणाले, पहिल्यावहिल्या भारतीय सुपरक्रॉस रेसिंग लीगसाठी अधिकृत वाहन भागीदार होताना आम्हाला आनंद होत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला टोयोटा हिलक्ससारख्या ऑफ- रोडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीबरोबर खास सुपरक्रॉस बाइक्सची वाहतूक करण्यासाठी आवश्यक मदत करण्याची संधी मिळाली आहे. जगभरातील मोटरस्पोर्ट्सरोबर आम्ही दीर्घकाळापासून काम करत आहोत आणि आता भारतात इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे.

सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगची पालक कंपनी टीम एसएक्सआय या उपक्रमाच्या केंद्रस्थानी असून त्याचे नेतृत्व माजी आंतरराष्ट्रीय रेसर्स ईशान लोखंडे, वीर पटेल आणि अश्विन लोखंडे करत आहेत. त्यांनी या खेळाचा अनुभव आणि त्याविषयी वाटणाऱ्या ध्यासाच्या मदतीने बारकाईने सर्व आयोजन केले आहे, त्यातील कच्चे दुवे जोडले आहेत आणि जागतिक पातळीवर सुपरक्रॉसची समीकरणे नव्याने प्रस्थापित होतील यावर भर दिला आहे. या खेळाचे सखोल ज्ञान आणि गुणवत्तेच्या मदतीने त्यांना सुपरक्रॉसचे नवे युग सादर करत जगभरातील चाहत्यांना आकर्षित करायचे आहे. 

तमन्ना भाटिया हिच्या ” जी करदा ” ची रिलीज डेट जाहीर !

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या शूटींग करण्यात व्यस्त आहे. ” जी करदा ”  ही तिची आतापर्यंतचा सर्वात प्रतिक्षित वेब शो येणार असून याची रिलीज डेट ठरली आहे. हा वेब शो 15 जून 2023 रोजी Amazon Prime Videos रिलीज होणार आहे. 
या वेबशो ची कथा सात मित्र त्यांच्या आयुष्यात काय घडतंय यावर भाष्य करणारी आहे. जेव्हा हे सगळे मित्र ते 30 वर्षांचे होतात तेव्हा त्यांचा मधील मैत्री आणि सहज सुंदर नात्यावर घडणारी ही गोष्ट आहे.
या वेब शो मध्ये  तमन्ना भाटिया, आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी, आणि सामवेदना सुवाल्का हे मित्रांच्या भूमिकेत आहेत. या वेब शो मध्ये सिमोन सिंग आणि मल्हार ठकर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अरुणिमा शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, हुसैन दलाल, अब्बास दलाल लिखित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित, आठ भागाचा हा वेब शो नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही.

होर्डिंग्जचे फ्लेक्सची करामत पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त :एमआयडीसीमध्ये भारनियमनाची शक्यता

चाकणमध्ये होर्डिंग्जमुळे ४६ हजार ग्राहकांची वीज खंडित

पुणे, दि. ०२ जून २०२३: चाकण येथील महापारेषणच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने सुमारे १० ते १५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यासाठी महावितरणकडून भारव्यवस्थापनाचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र विजेची मागणी अधिक असल्याने गरज भासल्यास चाकण एमआयडीसीमधील काही वीजवाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण येथील ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातून चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी (दि. १) मध्यरात्रीनंतर बिघाड झाला. त्याची तपासणी केला असता तो पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. त्यानंतर महापारेषणकडून नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र या कामासाठी मंगळवार (दि. ६)पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान महापारेषणच्या या उपकेंद्रातील उर्वरित दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरवर नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा वीजभार टाकण्यात आला आहे. सध्या विजेची मागणी वाढली आहे व उर्वरित १० ते १५ मेगावॅट विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र गरज भासल्यास नानेकरवाडी, कुरुळी, एमआयडीसी, सारा सिटी, फोर्स मोटर्स, चिंबळी, आळंदी फाटा व खालुंब्रे या २२ केव्ही वीजवाहिन्यांवर दिवसा चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे. या सर्व वीजवाहिन्यांवर उच्चदाबाचे ७४ आणि लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकचे ३८५० असे एकूण ३९२४ ग्राहक आहेत. विजेच्या भारनियमनाची गरज भासल्यास संबंधित वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

चाकणमध्ये होर्डिंग्जमुळे ४६ हजार ग्राहकांची वीज खंडित – चाकण शहर व परिसरात गुरुवारी (दि. १) सायंकाळी वादळासह मुसळधार पूर्वमोसमी पाऊस झाला. या वादळात विविध ठिकाणी लावलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचे फ्लेक्स महावितरणच्या अनेक वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा केवळ होर्डिंग्जच्या फ्लेक्समुळे तर उर्वरित १० टक्के वीजपुरवठा मोठी झाडे व फांद्या यंत्रणेवर पडल्यामुळे खंडित झाल्याचे निदर्शनास आले. सायंकाळनंतर महावितरणकडून वीज यंत्रणेवरील फ्लेक्स काढणे व वीजतारांची दुरुस्ती करण्याचे काम अविश्रांत सुरू होते. शुक्रवारी (दि. २) पहाटे तीन वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र वादळामुळे उडालेले फ्लेक्स वीजवाहिन्यांच्या तारांवर पडल्याने चाकणमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला.

1275 रेल्वे स्थानके केली जाणार अद्ययावत/आधुनिक

नवी दिल्ली, 1 जून 2023

रेल्वे मंत्रालयासाठीच्या संसद सदस्यांच्या सल्लागार समितीची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. भारतीय रेल्वेवरील खानपान सेवा आणि भारतीय रेल्वेवरील स्थानकांचा विकास- अमृत भारत स्थानक योजना या दोन विषयांचा चर्चेत समावेश होता.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अनेक खासदार उपस्थित होते.

भारतीय रेल्वेतील खानपान सेवेच्या मुद्द्यावर, सदस्यांना माहिती देण्यात आली. यानुसार भारतीय रेल्वेतून दररोज अंदाजे 1.8 कोटी प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांसाठी रेल्वे आणि स्थानकांमध्ये पुरेशा खानपान सुविधांची तरतूद आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत, रेल्वेने खानपान सेवांचे सखोल विश्लेषणच केले नाही तर खानपान व्यवसायात बदल घडवून आणण्यासाठी संरचनात्मक सुधारणाही सुरू केल्या आहेत.

प्रवाशांना स्थिर किंवा मोबाईल युनिटद्वारे खानपान सेवा पुरवल्या जातात.  पॅन्ट्री कार्स/मिनी पॅंट्री असलेल्या गाड्यांच्या 473 जोड्या आहेत आणि 706 जोड्या गाड्यांमध्ये  ट्रेनसाइड वेंडिंग सुविधा आहे.  भारतीय रेल्वेचे 9342 लहान आणि 582 मोठे स्थिर युनिट्स आहेत. यात जनआहार केन्द्र, फूड प्लाझा आणि उपहारगृहे (रिफ्रेशमेंट रूम्स) यांचा समावेश आहे.  भारतीय रेल्वेचे स्वत:चे खानपान धोरण आहे. रेल्वेच्या खानपान सेवेस वेगळे करुन रेल्वे प्रवाशांना दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे, याद्वारे अन्न तयार करणे आणि अन्न वितरण यामध्ये प्राथमिक फरक निर्माण करणे हा याचा उद्देश आहे.  मंत्रालयाने IRCTC ला रेल्वेमधील खानपान सेवांचे खाद्यपदार्थ ठरवण्याची लवचिकता दिली आहे. जेणेकरून प्रवाशांच्या विविध गटांच्या पसंतीनुसार प्रादेशिक पाककृती, हंगामी स्वादिष्ट पदार्थ आणि खाद्यपदार्थांचा समावेश केला जाईल.

भारतीय रेल्वेनेही ई-केटरिंग (खानपान सेवा) योजना सुरू केली आहे. रोकडरहित व्यवहाराची सुविधा मोबाईल आणि एका जागी असलेल्या खानपान केंद्रांवर उपलब्ध आहे. गुणवत्ता आणि सेवा मानकांची हमी देता यावी यासाठी खानपान सेवांचे लेखापरीक्षण त्रयस्थ संस्थेकडून केले जाते. खानपान सेवांचे निरीक्षण आणि पर्यवेक्षण करण्यासाठी नियमित आणि आकस्मिक तपासणी केली जाते.

भारतीय रेल्वे स्थानकांचे अद्ययावतीकरण /आधुनिकीकरण ही निरंतर चालू असलेली प्रक्रिया आहे, असे स्थानकांच्या विकासाच्या मुद्द्यावर सांगण्यात आले.  मध्य प्रदेशातील राणी कमलापती, गुजरातमधील गांधीनगर आणि कर्नाटकातील सर एम. विश्वेश्वरय्या या तीन रेल्वे स्थानकांचा आतापर्यंत पुनर्विकास/आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या तीन स्थानकांच्या उदाहरणाने मिळालेल्या अनुभवाच्या आधारे, भारतीय रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सातत्याने विकास व्हायला हवा असा विचार मांडते. यामध्ये स्थानकावरील सुविधांच्या अद्ययावतीकरणासाठी महायोजना तयार करणे आणि त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे या मुद्द्यांचा समावेश आहे. सुविधांची उपलब्धता सुधारणे, प्रतीक्षा कक्ष, शौचालये, लिफ्ट/एस्कलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनांद्वारे स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क, उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यवसाय बैठकीसाठी योग्य जागा अशा सुधारणांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक स्थानकाची स्वतंत्र गरज लक्षात घेऊन या सुधारणा केल्या जात आहेत.

या योजनेत इमारत सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाचे एकत्रीकरण, दिव्यांगजनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बलास्टलेस ट्रॅकची तरतूद, ‘रूफ प्लाझा’ या सुविधा आवश्यकतेनुसार, टप्प्याटप्प्याने, व्यवहार्यता लक्षात घेऊन उपलब्ध करून दिल्या जातील. दीर्घकालीन सुधारणा म्हणून स्थानकांचा विकास सिटी सेंटर म्हणून केला जाईल. सध्या या योजनेअंतर्गत 1275स्थानकांच्या अद्ययावतीकरणाचा /आधुनिकीकरणाचा विचार भारतीय रेल्वेने केला आहे.

दोन्ही विषयांवर सदस्यांनी काही मौल्यवान सूचना केल्या. रेल्वेमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानल्यानंतर बैठक संपली.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची ‘ एसआयटी ’ मार्फत चौकशी करा- मुंबई भाजपा सरचिटणीस आ. अमित साटम यांची मागणी

मुंबई- महापालिकेच्या विविध कामांमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळात झालेल्या १२ हजार कोटींच्या कामात निधीचा गैरव्यवहार, कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘ कॅग ’ ने ठेवला असून या प्रकरणांची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी व या संदर्भात प्राथमिक माहिती अहवाल ( एफआयआर ) दाखल करण्यात यावा , अशी मागणी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ. अमित साटम यांनी केली आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असल्याची माहिती साटम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते.
आ. साटम यांनी सांगितले की . १९९७ ते जून २०२२ या २५ वर्षांत मुंबई महापालिकेच्या विविध कामांत ३ लाख कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. याच अनुषंगाने नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या काळात झालेल्या सुमारे १२ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांमार्फत ( कॅग ) लेखा परीक्षण करण्यात आले. यात ३ हजार कोटींची कामे कोरोनासंबंधित होती. या लेखापरीक्षणात कॅग ने अनेक कामांमध्ये सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार, अधिकारांचा गैरवापर , शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. नोव्हेंबर २०१९ ते जून २०२२ या काळात महापालिकेने २१४ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे, निविदा न मागवताच वाटप केले. ४ हजार ७५६ कोटींची कामे ६४ कंत्राटदारांना देताना त्यांच्याबरोबर करारच करण्यात आला नव्हता . करार न केल्यामुळे महापालिकेला कंत्राटदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईच करता येत नाही. ३ हजार ३५६ कोटींच्या १३ कामांत थर्ड पार्टी ऑडिटर नियुक्त करण्यात आला नव्हता , असेही आ. साटम यांनी सांगितले. कॅग च्या या अहवालानुसार राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशांसारख्या निःपक्ष व्यक्तींचा समावेश असलेली विशेष तपास समिती ( एसआयटी ) नेमून चौकशी करावी व याप्रकरणी तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा , अशी मागणीही आ. साटम यांनी केली .

पुणे जी 20 समूहाच्या चौथ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीनिमित्त शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरात जनभागीदारी कार्यक्रम

नवी दिल्ली, 1 जून 2023

भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा जनतेच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यावर मुख्य भर देण्याच्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून शिक्षण मंत्रालय विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करत आहे. एफएलएन अर्थात पायाभूत साक्षरता आणि मोजणीच्या ज्ञानाची ग्वाही या संकल्पनेला मिश्र शिक्षणाच्या संदर्भात चालना देणे आणि पाठबळ देणे हे या कार्यक्रमांच्या आयोजनामागचे  उद्दिष्ट आहे.

हे लक्ष्य गाठण्यासाठी शिक्षण मंत्रालय सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या भागीदारीत देशभरात जनभागीदारी कार्यक्रम राबवत आहे. जनजागृतीबरोबरच विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणात समाज या विविध भागधारकांमध्ये जी 20, राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि पायाभूत साक्षरता व मोजणीचे ज्ञान (एफएलएन) याबद्दल अभिमानाची भावना तयार करणे हा त्यामागचा हेतू आहे. आजपासून (एक जून) सुरू झालेल्या या जनभागीदारी कार्यक्रमांत कार्यशाळा, प्रदर्शने, परिसंवाद आणि परिषदा असा भरगच्च कार्यक्रम आहे. 15 जून रोजी या कार्यक्रमांचा समारोप होईल. सर्व स्तरातील लोकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, पंचायत आणि शालेय अशा स्तरावर हे कार्यक्रम होणार आहेत.

महाराष्ट्रातील पुणे येथे चौथ्या शिक्षण कार्य गटाचे चर्चा सत्र होणार आहे. हा मुख्य जनभागीदारी कार्यक्रम 19 ते 21 जून दरम्यान होत आहे. 22 जून 2023 रोजी होणाऱ्या शिक्षण मंत्रिस्तरीय बैठकीने या कार्यक्रमाचा समारोप होईल.

मंत्रालयाद्वारे आयोजित कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • सर्व शाळांमध्ये जी 20, राष्ट्रीय शिक्षण धोरण, एफएलएन बद्दल जागृतीपर जनभागीदारी कार्यक्रम-1 ते 15 जून 2023.
  • 17 ते 22 जून 2023 या कालावधीत पुणे,  येथे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचे सादरीकरण
  • 17 आणि 18 जून 2023 रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्यामोजणीवर  2-दिवसीय राष्ट्रीय परिषद

आरक्षणाच्या नावाखाली मराठा व कुणबी यांच्यात भांडण लावण्याचे भाजपाचे षडयंत्र.

मुंबई, दि. १ जून
शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस सरकारने काम करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, केवळ शहरांची नावे बदलून काहीच उपयोग होणार नाही. औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांचे नामकरण झाले तरी अजून घोळ आहेच. आता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर ठेवल्याची घोषणा सरकारने केली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तीने धनगर समाजाला खूष करून श्रेय लाटण्याचा हा प्रयत्न दिसतो. याच धनगर समाजाला भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजाचे आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते पण अद्याप फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी हे सर्व सुरु आहे. अहिल्यादेवींनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही, सर्वांना सोबत घेऊन राज्य कारभार केला. भाजपा मात्र जाती-धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचे राजकारण करत आहे.
दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील राजमाता अहिल्यादेवी व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून त्यांचा अपमान करण्यात आला आणि आता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव शहराला दिले हा भाजपाचा दुतोंडीपणा आहे. महाराष्ट्र सदनात अहिल्यादेवी व सावित्रीबाईंच्या झालेल्या अपमानावर सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. जनतेला फसवणारे, लुटणारे, जनतेचे खिसे कापणारे भाजपा सरकार सर्व स्तरावर नापास आहे, त्यामुळे जनतेनेच भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे.

आरक्षणाच्या नावाखाली मराठा व कुणबी यांच्यात भांडण लावण्याचे भाजपाचे षडयंत्र.

आरक्षणाबदद्ल भारतीय जनता पक्षाची भूमिका सर्वांना माहित आहे, भाजपा हा आरक्षण विरोधी आहे. २०१४–१९ मध्ये राज्यात फडणवीस सरकार होते. त्यांच्याच सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टाने त्यावर ताशेरे ओढले. फडणवीस सरकरला अधिकार नसतानाही त्यांनी गायकवाड आयोग नेमला होता.
भाजपा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाची दिशाभूल करून कुणबी व मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत. भाजपाच्या या कुटनितीला मराठा व कुणबी समाज ओळखून आहे, समाज जागरुक आहे. तसेच भाजपाच्या कथनी व करनीला ओळखून आहेत. केवळ आपली राजकीय पोळी भाजपण्याचे काम भाजपा करत आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

मुंबई दि. १ : मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय 31 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांनी त्यांना दिलेल्या भूखंडावर इमारतींचे बांधकाम करुन आता ५० ते ६० वर्षांचा कालावधी झाला असून या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास  होणे आवश्यक होते. आता अशा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत नव्या धोरणाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था (Post war rehabilitation – २१९ ) अंतर्गत येणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास सुसाध्य व व्यवहार्य होण्यासाठी  अशा संस्थांमध्ये मूळ सभासदांच्या बाबतीत ९० टक्के मागासवर्गीय व १० टक्के अमागासवर्गीय हे प्रमाण जैसे थे ठेवून पुनर्विकासानंतर त्या जागेवर ज्या अतिरिक्त सदनिका तयार होतील. त्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्के व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्के राहील. कोणत्याही परिस्थितीत पुर्नविकासानंतर तयार झालेल्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाही.

पुनर्विकासानंतर २०% मागासवर्गीय सभासदांसाठी आरक्षित केलेल्या सदनिका / गाळे यांची विक्री ही मागासवर्गीय सदस्यांसाठी करताना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) मार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) निश्चित केलेल्या दराप्रमाणे उच्च उत्पन्न गट (HIG) व मध्यम उत्पन्न गट (MIG) यानुसार तेथील जागा व इमारतीच्या आकारावर अवलंबून असेल त्याप्रमाणे दर आकारण्यात येतील. पुनर्विकासानंतर तयार होणान्या इमारतींमध्ये मागासवर्गीय सभासदांना देण्यात येणाऱ्या सदनिका व खुल्या प्रवर्गातील सभासदांना देण्यात येणाऱ्या सदनिका या सारख्याच दर्जाच्या व समान सोयी-सुविधांयुक्त असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय सभासदांकरिता वेगळी व खुल्या प्रवर्गातील सभासदांकरिता वेगळी इमारत करण्यात येऊ नये. यासर्व बाबींची दक्षता घेण्याची जबाबदारी विकासकावर बंधनकारक राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सदन येथे ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ च्या वतीने राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन

नवी दिल्ली: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती निमित्त राजधानी नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ च्या वतीने राजमाता अहिल्यादेवी च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ चे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी, दिल्ली प्रदेश चे अध्यक्ष अतुल बोकरिया जैन, मोर्चा चे विशेष मार्गदर्शक श्रीराम जोशी व राष्ट्रीय खजिंनदार सुभाष लोखंडे तसेच अनेक मराठी कार्यकर्ते उपस्थित होते.
आज आहिल्या देवी होळकर ह्यांची २९८ वी जयंती आहे.
यावेळी आपल्या भाषणा मध्ये राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी ह्यानी अहिल्या देवी यांच्या कार्या बद्दल माहिती सांगितली व खजिनदार सुभाष लोखंडे ह्यानी उपस्थितांचे आभार मानले.

उन्हाळ्यात ग्राहकांच्या वाढीव मागणीसाठी महावितरणकडून १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी

 मुंबई,दि. १ जून २०२३: उन्हाळ्याच्या कालावधीत राज्यातील ग्राहकांची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यात लघुकालीन करार व पॉवर एक्सचेंजमधून एकूण १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी करून मागणीनुसार पुरवठा करण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

            उन्हाळ्यातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन महावितरणने ग्राहकांना जादा वीज पुरवठ्याचे नियोजन करण्याची सूचना मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार महावितरणने अधिकची वीज खरेदी केली. परिणामी मागणीनुसार वीज पुरवठा करता आला आणि कुठेही भारनियमन होऊ दिले नाही.

            उन्हाळ्यामुळे महावितरणच्या विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात विजेची कमाल मागणी अनुक्रमे २४,९८३ मेगावॅट व २४,३२६ मेगावॅट इतकी नोंदली गेली आहे. मे महिन्यातील कमाल मागणी २४,०४७ मेगावॅट होती.

            मार्च महिन्यात ३०० मेगावॅट, एप्रिलमध्ये ४०० मेगावॅट आणि मे महिन्यात ४०० मेगावॅट विजेच्या खरेदीसाठी लघुकालीन करार करण्यात आले होते. या माध्यमातून या तीन महिन्यात महावितरणने ६५६ दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी केली.

            उन्हाळ्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने पॉवर एक्सचेंजच्या सुविधेचाही लाभ घेतला आहे. विजेची उपलब्धता आणि दर ध्यानात घेऊन नियमितपणे पॉवर एक्सचेंजवरून वीज खरेदी केली जाते. महावितरणने पॉवर एक्सचेंजवरून मार्च महिन्यात १३९ दशलक्ष युनिट तर एप्रिल महिन्यात ३२९ दशलक्ष युनिट वीज खरेदी केली. मे महिन्यातील वीज खरेदी २१६ दशलक्ष युनिट इतकी होती.

            महावितरणने पंजाब व इतर काही राज्यांसोबत केलेल्या पॉवर बँकिंग कराराच्या आधारे मार्चमध्ये ५०० मेगावॅट, एप्रिलमध्ये ४५० मेगावॅट आणि मे महिन्यात २५० मेगावॅट वीज उपलब्ध केली. पॉवर बँकिंग करारात महावितरणकडे अतिरिक्त असलेली वीज अन्य राज्यांना दिली जाते व त्या बदल्यात महावितरणला गरज असेल त्यावेळी त्यांच्याकडून वीज घेतली जाते. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून गरजेनुसार १९०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करून पुरवठा करण्यात येत आहे.

            पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी राज्यात महावितरणकडून मोठ्या प्रमाणात पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर गरजेनुसार काही वेळ वीज पुरवठा खंडित करावा लागतो. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी वीज पुरवठा खंडित होतो. वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर महावितरणकडे वीज उपलब्ध असूनही ग्राहकांना पुरवठा करता येत नाही. तथापि, राज्यात मागणीनुसार उपलब्ध वीज नाही अशी समस्या महावितरणला जाणवलेली नाही.

काँग्रेसची २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली टिळक भवनमध्ये बैठक.

मुंबई, दि. १ जून २०२३
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दिनांक २ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बैठकीला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
शनिवार दिनांक ३ जून रोजी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरुर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील. तसेच लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष उपस्थित राहतील.

पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि १ :- देशातील विशेषतः मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे असून जपानसोबतचे सहकार्याचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध क्षेत्रातील सहकार्याच्या संधींबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राचे जपानशी सहकार्याचे संबंध आहेत. जपानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये होत असून या माध्यमातून जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारत आणि विशेषतः महाराष्ट्राशी विविध क्षेत्रात संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असल्याचे जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी सांगितले. सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यांसारख्या विविध क्षेत्रामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि संबंध अधिक दृढ होण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

शि.प्र. मंडळीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची निवड 

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यात नुकतीच पार पडली असून सभेमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची अध्यक्षपदी पुन्हा पुढील ५ वर्षांसाठी म्हणजेच २०२३-२०२८ या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार, अनिलकुमार रुईया, डॉ.पवन पोदार यांची नियुक्ती झाली आहे.

संस्थेच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या सभेचे अध्यक्षपद सूर्यकांत पाठक यांनी भूषविले. सभेस शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे व इतर नियामक मंडळ सदस्य देखील उपस्थित होते. तसेच शि.प्र. मंडळीचे ज्येष्ठ सभासद डॉ.न.म.जोशी, ज.गं.फगरे यांसह पुणे व सोलापूर येथून देखील इतर सदस्यही सभेला होते.   अ‍ॅड.एस.के.जैन, अ‍ॅड.नंदू फडके, गजेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेच्या चिटणीस राधिका इनामदार सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण चितळे यांनी आभार मानले. सरस्वती वंदनेने सभेची सुरुवात आणि पसायदानाने सांगता झाली.  
अ‍ॅड.नंदू फडके गेली ४२ वर्षे वकिली व्यवसाय करीत आहेत. प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी अनेक कामे बघितली आहेत. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे अनेक वर्षे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. तसेच गेली १० वर्षांहून अधिक काळ ते भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे गेली ५ वर्षे अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत.

गजेंद्र पवार हे बांधकाम व्यावसायिक असून पिनॅकल ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, महाराष्ट्र हौसिंग कॉर्पोरेशन, क्रिकेट मास्टर अ‍ॅकॅडमी यांसारख्या अनेक संस्था व संघटनांवर ते कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत असून निरामय ट्रस्ट पुणेचे विश्वस्त म्हणून काम पहात आहेत, अशी माहिती शि.प्र.मंडळी संस्थेच्या चिटणीस राधिका इनामदार यांनी दिली.