मुंबई
एनटीसी गिरणी कामगारांच्या मागण्या त्वरित पूर्ण व्हाव्यात आणि त्यांच्या थकीत पगारापोटीचे पैसे तातडीने मिळावेत याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी संवाद साधला. याप्रश्नी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. अॅड. आशिष शेलार यांनी केली. केंद्र सरकार एनटीसी गिरणी कामगारांच्या पाठीशी असून त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.
मार्च २०२० पासून एनटीसी गिरण्या बंद आहेत. या कामगारांना पूर्ण पगार देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असताना अर्धा पगार दिला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तोही पगार दिला गेला नाही. दरम्यान, गिरणी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात होते. याबाबतची बातमी कानावर येताच एनटीसी गिरणी कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हलाखीची परिस्थिती ओढवू नये याकरिता तातडीने मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी पुढाकार घेतला आहे. याआधी मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या ११ चाळींच्या पुनर्विकासासाठी आ. अॅड. आशिष शेलार यांनी पुढाकार घेवून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाशी संपर्क करत या चाळींचा पुनर्विकास व्हावा म्हणून पाठपुरावा केला आहे. केंद्रीय मंत्र्यांना भेटून याबाबत निवेदही त्यांनी दिले होते. आता एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लागेल असा विश्वास आ. अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.