Home Blog Page 1516

भारतरत्न सचिन तेंडुलकर कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रश्नी तुम्ही गप्प का? काही महिला लैंगिक अत्याच्याराविरोधात उठवत आहेत. मात्र, तुमच्यातील माणुसकी गेली कुठे?

मुंबई-भारतरत्न सचिन तेंडुलकर कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रश्नी तुम्ही गप्प का? काही महिला लैंगिक अत्याच्याराविरोधात उठवत आहेत. मात्र, तुमच्यातील माणुसकी गेली कुठे? असे सवाल करणारे होर्डिंग मुंबई प्रदेश युवक काँग्रेसने सचिनच्या मुंबईतल्या घरासमोर लावलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सचिनच्या मौनावर टीका केली होती. आता सचिन यावर तरी काही बोलणार का, हे एनारा कालच सांगेल

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी असताना ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेची मागणी करत साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी 23 एप्रिलपासून धरणे आंदोलन सुरू केले. नव्या संसद भवनाच्या उदघाटनादिवशी या इमारतीसमोर महापंचायत भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आंदोलन पोलिसांनी मोडून काढले.

खेळाडूंनी आपली पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतकरी नेत्यांनी त्यांचे मन वळवले. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला फिरकीपटू अनिल कुंबळे, बॉक्सर विजेंदर सिंह, भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी पाठिंबा दिला. मात्र, इतर खेळाडूंनी या आंदोलनाची दखलही घेतली नाही. त्यामुळेच सचिन तेंडुलकरवरही टीका होत आहे.

सचिन तेंडुलकरच्या घरासमोर मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्ता रंजीता गोरे यांनी मोठे फलक लावले होते. मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला सणसणीत उत्तर तुम्ही दिलं होतं की आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नको… आणि आज मात्र सचिन तुझे तेच देश प्रेम कुठे गेले आहे??, असे विचारण्यात आले आहे.

सह्याद्रि हॉस्पिटल्सने पुण्यात जीवनदान देणारी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली

पुणे,: पश्चिम भारतातील रुग्णालयांची मोठी शृंखला असलेल्या सह्याद्रि हॉस्पिटल्सने जीवन वाचवणारी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन जिमखाना येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेमुळे हृदय प्रत्यारोपणाच्या हॉस्पिटलच्या विक्रमात भर पडली असून हि संख्या आता आठ वर पोहोचली आहे. डॉ. मनोज दुराईराज, मुख्य हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक आणि सह्याद्रि रुग्णालयातील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल टीमने या गंभीर शस्त्रक्रिये दरम्यान असामान्य कौशल्य आणि उमेद दाखवली.

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची प्राप्तककर्ती 27 वर्षीय रुग्ण, अदिती (नाव बदलले आहे), डायबेटिक कार्डिओमायोपॅथीने ग्रस्त होती आणि हृदयविकाराच्या शेवटच्या लढाईशी झुंज देत होती. अदितीच्या हृदयाचे कार्य अतिशय बिघडले होते. ज्यामुळे गंभीर स्वरूपाचा श्वास लागणे, वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आणि लक्षणीयरित्या वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसू लागली होती. गेल्या काही वर्षांत इतर सर्व वैद्यकीय उपचार पर्याय संपल्यानंतर, तिच्यासाठी हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग उरला होता. प्रत्यारोपणाशिवाय आदितीची जगण्याची शक्यता फार कमी होती, कारण तिचे हृदय फक्त 20 टक्के कार्यरत होते.

सह्याद्रि रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने व्यापक तयारी करून योग्य ती खबरदारी घेतल्यानंतरच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यारोपणासाठी प्राप्तकर्त्याची योग्यता सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक इम्यूनोलॉजिकल वर्कअप आयोजित केले गेले. यामध्ये कुठल्याही जंतुसंसर्गाचा अभाव, लसीकरणाचा इतिहास आणि प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकणार्‍या मूत्रपिंड किंवा यकृत संबंधित रोगांच्या अनुपस्थितीचे मूल्यांकन करणे याचा समावेश होता. याव्यतिरिक्त, दात्याच्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी प्राप्तकर्त्याच्या फुफ्फुसांच्या दाबाची देखील तपासणी केली गेली.

प्रत्यारोपणासाठी लागणारे हृदय एका 40 वर्षीय गृहस्थ विनोद (नाव बदलले आहे) यांनी उदारपणे दान केले होते. ज्यांनी रस्त्यावरील एका अपघातात दुःखदपणे आपला जीव गमावला होता. दात्याचे हृदय अदितीसाठी सुसंगत असल्याचे आढळून आले आणि प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. अवयवदात्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा अवयव दानाचा निर्णय हा वैयक्तिक दुःखात असूनही इतरांना जीवनदान देऊन आपली उदात्त वचनबद्धता दर्शवणारा होता.

यशस्वी हृदय प्रत्यारोपणाबद्दल उत्साह व्यक्त करताना डॉ. मनोज दुराईराज, मुख्य हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक आणि सह्याद्रि रुग्णालयातील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख, यांनी सांगितले की, “हे यश आमच्या सह्याद्रि हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथकाच्या कौशल्याचा आणि अतूट बांधिलकीचा पुरावा आहे. आम्ही पूर्ण केलेली हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी पूर्तता केवळ आपल्या रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय सेवा प्रदान करण्याच्या आमच्या समर्पणाचे प्रदर्शन करत नाही तर वैद्यकीय प्रगतीच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड देखील दर्शवते. जीवन सुधारण्याच्या सामायिक उत्कटतेने प्रेरित असलेल्या आमच्या प्रवीण आरोग्यसेवा तज्ञांच्या पथकाच्या महत्त्वपूर्ण सहकार्यातूनआम्ही अवयवदानाची परिवर्तनीय शक्ती अनेकदा पाहिली आहे. अवयवदानामुळे गरजूंचे जीवन बदलते आणि त्यांना नवीन आशा देते. हे एक निःस्वार्थी कृत्य आहेजे अनेकांना जीवनाची दुसरी संधी देते. आम्ही सर्वांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी अवयवदानाच्या अतुलनीय देणगीचा जरूर विचार करावा आणि इतरांना उज्वल भविष्य देण्याच्या उदात्त प्रयत्नात आमच्यासोबत सामील व्हावे.” 

सह्याद्रि हॉस्पिटल्सने हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडलेच, पण या अवयव दात्याच्या कुटुंबीयांनी इतर अवयव सुद्धा दान केल्यामुळे शहरातील अन्य रुग्णालयात देखील अनेकांचे प्राण वाचू शकले. अवयवदानाच्या या नि:स्वार्थी कृतीमुळे केवळ जीवदान देणारेरी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तर शक्य झालीच पण त्याचबरोबर यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड प्रत्यारोपणाची गरज असलेल्या प्राप्तकर्त्यांना देखील एक नवीन आशा मिळाली.

योग्य अवयव दाता मिळाल्यानंतर आणि सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतर ही शस्त्रक्रिया 31 मे 2023 रोजी अगदी पहाटेच चालू झाली. वैद्यकीय पथकाचे समर्पण आणि वचनबद्धता, अवयव दात्याची वेळेवर उपलब्धता यामुळे ही तारीख पुण्याच्या वैद्यकीय इतिहासात संस्मरणीय ठरली.

प्रत्यारोपणाच्या टीममध्ये हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक – डॉ मनोज दुराईराज, डॉ राजेश कौशिश आणि डॉ सुमित अगस्ती. ट्रान्सप्लांट ऍनेस्थेटिस्ट – डॉ शंतनू शास्त्री आणि डॉ प्रिती अदाते. परफ्युजनिस्ट- डॉ प्रशांत धुमाळ आणि डॉ अमर जाधव. ऑपरेशन थिएटरमधील श्री मुकेश अडेली, श्रीमती सुमन आणि मिस पूजा यांचा समावेश होता. श्रीमती शर्मिला पाध्ये आणि श्री अजिंक्य बोराटे यांचा हृदय प्रत्यारोपण समन्वयक म्हणून समावेश होता.

‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर

     सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालन हे   ‘कोण होणार करोडपती’या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर येणार आहेत. दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे आणि या भागात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. या बाप-लेकीबरोबर  रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. त्याशिवाय ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर दोन सचिन एकत्र असतील. तेही नक्कीच गमतीदार असेल. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार चिरतरुण व्यक्तिमत्त्व सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर.

                             चित्रपट सृष्टीत तब्बल ६० वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगांवकर ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत.सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे त्यांच्या बालपणापासूनच उमटवले आहेत. तसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या वेब मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आजवर आली. श्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेत. सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. सचिन पिळगांवकर म्हणले की, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी  वकिलाची भूमिका कधीच केली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केली. सचिन पिळगांवकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाही, हे शक्य नाही. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही  सादर केले आणि ‘कोण होणार करोडपती’चा मंच काही काळासाठी संगीतमय झाला.

‘कोण होणार करोडपती’ विशेष, ३ जून,  शनिवारी रात्री ९ वाजता,सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल

शहरातील नाट्यगृहांच्या नूतनीकरणासाठी नागरिकांकडून सूचना मागवा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश; नाट्यगृहांच्या सध्यस्थितीचा घेतला आढावा

पुणे, दि.१: शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी जून अखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून सूचना मागवाव्यात आणि १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट अखेरपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पुणे शहरातील सर्व नाट्यगृहांच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त चेतना केरुरे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, बालगंधर्व रंगमंदिराच्या मूळ वास्तूचे नूतनीकरण करण्यात यावे. रंगमंदिराच्या स्वच्छतेसाठी अनुभवी संस्थेची नेमणूक करून नीटपणे स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घ्यावी.  रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी नागरिकांकडून सूचना मागवाव्यात आणि जून अखेरपर्यंत सर्व कामांच्या निविदा काढण्यास सुरुवात करावी. दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात यावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या लक्षात घेता नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद करण्याबाबत एक महिनापूर्वी पूर्वसूचना देण्यात यावी.

श्री गणेश कला क्रीडा मंच येथे वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात यावी. प्रत्येक नाट्यगृहातील कामांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नूतनीकरणाची कामे करताना नाट्यकलावंतांकडूनही त्यांच्या अपेक्षा जाणून घ्याव्यात. पं. भीमसेन जोशी कलामंदिराच्या रॅम्पचे काम त्वरीत करावे. अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे दुरुस्तीचे कामही करण्यात यावे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतन इमारतीचे उर्वरित काम पुढील तीन महिन्यात पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पाषाण भागातील समस्यांचा आढावा

पाषाण-सूस रोडवरील अतिक्रमणाचे काम जून अखेरपर्यंत करावे. स्मार्ट सिटीअंतर्गत जनतेच्या दृष्टीने आवश्यक कामांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. पाषाण परिसरातील रस्त्यांची कामे तेथील जागेचे प्रश्न सोडवून तात्काळ सुरू करावीत. नागरिकांच्या समस्या सोडविताना त्यांच्याशी संवाद साधावा आणि कामात येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात. १० जूनपर्यंत बाणेर-बालेवाडी आणि पाषाण भागातील पाण्याची समस्या दूर होईल याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण; सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

मुंबई, दि. ३१ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार, ६ जून रोजी देखील सकाळी ८.३० वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचाड येथे १ ते ६ जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेटवे ऑफ इंडिया येथे ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

याशिवाय, १ जून ते ७ जून या काळात गेटवे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. १ जून रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य, २ जून रोजी राजस्थानी लोककला, ३ व ४ जून रोजी महाराष्ट्राची लोककला तसेच ५ ते ७ जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सोबतच १ ते ७ जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विनामूल्य सन्मानिका श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, दामोदर हॉल, परळ, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, गडकरी रंगायतन, ठाणे, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे, येथे उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दि.2 व 6 जून 2023 रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास येणाऱ्या शिवभक्त जनतेसाठी अत्यावश्यक सेवा, सोयीसुविधांसह त्यांच्या स्वागत आणि  तत्पर सेवेसाठी  प्रशासन सज्ज झाले आहे. या शिवराज्याभिषेकाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणारी शिवभक्तांची प्रचंड गर्दी पाहता रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने 33 समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

शिवभक्तांच्या आरोग्यासाठी सुविधा

नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने राज सदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, नियंत्रण कक्ष, निवारा कक्ष, आराम कक्ष या ठिकाणी त्याचबरोबर एसटी वाहन चालक, पोलीस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत. शिवभक्तांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या 4 तर बेसिक लाईफ सपोर्ट सुविधा असणाऱ्या 16 ॲब्म्युलन्स  सज्ज ठेवल्या आहेत. पार्किंग, गड पायथा, पायरीमार्गावर प्रत्येकी 300 मीटर अंतरावर आणि गडावर आरोग्य अधिकारी, तज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पुरेसा औषधसाठा यासह एकूण 24 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून 104 डॉक्टर्स व 350 आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सज्ज ठेवण्यात आले आहेत.

सोहळ्यावर राहणार सीसीटीव्हीड्रोनचे लक्ष

सोहळ्याला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम, वॉकी टॉकी, हॅम रेडिओ, पोर्टेबल साऊंड, सर्च लाईट, वीज अटकाव यंत्रणा आदि साधन-साहित्यांची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. यासह सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी  नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे.

अग्निशमन व्यवस्था सज्ज

पार्किंग, बस डेपो, गड पायथा, गडावरील सर्व मंडप, भोजन कक्ष अशा सर्व आवश्यक  ठिकाणी एकूण चार अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

शिवभक्तांच्या वाहनांकरिता वाहनतळ व्यवस्था; एसटीच्या 150 बसेस तैनात

संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मार्गांनी रायगड किल्ल्याकडे येणाऱ्या शिवभक्तांसाठी सोयीस्कर वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर महाड नातेखिंड या मार्गाने येणाऱ्या वाहनांकरिता कोंझर पार्किंग क्रमांक एक व कोंझर पार्किंग क्रमांक दोन, वालसुरे पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई, पेण, कोलाड, माणगाव, धनगर फाटा, कवळीचा माळ तसेच पुणे, ताम्हाणी,निजामपूर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था ही कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत 150 बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत.

रायगड जिल्हा प्रशासनातर्फे मंडप, वीजपुरवठा, गर्दी नियंत्रण, अग्निशमन, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे व वापरावयाचे पाणी, भोजन, स्नानगृह व शौचालय, स्वच्छता, कचरा, परिवहन, पार्किंग, रोप-वे, रस्ते, मोबाईल नेटवर्क, पोलीस बंदोबस्त, सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ल्याचे सौंदर्यीकरण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध बाबींचे  नियोजन करण्यात आले  आहे.

झाराप आणि इन्सुली पुलासाठी 68 कोटी, व्हाईट टॉपींगसाठी 38 कोटी आंबोली – रेडी रस्ता क्राँक्रीटीकरणाचा प्रस्ताव-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी,- गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा सण असून महायुती सरकारच्या माध्यमातून मुंबई – गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरु असून येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण होणार आहे. यामुळे गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज सिंधुदुर्ग येथे व्यक्त केला.तसेच या महामार्गावर अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॅाट आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप या दोन ठिकाणी होणाऱ्या पुलांसाठी 68 कोटींना तसेच जुन्या रस्त्यावरील व्हाईट टॉपींगसाठी 38 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. आंबोली – रेडी रस्ता क्रॉंक्रीटीकरण करण्याचा प्रस्तावही पाठवला असून, तोही लवकरच मार्गी लावला जाईल, अशी माहितीही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
पालकमंत्री चव्हाण यांनी आज सकाळी झाराप येथून मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी करण्यास आज सुरुवात केली. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
या पाहणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. पत्रादेवी ते झाराप आणि सावंतवाडीकडून येणारा रस्ता यामुळे झाराप तिठ्यावर अपघात होत होते. या ठिकाणी तसेच इन्सुली येथे पुलाच्या कामास मंजुरी देण्यात आली असून लवकरच ते पूर्ण होईल, असे सांगून पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, हा संपूर्ण रस्ता पूर्वी झालेला आहे. त्यासाठी व्हाईट टॉपींग करण्यासाठीही मंजुरी देण्यात आलेली आहे. मुबई ते गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून लोकप्रतीनिधींचे सहकार्य,अधिकारी कंत्राटदार यांचीही मेहनत यासाठी असल्याचेही ते म्हणाले.
कुडाळ येथील आरएसएन हॉटेल नजिक होणारे अपघात रोखण्यासाठी, कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची लोकप्रतिनिधींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या ठिकाणची पालकमंत्री चव्हाण यांनी पाहणी करुन, त्यांनी तेथे आयलॅंड करण्याचे निर्देश यावेळी दिले. वेताळ बांबार्डे येथील प्रलंबित भूसंपादनाचे प्रस्ताव आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेशही प्रांताधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिले.
कणकवली – वागदे फाटा येथे पाहणी करुन पालकमंत्री चव्हाण म्हणाले, हा ब्लॅकस्पॉट आहे. या ठिकाणी अपघात झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी येथे मोठे आरसे लावा त्याचबरोबर नव्याने काही बदल करणे आवश्यक असेल तर ते करा. त्यासाठी नवीन प्रस्ताव करण्यासाठी हरकत नाही, पण ठोस उपाययोजना करा.
यावेळी आमदार नितेश राणे, संदेश पारकर हे ही उपस्थित होते. खारेपाटणपर्यंत पालकमंत्री चव्हाण यांनी पाहणी करत एन एच आय च्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यादरम्यान ठिक-ठिकाणी ग्रामस्थ पालकमंत्र्यांना भेटून निवेदने देत होते. ते स्वीकारुन पालकमंत्र्यांनी त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक, विद्यापीठे व उद्योगांसाठी ‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’ तयार करणार – राजदूत डॉ. राल्फ हेकनर

मुंबई, दि. 31 : भारतात किमान 330 स्विस कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी 150 एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे स्वित्झर्लंडसाठी सर्वात महत्त्वाचे राज्य असून भारताशी मुक्त व्यापार करार करुन हे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी स्वित्झर्लंड प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत डॉ. राल्फ हेकनर यांनी केले आहे.

डॉ. राल्फ हेकनर यांनी मंगळवारी (दि. 30) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे येथे नुकतीच आपण सार्वजनिक व खासगी विद्यापीठांच्या प्रमुखांशी भेट घेतली. विद्यापीठांमध्ये होत असलेल्या संशोधनाचा व्यापाराला लाभ व्हावा, याकरिता स्वित्झर्लंडच्या पुढाकाराने उद्योग व विद्यापीठांसाठी एक सामायिक ‘नाविन्यता व्यासपीठ’ (‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’) सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे राजदूतांनी सांगितले.

या व्यासपीठावर आयआयटी सारख्या संस्थांनादेखील घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो 22 देशांमध्ये राबविला जाईल, असेही ते म्हणाले.

“स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघाची व्यापार, आरोग्य विषयक कार्यालये आहेत. तसेच दावोस येथे दरवर्षी जागतिक आर्थिक परिषद होते. या दोन्ही ठिकाणी भारताचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे भारताच्या मताची  दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते”, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तोवर भारताला विकसित राष्ट्र करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे नमूद करून या उद्दिष्ट प्राप्तीसाठी भारत – स्वित्झर्लंड मुक्त व्यापार करार होणे आवश्यक असल्याचे हेकनर यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड – भारत मुक्त व्यापार करार झाल्यास कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील, याची माहिती धोरणकर्त्यांना तसेच उद्योगजगताला देण्यासाठीच आपण मुंबई भेटीवर आलो असल्याचे डॉ. हेकनर यांनी सांगितले.

कोरोना संसर्गानंतर स्विस दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड मात्रा उपलब्ध करून दिल्याबद्दल हेकनर यांनी भारताचे आभार मानले. स्वित्झर्लंडला भारताकडून अधिक गुंतवणूक तसेच नाविन्यता व संशोधन सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यश चोप्रा यांनी स्वित्झर्लंड येथे आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण केल्यामुळे दरवर्षी अडीच ते तीन लाख भारतीय पर्यटक स्वित्झर्लंडला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड भारताचा 11 वा मोठा गुंतवणूकदार देश असून मुंबईतील वाणिज्य दूतावास 108 वर्षांपासून कार्यरत असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. स्वित्झर्लंड सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व औषधीनिर्माण या क्षेत्रातील कौशल्यप्रधान देश असून उभय देशांत कौशल्य आदान – प्रदान करार झाल्यास भारतातील युवकांच्या कौशल्याचा अनेक देशांना फायदा होईल,असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठांचा कुलपती या नात्याने उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी – तसेच अध्यापक – आदानप्रदान वाढावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. बैठकीला स्वित्झर्लंडचे मुंबईतील वाणिज्यदूत मार्टिन माईर हे देखील उपस्थित होते.

 अनिल कपूरनेने अधिकृतपणे ” नाईट मॅनेजरच्या ” दुसऱ्या सीझनची केली घोषणा !

” द नाईट मॅनेजर ” च्या दुसऱ्या सीझन ची घोषणा ! 

अभिनेता अनिल कपूरने सोशल मीडिया च्या माध्यमातून  नाईट मॅनेजरच्या दुसऱ्या सीझन ची केली घोषणा ! 
अभिनेता अनिल कपूर चा ” द नाईट मॅनेजर ” या वेब सीरिज ची जोरदार चर्चा झाली पहिल्या सीझनला प्रेक्षकांचं अनोखं प्रेम मिळालं. अनिल च्या अभिनयाची जादू या वेब शो मध्ये देखील पहायला मिळाली आणि आज अनिल कपूर याने त्याचा सोशल मीडिया वरून ” द नाईट मॅनेजर २ ” ची अधिकृत घोषणा केली  आहे पुन्हा एकदा हा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सगळ्यांना याची उत्सुकता आहे. 
शेवटच्या एपिसोड नंतर सगळयांना या वेब शो च्या पुढच्या सीझनची उत्सुकता होती. दुसरा सीझन तयार होत असताना, अनिल कपूरने सोशल मीडियावर या सुपरहिट वेब शो ची  रिलीज डेट आणि सीझन दोनची अधिकृत घोषणा केली आहे.
इथे बघू शकता ! https://www.instagram.com/p/Cs5cH1sKtX1/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
” द नाईट मॅनेजरमधील शेली रुंगटा पात्राने सगळ्यांची मन जिंकली. अभिनेता अनिल कपूर यांच्याकडे रणबीर कपूरसोबत अॅनिमल, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर, त्यानंतर सुभेदार आणि अँड्रॉइड कुंजप्पन Ver 5.25 चे हिंदी रूपांतरित हे आगामी प्रोजेक्ट्स आहेत !

मंत्रालयात तंबाखूमुक्तीची शपथ

मुंबई, दि. 31 : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना त्रिमूर्ती प्रांगणात तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

सामाजिक न्याय विभाग व नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यसनमुक्ती सापशिडीचे  आयोजन करण्यात आले होते. तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, पोस्टर्स, पत्रक  मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात लावण्यात आले होते. नशाबंदी मंडळ व आरोग्य आयुक्तालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. ३१: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली शाळा आणि अंगणवड्यांची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शाळा वर्गखोली, स्वच्छतागृह बांधकाम, पिण्याचे पाणी, वाचनालय आदी सुविधांच्या प्रस्तावित ४०० कामांची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात यावी. १५ जूनपर्यंत कामांना सुरुवात करण्यात यावी. मनरेगा, स्वच्छ भारत अंतर्गत काम करणाऱ्या यंत्रणांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.

बांधकामासाठी जागा उपलब्ध असलेल्या अंगणवाडी कामाबाबत गावनिहाय माहिती सादर करावी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अपेक्षित खर्च सादर करण्यात यावा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल. जुलैच्या प्रारंभी शाळा व अंगणवाडी कामांचा आढावा घेण्यात येईल. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीचा प्रस्तावही सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात साथजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पावसाळ्याच्या कालावधीत रजेवर जाऊ नये याबाबत सूचना द्याव्यात, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. वाघमारे यांनी गतवर्षी झालेल्या शाळा, अंगणवाडी बांधकाम तसेच रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण

मुंबई दि. 31 : बारामती, जि.पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव म्हणून आज याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी दिली.

सन २०१३ च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रूग्ण खाटांचे रूग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन २०१९ च्या शासन निर्णयान्वये प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून शिस्तप्रिय, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. अशा राजमातेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ठाणे व पालघर जिल्ह्यातील ६० महिलांचा सन्मान

मुंबई,दि, ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कारप्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवावे. त्यामुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींमधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता काळे बनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सरपंच,पुरस्कार प्राप्त महिला उपस्थित होत्या.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७८९७ ग्रामपंचायतींमध्ये  सुमारे ५५,७९४ महिलांना पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले.

0000

जी-२० बैठकीच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याची प्रगती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवावे- अपर सचिव अभिषेक सिंग

पुणे, दि. ३१: जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे १२ ते १४ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठकीच्या आयोजनप्रसंगी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याच्या प्रगतीचे प्रदर्शन करतानाच महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन परिषदेच्या सदस्यांना घडवावे, असे निर्देश केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हीजनचे अपर सचिव अभिषेक सिंग यांनी दिले.

जी-२० बैठकीच्या नियोजनासंबधी आढावा बैठक आज विधान भवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव सुशिल पाल, उपसचिव अनुपम आशिष चौहान, विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.

श्री. सिंग म्हणाले, बैठकीच्या नियोजनामध्ये कोणतीही त्रुटी राहू याची दक्षता घ्यावी. पाहुण्यांना पालखी सोहळाच्या निमित्ताने आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून द्यावी. वारीबद्दल क्युआर कोड आणि घडीपुस्तिकेच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी. जेवणाच्यावेळी महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची देखील ओळख करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.

बैठकीच्या आयोजनाच्या तयारीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. सर्व संबधित विभागांनी समन्वयाने कामे करावीत, पुण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे, येथील खाद्यसंस्कृती, स्मार्ट सिटी, स्वच्छ पुणे, आदी वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रशासनाला मोठा अनुभव असून जानेवारी २०२३ मध्ये जी-२० प्रतिनिधींच्या पहिल्या बैठकीचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. १२ ते १४ जून दरम्यान आयोजित बैठकीसाठी आवश्यक तयारी प्रशासनातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सुरु आहे. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पुण्याची वैशिष्ट्ये आणि क्षमता ठळकपणे दिसतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असून ऐतिहासिक व महत्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक संकुल आदी ठिकाणी प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. आषाढी वारी आणि बैठकीच्या आयोजनासंबधी ताळमेळ ठेवण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीच्या निमित्ताने शहर स्वच्छता, महत्वाच्या चौकांचे व मार्गाचे सुशोभीकरण आणि रात्री विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

असे होईल पाहुण्यांचे स्वागत
बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींचे विमानतळावर पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने सनई-चौघड्याद्वारे स्वागत करण्यात येणार आहे. विमानतळावरील सजावट करताना बैठकीच्या विषयाच्या अनुषंगाने डिजिटल संकल्पना केंद्रीत ठेवण्यात आली आहे. पाहुण्यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजनाचेवेळी सांस्कृतिक कार्यक्रमात माँसाहेब जिजाऊ वंदन, दिंडी, शेतकरी नृत्य, मंगळागौर, गोविंदा, कोळी नृत्य, लावणी, धनगर नृत्य, गोंधळी आणि शिवराज्याभिषेक सोहळा सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

प्रवेशप्रक्रिया १ जूनपासून सुरु होणार

मुंबई, दि. 31 : शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास 01 जून 2023 पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून  https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मागील चार वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका ही रोजगारक्षम बनण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याचा तसेच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून  ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी यासाठी हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले.

तंत्र शिक्षण संचालक श्री. मोहितकर म्हणाले की, मागील चार वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने, राज्यातील तंत्रनिकेतनांद्वारे “स्कूल कनेक्ट” हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिराती, रेडिओ मुलाखती अशा विविध उपक्रमाद्वारे संस्थांनी आपले योगदान दिले आहे.

तसेच औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन 9 शासकीय व 30 विनानुदानित संस्थामध्ये  2हजार 460 प्रवेशक्षमतेचे  न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये  Artificial Intelligence (AI) and Machine Learning; Mechatronics; Automation and Robotics; Cloud Computing and Big Data, Computer Engineering and IoT अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 41 टक्के, 2019-20 मध्ये 50 टक्के, 2020-21 मध्ये 60 टक्के व 2021-22 मध्ये 70 टक्के होती. तर 2022-23 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 85 टक्के झालेली आहे.

शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येची सरासरी टक्केवारी 97 टक्के आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता एकुण 375 संस्थांची प्रवेशक्षमता जवळपास 1 लाख आहे.

पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता अध्यापनाच्या प्रक्रियेची अंमलबजावणी ऐच्छिक स्वरुपात “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” माध्यमातून राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये, विकल्प अर्ज भरताना उमेदवारांना “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” अभ्यासक्रम ठळकपणे दर्शविण्यात येणार आहेत.

पदविका प्रवेश प्रक्रिया :

10 वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10 वी चा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी  कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया दि. 01 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.

विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई-स्क्रुटीनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणाली वर देण्यात येणार आहे.

सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सुविधा केंद्रांना / संस्थांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास त्याचे निवारण नोडल अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेचे टप्पे उदा. नोंदणी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननीची पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमुना भरणे, इ. या महत्त्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार  आहेत. त्याचबरोबर या संकेतस्थळावर पदविका प्रवेश प्रक्रियेची थोडक्यात माहिती देणारे सादरीकरण, विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपटदेखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते अगदी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

ज्या उमेदवाराला कॅपफेरी दरम्यान जागा वाटप केली गेली जाईल त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट यावर्षीही शिथिल करण्यात आलेली आहे.

जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅप फेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिनमधून करु शकणार आहे व त्यानुसार उमेदवारांना जागा स्वीकृतीची कार्यवाही त्यांच्या लॉगीन मधून पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत श्री मेंगाई देवी भक्त निवास बांधकामाचे भूमिपूजन

पुणे, दि. ३१: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती वेल्हे अंतर्गत श्री मेंगाई देवी भक्त निवास बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी गट विकास अधिकारी पंकज शेळके, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता विकास कुलकर्णी, देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष प्रकाश पवार आदी उपस्थित होते.

क-वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत मोजे वेल्हे बु. येथील श्री मेंगाई देवी भक्त निवास बांधकामासाठी १० लक्ष रुपये निधी उपलब्ध झालेला आहे.