Home Blog Page 1515

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

मुंबई दि. १ : मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय 31 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांनी त्यांना दिलेल्या भूखंडावर इमारतींचे बांधकाम करुन आता ५० ते ६० वर्षांचा कालावधी झाला असून या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास  होणे आवश्यक होते. आता अशा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत नव्या धोरणाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.

मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था (Post war rehabilitation – २१९ ) अंतर्गत येणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास सुसाध्य व व्यवहार्य होण्यासाठी  अशा संस्थांमध्ये मूळ सभासदांच्या बाबतीत ९० टक्के मागासवर्गीय व १० टक्के अमागासवर्गीय हे प्रमाण जैसे थे ठेवून पुनर्विकासानंतर त्या जागेवर ज्या अतिरिक्त सदनिका तयार होतील. त्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्के व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्के राहील. कोणत्याही परिस्थितीत पुर्नविकासानंतर तयार झालेल्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाही.

पुनर्विकासानंतर २०% मागासवर्गीय सभासदांसाठी आरक्षित केलेल्या सदनिका / गाळे यांची विक्री ही मागासवर्गीय सदस्यांसाठी करताना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) मार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) निश्चित केलेल्या दराप्रमाणे उच्च उत्पन्न गट (HIG) व मध्यम उत्पन्न गट (MIG) यानुसार तेथील जागा व इमारतीच्या आकारावर अवलंबून असेल त्याप्रमाणे दर आकारण्यात येतील. पुनर्विकासानंतर तयार होणान्या इमारतींमध्ये मागासवर्गीय सभासदांना देण्यात येणाऱ्या सदनिका व खुल्या प्रवर्गातील सभासदांना देण्यात येणाऱ्या सदनिका या सारख्याच दर्जाच्या व समान सोयी-सुविधांयुक्त असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय सभासदांकरिता वेगळी व खुल्या प्रवर्गातील सभासदांकरिता वेगळी इमारत करण्यात येऊ नये. यासर्व बाबींची दक्षता घेण्याची जबाबदारी विकासकावर बंधनकारक राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सदन येथे ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ च्या वतीने राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन

नवी दिल्ली: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती निमित्त राजधानी नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ च्या वतीने राजमाता अहिल्यादेवी च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ चे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी, दिल्ली प्रदेश चे अध्यक्ष अतुल बोकरिया जैन, मोर्चा चे विशेष मार्गदर्शक श्रीराम जोशी व राष्ट्रीय खजिंनदार सुभाष लोखंडे तसेच अनेक मराठी कार्यकर्ते उपस्थित होते.
आज आहिल्या देवी होळकर ह्यांची २९८ वी जयंती आहे.
यावेळी आपल्या भाषणा मध्ये राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी ह्यानी अहिल्या देवी यांच्या कार्या बद्दल माहिती सांगितली व खजिनदार सुभाष लोखंडे ह्यानी उपस्थितांचे आभार मानले.

उन्हाळ्यात ग्राहकांच्या वाढीव मागणीसाठी महावितरणकडून १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी

 मुंबई,दि. १ जून २०२३: उन्हाळ्याच्या कालावधीत राज्यातील ग्राहकांची विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने मार्च, एप्रिल व मे महिन्यात लघुकालीन करार व पॉवर एक्सचेंजमधून एकूण १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी करून मागणीनुसार पुरवठा करण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

            उन्हाळ्यातील वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन महावितरणने ग्राहकांना जादा वीज पुरवठ्याचे नियोजन करण्याची सूचना मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार महावितरणने अधिकची वीज खरेदी केली. परिणामी मागणीनुसार वीज पुरवठा करता आला आणि कुठेही भारनियमन होऊ दिले नाही.

            उन्हाळ्यामुळे महावितरणच्या विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात विजेची कमाल मागणी अनुक्रमे २४,९८३ मेगावॅट व २४,३२६ मेगावॅट इतकी नोंदली गेली आहे. मे महिन्यातील कमाल मागणी २४,०४७ मेगावॅट होती.

            मार्च महिन्यात ३०० मेगावॅट, एप्रिलमध्ये ४०० मेगावॅट आणि मे महिन्यात ४०० मेगावॅट विजेच्या खरेदीसाठी लघुकालीन करार करण्यात आले होते. या माध्यमातून या तीन महिन्यात महावितरणने ६५६ दशलक्ष युनिट अतिरिक्त वीजखरेदी केली.

            उन्हाळ्यातील वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने पॉवर एक्सचेंजच्या सुविधेचाही लाभ घेतला आहे. विजेची उपलब्धता आणि दर ध्यानात घेऊन नियमितपणे पॉवर एक्सचेंजवरून वीज खरेदी केली जाते. महावितरणने पॉवर एक्सचेंजवरून मार्च महिन्यात १३९ दशलक्ष युनिट तर एप्रिल महिन्यात ३२९ दशलक्ष युनिट वीज खरेदी केली. मे महिन्यातील वीज खरेदी २१६ दशलक्ष युनिट इतकी होती.

            महावितरणने पंजाब व इतर काही राज्यांसोबत केलेल्या पॉवर बँकिंग कराराच्या आधारे मार्चमध्ये ५०० मेगावॅट, एप्रिलमध्ये ४५० मेगावॅट आणि मे महिन्यात २५० मेगावॅट वीज उपलब्ध केली. पॉवर बँकिंग करारात महावितरणकडे अतिरिक्त असलेली वीज अन्य राज्यांना दिली जाते व त्या बदल्यात महावितरणला गरज असेल त्यावेळी त्यांच्याकडून वीज घेतली जाते. विजेची गरज पूर्ण करण्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून गरजेनुसार १९०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करून पुरवठा करण्यात येत आहे.

            पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी राज्यात महावितरणकडून मोठ्या प्रमाणात पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर गरजेनुसार काही वेळ वीज पुरवठा खंडित करावा लागतो. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी कधी वीज पुरवठा खंडित होतो. वीज पुरवठा करणाऱ्या पारेषण कंपनीच्या उच्च क्षमतेच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर महावितरणकडे वीज उपलब्ध असूनही ग्राहकांना पुरवठा करता येत नाही. तथापि, राज्यात मागणीनुसार उपलब्ध वीज नाही अशी समस्या महावितरणला जाणवलेली नाही.

काँग्रेसची २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली टिळक भवनमध्ये बैठक.

मुंबई, दि. १ जून २०२३
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते व सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दिनांक २ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बैठकीला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
शनिवार दिनांक ३ जून रोजी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरुर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील. तसेच लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष उपस्थित राहतील.

पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि १ :- देशातील विशेषतः मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे असून जपानसोबतचे सहकार्याचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध क्षेत्रातील सहकार्याच्या संधींबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राचे जपानशी सहकार्याचे संबंध आहेत. जपानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये होत असून या माध्यमातून जपान आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक वृद्धिंगत होत आहेत, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारत आणि विशेषतः महाराष्ट्राशी विविध क्षेत्रात संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असल्याचे जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी सांगितले. सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यांसारख्या विविध क्षेत्रामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि संबंध अधिक दृढ होण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

शि.प्र. मंडळीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची निवड 

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी ची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यात नुकतीच पार पडली असून सभेमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.सदानंद उर्फ नंदू फडके यांची अध्यक्षपदी पुन्हा पुढील ५ वर्षांसाठी म्हणजेच २०२३-२०२८ या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी गजेंद्र पवार, अनिलकुमार रुईया, डॉ.पवन पोदार यांची नियुक्ती झाली आहे.

संस्थेच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या सभेचे अध्यक्षपद सूर्यकांत पाठक यांनी भूषविले. सभेस शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे व इतर नियामक मंडळ सदस्य देखील उपस्थित होते. तसेच शि.प्र. मंडळीचे ज्येष्ठ सभासद डॉ.न.म.जोशी, ज.गं.फगरे यांसह पुणे व सोलापूर येथून देखील इतर सदस्यही सभेला होते.   अ‍ॅड.एस.के.जैन, अ‍ॅड.नंदू फडके, गजेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेच्या चिटणीस राधिका इनामदार सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण चितळे यांनी आभार मानले. सरस्वती वंदनेने सभेची सुरुवात आणि पसायदानाने सांगता झाली.  
अ‍ॅड.नंदू फडके गेली ४२ वर्षे वकिली व्यवसाय करीत आहेत. प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी अनेक कामे बघितली आहेत. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे अनेक वर्षे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. तसेच गेली १० वर्षांहून अधिक काळ ते भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे गेली ५ वर्षे अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत.

गजेंद्र पवार हे बांधकाम व्यावसायिक असून पिनॅकल ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, महाराष्ट्र हौसिंग कॉर्पोरेशन, क्रिकेट मास्टर अ‍ॅकॅडमी यांसारख्या अनेक संस्था व संघटनांवर ते कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत असून निरामय ट्रस्ट पुणेचे विश्वस्त म्हणून काम पहात आहेत, अशी माहिती शि.प्र.मंडळी संस्थेच्या चिटणीस राधिका इनामदार यांनी दिली.

होंडा रेसिंग इंडियातर्फे २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250Rसाठी रायडर्स जाहीर

·         २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R मध्ये पाच नवे रायडर्स आपले कौशल्य दाखवणार

नवी दिल्ली, १ जून २०२३ – २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपसाठी होंडा रेसिंग इंडियाने आपल्या रायडर्सची टीम जाहीर केली आहे. कोईम्बतूरमधील कारी मोटर स्पीडवे येथे या वीकेंडला ही रेस होणार आहे.

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपच्या २०२३ सीझनमध्ये जबरदस्त रेसिंग पाहायला मिळणार असून मोटरसायकल रेसिंगचे भारतातील भविष्य कसे असेल याची झलक अनुभवता येईल. या पाच फेऱ्यांच्या सीझनमध्ये १४ गुणवत्तापूर्ण तरुण रायडर्स सहभागी होऊन होंडाचे प्रतिनिधीत्व करतील. NSF250R या मोटोथ्री रेस मशिनवर स्वार होत रायडर्स आपले कौशल्य दाखवून देतील. त्याशिवाय CBR150R नॉव्हिस विभागात चांगली कामगिरी केलेले पाच नवे रायडर्स टीममध्ये सहभागी होणार आहेत.

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी रायडर्सची नवी पिढी घडवण्यासाठी व्यासपीठ म्हणून उपयुक्त ठरत आहे. या प्रतिष्ठित मोटरसायकल कार्यक्रमात असामान्य गुणवत्ता आणि होंडाच्या उदयोन्मुख रेसर्सचे कौशल्य दिसून येणार आहे. या स्पर्धेत कडवी झुंज देत या रायडर्सना कोईम्बतूरच्या राष्ट्रीय रेसिंग सर्किटवर अविस्मरणीय कामगिरी करण्याची संधीही मिळणार आहे.

आगामी सीझनविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘तरुण गुणवत्तेचा विकास आणि भारतात मोटरसायकल रेसिंगचा प्रसार करण्याची आमची बांधिलकी इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपच्या माध्यमातून दिसून येते. या व्यासपीठाने भारतातील रेसिंगचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या स्पर्धेमुळे तरुण रायडर्सना चमकण्याची, आपले कौशल्य उंचावण्यासाठी व क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी आवश्यक संधी मिळते.’

२०२३ सीझनविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘आगामी इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये आमच्या तरुण रायडर्सची असामान्य गुणवत्ता पाहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आधीच्या फेऱ्यांमध्ये सातत्याने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आगामी रेसमधे त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. दृढनिश्चय आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे तरुण रायडर्स राष्ट्रीय पातळीवर जबरदस्त कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. NSF250R सारख्या ताकद, चपळाई आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मोटोथ्री मशिनचा दमदार पाठिंबा त्यांना लाभला आहे. त्यांच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास असून आगामी रेसमध्ये त्यांचे कौशल्य पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे.’

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपसाठी रायडर्सची टीम

२०२३ सीझन इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R मध्ये १४ तरुण आणि गुणवत्तापूर्ण रायडर्स होंडाच्या प्रतिष्ठित मोटोथ्री मशिनवर स्वार होतील. त्यामध्ये कविन क्विंतल (१८ वर्ष), श्याम सुंदर (१९ वर्ष), रक्षित एस दवे (१४ वर्ष), थिओपॉल लिएंडर (२२ वर्ष) चेन्नई, मलप्पुरमचे मोहसिन पी (२० वर्ष), एएस जेम्स (२१ वर्ष) आणि बेंगळुरूचे सॅम्युएल मार्टिन, बोकोरो स्टील सिटीचे प्रकाश कामत (१९ वर्ष) आणि बेळगावचे विवेक रोहित कपाडिया (२० वर्ष) यांचा समावेश आहे.

त्यांच्यासोबत मुंबईचे राहीश खत्री (१५ वर्ष), उत्तुरचे सिद्धेश सावंत (२१ वर्ष), बेंगळुरूचे हर्षित बोगार (१९ वर्ष), श्याम बाबू (१९ वर्ष) आणि हैद्राबादचे बिदानी राजेंद्र (१८ वर्ष) यांना CBR150R कपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

पावसाळ्यात पोलिसांनी नेमके करायचे काय?पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे यंत्रणांना निर्देश

पुणे, दि. १: पुणे शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले.

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात काल (गुरुवारी) आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महामेट्रो, टाटा मेट्रो, पी.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ, पी.एम.पी.एम.एल.चे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पुणे शहरामध्ये पावसाळ्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे व त्याचा राडारोडा रस्त्यावर असल्याने होणारी वाहतूक कोंडी, शहरात सुरु असलेली उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सुरु असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे आदींच्या अनुषंगाने उपाययोजनांविषयी विचारविनिमय करण्यात आला.

गटारे, नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे तसेच गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळी (स्टॉर्मवॉटर) पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वगैरे कामामुळे रस्त्यात पडलेला राडारोडा काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या.

पावसाळ्यामध्ये वाहतूक नियमानाकरीता पुणे मनपा, महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेस अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

आंबील ओढा, कोळेवाडी नाला, दळवी नगर चौक, आंबेगांव नाला, जांभुळवाडी नाला आदींच्या नालेसफाईबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पीएमपीएमएल बसेस नादुरुस्त होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत असेही सांगण्यात आले.

अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय रहावा याकरीता सर्व संबंधित स्वायत्त संस्थांच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार असून जलद प्रतिसादासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये तातडीने संदेशाचे आदानप्रदान करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

जन्माला घातलेलं अर्भक रस्त्यावर सोडण्याच्या प्रकारात वाढ

पुणे- पुण्याच्या संस्कृतीचे महत्व आणि गोडवे नेहमीच गायले जाते ,शिक्षणाचे माह्रेघर म्हणूनही पुणे ओळखले जाते पण आता अशा पुण्यात जन्माला घातलेले अर्भक (मुल ) रस्त्यावर सोडण्याच्या प्रकारात काही कमतरता होताना दिसत नाहीये .महात्मा गुले आणि सावित्री माई फुले यांनी रूढी परंपरा ना लाथाडून बनवू पाहिलेल्या सुसंस्कृत पुण्यात आता तातडीने अशा घटनांकडे लक्ष देऊन उचित सामाजिक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानतळ पोलीस आणि येरवडा पोलीस यांना आपल्या हद्दीत जन्माला घातलेले आणि रस्त्यावर सोडलेली २ मुले प्राप्त झाली आहेत.वास्तविक पाहता अशा घटना वारंवार सुरु आहेत ,पण या प्रकरणी आता पुण्याने गंभीर दाखल घेण्याची वेळ आली आहे पहाटे ४ वाजता विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंद्रीय विद्यालयाच्यारस्त्याच्या कडेच्या भिंतीलगत एक अर्भक मिळून आले आहे.गोरी छान १ ते दीड फुट हाईट असलेली ५ एक दिवसांची मुलगी कोणीतरी येथे सोडून निघून गेले आहे.फौजदार वाकडे 9175603088याप्रकरणी तपास करत आहेत. पोलीस नाईक विजय भोसले यांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आगाखान पूल कल्याणीनगर पदपथाच्या कठड्याजवळ रात्री साडेआठ ते नऊ च्या दरम्यान साधारणतः ४ ते ५ दिवसांची आणखी मुलगी (अर्भक )कोणीतरी सोडून गेले आहे.बबलू शेख यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून फौजदार गायकवाड 7709130917अधिक तपास करत आहेत .

एनटीसी गिरणी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांचा पुढाकार

मुंबई
एनटीसी गिरणी कामगारांच्या मागण्या त्वरित पूर्ण व्हाव्यात आणि त्यांच्या थकीत पगारापोटीचे पैसे तातडीने मिळावेत याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी संवाद साधला. याप्रश्नी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली. केंद्र सरकार एनटीसी गिरणी कामगारांच्या पाठीशी असून त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

मार्च २०२० पासून एनटीसी गिरण्या बंद आहेत. या कामगारांना पूर्ण पगार देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असताना अर्धा पगार दिला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तोही पगार दिला गेला नाही. दरम्यान, गिरणी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात होते. याबाबतची बातमी कानावर येताच एनटीसी गिरणी कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हलाखीची परिस्थिती ओढवू नये याकरिता तातडीने मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पुढाकार घेतला आहे. याआधी मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या ११ चाळींच्या पुनर्विकासासाठी आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पुढाकार घेवून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाशी संपर्क करत या चाळींचा पुनर्विकास व्हावा म्हणून पाठपुरावा केला आहे. केंद्रीय मंत्र्यांना भेटून याबाबत निवेदही त्यांनी दिले होते. आता एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लागेल असा विश्वास आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

पीएमपीएमएल बसमधील चोऱ्यांचे प्रमाणात प्रचंड वाढ

पुणे- इलेक्ट्रोनिक बस आणल्या, बीआरटी ला स्वतंत्र लेन हवी , बस स्थानकांवर, बसेसवर जाहिरातीतून प्रचंड महसूल हवा ,शिवाय पुणे आणि पिंपरी महापालिकेने दरवर्षी शेकडो कोटीची मदत तर कार्याला हवी शिवाय फुकटच्या जागा डेपो आणि पार्किंगसाठी द्यायला हव्यात कारण हि सामाजिकदृष्ट्या राबविलेली सार्वजनिक सेवा आहे,धंदा नाही ..हे सारे खरे असले तरी पीएमपीएमएलने नागरिक किती वर्षे प्रवास करतात ..सुरुवातीची ३/ ४ वर्षे नंतर आपापली दुचाकी घेतात आणि कामाला सुटतात हि वास्तवता आहे अशाच पार्श्वभूमीवर आता पीएमपी ला आणखी एका मोठ्या संकटाने ग्रासले आहे. पण ज्याकडे ना पोलिसांचे लक्ष ना,पीएमपीएमएल च्या प्रशासनाचे लक्ष .. ते म्हणजे या बस प्रवासात होणाऱ्या चोऱ्या …

कुठे किती चोऱ्या झाल्या ? चोऱ्यांचे हॉट स्पॉट कोणते ? गेल्या प्रत्येक सहामाहीचा डाटा या दोघांकडे उपलब्ध नाही,ना त्यावर काई उपाय योजना करण्याची मानसिकता नाही .

दरम्यान नेहमीप्रमाणे चोऱ्या माऱ्या सुरूच आहेत .वाघोली च्या एका ४६ वर्षीय महिलेचे पाटस ते हडपसर प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन पर्स मध्ये ठेवलेले ५० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले .काल सकाळी हा प्रकार घडला . हद्प्सारचे पोलीस अंमलदार अशोक निकम 8888829480 याप्रकरणी तपास करत आहेत.

स्वारगेट येथून कात्रज ला निघालेली महिला बस मध्ये चढत असताना तिच्या मनगटातील ८७५०० रुपयांची सोन्याची पातळी कट करून चोरट्याने पळविली सायंकाळी पावणेसह वाजता हि चोरी झाली .आंधळे नावाचे अंमलदार याप्रकरणी तपास करत आहेत ज्यांचा मोबाईल क्रमांक नाही पण ̈020/24452769 हा नंबर देण्यात आला आहे.

‘गोदावरी’ चित्रपट ३ जूनपासून जिओ सिनेमावर मोफत 

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला, निखिल महाजन यांचा ‘गोदावरी’ हा चित्रपट जिओ सिनेमावरील डिजिटल प्रीमियरद्वारे आणखी अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे. ३ जूनपासून हा चित्रपट जिओसिनेमावर विनाशुल्क स्ट्रीम करता येणार आहे. जीतेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव आणि संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या एका कुटुंबाभोवती फिरते. भावना, आव्हाने आणि मानवी नातेसंबंधांच्या नाजूक पदरांचा वेध हा चित्रपट सुंदररित्या घेतो. नदीच्या रम्य पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटाची कथा निखिल महाजन व प्राजक्ता देशमुख यांची आहे. २०२१ मध्ये व्हँकुव्हर चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. खिळवून ठेवणारी कथा आणि अप्रतिम अभिनयासाठी या चित्रपटाचे तेथे खूप कौतुक झाले.  

‘गोदावरी’चा डिजिटल प्रीमियर च जूनपासून मोफत पाहता येईल केवळ जिओसिनेमावर!

ऊर्जा निर्मितीमध्ये पुणेकरांचे ‘सौर’ उड्डाण २५४ मेगावॅटवर

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे दहा हजारांवर सौर ऊर्जा प्रकल्प

पुणे, दि. ०१ जून २०२३: महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यात आला असून पुणे परिमंडलात चांगल्या प्रतिसादामुळे तब्बल २५३.९४ मेगावॅट क्षमतेचे १० हजार १७० सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक व सोसायटीच्या घरगुती ७ हजार ५८० ग्राहकांकडील ७२ मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचा समावेश आहे. तर ९६.७९ मेगावॅट क्षमतेचे आणखी ३ हजार ५८० प्रकल्पांचे काम सुरू आहे.

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल सातत्याने आढावा घेत आहेत. तर संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनी परिमंडलांना भेटी देत या योजनेला वेग दिला आहे.

घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येत आहे. उदा. ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी सुमारे १ लाख २४ हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे सुमारे ४९ हजार ६०० रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात सुमारे ७४ हजार ४०० रुपयांचा खर्च करावा लागेल. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येत आहे.

पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत उच्च व लघुदाबाच्या ७५८० घरगुती ग्राहकांकडे ७२ मेगावॅट, १३६४ वाणिज्यिक- ३६.११ मेगावॅट, ६४१ औद्योगिक- ११०.२८ मेगावॅट आणि इतर ५८५ ग्राहकांकडे ३५.५५ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर १७.८३ मेगावॅटचे २८८० घरगुती, १५.०१ मेगावॅटचे ३४३ वाणिज्यिक, ५५.६४ मेगावॅटचे २२४ औद्योगिक तर ८.३१ मेगावॅटचे १३३ इतर वर्गवारीतील सौर प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे.

पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना मोठा वेग देण्यात आला आहे. यामध्ये गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच निवडसूचीवरील ‘सौर’च्या ४५ एजन्सीजच्या प्रतिनिधींना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोबतच सर्व ४१ उपविभाग कार्यालयांतील सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) आणि ‘सौर’ एजन्सीजच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा नुकतीच झाली.

मनोगत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार – छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे घरगुती वैयक्तिक व सोसायट्यांच्या वीजबिलांच्या खर्चात कपात होऊन त्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे २५ वर्ष लाभ होतो. यासह सौर प्रकल्पाच्या यंत्रणेला लावलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे. वीजबिलातील आर्थिक बचत व पर्यावरणस्नेही म्हणून वीजग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा.

————————

पुणे परिमंडलातील कार्यान्वित झालेले सौर ऊर्जा प्रकल्प
  वर्गवारी पुणे शहर  पिंपरी चिंचवड शहरआंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुके
ग्राहकसंख्या व क्षमता (मेगावॅटमध्ये)
घरगुती४८७७ – ४८१८४८ – १६.७७८५५ – ७.२३
वाणिज्यिक८४९ – २०.२६२२२ – ६.३४२९३ – ९.५१
औद्योगिक१०२ – ६.४३१८० – १८.७४३५९ – ८५.११
इतर२७२ – १५.३११३३ – ८. ५५१८० – ११.६९
एकूण६१०० – ९० मे.२३८३ – ५०.४० मे.१६८७ – ११३.५४ मे.

मनोज बाजपेयींच्या फॅमिली मॅनपासून अमित साधच्या दुरंगापर्यंत असे अनेक वेबशो च्या नव्या सीझन पाहण्यासाठी नेटिझन्स उत्सुक ! 


ओटीटी शोने त्याच्या आकर्षक कथा आणि  प्रेक्षकांचा मूड ओळखून अनेक नवीन वेब शो ओटीटी वर रिलीज केले. प्रेक्षकांना त्यांच्या वेळेनुसार हवं ते बघता यावं उत्तम कथाचा आनंद घेता यावा या साठी अनेक वेब सिरीज सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.  गेल्या तीन वर्षात काही आकर्षक आणि तितक्याच लक्षवेधी वेब शो प्रेक्षकांनी पाहिले आणि आता लवकरच त्यांचे नवीन सीझन येणार आहेत ज्याची सगळेच आतुरतेने वाट बघतात !
फॅमिली मॅन सीझन 3:
द फॅमिली मॅनचा पहिला आणि दुसरा सीझन यशस्वीपणे चालल्या नंतर लवकरच याचा तिसरा सीझन येणार आहे. अभिनेता मनोज बाजपेयी हे श्रीकांत तिवारी म्हणून घराघरात प्रसिद्ध  झाले जो एक मध्यमवर्गीय माणूस आहे जो गुप्तपणे थ्रेट अॅनालिसिस अँड सर्व्हिलन्स सेल (TASC) साठी गुप्तचर अधिकारी म्हणून काम करतो. समंथा रुथ प्रभू हिने प्रतिपक्षाची भूमिका साकारल्याने दुसरा सीझन देखील तितकाच उत्साह वर्धक ठरला. आता चाहते तिसरा सीझन प्रसारित होण्याची आणि बाजपेयी पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये पाहण्याची प्रेक्षक वाट बघतात. 
मेड इन हेवन सीझन 2:
तारा आणि करण, दिल्लीतील दोन वेडिंग प्लॅनर, ‘मेड इन हेवन’ या कंपनीचे मालक आहेत. या मालिकेने प्रेक्षकाची मन तर जिंकली आणि प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं.आता प्रेक्षक तारा आणि करणच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 
मिर्झापूर सीझन 3:
मिर्झापूरचा पहिला सिझन झटपट हिट झाला. इंडस्ट्रीतील काही सर्वोत्कृष्ट कलाकारांची कलाकृती यातून सगळ्यांनी अनुभवली. या क्राईम अ‍ॅक्शन थ्रिलरने हा वेब शो सुपरहिट ठरला. आता तिसरा सीझन मध्ये काय पाहायला मिळणार या साठी सगळेच वाट बघतात. 
आर्या सीझन 3:सुष्मिता सेन सारख्या शक्तिशाली अभिनेत्रीने या प्रकल्पाचे नेतृत्व केल्याने, एखाद्याला माहित होते की आर्या कमालीची वेब सीरिज असणार आहे. सेनला शहरातील नवीन लेडी-डॉन म्हणून ओळखल जातंय आणि आता प्रेक्षक तिसरा सीझन येण्याची आतुरतेने वाट बघतात. 
दुरंगा सीझन 2:दुरंगाचा सीझन 1 इतका लोकप्रिय ठरल्यानंतर लवकरच या वेब  शो चा नवीन  सीझन येणार आहे. गुलशन देवैया आणि दृष्टी धामी यांच्या मोहक कामगिरीसह, अभिनेता अमित साधने ‘दुरंगा’ सीझन 1 मध्ये एक कमालीचा कॅमिओ केला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून आणि निर्मात्यांकडून खूप प्रेम मिळालं. आता अमित दुरंगा सीझन 2 मध्ये एक मनोरंजक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाल्याचं समजतंय. या सीझनमध्ये त्याचे पात्र कसं असणार आहे या साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दहावी बोर्डाचा निकाल बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या जाहीर होणार आहे.

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

असा पाहा निकाल

स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.